? जीवनरंग ❤️

☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – तीन ☆ श्री आनंदहरी ☆

कधीतरी एखादया ओलावल्या क्षणी धाकटी नणंद येऊन टपकायची. त्यांच्या डोळ्यांतील पाणी पाहून जवळ बसत आपला अवखळपणा, खट्याळपणा विसरून जवळ बसत, एखाद्या वडीलधाऱ्यासारखे विचारायची,    

” वहिनी, काय झालं गं ? माहेरची, मैत्रिणींची आठवण आली काय गं ?”

त्या खाली मान घालून हळूच डोळे टिपत मानेनेच नकार देत म्हणायच्या,

” इथं तुझ्यासारखी मैत्रीण भेटल्यावर तिकडच्या मैत्रिणींची आठवण कशाला येईल गं ? “

त्यांच्या या वाक्याने खुश होऊन त्यांच्याजवळ बसत लाडीकपणे नणंद म्हणायची,

” वहिनी, मला सांग ना, तुझ्या माहेरच्या गमती-जमती.. सांग ना गं..! “

मनातील कुपी बंद करत त्या म्हणायच्या,

” आत्ता नाही हं … पुन्हा कधीतरी सांगेन. आत्ता काम आहे गं मला . “

” काम-बीम काही नाही हं..आत्ताच सांग.. हवं तर  नंतर आपण दोघी मिळून करू सारी कामं.”

” आणि तुझा अभ्यास ? “

” तो मी करेन ना नंतर.. सांग ना गं ? असं काय करतेस ? “

नणंद रुसायची, फुरंगटून इवलंसं तोंड करून बसायची.. मग मात्र त्यांच्या मनातील कुपी आपोआप उघडायची अन् साऱ्या आठवणी मनभर पसरायच्या..प्राजक्ताची फुलांचा सडा अंगणभर पडावा, पसरावा तशा.

राधाबाई त्या आठवणींच्या फुलांतील एखादे फुल हळूच उचलायच्या आणि नणंदेसमोर ठेवायच्या.  फुलाच्या गंधाने त्या गंधभारीत व्हायच्याच पण नणंद तर त्या गंधाने अक्षरशः वेडी होत म्हणायची,

” कित्ती छान आहे ग वहिनी तुझं माहेर ! “

” प्रत्येकीचं माहेर असंच सुंदर असतं गं..  तुझं लग्न होऊन तू सासरी गेलीस की तुलाही तुझं हे माहेर खूपच छान आहे असंच वाटंल.. जाणवंल… प्रत्येक सासुरवाशिणी सारखं.”

” आमी नाय जा.. “

त्यांनी नणंदसमोर लग्नाचा विषय काढल्यामुळे ती लाजून घरात पळून गेली होती..

नणंद लग्न होऊन सासरी गेली आणि राधाबाईंना जास्तच एकटेपणा जाणवू लागला. त्या सासरी आल्यापासून तीन-चार वर्षात त्यांच्यात आणि नणंदेत चांगलेच मैत्रीचे नाते निर्माण झालेले होते.

राधाबाई आणि लेकीच्या विचारात, काळजीत, आठवणीत हरवून गेलेल्या सासूबाई, दिवसभर घरात दोघीच असायच्या. नणंदेच्या सासरी जाण्याने घरातील अवखळपणच, घरातील चैतन्यच हरवून गेले होते.

राधाबाईंच्या मनातील आठवणींच्या कुपीत नणंदेच्या खुपसाऱ्या आठवणी अलगद जाऊन बसलेल्या होत्या. दुपारची सारी कामे झाली की उन्हं चांगली कलती होईपर्यंत विसावाच असायचा. दुपारी सारे आवरून विसवताना मनातली एखादी आठवण कुपीतून सुळक्कन बाहेर यायची, मनात तरंगत रहायची.

एकदा काहीतरी आवराआवर करताना नणंदेच्या हाताला गजग्यांची टोपली लागली. तिला खूप आनंद झाला. ती पळतच राधाबाईंच्याजवळ आली. त्या भाजी निवडत होत्या.. पळत पळत नणंद आली ते पाहून त्यांना नेमकं काय झाले ते समजेना. त्यांनी भाजी बाजूला सारली अन् गडबडीत उभा राहत काळजीने विचारले,

” काय झालं गं ? “

” वहिनी, चल, गजग्यांनी खेळूया ? “

” काsय ? गजग्यांनी ? आणि आत्ता ? “

तिच्या हातात गजगे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचा उत्साह पाहून त्यांना सानंद आश्चर्य वाटले होते.

” खेळूया ना वहिनी.. कित्ती दिवसात खेळलेलेच नाही मी..  अगं खूप मज्जा येते .. एक्कय..दुक्कय.. तिक्कय खेळताना… चल ना गं. “

खरं तर राधाबाईंच्या मनात माहेरी असताना खेळलेला गजग्यांचा खेळ तरळून गेला. ऐनवेळी गजगे सापडले नाहीत तर बिट्ट्या आणि बिट्ट्या नसतील तर खडे..  दुपारच्या वेळी घराच्या सोप्यात किंवा अंगणात सावलीत जे मिळेल त्याने एक्कय.. दुक्कयचा खेळ रंगायचा. त्यांचे मन त्या आठवणीत रमून गेलं होते.

” खेळूया न वहिनी.. हवं तर फक्त दोनच डाव खेळूया… चल ना गं तिकडे ! “

नणंदेने त्यांचा हात धरून त्यांना परसातल्या आंब्याच्या झाडाकडे ओढतच म्हणले तशा त्या आठवणीतून बाहेर आल्या. त्यांच्या मनाला खेळायची ओढ लागलीच होती त्यात लाडक्या नणंदेचा आग्रह..  त्यांचे ‘ आत्ता नको गं, काम आहे ‘ असा नकार लटका पडला. त्या नणंदेसोबत परसातल्या आंब्याच्या झाडाच्या गार सावलीत गजग्यांचा खेळ मांडून बसल्या.

दोनच डाव खेळायचे असे ठरवून खेळायला बसल्यावर खेळ इतका रंगत गेला की किती डाव झाले आणि किती वेळ झाला याचं भान दोघींनाही उरलं नव्हतं .

क्रमशः….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments