पुस्तकावर बोलू काही
☆ “एक चिरंतन चित्रपट ‘मुगल -ए- आझम’” – लेखिका : डॉक्टर मीना श्रीवास्तव – परिचय : मोहिनी हेडावू ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆
उज्ज्वला केळकर
पुस्तक : एक चिरंतन चित्रपट ‘मुगल -ए- आझम’
लेखिका:-डॉक्टर मीना श्रीवास्तव
पुस्तकाचे प्रकाशक- लोकव्रत प्रकाशन
पुस्तकाची पाने – १५४
लोकव्रत प्रकाशन, पुणे यांनी मुगल-ए- आजम हे डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे .आपण बरेचदा बघतो की एखाद्या कथेवर, नाटकावर, कादंबरीवर आधारित चित्रपट बनतो.पण इथे उलटे झालेले आहे की, एका चित्रपटांवर पुस्तक निघालेले आहे. चित्रपटाचे लेखिकेने अत्यंत चोखंदळ रसिका प्रमाणे परीक्षण केलेले आहे . यात नुसतं चित्रपट परीक्षण नाही तर ते कलाकारांनी सादर केलेल्या कलेचे परीक्षण तसेच या चित्रपटाचे परीक्षण करताना त्या योगाने आलेले चांगल्या चित्रपटाचे ही संदर्भ त्या देतात. त्यामुळे तसं पाहिलं तर चित्रपट रसिकांसाठी हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.
डॉ. मीना श्रीवास्तव
तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार, कोल्हापूर हा पुरस्कार या पुस्तकांसाठी मीनाताईंना मिळालेला आहे, ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे.
डॉक्टर मीना श्रीवास्तव यांचे हे पहिले मराठी पुस्तक आहे, त्यांनी स्वतः लिहिले असे. तसे पाहिले तर त्यांनी’ महर्षी वाल्मिकी’ तसेच ‘रामायण ‘या दोन विश्वास देशपांडे लिखित मराठी पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केलेले आहे. हे वाचताना त्यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषेवरचे प्रभुत्व तर वाखाणण्याजोगंआहेच. परंतु या पुस्तकातून त्यांची सुंदर मराठी ही दिसून येते. ही मराठी लिहीत असताना त्यांनी त्या चित्रपटाच्या अनुषंगाने येणारे हिंदी, उर्दू आणि फारसी भाषेतील शब्दांचा सढळ हाताने वापर केला आहे. कारण की ‘मुगल- ए- आझम हा चित्रपट मुगल दरबारातील राजपुत्र सलिम आणि नर्तिका अनारकली यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे .त्यामुळे त्या लिखाणांमध्ये बरेच उर्दू शब्द येतात आणि ते त्या ठिकाणी चपखल बसतात. कुठेही ते वाचताना रसभंग होत नाही .या उलट त्यांनी व्यक्त केलेल्या भावना किंवा विचार त्या शब्दांनी अजून ठळकपणे मांडल्या जातात. याची कथाही त्या सुरसपणे मांडतात.
हे पुस्तक वाचत असताना त्यांना चित्रपट दिग्दर्शक आसिफ याविषयी असलेला आदर तसेच मधुबाला विषयी असलेले जिव्हाळा आणि प्रेम व्यक्त होते .या पुस्तकातील त्यांचे एक वाक्य कायम लक्षात राहण्यासारखे आहे. कारण की ‘मधुबाला सौंदर्याची पुतळी म्हणून सगळेजण मानतात परंतु तिच्या सौंदर्या बरोबरच तिचा सशक्त आणि समृद्ध करणारा अभिनय आहे’ हे पण लेखिकेनेचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधुबालानं बरेचदा आजारी असतांना ऑक्सिजन सिलेंडर लावून चित्रपटात काम केलं, यावरून त्या चित्रपटाविषयी एकंदरच कामाविषयी तिचे असलेले समर्पण दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपट असो आणि या चित्रपटाचे संपूर्ण पडद्यावरचे आणि पडद्यामागच्या टीमची मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम म्हणजे हे पुस्तक.
दिग्दर्शक आसिफ याच्या कार्याला ,मेहनतीला, दिग्दर्शनाला,गुणग्राहकतेला तसेच चांगुलपणाचा ध्यास, जे जे करेल ते ते चांगलंच करणार या, उत्तमोतमाचा ध्यास घेणा-या त्याच्या वृत्तीला सलाम !संवाद लेखन असो, गायिका असो दिग्दर्शन असो ,फोटोग्राफी असो या सर्व बाबतीत उत्तमतेचा त्याने ध्यास घेतला होता आणि त्या संदर्भातली सगळे किस्से लेखिकेने खूप छानपणे उलगडून दाखवलेले आहे. खरोखरचे युद्ध वाटावे म्हणून सैनिकांची तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही के कृष्ण मेंनन यांच्या परवानगीने घेतलेली मदत, हा प्रकार ही काहीतरी वेगळाच आहे. तसेच ‘प्यार किया तो डरना क्या!’ च्या वेळेचा सेट चित्रपट संपल्यानंतर गुरुदत्तने तो सेट भाड्याने घेतला आणि असाही त्याचा उपयोग केला .दोन वर्ष त्या शिशमहलच्या सेटचं प्रदर्शन चालत राहिलं. तब्बल ७७ आठवडे तो चित्रपट मराठा रंगमंदिर, मुंबई मध्ये चालला .त्या काळात सर्वात जास्त कमाई केलेला तो चित्रपट होता .हा चित्रपट जसां आसिफचं वर्षानुवर्ष उराशी बाळगलेले स्वप्न होते. तसेच हा चित्रपट हे लेखिकेच्या भावाविश्वाचे स्वप्न होते आणि या चित्रपटाविषयी त्याचं दिग्दर्शन, कला, गाणी, गायक, प्रत्येक अंगाविषयी, त्या चित्रपटाविषयी वृत्तपत्रात, मासिकात आलेल्या वृत्तांताविषयी लेखिकेने भरभरून लिहिलेले आहे. आणि आसिफने जसा हा चित्रपट सुंदरपणे मांडला तसंच सुंदरपणे लेखिकेने या चित्रपटाचे समीक्षणही केलेले आहे, सर्व अंगाने `!
अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. एकूणच मुगल -ए-आजम व त्या संदर्भातील गोष्टींचा लेखिकेने असा उलगडा केलेला आहे की जवळपास ५० वर्षाचा भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास डोळ्यासमोर येतो. अक्षय लेखन, चांगली गाणी, चांगले चित्रपट, चांगले दिग्दर्शक, चांगले कलाकार यांचा संदर्भही आपल्याला मिळतो. चित्रपटातील जागा, चित्रपटाची नजाकत काय आहे? त्याची सौंदर्यस्थळे कशी ओळखावीत, यांची समज हे पुस्तक देतं.त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला एक रसिक, चित्रपट समीक्षक बनवू शकते. लेखिकेच्या या रसिक वृत्तीला सलाम.
परिचय : मोहिनी हेडावू
सहाय्यक राज्यकर आयुक्त, राज्य वस्तू व सेवा कार्यालय, नागपूर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈






