श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ ‘पुनर्मृत्यू…‘ – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एक सैनिक पुनः एकदा मरताना !
(तिचा स्वत:चा हक्काचा माणूस म्हणजे मी जगात नसताना? पाच महिन्यांचे सासर की सव्वीस वर्षे सांभाळलेले माहेर! ती माहेरी गेली यात नवल ते काय?) – इथून पुढे –
शिवाय आमचे थोड्या थोडक्या वर्षांचे नव्हे तर आठ वर्षांचे प्रेमजीवन होते लग्नाआधी.या आठ वर्षात प्रत्यक्षात भेटी अत्यंत मोजक्या घडलेल्या असल्या तरी दीर्घ संवाद होत असे…या प्रेमात काळाचे भान नसते! आयुष्यभर एकमेकांचे होण्याच्या आणाभाका घेतल्या जातात! अशा स्थितीत एकमेकांत गुंतले जाणे किती साहजिक आहे,याची कल्पना ज्यांनी असे अनुभवले आहे,त्यांनाच येऊ शकेल. अवघ्या चाळीस दिवसांचा सहवास लाभलेल्या हुतात्मा कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या वागदत्त वधूने आज पंचवीस वर्षे उलटून गेली तरी विवाह केलेला नाही,हे तुम्हांला माहित असेलच. कित्येक वीरपत्नी वैवाहिक आयुष्याचं सुख विसरून जाऊन पतीच्या नावासाठी सैन्यात अधिकारी झाल्या आहेत…हे सर्व प्रेमापोटी होतं..आणि ही सर्वोच्च त्याग भावना आहे! सामाजिक व्यवहाराला हे पटो न पटो…आहे ते आहे !
स्मृती मी सियाचीनला ड्यूटी वर निघून गेलो त्यावेळी आमच्या घरापासून दूर असलेल्या एका शहरात राहणा-या माझ्या बहिणीकडे तात्पुरती रहायला गेली होती. तिच्याकडे माझ्या काही चीज वस्तू होत्या…माझे हे असे झालेले…म्हणून तिने माहेरी निघून जाताना त्या वस्तू सोबत नेल्या…माझी आठवण म्हणून. यात गैर ते काय? बरं, माझ्या घरून निघताना ती काही भांडून नव्हती निघालेली…आईला विचारून गेली होती! असो.
खरा दैवदुर्विलास तर इथून सुरू होतो…मी गेल्याला सुमारे वर्ष उलटून गेले होते आणि अर्थातच जनता मला विसरूनही गेली होती. राष्ट्रपतीभवनातील शौर्य पदके वितरणाचा विडीओ वायरल झाला! माझी आई आणि स्मृती यांचे चेहरे पाहून सारा समाज विव्हल झाला! विशेषत: स्मृतीविषयी सा-यांच्याच मनात कणव दाटून आली…आणि हे साहजिकच होते! तिचे दु:ख आभाळाएवढे! आणि माझी आईही हे मान्य करते..ती म्हणते “मी आई म्हणून अंशुमानचा अगदी शेवटपर्यंतचा जीवनप्रवास अनुभवला,यातील आनंद उपभोगला. पण स्मृतीला हे भाग्य खूप अल्पकाळ लाभले!
माझ्या जाण्यानंतर जवळपास वर्ष उलटून गेले होते. स्मृती माहेरी होती. तोवर तिनेही काही विचार करून ठेवला असेल. ती इतकी धीराची आहे की, माहेरी गेल्यानंतर केवळ दहाच दिवसांत ती एका शाळेत शिकवायला जायलाही लागली होती…मनाला बांधून ठेवण्यासाठी! आणि या काळात तिने लष्करी नियमांना अनुसरून काही आर्थिक व्यवहार विषयक कागदोपत्री बदल करूनही घेतले होते. शेवटी तिलाही तिचे आयुष्य पुढे रेटायचे आहेच की! माझ्या वडिलांना त्यांची पेन्शन मिळतेच आणि इतर अनुषंगिक लाभ सुद्धा. त्यामुळे तिच्या आर्थिक व्यवहारांचा आणि वडिलांच्या व्यवहारांचा तसा काही संबंध नव्हता.
मा.राष्ट्रपती महोदयांनी कीर्तीचक्र परंपरेनुसार पत्नी म्हणून स्मृतीच्याच हाती दिले. आई आणि स्मृती यांनी कीर्ती चक्राला हात लावलेला आहे, असा फोटोही काढला गेला. हे कीर्ती चक्र स्मृती माहेरी घेऊन गेली! स्मृती जर सासरीच राहणार असली असती तर कीर्ती चक्र अन्यत्र नेले जाण्याचा प्रश्नच नव्हता. आणि किमान ते प्राप्त झाल्याच्या वेळी तरी स्मृतीने कोणाताही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे याबाबत झालेल्या कोणत्याही चर्चांना काही अर्थ नव्हता.
यात माझ्या आई-वडिलांची भूमिकाही विचार विचारात घेण्यासारखी आहे, हे ही खरे आहे. जन्मदात्या आई-वडिलांकडे दिवंगत मुलाला मिळालेले शौर्य पदक असावे की पत्नीकडे असावे, यावर कायदा काहीही निर्णय देऊ शकत नाही. याबाबत वडिलांनी ‘नेक्स्ट ऑफ किन’ चा नियम बदलावा,अशी मागणी सरकारकडे केली आहे. शिवाय मला देण्यात आलेल्या कीर्ती चक्राची आणखी एक प्रतिकृती करावी, आणि ती त्यांना देण्यात यावी. त्याबद्दल संरक्षण खाते विचार करेल तेंव्हा करेल. असो. इथपर्यंत ठीक होते! पण आमच्या कुटुंबाच्या बंद दाराआड गोष्टी चर्चेने ठरवता आल्या असत्या. यात मिडीया कुठून आला? लोकांच्या वक्तव्यातील निवडक वाक्ये अधोरेखित करायची आणि खूप काही झाले आहे,असा आभास निर्माण करायचा प्रयत्न केला जाणे काही नवे नाही. “बहुयें तो घर से भाग जाती हैं!” हे वाक्य त्या वृत्तवाहिनीने उचलून धरले…आणि एका क्षणात स्मृती अनेकांसाठी खलनायिका ठरली! ग्रुप इंश्युरंस स्कीम मधून आलेले एक कोटी रुपये सेनादलाने स्मृती आणि माझे आई-वडील यांच्यात नियमानुसार वाटून दिले! उत्तर प्रदेश सरकारने दिलेले पन्नास लाख रुपयेसुद्धा आई-वडिलांना पस्तीस आणि स्मृतीला पंधरा लाख असे विभागून दिले गेले! दरमहा जी पेन्शन मिळणार आहे, त्यातही नियमानुसार योग्य ती विभागणी होणार आहेच. याबद्दल स्पष्ट काहीही न सांगता काही तथाकथित फुकट-पहारेक-यांनी “स्मृती कीर्ती चक्र आणि सारे पैसे घेऊन माहेरी निघून गेली” अशी आवई उठवली. यातील कीर्ती चक्र घेऊन गेली हे खरेच होते आणि तिच्या हक्काचेही. काही रील्सवाल्यांनी भलत्याच एका महिलेचा विडीओ दाखवून ती स्मृती असल्याचे भासवले आणि पैसे कमावले…लोकांना असे काही तरी बघायचे असतेच! यावर खुद्द सैन्यादलाला पुढे येऊन स्मृतीच्या बाजूने खुलासा करावा लागला!
आणि कहर म्हणजे आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेल्या फेसबुक पेजवाल्यांनी,रीलवाल्यांनी मनाला येईल ते लिहिले,दाखवले आणि त्यावर लाखो मूर्खांनी मुक्ताफळे उधळली! नशीब मला त्या सर्व कमेंट्स वाचायला लागल्या नाहीत…! एका नतद्रष्ट माणसाने तर अशी अश्लील टिपण्णी केलीय स्मृतीविषयी की महिला आयोगाला पुढे येऊन त्याच्याविरोधात तक्रार दाखल करावी लागली!
माझे पालकांचे वर्तन योग्य की स्मृतीचे याचा निर्णय कोणताही कायदा देऊ शकणार नाही. हे सर्व सामोपचाराने घ्यायला पाहिजे..निदान माझा मान राखावा म्हणून तरी! मला स्मृती आणि माझी आई,माझे वडील हे सर्व प्रिय आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्या विचारसरणीनुसार गोष्टी मांडल्या,आईने तिच्या मनाने काही गोष्टी मांडल्या…पण निर्णय स्मृतीला घेऊ द्यात…एवढेच मला सांगायचे आहे. यापैकी कुणावरही चिखलफेक झालेली मला पहावणार नाही! कायदा,नियम यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय कुणीही वक्तव्ये करू नका. कीर्ती चक्र कुणाकडेही राहिले तरी ते माझ्या बलिदानासाठी मला दिले गेले आहे,हे विसरता कामा नये. माझ्या आई-वडिलांचा त्याग,दु:ख कशानेही कमी ठरत नाही, आणि स्मृतीच्या वेदनाही मोठ्या आहेत. सर्वशक्तीमान काळ सर्व ठीक करेल.
मिळालेली रक्कम लाटून सासू-सास-यांना वा-यावर सोडून गेलेल्या काही विधवा आहेतच आणि विधवा सुनेला विविध मार्गांनी जगणे नकोसे करणारे सासरकडचे लोकही कमी नाहीत! विधवेच्या पैशांकडे पाहून तिच्याशी विवाह करू पाहणारेही महाभाग आहेतच. स्त्रीचा नवरा गेला म्हणजे ती ‘उपलब्ध’ अशी धारणा बाळगणारे सुद्धा आपल्यातच आहेत. राजस्थानची चुडा प्रथा तर एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय व्हावा! एकूणात “हाय अबला! यह तेरी कहानी…आंचल दूध और आंखो में पानी” हे चित्र काही बदलत नाही समाजातले! पण एक चांगली बाब म्हणजे या दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी समाजातील काही जाणती मंडळी,संस्था कार्यरत आहेत. सेनेतील अधिका-यांच्या पत्नी AWWA नावाच्या संस्थेच्या माध्यमातून सैनिकांच्या परिवारांच्या कल्याणाचे कार्य करत असतातच. निवृत्तीवेतन,शौर्य गाजवल्याबद्दल दिले जाणारी विशेष रक्कम, सैनिकांच्या विधवा पत्नी,त्यांची अपत्ये,विधवांचे पुनर्विवाह यांतील कायदेशीर गुंतागुंती मोठ्या आहेत. पण आपली न्यायप्रणाली सक्षम आहे…उशीर होऊ शकतो पण न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष कामगिरी करीत असताना प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नीला देय असणारा एक विशेष लाभ, तिने जर त्या सैनिकाच्या धाकट्या भावाशी विवाह केला तरच दिले जाण्याचा एक विचित्र नियम पूर्वी प्रचलित होता. २०१९ मध्ये यात आवश्यक बदल करण्यात आला आहे…बदल व्हायला वेळ लागतो आपल्या व्यवस्थेत! पण सैनिकांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी जनतेच्या मनात प्रचंड आदर,सहानुभूती आहे,हे मी जाणतो! यासाठी खरोखर तळमळीने काम करणा-या व्यक्ती,संस्थाही आहेत. एकच विनंती आहे…अनाधिकाराने कुणीही जीभा उचलून टाळ्याला लावू नका ! या गोष्टी माझ्यासारख्या एकदा मृत्यू पावलेल्या सैनिकाला सतत पुनर्मृत्यू देत राहतात !…मला भारतमातेच्या सेवेसाठी पुनर्जन्म मिळावा…असले सततचे मरण नको ! जय हिंद ! खुश रहना देश के प्यारो…अब हम तो सफर करते है !
भारतमातेचा दिवंगत पुत्र,
अंशुमन —
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈