शुभा रूद्र 

🌸 विविधा  🌸

☆ रंग, रेषा आणि नात्यांचे बदलते पोत… ☆ शुभा रूद्र  ☆

(वैचारिक: लेख)

☆

मानवी नाती ही कधीच सरळरेषेत किंवा मयूरपंखी नसतात. काम, क्रोध, लोभ या षड्रिपूंच्या भोवऱ्यात ती सतत स्वतःचे रंग बदलत असतात. डॉ. अनघा केसकर यांचा ‘नाती बदलताना’ हा कथासंग्रह याच दाहक वास्तवाचे दर्शन घडवतो. कोड उमटण्यासारखा शारीरिक आजार असो, घटस्फोटाचे सावट असो वा विवाहबाह्य संबंध; अशा वादळात नात्यांची वीण कशी उसवते आणि लहान मुले त्यात कशी भरडली जातात, याचे संवेदनशील चित्रण या कथांमधून उमटले आहे.

पुस्तकातील ‘धवलिमा’ कथेतील अचानक उमटलेले कोड आणि त्यामुळे उडालेली कौटुंबिक तारांबळ वाचताना मला माझ्या कलाशिक्षिका म्हणून आलेल्या एका प्रसंगाची तीव्र आठवण झाली. माझ्या वर्गातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला कुष्ठरोग (लेप्रसी) झाला होता. भीती आणि न्यूनगंडामुळे तिचे बालपण कोमेजले होते; “माझ्या जीवनात आनंद नाही” हे तिने कागदावर लाल-पिवळ्या रंगांतून, स्वतःचे अश्रू आणि वर कोपऱ्यात मला—तिच्या शिक्षिकेला—चित्रित करून मांडले होते.

समाजाने वाळीत टाकण्याची भीती नात्यांना किती असुरक्षित बनवते, याचा तो जिवंत पुरावा होता. तिच्या उपचारासाठी विश्वासू साखळी तयार करून योग्य वैद्यकीय सल्ला मिळाल्यावर ती सावरली आणि पुढे स्वाभिमानाने उभी राहिली.

कथांमधील पात्रे असोत वा वर्गातली ती चिमुरडी, आजार वा संकटांपेक्षाही समाजाची पूर्वग्रहदूषित दृष्टी माणसाला अधिक एकाकी करते. सोशिकपणा किंवा आक्रमकतेपेक्षा खरी गरज असते ती संवादाची आणि समुपदेशनाची. डॉ. अनघा केसकर यांच्या कथा जशा नात्यांमधील विषण्णतेमागचे वास्तव उलगडून अंतर्मुख करतात, तसेच कलेच्या माध्यमातून रंगांनी व्यक्त केलेले दुःखही माणुसकीच्या स्पर्शाने आनंदाचा नवा आकार घेऊ शकते, हाच जीवनाचा खरा धडा आहे.

 नाती उसवता वादळात,

रंग मनाचे बदलत गेले;

अश्रू पुसता विश्वासाने,

पुन्हा नवेपण फुलत आले.

 *

कागदावरल्या लाल-पिवळ्या,

रेषांमधुनी दुःख तराळे;

मायेच्या त्या हळव्या स्पर्शे,

जीवनाचे गीत निराळे.

 *

दाहकतेच्या संकटावरती,

संवादाची फुंकर व्हावी;

कलेत उमटून वेदना सारी,

आनंदाची पहाट यावी.

 ☆

© शुभा रूद्र

मो. 9657189569

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted