सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ जीवनरंग ☆
☆ शॉर्टकट… – भाग – १ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
॓सुनंदाबाई, संध्याकाळी चांगली कोवळी मेथीची जुडी आणा. भाईसाहेब दोन-तीन दिवस बाहेरगावी जात आहेत. थोडे पराठे बरोबर देता येतील. ॑ नाश्ता करता करता राजश्री सुनंदाबाईंना दिवसभरच्या कामाच्या सूचना देत होती.
रमेश नाश्ता करून कोर्टाच्या कामासाठी बाहेर पडला होता. त्याच्या वडिलांपासून चालत आलेली त्यांची टॅक्स कन्सल्टेशनची फर्म चांगली नावाजलेली होती. एम कॉम झालेली राजश्री फर्ममध्येच अकाउंटस् चं काम सांभाळायची. आवरायला उशीर झाला की राजश्रीला चित्राची खूप आठवण येई.
॓दीदी, ड्रेसला इस्त्री करून ठेवली आहे. मॅचिंग बांगड्या गळ्यातलं पण ठेवलाय तिथेच आणि टेबलावर गोड ताज्या ताकाचा ग्लास ठेवलाय. आठवणीने प्या बरं का. मागचं सर्व आवरून येतेच मी ऑफिसला.॔ असा प्रेमळ आग्रह करणाऱ्या हुशार, चटपटीत चित्राला दुबईला पाठवून आता वर्ष होऊन गेलं होतं.
॓हल्ली ती फोनवर पहिल्यासारखी उत्साहाने बोलत नाही. नुसतं हो… नाही.. बरं.. म्हणंत फोन ठेवून देते. काही बिनसलय का तिचं ते एकदा नीट विचारलं पाहिजे.॔ असा विचार करत राजश्री सँडल्स घालत होती. तेवढ्यात फोन वाजला.
॓आता कोण असेल? आधीच उशीर झालाय ॔. असं मनात म्हणंत राजश्रीनं फोन उचलला. फोन तिच्या नेहमीच्या बँकेतल्या मॅनेजरचा होता. राजश्रीला शक्य तितक्या लवकर बँकेत भेटायला बोलावलं होतं.
॓संध्याकाळी नक्की येऊन जाते.॔ असं म्हणत राजश्रीनं फोन ठेवून दिला. एवढं अर्जंट काय काम असेल तिला प्रश्नच पडला.
*****
॓तुमच्याकडे कामाला असलेल्या चित्राचा आपण इथे तुमच्या मदतीने एन् आर् आय् अकाउंट उघडला आहे. या नॉन रेसिडेंट इंडियन अकाउंटमध्ये दरमहा 22/25 हजार रुपये जमा होतात आणि त्यातले 15/16 हजार रुपये काढले जातात.॔ संध्याकाळी भेटल्यावर बँक मॅनेजरने सांगितलं.
॓ हो. मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्राला आम्ही दुबईला माझ्या मैत्रिणीकडे मदतीसाठी पाठवत आहोत. तिचा भाऊ येऊन घरखर्चासाठी थोडे पैसे काढत जाईल. राजश्री म्हणाली.॔
पण गेल्या चार-पाच महिन्यात या अकाउंटमध्ये नेहमीच्या रकमेशिवाय
आणखी जवळजवळ दीड लाख रुपये जमा झाले आहेत. काही फिक्सड् डिपॉझिट वगैरे करायचं असेल तर विचारा तिला. ही जमा रक्कम थोडी जास्त वाटली नेहमीपेक्षा म्हणून बोलावलं तुम्हाला. मॅनेजर म्हणाले ॔
॓थँक्स! मी कळवते तुम्हाला काय करायचं ते.॔ असं म्हणून राजश्री गडबडीने उठली.
घरी येईपर्यंत उलट सुलट विचारांनी राजश्रीचं डोकं भणभणून गेलं. तोंड धुऊन तिनं कपडे बदलले. सुनंदाबाईने दिलेलं गरम थालीपीठ आणि तिला आवडणारी वेलचीची कॉफी पितानाही तिच्या डोक्यात चित्राच होती. चित्राचा विषय सुनंदाबाईंजवळ… तिच्या आईजवळ… काढावा का हा मनातला विचार तिने बाजूला केला.
आधी रमेशजवळच बोलावं याबद्दल, असं ठरवून ती गप्प राहिली. खाण्यापिण्याची भांडी आवरून सुनंदाबाई बाजारात गेल्या. रमेश यायला अजून तसा वेळ होता. हॉलमध्ये टांगलेल्या वेताच्या झोपाळ्यावर ती विचार करत बसली. तिचं मन पाच सहा वर्ष मागे गेलं.
*******
राजश्रीचं गर्भाशयाचं ऑपरेशन करायचं ठरलं होतं. कदाचित गर्भाशय काढावही लागणार होतं. ऑपरेशननंतर दोन-तीन महिने राहायला येऊ शकेल असं सासर… माहेरचं कुणीच नव्हतं. त्यामुळे घर सांभाळेल, तिची काळजी घेईल अशा एखाद्या चांगल्या बाईच्या ती शोधात होती. त्याचवेळी तिच्याकडे भांडी घासणाऱ्या बाईंनी तिला चित्राचं नाव सुचवलं होतं. चित्राची आई बाईंच्या लांबच्या नात्यातली होती. अलिबाग जवळच्या एका छोट्या गावात ती मुलगी कुटुंबीयांसह राहत होती. चित्राच्या कामसूपणाची, चांगुलपणाची बाईंनी खात्री दिली आणि मदतीसाठी चित्राला मुंबईला आणायचं ठरलं.
चित्राने थोड्याच दिवसात मुंबईच्या जीवनाशी जुळवून घेतलं. राजश्रीदीदी आणि भाई साहेबांचा विश्वास संपादन केला. ऑपरेशननंतर दीदीची मनापासून काळजी घेतली. तिची औषधं, खाणं.. पिणं सारं सांभाळलं. डायबेटीस असलेल्या भाईसाहेबांचं पथ्याचं खाणं शिकून घेतलं. स्वच्छ, नीटनेटक्या, हसतमुख मितभाषी चित्राला राजश्री आणि भाईसाहेबांनी घरातल्यासारखंच वागवलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि आता राजश्रीच्या ऑपरेशन नंतर ती शक्यताही दुरावली होती.
चित्राच्या बोलण्यातून कळलं होतं की तिच्या वडिलांना मुंबईत चांगली नोकरी होती पण त्यांच्या व्यसनामुळे साऱ्या संसारावर अवकळा आली होती. धाकट्या दोन भावांच्या शिक्षणासाठी चित्रांने स्वतःच शिक्षण आठवीनंतर सोडलं होतं आणि गावातच एक लहानशी नोकरी धरली होती. आईसुद्धा मोलमजुरी करत होती. चित्रा तिला मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाला मदत करत होती. तिला घरच्यांची आठवण यायची पण लांब राहून का होईना आपण त्यांना मदत करतोय हे जाणवलं की तिला बरं वाटायचं.
राजश्री आणि भाईसाहेबांनी तर या कुटुंबाला आधार द्यायचं ठरवलंच होतं.
॓चित्रा, तू आता इथेच राहून रात्र शाळेत जाऊन तुझं शिक्षण पूर्ण कर. आपण जमेल तसं तुझ्या भावांना आणि आईलासुद्धा आणू इथे. दीदी आणि भाईसाहेबांच्या या बोलण्याने चित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिची रात्र शाळा सुरू झाली. राजश्रीने खटपट करून, डिपॉझिट भरून एक छोटी दीड खोलीची जागा या कुटुंबासाठी मिळवली आणि काही महिन्यातच चित्राची आई आणि भाऊही मुंबईला आले. राजश्री आणि भाईसाहेबांनी ॓कमवा व शिका॔ असा चांगला गुरुमंत्र या कुटुंबाला दिला होता. कुटुंब खरंच गुणी होतं. जर मोठा दिनेश शाळेत जायच्या आधी जवळपासच्या सोसायटीतल्या चार-सहा जणांच्या गाड्या पुसायच्या तर कधी कुणाला दूध, भाज्या आणून द्यायचा. चित्राच्या आईला सुद्धा चांगली घरकामं मिळाली. धाकटा भाऊ जवळच्या शाळेत जायला लागला. सगळ्यांचं आयुष्य आधीपेक्षा सुकर झालं होतं.
अशीच एकदा राजश्रीची बालमैत्रीण सुलेखा एका लग्नाच्या निमित्ताने राजश्रीकडे चार-पाच दिवस राहायला आली होती. पाच वर्षांपूर्वी लग्न होऊन सुलेखा नवऱ्याबरोबर दुबईला गेली होती. त्यानंतर आत्ताच मैत्रिणींची भेट होत होती. त्यामुळे गप्पांना, खाण्यापिण्याला, फिरण्याला उधाण आलं होतं. सुलेखाचा नवरा सुरेंद्र दुबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. सुलेखा तिथल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती.
इथे आल्यावर, राजश्रीच्या घरी काम करणारी कामसू, विश्वासू, शांत स्वभावाची चित्रा सुलेखाच्या मनात भरली. त्यावेळी नुकतीच बारावी पास झालेल्या चित्रांनं पुढे कुठलं शिक्षण घ्यावं याची चर्चा राजश्रीकडे चालू असतानाच, ॓चित्रासारखी मुलगी आपल्याला मदतीला मिळाली तर?॔ असा विचार सुलेखाच्या मनात चमकून गेला.
॓अगं, चित्राला आमच्याकडे दुबईला पाठवतेस का? तिथे आता मुलींसाठी स्पेशल होम सायन्सचा कोर्स सुरू झालाय. आम्ही चित्राला त्या कोर्सला घालू आणि मला चित्राची घरकामात मदतही होईल. आम्ही दरमहा तिच्या इथल्या अकाउंटमध्ये साधारण 22… 25 हजार रुपये जमा करू. तिचं शिक्षण होईल आणि पैसे पण जमतील.॔ सुलेखाने आपला प्रस्ताव राजेश्रीकडे मांडला.
राजश्री विचारात पडली. चित्राच्या कुटुंबाला पैशाची गरज तर होतीच. दोन्ही भावांचे शिक्षण, चित्राचं लग्न, मुख्य म्हणजे स्वतःची जागा असं सगळंच व्हायचं होतं. त्यांच्या राहत्या खोलीच्या कराराचे अकरा महिने कधी संपायचे कळायचंही नाही. मग राजश्रीलाच धावपळ करून, जादा भाडं कबूल करून जागेचं नवीन ॲग्रीमेंट करून घ्यावं लागायचं. सुलेखाच्या या प्रस्तावामुळे या कुटुंबाचा फायदा होईल असंच राजश्रीला वाटलं.
मुलीला एवढ्या लांब, अनोळखी ठिकाणी पाठवायला सुनंदाबाई प्रथम तयार नव्हत्या. मग चित्रानेच आईची समजूत घातली. चित्राला पासपोर्ट मिळाल्यावर सुरेंद्र सुलेखानं दुबईहून आवश्यक ती कागदपत्रं पाठवली. चित्राच्या येण्याचा उद्देश, तिची राहण्या जेवण्याची व्यवस्था, तिचा दरमहाचा पगार अशा बऱ्याच गोष्टींची नोंद तिथल्या सरकारी खात्यात झाल्यावर अखेर एकदाचं परवाना पत्र आणि तिकीट दुबईहून आलं. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत चित्रानं आईचा, दीदी आणि भाईसाहेबांचा आशीर्वाद घेतला. भावांना जवळ घेऊन निरोप घेतला आणि मोठ्या हिमतीनं विमानात पाय ठेवला. दुबई एअरपोर्टवर सुरेंद्र सुलेखा तिला न्यायला आले होते. चित्रा सुखरूप दुबईला पोचल्याचा फोन आला तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. पुष्पा चिंतामन जोशी
कोथरूड, पुणे
मो ९९८७१५१८९०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈



