श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “खरं तर आपण खुनी आहोत…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
नदीला आपण “देवी” म्हणतो आणि मग —
तिच्याच कुशीत टाकतो आपल्या श्रद्धेचा कचरा.
निर्माल्य…फुलं, हार, अगरबत्त्यांची राख—
ज्यांना आपण पवित्र म्हणतो
तेच तिच्या श्वासात हळूहळू विष मिसळत जातात.
दुधाचे टँकर येतात भावनेच्या उन्मादात
पांढऱ्या प्रवाहात ओतलेलं दूध
क्षणात बदलतं कुजलेल्या दुर्गंधीत.
देवाला अर्पण करताना
आपण विसरतो नदी पोट भरून खात नाही,
ती वाहते… आणि आपणच तिच्या प्रवाहात
रासायनिक दुधाचे विषारी नाग सोडतो.
पणत्या, दिवे— प्रकाशाचा उत्सव म्हणे…
पण त्या तेलकट ज्योती पाण्याच्या पृष्ठभागावर
मरणासन्न तवंग निर्मितात
मग त्या तवंगाखाली मासे गुदमरून मरतात.
राख, अस्थी, विधी… मोक्षाच्या आशेने
आपण मृत्यूही नदीवर सोपवतो.
पण त्या राखेत फक्त शरीर नाही,
तर प्रदूषणाचे कणही असतात—
जे तिच्या अंगावर जखमा कोरतात.
त्याहीपेक्षा जास्त निर्दयी असतो
आपला “विकास”!
सांडपाणी कारखान्यांचं, शहरांचं,
घराघरातलं घाणेरडं पाणी
सरळ तिच्या कुशीत सोडलं जातं.
जणू ती नदी नाही,
तर एक न संपणारं गटार आहे.
नदीकाठची झाडं तोडून
आपण तिची सावलीच काढून घेतो,
तिचं श्वसन रोखतो,
तिच्या काठांना सिमेंटने कैद करतो
एका नाल्यात रूपांतरित होऊन वाहणारी नदी
आता श्वास गुदमरलेली रेषा बनते.
आणि आपण म्हणतो— “ही देवी आहे! ”
देवी?
देवीला आपण असं मारतो का?
देवीला आपण घाण, रसायनं, मृत्यू अर्पण करतो का?
धर्माच्या नावाखाली विनाश लपवण्याची युक्ती
म्हणून आपण पूजा करतो, पण जपणूक नाही.
आणि शेवटी—
हेच पाणी आपल्या नळातून येतं,
आपल्या शरीरात जातं,
आपल्या रक्तात मिसळतं…
आणि आपणही हळूहळू
स्वतःलाच संपवत राहतो.
नदी मरत नाही. पण ती मरते तेव्हा
आपणच मरतो.
पण आपल्याला अजूनही वाटतं,
आपण भक्त आहोत.
खरं तर आपण खुनी आहोत.
आणि नदी आपल्या श्रद्धेची
सर्वात मोठी बळी.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




