श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “टाइम मॅनेजमेंट” – लेखिका : सुश्री मीना शेटे-संभू ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : टाइम मॅनेजमेंट
*तणावमुक्त, यशस्वी आणि सुखी जीवनाचे रहस्य*
लेखिका : मीना शेटे – संभू
पृष्ठ: १७२
मूल्य: २५०₹
हे केवळ वेळापत्रक तयार करण्यापुरतं मर्यादित नसून, उद्दिष्ट निश्चित करणं, कामांचं योग्य नियोजन, प्राधान्यक्रम ठरवणं, स्वयंशिस्त, सातत्य आणि डेडलाइनचं पालन यांचा समन्वय आहे. या पुस्तकात वेळेचा अधिक परिणामकारक उपयोग करून स्मार्ट वर्क कसं करावं, याचं सोप्या आणि शास्त्रशुद्ध भाषेत मार्गदर्शन केलं आहे. महिलांच्या दैनंदिन जीवनातील अनुभवांमधून वेळेच्या व्यवस्थापनाची प्रभावी उदाहरणं उलगडत, छोट्या सवयींपासून मोठ्या तत्त्वांपर्यंत प्रत्येक पैलू समजावून सांगितला आहे. अधिक यशस्वी, संतुलित आणि परिणामकारक जीवन जगण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकासाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.
वेळेचं व्यवस्थापन म्हणजे काय, ते का आणि कसं करावं, याची इत्थंभूत शास्त्रशुद्ध; परंतु सुलभ भाषेतील माहिती. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे फक्त वेळापत्रक आखणं नव्हे, तर त्यात उद्दिष्टपूर्तीकरिता आणि उद्दिष्टं निश्चित करण्यापासून डेडलाइन पाळणं अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. फक्त खडतर कष्ट करत राहण्याऐवजी परिश्रमपूर्वक स्मार्ट वर्क करण्याला अधिक महत्त्व असतं. या मोठमोठ्या शब्दांचा खरा अर्थ महिलांच्या दैनंदिन कामातून स्पष्टपणे दिसून येतो म्हणूनच त्यांना वेळेच्या व्यवस्थापनाच्या गुरू म्हटलं पाहिजे. थेट वाचकांशी संवाद साधत वेळेच्या व्यवस्थापनातील बारीकसारीक गोष्टींपासून मोठ्या सिद्धान्तांपर्यंतच्या अनेक गोष्टींचा केलेला ऊहापोह.
लेखिकेचा परिचय –
मीना शेटे-संभू यांनी दै. सकाळमध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून २२ वर्षे काम केले. शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता विषयाच्या मानद प्राध्यापिका आणि कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केले. गेल्या १५ वर्षांत त्यांनी विविध प्रकाशन संस्थांच्या विविध विषयांवरच्या १३७ इंग्रजी आणि ६ हिंदी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला असून, त्यांची सहा स्वरचित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘टाइम मॅनेजमेंट वेळेचे व्यवस्थापन’ हे त्यांचे सातवे स्वरचित पुस्तक आहे. याशिवाय त्यांची तीन इंग्रजी ई-पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शोध पत्रकारिता आणि अनुवाद या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरींबद्दल त्यांना काही प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





