प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २१ ☆ प्रा.भारती जोगी ☆

निर्मलाताई आठवले!!

मार्च १९४४. रायगड जिल्ह्यातील रोहा गाव! कुंडलिका नदीच्या किनारी एक नवपरिणीत जोडपे बसलेले. नदी संथपणे वाहत होती. वाटेतल्या मोठ्या खडकांच्या बाजूनं जातांना पाणी खळाळत होतं. तिन्हीसांज होत आलेली… पक्षीगण परतीच्या वाटेला… अशा वेळी पती पत्नीला म्हणाला, ” मी केवळ विद्वान पंडित बनून राहणार नाही किंवा शास्त्रीबुवा बनून देवळात कथा सांगत बसणार नाही. आजपर्यंत जे कार्य कुणीही केलं नाही ते मी करणार आहे. धर्माचं शुद्ध स्वरूप मला समाजासमोर ठेवायचं आहे. या कार्यात मला तुझं सहाय्य हवं आहे. “

क्षणाचाही विलंब न लावता पत्नी उत्तरली, ” माझ्या अंगावरची सोन्याची शेवटची गूंज असेपर्यंत मी तुम्हाला साथ देईन. “

मावळत्या सूर्याच्या साक्षीने जणू तिनं वचनच दिलं!! त्या पवित्र संधिप्रकाशात एका निश्चयाने उजळून आणि तेजाळून निघालेली तिची मुद्रा ; अगदी देवघरातल्या नंदादीपासारखी भासली त्यांना!

हा शांत नंदादीप होता… निर्मलाताई आठवले!!

आणि एक वेगळंच धर्म कार्य करायला सिद्ध झालेला तो तरुण होता… प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले

 त्याच वेळी निर्मला ताईंच्या लक्षात आलं की सर्वसामान्य गृहिणी सारखा संसार करून चालणार नाही. पतीचं कार्य हे जगावेगळं आणि विश्वव्यापी असणार आहे. आर्थिक प्राप्ती साठी मुळीच नाही. किंबहुना पदरचेच पैसे खर्च करून हे कार्य करावे लागणार आहे. हाती येतील तेव्हढ्याच पैशात संसार करावा लागणार. मला माझ्या पतीला साथ दिली पाहिजे.

आणि निर्मलाताईंनी ठरवूनच टाकलं… पतीशी एकरूप होऊन त्यांच्या कार्यात सहभागी व्हायचं. स्वतः चं असं वेगळं अस्तित्व उरलंच नाही मग त्या दिवसापासून सुरू झाला या समिधेचा समर्पणाचा प्रवास!

प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांना आजच्या तरुणाई ला भारतीय संस्कृती, वेद, उपनिषद यांचे ज्ञान देणारे एक हक्काचं केंद्र उभारायचं होतं. ठाण्यातील घोडबंदर रोडवर दोघं ही… स्वप्नांच्या उभारणीसाठीच्या जागेची पाहणी करायला गेले. जाऊन बघतात तो काय… अतिशय दुर्गम, चिखलमय, झाडा-झुडुपांनी वेढलेली जागा… पाऊल ठेवणे ही कठीण! चालणं तर मुश्किलच!!

मोठ्या मुश्किलीने चालतांना ; एका ठिकाणी निर्मलाताईंचे पाय त्या मातीत रूतले… खोलवर अगदी! पुढे चालणे ही कठीण!

हे पाहिले आणि प. पू. पांडुरंग शास्त्री जी (दादा) म्हणाले, ” ईश्वराची हीच इच्छा आहे की, आपल्या तत्वज्ञान विद्यापीठाची मुख्य इमारत याच जागी उभी रहावी “! मातीत रूतल्या पायांनी जणू संकेतच दिला.

आणि त्याच जागी, सगळ्या अडचणी सोसून इमारतीचा पाया रचला गेला. त्या दुर्गम भागातील चिखलातूनच मग उमललं एक नयनरम्य, दिमाखदार असं तत्त्वज्ञान विद्यापीठ! एका तपोभूमीची निर्मिती झाली. त्याच मातीत तयार झाली चैतन्याची अशी एक देखणी वाट! निर्मलाताईंच्या प. पू. दादां बरोबरच्या प्रवासाची ही वाट! त्यांच्या मनातल्या विचारांची इमारत माणसांच्या मनात उभी राहण्या पूर्वीच, ही भौतिक इमारत उभी करण्यासाठी ताईंनी ती माती आपल्या हात आणि पायाला लावून घेतली.

ही इमारत उभी करण्यासाठी विविध भागातून तरूण स्वाध्यायी श्रमदानासाठी येत. निर्मलाताई स्वतः जातीने त्यांच्या जेवणाचं अगदी आईच्या मायेनं बघत.

 इमारती पैशाने उभ्या राहतात. पण ही इमारत आकाराला येत होती ती… मानसिक आणि भावनिक संघर्ष, माया यांतून!

म्हणूनच ही दगड-मातीची वास्तू तपोभूमी बनली नंतर. या तपस्विनी च्या तपोबलाचं हे फल!!

बांधकाम करतांना पाण्याची खूपच अडचण… मग विहीर खणायचे ठरले. पाण्याचा तुटवडा, डोंगराळ भाग, विहिर खणण्याचं काम सुरू झालं… पण पाणी लागेना. हताश झाले सगळे. पण ताई धीर देत आणि सांगत, ” माती आणि दगड कितीही कठीण असले तरी आपल्या मनातील भक्ती पेक्षा कठीण नाहीत. “…

भक्ती आणि कष्टाचा संगम झाला… विहिरीला गोड पाणी लागले.

दादांच्या विचारांना… ही अशी निर्मलाताईंच्या मायेची जोड लाभली. त्यांनी प्रत्येक माणसाला आणि दगडाला मायेनं जोडलं. त्यांची ‘माया ‘ या कार्याचा ‘पाया ‘ ठरली!

 ‘ स्वाध्याय परिवाराच्या’ माध्यमातून संत, ऋषी मुनींनी टिकवलेल्या वैदिक संस्कृतीची विचारधारा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणा-या एका महान व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून परिवारावर मातृवात्सल्याने प्रेमाचा हात फिरवणारी शक्ती म्हणजे… निर्मलाताई!!

शांत, सौम्य, संयमशील व्यक्तिमत्त्व! प्रसिद्धी, किर्ती चा मोह नव्हताच त्यांना! सांस्कृतिक कार्य करणा-या आठवलेंच्या ५ पिढ्यांची परंपरा जपत, पुढे नेणा-या महान कर्मयोग्याची, तपस्व्याची सहचारिणी, सहधर्मचारिणी म्हणून भूमिका निभावण्याचे आव्हान लिलया पेलणारी तपस्विनी होती ही!!

“मौनातून प्रेरणा देणारी साध्वी” च!

अवघ्या १८ व्या वर्षी संसार धर्म पाळत, नातेवाईक, पाहुणे रावळे सगळ्यांचं जातीने लक्ष देऊन करत. दुपारी सगळं आवरून उसंत मिळाली की थोडं वाचन ही करायच्या.

एकदा अशाच शेजारच्या घैसास मामींनी निर्मलेला वाचन करतांना बघितलं आणि आश्चर्याने तिच्या सासूबाईंना म्हणाल्या, “अहो, पारूताई, तुमची सून बघा पुस्तक वाचतीये”… पांडुरंग शास्त्रींच्या कानावर हे शब्द पडले, ते हळुच म्हणाले, ” मामी, ती माझी पत्नी आहे. माझ्या प्रमाणेच ती ही सगळं काही वाचणार. तिच्या पाठीमागे घरची कामं नसती तर ‘ रॉयल एशियाटिक लायब्ररी’ सुद्धा तिनं वाचून काढली असती”!!

हीच ती पतीची ख-या अर्थाने लाभलेली साथ. म्हणून च बळ लाभलं या पावलांना! समाजाचा संसार करायला निघालेल्या पतीला संपूर्ण समर्पित साथ देण्याचं बळ!!

निर्मलाताई आणि प. पू. पांडुरंग शास्त्री जी यांच्यात जणू त्या दिवशीच कुंडलिका नदीच्या साक्षीने अद्वैत झालं होतं! म्हणून च… त्यांच्या समाज संसारातल्या प्रत्येक भागात सहभागी होण्याचं भाग्य निर्मलाताईंना लाभलं. प्रस्थापितांच्या विरोधात उभं ठाकून परिवर्तन घडवून आणणा-या आपल्या पतीला संपूर्ण साथ दिली त्यांनी. दादांनी ही ती साथ मागितलीच होती एकदा बोलता बोलता… म्हणाले होते,

” निर्मला, अंदमानात असतांना रूग्णशय्येवरून सावरकरांनी एक अलौकिक कविता केली होती.

मी दुपार व्यर्थ गमावली नाही. म्हणून संध्याकाळचं भय मला वाटत नाही! 

म्हणजेच जीवनातील तारुण्याची एक क्षण ही त्यांनी वाया दवडला नव्हता. म्हणून अखेरीचं भय नव्हतं त्यांना. कृतकृत्य झाले होते ते. तसच भय मलाही संपवायचयं. जीवनाची दुपार कारणी लावायचीये मला सुद्धा! “

त्यावेळचे दादांचे शब्द, ” सावरकर पती-पत्नीच्या त्यागाला तोड नव्हती. माईंचा ही त्याग मोठा होता. तुलाही तसाच त्याग करायचा आहे “!!!

त्यावेळी निर्मलाताई म्हणाल्या, ” मलाही वाटतं, माझा संसार फुलावा, बहरावा. पण तुम्ही जो समाजाचा संसार चैतन्याने बहरवायला निघाला आहात त्यात मी साथ कशी नाही देणार बरं? “

ही आहे ती विशाल मनाने, “वसुधैव कुटुंबकम्” या वृत्तीने पतीच्या बरोबरीने चैतन्याच्या मार्गावर पावलं टाकत शेवटपर्यंत चालत रहाणारी… सहधर्मचारिणी!!

आपलं वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून निर्मलाताई आपल्या पतीच्या कार्याशी तनमनानं एकरूप झाल्या होत्या. दोघांची मनं खरोखरच एकरूप झाली होती.

 *रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांच्याप्रमाणेच ते दोघे जणू एकाच शरीराचे दोन डोळे बनले होते. *

दादा जेव्हा घरातून बाहेर पडत तेव्हा निर्मलाताईंचं मन त्यांच्या बरोबरच असे कायम… हर पल… हर क्षणी बरोबरच चालत असे… शेवटपर्यंत चालतच राहिलं!!

प्रकृती-पुरूष… शिव-पार्वती… सारखं हे अद्वैत… हा अद्वितीय अनुभव वाट्याला आलेल्या या अमूल्य क्षणांची लाभार्थी… निर्मलाताई… त्यांनी दादांच्या नंतरही ही चैतन्याची वाहणी प्रवाहीतच ठेवली… अविरत… अखंड!!! प्रसिध्दी परान्मुख राहात स्वाध्याय परिवार, परिवारातील सदस्य आणि आपली लेक *जयश्री* यांच्यावर माया, ममता, वात्सल्य, शिस्त, स्वच्छता, टापटीप आणि… *वेळच्या वेळी… जिथल्या तिथे*… या जीवन मंत्राची संस्कार पखरण, सिंचन करतच राहिल्या.

शेवटी जानेवारी २०१७ मध्ये ९० व्या वर्षी आपल्या निवासस्थानी म्हणजे… *तत्वज्ञान विद्यापीठात* च या समर्पितेने वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. एक शांतपणे तेवणारी ही समिधा… त्याच ठिकाणी निमाली… शांत झाली… ज्या इमारतीचा पाया ती होती… त्याच मृदेच्या गंधात हा समर्पण गंध मिसळला… आणि धन्य झाला!

हे निर्मलाताईंचं *शताब्दी वर्ष* त्यानिमित्ताने या समिधेचा सुगंध दरवळविण्यासाठी उचलेला हा खारीचा वाटा! या समिधेला शत शत नमन!!

– लेख क्र. २१ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted