श्री संभाजी बबन गायके

🌸 जीवनरंग 🌸

☆ “भाकड दिवस ”  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

ती लग्न होऊन या गावात आली तशी तिची आणि त्याची भेट दुर्मिळ झाली… तो म्हणजे विठोबा…तिच्या माहेरच्या गावातल्या राऊळातला पांडुरंग. सुमन लहानाची मोठी झाली ती त्या सावळ्या परब्रम्हाच्या संगतीत. घर देवळाच्या अगदी समीप होतं. तिथली झाडलोट, आल्या गेल्या साधूसंतांची थोडीफार सेवा सुमनकडेच असायची. आणि दरवर्षी थंडीच्या दिवसांत होणारी काकड आरती तर सुमनच्या हृदयातला मोठा ठेवाच असायचा. भल्या पहाटे उठून देवळाच्या अंगणात सडारांगोळी घालायला सुमन आईसोबत जायची.

लहानशा ताटात तिचे पूजेचे साहित्य सजलेलं असायचं, त्यात तुपातल्या दोन लुकलुकत्या वाती असायच्या. पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली… म्हणताना सुमन हरखून जायची. सुमनला वडील नव्हते. आई शेतावर कामं करीत गुजराण करायची, सुमन मोठी झाल्यावर ती ही शेतावर जाऊ लागली. कसा कुणास ठाऊक सुमनचा हरिपाठ, तुकोबारायांचे अभंग, काकड आरतीतले सर्व गोड अभंग तोंडपाठ होते… नेहमी कानांवर पडत होते म्हणून असेल. सुमनच्या गळ्यात तुळशीची माळ तिच्या वयाच्या पाचव्या दिवशीच पडली होती… तिचं हाड बाटलेलं नव्हतं… म्हणजे तिचा आहार शुद्ध शाकाहारी. कधी काळी क्रीम रोल यायचा समोर.. तर त्यात अंडे असते म्हणून ती त्याला हातही लावायची नाही.

दिवाळीच्या दिवसांतल्या महत्त्वाच्या अर्थात लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवसांच्या काकड आरत्या कुणी करायच्या हे गावात ठरलेलं असतं. गावातले महत्त्वाचे लोक या दिवशी आपल्याला आरतीचा मान मिळावा म्हणून प्रयत्नशील असत. विशेषत: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गावातल्या सरपंचाच्या घरच्यांच्या हस्ते होणा-या आरतीचा थाट मोठाच असे. ती मंडळी भरपूर प्रसाद वाटत, फटके वाजवत, मंदिराला रोषणाई होई. त्यांच्या घरातील झाडून सारी माणसं, विशेषत: महिला नटून थटून काकड आरतीला हजर असत. त्या वर्षी जर एखादी नवी नवरी त्या घरात आलेली असली म्हणजे तर मोठाच समारंभ असे. गावाला सरपंच घरी चहा-फराळाला बोलावीत. एकूणच देवाच्या दरातही श्रीमंतांची चलती असायचीच. पण त्यामुळे काकड आरती धूम धडाक्यात व्हायची हेही खरंच. एरव्हीच्या दिवसांत नेहमीची उत्साही मंडळी पहाटे आरतीचे अभंग म्हणायला सुरुवात करीत… मग हळूहळू गाव देवळात जमा होई.

सुमनला खूप वाटायचं… आपणही आपल्या हस्ते रखमाई-पांडुरंगाला छान दुधा-दह्याने न्हाऊ घालावं, नवे कपडे चढवावेत त्यांच्या अंगावर… प्रसाद तर भरपूर वाटावा सर्वांना. आणि तो दिवस दिवाळीचा असावा… म्हणजे आणखी छान होईल. पण सुमनच्या आईकडे तेवढे पैसे कधीच जमा व्हायचे नाहीत. आणि सामान्य घरांना दिवाळीच्या दिवसांत आरतीचा मान देणार तरी कोण?

सुमन मोठी झाली. वारक-याचं घर बघून तिचं लग्न लागलं आणि सुमन या नव्या गावात आली. याही गावात विठोबाचं देऊळ होतंच आणि इथंही काकडा होई. पण हे गाव तर सुमनच्या माहेरापेक्षाही मोठं आणि श्रीमंत होतं. इथंही देवाचा, पूजेचा थाट होताच. वार्षिक हरीनाम सप्ताहात शेकडो लोकांच्या पंगती उठत. सुमनचा नवरा गावच्या पुढा-याच्या गाडीवर ड्रायवर होता. कमाई जेमतेम. पण नशिबाने त्यालाही विठोबाचा नाद होता… घरी पंढरीची, आळंदीची-देहूची वारी होती.

सुमनच्या सासरच्या गावातली तिची ही पहिलीच काकड आरतीची वेळ. तिने नव-याला विचारलं की आपल्याला दिवाळीतला एखादा दिवस मिळेल का काकडा? अर्थातच गरीबांचा नंबर लागणं अवघड म्हणण्यापेक्षा अशक्य होतं. सुमननं मग सहज कालनिर्णय पाहिलं… यंदा एक भाकड दिवस होता दिवाळीच्या दरम्यान… भाकड दिवस म्हणजे ज्या दिवशी वसूबारस, धन त्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी किंवा भाऊबीज किंवा दिवाळी पाडवा असं काहीही नसतं!

सुमन नव-याला म्हणाली… शुक्रवारी तर भाकड दिवस आहे. गावातल्या लोकांना विचारून बघा की. त्यावर नवरा बरं म्हणाला. लक्ष्मीपूजनाच्या आधीचा दिवस भाकड होता! आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिच्या नवा-याच्या मालकाने काकड आरतीचा मान मिळवला होता!

इकडे सुमन तयारीला लागली. लक्ष्मीपूजनाच्या आधीच्या रात्री लाईटच्या माळा मालक लावून घेणारच होते, सुमनने नव-याला सांगून त्या एक दिवस आधीच लावल्या जातील अशी व्यवस्था करवून घेतली… कारण मालकाने ते काम ड्रायवर म्हणजे सुमनच्या नव-यालाच सांगितले होते.

एक दिवस आधीच सुमनने संपूर्ण देऊळ स्वच्छ करून घेतलं. शेजा-याच्या शेतातली झेंडूची फुलं मागून आणली आणि दोन सुंदर हार गुंफून ठेवले… एक रखुमाईसाठी एक लाडक्या विठूरायासाठी. दिवाळीसाठी घरी आणलेली साखर, खोबरं प्रसादासाठी वापरायचं ठरवलं आणि तशी तयारीही करून ठेवली. लग्नात आईने दिलेला शालू पेटीतून काढून ठेवला आणि नव-यालाही चांगला ड्रेस घाला अशी गळ घातली.

भाकड दिवसाच्या आधी झालेल्या काकड आरतीला सुमन जरा आधीच देवळात पोहोचली आणि काय काय लागेल उद्यासाठी याची मनातल्या मनात नोंद घेत राहिली. सुमनच्या मनात एकच ध्यास होता… भाकड दिवस असला म्हणून काय झालं… तोचि दिवाळी-दसरा अशी तिच्या मनाची गत झाली होती. सासूबाई लेकीकडे गेल्या होत्या, त्यांना बोलावून घेतलं. सासरे आजारी होते आणि अंथरुणावर होते. “मामंजी, तुम्हांला मी घेऊन जाईन देवळात! ” सुमनने त्यांना शब्द दिला तसा म्हाता-याचा चेहरा उजळून निघाला! त्यांनी उशीखाली हात घातला आणि शंभराची नोट सुमनच्या हातावर ठेवली… म्हणाले, ”असू दे! लागतील उद्याच्याला.. देवाला! ”

दिवस धांदलीत गेला. रात्रीचे अकरा वाजले तरी सुमनची तयारी काही पूर्ण होत नव्हती. तिने एका नव्या को-या कापडाचा काकडा तयार केला… रात्रभर तेलात भिजला म्हणजे सकाळी देवाला थंडीत छान ओवाळता येईल… ती विचार करत होती.

सुमन पहाटे चार वाजता उठली… सास-याला गरम पाण्याने आंघोळ घातली आधी… उटणे, तेल सर्वकाही साग्रसंगीत… सासूबाई बघतच राहिल्या. मामंजीना सायकलवर बसवून देवळात घेऊन या… असं नव-याला बजावलं. सुमनने भरभर सारं आवरलं आणि ती देवळाकडे पळाली. शेन रात्रीच भिजवून ठेवलं होतं… त्याचा छान सडा घातला देवळाच्या प्रांगणात… रांगोळी रेखली आणि शेजारी लिहिलं… माझ्या विठोबाचं कार्तिक स्नान! देवळाच्या ओवरीत ठिकठीकाणी पणत्या लावल्या… देवळाच्या खांबाना फुलांच्या माळा बांधल्या… देवासमोरच्या गरुडासाठी सुंदर हार होताच.

भजनकरी यायचे होते अजून. स्पीकर लावणा-या पोराला उठवून स्पीकर जोडून ठेवायला सांगितला. तिथून घरी आली. सासूबाईने पूजेचे ताट भरून तयार ठेवले होते. सुमनने काळजीपूर्वक शालू नेसला. कपाळी छान कुंकू रेखलं… आणि देवळाकडे निघाली. तिच्या हातातल्या तबकातल्या ज्योती पहाटेच्या गार वा-याच्या झुळूकांनी लवलवत होत्या आणि त्यांचा प्रकाश सुमनच्या चेह-यावर पडत होता!

देव अजून झोपेतच होते.. सुमनने काकडा पेटवून नव-याच्या हाती तिला, त्याच्या हाताला हात लावला आणि… काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया… चराचर मोहरले तुझी मूर्ती पहावया… या अभंगाच्या स्वरांत स्वर मिसळले… देव जागे झाले!

पुढील दोन तास देऊळ भक्तिरंगात न्हाऊन निघाले. त्या दिवशी टाळ-मृदुंग मोठ्या तालात घुमत राहिले. घरी झोपून राहिलेली माणसं तो आवाज ऐकून लगबगीने मंदिरात आली. गावात नव्याने सुना म्हणून आलेल्या काही पोरी सुमनकडे कौतुकाने पहात होत्या…! जुनी जाणती वारकरी मंडळी आज जास्त खुशीत दिसली… इतक्या प्रेमाने काकडा होताना ते पहिल्यांदा पहात असावेत. एका पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत तरुण मुलीचा तो भक्तीभाव त्यांना सुखावून जात होता. गावातल्या म्हाता-या बायाबापड्या सुमनचं कौतुक करीत होत्या… आपल्या पुढच्या पिढीत काकड्याची काळजी नव्हती राहिली त्यांना.

आजच्या भाकड दिवशी देवळाला लक्ष्मीपूजनाची झळाळी मिळाली होती… देवाची आरती करताना सुमन देवाच्याच डोळ्यांत पहात होती… आणि सुमनच्या डोळ्यांत रखुमाई अवतरली होती!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted