श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ एक सहजीवन… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
नुकतीच माझी बदली दिल्लीला झाली होती. रघुवीरजी, एकेकाळचे माझे सहकारी, दिल्लीच्या जवळच फरिदाबादला स्थायिक झाले होते. एकदा रघुवीरजींना आणि सविता दीदींना भेटायची इच्छा होती. ते साताठ वर्षापूर्वी निवृत्त झाले असल्याने त्यांचा मोबाईल नंबरही नव्हता. खरं सांगायचं तर, कामाच्या धबडग्यात मला वेळही मिळत नव्हता.
आमच्या ऑफिसातला जगदीश फरिदाबादलाच राहतो. एकदा त्याच्याकडे रघुवीरजींच्याविषयी चौकशी केली. रघुवीरजी त्याच्या जवळच्या कॉलनीत त्यांच्या मुलासोबत राहत असल्याचं त्यानं सांगितलं. सविता दीदी एका वर्षापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने परलोकवासी झाल्या हे कळल्यावर मला त्यांच्या सोबत व्यतित केलेलं मुंबईतलं वास्तव्य आठवलं.
रघुवीरजींची मुलं हॉस्टेलमधे राहून दिल्लीत शिकत होती. त्यामुळे कांदिवलीच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये ते सपत्नीक अकराव्या मजल्यावर राहायचे तर मी सातव्या मजल्यावर एकटाच राहायचो. बऱ्याच वेळा सवितादीदी मला आग्रहाने त्यांच्याकडे जेवायला बोलवायच्या. मी चार पाच वेळा तरी त्या माऊलीच्या हातचं खाल्लं असेल. त्या म्हणायच्या, “हृषिकेश, आप मुझे दीदी कहते हो ना? फिर अपने दीदी के घर आने में इतना क्यों झिझकते हो?”
एकदा सवितादीदी कुठल्याशा समारंभाच्या निमित्ताने दिल्लीला गेल्या होत्या. रघुवीरजींनी फोनवर विचारलं, ‘हृषिकेश, मैं तुम्हारे फ्लॅट में रहने आऊं क्या?’
सवितादीदी नसल्याने त्यांना घर खायला उठलं होतं. मी ‘हो’ म्हणताच ते माझ्या फ्लॅटवर राहायला आले. मला म्हणाले, ‘हृषिकेश, मेरे भाई, सविताजी ह्या फक्त दोन दिवसासाठी बाहेर गेल्या आहेत तर मी इतका अस्वस्थ झालो आहे की काय सांगू? देव न करो अन त्या माझ्या अगोदर गेल्या तर माझी काय अवस्था होईल?’ हे ऐकल्यावर, अशाच विरह व्यथेचे मनोज्ञ दर्शन घडवणाऱ्या बोरकर यांच्या कवितेतल्या ओळी माझ्या मनात रूंजी घालत होत्या.
‘तू गेल्यावर दो दिवसांस्तव जर ही माझी अशी स्थिती
खरीच माझ्या आधी गेलीस तर मग माझी कशी गती?….
‘तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसूंही सुने सुके
मुले मांजरापरी मुकी अन् दर दोघांच्या मधे धुके’….
खरंच रघुवीरजी आणि सवितादीदी ‘मेड फॉर इच अदर’ असं कपल होतं. रघुवीरजींना शेवटची पोस्टिंग दिल्लीला मिळाली त्याचवेळी माझी चेन्नईला बदली झाली. त्यानंतर रघुवीरजींचा कधी संपर्क झाला नाही.
जगदीश पुढे सांगायला लागला आणि माझी तंद्री भंग पावली, ‘साहेब, रघुवीरजींचा मुलगा शेखर हा माझा घनिष्ठ मित्र आहे. शेखर आणि त्याची पत्नी रजनी त्यांची अतिशय काळजी घेतात. गेल्या वर्षभरापासून ते दोघेही ऑफिसला गेल्यानंतर रघुवीरजींना घरी एकटेच राहावे लागायचे. पत्नींच्या आठवणीने हळूहळू ते निराशेच्या गर्तेत जात होते.
त्यांची सून रजनीच्या आग्रहामुळे, रघुवीरजी घराच्या जवळच असलेल्या पार्कमध्ये सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जायला लागले. पार्कमध्येच त्यांची राजेश्वरींशी ओळख झाली. हळूहळू ती जुजबी ओळख गाढ मैत्रीत रूपांतरित झाली. रघुवीरजींना राजेश्वरींच्या वागण्यातून, बोलण्यातून सविताजींचे लाघवी रूप दिसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच तजेला आला. त्यांच्या मैत्रीची गोष्ट आजूबाजूला पसरली.
शेखरने ती हकीगत माझ्या कानावर घातली. मी म्हटलं, “शेखर, अरे रजनी भाभींना ही हकीगत इतरांच्याकडून कळण्या अगोदर तूच सांगावंस. ”
घरी पोहोचल्यावर शेखरने रजनी भाभींना ही हकीगत शांतपणे सांगितली.
सगळं ऐकल्यावर रजनी भाभी म्हणाल्या, ‘हे पाहा शेखर, ज्यांनी एकटेपणा अनुभवला नाही ना असेच लोक पप्पांच्या विषयी बोलत असतील. एकटेपणाशी लढण्यात हार मानून निराशेच्या गर्तेत जाऊन आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा किंवा चिडचिड करून आपल्या मुलांच्या संसारात लुडबूड करीत राहण्यापेक्षा; त्यांनी त्यांच्या वयाला, स्वभावाला जुळणाऱ्या व्यक्तिशी सुखदु:खं वाटून घेतली तर काय हरकत आहे? या वयातल्या मैत्रीत समोरची व्यक्ती आपल्याला कितपत समजून घेतो एवढंच माणूस पाहत असतो. ‘
‘मग त्यांनी पुरूष मित्र जोडावेत. त्याला कोणाची हरकत असणार आहे?’ शेखरनं सांगितलं.
‘शेखर, स्त्रियांमध्ये वात्सल्य-ममता हे भाव जात्याच असतात, तसे पुरुषांमध्ये नसतात. एक स्त्री म्हणून नव्हे तर ती त्यांच्या भावना समजून घेते म्हणून पप्पांनी त्यांच्याशी मैत्री जोडली असेल. पप्पांना त्यांच्या एकाकी जीवनात योगायोगाने एका स्त्रीमधे मैत्र भेटलं आहे. एरव्ही कोणा परस्त्री सोबत बोलताना मी मामंजीना कधी पाहिलेलं नाही.
आज वयाच्या या टप्प्यावर सासूबाई नसल्याने त्यांना आलेले मानसिक रितेपण न सांगताच राजेश्वरीजी समजून घेत असाव्यात. माणसाला एकटेपणा, नैराश्य ह्यातून सहानुभूतीचे चार जादुई शब्दच तारू शकतात. स्त्री आणि पुरुष हा आदिम व मूलभूत भेद अनादिकाळापासून माणसाच्या प्रवृत्तीला चिकटलेला आहे.
आजकाल तरूण वयातल्या मुला-मुलींची मैत्री स्वाभाविक वाटते, मग वृद्धत्वात झालेल्या मैत्रीत कसली आली आहे विसंगती? ते वृद्ध झाले आहेत म्हणून त्यांची लहानसहान सुखे आपण हिरावून घ्यावीत का? स्त्री पुरुषात शारीरिक ओढीच्या पलीकडचे मैत्र असूच शकत नाही का?’
‘रजनी, तू जे बोलते आहेस ते बरोबर आहे, पूर्वीच्या मानाने आता स्त्री-पुरुष या नात्यात बराचसा मोकळेपणा आलेला आहे, हे मान्य आहे. परंतु अजूनही तो पुरेसा नाही. आपल्या समाजात आजही स्त्री-पुरुषांच्या मैत्रीकडे वाकड्या नजरेनेच बघितले जाते हे तर मान्य करशील की नाही?’
‘शेखर, दिवसेंदिवस भोवतालचे वातावरण आणि राहणीमान वेगाने बदलत चालले आहे आणि त्याच बरोबर लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन आणि विचार करण्याच्या पद्धतीतदेखील बदलत होतोय. प्राप्त परिस्थितीला सामोरे जाणे ही काळाची गरज होत चाललीय.
आपल्या जीवनाचे निर्णय बरोबर की चूक किंवा चांगले की वाईट एवढ्याच कसोट्यांवर घासून न पाहता त्यातून होणाऱ्या सोयी सुविधांच्या हिशेबाने योग्य तो विचार करून आज माणूस निर्णय घेतो आहे. परदेशातल्या नोकरीच्या निमित्ताने मुलं दूर जाण्याने वृद्धांची एकाकी कुटुंबे वाढत चाललेली आहेत. परिणामत: कधीही विचारात न घेतल्या गेलेल्या अनेक नवीन समस्यांना तोंडे फुटत चाललेली आहेत. आईबाबांना एकटे राहायला लागू नये म्हणून विदेशातली संधी नाकारणारा तुझ्यासारखा एखादाच शेखर असतो. कळलं?’
‘खरंच, रजनी मी हा विचार कधी केलाच नव्हता. तूच बाबांशी बोलून एकदा राजेश्वरी आंटीशी बोलून घे. ’
असं म्हटल्यावर रजनीने रविवारी सकाळचा नाश्ता झाल्यावर रघुवीरजींच्या समोर विषय काढला. ‘पप्पा, आम्ही तुम्हाला सोसायटीतल्या राजेश्वरी आंटीबरोबर पार्कमध्ये गप्पा मारताना पाहिलं आहे.’
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈