सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ सुगीचा घयटा… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
दसर्याचं सोनं लुटून झाले की गावं, खेडोपाड्यात सुगीची हातघाई चालू होते. गावं शिवार माणसांनी गजबजून उठतो. सोन पिवळसर रंगात रानं बुडून जातात. भरात आलेल्या पिकाचा एक वेगळाच गंध
साऱ्या शिवाराला गंधाळून टाकतो. दाणा दाणा भरून परिपक्व झालेलं रान कापणीला येतं तेंव्हा शेतकरी राजाच्या समाधानाला सीमा उरत नाही. शेतातील भरगच्च पिकं बघून बळीराजाचं मन आनंदाने फुलून येते.
सुगी म्हटलं की, पूर्वीचे दिवस आठवतात. वावर भरून शिवारात पुठ्ठा (एकत्रीत जमावं)करून राबणारी माणसं आठवतात. एकमेकांच्या शेतात आळीपाळीनं राबणारी माणसं, शब्दाला जागणारी माणसं, कष्टकरी माणसं यांनी शिवार गजबजून उठायचे. गावात असा राबता असायचा की, कुणाचेही काम अडत नसे. लोक अडीअडचणीला एकमेकांच्या मदतीला धावून जात असत. सुगीची हातघाई चालू झाली की लोक कोंबड्याच्या पहिल्या आरोळीला उठून लगबगीनं उजडायला रानात पोहचत होते. शेतावर जाताना लोक जमावानं मिळून जात. शेतात पैऱ्यानी मिळून राबताना कामाचा कंटाळाच येत नव्हता. माणसं चालता बोलता हातघाईनं उभं पिकं आडवं पाडत असत. नंतर कापलेलं पिक खळ्यात भारं बांधून सांगड करून भारं नेताना तर खुपच मजा येत असे. सुगीच्या हातघाईत शिवार माणसानी फुलून दिसायचा. बघावं तिकडं माणसांची धावपळ सुरू असायची. रान बांधावर झाडाच्या सावलीत बसून माणसं अंगत पंगत करून जेवायला बसायचे. एकमेकांच्यातला एक एक घास चवीने खात होते. गप्पागोष्टी करत रानभोजन चवदार होत असे आणि रान मैफलीला आनंद समाधानाचा रंग येत असे.
पूर्वी माणसात माणुसकी होती. लोक इमानदारीने एकमेकांच्यात राबत होते. प्रत्येकाच्या दावणीला बैल जोडी उभी असे. तेवढाच माणसाचा पण जमाव होता. समदा बुडका (एक कूळ) मिळून माणसं जमावाने शेतात राबायचे. तांबट फुटल्या पासून ते दिवस डुबायला जाई पर्यंत लोक शेतात असत. सुगीच्या दिवसात सहसा लोक अंधार करूनच घरी यायचे. भात कापणीच्या वेळेस तर वावरात आणि खळ्यात दहा-बारा-पंधरा
बाईमाणूसाचा राबता चालत असे. भाताच्या काड्या घट्ट मूठीत आवळून सपासप भात बडवले जायचे. नंतर काड्या खळभर पसरून चार- सहा बैलांची सांगड करून त्यांच्या पायाखाली मळणी केली जायची. दिवसभर कापणी करून रात्री शरदाच्या टपोऱ्या चांदण्यात मळणी चालत असे. मळणी झाल्यावर पिंजार झाडून बाहेर सगळ्या माळभर पसरले जायचे. या पिंजऱाच्या वासानी सगळे शिवार दुरवर गंधाळून जायचे. भातकापणी बरोबर भुईमूग, सोयाबीन ही पिकं पण कापणी येत. खेड्यापाड्यातून सुगीचा नुसता घयटा उठत असे. सगळ्या शिवारात विलक्षण आनंद आणि उत्साह भरून यायचा. पुर्वी शेतात मिळून मिसळून कष्ट करताना कष्टाचा ताण येत नसे.
सुगी संपली की, डोंगर रानातून गवत कापणीला सुरुवात होत असे. बाया, गडी माणसं मिळून उभ्या डोंगराला गवत कापायचे. डोगराच्या उभ्या कड्यावर गवत कापताना बळीराजा च्या कष्टाची दादच घ्यायला हवी. खरोखर पेरणी पासून ते सुगी पर्यंत खेडी कष्टानी पिळून निघायची. सुगीच्या दिवसात होणाऱ्या धावपळीत पोटाला अन्नपण वेळेवर मिळत नसे.
काही वर्षांपूर्वी पूर्वी सुगीच्या दिवसात अतिउत्साही, कष्टाळू, परोपकारी, अशा ग्रामीणतेचे दर्शन घडून यायचे. तेव्हा माणसाकडे पैसा कमी होता पण माणुसकी होती. माणसा सोबत माणूस होता. आज पैसा आला आणि माणसानं माणूसकीला पूसून टाकले. पैसा आला की यंत्र यंत्रणा आली. आणि सुगीचे पूर्ण चित्र पालटले. आज माणूस साधे उचलू लागायला पण शंभर ची नोट घेत आहे. एकजूटीने मिळून एकमेकांच्यात राबायचे दिवस काळाच्या बंद दरवाज्यात नाहीसे झाले. शेताच्या बांधावर आणि खळ्याच्या कडेच्या खोपीत समुह भोजनाचा वेगळाच आनंद होता. कोणाचे दही, कोणाचा ठेचा, चटणी, भाकरी एकमेकांच्या मुखात जात असे. आणि जिभेवर आपुलकीचा गोडवा वाढत असे. मदती साठी उचलू लागायला एकमेकांना दिलेल्या आरोळीने सारं शिवार घुमून जायचं. माणसांची धांदल आणि रानपाखरांची किलबिल यानी शिवारं जणू बोलकं होत असे.
आज यंत्र यंत्रणा आली आणि सुगीचे दिवस, स्थिती, माणसं, बाया माणसानं गजबजलेलं शिवार हे सगळे काही बदललं. कापणी, मळणी यंत्र आले. शेतमजूराच्या हातचा रोजगार गेला. खळ्यावर बारा बलुतेदार यायचे थांबले. सुगीच्या दिवसांत रानातून बैलगाडीने गाडवाट मळली जायची. गाडवाट म्हणजे रानाची जीवन रेषाच समजा. आज हरवलेल्या बैलगाडी मुळे रानातून फिरणारी गाडंवाट पण हरवली. एकंदरीत बदललेल्या सुगीच्या दिवसां बरोबर ग्रामीण जीवनाचे स्वरूप सुध्दा बदलले.
आज माणसाप्रमाणेच निसर्ग सूध्दा बदलला आहे. निसर्गाचे बदललेले रूप, बदलेले पर्यावरण यामुळे आजकाल शेतीवर बराच विपरीत परिणाम झाला आहे. लहरी पाऊस कधी ओला कधी, कधी सुका दुष्काळ यात शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा देखिल सुगीवर विपरीत परिणाम होत आहे.
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक- 9327282419
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





