श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इतिहासातील प्राणिविश्व… (भाग १ व २)” – लेखक : श्री महेश तेंडुलकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : “इतिहासातील प्राणिविश्व…” (भाग १ व २)

लेखक : श्री महेश तेंडुलकर

पृष्ठे : अनुक्रमे ३४३ व ३३२

मूल्य : प्रत्येकी ३६०/- रुपये दोन्ही पुस्तकांचे एकूण मूल्य: ७२०/- रुपये

आगळेवेगळे ऐतिहासिक पुस्तक ☆

भाग – १

या भागात ७० लेख आहेत.

बादशहा-सुलतानांच्या राजे-रजवाड्यांच्या किंवा सत्तासंघर्षात, मोहिमांत आणि जीवनशैलीत प्राण्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे.

रणभूमीवरील लष्करी डावपेच असोत, प्रत्यक्ष लष्करी हालचाली असोत, शत्रूला गाठण्यासाठी लांबवरच्या मजला पार करायच्या असोत, नाहीतर युद्धाची गतिमानता वाढवणे असो-घोडदळाशिवाय हे शक्य नाही.

हजारो शत्रुसैनिकांची फळीच्या फळी उद्ध्वस्त करून निर्णायक विजय प्राप्त करण्यासाठी सोंडांना धारदार शस्त्रे लावलेल्या गजदळाशिवाय पर्याय नाही.

कच्छ व राजस्थानसारख्या उष्ण हवामान असलेल्या वाळवंटी प्रदेशातून जलदगतीने मजला पार करून शत्रुसैन्यावर अचानक हल्ला चढवण्यासाठी उंटांसारख्या वाळवंटातील जहाजांना पर्याय नाही.

प्रत्यक्ष रणभूमीवर दारूगोळ्याचे गाडे, अवजड तोफा ओढून आणून सैनिकांना मदत करणारी गाढवे-खेचरे किंवा सैन्यातील सरदारांचे सामानसुमान, कापडी तंबू, धान्य, गवत, जनानखाना वगैरे शेकडो कोस ओढत नेणारे ओझ्याचे बैल आणि प्रसंगी सैनिकांच्या पोटातील भूक भागवण्यासाठी प्राणार्पण करणारे कित्येक प्राणी यांचे इतिहासातील योगदान नाकारणे योग्य आहे का ?

या निष्पाप जीवांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेणारे राज्यकर्ते व त्यांचे सरदार यांच्यावर ग्रंथ लिहिले गेले. परंतु अबुल फजलचा अपवाद वगळता असे किती ग्रंथकार होते की, ज्यांनी प्राण्यांच्या आयुष्यावर इतक्या तपशिलाने लिहिलेले आहे? ही कमतरता दूर करण्यासाठी व प्राण्यांच्यासंबंधी इतरही ऐतिहासिक माहिती मिळवण्यासाठी ‘इतिहासातील प्राणिविश्व’ हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

भाग – २

या भागात ७८ लेख आहेत.

राज्यकर्ते पशू-पक्ष्यांचा उपयोग फक्त रणभूमीपुरता मर्यादित ठेवत नव्हते. महत्त्वाच्या व मोठ्या व्यक्तींना ते भेट देणे व त्यांच्याकडून तशा भेटी घेणे ही एकेकाळची पद्धतच होती. मग त्यात तो प्राणी पाळीव असो किंवा जंगली असो देणाऱ्याला व घेणाऱ्याला त्याचा फारसा फरक पडत नसे.

त्यामुळे साताऱ्याचे शाहूमहाराज, पुण्याचे पेशवे, सांगलीचे पटवर्धन यांचे शिकारखाने निर्माण झाले. मुघल बादशहा अकबराचा शिकारखाना तर ‘महा’ हा शब्ददेखील तोकडा पडेल इतका मोठा व नानाविध जातींच्या, रंगांच्या व आकाराच्या पशू-पक्ष्यांनी समृद्ध होता. त्यात हजारो हत्ती, घोडे, चित्ते, उंट अन् शेकडो हरणे, पक्षी, बेडूक वगैरे होते. अकबराची हौस मोठी दांडगी होती. त्याने या प्राण्यांची उत्तम बडदास्त ठेवलेली होती. त्याकरिता हजारो लोक रात्रंदिवस राबत होते, करोडो रुपये खर्च केले जात होते, तरीसुद्धा अकबराची ‘आणखी’ची भावना काही केल्या जात नव्हती. अकबर पशू-पक्षी जसा बाळगायचा तसाच तो त्यांची शिकारही करायचा.

शाहू छत्रपती, पेशवे व पटवर्धन हेदेखील पशू-पक्ष्यांचा मोठा संग्रह बाळगायचे आणि त्या छंदातूनच शिकारखाने आकार घ्यायला सुरुवात करायचे. त्यांचे किस्से, व्यवस्था, नोंदी वगैरेंचा अंतर्भाव ‘इतिहासातील प्राणिविश्व’ या पुस्तकात आहे.

या पुस्तकात हत्तीपासून ते अगदी बेडूक-मुंगळ्यांपर्यंत सर्वांचे इतिहासात जिथे संदर्भमिळाले ते एकत्र करून ७० विषयांवर लेखन केलेले आहे. हत्ती हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई. तसेच राजेरजवाडे, सरदार, मुत्सद्दी, अमीर उमराव वगैरे धनाढ्य व मातब्बर लोकांचे ते वाहनही होते अन् करमणुकीचे साधनही होतेच. त्यामुळे या महाकाय प्राण्याची दखल अगदी सम्राट अकबरापासून ते सांगलीच्या अप्पासाहेब पटवर्धनांपर्यंत सर्वांना घ्यावी लागलेली होती. हत्ती हा प्राणी वाटतो तितका शांत, निरुपद्रवी वगैरे काही नाही, हे त्याच्या उपद्रवकथा वाचल्यानंतर लक्षात येते. त्याच्यात जसे गुण आहेत तसेच अवगुणही आहेत. पण मानवाने त्याच्यातील गुणदोषांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थाकरिता कसा करून घेतला हे लढाऊ हत्तींच्या किश्शांवरून लक्षात येते. मराठ्यांच्या सैन्यात हत्ती होते, पण ज्याला गजदळ म्हणतात ते नव्हते. उलट मुघलांच्या फौजेत गजदळाला फार महत्त्व प्राप्त झाले होते, किंबहुना लढाऊ हत्ती शत्रुसैन्यावर सोडून त्यांची दाणादाण उडवण्याचा तो रामबाण उपाय होता. चोखंदळ वाचकांना सैन्यातील लढाऊ हत्तींचे गजदळ कसे होते, कशा पद्धतीने त्याचा वापर केला जात असे वगैरेची कल्पना यावी म्हणून इतिहासातील अनेक प्रसंग संदर्भासह या पुस्तकात दिलेले आहेत. घोडा व उंट यांच्यासारखे जलदगतीने धावणारे प्राणीसुद्धा माणसाने सोडलेले नाहीत. त्यांनाही त्याने आपली वाहने बनवली. वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकारीच्या पद्धती, गाढवाचा नांगर किंवा इतिहासातील घोरपड प्राणी की साधन याबद्दल विस्तृत विवेचन दिलेले आहे. तसेच हत्ती, उंट, चित्ते, शिकारखाने यांचा सरंजाम, सेवकवर्ग, आहार, वगैरे बाबींचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. वन्यजीवनाच्या रक्षणार्थ नानासाहेब पेशव्यांना लिहिलेली दोन पत्रेही यात समाविष्ट केली आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर माणसाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरिता वेगवेगळ्या प्राण्यांनी दिलेल्या योगदानाचा हा आढावा आहे. तो माहितीपूर्ण आहे, त्यांत रंजकता आहे, नुसताच तलवारींचा खणखणाट अन् तोफा-बंदुकांचा दणदणाट नाही, तर त्याला लढाऊ हत्तीच्या आक्रमकतेची जोड लाभलेली आहे. सम्राट अकबरासारख्या राज्यकर्त्यांच्या कल्पकतेची साथ लाभलेली आहे, पेशवे व पटवर्धन यांच्या ऐश्वर्याची झलक दिसत आहे.

— — 

लेखक महेश तेंडुलकर यांचे मनोगत – – 

इतिहास व प्राणी यांचे एक वेगळेच नाते या पुस्तकाच्याद्वारे उलगडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा विषय नवा आहे, विषयाची मांडणीही नवी आहे आणि विषयातील माहितीसुद्धा बरीचशी नवीन आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी, पक्षिप्रेमी, प्राणिमित्र इत्यादी प्रेमळ मंडळी या पुस्तकाचे जोरदार स्वागत करतील अशी अपेक्षा बाळगतो.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments