सुश्री वर्षा बालगोपाल
जीवनरंग
☆ दोन बोधकथा – प्रयत्नांती परमेश्वर… / करावे तसे भरावे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(१) प्रयत्नांती परमेश्वर…
अजय विजय दोघे मित्र. अभ्यासात खेळात अतिशय हुशार. दोघे मोठे झाल्यावर चांगले नाव कमावतील अशी सगळ्यांना खात्री. दहावी 90 टक्केपेक्षा जास्त मार्कांनी उत्तीर्ण झाले. दोघांनीही सायन्स निवडले.
परंतु 10 वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेल्या दोघांनाही ते अवघड वाटू लागले. अजय प्रयत्नवादी असल्याने आजपर्यंतची घोकंपट्टी करून अभ्यास करायची पद्धत त्याने सोडून समजून घेऊन मग स्व अध्यनाची सवय लावून जिद्दीने आपल्या शिक्षण पूर्तीकडे पावले टाकू लागला.
विजय मात्र अवघड आहे… कसे जमणार… समजत नाहीये… अशी कारणे सांगून पहिल्या काही महिन्यातच त्याने शाखाच बदलून कॉमर्स निवडले आणि पुढील शिक्षण सुरु केले.तेथेही अकाउंट्स अवघड वाटल्याने क्लासला जाऊन तो बीकॉम झाला.
अजयही बी एस सी झाला. आवडू लागल्याने पुढे इंजिनिअर झाला. Ms करण्यासाठी परदेशात गेला.नोकरी करत शिक्षण करत Ms पण पूर्ण केले आणि गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी पण लागली.
विजय मात्र बीकॉम नंतर ca करावे म्हणून त्यासाठी प्रयत्न करू लागला. पण अवघड… जमेना… दिले सोडून. Mba साठी ऍडमिशन घेतली पण तेही जमेना… लॉ करावे वाटून तेही प्रयत्न केले पण ते सुद्धा जमले नाही.
शेवट खूप खटाटोप करून कोणाच्या तरी वशिल्याने एका खाजगी कंपनीत चिकटला एकदाचा. पण पगार कमी म्हणून जेमतेम महिनाखर्च भागवून जीवन जगू लागला.
गावातले सगळे आश्चर्य चकितच झाले. असे कसे झाले? का झाले? दोघेही बुद्धिमान समजत असताना एकावर अशी परिस्थिती का आली?
गावातली एक आजी म्हणाली पडलो झडलो तरी चालेल पण प्रयत्न कधीच सोडले नाही पाहिजेत. ओल्या झाडावर चढू पहाणारे माकड चार फूट वर गेले तर तीन फूट खाली येते. परत प्रयत्न केला तर तसाच अनुभव येऊनही ते दोन फूट वर पोहोचलेले असते. असेच प्रयत्न चालू ठेवले तरच ते शेंड्यावर पोहोचू शकते.
किंवा दह्यात पडलेल्या बेडका प्रमाणे जो प्रयत्न सोडतो तो दह्यात बुडून मरतो पण जो प्रयत्न करत रहातो तो दह्याचे ताक करून त्यावर निर्माण झालेल्या लोण्यावर उभे राहून उडी मारून बाहेर पडून स्वतःची सुटका करू शकतो.
येथे अजयने प्रयत्न सोडले नाहीत. अपार कष्ट घेतले त्याचे फळ म्हणून त्याचे चांगले झाले. तर विजयने प्रयत्नच सोडले दुसरा मार्ग निवडला त्या मार्गावर पण अडचणी येताच जाऊदे म्हणून सोडून देत गेला परिणामी तो त्याच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला. त्याचे वाईट काही झाले नाही असे म्हटले तरी फार प्रगती झाली नाही ध्येयापासून भरकटला हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही.
म्हणूनच कोणी कधीच प्रयत्न करणे सोडू नये. त्यामुळे नकळत का होईना थोडी थोडी प्रगती होत असते हे निश्चित. मग ध्येय साध्य होणारच. कितीही झाले तरी प्रयत्नांती परमेश्वर हे खरेच.
(२) करावे तसे भरावे…
राहुल आणि सचिन दोघे जिवलग मित्र. दोघांनाही एक एकच मुलगा. सारख्याच वयाचे. राहुल आणि त्याची बायको रागिणी दोघेही चांगल्या कंपनीत नोकरीला. त्यामुळे त्यांचा मुलगा रोहन लहानपनापासून पाळणाघरात राहिला. अगदी पहिली पासूनच त्याला बोर्डिंग स्कुलमध्ये घातले. अगदी अद्ययावत सुविधा त्याच्यासाठी नेहमीच उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे खूप चांगले शिक्षण त्याने घेतले पण पुढील शिक्षणासाठी परदेशात गेला आणि आपल्या आवडीच्या मुलीशी विवाह करून तेथेच स्थायिक झाला.
सचिन पण चांगल्या हुद्द्यावर चांगल्या कंपनीत कामाला. त्याची बायको सुप्रिया पण सुशिक्षित चांगल्या नोकरीत होती. पण मुलगा सर्वेशच्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली. काही दिवस ती घरीच होती. मग सर्वेश शाळेत जाऊ लागला आणि तिने ट्युशन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती घर तर सांभाळू शकत होतीच पण सर्वेशकडे लक्ष देतादेता आता अर्थार्जनही करू शकत होती.
सर्वेशही इंजिनियर होऊन अनेक छोटे मोठे कोर्सेस करून त्याने आधी काही वर्ष नोकरी करून स्वतःची इंडस्ट्री उभी केली. आई वडिलांच्या पसंतीच्या मुलीशी विवाह केला. ती पण त्याला व्यवसायात मदत करत होती.
अगदी दोन्ही मित्रांचे सगळेच उत्तम चालले होते.राहुल सचिन दोघेही रिटायर्ड झाले होते. राहुल रागिणीला मुलाबद्दल खूप अभिमान होता. पण रिटायर्ड झाल्यानंतर काही दिवस ते परदेशात जाऊन राहूनही आले पण परत आल्यावर त्यांना एकटेपण जाणवू लागले. मुलगा आपल्यापाशी नाही ही खंत सतावू लागली. रोहनला त्यांनी भारतात परत ये म्हणून सांगितले पण त्याने नकार दिला.
परंतु सचिन सुप्रिया अगदी समाधानाचे आनंदाचे जीवन जगत होते. नातवंडा बरोबर रमत होते. सर्वेश आई बाबांकडे विशेष लक्ष देत होता काळजी घेत होता.
राहुलला सचिनचा हेवा वाटू लागला. उगीचच मनात तणाव वाढून मैत्रीत अंतर पडू लागले.
काही दिवसात रागिणी देवाघरी गेली आणि राहुल याहूनच एकटा पडला. एकाकीपण खायला उठले तेव्हा रोहन काही दिवसांसाठी आला. त्याने राहुलला परदेशात या म्हटले पण राहुल तयार नसल्याने त्याने निर्विकारपने राहुलची व्यवस्था वृद्धाश्रमात केली आणि तो परदेशात जायला निघाला तेव्हा राहुल म्हटला नको रे रोहन मला असे येथे सोडून जाऊ. रोहन लगेच म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या सोयीसाठी मला पाळणाघरात ठेवले होतेच की. नंतरही तुमच्या पार्ट्या, नोकऱ्या याच्या आड मी येऊ नये म्हणून मला बोर्डिंगमध्ये ठेवलेच होते की. मग मी माझ्या सोयीसाठी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं तर कुठं बिघडलं?
नाईलाजाने राहुल वृद्धाश्रमात राहू लागला.
सचिन पण वयानुसार अशक्त झाला होता. पडल्याचे निमित्त होऊन त्याचे दोन्ही पाय अधू झाले होते. पण सर्वेश रोज रात्री सचिनची सेवा करायचा सुट्टीच्या दिवशी महिन्यातून दोनदा तरी पाटकुली घेऊन बाहेर नेऊन आणत होता.एकदा राहुलला भेटायला सुद्धा घेऊन गेला . सर्वेश सगळे आनंदाने करत असल्याचे पाहून राहुलने विचारले तू कसे हे करतोस? तेव्हा सर्वेश म्हणाला मी लहान असताना बाबांनी नाही का मला शी शू साठी नेले? साफही केले? मला पाठकुली घेऊन इकडे तिकडे फिरवले? अगदी माझ्या मुलासाठी पण केले. मग आता मी तेच त्यांच्यासाठी केले तर कुठे बिघडलं?
सचिन राहुलला भेटून गेला आणि मग त्याला त्याच्या आयुष्यातली मोठी चूक समजली. न कळतं तो बोलून गेला करावं तसं भरावं हेच खरं…
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈