सुश्री विभावरी कुलकर्णी
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
पुस्तक : आनंदयात्री रवींद्रनाथ
लेखक : श्री. विश्वास देशपांडे
प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन्स, पुणे.
हे पुस्तक हातात घेतल्यावर ज्याकडे आधी लक्ष जाते ते म्हणजे त्याचे आकर्षक मुखपृष्ठ आणि रवींद्रनाथ यांचा गूढ, गहन वाटणारा परंतु शांत, निश्चयीपणा दर्शविणारा फोटो आणि ‘एकला चालो रे’ हे वाक्य.. जे जे अतिशय अर्थपूर्ण आहे. आकर्षक रंगातील मुखपृष्ठ व प्रस्तावनेतील मोजकी वाक्ये घेऊन सजलेले मलपृष्ठ.. जे पुस्तक उघडण्यापूर्वीच त्याची व्यापकता दर्शवतात. त्यानंतर पुस्तकातील ‘अर्पणपत्रिका – ज्या दोन आनंदयात्रींना समर्पित केली आहे, त्यांच्या फोटोसह दिसते प्रस्तावनेच्या शेजारील पानावर रवींद्रनाथ यांचा जो फोटो आहे, त्यातील डोळे फारच बोलके व संदेश देणारे आहेत. मा. डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रस्तावना पुस्तक व लेखक यांच्या विषयी अत्यंत महत्वाची माहीती सांगते. आवर्जुन वाचावी अशी सुलभ भाषेतील प्रस्तावना! त्यानंतर मा. लेखक यांचे मनोगत वाचायला मिळते. मनोगत वाचताना लेखकांचा प्रामाणिकपणा, ऋणनिर्देश विशेष जाणवतात. पुस्तकाइतकेच वाचनीय हे मनोगत आहे.
श्री विश्वास विष्णु देशपांडे
पुढील पानावर जी अनुक्रमणिका वाचायला मिळते, ती बघून थोडे आश्चर्य वाटते, जर पुस्तकच ‘रवींद्रनाथ’ यांच्याविषयी आहे, तर अनुक्रमणिका का दिली असेल? परंतू ती वाचल्यावर लक्षात येते, हे तर त्यांचे विविध पैलू आहेत. त्या त्या लेखात त्या त्या पैलूचे दर्शन घडते.
कौटुंबिक पार्श्वभूमी – रवींद्रनाथ कसे घडले, त्यांच्यावर कोणते संस्कार झाले हे समजण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूती अत्यंत महत्वाची ठरते. नव्यातील चांगले स्वीकारणे व जुन्या कालवाहय गोष्टींचा त्याग या साठी लागणारा डोळस विवेक या कुटुंबात होता. इंग्रज प्रवाहात वाहून. न जाता स्वयंप्रज्ञ वागणे कसे असावे हे वाचणे महत्वाचे आहे.
समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी – सगळे कुटुंब विविधकलांचे भोक्ते होते. व प्रत्येक व्यक्तीजवळ कोणतीतरी कला होतीच. हेच संस्कार रवींद्रनाथ यांच्यावर झाले.
व्यक्तिमत्वाची जडण घडण – यालेखात त्यांच्या मनावर उत्तम संस्कार कसे घडले आणि शांतीनिकेतन विषयी महत्वाची माहिती गोष्ट रूपाने समोर येते. हे पालकांनी आवर्जून वाचायला हवे.
शांतिनिकेतनच्या स्थापनेमागील विचार – रवींद्रनाथ यांचे विचार कसे घडत गेले, अनुभवातून ते काय व कसे शिकले शाळेविषयीचे त्यांचे मत आणि त्यातून आकाराला येणार विचार लक्षात येतात.
रवींद्रनाथांच्या जगणं आनंदी करणाऱ्या शैक्षणिक संकल्पना -मानव चराचराचे कल्याण व्हावे, असे शिक्षण निसर्गातून मिळावे अशा शैक्षणिक संकल्पना वाचायला मिळतात. अर्थात वेगळे काही करणाऱ्याला विरोध असतोच. तो इथेही झालेला दिसतो
शांतिनिकेतनची स्थापना:- आलेल्या अडचणी, संकटांची मालिका असूनही त्यांचा ठाम निर्धार दिसतो.
आनंददायी शांतिनिकेतन – जीवन व शिक्षण हातात हात घालून चालले तर शिक्षण किती आनंददायी होते हे सांगणारे अनेक मौलिक विचार, प्रसंग व अनुभव यातून समजतात.
शिक्षणाचं माध्यम मातृभाषा – यात मातृभाषेचे महत्त्व सांगणारे विचार व त्याप्रमाणे केलेले आचार दिसतात. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मातृभाषेतून भाषण करणे हे वेगळेपणाचे वागणे, आणि माणसात तफावत पडण्याची कारणे समजतात.
कमालीचा साधेपणा आणि मनाची श्रीमंती – माणसे जोडण्याची कला रवींद्रनाथांना अवगत होती. त्यातूनच अनेक ऋषीतुल्य व्यक्ती शांतिनिकेतन मध्ये येत असत. त्यातून प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. त्यांच्या या संस्थेत साधेपणा व सौंदर्य जपले जात होते. सोन्यापेक्षा फुलातील सौंदर्य समजावून दिले जात होते
सहजता हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण– सहजता केंद्रस्थानी ठेवून ही पुस्तक निर्मिती लेखकांनी केली आहे.. सहजता आणि शिक्षणमूल्य एकत्र कसे परिणामकारक होतात ते त्यांनी दाखवून दिले.
टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी सुंदर व हळवी कहाणी बरेच काही शिकवून जाते. नाते उदात्त कसे असावे, प्रेरणादायक कसे असावे हे आवर्जून वाचावे.
बहुमुखी प्रतिभा :– घरातील वातावरणाच्या आनंदलहरी मुलांवर किती सकारात्मक परिणाम करतात आणि परिणामस्वरूप मुले किती प्रतिभासंपन्न होतात… हे लक्षात येते.
कवितेशी मैत्री– वाचत असताना त्यांच्या कवीमनाची ओळख होते. हेच कवीमन विविध प्रसंगी कवितेतून व्यक्त होते. अगदी मृत्यूपूर्वी काही अर्धा ते पाऊण तास त्यांनी मृत्यूवर कविता केली होती. विविध कवितांमधून त्यांचे स्वभाववैशिष्ट्य समजते.
नाटककार रवींद्रनाथ – शिक्षण घेत असताना विविध साहित्यकृतींचा अभ्यास करत विसाव्या वर्षी त्यांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ नाटक लिहीले.
रवींद्रद्रनाथांची अपारंपरिक लेखनशैली – त्यांनी स्वतःची शैली विकसित केली. टीका सहन केल्या. अनुभवलेला निसर्ग कवितेतून प्रगट झाला.
विश्वकवी रवींद्रनाथ– त्यांनी साहित्य, कला अशा सगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले. त्यांचा ‘गीतांजली’ काव्यसंग्रह त्यांनी परमेश्वराला अर्पण केला आहे. याने त्यांचे नाव विश्वात पोहोचले. ते जसे व्यक्त झाले तसेच जगले.
अष्टपैलू साहित्यिक– त्यांचे सगळेच साहित्य असे आहे की कोणतेही पान उघडावे आणि रवींद्रनाथांना भेटावे.
सर्वात मोठी देणगी– ‘जन गण मन’.. त्याचे महत्व व त्यामागील रोचक सत्य लक्षात येते.
रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी -त्यांच्या विविध कविता, त्यातील अर्थ, हेतू हे सगळे या पुस्तकातून समजते.
कथाकार रवींद्रनाथ – कवितेचे माध्यम व्यक्त होण्यासाठी अपुरे वाटले तेव्हा त्यांनी इतर कलांचा अवलंब केला. आणि कथा वास्तवातून आलेल्या.. काबुलीवाला तर परिचित आहेच. अशा काही कथा व त्याची थोडक्यात आशय रुपाने माहिती या पुस्तकातून समजते.
स्त्रीपात्र प्रधान कथा – स्त्रियांचे भावनाविश्व व स्त्रीची प्रतिमा उजळून टाकणारं लेखन!
आणखी एक कथा- नष्टनीड- विविध भावभावनांचे कंगोरे विविध प्रसंगातून वाचायला मिळतात. यातील सर्व व्यक्तीरेखा मात्र सुसंस्कृत, समंजस आहेत. या सुंदर कथेत संयम जागोजागी दिसतो.
कादंबरीकार रवींद्रनाथ – त्यांच्या विविध कादंबऱ्यांचा आढावा, तसेच आणखी काही कादंबऱ्या यांचा परिचय या पुस्तकातून होतो.
नाटककार रवींद्रनाथ– म्हणजे नाटक सृष्टीचा तारणहार म्हणता येईल. त्यांनी नाटकांचे सर्व प्रकार हाताळले. यातून त्यांचे बहुश्रुत व्यक्तिमत्व दिसते. विषयाला कलाटणी देणाऱ्या नाटकांचा आढावा या पुस्तकात वाचायला मिळतो.
रवींद्र संगीत – म्हणजे एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदयच. कुटुंबातील वातावरणामुळे संगीताचा कान तयार झाला. संगीताची जाण, पारंपारिक लोकसंगीत व व्यासंग यातून रवींद्रसंगीताची अलौकिक निर्मिती घडली. त्यातील गीतांच्या चाली, संगीत, शब्द यांची सुरेल गुंफण सांगणारा एक अलौकिक प्रवास वाचकाला वाचायला मिळतो. त्यांच्या संगीतात झालेला बदल, त्याचे टप्पे, त्यात असलेले भावनांचे प्रतिबिंब, रवींद्र संगीताचे वेगळेपण, ते लोकप्रिय असण्यामागील कारणे, आणि वेगळ्याच ट्रान्समध्ये नेणारी त्यांची गीते!.. सगळंच अचंबित करणारं आहे.
रवींद्रनाथांची पत्रे – इतर साहित्याप्रमाणे यातही विविधता व वास्तविकता दिसून येते. या पत्रांचे १२ खंड प्रकाशित झाले आहेत हे वाचून फारच आश्चर्य वाटले. काही पत्रे व त्यातील मजकूर आजच्या काळातही लागू पडतो. तर काही पत्रे खूपच मार्गदर्शक आहेत. सर्वच पत्रे अत्यंत वास्तव व पारदर्शक आहेत. उदा.
‘ सुखदुःख सर्व मार्गावरच असतात पण शांती केवळ मोठ्या रस्त्यावरच असते ! ’
चित्रकार रवींद्रनाथ – त्यांना विविधतेची किती ओढ होती हे पुढील वाक्यातून समजते. ‘ शब्द मला संतुष्ट करत नाहीत. माझ्या रेषा मात्र त्यांच्या मनाप्रमाणे हसतात. असे म्हणून ते चित्रकलेकडे वळले. त्यावेळी त्यांचे वय ६५ होते, यावेळी त्यांनी या कलेची आराधना करून त्यात प्राविण्यही मिळवले.
नृत्यकलेचे पुनरुज्जीवन – नाटकातील नृत्याचे महत्व टागोरांच्या लक्षात आले होते. भारतातील नृत्य परंपरा त्यांना खुणावत होती. आणि तीही आत्मसात करून त्यांनी ५६ या वर्षी एका नाटकात नृत्य सुद्धा सादर केले होते. त्यांच्या मते नृत्य म्हणजे संपूर्ण शरीर बोलते. प्राचीन नृत्यकलेला आधुनिकतेची जोड देऊन
विकास घडवून आणला. याही क्षेत्रात त्यांचे प्राविण्य दिसते.
भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ – विविध देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरलेली होती. त्या प्रत्येक देशात विविध अभ्यास केला. ‘घरटे व पिंजरा’ यातून त्यांनी रुपकातून तांत्रिक विकास आणि नैसर्गिक गोष्टी यातील फरक दर्शवला आहे. त्यांच्या साहित्यामुळे त्यांना ‘तत्वज्ञ’ अशी मान्यता मिळाली.
मानवतावादी धर्माचा साक्षात्कार – ईश्वराची सेवा करण्याचा मार्ग म्हणजे कोणताही भेद न करता मानवाची सेवा करणे… या विषयीचे रवींद्रनाथांचे मौलिक विचार आपण वाचू शकतो.
शांतिनिकेतन ते विश्वभारती– शांतिनिकेतन ही गुरुकुल पद्धतीच्या धर्तीवर शिक्षण देणारी संस्था ते विश्वभारती विद्यापीठ हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.
श्रीनिकेतनची स्थापना – स्थानिक कला व हस्तकला यांना उत्तेजन देणाऱ्या या मोठ्या सांस्कृतिक केंद्राची स्थापना करून त्यांनी स्थानिक समाजाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून मोठेच काम केले.
सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी – त्यांनी विद्यार्थ्यांसाठी त्यांना परिचित वाटणारी व सहजसोपी वाटणारी ‘सहजपाठ पाठ्यपुस्तके’ यांची निर्मिती केली.
कर्मयोगी रवींद्रनाथ– ‘बोले तैसा चाले’ या प्रमाणे वर्तन असणाऱ्या रवींद्रनाथांची या पुस्तकातून छान ओळख होते.
गुरुदेवांची सजीव शिल्पे– कोणतेही काम सौंदर्यदृष्टी ठेवून केले तर ते चांगले होते… या विचारातून त्यांची विविध शिल्पे कशी सजीव आहेत याची माहिती लेखकाने दिली आहे.
गुरुदेवांची राजकीय विचारसरणी – राष्ट्रकारण व विश्वकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे त्यांचे मत होते. हीच भावना त्यांच्या कृतीमागे होती. अवघे जग एकच कुटुंब व्हावे अशी त्यांची प्रामाणिक भावना होती.. जी लेखकाने नेमकी टिपली आहे.
मैत्रीपर्व : यात जगातील विविध माणसांबरोबर मैत्रीपर्वाच्या निमित्ताने मैत्रीचा धागा कसा टिकवून ठेवला होता ते लेखकांच्या शब्दातून नीट समजते..
देखणा देहांत तो: यात त्यांच्या शेवटच्या दिवसातील आयुष्य व कार्य या पुस्तकात आपण वाचू शकतो. यातील त्यांची वाक्ये खूप महत्वपूर्ण शिकवण देतात.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती – यात रवींद्रनाथांच्या वेगळ्या विचारांची – आचारांची कारकीर्द आपण वाचू शकतो.
गुरुदेवांचे संस्मरणीय विचार – यात त्यांचे काही अनमोल विचार आपल्याला वाचायला मिळतात.
मान्यवर वाचकांच्या प्रतिक्रिया – हे नक्कीच या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणायला हवे. पुस्तक प्रसिध्द होण्यापूर्वी या लेखमालेवर ज्या प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या आहेत ज्याही येथे वाचायला मिळतात.
शेवटी संदर्भग्रंथाची सूची लेखकाच्या मनाचा प्रामाणिक पारदर्शीपणा दर्शवते. एकंदरीत खूप सखोल माहिती व रवींद्रनाथ यांचे जीवनकार्य या पुस्तकात वाचक वाचू शकतो. आणि याचे श्रेय लेखकांच्या या अभ्यासपूर्ण लेखनाला व त्यांच्या लेखनशैलीला आहे हे आवर्जून सांगायलाच हवे.
– – प्रत्येकाच्या संग्रही असावेच असे हे पुस्तक नक्कीच आहे.
(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ )
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







