श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ एक यू-टर्न घ्यायलाच हवा… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

कागदाच्या लगद्याचा केलेला किल्ला हे जरा अवघड आणि वेळखाऊ प्रकरण आहे खरं.. पण किचकट गोष्टी करण्यातही एक झकास आनंद असतोच.. छोटा छोटा म्हणत म्हणत चार फूट बाय पाच फूट आकाराचा आणि जवळपास चार फूट उंचीचा किल्ला तयार झाला. एवढं अवाढव्य प्रकरण कागदाचं कसं होणार? अशी धाकधूक वाटत होती. पण जमलंय.. आपलीच हौस आणि तीही आपणच आपल्या मनानं भागवायची म्हटलं की मग काय विचारता.. केला किल्ला..!

खरं सांगू का, किल्ला परफेक्टच झाला पाहिजे असा जर आग्रह (दुराग्रह) आपल्या मनात ठाण मांडून बसला असेल तर मग आपण आपल्या मुलांसोबत, मित्रांसोबत स्वतः राबून, खपून किल्ला उभा करणं अशक्य आहे. आपण शिक्षणानं, व्यवसायानं कुणीही असू, प्रत्येक मराठी माणसात एक पस्तीस टक्क्यांचा आर्किटेक्ट आणि टाकाऊ पासून टिकाऊ काम करणारा एक क्रिएटिव्ह सिव्हिल इंजिनिअर चिरंजीव असतो, याचं कारण म्हणजे दिवाळीतला मातीचा किल्ला.. मराठी माणसाला कसा का असेना, पण किल्ला जमतोच. आता प्रतापगडाची प्रतिकृती, रायगडाची प्रतिकृती, सिंधुदुर्गाची प्रतिकृती आणि तीही अत्यंत अचूक, प्रमाणबद्ध साकारणं हे मुळीच सोपं नाही. एकेक महिना अभ्यास करून, नियोजन करून, आखणी करुन हे जुळवावं लागतं. पण हे कौशल्य आणि चिकाटी प्रत्येकात असेलच असं नाही. नसू देत. आनंद घ्यायला काय हरकत आहे?

आनंद महत्त्वाचा की परफेक्शन महत्त्वाचं, ह्याचा निर्णय ज्यानं त्यानं घ्यावा.. पण परफेक्शनची कुठलीही अपेक्षा न ठेवता, चार दिवस आपलं हक्काचं बालपण मनमुराद उपभोगायचं असेल ना, तर शर्टाच्या बाह्या मागं सारा आणि खुशाल मातीत हात घाला. जरा डोकं लावावं लागेल, पण त्यातही मजा आहे.

किल्ल्याच्या आजुबाजूचं जंगल कसं करायचं, वाटा कशा करायच्या, तळी कुठं करायची, विहिरी कुठं असाव्यात, किल्ल्याचे बुरुज कुठं करायचे, दरवाजे किती आणि कुठं करायचे, तटबंदी कशी कुठून करायची, चोरदरवाजा कुठं करायचा, जंगलातल्या गुहा कशा करायच्या, गडाच्या पायथ्याच्या वाड्या वस्त्या शेतं कशी करायची… एक ना दोन, कितीतरी गोष्टी असतात.. वर्षभर काही रोजचा सराव नसतो, त्यामुळं मामला जरा अवघड वाटतो. पण एकदा माणूस रमला की, मग गाडी एकदम सुसाट निघते. सुबकपणा किंवा अगदी सगळेच बारकावे साधता येणार नाहीत. त्यानं काय फरक पडतो?

आपल्या संस्कृतीमध्ये स्वतःमध्ये रमणं, स्वतःच्या आवडी निवडी छंद यांना पुरेसा वेळ देणं, त्यातून छान निर्भेळ आनंद मिळवणं, तो आनंद अगदी निरपेक्षपणे दुसऱ्यांना वाटणं या गोष्टींना फार महत्त्व दिलंय. कारण, त्यानं आपलं मानसिक भावनिक स्वास्थ्य उत्तम राहतं. आपल्या स्वतःसाठीच्या वेळेची गुणवत्ता सुधारते. आपला आपल्या मुलांशी छान संवाद होतो, त्यांच्यासोबत घालवलेला हा वेळ आपल्याला अत्यंत सुंदर आणि मौल्यवान आठवणी देतो. चिवडा, चकली, शंकरपाळे, करंज्या, लाडू, शेव, अनारसे हे पदार्थ आता पूर्वीसारखे फक्त दिवाळीतच होत नाहीत, वर्षभर मिळतात, हवे तितके आणि हवे तेव्हा तयार मिळतात. पण किल्ल्याचं तसं नाही. तो फक्त दिवाळीतच होतो. ह्यो मुद्दा ध्यानी धरा अन् मुलांच्या आयांनो, तुमीबी जरा किल्ला कराया हातभार लावा. सगळ्याच गोष्टी विकत आणून दिवाळी साजरी करायला गेलो तर कदाचित रितीप्रमाणं दिवाळी होईलही, पण त्यातून आपल्याला खरा मानसिक भावनिक आनंद कसा मिळेल?

आपली दिवाळी पूर्ण बदलूनच गेली आहे. ज्याच्या खिशात पैसा, त्याची रोजच दिवाळी. ‘राजाला दिवाळी माहितच नाही’ अशी एक जुनी म्हण आहे. आजकाल कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात सुद्धा वर्षभर कपडे खरेदी होते, नवनव्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात येत राहतात, सोन्या चांदीच्या गोष्टी भिशी लावून घेतल्या जातात. येताजाता तोंडात टाकण्यासाठी म्हणून दिवाळी फराळाचे पदार्थ वर्षभर मिळतात, ते घरी येतातच. दिवाळी बघून खरेदी होण्यापेक्षा शोरूम्स मधल्या ऑफर्स बघून खरेदी होते. व्यावहारिक दृष्ट्या त्यात गैर काय? काहीही नाही. पण मानसिक आनंदाचं अप्रूप आता फक्त पुस्तकांमधूनच वाचायला लागतंय की काय, अशी स्थिती आली आहे. येऊन जाऊन एक तेवढा मातीचा किल्लाच फक्त राहिला आहे. आजकाल तोही रेडीमेड मिळतो. चकचकीत फ्लॅट च्या बाल्कनीत किंवा दाराबाहेर कुठंतरी एका कोपऱ्यात अंग चोरुन बसलेला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा रेडिमेड किल्ला पाहिला की, आतून कुठलातरी टाका उसवल्यासारखं वाटतं. बाजारातून रेडिमेड किल्ला उचलून आणून बसवल्यानं मुलं त्यातून काय शिकत असतील? आमची वाढती क्रयशक्ती आमच्या मुलांची कौशल्यांची जडणघडण संपवत चालली आहे का? हा प्रश्न आजच स्वतःला विचारण्याची गरज आहे. नंतर कदाचित हा प्रश्न विचारण्याची सुद्धा वेळ निघून गेलेली असेल.

आपला रिमोट कंट्रोल आता बाजारपेठेच्या हातात गेला आहे, नव्हे, तो आपणच देऊन टाकला आहे. आमच्या घरी कोणती वस्तू कधी येणार, हे आम्ही ठरवत नाही, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ठरवतात. नवीन वाहन कधी घ्यायचं हे आम्ही ठरवत नाही, बँकांच्या कर्ज योजना ठरवतात. आमच्या घरी टीव्ही, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, मायक्रोवेव्ह, फ्रिज आणण्यासाठी आम्ही दिवाळीची वाट बघत बसत नाही, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या ऑफर्स वर आमची खरेदी ठरते. शून्य टक्के व्याजदराची गाजरं, इझी ईएमआय च्या गोड गोड गोळ्या, क्रेडिट कार्ड वापरण्याच्या ऑफर्स च्या भुली, ग्रेट इंडियन सेल, बोनान्झा ऑफर्स, मेगा ऑफर्स, बंपर ऑफर्स ऑफर ऑफ द डे, एव्हरीडे डिस्काऊंट हे सगळं आता तिन्ही त्रिकाळ सुरु असतंच. क्रयशक्तीचा हा वाढता वेग आपलं मानसिक स्वास्थ्य, समाधान, तृप्तता वेगानं पोखरत चालला आहे. धडाधड दणकून सतत खरेदी करत राहिलं की, आपण आनंदी असतो, हे बांडगूळ आपणच आपल्याला चिकटवून घेतलं आहे आणि तेच आता बेसुमार फोफावत चाललंय. आणि ह्याच कृत्रिम आनंदाच्या नादात आपण आपल्या दिवाळीलाही अडकवून टाकलंय.

वास्तविक पाहता, दिवाळी हा केवळ सण नाहीच. तो आपल्या मुलांसाठी एक फार सुंदर आणि प्रभावी हँड्स ऑन ट्रेनिंग प्रोग्रॅम आहे. आपण मनात आणलं तर, आपली मुलं या एका सणातून शेकडो गोष्टी आणि कौशल्यं आत्मसात करु शकतील. आठ दहा दिवस दिवाळीच्या निमित्तानं वेळ मिळाला तर अख्ख्या कुटुंबाचं स्वास्थ्य सुधारेल. पण तसं घडताना दिसत नाही. आमच्याच स्वास्थ्यासाठी आम्ही वेळ काढत नाही. अगदी धनत्रयोदशी पर्यंत शाळा सुरु असतात. शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा असतात. नोकरदारांना सुट्ट्या नाहीत. मग घरी आकाशदिवा करायला वेळ आणणार कुठून? पणत्या रंगवायला वेळ आणणार कुठून? आदल्या दिवसापर्यंत पार दमून गेल्यावर पहाटे चार वाजता उठून दारात रांगोळ्या काढत बसायला कुणाच्या अंगी त्राण उरणार? मग संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या नादात आम्ही हे सगळं विकतच आणणार. ज्याच्या खिशात भरपूर बजेट, त्याचा आकाशदिवा मोठा. ज्याचा खर्चाचा हात मोठा, त्याच्या घरची रोषणाई मोठी. हळूहळू “तुम्ही निवांत रहा, आम्ही तुमच्या फ्लॅटच्या दारी पहाटे रांगोळी काढून देऊ. वर्षभर उंबऱ्यावर रांगोळी काढून दिली जाईल. सणावारी रांगोळी काढून देण्याचे चार्जेस वेगळे असतील. पण किमान तीन दिवस आधी बुकिंग करावं लागेल. ” अशा सेवा सुरु झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. आऊटसोर्सिंग का जमाना कब आता है? जब हम को वेळ काढ के ये सब जमना लगभग बंद हो जाता है तब..

साधी गोष्ट आहे हो.. दिवाळी हा भारतीयांचा सगळ्यात मोठा सण असेल तर भारतीयांना तो सण आनंदानं साजरा करण्यासाठी मुबलक वेळ द्या ना. दिवाळीच्या आधी किमान पाच दिवस सुट्ट्या मिळाल्या तर आमची मुलं काहीतरी नवं शिकतील. कलेच्या सहवासात वेळ घालवतील. घरातले कुटुंबीय एकत्र येऊन वेळ घालवू शकतील, सणाची तयारी व्यवस्थित करू शकतील. घरची स्वच्छता, वाहनांची स्वच्छता, अडगळ काढून टाकणं, फुलांची तोरणं करणं, रोषणाई करणं, पणत्या रंगवणं, आकाशदिवा आणि किल्ला करणं, घरी फराळाचे जिन्नस तयार करणं, दिवाळी अंक वाचणं, घरोघरी फराळ नेऊन देणं, दिवाळीची शुभेच्छापत्रं लिहून पाठवणं या सगळ्यासाठी वेळ मिळणंच आवश्यक आहे. सण उत्तम साजरा कधी होईल? लोकांच्या हातात पुरेसा वेळ असेल तेव्हा. भारतीय संस्कृतीमधल्या सगळ्यात मोठ्या सणाला भारतीयांनाच सुट्ट्या नाहीत आणि ख्रिसमसला मात्र आठवडाभर सुट्ट्या? भारतीय संस्कृतीच्या जतन, संवर्धनाच्या विचारांचं सरकार गेली १४ वर्षं असूनही यात बदल झालेला नाही. आमच्या मुलांनी संस्कृती कशी जपावी, याचेसुद्धा क्लासेस, क्रॅश कोर्सेस आणि प्रॅक्टिकल, जर्नल्स करुन शिकणं समाजाला अपेक्षित आहे का?

जाऊ द्या की लोकांना आठ दिवस आधी त्यांच्या त्यांच्या गावी.. करु द्या की शाळकरी मुलांना आठ दिवस आधी आकाशदिवे आणि किल्ले.. शिकू द्या की मुलामुलींना त्यांच्या आजीच्या हाताखाली फराळाचे पदार्थ करायला.. एकवेळ बोनस कमी दिला तरी परवडेल, पण लोकांच्या हाती त्यांचा स्वतःचा हक्काचा मुबलक वेळ द्या. आपण आपल्या कुटुंबिय, नातेवाईक, मुलंबाळं, मित्र परिवार, निसर्ग, पर्यावरण यांच्या सहवासात अतिशय छान वेळ घालवणं हीच खरी गरज आहे, हे माणसांना पटू द्या. हाच ‘क्वालिटी टाईम’ आयुष्यात उपयोगी पडणार आहे, त्यातून मिळणारं स्वास्थ्य हेच आयुष्यभर संजीवनी म्हणून कामी येणार आहे, हे लोकांच्या आणि सरकारच्या लक्षात आणून द्यायला हवंय. वेळ या गोष्टीसारखी दुसरी दौलत नाही, याचीच जाणीव माणसाला करुन देणं आता सगळ्यात महत्वाचं ध्येय व्हायला हवं.

आपले पारंपरिक भारतीय सण कस्तुरीमृगाच्या पोटातल्या कस्तुरीसारखे आहेत. त्यांचा मूळ उद्देश नेमका काय आहे, हे सगळ्यांनीच नीट समजून घेणं नितांत आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं आपण सण उत्सव साजरे करायला लागलो की, ती कस्तुरी दरवळायला लागेल. घाई, गडबड, उरका उरकी, जीवाचा आटापिटा करुन वेळा मारुन नेणं, सण पार पडावा याचाही ताण घेणं हेच घरोघरी घडतंय. हे दुष्टचक्र वेळीच तोडायला हवं. आयुष्य आनंदानं आणि समाधानानं जगण्याचा खरा मार्ग आजही उपलब्ध आहे, तो मान्य करायला हवा. संस्कृती आणि परंपरांकडे डोळसपणे पहायला हवं. माणसांच्या स्वास्थ्यासाठीच सण उत्सव योजलेले आहेत, हे ठामपणे मांडायला हवं. आणि आपल्या कुटुंब व्यवस्थेच्या, कुटुंबातील व्यक्तींच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, सामाजिक स्वास्थ्यासाठीच संस्कृती आहे, हे ठणकावून सांगायला हवं. त्यासाठी आपली वार्षिक शैक्षणिक व्यवस्था, विविध क्षेत्रातील नोकऱ्यांची व्यवस्था, कॉर्पोरेट व्यवस्था अशा सगळ्यांचीच पुनर्रचना करायला हवी. या सगळ्यासाठी खूप वेळ लागेल, हे मान्य. पण या बदलाची फार फार गरज आहे, हे तरी प्रत्येकानं मान्य करायला हवं. मूलाधार आणि मूलतत्वाकडे खऱ्या अर्थानं पुन्हा परतण्याचा श्रीगणेशा करुया..!

|| लेखनसीमा || 

|| शुभ दीपावली ||

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक

संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted