सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ संध्याछाया सुखविती हृदया… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
मिलिटरीमध्ये निर्णयात्मक, कडक शिस्तीच्या आणि नियम बद्ध वातावरणात वाढलेल्या कर्नल साहेबांचा खाक्या काही और होता. भल्या पहाटे निसर्गरम्य वातावरणात वावरायला त्यांना खूप आवडायचं. चिमणपाखरांची भाषा त्यांना अवगत असल्यामुळे त्या दोस्तांशी दोस्ती करून बागेतून गोल फेरफटका मारून ते आपल्या पेन्शनर मित्रांकडे वळायचे.
आज पंधरा दिवस झाले तरी वासुनानांचा पत्ता नव्हता. हॊ त्याला कारणही तसंच होतं आयुष्याच्या संध्याकाळी पुढे जाण्यात त्यांच्या बायकोने, 1ला नंबर पटकावला होता.
ती मला सोडून माझ्या आधी देवाकडे का गेली? ह्या प्रश्नांच्या भोवऱ्यातून वासुनाना अजूनही बाहेर पडले नव्हते.
अखेर ह्या मित्र मंडळींनी त्यांना बागेत आणलंचं. त्यांना बोलतं करण्यासाठी मित्रांची धडपड चालूच होती.
पण ‘आता मी काय करू? कसा जगू? वेळ, दिवस कसा घालवू? ह्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कुणालाच देता येईना. सगळेच गप्प होते. सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं इतकं की कट्ट्यावर बसलेल्या मंडळींच्या तोंडून नेहमी एकच वाक्य बाहेर पडायचं.
“हम पंछी एक डालके”
आणि बरं का! ह्या सगळ्यांचे पुढारी होते कर्नल साहेब. खूप विचार करून त्यांना एक आयडिया सुचली. उत्स्फूर्तपणे ते म्हणाले, “मंडळी मला एक विचार सुचलाय. आपण आता रिकामं बसून नाही चालायचं. रिकाम्या डोक्यात शिरू पाहणाऱ्या सैतानाची कत्तल करायची. एकदम गोळी मारायची त्याला”
गोंधळलेल्या नागुअप्पांनी त्यांचा धबधबा आंवरत विचारलंन्, “अरे बा, कर्नलया तुझी मिल्ट्री भाषा सोड. आणि सरळ भाषेत बोल ना जरा! आपण नक्की काय करायचं ते तरी सांग. कुठून तरी वासुनाना निराशेतून बाहेर आलेचं पाहयजेतं”
“सांगतो,! सगळ सांगतो! नागूआप्पा तुमच्यापासून सुरुवात करूया. नागोजीराव अहो काय बॉडी आहे तुमची 85 पार केलीतं पण अजूनही 75 चेच वाटताय तुम्हीं. आहात कुठे! कर्नल साहेबांची गाडी रुळावर येतच नव्हती.
“अरे करण्या! तुझी गाडी रुळावरून घसरतीय लेका, मी काय विचारतोय आणि तू कां मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोयस?
आता मात्र सगळेच’एक डालकेपंछी’ओरडले”कर्नल साहेब मुद्द्यावर या, आणि सांगा तुमची भन्नाट आयडिया”
कर्नल, भरदार मिशीतून मिस्कील हंसतं बोलते झाले, “आठवून बघा लहानपणीआपल्या शाळेत पी. टी. चा स्पेशल एक तास राखून ठेवलेला असायचा.
हॊ असायचा, पण मग त्याचं काय इथं? आपण काय आता त्या पी. टी. ला जाऊन वेळ घालवू शकतो का?
“अहो मुद्याचं बोला हॊ कर्नल साहेब “उतावळे साठीचे संभाजीराव आता मात्र कावले होते. त्यांच्या गरम होत चाललेल्या डोक्यावर हात ठेवून साहेब म्हणाले, धीर धर! यार असा तापू नकोसआपल्या डोक्यात सैतान नकोय आणि संतापही नकोय. तुमच्या अधीर मनाला अधिक न ताणता माझ्या भेजातल्या आयडिया सांगतो,
असं बघा नागप्पा ती समोर बालमंडळी बसली आहेतं ना, मोबाईल मध्ये डोकं खूपसून, त्यांना आपण मैदानात मोकळ्या हवेत, कोवळ्या उन्हात आणायचं आणि व्यायामात गुंतवायचं. एका जागी बसलेल्या ह्या गुळाच्या ढेपा हलल्याच पाहिजेत. बागेच्या गोल रिंगणात त्यांना पळवायचं. ”
अरे पण महाभागा ती पोरं तयार होतील कां?
कां नाही? त्यांचे बापही तयार होतील. पिझ्झापास्ता खाऊन ढेकर देणाऱ्यांना रींगणात पळवलेलं त्यांच्या आईबापांनाही नक्की आवडेल.
“अगदी बरोब्बर! मुलांना शिस्त लावणे त्यांना नाही जमलं, पण ते आपण जमवलं, आणि मी म्हणतो परस्पर पावणे बारा वाजले तर आईबाप कशाला विरोध करतील? उलट त्यांच्या ते पथ्यावरच पडेल. आपणचं सुरुवात करूया”
” बेस्ट आयडिया” आप्पा उत्साहाने उभे राहयले.
मिशीतल्या मिशीत हंसणाऱ्या कर्नल साहेबांच्या मनात आलं, होईल -होईल, दोस्तांना गुंतवण्याचा आपला प्रयोग नक्कीच यशस्वी होईल. त्यांच्याअंगात चैतन्याचं वारं सळसळायला लागलं.
आणि मग कर्नल पुढे सरसावून म्हणाले, “म्हणजे आयडिया नंबर एक पटलीय ना तुम्हाला? कापऱ्या हातांच्या टाळ्या खणखणीत वाजल्या आणि बेंबीच्या देठापासून, शाळकरी मुलांसारखा कोरस भरगच्च होकार दणदणला.
कोपऱ्यातून विशूभाऊंचा आवाज आला, “अरे त्या बालचमुंबरोबर आपणही कवायत करू या की! त्यांना लगोरी, विटी दांडू काकडी कोशिंबीर इत्यादी खेळ शिकवूया. पोरं दमली कंटाळली तर मामाच पत्र हरवलं, बटाटा शर्यत इत्यादी गंमतीशीर खेळात त्यांना आपण गुंगवूया. हे जुने मजेचे खेळ खेळताना बागेतल्या कुंदकळ्यांबरोबर या बाळ गोपाळांच्या हास्यकळ्याही उमलतील. “कोपऱ्यातल्या त्या आवाजाला टाळ्यांनी दणकून दाद दिली. आणि पेन्शनरांच्या घोळक्यातून दिलखुलास खोडकर हंसू बाहेर पडलं. कर्नलचा खणखणीत आवाज दणाणला, “सुनो यार! आता आयडिया नं. 2 ते आपलं, वर्तुळातलं, समोरचं फिरत मोफत वृत्तपत्र वाचनालय आहे ना! तिकडे आपल्याला आता वळायचय”
“त्यात काय! रोजच आपण जातो की तिथे. ती तर आपली फेवरेट जागा आहे. जगातल्या उलाढाली, राजकीय गोष्टी, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान याची बँक लुटायला. गप्पांचा फड संपल्यावर या आवडत्या अड्ड्याकडे आपण हमखास रोजच वळतोच की, कोवळ्या उन्हाची शाल पांघरून पेपर वाचायला का मज्जा येते राव!
त्या सुखकल्पनेतून मित्राला बाहेर काढत कर्नल म्हणाले, “सदुभाऊ पण या अड्डयावर आता आपण ह्या बाळगोपाळांना पण घेऊन जायचंय. “
काय सांगताय! पण येतील का ती पोर आपल्या म्हाताऱ्यांच्या बरोबर?
अहो येतील की, आपण त्यांचे प्रेमळ आजोबा होऊन त्यांची मोबाईल मधली मान वर्तमानपत्रात अडकवायची. असं बघा, अण्णांना वयामुळे दिसत नाही. ही छोटी मंडळी पेपर वाचून दाखवतील त्यांना.
मुलांना पण त्यामुळे स्पष्ट उच्चाराची, मराठी वाचायची, सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल”.
रघुदादांनी अण्णांच्या पाठीवर थाप मारली. “अण्णा लेका दुहेरी फायदा होईल तुझा. त्या मुलांचा आणि त्यांच्या बापांचा पण फायदा होईल. ”
“तो कसा काय?
असं बघ मोबाईलचं भूत मानगुटीवर बसल्यामुळे पोरांचं डोकं आणि डोळेही बिघडलेत. तासंतास स्क्रीन समोर बसल्याने पाठदुखी, मान दुखी, चिडचिडेपणाआणखी काही विकारांनी आकार घेतलाय.
त्यांच्या विकासाचा कणाच मोडलाय रे!
त्यांना दुजोरा देत जोशीभाऊ म्हणाले, “वर्तमानपत्रात राजकारण, खेळ, अर्थशास्त्र एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे मेंदूला चालना मिळून मेमरी वाढते. शब्दसंग्रह वाढून ज्ञानात भर पडते. नियमित वाचनाची सवय लागून रिकामं मन सैतानाचं घर न बनता बुद्धीचा आगर होतं. ”
इतका वेळ पेपर वाचणारे गजाभाऊ ओरडले “अरे ही बघा आजकी ताजी खबर, उत्तर प्रदेश सरकारने शाळांमधून हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्याचा आणि प्रार्थनेच्या आधी दहा मिनिटे वृत्तपत्र वाचनाचा निर्णय घेतलाय. आणि जगभरातून ह्या निर्णयाचंशाळांतून स्वागतच झालय”
हे ऐकल्यावर कर्नल साहेबांनी आनंदाने आरोळीच ठोकली. “अरे मग आपणही हा निर्णय मान्य करून मराठी पेपर वाचन सुरू करूया. मुलांच्या जिभेला मातृभाषेचं वळण लाऊ. इंग्लिश मीडियम मुळे मराठी इंग्रजीची त्यांच्या बोलण्यात येणारी खिचडी तरी वाचेल. कर्नल साहेब बाकी तुमच्या पोतडीतल्या आयडिया भन्नाटचं असतात. उशीर कशाला! उद्याचाच मुहूर्त धरू.
बागेतल्या मारुती पुढे शकुनाचा नारळ फोडून, खोबऱ्याचा प्रसाद वाटून, कार्यक्रमाचा श्री गणेशा आत्ताच करूया.
कर्नल साहेबांनी पिल्लू सोडलं “मंडळी आता गुढीपाडवा जवळचं आलाय सगळ्या भाभीजींना माझा निरोप सांगा भरपूर मसाले भात करून आणायचा. कडुलिंबाच्या चटणीचा उतारा हवाच श्रीखंडपुरीची ऑर्डर देऊया. आणि साजरं करूया वनभोजन. उंच उंच गुडी बागेतच उभी करूया. मदतीला चिल्लीपिल्ली वानर सेना आपल्या हाताशी असेलच. अशाप्रकारे चैतन्य बागेत चैतन्य उसळलं. सगळ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि होकार भरला
मंडळी काय सांगू तुम्हाला! तेव्हांपासून दरवर्षी ह्या चैतन्य उद्यानात गुढीपाडवा साजरा केला जातो बागेत उंच उंच गुढी उभारली जाते. माळापताकांनी बाग सजवली जाते. हौशी पुरुष मंडळी सनई सुरू करतात आणि मग काय! त्या चैतन्य बागेत वनभोजन साजरं होतं. नववर्षाची अशी ही उत्साही आनंदी सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरू झाली.
अशा प्रकारे कर्नल साहेबांचा उपक्रम पार पाडतांना सगळेच आनंदात असतात.
बायकोच्या वियोगाचं काही काळ का होईना वासुनाना दुःख विसरलेत. कारण बागेत रोज पेपरवाचन, कवायत पकडापकडी, पळणे, p. T. चा तास साजरा होतो. बाल मंडळींबरोबर हे ज्येष्ठही आता चिरतरुण झालेत. दुःख आणि दुखणं गोंजारायला त्यांना आता वेळच नाहीय्ये बरं का!
आणि हॊ ह्याचं सगळं श्रेय नक्कीच कर्नलसाहेबांनाच आहे. तर धन्यवाद कर्नल साहेब. मित्र-मैत्रिणींनो तुम्हांलाही गुढी पाडव्याच्या आत्तापासूनच शुभेच्छा.
धन्यवाद
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




