श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ कागदाची नाव… भाग-१ ☆ श्री मंगेश मधुकर ☆
(पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं सुचत नव्हतं कारण दोघंही डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न करत होतो.इतक्यात…) – इथून पुढे —
छतातून पडणाऱ्या थेंबामुळे डोकं पुसत रस्त्याकडं पाहणाऱ्या काकाच्या डोक्यावर छत्री धरल्यावर त्यानं मागे वळून पाहीलं आणि एकटक बघतच राहीला.त्याच्यासाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता.खूप दिवसांनी खरं तर वर्षांनी भेटत असल्यानं पुढचे काही क्षण अवघडलेल्या अवस्थेत गेले.काय बोलावं हेच समजत नव्हतं.साऱ्या जुन्या आठवणी दाटून आल्या.डोळ्याच्या काठापर्यंत आलेलं पाणी अडवायचा प्रयत्न दोघंही करत होतो. इतक्यात जोरात वीज कडाडली.आकाशाकडं बघण्याच्या निमित्तानं दोघांनी डोळे पुसले.शेवटी काकानं सुरवात केली “भारतात कधी आलास”
“दीड वर्ष झालं”
“थांबणारेस कि परत जाणार ”
“नवीन थ्री बीएचके घेतलाय.आता इथंच सेटल झालोय.”
“वा.चांगली बातमी दिलीस.आत्ता तू इथं कसा?”
“माझं ऑफिस समोरच आहे.खिडकीतून तुला पाहीलं आणि..”
“गर्दीत ओळखलसं कसं?”
“उभं राहण्याच्या स्टाईलवरून”
“बरी लक्षात राहिली.” काकाच्या बोलण्यावर मी फक्त हसलो.
“रेनकोट नाही का”
“गडबडीत विसरलो.नेमकं पावसानं गाठलं.आडोशाला थांबलो तरी निम्मा भिजलोच.”काका.
“ऑफिसमध्ये चल.गरमागरम कॉफी घेऊ.”
“आम्ही चहाबाज,कॉफी चालत नाही.”काका टाळतोय हे लक्षात आलं.
“चहापण मिळेल”
“आता नको नंतर!!.तसंही पावसाचा जोर कमी झालाय.थोड्या वेळानं निघेन.ऑफिस माहिती झालंय.भेटायला येईन” पुन्हा एकदा शांतता.दोघंही गप्प.एकदम ऑकवर्ड परिस्थिती.
“कसायेस”यावेळी मी पुढाकार घेतला.
“जसा असायला पाहिजे तसा.”
“म्हणजे”
“खाऊन पिऊन सुखी आहे.थोडाफार सोडला तर विशेष बदल नाही.”डोक्यावरून हात फिरवत काका हसला.
“सेम पिंच.माझंही तसंच आहे.”
“थापा मारू नकोस.आरशात बघितलं का.अजून चाळीशी यायचीय तरीही पोक्त बाप्या वाटतोस.पोट बघ. व्यायाम बियाम सगळं बंद वाटतं.दिवसभर फक्त मोबाईल,आरामदायी खुर्ची आणि लॅपटॉप.तब्येतीची हेळसांड करून पैसे कमवायचे आणि डॉक्टरची बिलं भरायची.हो ना.”
“वेळच मिळत नाही.तू मात्र चांगलं मेंटेन केलंय” मी शिफातीनं विषय बदलला.
“पर्याय नाही.तब्येत चांगली तर सगळं ठिक नाहीतर..तसंही आयुष्य आता उतरणीला लागलं.एकदा का उतार संपला की सदामुक्कामी !!”काका भकास हसला.ते खूप खोलवर भिडलं.
“असं का बोलतोस”
“जे खरं आहे तेच बोलतोय.बाकी,तुझी प्रगती बघून समाधान वाटलं.खूप अभिमान वाटतो.अजून भरपूर यश मिळू दे.मोठा माणूस झालास.माझी भविष्यवाणी खरी ठरली.दादा-वहिनीची पुण्याई फार मोठी म्हणूनच त्यांच्या पोटी तुझ्यासारखा हिरा आला.घराण्याचं नाव मोठं केलसं.”इतक्या वर्षानंतर भेटलो तरी काकाची माया तसूभरही कमी झाली नव्हती.लहानपणीसारखंच अफाट कौतुक तो आताही करत होता.त्याच्याकडे माझे सगळे अपडेट्स होते आणि मला त्याच्याविषयी काहीच माहिती नव्हतं कारण मीच त्याला आयुष्यातून हद्दपार केलं होतं.एवढ्या वर्षात एक साधा फोन करून चौकशी केली नाही.कोणतेही ठोस कारण नसताना इतरांचे ऐकून मनात अढी निर्माण झाली आणि संबंध तोडले.कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी निर्णय घेतला त्याचचं वाईट वाटतं होतं.काका मात्र मनमोकळं बोलत होता.माझा गिल्ट वाढला.स्वतःचीच लाज वाटायला लागली.काकाच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होईना.
“काय रे!! कसल्या विचारात हरवलास.”काकाच्या आवाजानं भानावर आलो.
“तूझं मन खूप मोठयं.”काका फक्त हसला.
“चल,निघतो आता,पाऊस कमी झालाय”
“जाणार कसा”
“बाइक जिंदाबाद”
“भिजशील ना”
“थोडफार भिजलेलं तब्येतीला चांगलं असतं.”
“एक विचारू,”
“बिनधास्त!!”
“माझा राग नाही आला”
“अजिबात नाही पण खूप वाईट वाटलं.भांडणं नाही कि मतभेद नाही तरी तुझं बदललेलं वागणं जिव्हारी लागलं.परक्यासारखा वागण्याचा खूप त्रास झाला.”
“कान पकडून जाब का विचारला नाही”
“मला तो हक्क नव्हता. दादाच्या जाण्यानं खूप काही बदललं म्हणून गप्प राहिलो. माझी मर्यादा माहिती होती.जाऊ दे.जे झालं ते झालं, जुने विषय आता नको.उगीच शिळ्या कढीला ऊत आणून उपयोग नाही.अचानक भेटलास,महत्वाचं म्हणजे स्वतःहून बोललास.खूप खूप छान वाटलं.आजचा दिवस सार्थकी लागला.आता भेटत राहू.पुढच्या वेळेला चहा नक्की!! बाय”. काका निघाल्यावर अस्वस्थता अजून वाढली.नक्की काय करावं सुचत नव्हतं.समोर बंद पडलेली बाईक सुरू करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या काकाला पाहून हुंदका आला. स्वतःला रोखू शकलो नाही.धावत जाऊन काकाला बिलगल्यावर आपसूक बांध फुटला.
“काका,माफ कर.तुझ्याशी खूप चुकीचा वागलो.”
“मघाशी सांगितलं ना.सोडून दे”
“तू अजूनही तसाच आहेस पण मी बदललो रे.ईगोला कुरवाळत बसलो.”
“तुझं तुला कळलं यातच सगळं काही आलं.फार विचार करू नकोस.आता आपल्या नात्यावरची जळमटं निघून मनं स्वच्छ झाली.अजून काय पाहिजे.”त्याचवेळी विजेचा कडकडाट झाला.
“सत्ययं,बंद पडलेलं नातं रिचार्ज झाल्याची पावती मिळाली.”
“आता माझ्या बरोबर चल.कडक चहा पिऊ” बाइक ढकलत निघालो.ऑफिसजवळ आल्यावर पुन्हा पावसाला सुरवात झाली.काकानं बॅगेतून कागद काढला अन त्याची नाव बनवून माझ्याकडं दिली. लहानपणीचे दिवस आठवले.काका नाव बनवणार आणि मी पाण्यात सोडणार हा आमचा खेळ बराच वेळ चालायचा.खूप वर्षानंतर कागदाची नाव हातात घेतल्यावर पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं.काकाला घट्ट मिठी मारली. ईगो,यश,श्रीमंती,अहंकार,गैरसमज,रूसवे-फुगवे,मान-अपमान सगळं सगळं कागदाच्या नावे सारखंच तकलादू असतं. वाहत्या पाण्यात नाव सोडताना डोळ्यातून पश्चातापाचे थेंब नावेवर पडले आणि नाव पुढे गेली तेव्हा मन खूप शांत झालं.इतका वेळ आडोशाला थांबलेला काका अचानक पावसात जाऊन उभा राहीला.कदाचित त्याला डोळ्यातलं पाणी माझ्यापासून लपवायचं होतं.—
– समाप्त –
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈