श्री मंगेश मधुकर
मनमंजुषेतून
☆ “भीतीपोटी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
“बोला, काय तक्रार आहे”हातातलं रजिस्टर ठेवत हवालदार कदमांनी विचारलं.
“साहेब, हा माणूस फार भयानक आहे”बाजूला बसलेल्या बाबूकडं बोट दाखवत ताई म्हणाल्या.
“चांगल्या घरातले, शिकलेले वाटता”कदमांनी बाबूकडं पाहत विचारलं.
“ग्रॅज्युएट आहे. सुपरवायझर म्हणून काम करतो”बाबू.
“दिसण्यावर जाऊ नका. आठ दिवस भयंकर प्रकार करत आहेत. सोसायटीतल्या भटक्या कुत्र्यांना हा माणूस त्रास देतोय. ”
“आयला!! , हे नविनच ऐकतोय. त्रास देतात म्हणजे नक्की काय करतात”कदमांनी उत्सुकतेनं विचारलं.
“काठी घेऊन शोधाशोध करतात कुत्रं सापडलं की काठीनं मारतात आणि पळालं तर दगड मारतात. सकाळी सातनंतर यांचा मारमारीचा कार्यक्रम सुरू होतो. ”
“नवलच आहे. काय रे, या मॅडम सांगतात ते खरंय का? ”कदमांनी खडसावलं पण बाबू काहीच बोलला नाही.
“हा घ्या पुरावा”ताईंनी मोबाइल पुढे केला. व्हिडिओ पाहून कदम भडकले.
“थोबाड फोडू का? हे नस्ते उद्योग कशाला रे? . ”
“माझी तक्रार घ्या. नाहीतर मी प्राणीमित्र संघटनेकडे जाते. ”ताई.
“थोडा धीर धरा. चौकशी चालूयं ना. जरा आमच्या पद्धतीने काम करू दया. ए, तू आता बोलतोस की… ”
“साहेब, माझं वागणं चुकीचचं आहे पण पर्याय नाही. भीतीपोटी मी करतोय. ”बाबू
“असले प्रकार काही करण्यापेक्षा तक्रार करायची. ”
“केली होती. कुत्र्यांना पकडायला आलेली गाडी तासभर थांबून गेली. एकही कुत्रा सापडला नाही. ”
“म्हणून दगडं मारायची. हे बरोबर नाही. त्यांनाही जीव आहे. ”ताई.
“मॅडम, तुमचं प्राणीप्रेम तुमच्याजवळ ठेवा. घरात बसून ज्ञान देणं सोप्पयं. ज्याचं जळतं त्यालाच कळतं”बाबू.
“तुझं काय जळालं रे”हवालदार कदम.
“ पंधरा दिवसांपूर्वी माझी बायको सकाळी दूध आणायला जात होती. अचानक सगळी कुत्री जोरजोरात भुंकत तिच्या दिशेनं धावत आली. ”
“भुकेली असतील. हातातली पिशवी बघून खायला आहे असं वाटलं असेल. ”ताई.
“कमाल आहे. तुम्ही अजूनही कुत्र्यांच्या बाजूनेच विचार करताय. देवाच्या कृपेनं तिथं असलेल्या बाईकवाल्यानं आरडाओरड करत दगड फेकले म्हणून कुत्री पळाली. बायकोला काही झालं नाही पण खूप घाबरली. तिनं एवढी धास्ती घेतलीये की त्यादिवसानंतर एकदाही घराबाहेर पडलेली नाही. भुंकण्याचा आवाज आला तरी थरथर कापते. ”बाबूचा आवाज कातर झाला.
“म्हणून तू हा उपाय शोधलास. ”
“त्या कुत्र्यांना सोसायटी बाहेर घालवल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि ते जात नाहीत तोपर्यंत माझी बायको नॉर्मल होणार नाही. ”बाबूची बाजू ऐकून हवालदार कदम नरमले. “मॅडम, तुम्हाला आता वस्तुस्थिती कळली असेल. त्यांचं सगळंच चूक नाहीये. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची दहशत वाढलीये. रात्री तर जाम भीती वाटते. कधी, कुठून येऊन गपकन धरतील याचा भरवसा नाही. ”
“मग आता काय करायचं”ताईं वैतागल्या.
“सोसायटीतील सगळी कुत्री मनपावाले घेऊन जातील. ”
“हरकत नाही”ताई.
“कुणीही नेऊ दया. फक्त सोसायटीत नकोत”बाबू.
“दोन दिवसात प्रॉब्लेम सुटेल पण तोपर्यंत शांत राहायचं. दगड मारायचे नाहीत. ”कदमांनी बाबूला बजावलं.
“साहेब, मला सुद्धा हौस नाही पण… जाऊ द्या पण काय ते लवकर करा. सोसायटीत म्हातारी माणसं, मुलं आहेत. काही गंभीर घटना घडायच्या आधी कुत्र्यांचा बंदोबस्त करा ही हात जोडून विनंती. तुम्ही म्हणताय म्हणून दोन दिवस थांबतो. नाहीतर माझा उपाय आहेच”नमस्कार करून बाबू गेला. ताई आणि हवालदार कदम पाहत राहिले.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



