डॉ मकरंद पिंपुटकर
इंद्रधनुष्य
☆ एक प्रवास – अंधारातून प्रकाशाकडे– – ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
– – – सागर आणि नेत्रा पाटील
संध्याकाळ होत जाते, घरोघरी दिवे लागतात आणि अंधार मागे सरतो. पण ‘अंधार’ म्हणजे नेमकं काय? काहींसाठी तो प्रकाशाचा अभाव असतो; तर काहींसाठी संधींचा.
सागर पाटील यांना हा फरक आयुष्याच्या अगदी लहान वयातच समजला. डोळ्यांवर अनेक शस्त्रक्रिया होऊनही वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दृष्टी गमावली. त्यानंतर समाज दिव्यांग व्यक्तीकडे कसा पाहतो, हे त्यांनी जवळून अनुभवले. दुर्लक्ष, उपेक्षा, दया किंवा ‘बिच्चारा’ असा शिक्का—यापलीकडे अनेकांना काही दिसतच नव्हते.
या सर्व प्रवासात अत्यंत खंबीरपणे, खमकेपणाने सागर यांच्यासोबत त्यांचे आई वडील उभे राहिले. मुलाला अंधत्व आले असतानाही त्यांनी कधीच “हे करू नकोस” किंवा “तुला जमणार नाही” असा नकारात्मक सूर लावला नाही. उलट, सागर काही नवी गोष्ट अजमावत असतील, तर आई वडील म्हणायचे, “आमच्या समोरच कर, काही मदत लागली तर आम्ही आहोतच”. हा सकारात्मक दृष्टीकोन, सागर यांच्या आत्मविश्वासाचा पाया ठरला.
यामुळे सागर यांच्या मनात एक विचार दृढ झाला होता—एखाद्या व्यक्तीची “मर्यादा (limitation) / कमजोरी” ही तिच्या मूल्याची मोजपट्टी असू नये. पुढे हाच विचार एका चळवळीचा पाया ठरला.
त्यांच्या सोबतीला होत्या नेत्रा पाटील—शांत, संवेदनशील आणि कृतीतून परिवर्तन घडवण्यावर विश्वास ठेवणाऱ्या.
सागर यांनी मराठी साहित्य विषयात एम. ए. केले; पण त्यांचा जीव रमला तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये. वडिलांना सरकारी नोकरी सोडावी लागलेली पाहून त्यांनी लहानपणीच ठरवले होते—नोकरी करणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा उद्योजक व्हायचे.
शालेय वयापासूनच त्यांचे इस्त्री, रेडिओ, ट्यूबलाईट दुरुस्त करणेही सुरू झाले. वापरात नसतानाही बॅटऱ्या का उतरतात (drain होतात) ? हा प्रश्न त्यांना सतावत राहिला. त्यातून पुढे त्यांनी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमचे तंत्र विकसित केले.
२०१३ मध्ये त्यांनी IIG (Ideal Innovative Group) कंपनीची स्थापना केली. संगणक आणि एलईडी उत्पादनांची जुळणी सुरू झाली. नामांकित कंपन्यांसाठी बल्ब व ट्यूबलाईट तयार करण्याबरोबरच स्वतःच्या ब्रँडनेही उत्पादने बाजारात आली.
कामाची व्याप्ती वाढू लागल्यावर, सागर यांनी सॉल्डरिंगची कामं घरी आणायला सुरुवात केल्यावर, वयाची साठी उलटून गेलेल्या त्यांच्या आईंनी हे कौशल्य स्वतः आत्मसात केले. आजही त्या नातवाला सांभाळत, घर सांभाळत दिवसाला सॉल्डरिंगचे १०००-१५०० टाके सहज लावतात.
पुढे एलईडी उत्पादने स्वस्त झाल्यावर सागर आणि नेत्रा यांनी पुनर्भरणीय उत्पादनांवर (rechargable products) लक्ष केंद्रित केले. टाटा पॉवर हे त्यांच्या सुरुवातीच्या नामवंत ग्राहकांपैकी एक. उत्पादनाचा दर्जा हा यशाचा पाया असतो, या त्यांच्या विश्वासाला टाटा पॉवरने दीर्घकालीन कराराद्वारे (lifetime contract) दुजोरा दिला.
पुढे त्यांच्या संशोधनातून विकसित झालेल्या विशेष पुनर्भरणीय (rechargable) बॅटऱ्यांनी रेल्वे क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. रेल्वे गार्ड आणि मोटरमन सिग्नल देण्यासाठी वापरत असलेल्या विशेष बॅटऱ्यांच्या उत्पादनात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. सुमारे चारशेहून अधिक उत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करताना ‘VC – व्हिज्युअली चॅलेंज्ड’ या त्यांच्या ब्रँडच्या उत्पादनांनी सर्व तांत्रिक कसोट्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले आणि महत्त्वाच्या ऑर्डर्स प्राप्त केल्या. गुणवत्ता, नित्यनूतनता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
परंतु या दांपत्याचा प्रवास केवळ स्वतःपुरता उद्योग उभारण्यापुरता आणि पैश्यांची धन करण्यापुरता मर्यादित राहिला नाही.
रुईया महाविद्यालयातील शिक्षणकाळात त्यांना संतोष फडके, अनघा पेंडसे यांच्यासारख्या समविचारी मित्रमैत्रिणी भेटल्या, महाविद्यालयानंतरही हे मैत्र अबाधित राहिलं. आणि या सर्वांच्या परस्पर सहकार्य, संवाद आणि सामूहिक विचारातून, दृष्टिबाधित व्यक्तींना आणि एकंदरीतच समाजातील गरजूंना प्रशिक्षण देण्यासाठी IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना झाली.
या सगळ्यांना एक साधी पण महत्त्वाची गोष्ट उमगली होती—लोकांना सहानुभूतीपेक्षा संधीची अधिक गरज असते.
अनेक दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये त्यांनी बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, शिस्त आणि अपार क्षमता पाहिली. समाज जिथे “हे लोक काय करू शकत नाहीत?” असा प्रश्न विचारत होता, तिथे त्यांनी “त्यांना संधी मिळाली तर ते काय करू शकतील?” हा प्रश्न विचारला.
…… आणि त्या एका प्रश्नाने अनेक आयुष्यांची दिशा बदलली.
ट्रस्टने दानधर्माऐवजी सक्षमीकरणाचा मार्ग निवडला. कौशल्य विकास, आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे त्यांच्या कार्याचे केंद्र बनले. इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण, संगणक साक्षरता, उद्योजकता मार्गदर्शन, व्यावसायिक मराठी, क्रीडा आणि जनजागृती उपक्रमांद्वारे अनेकांना नवी दिशा मिळाली.
प्रशिक्षित हातांनी तयार होणारा प्रत्येक एलईडी दिवा जणू एक संदेश देत होता—
“मी सक्षम आहे. ”
कार्यशाळा वाढल्या. प्रशिक्षणार्थी उत्पादने तयार करू लागले, उपकरणे दुरुस्त करू लागले, स्वतः कमाई करू लागले. अनेकांना वर्षानुवर्षांनी आत्मविश्वास मिळाला. चिंतेत जगणाऱ्या कुटुंबांना आशेचा किरण दिसू लागला.
या प्रवासात नेत्रा यांनी भावनिक आधाराची महत्त्वाची भूमिका निभावली. व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपुलकीची ऊब दिली. लोकांना ‘प्रकरण (case study)’ म्हणून नव्हे, तर स्वप्ने आणि क्षमता असलेल्या व्यक्ती म्हणून वागवले.
मोठ्या ऑर्डर्स आल्या असताना त्यांची पूर्तता करण्यात आणि प्रशिक्षण कार्यशाळांच्या पूर्वतयारीत सागर यांच्या आईंचा सहभाग आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.
सागर यांची दृष्टी केवळ उद्योग किंवा प्रशिक्षणापुरती मर्यादित नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रगतीच्या वाटेवर नेण्याची त्यांची वृत्ती तितकीच प्रेरणादायी आहे.
अलिबाग येथील कुटुंबाच्या सामायिक मालकीची जमीन अनेक वर्षे वाद आणि मतभेदांचे कारण बनली होती. सागर यांच्या मेहुण्याने (मावशींच्या जावईबापूंनी) या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्याची कल्पना मांडली. सागर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात पुढाकार घेतला. आज तीच जागा एका सुंदर रिसॉर्टमध्ये रूपांतरित झाली आहे आणि त्याचा लाभ सर्व भागीदारांना मिळत आहे.
समाजहित आणि लोकांना जोडण्याच्या या कार्यासाठी त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. अलीकडेच अमरावती येथे सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांच्या मातृसंस्था असलेल्या रुईया महाविद्यालयाचा ‘रायझिंग स्टार’ हा सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
आज ट्रस्टने ५० हून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि १००० हून अधिक व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे. यापैकी ३५०हून अधिक जण दृष्टीबाधित आहेत, अनेकजणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आहेत, तर काही स्वमग्न (ऑटिस्टिक) आहेत. विविध कारणांनी गरजू असलेल्या या सर्वांना एकच व्यासपीठावर समान संधी देण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा विशेष पैलू आहे.
सागर आणि नेत्रा यांनी या सगळ्यांना केवळ मदत केली नाही; त्यांनी हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीतील १८ कामगारांपैकी १४ जण दृष्टिबाधित आहेत.
एकेकाळी ज्या शैक्षणिक संस्थांनी सागर यांना इलेक्ट्रॉनिक्स शिकवण्यास नकार दिला होता, त्याच संस्था आज त्यांना प्रशिक्षक म्हणून सन्मानपूर्वक निमंत्रित करताना दिसतात.
काही प्रशिक्षणार्थी आज स्वतः मार्गदर्शक झाले आहेत. काहींनी स्वतःचा उदरनिर्वाह सुरू केला आहे. जे पालक कधीकाळी भविष्याबद्दल साशंक होते, ते आज अभिमानाने बोलतात.
या यशोगाथा कदाचित वर्तमानपत्रांच्या मथळ्यांत फारशा झळकत नसतील; पण त्यांनी अनेक आयुष्ये उजळवली आहेत.
कारण सागर आणि नेत्रा पाटील यांनी केवळ दिवे तयार केले नाहीत—
…… त्यांनी माणसांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला आहे.
अधिक माहितीकरता :
IIG Education and Development Trust,
संपर्क : शॉप क्रमांक २बी, जिजामाता चाळ, कोकणीपाडा, अशोकवन, दहिसर (पूर्व), मुंबई, ४०००६८. मो ९३२२०१७१४०.
डॉ मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




