श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर” – इंग्रजी लेखक : पीटर वोहललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर (मराठी)
लेखक : पीटर वोहललेबेन
अनुवाद: डॉ. गुरुदास नूलकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठ: २००
मूल्य: ३००₹
पीटर वोललेबेन यांचे पहिले पुस्तक ‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज’ याला मराठी वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाने आपल्याला वनस्पतींच्या अज्ञात विश्वाची अतिशय सोप्या भाषेत ओळख करून दिली. ‘द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर’ हे त्यांचे पुढचे पुस्तकही सोप्या भाषेत रंजक गोष्टीने सजलेले आहे. निसर्गातील क्लिष्ट गुंतागुंती, सजीव आणि निर्जीव घटकांमधील परस्परसंबंध आणि या मध्ये मानवाची भूमिका समजावून सांगताना वोललेबेन यांनी पुन्हा एकदा खूपच वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणले आहे.
यातील गोष्टी जरी प्रामुख्याने युरोप खंडावरील असल्या तरी निसर्गाचे नियम पृथ्वीवर कुठेही बदलत नाही. समशीतोष्ण प्रदेशात जो निसर्गाचा अनुभव येतो तो आपल्यासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणाच्या देशात अधिक स्पष्ट दिसतो. याचे कारण म्हणजे आपल्या इथे वर्षभर सूर्यप्रकाश आणि उत्तम माती आहे. यामुळे वनस्पतींच्या असंख्य प्रजाती इथे आढळतात, आणि त्यांच्यावर उभी असलेली वैविध्यपूर्ण अन्नसाखळी पोसली जाते.
भारतातील निसर्ग हा इंद्रधनुष्यासारखा अनेक रंगांनी सजलेला आहे. हिमालयातील हिमरेषेपासून ते कच्छच्या मिठाच्या रणापर्यंत, पश्चिम घाटातील सदाहरित जंगलांपासून ते सुंदरबनच्या खाऱ्या खाड्यांपर्यंत-प्रत्येक प्रदेश एक वेगळी कथा सांगतो. अन्नसाखळी हा त्या कथांमधील धागा. ही अन्नसाखळी फक्त “कोण कोणाला खातं” इतकी साधी नाही; ती संबंधांची, परस्परावलंबनाची, आणि न जाणवणाऱ्या संतुलनाची एक जिवंत कहाणी आहे.
तुम्हाला हे माहीत होतं का?
पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?
निसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात.
रोजामंड यंग, दि सिक्रेट लाइफ ऑफ काउजच्या लेखिका म्हणतात – –
“ पीटर वोललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. “
अद्भुत! निसर्गात सगळे एकमेकांशी जोडलेले असतात याची वोललेबेन आपल्याला आठवण करून देतात.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






