श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ मला माफ करा… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
आज राघवेंद्राला दुरंतो एक्सप्रेसने दिल्लीला जायचं होतं. पुण्यातल्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही म्हणून आईला घेऊन सकाळी नऊ वाजताच त्यानं घर सोडलं. स्टेशनवर लवकर पोहोचले. ट्रेन सुटायला अजून अवधी होता. त्यानं आईला वेटिंगरूममध्ये बसवलं. पेपरस्टॉलवरून काही मासिकं विकत घ्यायला गेला तेव्हा समोरून येणारी व्यक्ति त्याला ओळखीची वाटली. त्याच्याबरोबर एक वृद्ध गृहस्थ आणि इतर दोघे बॅगा घेऊन चालले होते.
ते लोक काहीसे पुढे गेल्यावर, काहीसे आठवल्याने राघवेंद्राने “अहो, महेशसाहेब” म्हणून हाक मारली.
त्या गृहस्थानं पटकन मागं वळून पाहिलं आणि थांबून राहिला. तो महेशच होता. त्याला भेटून जवळपास वीस वर्षे झाली होती.
राघवेंद्र आणि महेश एकाच कॉलनीत राहणारे वर्गमित्र आणि अभ्यासात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. राघवेंद्र नेहमीच महेशहून वरचढ असायचा. कॉलेजला गेल्यावर त्यांचे मार्ग बदलले. महेशच्या बाबांनी बावधनला घर बांधल्यानंतर ते कॉलनी सोडून गेले. त्यानंतर पुन्हा त्यांची कधी भेट झाली नाही.
महेश आता सेंट्रल एक्साईजमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे असं कुणाकडून तरी कळलं होतं. राघवेंद्र त्याच्या जवळ जात म्हणाला, “साहेब, मला ओळखलंत का?” राघवेंद्रने ‘साहेब’ म्हटल्यामुळे महेशचा अहंकार सुखावला होता.
“का नाही ओळखणार? तुझ्यात तसा काही फारसा फरक पडलेला नाही. आहे तसाच आहेस. ठेविले अनंते तैसेचि रहावे….” असं म्हणून मिश्किलपणे हसत पुढे बोलला, “काय करतोस? कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहेस?”
“मी, प्राध्यापक आहे. तुम्ही म्हणता तसे मी आहे तसाच आहे आणि चित्ती समाधानही आहे.”
महेश मनातल्या मनात विचार करत होता. आज मी त्याच्याहून कितीतरी उंचावर आहे. आज मी केवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहे आणि हा मात्र प्राध्यापकच आहे. बोलता बोलता ते वेटिंगरूममध्ये आले.
“राघवेंद्र, तू अव्वल नंबरचा विद्यार्थी होतास ना? पण तुला सरकारी नोकरी मिळवता आली नाही. खरं आहे ना?” महेशनं सहेतुक विचारलं.
“मी प्रयत्नच केला नाही. एम टेकला गोल्डमेडल मिळाल्यावर प्राचार्यानी मला केबिनमध्ये बोलावलं अन म्हणाले, ‘तुझ्यासारख्या विद्यार्थ्याने स्वत:च्या अर्थाजनासाठी ही पदवी न वापरता विद्यादानासाठी वापरावी. तुझ्या शिकवण्याने कित्येक मुलांचे भवितव्य घडेल. कदाचित मोठ्या कंपनीतल्यासारखा पगार मिळणार नाही. अर्थार्जन कमी होईल. परंतु कित्येक विद्यार्थ्यांच्या आदरास पात्र होशील. मला त्यांचं म्हणणं पटलं. प्राचार्यानी नेमणुकीचं पत्र हातात दिलं. असो.”
“आता तुम्ही कुठे निघाला आहात साहेब?” असं म्हणत राघवेंद्रानं नकळत महेशवर मात केली.
“उद्यान एक्सप्रेसने बाबा बेंगलुरूला चालले आहेत, तर त्यांना सोडवायला आलोय.” महेशने सांगितलं.
“ते एकटे जातील काय?” राघवेंद्रने भाबडेपणानं विचारलं.
“त्यांच्या सोबतीला ऑफिसातला एक कर्मचारी आहे. अरे मला अजिबात वेळ नसतो. मी सेंट्र्ल एक्साईजमध्ये असिस्टंट कमिशनर आहे.”
“एवढे मोठ्या हुद्द्यावर आहात म्हटल्यावर तुम्हाला वेळ मिळणे शक्यच नाही.”
“राघवेंद्रा, मघापासून मी तुला अरेतुरे करतोय आणि तू मला अहोजाहो करतो आहेस. बरं, तू कुठे चालला आहेस सांग.”
“महेश, तुम्हा सरकारी अधिकारी लोकांचा मान असतो. चार-चौघात अरेतुरे कसं म्हणणार? कॉलेजच्या बाहेर आम्हाला कोण ओळखतो? बरं असो. अरे, मी आईला घेऊन दिल्लीला चाललोय. माझा धाकटा भाऊ राहुलला ओळखतोस ना? तो दिल्लीला असतो. त्यानं तिथे एक फ्लॅट विकत घेतलाय. आम्ही वास्तुशांतीला चाललो आहोत. आईला सांधेदुखीचा तसंच हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे. गेल्यावर्षी बाबा गेल्यानंतर ती थोडीशी डिप्रेशनमध्ये गेली होती.”
“आईला सांभाळणं तुला एकट्याला फारच अवघड जात असेल. तुम्ही दोघे भाऊ सहा सहा महिने सांभाळता वाटतं.”
“छे छे ! महेश मी असा विचार देखील करू शकत नाही. आई-बाबा सुरूवातीपासूनच पुण्यात राहिले आहेत. इथेच वाढले आहेत. त्यांना दुसरीकडे करमत नाही म्हणून ते राहुलकडे कधीच राहायला गेले नाहीत. केवळ पोट भरण्यासाठी म्हणून दर सहा महिन्याला त्यांनी निर्वासितांच्यासारखे बाडबिस्तरा गुंडाळून दुसरीकडे जावं ही कल्पनाच मला पटत नाही.
आज आम्ही दोघे भाऊ आहोत म्हणून सहा-सहा महिन्याची वाटणी करावी असं म्हणतोस. जर आम्ही तिघे भाऊ असतो तर आईबाबांना चार-चार महिने वाटून घ्यायचं की काय?
माणसाला फक्त दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न नसतो. समाजप्रिय माणसाला कुणाशी सतत तरी संवाद साधावं असं वाटत राहतं. राहुल आणि वहिनी कामावर गेल्यावर दिल्लीसारख्या ठिकाणी ते कुणाशी संवाद साधतील, सांग ना?
“राघवेंद्रा, असं म्हणून कसं चालेल? आईने राहुललासुध्दा जन्म दिलाय. हा व्यवहार आहे. त्यांनं देखील आईला सहा महिने सांभाळायला हवं. तू एकट्यानेच ह्या जबाबदारीचं ओझं का उचलावं? माणसानं असं भावनाप्रधान होऊन चालत नाही. थोडंसं व्यावहारिक असायला हवं. वहिनी काही बोलत नाहीत काय?”
“महेश, मुळात मी आईला सांभाळतो आहे ह्या भ्रमात कधीच नाही. आईबाबांनीदेखील मुलांचा भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांच्या वर्तमानकाळाचा बळी दिला आहे. आमचे शिक्षण, आमचं भवितव्य ह्यातच ते गुरफटले होते. त्यांनी स्वत:चा विचार कधीच केला नाही.
ज्या आई-बाबांनी निरपेक्ष मनानं मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं त्यांना मी सांभाळतोय असं कधी मानलंच नाही. त्यांनी आम्हा मुलांना कधी ओझं मानलं होतं काय? मग त्यांच्या वृद्धत्वात मी त्यांना ओझं का समजायचं?
माझी पत्नी रेणुचं म्हणत असशील तर, एकदा ‘आमच्या सासूबाई राहुल भावोजींच्याकडे जायला नाही म्हणतात.’ असं ती कुणाशी तरी बोलताना मी ओझरतं ऐकलं होतं. दोन तीन दिवसानंतर मी तिला सहज म्हटलं, “रेणु, आपल्याला दोन मुलं आहेत. म्हातारपणी तू कुणाकडे राहायचं ठरवलंस? मोठ्याकडे की धाकट्याकडे?” तर ती पटकन म्हणाली, ‘माझी मर्जी मला ज्या मुलाकडे राहावेसे वाटेल मी त्याच्याकडे राहीन. मला कोण अडवतं बघू.’
मग मी तिला हसत हसत म्हटलं, “रेणु, माझी आई देखील तुझ्यासारखाच विचार करते बघ. ती सुद्धा म्हणते की मी मरेपर्यंत राघवेंद्राकडेच राहणार आहे, मला कोण अडवतं बघू म्हणून.’ खरं आहे. इथे माझ्याकडे राहायचं की राहुलकडे राहायचं हे आईच ठरवू शकते. नाही का?’ त्यानंतर रेणु ह्या विषयावर आजवर कधीच बोलली नाही.
“राघवेंद्रा, मुळात आईवडिलांना आपण एकट्यानेच का सांभाळायचं हा प्रश्न आहे.”
“जर मी एकटाच मुलगा असतो तर आईबाबा आणि आम्ही सगळे एकत्रच राहिलो असतो ना? दुसरी गोष्ट, माझा भाऊ राहुल आईला सांभाळायला नाही म्हणतो म्हणून ती माझ्याकडे राहते असं समजू नकोस. आई-बाबा आमच्याकडे राहत नाहीत म्हणून राहुल आणि माझी भावजय मनापासून हळहळ व्यक्त करीत असतात. आजी-आजोबांच्याकडे राहता येत नाही म्हणून माझा पुतण्या व पुतणी सदैव खंत व्यक्त करत असतात.
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈