सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

☆ मोक्ष… भाग – २ –  लेखिका : भारती ठाकूर ☆ प्रस्तुती – शशी नाईक-नाडकर्णी ☆

(खूप विचार केल्यानंतर एक युक्ती मला सुचली. कै. परांजपे यांच्या मुलाला मी इथे काय चर्चा चालू आहे लोकांमध्ये ते फोनवर सांगितलं. त्याला मी सांगितलं, की ‘ वडलांच्या चितेला अग्नी देणे हे मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आमचे सगळेच नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी इथे पोहोचू शकणार नाहीत. माझी आई सुद्धा येऊ शकत नाहीये. अशावेळी किमान मला अस्थिकलश घेऊन जाता यावा म्हणून तरी पार्थिव शरीराचे दहन होणे आवश्यक आहे. ’– असे तू त्या स्वामीजींना सांग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात मी जिंकले. गावकरी आणि ते स्वामीजी नर्मदा किनाऱ्यावर कै. परांजपे यांचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले.) — इथून पुढे – – 

संध्याकाळी अंधार पडू लागला तसे अंत्यक्रियेसाठी लोक जमू लागले. कोणी फुलं हार तर कुणी उदबत्ती असं घेऊन आले. विशेष म्हणजे थोड्याच वेळात बँड पार्टी सुद्धा पोचली. परिक्रमावासीचा नर्मदा किनारी मृत्यू होणे हे भाग्याचं लक्षण आहे. तो दुःखाचा नाही तर आनंदाचा क्षण आहे म्हणून हा बँड बाजा.. खूपच गहिवरून आलं होतं मला. रात्री साडेनऊच्या सुमारास परांजपे यांचा मुलगा, मुलगी आणि जावई तसेच श्री. वाळुंजकर तिथे पोहोचले. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. निशब्दपणे एकमेकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत होत्या. वाजत गाजत अंत्ययात्रा नर्मदा किनाऱ्यावर गेली. कार्तिकी पौर्णिमेचा चंद्र अगदी माथ्यावर आलेला होता.

त्यांच्या मुलीला – पूजाला सोबत म्हणून मी आश्रमातच थांबले. भांबावली होती बिचारी. थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं ही सगळी मंडळी अंत्ययात्रेला गेलीत पण आश्रमातले स्वामीजी आणि त्यांचे गावातच राहणारे एक परिचित हे दोघे मात्र आश्रमातच थांबले आहेत. न राहवून मी विचारलं त्यांना, “ दिवसभर तुम्ही इतकं सहकार्य केलं. मग आता अंत्यविधीसाठी का नाही गेलात? ” कदाचित जलसमाधी दिली नाही म्हणूनही स्वामीची गेले नसावेत असं मला क्षणभर वाटून गेलं. पण ते म्हणाले, “हम कैसे जा सकते है?  हमारा असली काम तो अब चालू होगा | इन लोगोने भोजन नही किया है।भोजन की तयारी भी तो करनी है |” दोघांनीही आंघोळी केल्या आणि स्वयंपाकाला लागले. त्यांनी दाल बाटी चा बेत केला. कमी वेळात जास्त माणसांसाठी स्वयंपाक करायचा असेल तर दालबाटीला पर्याय नसतो.

अंत्यविधी झाल्यानंतर मंडळी परतली. त्यात गावकरीही होते. त्या सगळ्यांना स्वामीजींनी आणि त्यांच्या त्या गावातल्या सहकाऱ्याने प्रेमाने जेवू घातलं. दुसऱ्या दिवशी अस्थिकलश घेऊन कै. माधव परांजपे यांचे चिरंजीव शांतिशआणि लेक- जावई पुण्याला परतले.

अशीच एक घटना गेल्या वर्षी घडली. दिलीप गोखले हे माझी नाशिक ची मैत्रीण सौ. माधुरी माटे हिचे बंधू.

ते नर्मदा परिक्रमेत आहेत हे समजलं होतं. अशी अनेक मंडळी परिक्रमेत असतात. प्रत्येक वेळी भेट होऊ शकतेच असेही नाही. मुळात लेपा, भट्याण आणि छोटी खरगोन या ठिकाणी आमच्या ज्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी निशुल्क शाळा चालतात त्याचे व्यवस्थापन आणि आर्थिक जुळवाजुळव यामध्येच वेळ इतका जातो की परिक्रमावासी आमच्याकडे लेपाला आले तरी त्यांच्याशी फार गप्पा गोष्टी होऊ शकतात असं नाही. नंतरही प्रत्येकाशी फारसा संपर्क राहतोच असेही नाही. त्यामुळे दिलीप गोखले येऊन गेले असतील आमच्याकडे पण मला नाव आठवत नव्हतं. एक दिवस भल्या पहाटे माधुरीचा फोन आला. तिचा भाऊ दिलीप नरसिंगपूर जवळच्या एका आश्रमात रात्री झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावला. त्याचं कुटुंब मुंबईला तर माधुरी नाशिकला. दोन्ही कुटुंबांनी लवकरात लवकर नरसिंगपूरला पोहोचायचं ठरवलं तरी दीड दोन दिवस लागणार होते. श्री दिलीप गोखले यांच्या मोबाईल मध्ये मुलाचा नंबर मिळाला म्हणून संपर्क तरी झाला. एकटेच परिक्रमा करत होते. म्हणून पोलिसांनी पोस्टमार्टेम करावं लागेल असं सांगितलं. आता काय करायचं?  माधुरी आणि तिचे नातेवाईक काळजीत होते. माझ्याशी फोनवर संपर्कही चालू होता. अचानक मला आठवलं, महिनाभरापूर्वीच नरसिंगपूरचे डॉक्टर चांदोरकर व त्यांच्या पत्नी आमच्याकडे लेपाला येऊन गेले होते. त्यांचा परिचय झाला होता. त्यांना मी फोन केला. ही अडचण सांगितली. तर म्हणाले आता तुम्ही कुठलीच काळजी करू नका. या पुढची सर्व जबाबदारी माझी. माझा फोन नंबर दिलीप गोखले यांच्या नातेवाईकांना द्या. विशेष म्हणजे पोस्टमार्टेम करून घेण्यापासून तर पार्थिवाला बर्फाच्या पेटीत ठेवून स्वतःच्याच दवाखान्यात ठेवणे ही सोय त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी दिलीप गोखले यांचे नातेवाईक तिथे पोहोचले तर बर्मानघाट येथे अंत्यसंस्काराची सर्व सोय आधीच तयार होती. मानवता म्हणून ही सोय करणं, त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची भोजनाची सोय करणं हे मी समजू शकते. पण प्रसंग ओळखून त्यांच्या परतीच्या प्रवासा साठी रेल्वेचे आरक्षण करणे – जे मला कदाचित सुचलं देखील नसतं, ती व्यवस्थाही डॉक्टर चांदोरकर यांनी करून ठेवली होती.

नर्मदा परिक्रमा करत असताना एक महंत मला म्हणाले होते, “ नर्मदा परिक्रमा केलीत म्हणजे तुमचा सीमित परिवार असीम परिवार होतो. ” याचा अनुभव या अशा प्रसंगातून येतो.

नर्मदा परिक्रमा करत असताना परिक्रमावासी जर मृत्यू पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते अथवा मोक्ष मिळतो असे म्हणतात. स्वर्ग आणि मोक्ष ही काय भानगड आहे हे आपण स्वतः मेल्याशिवाय कसं कळणार?  अशा वेळी मात्र मला विनोबाजींनी केलेली मोक्षाची व्याख्या आठवते. विनोबा म्हणतात, मोक्ष म्हणजे काय?  मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. ही व्याख्या मला मनापासून पटते. कारण भौतिक आयुष्यात कुठलाच मोह उरलेला नसतो म्हणून हे लोक परिक्रमेला येतात.

मला मात्र मोक्ष म्हटला की स्वामी विवेकानंद यांची आठवण येते. ते म्हणत मी साधना भलेही करत असेन. पण ती मोक्षासाठी नाही. जोपर्यंत या देशातला एखादा बेवारशी कुत्रा देखील उपाशी आहे तोपर्यंत मी मोक्षप्राप्तीची कामना करणार नाही. स्वामी विवेकानंद माझे आदर्श! त्यांच्या या संकल्पात मला थोडी भर घालावीशी वाटते. माझ्या स्वतःच्या बाबतीत. जोपर्यंत या देशातला गरीबातला गरीब मुलगा अथवा मुलगी शिक्षित होत नाही तोपर्यंत मलाही मोक्ष नको. अगदी मी नर्मदा किनार्‍यावर रहात असले तरी.

समाप्त –  

लेखिका : भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा पुनर्वास (बैरागढ)  जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश.

प्रस्तुती : शशी नाडकर्णी-नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments