श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
उगवतीचे रंग- नात्यांचं महावस्त्र
महावस्त्राचे पदर – भाग तीन : ‘बाबा’ (सह्याद्रीची ढाल)
आतापर्यंत नात्याच्या महावस्त्राचे दोन भाग आपण पाहिले. त्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा पदर होता ‘आई’. तिचा आपण ‘मायेची पैठणी’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला. आज या महावस्त्राचा दुसरा प्रमुख पदर पाहूया. हा पदर आहेत ‘बाबा’—घरातील आईनंतरचं दुसरं अत्यंत आदराचं दैवत!
नात्यांचं महावस्त्र विणताना जसा एक धागा मायेच्या मुलायम आणि जरतारी रेशमाचा असतो, तसाच दुसरा अत्यंत महत्त्वाचा धागा हा त्या वस्त्राला बळकटपणा देणाऱ्या टणक सुताचा असतो. हे सुताचं बळकट आणि तितकंच सुरक्षित कोंदण म्हणजेच ‘बाबा’! आई जर या वस्त्राची देखणी सुवर्णमयी पैठणी असेल, तर बाबा या महावस्त्राला कवेत घेणारे आणि उन्हापावसापासून रक्षण करणारे आकाशाएवढे भक्कम छत्र असतात. कुटुंबासाठी ते स्वतः ‘सह्याद्रीची ढाल’ होतात.
बाबा म्हणजे घराच्या या सुंदर इमारतीचा पायाचा भक्कम दगड असतात. पायाचा दगड जमिनीखाली गाडला गेलेला असतो, तो वरून कोणाला दिसत नाही आणि याची कोणी जाहीर स्तुतीही करत नाही; पण त्यावरच अख्ख्या घराचा डोलारा वर्षानुवर्षे सुरक्षित उभा असतो. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, त्यांचे हट्ट आणि भविष्याची चिंता वाहत बाबा अहोरात्र झिजत असतात. स्वतःचे कपडे जुने झालेले असले, पादत्राणे झिजलेली असली, तरी मुलांच्या आनंदासाठी खिशातला शेवटचा रुपया आनंदाने रिकामा करताना कधीच बाबांच्या कपाळावर आठी उमटत नाही. मुलाला यश मिळालं की आई त्याला उराशी धरून रडते, पण बाबा मात्र घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा गच्चीवर जाऊन शांतपणे आनंदाश्रू पुसतात. जगासमोर ते नेहमी कणखरच राहतात, कारण त्यांना माहिती असतं की घरातील हा मुख्य कणा जर मोडला, तर अख्खं घर कोलमडून पडेल!
’देणाऱ्याने देत जावे’ या अतिशय प्रसिद्ध कवितेत कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात:
हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी.
या ओळींमध्ये थोडासा भावबदल करून मी असं म्हणेन:
प्रेम देणाऱ्या आईकडून मायेची उबदार शाल घ्यावी,
घराचे आभाळ पेलणाऱ्या बाबांकडून सह्याद्रीची ढाल घ्यावी!
आपल्याकडे आईची महती सर्वांनीच गायिली आहे, पण त्या मानाने बाबा हे नाते थोडे दुर्लक्षितच राहिले आहे. आजच्या गतिमान युगात कोणी कोणाला क्वचितच पत्र लिहितो. परंतु पूर्वी जेव्हा एकमेकांच्या भावना किंवा सुखदुःखे जाणून घेण्यासाठी पत्राशिवाय दुसरं माध्यम नव्हतं, तेव्हा बाहेरगावी असणारा मुलगा वडिलांना पत्र लिहिताना पत्राची सुरुवात ‘तीर्थरूप’ या शब्दाने करायचा. आपली संस्कृती वडिलांना केवढं सर्वोच्च स्थान देत होती, हेच यातून सिद्ध होतं. वडील हे ‘तीर्थरूप’ म्हणजे तीर्थासारखे पवित्र! त्यांचं छत्र जोपर्यंत शिरावर आहे, तोपर्यंत अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरजच उरत नाही. ‘आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी’ या सुंदर भावगीतात नेमका हाच विचार सांगितला आहे. आपल्याकडे केवळ एक दिवस ‘फादर्स डे’ साजरा करण्याची पद्धत नाही; आपली संस्कृती तर रोजच आई-वडिलांना आणि गुरूंना वंदन करायला शिकवते. “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव” हाच आपल्या जगण्याचा पाया आहे.
आईची कोमलता, प्रेम, माया आणि हळुवारपणा या गुणांच्या पार्श्वभूमीवर बाबांचे थोडेसे विरोधी वाटणारे व्यक्तिमत्व अधिक उठून दिसते. रामगणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज आपल्या कवितेत महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हणतात:
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा,
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा!
जसा हा महाराष्ट्र वरून राकट आणि कणखर असला, तरीातून नाजूक, कोमल आणि फुलांचा प्रदेश आहे; मला वाटतं बाबांचे व्यक्तिमत्त्वही हुबेहूब असंच असतं! ते वरून राकट आणि कणखर दिसतात, पण ते केवळ बाह्य रूप असतं. मनाने बाबा सुद्धा तितकेच हळवे असतात. आईचे अश्रू सहज दिसतात, बाबांचे दिसत नाहीत; एवढाच काय तो फरक! बाबा म्हणजे अगदी ‘नारळासारखे’. नारळ वरून पाहायला किती कठिण, खडबडीत आणि टणक असतो; पण त्याच्या आत डोकावून पाहिलं, तर तिथे मायेचं गोड पाणी आणि शुभ्र खोबरे साठलेलं असतं. भगवान शंकरांनी जगाला वाचवण्यासाठी हलाहल विष कंठात धारण केलं, पण बाबांनी प्रपंचात येणाऱ्या समस्यांचं आणि संकटांचं हलाहल चक्क स्वतः पिऊन टाकलं! त्या आगीची झळ त्यांनी कधीच आपल्या लेकरांना लागू दिली नाही. मुलीच्या पाठवणीच्या वेळी जगासमोर खंबीर राहणारा, पण पाठीमागे कोपऱ्यात जाऊन मुसमुसून डोळे पुसणारा पिता मी स्वतः अनुभवला आहे.
वडिलांच्या स्वभावातील काही वेळा जाणवणारी कठोरता आणि शिस्त ही केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या उज्वल हितासाठीच असते. आई जर मुलाचा पहिला गुरू असेल, तर वडील मुलाला मोठे होईपर्यंत आणि जगाच्या बाजारात पाय रोवून उभे राहेपर्यंत मार्ग दाखवणारे खरे मार्गदर्शक असतात. जेव्हा लहान असलेला मुलगा आईचं बोट सोडून चालण्याइतका मोठा होतो, तेव्हा त्याला पुढचा खडतर मार्ग बाबांच्याच मार्गदर्शनाने दिसू लागतो. पावलापावलावर ते त्याची सोबत करतात. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” अशी त्यांची मूक भूमिका मुलाला आश्वस्त करणारी आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते. अपयशाच्या काळात पाठीवर मायेचा हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे बाबाच असतात.
’आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकात डॉ. नरेंद्र जाधव यांचे अशिक्षित वडील त्यांना जे मोलाचे मार्गदर्शन करतात, ते प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणतात, “तू काय बी कर, काय बी शिक; पण जे काय करशील त्याच्यात टॉपला जा! ” गायनाच्या क्षेत्रातील इतिहास ज्यांच्या नावाशिवाय कधीच पुढे जाऊ शकत नाही, अशा मंगेशकर भावंडांना आणि विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकरांना स्वरांचे बाळकडू देऊन घडवणारे त्यांचे वडील मास्टर दीनानाथच होते!
साहित्याच्या आणि सिनेमाच्या पडद्यावरही या नात्याची अथांगता नेहमीच अधोरेखित झाली आहे. ‘ शोले ‘ चित्रपटात जेव्हा तरुण मुलगा अकाली मृत्यू पावतो आणि तिथे त्याचे वृद्ध, अंध वडील (अभिनेते ए. के. हंगल) येतात, तेव्हाचा तो प्रसंग आणि त्यांचा संवाद काळीज चिरून टाकणारा आहे. ते अत्यंत कातर स्वरात म्हणतात—”जानते हो दुनिया का सबसे बडा दुःख क्या होता हैं? बाप के कंधे पर बेटे का जनाजा. ” काळीज विदीर्ण करून टाकणारे हे शब्द आहेत!
’कुंवारा बाप’ चित्रपटात आपल्याला सापडलेल्या एका अनाथ मुलाला जीवापाड जपणारा मेहमूद आठवा….. त्या मुलाला पोलिओच्या आजारातून वाचवण्यासाठी तो जे रक्ताचं पाणी करतो, त्याचं वर्णन कोणत्या शब्दात करावं? तो प्रसंग पाहताना नकळत आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. अगदी त्रेतायुगात डोकावले, तर कैकयीला दिलेल्या वचनामुळे प्रभू रामाला जेव्हा वनवासात जावे लागते, तेव्हा पिता असलेल्या दशरथ राजाचा शोक हृदय पिळवटून टाकणारा आहे. हा कर्तव्यनिष्ठ पिता शेवटी केवळ पुत्रशोकातच आपले प्राण सोडतो.
गीत रामायणात श्रीराम आणि लव-कुश यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत अद्भुत रीतीने वर्णन केला आहे. ‘कुश लव रामायण गाती’ हे गीत ऐकलं की डोळे भरून येतात. प्रभू श्रीरामांसमोर त्याचेच अपत्य त्याचे चरित्र गात असताना, गदिमांनी (ग. दि. माडगूळकर) शब्दांचा केवढा सुंदर चमत्कार साधला आहे:
“पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती! “
आणि तेवढ्याच ताकदीने बाबूजींनी (सुधीर फडके) ते आपल्या सुरांनी अजरामर केले आहे. या शब्दांचा प्रत्यक्ष प्रभू रामावर काय परिणाम होतो? तर गदिमा पुढे लिहितात:
सोडुनि आसन उठले राघव, उठुनि कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती!
पिता-पुत्रांच्या या भेटीला गदिमांनी ‘पुत्रभेटीचा महोत्सव’ असे अतिशय सुंदर शब्द वापरले आहेत. खरोखरच दिव्य आणि अलौकिक प्रतिभा! ज्या रामाच्या पराक्रमाला पाहून कळिकाळही थरारतो, असे कर्तव्यकठोर श्रीराम आपल्या राजासनावरून उठून चक्क त्या लहान बालकांना प्रेमाने उराशी धरतात; कारण त्यांच्यातही असतं पित्याचं प्रेमळ हृदय!
इतिहासाच्या पानापानांत डोकावून पाहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत माता जिजाऊंचे संस्कार जसे अनन्यसाधारण होते, तसेच वडील शहाजीराजांचे शौर्य, युद्धकौशल्य आणि ‘स्वराज्य’ स्थापनेची मूळ प्रेरणा ही वडिलांचीच देणगी होती. शहाजीराजांनी शिवरायांच्या पाठीवर ठेवलेला तो अदृश्य विश्वासाचा हातच होता, ज्याने एका नव्या युगाची पहाट निर्माण केली. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे:
”आईकडे बोट धरून जगामध्ये कसं चालायचं हे शिकायचं असतं, पण रस्ता संपल्यावर पुढे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, हे फक्त बाबांनीच शिकवलेलं असतं. “
जीवनात संघर्ष करण्याची ताकद आणि वागताना हवा असणारा विवेक हा मुलाला वडिलांच्या प्रेरणेतूनच मिळत असतो.
पण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, वर्तमान परिस्थितीने बाबा या नात्यासमोरही अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीच्या काळी वडिलांचा घरात एक वेगळा ‘दरारा’ असायचा. बाबा घरात आले की मुले शांत व्हायची, एका कोपऱ्यात जाऊन अभ्यासाला बसायची. तो काळ वेगळा होता आणि त्या काळाची शिस्त वेगळी होती. आज मात्र काळ बदलला आहे. आजचे बाबा हे केवळ शिस्त लावणारे ‘वडील’ उरलेले नाहीत, तर ते मुलांचे ‘सखे’ आणि ‘मित्र’ झाले आहेत. आजचा बाबा मुलांशी खेळतो, त्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्या मनातले समजून घेतो; बाबांचे हे बदललेले रूप अत्यंत सुखद आणि स्वागतार्ह आहे.
परंतु, या आधुनिक आणि धावपळीच्या युगात ‘करिअर’ आणि ‘पैशांच्या’ शर्यतीमुळे बाबांना कुटुंबासाठी हवा तेवढा वेळ देणे जिकिरीचे झाले आहे. अहोरात्र काम केल्यामुळे मुलांशी असणारा प्रत्यक्ष संवाद बऱ्याचदा मागे पडतो. आपण मुलांना महागड्या वस्तू, गॅजेट्स किंवा चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन देतो; पण त्यांना पैशांपेक्षा बाबांच्या ‘वेळेची’ आणि त्यांच्या ‘स्पर्शाची’ जास्त गरज असते, हे आजच्या पित्याला समजून घ्यावे लागेल. केवळ आर्थिक गरजा पूर्ण करणे म्हणजे पितृत्व नव्हे, तर मुलांच्या भावविश्वात प्रत्यक्ष उपस्थित राहणे, त्यांना नैतिक मूल्यांची जोड देणे ही आजची मोठी गरज आहे.
ज्याप्रमाणे आई सुसंस्कारित असेल तर घर घडतं, तसेच बाबांचे घराकडे असणारे लक्ष, त्यांची संयमी वृत्ती आणि त्यांनी घेतलेले योग्य निर्णय यावर कुटुंबाचे संपूर्ण आरोग्य अवलंबून असते. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा पितृत्वाचा पदर जर बळकट आणि सुरक्षित राहिला, तरच येणारी पिढी कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकेल. बाबा नावाच्या या आकाशाएवढ्या छत्राची सावली जपणे आणि त्यांच्या त्यागाची कृतज्ञतेने जाणीव ठेवणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे.
थकलेल्या आणि वयस्कर झालेल्या बाबांसाठी ‘वृद्धाश्रम’ ही जागा म्हणजे शेवटचा पर्याय आहे असं मला वाटतं. घरातच त्यांना सर्वोच्च सन्मानाचे स्थान हवे. ‘नटसम्राट’ नाटक आपण सर्वांनीच पाहिले असेल; त्यातील गणपतराव उर्फ अप्पा बेलवलकर यांना आणि त्यांच्या पत्नीला वृद्धापकाळी मुलं सांभाळायला तयार होत नाहीत, तेव्हा त्यांची होणारी घालमेल काळीज हेलावून टाकते. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ चित्रपटही याच विदारक वास्तवावर भाष्य करतो. अशी नाटकं किंवा चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहत नाहीत. कोणीतरी फार सुंदर म्हटले आहे:
”या वाळलेल्या पानांवर नेहमी जपून पाय ठेवा….. कारण, एकेकाळी याच पानांनी तुम्हाला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती! “
आज त्या पानांना आपल्या प्रेमाच्या आणि आदराच्या सावलीची नितांत गरज आहे, हे आपण विसरता कामा नये.
© श्री विश्वास देशपांडे
३/७/२०२६
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी – ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





