सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ वास्तुशास्त्र… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
” हे घ्या आई तीन हजार , ठेवा तुमच्याकडे .”… नवीन सुनबाई ऑफिसला जाताजाता अगदी सहज
म्हणाली . आणि सासुबाईंचे डोळे भरून आले .
” मला कशाला ग एवढे लागतात ? “
” अहो , दिवस भर किती गोष्टींना पैसे लागतात बघतेय न मी एक महिन्यापासून . दारावर भाजी , फळवाले येतात . कधी कामवाली जास्तीचे पैसे मागते . शिवाय तुमची भिशी असते. राहू द्या तुमच्याजवळ .”
” अग , पेन्शन मिळते तुझ्या सासऱ्यांची .ते असतांना त्यांच्याकडे मागत असे , आता न मागता महिन्याच्या महिन्याला सरकार देते .” .. सासू हसून म्हणाली .
” तुम्ही भिशीच्या ग्रुपबरोबर सिनेमा , भेळ पार्टी , एखादं नाटक, असे कार्यक्रम ठरवत जा . जरा मोकळं व्हा आई . ह्यांनी सांगितलंय मला तुम्ही किती त्रासातून कुटुंब वर आणलंय ते . मोठे दादा तर वेगळे
झालेत , ताई सासरी खूष आहेत . मग तुम्ही पण आता आपलं जग निर्माण करा .मला माहितेय तुम्ही तुमच्या अनेक इच्छा दाबून टाकल्यात … आता जगा स्वतःसाठी . “
” इतक्या लहान वयात हे शहाणपण कुठून आलं ग तुझ्यात ?”
” मी दहा बारा वर्षांची असेन. आजी आत्याकडे निघाली होती. आईने पटकन सहाशे रुपये काढून
हातावर ठेवले . म्हणाली , ‘ तिथे नातवंडांना बाहेर घेऊन जा , ‘आजी कडून’ म्हणून काही खाऊ पिऊ घाला , खेळणी घेऊन द्या ….’ आजी आईच्या गळ्यात पडून गदगदून रडली होती . ‘ एवढे पैसे कधी
मोकळेपणाने खर्चच केले नाहीत ग ‘ असे म्हणाली होती … तेव्हापासून आजी आणि आई जश्या जिवलग मैत्रिणीच झाल्या . ……आई , मला माहितेय , घरचे खटले सांभाळायला तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागली न ? किती वाईट वाटलं असेल . किती मन मारावं लागलं असेल ….शिवाय प्रत्येक लहान मोठ्या घरच्याच खर्चासाठी नवऱ्यापुढे हात पसरावे लागले असतील … तेव्हा नवरे देखील उपकार केल्यासारखे बायकोच्या हातात पैसे ठेवत ……….तुमची पेन्शन राहू द्या आई .मला कधी कमी पडले तर मी तुमच्याचजवळ मागेन . ”
” अग , सगळं आजच बोलणार आहेस का ? जा आता तुला उशीर होईल. “
“मला बोलू द्या आई .हे मी माझ्या समाधानासाठी करतेय . आई म्हणते , की अठरा तास घरात राबणारी बाई कुणाला कधी समजतच नाही. तू मात्र तुझ्या सासूच्या कष्टाची कायम जाणीव ठेव . प्रेम पेर , प्रेमच उगवेल . “
…. सासूने भरल्या मनाने सुनेच्या गालावर थोपटले . ती दिसेनाशी होईपर्यंत दारात उभी असतांना
तिच्या मनात आले …
‘ सून आल्यावर मी आणखीनच घरात अडकेल असे वाटले होते. तू उलट कवाडं उघडून मला बाहेरचे मोकळे आकाश दाखवलेस ….. ‘
…… ज्या घरात लेकी सुना सासूचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरात वास्तुदोष नसतोच मुळी.
जेथे असेल आपुलकी .. प्रेम .. जिव्हाळ्याचे अस्र …
….. तेथे फिके पडते वास्तुशास्त्र.
खरंच ,,,,,,, सासू अन सुनेमधे असा बदल झाला तर ….
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈