प्रा. विजय काकडे
जीवनरंग
☆ मोलकरीण… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆
दुपारचे दोन वाजून गेले होते.रोजच्यापेक्षा जेवणासाठी मला घरी जायला मला त्यादिवशी बराच उशीर झाला होता. मी त्यावेळी संस्थेच्या कॉर्टर्समध्ये राहायला होतो. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटची होती.गाडी पार्किंगमध्ये लावून मी पटापट जी ने चढून वर गेलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकून आई दरवाजात येऊन उभी होती. माझ्या येण्याची ती वाटच पाहत होती. दुपारी मी घरी येईपर्यंत ती सुद्धा जेवण करीत नसायची. तू लवकर जेवण करत जा असं मी अनेक वेळा सांगूनही ती ऐकत नव्हती आणि ऐकणारही नव्हती. कारण आईची मायाच असते तशी. लेकरांसाठी आपले तहानभूक हरवणारी ती एकमेव व्यक्ती असते.
मी दरवाजात उभ्या असलेल्या आइकडे पाहिले तर त्यावेळी मला ती थोडी नर्व्हस दिसली. आज मला यायला उशीर झाल्यामुळे ती सुद्धा जेवणासाठी ताटकळी असल्यामुळे तसे झाले असेल असा अंदाज मी बांधला. “आई,जेवलीस का?” मी आत येताना तिला सहज विचारले.
” न्हाय ” तिने हलक्या आवाजात उत्तर दिले.
“जेवून घ्यायचंस ना मग?” मी सोप्यावर बसत म्हटले.
” अरे जेवणारच व्हते पण धुणं वालीची वाट बघत होते. “
“म्हणजे? ती अजून आली नाही?”
” नाही बाबा अजून … “
“ती काल काही बोलली का?”
“न्हाय रे, काल तर ती एकदम खुशीत व्हती.”
“मग तिला पगार वगैरे कमी ठरवलंस काय?”
” न्हाय रं बाबा… असं कसं! आरं बाबा नुसत्या धुणेभांड्याचेच ती सहाशे रुपये घेती. पण आपले फकस्त धुणं आणि फरशी मिळून सातशे रुपये ठरवले मी तिला.
ती सहाशेच रुपये द्या म्हणत होती पण मी म्हटलं जाऊद्या गरिबाला शंभर रुपये जास्तीचे.एकेकाळी मी बी अशीच लोकांकडं शेतात पडल ते काम करायची म्हणूनच मला पांडुरंग उभा राहिला, माझ्या पोरांचं चांगलं झालं अन अजूनबी लय चांगलं व्हाईल. ” जुने दिवस आठवून आई इमोशनल झाली होती. बोलताना तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले होते.मी पटकन विषय बदलत म्हटले, “मग तिला आपलं घर आवडलं नाही का?”
“तसं बी काय न्हाय.मावशी तुमच्या घरी याची माझी विच्छा होती ती आज पुरी झाली असं ती आनंदानं म्हणत होती.
तसं म्हणायला आपल्या घरी माणसं पण कमी आहेत होय आपल्या सगळ्यांना ओळखते ती. आली असेल काहीतरी अडचण तिला आज थोडा वेळ वाट पाहू.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच दुपारी तीन वाजेपर्यंत मोलकर्णीची वाट पाहिली शेवटी आईने भिजवलेले ओले कपडे धुऊन टाकले पण ती काही आली नाही.
मात्र ती का आली नाही याचे कोडे आईला व मला पडले होते.
विशेष म्हणजे ती न येण्यामागचे एकही सबळ कारण आम्हाला सापडत नव्हतं…
आमच्या घरी धुणं-भांडी करण्यासाठी खरे तर तीच आमच्या मागे गेल्या दोन महिन्यापासून लागली होती.
मावशी मला तुमच्या घरी कामाला न्या असं सारखं म्हणायची. पण आमच्या घरी निर्मला आधीपासूनच होती तीही कामाला व स्वभावाला खूप चांगली होती गरजू व होतकरू होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईची आणि तिची छान गट्टी जमली होती आणखी दहा पाच वर्षे तरी निर्मला आपल्या घरचे काम सोडणार नाही असे मला त्यावेळी वाटत होते.
निर्मला एक तरुण विधवा होती. तिला दोन लहान मुले होती. चार-पाच घरची धुणं -भांडी करून ती मुलांना सांभाळत होती. तिला जवळच असं कोणीच नव्हतं. पण गुणांनी ती खूप चांगली होती. तिचा चेहरा निरागस होता. डोळ्याची पापणी सदा खाली पडलेली असायची. वाट्याला आलेले भोग स्वीकारून ती परिस्थितीशी लढा देत होती. आयुष्याचा अजून खूप मोठा टप्पा बाकी होता पण तिने सुरुवात तर झकास केली होती.त्यामुळे ती आपल्या कामात यशस्वी होण्याची खात्री वाटत होती. लेकरांसाठी पडतील ते कष्ट घेण्याची तिची तयारी दिसत होती. शिवाय आई तिला दररोज धीर दयायची.
” सरून जातील दिस आज ना उद्या.काळजी करू नगो. कष्ट करत रहा. ” असा सल्ला द्यायची अन मग निर्मलाला नवी उभारी मिळायची. ती धावून धावून घरातली कामं करायची.
दुसऱ्या कोणाकडे हात न पसरता आपणच कष्ट करून स्वाभिमानाने जगावे असे तिने जणू ठरवले होते आणि त्याप्रमाणे ती वागत होती म्हणून आम्हालाही तिचा फार अभिमान वाटत होता. निर्मला आमच्याकडे कामाला आल्यापासून साधारणपणे चार महिने सगळे काही व्यवस्थित चालले होते. परंतू एके दिवशी भलतेच घडले!
एक किराणा दुकानदार तिच्या झोपडीत घुसला तिला दमदाटी करून त्याने आपले साध्य साध्य केले… त्याप्रसंगी निर्मला खूपच घाबरली होती. परंतू तिला प्रतिकाराची फारशी संधी त्या नराधमाने दिली नव्हती. रात्रीच्यावेळी घरात एकटी गाठून त्याने त्याचा कुटील डाव साधला होता. हा घडलेला प्रसंग तीने आईला दुसऱ्या दिवशी सांगितला. आईने तिला धीर दिला. खोली बदलून एखाद्या ओळखीच्या नातेवाईकाचा आधार घेण्याचा सल्ला आईने तिला दिला. त्या दिशेने तिची नव्या झोपडीसाठी शोधाशोध सुरू झाली. परंतु कुठे काही जमले नाही.दोन लेकरांच्या एकट्या तरण्याताठ्या एकट्या बाईला खोली कोण देणार…!
दरम्यान त्या दुकानदाराला चांगलीच चटक लागली होती.त्याच्या तोंडाला रक्त लागले होते. तहान लागली की भागवायला तो निर्मलाच्या झोपडीत राजरोसपणे घुसायचा.निर्मला खूपच भेदरली होती पण आपलीच अब्रू जाईल म्हणून बिचारी कुठेही न वाच्यता करता निमटपणे सगळे सहन करत होती. परंतु त्या नराधमाने तिचा चांगलाच गैरफायदा घेतला होता…
शेवटी त्यानेच तिला त्याच्या सोईचीच एक खोली परहस्ते मिळवून दिली व आपल्या बैठकीतल्या मित्रांना तिच्याकडे घेऊन येऊ लागला…!
हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते.
– क्रमशः भाग पहिला
© प्रा. विजय काकडे
बारामती.
मो. 9657262229
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈