वाचताना वेचलेले
☆ जीभ… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
- ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
- रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्वीकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत- बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ!
- एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ!
- सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ !
- तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ!
- प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ!
- भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !
- सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !
- बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे काम करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ !
- दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ !
- काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा कामानिराळा राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !
- दाताशी युती करत त थ द ध, ओठाशी युती करत प फ ब भ, दंतमूलाशी युती करत च छ ज झ, टाळुशी युती करत ट ठ ड ढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनीनिर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !
- पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणू काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !
- ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !
- ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !
- आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !
- उगाच नाही म्हटलंय__
जेणे जिंकीली रसना ।
तृप्त जयाची वासना ।
जयास नाही कामना ।
तो सत्वगुण ।।
– दासवाणी
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈