विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ सोशल मीडिया पासून सावधान – – – ☆ विभावरी कुलकर्णी ☆

मला या सोशल मीडियाचे विविध फसवणूक करणाऱ्या प्रकारांचे विविध अनुभव आले आहेत. आणि फसवणूक होता होता वाचले असे आत्तापर्यंत झाले आहे. त्यामुळे मी अधिक सतर्क होत रहाते. आपण कितीही सावध राहिले तरी कोणत्या वेळी फसवले जाऊ हे सांगू शकत नाही. अशा मला आलेल्या अनुभवांवर यापूर्वी लिहिले आहे. आणि अशी फसवणूक इतर कोणाची होऊ नये या साठी कशी फसवणूक होऊ शकते आणि असे झाले तर काय करावे? असे सावध करणारे लेख लिहिले आहेत. त्यात भर घालणारा काल अजून एक अनुभव आला तो आजच्या लेखात सांगत आहे.

आज माझा मोबाईल नंबर २ तासात बंद होणार होता! (पण मी वाचले)

सकाळी चहा हातात होता आणि मोबाईल वाजला. पलीकडून एकदम गंभीर आवाज –

“नमस्कार, मी जिओ कडून बोलत आहे. तुमचा मोबाईल नंबर २ तासात बंद होणार आहे. अशी सूचना TRAI कडून आली आहे.

नंबर चालू राहू द्यायचा असेल तर तुमची माहिती सांगा. आम्ही ग्राहकांची खात्री करत आहोत. “

आणि मग पुढचे प्रश्न सुरु झाले.

१) हा नंबर तुम्हीच वापरता का?

मी हो म्हणाले.

२) नंबरचे शेवटचे अंक १९७ आहेत का?

पुन्हा मी हो म्हणाले. पण थोडी सावध झाले. पण तरीही काही विचार क्षणात मनात आले.

अरे बापरे! माझा नंबर बंद झाला तर? माझे सगळे OTP, बँकेचे मेसेज, WhatsApp सगळेच बंद!

३) तुमची जन्म तारीख काय आहे?

आता मात्र पूर्ण सावध झाले. आणि “माझा नंबर बंद होऊ दे. माझे सर्व कॉल रेकॉर्ड होतात. आता पोलिस उत्तर देतील! ” असे म्हणताच, पलीकडून फोन कट झाला. मी ताबडतोब तो नंबर ब्लॉक केला. आणि पुढचे विचारचक्र सुरु झाले.

समजा मी त्यांना उत्तरे देत गेले असते तर…

आणि मग डोक्यात लखकन प्रकाश पडला. TRAI कधी कोणाला असा फोन करते का? TRAI काही माझा मामा नाही की मला प्रेमाने सांगेल “बाळा, तुझा नंबर बंद होणार आहे. “

नंतर शोध घेतला तर कळले, हा तर नवीन स्कॅम आहे.

यांची स्क्रिप्ट कशी असते बघा – सिनेमापेक्षा भारी! 

सीन १ : तुम्हाला घाबरवणार – “नंबर बंद होणार आहे. “

सीन २ : तुम्ही माहिती एक सांगितली, की पुढची विचारणार, आधार कार्ड नंबर विचारणार आणि “तुमच्या आधार कार्ड वर दुसऱ्याने सिम घेतले आहे, तुम्ही अडचणीत आहात. ” असे सांगून गोंधळ व भीती वाढवणार.

सीन ३ : मग एक “नकली पोलीस” म्हणतो – “तुम्हाला वाचवायचे असेल तर पैसे पाठवा. “

म्हणजे भिती दाखवायची आणि खिसा रिकामा करायचा, हाच यांचा धंदा.

कधी कधी असे प्रश्न न विचारता अधिक माहिती साठी ९ नंबर दाबा असे सांगतात. आणि मग “तुमच्या नावावर दुसऱ्या कोणी सिम कार्ड घेतले आहे असे सांगतात. ” आणि अधिक घाबरवणे सुरू होते.

म्हणून काही गोष्टी, लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

१. कोणताही सरकारी अधिकारी तुम्हाला फोनवरून “तुमचा नंबर बंद होणार” अशी धमकी देत नाही. सरकारला तुमचा नंबर बंद करायचा असेल तर ते तुमच्या कंपनीला सांगेल, तुम्हाला नाही.

२. असा कॉल आला की हिरो बनू नये. वाद घालू नये. सरळ फोन कट करुन ब्लॉक करणे. हाच सर्वोत्तम उपाय आहे.

३. आणि हो, आपल्या घरातल्या आई-बाबांना हे नक्की सांगा, कारण हे ठग लोक जास्त करून त्यांनाच घाबरवतात.

मी तर वाचले, तुम्हीही सतर्क राहा! 

©  विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन व हिलिंग मास्टर,  समुपदेशक,  सांगितोपचारक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted