प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ मोलकरीण… – भाग – २ ☆ प्रा. विजय काकडे ☆
(हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते.) – इथून पुढे
हळूहळू निर्मलालाही या गोष्टीची सवय होऊ लागली. तिला पैसाही चांगला मिळायला लागला. घरखर्चही आपोआप चालायला लागला. मग तिच्या राहणीमानही लागलीच बदलायला लागले…
कामावर येताना ती नेहमीसारखी साडी नेसून साधेपणाने यायची परंतू संध्याकाळी बाहेर ड्रेस वर फिरायची. एक-दोन वेळा तिला मी रस्त्यांना ड्रेसवर पाहिले व तिच्यातला बदल माझ्या लक्षात आला. काही गोष्टीही कानावर आल्या. मग मी ताबडतोब आईला तिला कामावरून काढण्याबद्दल सांगितले. आई सुद्धा तातडीने तिला कामावरून काढण्याचा निर्णय घेणार होती परंतू त्यापूर्वीच तिने सगळी कामे अचानक बंद केली आणि नको त्या घाणेरड्या कामात स्वतःला झोकून दिले…! ज्यातून ती कधीच बाहेर पडणार नव्हती ! तिचे काय होणार हे कदाचित तिलाही माहीत नसाव. किंवा सर्वकाही कळत असूनही तिने ते पत्करले असावे.
निर्मलाच्या बाबतीत जे काही घडले ते भयानक होते मन त्याचा कधी स्वीकार करीत नव्हतं. नुसतं आठवलं तरी काळजाला घरे पडत होती!
पण म्हणतात ना जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं तसेच झाले होते. निर्मलाच्या जाण्यामुळे सुरेखाची आमच्या घरी काम करण्याची इच्छा पूर्ण झाली होती. सुरेखा सुद्धा एका गरीब साधारण तीशीतली होती. तिचा नवरा व संपूर्ण कुटुंब तिच्या सोबत होते. नवरा भाजीपाल्याची गाडी सांभाळायचा तर सुरेखा सकाळी चार घरची धुणं -भांडी करायची व संध्याकाळच्या वेळी भाजीची गाडी चालवून नवऱ्याला दारू प्यायला मोकळीक द्यायची…
आमची भाजीला जाण्यामुळेच तर तिच्याशी ओळख झाली होती.
आईच्या ती खूप मागे लागायची मला कामावर घ्या म्हणून एकासारखी विनवणी करायची परंतु आमच्या घरी निर्मला आधीच काम करत होती. निर्मला गेली की मला कामावर घ्या असेही तिने आईला अनेकदा सुचवले होते.
सुरेखा दिसायला निर्मला पेक्षाही सुंदर होती. रंगाने गोरी होती. संसार चालवण्याची तिची धडपड व कसरत पाहून आम्हाला पण तिच्याविषयी आदर वाटायचा. तिला माणुसकी पण खूप होती. गिर्हाईकांना भाजी उदारपादार द्यायची. मिळेल तेवढ्यात समाधानी असायची.सचोटीने काम करायची.नवरा त्यातलं अर्ध पिण्यात घालवायचा पण तरी ती आनंदी असायची अन तिच्या दोन लेकरांनाही आनंदी ठेवायची.तिच्या अंगावर पातळ अगदी साधंसुधं असायचं परंतू चांगलं धुतलेलं नीटनेटकं असायचं. शिवाय तिचे विचारही चांगले असायचे. आमच्याशी थोड्या थोडक्या वेळात छान गप्पा मारायची.
बहुतेक वेळा आम्ही तिघे आई व आम्ही दोघे किंवा आई मी किंवा मी सौ.वंदना असे आम्ही दोघे भाजीपाला घ्यायला सुरेखाच्या गाडीवर संध्याकाळच्या वेळी हमखास असायचो. आमच्याशी ती खूप चांगलं बोलायची. तिच्या दृष्टीने आमची फॅमिली म्हणजे एक आदर्श कुटुंब होते.
ते दोघे पती-पत्नी आमची खूप स्तुती करायचे. आमच्या पाठीमागे इतरांच्या तोंडावर सुद्धा आमच्या बद्दल चांगले बोलायचे. मात्र अधनं मधनं ती, “मला तुमच्या घरी काम करायचे आहे.” असं म्हणायला विसरायची नाही. “मला तुमचं काम मिळालं तर जन्मात सोडायची नाही.”असंही वारंवार म्हणायची.
आईचं आणि तिचं मायलेकी सारखं घट्ट नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट होत चाललं होतं. आम्हीपण तिच्या बोलण्यामुळे तिच्या गरिबीमुळे सहानुभूतीमुळे कधी दोन गोष्टी महाग लागल्या तरी तिच्याकडून घ्यायचो. हे सगळं एकंदर असं असताना सुरेखाने आमचं काम दुसऱ्या दिवशी कसं सोडलं याचा विचार मी करू लागलो कारण की ती तसं करणं शक्य नव्हतं. तिला आमचे संबंध आणखी घट्ट करण्याची एक चांगली संधी मिळाली होती.
आपल्या मुलांनी सुद्धा शिकून माझ्यासारखं व्हावं अशी तिची व तिच्या नवऱ्याची इच्छा होती. तिचा नवरा मला सारखं शिक्षणाबाबत विचारायचा.
मुलांना पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा असं म्हणायचा.मी सुद्धा त्याच्याशी त्याबाबतीत वेळ मिळेल तेव्हा अगदी मनमोकळेपणाने बोलायचो आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा करायचो.
पुढचे आणखी दोन दिवस असेच वाट पाहण्यात गेल्यावर आईने मग सुरेखाशी संवाद साधला पण तिने जी कारणं दिली त्याने आईचे काही समाधान झाले नाही.
घरचा व्याप खूप वाढला आहे.भाजीच्या धंद्याला जास्ती वेळ देता येत नाही. धुणं-भांडीची काम आता कमी करायची आहेत.
काम करून आता कंबर दुखते. साबणाने हाताला एलर्जी होते. आधीच्या लोकांनी थोडी जादा पगार देऊन कामं वाढवलेत अशी तिची गुळगुळीत उत्तरे आम्हाला पटत नव्हती म्हणून आम्ही अस्वस्थ होतो.
एवढी सलगी राखणारी सुरेखा जेव्हा आमच्या घरचं काम मिळालं तेव्हा अक्षरशः नाचायची बाकी होती! फक्त लगेच माशी कुठे शिंकली तेच कळेना?
सरते शेवटी मी आमच्या शेजारी आमचे कुणी दुश्मन वगैरे आहे काय? ते पाहू लागलो. आमचे कॉर्टरमधले शेजारी सगळेच चांगले मित्र आणि आमचे स्टाफ वालेच होते. बहुतेकांच्या बायका घरीच त्यामुळे त्यांना मोलकराणीची वगैरे मुळीच गरज नव्हती त्यामुळे सुरेखाला जास्त पैसे देऊन फितवून काम करून घेण्याचा प्रश्नच नव्हता.
मग हे सगळे घडलेच कसे?सुरेखाने आमचे काम एका दिवसात सोडलेच कसे?हा एकच आम्हाला एकसारखा सातावत होता.
न राहून एके दिवशी मी दुसऱ्या एका भाजीवाल्या मावशी आशाबाई यांच्याशी बोलताना सुरेखाचा विषय मुद्दामच काढला. त्यावेळी त्या पटकन म्हणाल्या, “अहो सर, ती तुमच्या घरी काम तरी कशी?
मी म्हटले,” अहो तीच तर आमच्या मागे लागली होती,मला तुमच्या घरी कामाला ठेवा म्हणून…”
“अहो सर, पण तेव्हा तिला तुमची जात माहित नव्हती ना !!!” ” म्हणजे? “
” अहो सर, तुमचं राहणीमान व आडनाव बघून तिला तुम्ही त्यांच्यातलेच आहात असं वाटलं पण जेव्हा ती तुमच्या घरी आली आणि …
” आणि काय मावशी? “
पहिल्याच दिवशी काम केल्यावर ती तुमच्या घरात घरभर फिरली तवा तुमच्या घरातले फोटो तिनं बघितले अन मग तिला तुमची जात कळली…! हो आणि म्हणूनच तीनं तुमचं काम लगेचच सोडलं… पण एक करा सायेब माझं नाव तिला सांगू नका नाहीतर ती मला जित्ती ठेवायची न्हाय. “आशाबाईंच्या या उत्तराने मी निरुत्तर झालो! माणुसकीच्या आड लपलेला जातीयवाद आणि जात एवढी कृतघ्न असू शकते? याचा विचार करितच मी घरी पोहोचलो. त्यावेळी पैसे देऊन घेतलेला भाजीपाला असलेली थैली त्या गडबडीत आशाबाईकडेच विसरली होती…
– समाप्त –
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈