श्री आनंदहरी

? जीवनरंग ?

 ☆ सुगी… भाग-१ ☆ श्री आनंदहरी 

रानात पावसानं पार रेंदा केलावता.. आषाढ संपला तरी पाऊस थांबायचं काही नाव घेत नव्हता. चार चार दिवस सूर्य दिसत नव्हता.. भिकाजी सोप्यात बसला होता. सोप्यात बसून बसून कंटाळला होता.. असे घरात बसून राहणं त्याच्या स्वभावात नव्हतं. काम असो वा नसो रानात फेरफटका मारायचा रानातल्या खोपीत जायचं. मावळतीलाच घरला परतायचं.. घरला आलं की बैलांपुढे वैरण टाकायची, म्हसरांसमोर भरडयाची पाटी सरकवायची. म्हशींनी फुsस फूsस करत भरडा खायला जुपी केली की उकिडवे बसून धार काढायची.. रेडकू सोडून म्हस पानावली की कासांडीतल्या पाण्याचा शिपकारा मारून आधी सगळी कास अन मग एकेक थान स्वच्छ धुवून घ्यायचं. दुमडलेला अंगठा आणि वळवलेल्या चार बोटात धरून एकेका थानातनं दुधाची धार तांब्यात घ्यायची. तांब्या भरला की कासांडीत ओतायचा.. तीन थानं पिळून झाली की मेढीला बांधून ठेवलेलं रेडकू सोडायचं. कासांडी किटलीत ओतायची की मग दुसऱ्या म्हशीची धार..

धारा काडून झाल्या की किटलीतलं थोडे दूध घरात ठेवून राहिलेलं दूध डेरीत घालायला. भिवा गावात जायचा. तिथं कोणतरी भेटायचं, बिडी बहाद्दर असला तर बिडी फुडं करायचा.. किंवा ‘ काड बिडी.. ’ म्हणायचा. भिवाजीला फक्त बिडीचा नाद.. मग बिडीचं झुरकं मारत पारभर हिकडल्या-तिकडल्या गोष्टी व्हायच्या.. त्याचा रोजचा हा नेम होता पण पाचसहा महिन्यापासून त्याने स्वतः गावातल्या डेरीत जायचंच बंद केलं होतं. सुमी नाहीतर धाकली रमी दूध घालायला जात होत्या.

धारा काडून कासांड्या सुमीला हाळी मारून तिच्या हातात दिल्या आन गोठ्यातल्या माचावर भितीला पाठ टेकवून बसत भिवानं कोपरीच्या खिशातनं बिडीबंडल आन काडीपेटी काढली. बिडी पेटवून झुरका घेतला आन त्याला किटली घेऊन डेरीत निघालेली पाठमोरी सुमी दिसली.. त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या काळजीचा धूर दाटू लागला. ‘कसं हुयाचं पोरीचं? ‘ या प्रश्नाची वलयं विरळ होत जाण्याऐवजी दाट होत मनाला अस्वस्थ करू लागली.

सुमीचं लग्नाचं वय झाले तसं पावनं बगाय याला लागलंवतं. सुमी गोरीपान, देखणी.. कुणालापण आवडावी अशी होती. त्यामुळे तिच्या लग्नाची काळजी अशी त्याला कधी वाटली नव्हती. गावातले, पावण्या-पैतले कुणाला तरी स्थळ सुचवायचे, पावण्यांना बगायला घेऊन यायचे.. दोन-तीन स्थळं आली पण जुळले नाही.. कधी एक नाड आली तर कधी आणखी काही. लांबचा पण जाणं -येणं असणारा पावणा एक स्थळ घेऊन आला.. पोरगं-घरदार चांगलं होतं. सगळ्यांना आवडलं. द्या-घ्यायचं बोलणं झालं. ‘ याद्या कराय येतो ‘ म्हणून पावणं माघारी गेलं. भिवा, सगळं घर खुशीत होतं.

सगळ्या गावात बातमी पसरली.

याद्याचा दिवस उजाडला. घरात सगळ्यांची तारांबळा उडाली होती. लग्न ठरल्यातच जमा होतं. याद्या फक्त रीत म्हणून लिहायच्या होत्या. पावण्याकडची पंधरा-वीस जणं आन भावकीतली, घरची तेवडीच.. शिरा-भाताचा बेत केला होता. भावकीतल्या चारजणी मदतीला आल्या होत्या. पावखाणं आलं तेव्हा जेवायची येळ झालीवती.

“ पावणं, संमदं ठरल्यालंच हाय, निस्तं कागदाव उतरायचं हाय.. मंग मी म्हंतो जेवाय येळ कशापायी करायचा..? आगुदर दोन घास खाऊन घेऊया आन मग करू की याद्या.. कसं? “ भिवाचा चुलत भाऊ, भावकीतल्या सगळ्या लग्नांतला कारभारी मध्यस्थाला म्हणाला. माध्यस्थानं पोराच्या बापाला विचारलं.. होकार आला तशी जेवणं झाली.

पावण्यांनी याद्याचा म्हौरत काडून आणलावता.. त्याला वेळ होता. शिळोप्याच्या गप्पा सुरू झाल्या. बिडी-तंबाखूची देवाणघेवाण सुरू झाली. पोराची बहीण सुमीला म्हणाली ‘ चल, ’ सुमीला काही समजेना. पोराची बहीण सुमीपरास थोरली.. दोनतीन सालामागं लग्न झालेली.

“ चल, पड्याल चुलत्याचं घर हाय न्हवं.. जाऊया.. ”

मदघरात बसलेली ती पावणी सुमीला म्हणाली आणि पिशवी घेऊन, सुमीच्या आईला ‘ पल्याडनं येतोच ‘म्हणत मागच्या दारानं बाहेर पडली. नवऱ्याचीच बहीण म्हणल्यावर कशाला काय विचारायचं? असा विचार करून सुमीच्या आईनं हसून मान डोलावली.

सुमीला काही समजलं नव्हतं तरीही ती पावणीसोबत गेली. चुलत्याचा घराला कडी होती ती काडून दोघी आत गेल्या.

“ दादाला तुला नऊवारी लुगड्यात बगायचं हाय.. ह्ये नऊवारी लुगडं दिलंय त्येनं.. तुज्यासाठनं खास ‘’

हातातल्या पिशवीतनं जांभळ्या रंगाचं नऊवारी लुगडं काढत पावणी हसत म्हणाली.

सुमी लाजली.

“ आगं बग तरी.. पास न्हाय का तुला..? ”

सुमी गडबडली..

“ पास हाय मला.. ”

“ लुगडं का दादा “

पावणीने मस्करी केली. सुमी लाजून चुर झाली.

“ आगं, वर बग तरी.. का दादाला सोडून कुणाला बगायचं बी न्हाय? “

“ ताईसाब …”

“ बरं, नेस ही.. ”

“ पर ताईसाब, मी कवा नेसलं न्हाई नऊवारी “

“ मी हाय की.. ”

नऊ वारी नेसवताना पावणी मध्येच थांबली.

“ वाईच थांब.. आलेच. ”

दार ओढून घेऊन पावणी थेट सोप्याकडं आली. तिने सोप्यात बसलेल्या भावाला खुणेने बाहेर बोलावले. त्याच्या कानात खुसफूसली. नवऱ्या मुलाने बापाला बोलावून काहीतरी सांगितले. बापाने मध्यस्थाला आणि मध्यस्थानं सुमीच्या चुलत्याला सांगितलं. पावण्याकडच्या बायकातही कुजबुज सुरु झाली.. सुमीची आईनं चुलतीला नजरेनेच खुणावलं अन पळतच पलीकडे गेली. पावणी लुगडं नेसवता नेसवता मध्येच बाहेर कशासाठी गेली हे न उमजून सुमी गोंधळून गेली होती..

“ काय झालं गं? “

आत जाता जाता सुमीच्या आईने विचारलं..

“ त्येनी नऊवारी लुगडं आणलंया.. ताईसाब ती नेसवत हुत्या.. मदीच भायेर गेल्यात.. ती आजूनबी आल्या न्हायती.. ”

“ बरं, तू ये लगुलग.. ”

आई परत येईपर्यंत पावणे उठून निघालेवते.

“ पोरीच्या अंगाव पांढरा डाग हाय.. तुमी फसवलंसा. आगुदर सांगितलं आस्तं तर आमी आलोच नस्तो. “

सुमीचं लग्न ठरल्याचा आनंद क्षणात मावळला होता.

“ आर, भाव हाय मी तुजा, मला तरी सांगायचं हुतंस.. ” कारभारी भाऊ भिवाला म्हणाला

“ मला का बोल्ली न्हाईस? ” भिवा बायकोवर चिडला.

“ सुमे, मला का दावला न्हाईस डाग? ”

सुमीची आई सुमीवर चिडली.

“ कंचा डाग? “

पाहुणे लग्न मोडून गेलं हे समजल्यावर सुन्न झालेल्या, रडू आलेल्या सुमीने विचारले..

सुमीच्या कमरेच्या जरा खालच्या बाजूला हरभऱ्यापेक्षा लहान पांढरा डाग होता पण सुमीच्याही तो लक्षात आला नव्हता. झाल्या प्रकारानं सारे घर सुतकात असल्यासारखं सुन्न होतं. सुमीच नव्हे तर भिकाजी सुद्धा कोलमडून पडला होता..

सुमीचं लग्न मोडलं हे साऱ्या गावभर झालं होतं.

कुठं कुणी भेटला की पहिले सुमीचं लग्न मोडल्याबद्दल विचारायचा.. त्या विचारण्यात आपलेपणा, सहवेदना किंवा काळजी नसायचीच. , दुसऱ्याच्या जखमेवरच्या खपल्या काढण्यात लोकांना काय आनंद मिळतो.. कुणास ठाऊक?

भिकाजी या साऱ्याला त्रासला होता. त्यांन रानाची वाट धरली होती.

सुमीच्या आईने सुमीची समजूत घातली.. तिला धक्क्यातून सावरली होती.. काळ हेंच सगळ्यावरचं औषध असतं,.. निदान बाह्यांगी तरी सुमी सावरली होती. पण भिवाजी मात्र गावात जायचं थांबला होता ते थांबलाच होता..

त्याला सुमीचं लग्न मोडल्याचे दुःख होतेच पण त्याहीपेक्षा जास्त ‘ सुमीच्या आयुष्याची काळजी जास्त होती. त्या विचाराने मन भिरभिरत होतं..

बाईच्या जातीला डाग लावायला तिळाएव्हढं निमित्त पुरतं इथं तर हरभऱ्याएवढा डाग होता. वडाची साल पिंपळाला लावण्याच्या लोकांच्या वृत्तीमुळे सुमीचं लग्न नाही झालं तर रमीचं लग्न ठरण्यात अनंत अडचणी येणार होत्या हे त्याला जाणवत होतं. हीच काळजी त्याला रात्रंदिवस खात होती. कुठंही असला तरी तो आपल्याच विचारात असायचा. बायकोने कितीदा तरी त्याला सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यात फरक पडला नव्हता.. त्या बिचारीला ती आणखी एक काळजी लागलेली होतीच.

– क्रमशः भाग पहिला

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments