श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “नजरेआड राहून गेलेले बलिदान ! ” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
पहाटेचा दीड वाजला आहे. Central Reserve Police Force च्या एका तुकडीवर अंतर्गत भागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या भागातील एका शाळेच्या इमारतीमध्ये तात्पुरते out post उभारण्यात आले आहे.
कारगिल युद्ध समाप्त झाल्याची घोषणा झालेली आहे. बाहेरून आत येऊन सीमेमध्ये खोलवर लपून बसलेला शत्रू आपण फार मोठी किंमत मोजून पिटाळून लावला आहे… पण आधीच देशाच्या अंतर्भागात बस्तान बसवलेले शत्रू आता आतून दगाफटका करण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सैन्याने ज्यांचा येथील कार्यकाळ संपलेला आहे, अशाही सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना इथं मुदतवाढ देऊन जबाबदारी दिली गेली आहे. त्यात अमरनाथ यात्रेच्या बंदोबस्तासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करावे लागले होते!
ही outpost तशी काश्मिरातल्या जंगलाच्या भागात, आणि तेथून पाकिस्तान सीमा फारशी दूर नाही.. आसपास बऱ्यापैकी लोकवस्ती. तेथील लोकांशी या outpost मधील सैनिकांशी बराच परिचय झालेला होता. तेथील तरुण या सैनिकांशी क्रिकेट खेळत, दूध वगैरे वस्तू आणून देत असत. एकूण मैत्रीपूर्ण आणि शांत वातावरणात सैनिक कर्तव्यावर तैनात होते!
चक नटनस नावाचे ठिकाण. दिनांक ६ ऑगस्ट, १९९९… कारगिल युद्ध समाप्तीची घोषणा होऊन केवळ दहाच दिवस झालेले होते… पाकिस्तानी अतिरेक्यांच्या आणि स्थानिक अतिरेक्यांच्या एका खूप मोठ्या गटाने या outpost वर मोठ्या आधुनिक शस्त्रांनी हल्ला चढवला! अतिरेकी या OUTPOST पासून अगदी जवळ, म्हणजे सुमारे पंचवीस तीस मीटर्सपर्यंत जवळ पोहोचले होते… व त्यांनी अक्षरश: POINT BLANK RANGE हल्ला चढवला.. त्यांच्याकडे आर. पी. जी. अर्थात ROCKET PROPELLED GRENADES होते… जे खांद्यावरील बंदुकीतून डागता येतात… पिका मशीन गन्सही होत्या… या एक हजार मीटर्सपर्यंत अचूक मारा करीत मिनिटाला सहाशे ते आठशे राउंडस डागू शकतात… अंधार एवढा की केवळ रायफल मधून सुटणाऱ्या गोळ्यांमुळे उडणाऱ्या ठिणग्या दिसाव्यात.
Outpost मध्ये सैनिकांची संख्या मर्यादित. शिवाय पहाऱ्यावरील दोन, तीन रक्षक (सेंट्री) वगळता इतरांना रात्री त्यांच्याकडील शस्त्रे शास्त्रागारात जमा करण्याचे आदेश होते!
अचानक झालेल्या तुफानी गोळीबारात दोन पहारेकरी आणि तीन सैनिक आणि एक अधिकारी मिळून सहा शूरवीर धारातीर्थी पडले!
मदतीला येण्याचा संदेश दिला गेलाय… पण बचाव दल पोहोचायला किमान दोन तास लागतील. हल्ला अगदी पूर्वतयारी करून झाला आहे. क्रिकेट खेळायला येणाऱ्यांनी बहुदा गावाशेजारच्या जंगलात आधीपासूनच लपून बसलेल्या अतिरेक्यांना सर्व माहिती पुरवली आहे! त्यामुळे कोणत्या बाजूला किती जवान असतात, शस्त्रे कोणती आणि किती असतात याची माहिती शत्रूला होती, असे स्पष्ट होते!
४, राष्ट्रीय रायफल्स (बिहार रेजिमेंट) कुपवारा येथे कर्तव्यावर असलेले मेजर मनजीत सिंग यांची खरे तर काश्ममीरातील नेमणूक संपली होती आणि ते लवकरच त्यांच्या गावी, जालंधरला सुट्टीवर जाणार होते… पण प्राप्त परिस्थिती पाहून लष्कराने त्यांच्या सारख्या अधिकाऱ्यांना तिथेच कार्यरत राहण्याचे आदेश दिले होते.
८, माउंटन डिविजन काश्मीर खोर्यातून काढून तिला द्रास भागात झालेल्या घुसखोरीचा बिमोड करण्याच्या कामी धाडण्यात आले होते. त्यामुळे उत्तर काश्मीर भागात अतिरेकी विरोधी कारवाईत कार्यरत असलेल्या सैनिक, अधिकारी यांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला होता. नेमका याचाच फायदा शत्रूच्या फिदायीन अर्थात आत्मघातकी अतिरेक्यांनी उचलला होता. काश्मीरमधील भौगोलिक परिस्थिती ज्यांना माहीत आहे, अशांना यात काहीही आश्चर्य वाटणार नाही. तेथील परिस्थितीचे यथार्थ ज्ञान भारतातील इतरांना फारसे नाही.
गोळीबाराचा आवाज ऐकून मेजर मनजीत सिंग आपल्या झोपण्याच्या जागेवरून ताडकन उठले आणि बाहेर धावले. मागच्याच वर्षी त्यांनी जगरपोरा येथे झालेल्या चकमकीत एका अफगाणी अतिरेक्यास यमसदनी धाडले होते. तो अतिरेकी बी. एस. एफ. च्या बंकर वाहनावर चढून वाहनात ग्रेनेडस टाकण्याच्या अगदी बेतात असतानाच मनदीप यांनी त्याला ठोकले होते. त्यावेळच्या चकमकीत कॅप्टन तरुण कुमार (मरणोत्तर कीर्ती चक्र) आणि त्यांचे सिग्नलमन श्री. सावंत यांना वीरगती प्राप्त झाली होती. तो आणि असे अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी होते. पुढे राहून नेतृत्व करणारा हा शूर अधिकारी होता. मर्यादित शस्त्रे आणि प्रचंड संख्येने चालून आलेला शत्रू… परिस्थिती भयावह होती.
जखमी झालेल्या कनिष्ठ सैनिक अधिकाऱ्याची जागा घेण्यासाठी ते धावत असताना त्यांच्या पोटात, छातीत ग्रेनेडचे तुकडे घुसले… पण तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी इतर सैनिकांना भराभर सूचना देत स्वत: गोळीबार आरंभला.
यात एक गोष्ट आपल्या बाजूची ठरली.. ती म्हणजे पहाऱ्यावर असलेल्या एका सैनिकाजवळ रणगाडा भेदी rocket launcher होता! त्या जांबाज बहादाराने त्या तेवढ्या धुमश्चक्रीत ते शस्त्र चालवले… अतिरेक्यांना त्या शस्त्राची बहुदा कल्पना नसावी. त्या तोफगोळ्याच्या आवाजानेच अतिरेकी हादरून गेले आणि त्याच्या स्फोटात पुढे आलेल्या काही अतिरेक्यांचे तुकडे झाले.
अतिरेकी पांगले. पण तीन अतिरेकी मात्र OUTPOSTच्या आतील भागापर्यंत पोहोचले. त्यातील एकाकडे दोन ग्रेनेड्स होते. पण त्यादिवशी outpost मध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून एके ४७ रायफल जमा करण्याचे चुकून राहून गेलेले होते!
सैन्यातील प्रत्येकाला शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. त्याचा फायदा झाला. या सफाई कर्मचाऱ्याने एके. -४७ अचूक चालवली. त्या अतिरेक्याच्या हातातील दोन्ही ग्रेनेड्स त्याच्या हातातच फुटले आणि ते तिघेही ठार झाले!
पूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना कंपनी कमांडर कॅप्टन मनदीप यांनी रायफल चालवली. सैनिकांना मार्गदर्शन करीत राहिले. त्यांनी आणि साथीदार सैनिकांनी खूप अंधार असतानाही केवळ उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर अचूक गोळीबार केला. तब्बल २६ अतिरेकी ठार मारले!
एका छोट्या OUTPOST वर केला गेलेला हा मोठा हल्ला होता. त्यामुळे आपल्या सैनिकांनी बलिदान आणि उत्तरही मोठेच दिले! नायब रिसालदार नरेंदर सिंग, नाईक मिथिलेश पाठक, सोवार सोहन सिंग सोलंकी यांनीही शौर्य गाजवीत वीरगती पत्करली. अतिरेक्यांच्या हल्याची ही योजना पाकिस्तानी स्पेशल सर्विस ग्रुप (एस. एस. जी. )च्या, भारतात घुसखोरी केलेल्या एका अधिकाऱ्याने आखून दिली होती असं म्हटलं जातं!
१९ मे, १९६९ रोजी जन्मलेले मनजीत सिंग ६ ऑगस्ट, १९९९ रोजी, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी हुतात्मा ठरले! महाविद्यालयीन जीवनात ते उत्तम शरीरसौष्ठवपटू, मिस्टर पंजाब, मिस्टर जालंधर या स्पर्धांत सहभागी होते. कारगिल युद्धाच्या धामधुमीत कॅप्टन मनजीत सिंग यांचे हे बलिदान काहीसे दुर्लक्षित राहिले असल्याची शक्यता आहे. त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले!
© श्री संभाजी बबन गायके.
न-हे, पुणे, मो 9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





