श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “रंग…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

ता ना पी हि नी पा जा सात रंगाची सुरुवातीची ओळख अशीच होती. रंगांना नांव आहेत. पण बोलण्यात त्याचा वापर वेगळा होतो. हा वापर रंग, रंगसंगती या बरोबरच वागण्याशी सुध्दा जोडलेला असतो.

रंग वापरणे.

रंग खेळणे.

रंग लावणे.

रंग उधळणे.

रंग भरणे.

रंग फासणे.

रंगाचा बेरंग करणे.

वागण्यात रंगीला असणे.

चेहर्‍यावरचा रंग उडणे.

रंग दाखवणे.

रंग बदलणे.

अशा अनेक प्रकारांनी रंग हा शब्द वापरतो.

रंग उधळणे, रंगीला असणे, चेहर्‍यावरचा रंग उडणे, रंग दाखवणे, रंग बदलणे याचा तर बर्‍याचदा प्रत्यक्ष रंगाशी काहीच संबंध नसतो. यात रंगाचा उल्लेख वागण्याशीच असतो. म्हणजे वागणंसुध्दा रंगाशी जोडल जात.

काही रंगांची आपली अशी खास ओळख आहे. अशी ओळख आणि रंगांचा वापर धर्माशीपण  निगडीत आहे, किंवा जोडला जातो. भगवा, केशरी, निळा, हिरवा, पीवळा असे काही रंग नकळत व सर्वदूर धर्म आणि जातीशी जोडले गेले आहेत. रंंगातही शुभ आणि अशुभ तसेच पवित्र असे प्रकार सांगितले जातात. निषेध करायचा तर काळा रंग. शांतता, आणि शरणांगती साठी पांढरा. या प्रकारे रंग हे प्रतिक म्हणूनसुध्दा वापरले जातात.

प्रत्येक देशाचा, संघटनेचा, संस्थेचा आपला एक ध्वज आहे. आणि याचा रंग, क्रम कसा असेल हे ठरलेल असत.

चित्र, चित्रपट, जगणं, वागणं यासोबत औद्योगिक क्षेत्रात सुध्दा रंगांच आपल एक स्थान आहे. हे रंग त्या वस्तूबद्दल ठराविक माहिती देतात. औद्योगिक भाषेत स्क्रॅप, रिजेक्शन, रिवर्क यासाठी ठराविक रंगच वापरले जातात. वाहतूक नियम, किंवा चिन्ह दाखवणारे फलक यासाठी ठराविक रंगांचाच वापर होतो. हल्लीतर हवामानाचे अंदाज सुध्दा यलो, रेड, ऑरेंज अशा रंगात सांगितले जातात.

रस्त्यावर असणारे मैलांचे दगड Milestones. यांनासुध्दा रंगाचा आधार आहे. पिवळा आणि पांढरा दगड म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, हिरवा आणि पांढरा राज्य महामार्ग, नारंगी आणि पांढरा ग्रामीण रस्ता, काळा, निळा, किंवा पांढरा शहरी किंवा जिल्हा रस्ते. यावरून या रस्त्यांची देखभाल कोणाची हे सुध्दा समजत.

म्हणजेच रंगाला स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे.

काहीजण परिस्थितीनुसार रंग बदलतात. पण नीसर्गाची परिस्थिती बदललेल्या रंगावरून लक्षात येते. निरभ्र आकाशाचा रंग वेगळा, तर पावसाळी वातावरणात ढगांचा रंग वेगळा. सुुर्योदयावेेळी रंग वेगळा, तर कातरवेळीही वेगळा. ठग आणि ढग यांचाही संबंध रंगाशी सांगता येईल.

निसर्ग रंगामुळे खुलतो, तर काही रंग अंगावर खुलतात. चेहर्‍यावर रंग चढला की कलाकारांच्या अंगात वेगळा जोश येतो. डोळ्यांच्या बदललेल्या रंगावरून तब्येेतीचा अंदाज येतो. पदार्थ तयार करतांनासुध्दा किती भाजावा, तळावा यासाठी रंगाचाच ऊल्लेख असतो.

खरच रंग या नावाप्रमाणेच रंगाचे अनेक रंग आहेत.

 

 ©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted