सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ स्त्रीणाम् भाग्यम्… भाग-२ ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

(‘थोडेच दिवस चालणार आहे हे. एकदा परीक्षा होऊन जाऊ दे. मग सुट्टीत तुला जे जे आणि जेवढं म्हणून खावंसं वाटेल, ते सगळं करीन मी. ‘) इथून पुढे —- 

शेजारच्या टेबलावरून कांद्याच्या भज्यांचा वास आला.

‘‘तज्ज्ञा, भजी खाणार?”

तिचे डोळे लकाकले.

‘‘आता कावीळही बरी झालीय ना!” असं मी म्हटल्यावर ती हसली, पण मोजकंच. शाळेतल्यासारखं खळखळून नाही.

गरमागरम भजी पुढ्यात आल्यावर सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही भज्यांवरच कॉन्सन्ट्रेट केलं. भजी आणि प्लेटमधले शेंड्यांचे तुकडेसुध्दा संपले.

तज्ज्ञा आता थोडी सावरल्यासारखी वाटत होती.

‘‘परीक्षेच्या वेळी बरी होतीस तू?”

‘‘तसा विकनेस होता, पण पेपर्स व्यवस्थित लिहिले. पपांनी माझी चांगली बडदास्त राखली होती. नंतरही कुठे तरी ट्रॅव्हल करायचा प्लॅन करत होते. पण मीच नको म्हटलं. मला स्वस्थ झोपावंसं वाटत होतं. ती अख्खी सुट्टी मी झोपूनच काढली. दिवसाला बारा-बारा, चौदा-चौदा तास झोपत होते. आयुष्यभराची झोप त्या दोन महिन्यात घेतली. ”

‘‘आणि पपा?”

‘‘ते शांत होते. ‘एकदा कॉलेज सुरू झालं की बारावीच्या अभ्यासाला सुरुवात. झोपू दे आताच किती ते-‘ म्हणून ममीला सांगायचे. रिझल्ट जवळ आला, तसे ते पुन्हा बदलले. मी मेरीटमध्ये येणार, असं ते गृहीतच धरून चालले होते. माझ्या सत्कार-समारंभाची स्वप्नं बघत होते, माझ्यासाठी नव्या कपड्यांची खरेदी झाली. माझी भाषणं त्यांनी लिहून काढली. माझ्याकडून पाठ करुन घेतली. बघता बघता रिझल्टचा दिवस उजाडला. ”

‘‘मग?”

‘‘मला एक्क्याणव टक्के मिळाले. ”

‘‘अरे वा, एवढी आजारी असूनही. ”

‘‘तू ‘अरे वा’ म्हणतेस, पपांनी मात्र मला फेल झाल्यासारखंच वागवलं. ”

‘‘काय सांगतेस…?”

‘‘आमच्या अवघ्या घरावर अवकळा पसरली होती. अगं आरती, मला त्यांनी घरातसुध्दा घेतलं नाही. तुला आठवतं, दार उघडल्यावर आमचा व्हरांडा होता?”

‘‘हो. त्यात तो चपलांचा स्टँड होता आणि त्याच्याशेजारी बूट घालताना बसण्यासाठी खुर्ची होती. ”

‘‘त्याच खुर्चीवर मी बसून होते. अगदी दुपारी शाळेतून आल्यापासून. पपा दार लावून घरात बसले होते. ममीला कितीही वाटलं, तरी पपांपुढे तिचं काहीच चालायचं नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली. रात्रीचे नऊ वाजून गेले. त्यांनी ना मला घरात घेतलं, ना काही खायला दिलं. जेवण तर सोडाच, पण घरी आल्यापासून पाण्याचा थेंबही पोटात गेला नव्हता. माझा घसा कोरडा पडला होता. भुकेने पोटात वळवाटे येत होते. पोटातून हात घालून कोणी तरी जीभ, घसा, अन्ननलिका सगळं पोटातलं ओढतंय, असं वाटत होतं. शरीरातलं सगळं पाणी डोळ्यांतून वाहून गेल्यासारखं झालं होतं. ”

ती बोलत होती. मी काहीही न बोलता ऐकत होते.

‘‘दारावर थापा मारुन त्यांना दार उघडायला लावावं, असं वाटत होतं. पण माझ्या मनात आलं, यात माझी काय चूक होती? एवढ्या आजारपणातही मी अगदी टोकाला जाऊन माझा अभ्यास नीट केला होता आणि नाइन्टीवन म्हणजे काही कमी मार्क्स नव्हते. मग मी कशाला माघार घेऊ?

तेवढ्यात व्हरांड्याच्या ग्रिलच्या बाहेर कोणी तरी उभं असलेलं दिसलं. बघितलं तर, आमच्या समोरच्या चाळीत राहणारा मुलगा होता. मी ओरडणारच होते, पण त्याने डाव्या हाताची तर्जनी ओठावर ठेवून मला गप्प राहण्याची खूण केली. उजवा हात ग्रिलमधून आत घालून मला एक पुडी दिली आणि एक पाण्याची बाटलीही.

‘दुपारपासून बघतोय, बाहेरच बसलीयस. काही खाल्लं-पिलं नाहीस, म्हणून आणून दिलं. फेल झाली असलीस तरी काळजी करू नकोस, पुढच्या वेळी नीट अभ्यास कर, होशील पास. ’

त्याच्या हळूवार बोलण्याने खरंच जादू केली. इतका वेळ कोंडून ठेवलेला आवेगाचा बांध फुटला. मी ओक्साबोक्शी रडू लागले.

‘आता रडणं थांबव. थोडं पाणी पी आणि खाऊन घे. ’

मी त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहत त्याने आणलेले दोन्ही वडापाव खाल्ले आणि घटाघटा पाणी प्याले. ती रिकामी बाटली आणि कागद घेऊन तो निघून गेला. ”

‘‘तुझ्या ममी-पपांना कळलं नाही?”

‘‘नाही. ते बहुधा आतल्या खोलीत असावेत. ”

‘‘तुझे पपा नॉर्मलला कधी आले मग?”

‘‘चार-पाच दिवसांनी. मग ते माझी समजूत घालू लागले- जाऊ दे. दहावीला झालं ते झालं. आता बारावीची सुरुवात आतापासून कर. आणि तब्येत, खाणं-पिणं सगळं व्यवस्थित सांभाळायचं. पण खरं सांगू आरती, माझा सगळा इंटरेस्टच गेला होता. ताणून ताणून रबर तुटतो ना, तसं माझं झालं होतं. दोन्ही काकांना, चुलत भावंडाना शह द्यायला माझं ‘प्यादं’ केलं जातंय, हे मला कळून चुकलं होतं. माझं अभ्यासातलं लक्ष उडालं. मला कॉलेजमध्येही जावंसं वाटेना. ”

आमच्या पुढच्या डिशेश तशाच होत्या. ती बोलत होती, मी ऐकत होते.

‘‘त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे तो मुलगा मला वरचेवर भेटू लागला. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्ही लग्न करायचं ठरवलं. आमच्या घरी बोलण्याचीही सोय नव्हती. त्याच्या घरी विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. ”

ती दोन घोट पाणी प्यायली आणि पुन्हा बोलू लागली.

‘‘बारावीच्या परीक्षेच्या आधी दीड महिना मला अठरावं वर्ष पूर्ण झालं. त्याच्या दुस-याच दिवशी आम्ही लग्न केलं. लग्न करून दोन दिवसांकरता आम्ही माथेरानला गेलो. घर सोडण्यापूर्वी मी चिठ्ठी लिहून ठेवली होती. आम्ही माथेरानहून परत आलो, तेव्हा आमच्या घराला कुलूप होतं. मला भेटण्याचा, माझा शोध घेण्याचा प्रयत्नही न करता ते जागा सोडून गेले होते. कुठे गेले, ठाऊक नाही. तुला सांगू आरती, आजपर्यंत मी माझ्या घरच्यांना बघितलंही नाही. ”

तिच्या डोळ्यांना धार लागली होती. मी तिला रडू दिलं. थोड्या वेळानं ती थांबली. मी पुढे केलेल्या ग्लासातलं पाणी तिने एका झटक्यात संपवलं.

‘‘आता ठीक चाललंय ना तुझं? मिस्टर बरे आहेत ना?”

‘‘तो स्वभावाने खूप चांगला आहे. माझी खूप काळजी घेतो. पण आमच्या लाईफस्टाईलमध्ये खूप म्हणजे खूपच फरक आहे गं. त्यांच्या घरातलं कोणीच फारसं शिकलेलं नाही. वडिलांनी जन्मभर टेम्पररी नोक-या केल्या. कधी चार महिने, कधी सहा महिने, तर कधी आठ महिने. पहिली गेल्यानंतर दुसरी मिळेपर्यंत घरीच. हा सर्वात मोठा. त्यामुळे इच्छा असूनही हा फारसा शिकू शकला नाही. एक फुलटाईम, एक पार्टटाईम अशा दोन नोक-या तर पाचवीला पुजलेल्या. नंतरची चार भावंडं. त्यांना अभ्यासात विशेष गती नव्हती. बहिणी दोनदा एका इयत्तेत नापास होऊन घरी बसलेल्या. त्यांच्या लग्नाची जबाबदारी याच्यावरच. शेवटी मीही नोकरी धरली. पण दहावी पास मुलीला- अगदी एक्क्याण्णव टक्क्यांनी झाली म्हणून काय झालं?- कसली नोकरी मिळणार?”

बोलता बोलता ती मध्येच थांबली,

‘‘माझ्या माहेरच्या कोणाशीही माझे संबंध राहिले नाहीयेत गं. आज पहिल्यांदाच मी हे सगळं कोणाशीतरी शेअर केलंय. मी खूप मोठी चूक केलीय गं. माझं अख्खं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं मी. ”

तिच्या समोरून उठून मी तिच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसले. तिला जवळ घेतलं. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडत होती.

तिच्या रडण्याचा भर ओसरल्यावर मी म्हटलं, ‘‘हे बघ तज्ज्ञा, तुझ्या हातून चूक झाली हे खोटं नाही, पण त्याला तू जबाबदार नाहीस. ”

तिने झटकन मान वर केली आणि माझ्या डोळ्याला डोळा भिडवून विचारलं, ‘‘काय म्हणालीस?”

‘‘तू बरोबर ऐकलंस. तुझ्या हातून झालेल्या चुकीला तू जबाबदार नाहीस. त्यासाठी तुझे वडील जबाबदार आहेत. अगदी शंभर टक्के. त्यांनी तुला अजिबात समजून घेतलं नाही. म्हणून हे पुढचं रामायण घडलं. तुझ्या जागी दुसरं कुणी, अगदी मीही जरी असते, तरी कदाचित अशीच वागले असते. ते वयही असंच असतं. कोवळी मुळं ओलाव्याकडे वळतात ना?”

‘‘खरंच तुला असं वाटतं? की फक्त माझी समजूत घालायला…”

‘‘तुझी शप्पथ, तज्ज्ञा. खरंच मला असं वाटतं. ”

‘‘तुला ठाऊक नाही, आरती. माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं उतरलं म्हणून सांगू! इतके दिवस मी हा अपराधाचा गंड घेऊनच जगत होते. ”

‘‘एक सांगू, तुला तज्ज्ञा?”

‘‘काय?”

‘‘शांत डोक्याने विचार कर. आतापर्यंत तू या परिस्थितीला शरण गेलीस. आता तुझ्यातल्या ‘तज्ज्ञा’ला जागं कर आणि तुझं आयुष्य तुझ्या स्वत:च्या ताब्यात घे. पुढे शिक. चांगली नोकरी मिळव आणि तुला हवं तसं वळण तुझ्या आयुष्याला लाव. ”

‘‘थँक्स, आरती. तू माझ्या मनाला उभारी दिलीस. मी नक्की विचार करीन, तू सांगितलंस त्याचा. ”

घरी आले तरी तज्ज्ञाचेच विचार डोक्यात घोळत होते. काम आटोपून सेमिनारच्या पेपर्सवरून नजर फिरवली.

झोपेतही तज्ज्ञाचीच स्वप्नं पडत होती. ती महागातले फ्रॉक घालणारी, नीटनेटकी, अतिशय स्मार्ट तज्ज्ञा आणि टॉकटॉक बूट वाजवत येणारे, आम्हा विद्यार्थ्यांकडेच नव्हे, तर बाईंकडेही तुच्छतेने बघणारे तिचे ते पपा.

अलार्म वाजल्यावर एकदा स्नूझ केला. दुस-यांदा स्नूझ करायला गेले, तेव्हा लक्षात आलं, फ्लाईट गाठायची आहे.

मग धावपळ करत तयार होऊन निघाले, तर उशीरबिशीर काही झाला नव्हता. सिक्युरिटी चेक वगैरे आटोपूनही तब्बल सव्वा तास बाकी होता. मग पुस्तक काढून वाचत बसले. मध्ये-मध्ये डोळे मिटत होते.

– क्रमशः भाग दुसरा 

सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments