सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
जीवनरंग
☆ “रात्र थोडी सोंगं फार ( विनोदी कथा)” – भाग-२ ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
(आम्ही रात्री अडीच तीनला निघालेलो सकाळी सातच्या आसपास खाली पोहोचलो. घोड्यावरून आलेली मंडळी मात्र पहाटेच खाली आली होती.) – इथून पुढे –
आम्ही रूमवर आलो मी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ केली मग जरा थोडंसं बरं वाटू लागलं कारण अंग आणि पाय सगळंच ठणकत होतं. माझी दोन्ही मुलं आणि मिस्टर झोपलेले होते. मी खाली जाऊन नाश्ता केला आणि सर्वांसाठी घेऊन वर येऊ लागले तेव्हा घोड्यावरून आलेल्या पैकी एक जण माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला,
“वहिनी, तुम्ही चक्क एवढ्या लांबून चालत येऊन, अंघोळ करून, खाली जाऊन नाश्ता घेऊन आलात?”
मी म्हणाले,
“हो आता थोडंसं बरं वाटतंय आंघोळ केल्यावर. “
तो म्हणाला,
“आमच्या बायकांना चालताच येत नाही. हॉटेलच्या पायऱ्या सुद्धा त्या बसत बसत चढल्या. तोंडाने सारख्या आई आई गं! करत होत्या. घोडे धडधडतच खाली आले. हाडाचे पार खुळखुळे झाले बघा आमच्या. “
माझंही अंग खूप दुखत होतं पण मी हसू आवरू शकले नाही. बराच वेळ आराम केल्यानंतर वैष्णो मातेचा निरोप घेऊन सर्वजण परत जम्मूला जायला निघालो. जम्मूच्या एका गार्डन मध्ये आम्ही गेलो कारण ट्रेनला थोडा वेळ होता. त्या गार्डनमध्ये फोटो काढताना एकाने सेल्फी स्टिक आणली होती. त्यांचा मुलगा त्याच्या आईचा नवीन फोन घेऊन सेल्फी स्टिकने फोटो काढत होता. तो आई-वडिलांच्या हातात देखील सेल्फी स्टिक द्यायला तयार नव्हता आणि काय झाले काय माहिती पण अचानक फोन खाली पडला आणि त्यावर चीर गेली. तिथेच तिने मुलाला फटके द्यायला सुरू केले.
“माझा नवीन फोन फोडलास गाढवा. “
कसेबसे सर्वांनी समजावले आणि परत ट्रेनमध्ये बसणार तितक्यात आमच्या सोबत आलेल्या एका जोडप्याचा वैष्णोदेवीला स्टुडिओमध्ये खास काश्मिरी ड्रेसिंग मध्ये काढलेला सहकुटुंब फोटो जिथे राहिलो त्या हॉटेलवरच विसरला असल्याचे कळले आणि त्याच्या बदल्यात त्यांनी इंदिरा गांधींचा एक फोटो विकत घेतलेला होता तो मात्र लक्षात ठेवून आणल्याचेही कळले. हे ऐकल्यावर सगळीकडे हशा पिकला तो वेगळाच.
पण फोटो आणण्यासाठी परत जाणे शक्य नव्हते कारण खूप लांब आम्ही आलो होतो आणि आमच्या ट्रेनची वेळ देखील झाली होती. शेवटी काय वैष्णोदेवीच्या त्या पवित्र भूमीत आमच्यापैकी एकाचा सहकुटुंब फोटो आठवण म्हणून ठेवून आम्ही सर्वजण अमृतसरला जाण्यासाठी निघालो.
अमृतसरला आम्ही ठरवलेल्या हॉटेलवर पोहोचलो. सर्वजण छान फ्रेश झाले. पंजाबी लोकांचे पराठे खूप छान असतात म्हणून मुद्दाम आलू पराठ्याचा नाश्ता सांगितला होता पण त्या पराठ्यामध्ये आलू कुठे सापडतच नव्हता. नेहमीप्रमाणे माझ्या मुलांनी सांगून टाकले,
“यापेक्षा आमच्या आईचे पराठे खूप छान असतात. “
सर्वांनी सवय नसतानाही वेगवेगळ्या पद्धतीच्या नाश्त्याचा आनंद घेतला आणि नाश्ता करून सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलो.
जिथे जाईल तिथे तिथे वेगवेगळ्या चवीचा स्वाद घेण्यामुळे बहुतेक सर्वांनाच दोननंबरचा त्रास सुरू झाला होता. आम्हाला अनुभव असल्यामुळे आम्ही सांगत होतो की नवीन पदार्थ जरा कमीच खावेत आणि चालायचं भरपूर आहे त्यामुळे भूक थोडी ठेवून खा पण कोणीही ऐकले नाही. संध्याकाळी सर्वजण पोटदुखीच्या परिणामांना सामोरे जात होते.
दोन दिवस अमृतसरमधे राहून तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दिल्लीला जाण्यासाठी ठरलेल्या ट्रॅव्हलनी निघालो. दिल्लीला पोहोचल्यावर पहिले अक्षरधाम मंदिर पाहायचे ठरले. त्या दिवशी चतुर्थी होती त्यामुळे आम्हाला उपवास होता. अक्षरधाम टेम्पल पाहून आल्यावर इतर सर्वांनी मनसोक्त चाटपापडी, समोसे, छोले भटूरे इ. पदार्थांचा आनंद लुटला. यांच्या एका मित्राने तर हे सर्व मनसोक्त खाऊन परत आमच्यासाठी मागवलेले वेफर्स सुद्धा अर्धे खाऊन टाकले. अचानक ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि दिलगिरीच्या स्वरात म्हणू लागला,
“अरे, तुम्हाला उपास आहे नाही का?
असे म्हणून त्यांने खाणे बंद केले. त्याचाही परिणाम व्हायचा तोच झाला पोट बिघडल्यामुळे सर्वजण परेशान झाले. आम्ही दिवसभर उपाशी होतो त्यामुळे एका राजस्थानी रेस्टॉरंट मध्ये छान संध्याकाळी जेवण केले. ते जेवण खाण्याची इच्छा असून देखील, पोटदुखीमुळे खाता येत नाही म्हणून बहुतेक सर्वांची हळहळ झाली.
दिल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी संसद भवन, राष्ट्रपती भवन ओझरते पहात पहात आम्ही लोटस टेंपल पाहिले. शांत रम्य परिसर. सर्वांनी थोडा वेळ मेडिटेशन पण केले. लालकिल्ल्यावर गेलो. लालकिल्ला अगदी कानाकोपरा पहिला आणि त्यानंतर दिल्ली गेटवर गेलो. दिल्ली गेटवर फोटो काढण्यासाठी म्हणून एका माणसाला आम्ही ठरवले. आमच्यापैकी दोघांना वाटले त्याच्यापेक्षा चांगला माणूस ठरवूया म्हणून त्यांनी दुसऱ्या माणसाला ठरवले. मानवी स्वभाव दुसरं काय! वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही फोटो काढले पंधरा ते वीस मिनिटात त्या माणसाने आमचे फोटो आणून दिले. आमच्यासोबत ज्या ज्या जोडप्यांनी फोटो काढले होते त्या सर्वांचे मिळाले आणि दोघांनी अति हुशारी दाखवून दुसऱ्या माणसाला फोटो काढायला सांगितले होते तो माणूस आमची निघायची वेळ झाली तरी येत नव्हता म्हणून हे दोघेजण त्याला शोधायला म्हणून आख्खा दिल्ली गेटचा परिसर फिरले पण तो माणूस काही सापडला नाही आणि शेवटी सगळ्यांच्या शिव्या खाऊन गुपचूप गाडीत येऊन बसले. गाडी हलल्यावर ज्यांचे फोटो मिळाले नाहीत ते कुटुंब दिल्ली गेट कडे असे काही बघत होते की आमचे फोटो तुझ्याजवळ राहिले म्हणजे केवढा मोठा अपराध झाला आहे. हे चित्र पाहून सगळे पोट धरून हसू लागले. एकूण काय आनंदाचे खूप मोठे गाठोड घेऊन आम्ही संध्याकाळी दिल्लीच्या विमानतळावर पोहोचलो. आम्ही जरी विमानाचा प्रवास केला होता तरी आमच्या सोबत आलेले बहुतेक सर्वजण पहिल्यांदाच विमानात बसणार होते त्यामुळे कुतुहल खूप जास्त होते.
विमानतळावर पोहोचताच आमच्या सर्वांमधील सगळ्यात छोटा जो मुलगा होता त्याला दोन नंबरला आली होती. त्याची आई घाबरून गेली. आम्ही त्या दोघांना घेऊन पहिले वॉशरूम गाठले. आम्ही वॉशरूम मध्ये आहेत हे कुणालाच माहिती नव्हते त्यामुळे ज्या मुलाला घेऊन गेलो होतो त्याचे वडील वेड्यासारखे बायको मुलाला शोधू लागले. आम्हाला पाहिल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. बॅग चेकिंग पासून सर्वजण आम्हाला पुढे करत होते कारण आम्हाला विमानाचा आधीचा अनुभव होता. मधेच एकाने सर्वांना उभे करून त्याच्या सेल्फी स्टिकने एक सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला तो सेल्फी काही केल्या निघत नव्हता म्हणून दुसरा मोठ्याने म्हणाला,
“सेल्फीस्टिकचे पैसे दिले नाहीत वाटतं? म्हणूनच फोटो काढायला नको म्हणत आहे ती.”
असे म्हणताच सर्वजण मोठ्याने हसू लागले व विमानतळावरील सर्व लोक आमच्याकडेच पाहू लागले. शेवटी सर्व चेक होऊन आम्ही धावत पळत विमानात जाऊन पोहोचलो.
विमानात पोचल्यापासून ते विमानातून उत्तरेपर्यंत छोट्या मुलाला विमानातले टॉयलेट एवढे आवडले की तो सारख्या त्याच्या वाऱ्या करत होता.
आमच्यातीलच एक लेडीज विमानातल्या बाथरूम मध्ये गेली आणि काही केल्या तिला बाथरूमचा दरवाजा उघडेना. शेवटी विमानातील एका तरुणीने तिला बाहेर काढले तेंव्हा तेवढ्या थंडगार एसी मध्ये पण घामेघूम झालेल्या तिला पाहून सर्वजण हसू लागले. बघता बघता हैदराबाद आले हैदराबादहून आम्ही ठरवलेल्या गाड्या आम्हाला घरपोच घेऊन आल्या आणि अशा अजब गजब प्रवासाची सांगता झाली. प्रवास जरी संपला असला तरी खूप सार्या गोड आठवणी आणि हास्यरसाच्या भरपूर खाउनी भरलेले डबे मात्र कायम आमच्या शिदोरी मध्ये भरलेले राहिले आहेत. आज कितीही दिवसांनी ते डबे उघडले तरी तितक्याच उत्साहाने हास्याचे कारंजे असे काही उडतात की त्यात आम्ही चिंब चिंब होऊन जातो, आणि “असली मजा तो सबके साथ आता है।” याची पुन्हा एकदा प्रचिती येते.
पुर्वनियोजन करून देखील प्रत्येक व्यक्तींच्या वेगवेगळ्या स्वभावामुळे प्रवासात जी त्रेधातिरपीट उडाली त्यालाच तर म्हणतात रात्र थोडी आणि सोंगं फार.
— समाप्त —
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈