प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ ढवरा… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे 

(आमंत्रित, निमंत्रित पाहुणेमंडळी यांनी जेवण करण्यास बसून घेण्याची कृपा करावी. अशी मालकाची आग्रहाची नम्र विनंती आहे.” ते ऐकून आमचा चालण्याचा वेग अधिकच वाढू लागला. “ – इथून पुढे) 

आम्ही कार्यक्रम स्थळी पोहोचेपर्यंत सुज्याच्या दारात जेवणाची पहिली पंगत बसली होती. सुजाच्या घरासमोर आणखी शे -दीडशे माणसं जेवणाच्या प्रतीक्षेत उभी होती. घराच्या उजव्या बाजूला चुलवानावर एक मोठं तपेलं ठेवलं होतं. त्यात बहुतेक मटण शिजवलं असावंकारण दोन माणसं त्याला भकाभका जाळ घालत होती.तर एकजण मोठ्या पळ्याने मटण बाजूच्या मोठया परातीत काढत होता. दोन जाणती माणसं मटणाच्या खड्याचे द्रोण अंदाजाने भरून देत होती.सुजाच्या घरासमोर 200 वॉटचा मोठा बल्ब लावला होता. त्याच्या उजेडात पंगत बसली होती. आम्ही पुढे जाताच आमच्या तोंडावर उजेड पडला ते पाहून मोठ्या मुलांनी, ” हितं नग, आपुन तिकडं चला, आडबाजूला,” असा इशारा केला. कारण उजेड सोडून थोडा अंधारात उभे राहणं त्यांनी पसंत केलं. त्यांनी तसं का केलं ते मला काही समजत नव्हतं त्यामुळे मी मात्र उजेडात उभा राहून माझा वर्गमित्र असलेल्या सुज्याला शोधत होतो…

 तेवढ्यात कुठून कसं काय माहित सुज्याने मला पाहिलं आणि धावत माझ्याकडं आला. “आयला इज्या (लहानपणी मला कोणी ‘ विजय ‘म्हणत नव्हते इज्या प्रेमाने माझ्या नावाचा केलेला  अपभ्रंशच प्रचलित होता)आलाच व्हयं?लय भारी वाटलं…!” मी म्हटलं, “व्हयं आम्ही समधी आलोय. कुठं हाईत बाकीची?”

 “ती काय तिकडं अंधारात उभी राहिल्यात समदी. त्यांनला लाज वाटतीय उजेडात उभं राह्यची.”

“बरं, बरं असूदे, चल, तुला आमची शेरडं दाखवतो.” असं म्हणत सुजाने माझ्या सदऱ्याला धरून मला ओढतच त्याच्या शेळयांच्या गोठ्याकडे नेलं. तिथं मला त्याने त्यांच्या आठ ते दहा शेळ्या आणि दोन-चार करडं दाखवली. त्याच्याकडं इतक्या शेळ्या अन त्याचं पत्र्याचं मोठं घर बघून तो खूप श्रीमंत असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे  मित्र म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटत होता…!

“सुजा, आयला लईच भारी वाटतंय इथं येऊन,”मी सुजाचा हात धरून म्हटलं.

तोपर्यंत इकडं पहिली पंगत जेवण करून उठली होती आणि दुसरी पंगत बसत होती. तेवढ्यात मला आमच्यातल्याच कुणीतरी हाताला धरून ओढत नेलं,”चल, जेवायला उशीर व्हाईल अंधार पडलाय रात व्हईल आपल्याला घरी जायला,” मोठा भाऊ मला म्हटला.

मी म्हटलं ” सुज्या, चल की आपण दोघं शेजारी बसून जेऊ. ” 

” व्हयं गड्या, मलाबी लय भूक लागलीया,”सुज्या उत्तरला.

पंगतीच्या शेवटच्या टोकाला सुज्या मग मी आणि मग एकेक करून आम्ही सगळे पंगतीत बसलो होतो. मोठी पोरं मला काहीतरी इशारा करत होती,” सुज्याला  नगं हित आपल्या शेजारी जेवायला बसवू. ” असं काहीतरी म्हणत होती पण मी म्हटलं, “मी सुज्या बरोबरच जेवणार…!  शाळेतबी आम्ही दोघं संगच जेवतो.”

माझ्या या हट्टा पायी पुढे काय घडणार याची मोठ्या मुलांना चाहूल लागत होती. आणि झालेही तसेच. कोणीतरी सुज्याच्या अन माझ्या तोंडावर अचानक बॅटरीचा उजेड मारला…!  मग बाकीच्यांच्या तोंडावर सुद्धा मारला. मोठ्या पोरांनी तेव्हा माना खाली घालून आपली तोंडे लपवली…

पत्रावळेवाला आम्हाला पत्रावळ्या वाढणार तेवढ्यात सुजाला त्या बॅटरीवाल्या इसमाने त्याच्या बखोटीला धरून फराफरा ओढत त्याच्या घराकडे नेलं….

त्यानंतर तावातवाने एक जण ओरडला, ” ये उठा, उठा, च्याआयला  पाहुण्यावाणी ऐटीत जेवायला बसलाय की सगळी? उठा बघू? व्हा  तिकडं?सगळे पाहुणे जेवून झाल्यावर तुम्हाला बोलावतो, “असे म्हणून त्या गृहस्थाने आम्हाला भर पंगतीतून उठवले….!  

तिथे एकच गोंधळ उडाला…! आरडाओरड, शिवीगाळ ऐकू येऊ लागली. 

हा काय प्रकार आहे? ते मला काही समजत नव्हतं आणि ते समजण्याचं माझं वय सुद्धा नव्हतं…!

सगळ्यांची जेवणं झाल्यावर शेवटच्या पंगतीला आपल्याला जेवायला मिळणार इतकंच काय ते मला मोठ्यांनी समाजावून दिलं.

पण आत्ता पंगतीतून उठवून आपल्याला शिव्या का घालतायेत  तेच मला कळत नव्हतं…! 

मोठी पोरं पण काहीच बोलत नव्हती कारण त्यांना या गोष्टींची  अगोदर पासूनच सवय होती.त्यांनी फारसं मनाला लावून घेतलं नव्हतं. कधी का असेना शेवटी जेवायला मिळण्याशी त्यांचा मतलब होता.

त्या वस्तीवर तिथे वडाची तीन मोठाली झाडे होती. तिथल्या एका मोठ्या वृक्षाच्या बुडक्यात आम्ही सगळे गोळा होऊन बसलो होतो. तीन वडांच्या झाडाचा तो सुंदर गुच्छा होता. कदाचित त्यामुळेच तर त्या वस्तीला  ‘वडाचामळा’ असे नाव पडले होते.

पुरुषांच्या दोन-तीन मोठ्या पंगती झाल्यावर मग महिलांच्याही दोन पंगती बसल्या होत्या. आमच्या पोटात तर कावळे ओरडत होते त्याही पेक्षा काळाकुट्ट अंधार पडल्याने आपण घरी कसे जाणार याची मला भीती वाटत होती. जेवायला आपला कधी नंबर येणार ते काहीच समजत नव्हतं…

अखेर सगळे जेवून झाल्यावर एका भल्या माणसाने आम्हाला आवाज दिला, ” ये पोरांनो? या जेवायला… ”  त्याच्या त्या हाकेने त्याही परिस्थितीत आम्हाला इतका आनंद झाला होता की काही विचारू नका…! 

आम्ही सगळे अक्षरशः धावत जाऊन एका ओळीत जेवायला बसलो. मग पत्रावळी आल्या,द्रोण आले…

पत्रावळ्यावर ज्वारीची भाकरीवाढली गेली. भाकरी कसली?सगळ्यात शेवटी आता फक्त भाकरीचे  तुकडेच उरले होते…! तेच वाढले होते.

मटणाचा रस्सा द्रोणात वाढला तो सुद्धा अगदी ढवळून निघालेला होता. कोणाच्यातरी द्रोणात शेळीच्या लेंढी एवढा मटणाचा खडा पडत होता. मग तो शेजारच्यांना खिजवायचा… पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. त्यांनी जे पानात वाढलं होतं तेच आम्हाला त्यावेळी पक्वानाहूनही अधिक प्रिय होते. पण काही असो, जे काही शिल्लक होते ते त्या भल्या माणसांनी आम्हाला अगदी भरपेट वाढले होते.

रस्सा म्हणजे कडान पिऊन आमची पोटे अगदी गच्च झाली होती. माझं लक्ष अधनंमधनं सुज्याच्या घराकडं जात होतं.  पण कशाचं काय?तो जो एकदाचा घरात गेला तो पुन्हा काही शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही… 

आम्ही जेवून उठलो घरचा रस्ता चालू लागलो. रस्त्याने काही दिसत नव्हते. खूप रात्र झाली होती. कुणी डोळ्यात बोट घातले तरी समोरचे काही दिसणार नव्हते इतका अंधार गुडूप तिथे झाला होता…

गावापासून लांब वस्ती असल्याने तिथे स्ट्रीट लाईट नव्हत्या. 

पण आमचे म्होरके तयारीचे होते. ते अंधारातून नीट वाट काढत होते.

आम्ही जेवून परतताना अंदाजे रात्रीचे दहा वाजले असतील. आम्ही कोणाशी काही न बोलता अगदी गुपचूप चाललो होतो. तेवढ्यात इतका वेळ शांत झालेल्या स्पीकरचा आवाज अचानक कानावर आला… कुणीतरी माईकवर जोरात ओरडले, ” शेरडं घरात बांधा, लांडगे आलेत…! ”  बापरे…! लांडगे असा शब्द ऐकल्याबरोबर आमची एकच गाळण उडाली…! मी, भूषण, रवी आणि विकास आम्ही लहान होतो त्यामुळे लंडग्याच्या भीतीने आम्ही जोरजोराने रडू लागलो. त्यातच कुणीतरी ओरडलं, ” आज आमोशा हाय. मागं-पुढं भूतबी असत्याल नीट चला …!” मग काय आम्ही त्या रानात ठो ठो बोंब मारायचेच बाकी होते पण लगेच माझ्या भावाने त्या सगळ्यांना दरडावून आमच्या भोवती सगळ्यांनी कडं केलं आणि मग आम्ही लहान मुले त्यामधून चालू लागलो तेव्हा कुठे आम्हाला धीर आला. तरीपण भीती ही वाटतच होती. आम्ही भीतीने अक्षरशः थरथर कापत होतो…! तो प्रसंग आजही आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो…! 

आम्ही गावच्या ओढ्यात आलो तेव्हा सुद्धा, ” लांडगा आला…!  शेळ्या घरात बांधा..!”अशी अनाउन्समेंट स्पीकरवर चालूच होती.

आम्ही गावात शिरलो तोपर्यंत गाव मात्र सामसूम झाले होते…

जागी होती ती फक्त गावात रात्री पहारा देणारी मोकाट कुत्री…! 

आमची झुंड पाहताच ती  जोरजोराने भुंकू लागली. त्यातून कसेबसे बाहेर पडून आम्ही घरी पोहोचलो…

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर सुज्या म्हणाला, ” काय इज्या?हाणलं का मटण दाबून?”

मी म्हटलं, ” व्हयं गड्या,  निब्बार हाणलं लयं मज्जा आली …!” 

— समाप्त — 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments