रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
कंदील फुले…
रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(वृत्त- लवंगलता)
(मात्रा- ८+८+८+४=२६ यति ८ व १६ व्या मात्रेवर)
☆
सह्याद्रीच्या डोंगररांगा
गडकिल्ल्यांवर सजली
कंदील फुले बहर बहरुनी पहा किती गजबजली ||ध्रु||
*
वेली वरती फांदी सजली दिवे लावले कोणी
वरदानाने भगवंताच्या लखलख झाली क्षोणी
निरांजन कधी लोभसवाणी समई मज दिसली
कंदील फुले बहर बहरुनी पहा किती गजबजली ||१||
–
कलारग्याची झाडी झाली गड राखण करणारी
शिवरायाचे छत्र लाभले नामाने स्मरणारी
डोंगर उतार वळणे वळणे किती हिने घेतली
कंदील फुले बहर बहरुनी पहा किती गजबजली ||२||
*
आकाराने वेगवेगळी मना मोहिनी घाली
शब्दांना चेतना मिळाली कविता सुंदर झाली
हनुमान गदारुपे साजरी पानो पानी रुजली
कंदील फुले बहर बहरुनी पहा किती गजबजली ||३||
☆
© रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


