श्री आनंदहरी

?  विविधा ?

☆ पायवाटा… ☆ श्री आनंदहरी ☆

बालकवींची ‘औदुंबर‘ कविता शाळेत शिकताना आणि नंतरही ‘ पायवाट पांढरी तयातून आडवी-तिडवी पडे.. ’ ही ओळ आली की मन तिथेच थबकायचे, आजही थबकते..

ग्रामीण भागात, गाव-खेड्यात, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर पाय चालायला लागले की रस्त्यापेक्षा पायवाटा याच चालणाऱ्या पायांच्या सोबती असतात. अगदी बालपणापासूनची ही सोबत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी हवीशी वाटत राहते.

आमच्या शाळेच्या परीक्षा झाल्या की खऱ्या अर्थाने आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू व्हायची. या सुट्टीचे वेध खूप आधीपासून लागलेले असायचे. ही सुट्टी म्हणजे नुसती धमाल असायची. बांधलेल्या खोंडाचे दावं सोडल्यावर जसे खोंड उधळतं तशीच सर्वांची स्थिती असायची.. वार्षिक परीक्षांची दावी सुटलेली असायची.. दावणीत उभा राहून कंटाळलेले पाय उड्या मारत उधळायला आतुरलेले असावेत तशी अवस्था व्हायची. काहींच्या घरातल्यांनी ‘झाल्या एकदाच्या परीक्षा ‘ म्हणत निश्वास सोडलेला असायचा.. सगळी बंधने सैल केली जायची. काहींच्या घरात तर परीक्षा होत्या हे ही ठाऊक नसायचे.. पोट भरण्यासाठी येरवाळी जाऊन सांजंला परत येण्यावाचून त्याच्याकडे पर्यायच नसायचा.. पण गल्लीतल्या कुणा वडीलधाऱ्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष असायचे.. शाळेच्या वेळात एखादे पोरगं दिसले तर “ काय रं, शाळंला गेला न्हाईस ? “ लगेच विचारलं जायचं. दोन-चार दिवस पोरं उंडारताना दिसली की कुणीतरी विचारायचं, “ झाल्या व्हय रं परीक्षा ? “

परीक्षा एकदाची झाली की ओढ असायची ती पोहायला जायची. सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, पोहण्यासाठी गुरवांच्या विहिरीवर पोरांची झुंबड असायची.. विहीरवर जाण्याची प्रत्येकालाच एवढी आतुरता असायची की जो तो पायवाटा शोधायचा, काहीजण तर सांदी-कुपाडीतून नव्याच पायवाटा तयार करायचे.. अंतर कमी करून आपल्या आपल्या इप्सितापर्यंत, ध्येयापर्यंत लवकरात लवकर नेणाऱ्या या पायवाटा किंवा पाऊलवाटा सर्वांनाच प्रिय असतात. रस्ते, राजमार्ग तयार करावे लागतात पण पायवाटा कुणी बनवत नाही किंवा तयार करत नाही.. जिथून, माणूस असो किंवा जनावरे अनेकांचे पाय गेले की त्या आपोआप बनतात. गुरवांच्या विहिराला बक्कळ पाणी असल्याने आम्ही मठातून ओघळीत उतरून कधी बांधावरून तर कधी रानातून पोहोण्यासाठी पळतच जायचो..

येताना मात्र कडकडून भूक लागली असली तरी रमत गमत, गप्पा मारत पायवाटेवरून यायचो. आम्हां पोरांना त्यावेळी पायवाट ही प्रियच असायची आणि कुठेही जायचे यायचे झाले तरी पायवाटाच हव्याशा वाटायच्या.

माणूस गावातील असो किंवा शहरातील, प्रत्येकाचा फिरण्याचा, वावरण्याचा, जाण्या-येण्याचा एक क्षेत्रपरीघ असतो. खेडेगावात प्रत्येकाचा तो क्षेत्रपरिघ जवळपास सर्वांना, त्यातल्या त्यात मोठ्यांना ठाऊक असायचाच.. त्या बाहेर, आडवाटेलासुदधा कुणी पोरगं दिसलं तर “ काय रं, हिकडं कुणीकडं निगालायस ? “ म्हणून हटकलं जायचं. सांगितलेलं कारण पटलं नाही तर माघारी घराकडं पिटाळालं जायचं.. मोठ्या माणसांनासुद्धा “ आज हिकडं आडवाटंला कुणीकडं ? “ विचारलं जायचं.

आडवाटा या पायवाटा किंवा पाऊलवाटाच.. पण न गेलेल्यासाठी आणि क्वचित कधीतरी जाणाऱ्यासाठी त्या आडवाटा. तसेच काही कारण असल्याशिवाय कुणी आडवाटेला आढळायचं नाही. नाहीतरी सरळमार्गी माणसं आडमार्गाला जातीलच कशाला ?

एकदा मित्राच्या मावशीकडे, पेरिडला गेलो होतो.. डोंगरातल्या गावातली जनावरे चरायला डोंगरात जातात ती पायवाटेनच.. डोंगरातल्या पायवाटा तशा खडतर.. त्या सगळ्याच जनावरांच्या जाण्यायेण्याने तयार झालेल्या.. डोंगर चढण्या-उतण्याचे जनावरांचे ज्ञान आश्चर्य वाटण्याजोगे असते. जनावरे वर डोंगरात ज्या पायवाटेने जातात त्याच पायवाटेने उतरतात असे नाही. काही ठिकाणी त्यांची उतरताना घसरून पडू नये अशा विचाराने घसरणीच्या जागी उतरणीच्या पायवाटा जरा लांबून आलेल्या दिसतात.

पायवाटा वेड्या-वाकड्या, राना-वनातून जाणाऱ्या, उंच सखल असल्या तरी पावलांना त्या रस्त्यांपेक्षाही प्रिय.. प्रवासाचे आणि भवतालाशी, निसर्गाशी असणारे अंतर कमी करणाऱ्या.. पूर्वसुरीच्या पावलावर पाऊल टाकून वाट चालत रहावी असे अप्रत्यक्षरित्या सांगणाऱ्या.. शिकवणाऱ्या. पूर्वसुरीच्या पावलांनी आणि वहिवाटीने तयार झालेल्या पायवाटा.. वहिवाट थांबली की काही काळातच भवतालाशी एकरूप होऊन जातात. जीवनातली इतिकर्तव्यता संपली.. जीवनकार्य संपले याची जाणीव झाल्यावर आदितत्वाची एकरूप होऊन जाणाऱ्या, पंचमहाभूतात स्वतःला विलीन करणाऱ्या एखाद्या साधू-संतासारख्याच. पायवाटा तशाच असतात निरपेक्ष भावाने आपले कार्य करणाऱ्या.. त्यांना पायाखाली तुडवत जाणारा महापुरुष असो किंवा एखादा चोर-दरोडेखोर त्यांच्यालेखी सारे सारखेच असतात.

दिवसभर डोंगरात चरायला जाणारी जनावरे सांज उतरू लागली की पायवाटेने गोठयाकडे परततात.. कधी गोधुळ उडवीत तर कधी आतुर पावलांनी चालताना गळ्यातल्या घंटीच्या मंजुळ नादाने भोवतालाला सुखावत.. आमच्या तिळगंगेकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा, एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याने या तीरावर पाण्यात डुबकी मारून पुढच्या तीरावर प्रकट व्हावे तशा, पाण्यात डुबकी मारायच्या ते पुढच्या काठालाच नदीबाहेर यायच्या.. दिवसभर रानात कष्ट करणारे शेतकरी डोईवर वैरणीचा भारा घेऊन पायवाटेने नदीत उतरून दुसऱ्या काठावर येईपर्यंत पाण्याच्या स्पर्शाने शीण हरवून ओलेत्या पायांनी घरी परतायचे तशीच पायवाट सुस्नात होऊन दुसऱ्या काठावर यायची..

आयुष्यातील सुख-दुःखाचे कितीतरी सांगावे इकडून तिकडे, तिकडून इकडे येता-जाताना पायवाटेने पाहिलेले असतात.. कधी ती मनातून सुखावत असेलही. कधी ती कष्टीही होत असेल पण वरून मात्र ती असते एखाद्या स्थितप्रज्ञासारखी ! ‘ ‘ सुख-दुःख समे कृत्वा !’ म्हणत असल्यासारखी…. पांथस्थाचे मुक्कामापर्यंतचे अंतर कमी करायचे.. जवळची वाट होऊन त्याची वाट जवळ करायचे हे पायवाटेचे जीवनकार्य.. माहेराच्या ओढीने येणाऱ्या माहेरवाशिणीसाठी, पाडसाच्या ओढीने येणाऱ्या गाईंसाठी ती उरकती होते तर अनिच्छेने जड पावलांनी जाणाऱ्यासाठी ती उरकता उरकत नाही.

आता काळ बदलत गेलाय. माणूस वाहनांनी प्रवास करायला लागलाय. रस्त्यावरसुद्धा पाऊलांपेक्षा वाहनांची चाकेच जिथं जास्त धावायला लागलीत तिथं पायवाटांवर पाऊले कुठुन पडणार ? पायवाटांवरून पाऊलेच पडत नसल्याने कितीतरी पायवाटा, आडवाटा निर्सगात, भावतालात विरून गेल्यात.. तरी अजूनही रानावनात, डोंगरखोऱ्यात पायावाटा भेटतात तेंव्हा मन सुखावते.. त्यावरून चार पावले तरी चालावे असे वाटते.. कधी कधी या पायवाटा उदास असल्यासारख्या वाटतात.. एखादी माऊली सासुरवाशीण लेकीच्या आठवणीने उदास व्हावी तशा.

पायावाट पाहिली की वाटते, कितीतरी पावलांनी या पायवाटेवरून आपले घर जवळ केले असेल, कितीतरी माहेरवाशीणी, सासूरवाशींणी याच पायवाटांवरून आल्या-गेल्या असतील. कुणातरी एखाद्या सासुरवाशीणीला कधीतरी माहेर जवळ करणाऱ्या पायवाटेची आठवण येत असेल आणि ती मनात म्हणत असेल,

 रामरगाड्यात साऱ्या

 राब सुटता सुटंना

 हरवली पायवाट

 बापमाऊली भेटंना

 

 मना माहेराचा ओढा

 बाई मिटता मिटंना

 पायवाटेचं ह्या रिण

 बाई फिटता फिटंना

 खरंच, या पायवाटांचं ऋण कधीच फिटता फिटणार नाही.

 **

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted