सुश्री नीला महाबळ गोडबोले
जीवनरंग
☆ आष्टा – इस्लामपूर… ☆ प्रस्तुती – सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆
“ए ,ते बघ आष्टा-इस्लामपूर ” .. बाळीनं मला कोपरानं ढोसलं.. आम्ही दोघी त्यांना पाहून हसू लागलो..
बाळी माझी जवळची मैत्रीण.. अतिशय खोडकर, मिश्कील.. “सा-या दुनियेची मस्करी करण्यासाठी त्या आकाशातल्या देवानं आपल्याला भूतलावर पाठवलय”.. अशी पक्की खात्री असणारी. शाळा नि कॉलेजातले आदरणीय गुरूजनही तिच्या तावडीतून सुटले नव्हते.. मग हे “आष्टा-इस्लामपूर” कसं सुटावं?
झालं होतं असं की… मे महिना संपत आलेला होता.. आमची परीक्षा नुकतीच संपली होती. माझ्या ताईनं महाबळेश्वरची टूम काढली.. MTDC चं बुकिंगही केलं. त्यामुळे आम्ही महाबळेश्वरला आलेलो.. आम्ही बहिणी.. आमच्या आया-काकवा.. वगैरे..वगैरे. बाळीही आमच्या कुटुंबातलीच.
संध्याकाळी बॉम्बे पॉईंटला पोहोचलो.. सूर्यास्त पहायला.. सगळे सूर्यास्त पहात होते.. पण तारुण्याच्या बहरात असलेल्या माझं नि बाळीचं लक्ष मात्र तिसरीकडेच होतं… नुकतच् लग्न झालेली जोडपी हातात हात घालून, एकमेकांना खेटून फिरताना पहाताना मजा वाटत होती.. नि कुठेतरी पोटात गुदगुल्याही होत होत्या..
हातभर बांगड्या, मेंदीने रंगलेले तळवे, खरंतर वेणीची सवय असणारे पण हनीमूनला आल्याने मोकळे सोडलेले केस.. तेलाच्या सोबतीनं वेणीच्याच वळणाला जाणारे… मुद्दाम मधुचंद्रासाठी नवरोबानं खरीदलेली जीन्स नि त्यावरचा भडक रंगाचा टॉप.. तिला या असल्या कपड्याची सवय नसल्यानं खांद्यावरून ओघळणा-या टॉपला सतत जागेवर आणण्यात गुंतलेली ती, लग्नासाठी विकत घेतलेल्या उंच टाचेच्या वेलवेटच्या चपला नि तंग पॅंट यात अवघडून चालणारी .. हनिमूनला आलोय तर बायकोच्या अंगचटीला येणं हे कर्तव्य समजणारा तिचा गुलाबी शर्टातला नवरा.. नि या सगळ्यानं कसनुसा झालेला फेअर अँड लवली लावून पांढरा केलेला तिचा चेहरा..!!
हे “आष्टा- इस्लामपूर “… खेडवळपणाचं नि इनोसन्सचं बाळीने ठेवलेलं नाव.. आमचं मिरजही काही मोठं गाव नव्हे… पुण्या-मुंबईसारखं.. तशा आम्हीही खेड्यातल्याच.. पण अंगचा आगाऊपणा स्वत:ला फार ग्रेट समजणारा.
त्या जोडप्यांची यथेच्छ टर उडवून झाली..
“आपण नाही हं असलं नव-याबरोबर हनीमूनला जायचं..” प्रतिज्ञाही करून झाली..!!
त्या बॉंबेपॉईंटवरच्या भेळ, आईस्क्रीमवर ताव मारून हॉटेलवर परतलो.. महाराष्ट्र वीज मंडळाच्या कृपेने कॅंडल लाईट डिनरचा आनंद उपभोगला..
दुसर्या दिवशी सकाळी विल्सन पॉईंटचा सूर्योदय.. इथे मात्र “आष्टा-इस्लामपूर”ची अनुपस्थिती.. सकाळच्या गुलाबी थंडीतला एकमेकांचा एकान्त सोडून ते त्या रोज उगवणा-या सूर्याला बघायला कशाला मरायला येतायत !!
पण आम्हा दोघींना मात्रं चुकल्या सारखं झालं..!!
त्या दिवशी इतरही अनेक पॉईंट्स पाहिले.. प्रत्येक ठिकाणी माकडांचे नि “लवबर्ड्सचे थवे”… फार मजा आली.. दुपारी दोनला पोटात ओरडणा-या कावळ्यांना गिरीविहार हॉटेलमधे शांत केलं..
हॉटेलमधे गेल्यावर समस्त मंडळी “आता आज कुठेही बाहेर पडायचं नाही” ..म्हणत मेल्यासारखी झोपली..
मला नि बाळीला काही झोप येईना.. बाहेर पडलो.. नि वाट फुटेल तिकडे चालू लागलो.. “लॉडविक पॉईंट” बोर्ड दिसला.. पावलं तिकडे वळली.. नाहीतरी सकाळी हा पॉईंट पाहिला नव्हताच..
मातीची अरूंद पायवाट.. डोंगराच्या उंच सुळक्याकडे नेणारी.. दोन्ही बाजूला द-या.. सारं काही हिरवंगार.. मन नि डोळे तृप्त करणारं.. हिरवीगार जमीन, हिरवेगार डोंगर-द-या नि काळ्याभोर ढगांनी भरलेलं निळं-काळं आभाळं… रंगाची नुसती उधळण..!
“निले, आष्टा-इस्लामपूर ” ..बाळी ओरडली..
खरच एक नाजुकसं, नवथर जोडपं जितकं बिलगता येईल तेवढं एकमेकांना बिलगून चालत असलेलं.. तिचा लालबुंद टॉप नि त्याचा पिवळा शर्ट.. हळदीकुंकवाला लाजवेल असा.. एवढे दिवस फक्त सिनेमात पाहिलेलं प्रणयदृश्य असं लाईव्ह पहायला मिळाल्यावर आम्हाला वेड लागायची पाळी आली.
एवढ्यात टपटप आवाज येऊ लागला..नि त्यामागोमाग खरपूस मृद्गंधानं लावलेली हजेरी.. थेंबांचं रूपांतर धारांत झालं तसं ती त्याच्या कुशीत शिरली.. नि .. बाळीनं जोरदार आवाजात सुरू केलं..
“बरसातमें हमसे मिले तुमभी सनम तुमसे मिले हम.. बरसातमे..”
“ताक धिना धिन..”. .मी ही री ओढली..
त्या जोडप्यानं चमकून मागे वळून पाहिलं.. नि ते दोघेही लाजरं- बावरं हसले नि थोडे दूर झाले.. आमची हसून हसून पुरेवाट..
“रिमझिम गिरे सावन”, “गेला मोहन कुणीकडे” असली येत होती नव्हती तितकी आमची पावसाची युगुलगीते म्हणून झाली .. नि त्यांचं पावसात नि लाजेत नखशिखांत भिजून झालं..
त्यांचं ठीक होतं.. पण आमचं आपलं कोरडचं भिजणं.. त्यातून मला प्रचंड सर्दी-खोकला झालेला.. शिवाय अशा निर्मनुष्य ठिकाणी दोघींनी पावसात थांबणं सुरक्षित वाटेना..
“बाळे, चल परत जाऊया..”
“अगं पण अजून पॉईंटवर कुठे पोहोचलो ? तिथून प्रतापगड छान दिसतो म्हणे.. जाऊया गं पुढे !!” बाभळीच्या शब्दकोशात भीतीतला “भ” ही नसलेला.. नि भीतीशी माझी गट्टी !!
“मी चालले” .. आकाशात चमकणा-या विजांकडे पहात मी वळले..
“दुसरे दिवशी पुन्हा इथे यायचं” असा तहनामा करून आम्ही परत निघालो नि हॉटेलवर येऊन सा-यांच्या शिव्या पोटभर खाल्ल्या..
“चला, लॉडविक पॉईंटला जायचंय” रात्रीच्या वाक्यज्ञानाला न जुमानता बाळीनं फर्मान काढलं.. सगळे तयार होतेच.. लॉडविक पॉईंट गाठला.. फारच गर्दी होती आज.. भरभर सुळक्यावर पोहोचलो.. सुळका पोलिसांनी भरलेला..
पंचनामा सुरू होता..
आदले दिवशी संध्याकाळी वीज पडून एक जोडपं जागीच गेलं होतं.. मरणानंतरही एकमेकांच्या कुशीत विसावलेलं ते जोडपं कालचं “अष्टा-इस्लामपूर”चं होतं..!!
दरवर्षी मे महिना येतो.. आकाश भरून येतं.. पावसाबरोबरच विजांचं तांडव सुरू होतं..
नि..
“आष्टा-इस्लामपूर” डोळ्यांसमोरून हालता हलत नाही…!!
© सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
फोन नं. 9820206306, ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




