प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.)  – इथून पुढे —- 

आडबाजूला भिंतीला टेकून बाळूभाई च्या दारात आम्ही दोघे उभे राहिलो. बाळूभाईंच्या घरातून येणाऱ्या जाणाऱ्याला निरखून पाहू लागलो.पण आमच्याकडे कुणी पाहत नव्हते. तर कुणी पाहूनही न पाहिल्यासारखे करत होते.

पाच मिनिटे आमचा हा असा कार्यक्रम चालू होता. एका क्षणी अचानक तीन-चार लोक बाळू भाईंच्यासोबत घरातून शीरखुर्मा पिऊन बाहेर पडले. त्यांना पाहून आम्ही आमची तोंडे बाजूला केली. ते लोक बाहेर जाताच आम्ही पटकन उडी मारून दरवाजात गेलो.  बाळू भाईंची  एक पोरगी चांद समोरच होती. ती आम्हाला, ” या ” म्हणाली त्यात्याबरोबर आम्ही समोर बसायला टाकलेल्या पोत्यावर दोघे अगदी ऐटीत जाऊन बसलो…!  योगायोगाने त्यावेळी आमच्या दोघांच्या अंगावर नवे नसले तरी थोडेफार बरे कपडे होते.

घरातून चांदची आई म्हणजेच भाभी बाहेर आल्या. आम्हाला पाहून त्यांनी विचारले, ” कुणाचे रे तुम्ही?”

बिचकत मी म्हटले, ” जानरावदादाचा. “

मी घाई घाईत आडनाव न सांगता फक्त माझ्या वडिलांचेच नाव सांगितले. ते एकूण भाभी म्हणाल्या बापूंचे व्हयं! बसा, बसा. मी आलेच शीरखुर्मा घेऊन… आणि मग काय वातावरण एकदमच बदललं…आम्ही जाम खुश झालो. थोड्याचवेळात भाभी पटकन दोन वाट्या शीरखुर्मा आणि बशीत पाच सहा चोंगे घेऊन बाहेर आल्या. आमच्या पुढे ते ठेवत म्हणाल्या, ” खावा.” आम्ही चमच्याने शिरखुर्मा खाऊ लागलो. हा हा हा… काय काय तो गोडवा! अगदी अमृतासमान होतं ते पक्वान आमच्यासाठी. भजासारखे गोल गोल दिसणारे ते चोंगे तर फारच गुलगुलीत होते. आम्ही एका वेळी ते दोन-दोन चोंगे  आमच्या दोन्ही गालातून कोंबत होतो. शीरखुर्मा तर तोंडाला वाटी लावूनच पीत होतो.

” थांबा दमानं प्या, अजून थोडं आणते मी, ” भाभी म्हणाल्या आणि चक्क त्यांनी लगेचच आम्हाला अजून एकेक चमचा शिरखुर्मा वाढला, प्रत्येकी दोन सोंग सुद्धा वाढले.

हासगळा चमत्कार कसा काय होत होता…! मलातर काहीच कळेत नव्हतं….  खरं सांगायचं तर तेवढा विचार करण्याचं ते माझं वय सुद्धा नव्हतं आणि ती वेळ सुद्धा नव्हती…

तेवढ्यात ”  बापू कसे आहेत? ” भाभींनी मला विचारले. तसे मी मानेनेच हो म्हटले. पण खरे तर त्यांचा प्रश्न ऐकून मला गांगरल्यासारखे झाले होते. कारण  बापू म्हणजे  ‘जानराव बापू’ ते गावातले सवर्ण जातीतले एक प्रतिष्ठित गृहस्थ होते ते गावचे माजी सरपंच होते.त्या उलट आमचे वडील म्हणजे नावाचेच जानराव,अत्यंत गरीब शेतमजूर. त्यांना सगळे नावानेच हाक मारायचे. केवळ आम्ही घरातलेच त्यांना आवडीने दादा म्हणायचो इतकेच. 

आपल्याला समजून घेण्यात  भाभींची काहीतरी गफलत झाली आहे ते माझ्या लगेच लक्षात आले होते. पण चला वडिलांच्या नावाचा आपल्याला काहीना काहीतरी फायदा होतोय ते माझ्या लक्षात येत होते. भाभी आणखी काही बोलणार आणि आपला पचका होणार त्यामुळे आम्ही चड्डीला हात पुसून घरातून तात्काळ पळ काढला…! आणि सरळ मशिदीच्या मागून चौकात आलो तिथे अजय आणि दादण्या भेटले. अजयने आम्हाला विचारले ” मिळाला का रे शीरखुर्मा तुमाला ?” 

” आरं, लई पोटभर खाल्ला “,मी म्हटले.

” आयला आम्हाला काहीच न्हाय मिळालं…! “,तो केविलवाणी तोंड करून म्हणाला. त्या दोघांच्याकडे पाहून मला खूपच वाईट वाटलं थोडा विचार करून मी म्हटलं,” चला माझ्याबरोबर. ” 

“कुठं” 

“बाळूभाईच्या घरी,शीरखुर्मा खायला.”

मग काय ते हरखलेच की!

मी पुढं आणि माझ्यामागे ते दोघं आणि त्यांच्या मागे भूषण येऊ लागला.

मी बाळू भाईंच्या घरात हळूच डोकवलं. त्यांच्या दुसऱ्या पोरीनं भाभींना  खुणावले, “मगाशी आये हुये वो लडकी पुनिंदा आये है.” 

” या….या आत या “,  भाभींनी मला पाहताच आत बोलावलं. 

” आमचे दोस्त हाईत त्यांना बी खायचंय हे… ” मी सांगितलं.

” बसा, बसा मी शीरखुर्मा आणते… ” असं म्हणून भाभी आत गेल्या. 

आम्ही चौघे एका ओळीत बसलो मी सगळ्यांना नीट बसवण्याचं काम करत होतो.

भाभींनी शीरखुर्मा देताच अजय व दादण्या हे दोघे शीरखुर्मा पिऊ लागले. “कुणाबरोबर आला वस्तीवरून?” भाभींनी मला प्रश्न केला. 

” आम्ही दोघे चालत आलो. ” भूषणकडे बोट दाखवत  मी म्हणालो.

“बापू आल्यात का?” 

” व्हयं आल्यात तिकडं गावात “, मी भाभींच्या प्रश्नाला कशीबशी वाकडीतिकडी उत्तरं देत होतो.

खरे तर मी या दोघांच्या वाट्या लवकर संपण्याची वाट बघत होतो.परंतू शीरखुर्मा गरम असल्यामुळे त्यांनाही तो भरभर पिता येत नव्हता. मी भूषणला इशारा केला. आम्ही दोघांनी बशीतला एकेक चोंगा घेत बशी मोकळी केली.तसा  ” ये माझं भाजं दे…! ” दादण्या जोरात ओरडला. 

” ये गप उठ, बास झालं… ” मी म्हणालो. 

तेवढ्यात भाभी म्हणाल्या, ” थांबा,थांबा अजून देते चोंगे पण भांडू नका.”

त्या बशी घेऊन चोंगे आणायला गेल्या तोपर्यंत आम्ही सगळे त्यांच्या घरातून फरार झालो.

आम्ही चौघे खुशीत पिपरणीच्या झाडाखाली आलो तिथे खेळू लागलो. तेवढ्यात तिकडून विकास आला.

” काय रे,  खाल्लास का शीरखुर्मा? ” दादण्यानं त्याला विचारलं. 

” न्हाय रं… मला कुणीच नेलं न्हाय शीरखुर्मा खायला. ” विकास नाराजीनं म्हणाला.

” आरं मग जा की ह्यांच्याबरोबर बाळूभाईच्या घरी.आरं लय मज्जा हाय नुसती. “दादण्या पुढे म्हणाला.

“काय लेका मला काहीच मिळालं नाही ,  मला घेऊन चला की तिकडं,”  विकास विनंती करू लागला.

थोडा विचार करून मी म्हटलं, ” चला ” मग सगळेच बाळूभाईच्या घराकडे निघालो. तशी ती दोघं मागे सरकली.

विकासला घेऊन मी बाळूभाईच्या घरी गेलो. तिथे पुन्हा तेच आम्हाला पाहताच बाळूभाईच्या दुसऱ्या मुलीने आपल्या आईला खूणवलं. आता मी थेट घरात शिरलो आणि विकास कडं बोट करून म्हणालो, ” ह्यो एकटाच राहिलाय त्याला लय भूक लागलीय.”

” बरं, बरं असुद्या या…या… बसा म्हणत बाबींनी तिसऱ्यांदा माझं स्वागत केलं.

आम्ही दोघे ऐटीत बसलो. भाभी शिरखुर्माची एक वाटी आणि चोंग्याची बशी घेऊन आल्या. वाटी खाली ठेवताच विकास ने एक भुरखा मारला. अन तेवढ्यात बाळूभाई घाईघाने घरात आले.आल्याबरोबर त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघे टरकलोच…! आम्ही दोघे पळण्याची गडबड करू लागलो. मी बशीतले दोन चोंगे हातात घेतले.

“अहो,जानराव बापूंची मुले आहेत “, भाभी म्हणाल्या.

” कोण? ही? ” भाई आमच्याकडे पाहून उत्तरले.

ते ऐकून मी तर गारठलोच…! आता आपली काही धडगत नाही. मी विकासला खूणवलं, उठण्याविषयी मी त्याला डिवचू लागलो पण तो काही केल्या वाटी सोडेना.

त्याचवेळी बाळूभाई भाभींच्या कानाला कान लावून माझी खरी ओळख सांगून लागले. माझ्या ते लक्षात आल्यावर मी उठून सरळ बाहेर पळू लागलो. माझ्यामागे चड्डी धरून विकासही बाहेर पडला….घारघाईत बाहेर पडताना अर्धी वाटी शिरखुर्मा त्याच्या अंगावर सांडला होता. त्याचे ओघळ त्याच्या गोलाकार ढेरीवरून सरळ खाली ओघाळत होते…

एका दमात पळत आम्ही वाड्यात येऊन चावडीत धापा टाकत दाखल झालो. माझ्या हातातल्या दोन चोंग्याचा  त्यावेळी पार भुगा झाला होता…. 

– समाप्त –

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments