मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आज 31 डिसेंबर 2023, उद्या एक जानेवारी 2024… दोन दिवसातलं अंतर फक्त 24 तासंच…. या दिवसापासून त्या दिवसाकडे पोहोचायला मात्र वर्षभर वाट पहावी लागली… ! 

शिखरावर जाऊन झेंडा रोवायचं काम फक्त एक मिनिटाचं… पण त्यासाठी जीव धोक्यात घालून अख्खा डोंगर चढायला लागतो, तसंच काहीसं हे…! 

झेंडा रोवण्यापेक्षा जीव धोक्यात घालून तुम्ही कसे चाललात हे जास्त महत्त्वाचं….! 

किनाऱ्याशी आल्यावर, किनारा आणि नाव यामध्ये अंतर फक्त एका पावलाचं असतं… पण त्या अगोदर अख्खी नदी पालथी घालताना; वल्ही मारून धाप लागलेली असताना, तुम्ही कसे तरलात हे जास्त महत्त्वाचं…!!

एखाद्या ठिकाणी पोचण्यापेक्षा, पोचण्यासाठी केलेला प्रवास, वाटेत आलेल्या अडचणींचा सामना म्हणजे आयुष्य…! 

आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? तर ज्ञान आणि भान… 

कोणत्या वेळी काय करावं, याचं “भान”म्हणजे “ज्ञान”…

आणि कोणत्या वेळी काय करू नये, याचं “ज्ञान” म्हणजे “भान”…! 

गाडी जोरात पळवायची असेल तर काय महत्त्वाचं ?एक्सीलेटर ??…मुळीच नाही…! 

गाडी जोरात पळवायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्रेक…! 

निष्णात ड्रायव्हर, गाडी सुरू केल्यानंतर पहिल्यांदा चेक करतो तो ब्रेक…

थांबण्याची खात्री असेल, तरच त्या जोरात पळण्याला अर्थ आहे…  ब्रेकच नसेल तर पुढे जाऊन आदळणार हे नक्की…

गाडी चालवणं हे झालं “ज्ञान” आणि योग्य वेळी ब्रेक दाबून थांबणं हे झालं “भान”…! 

ज्ञान आणि भानाचं समीकरण एकदा कळलं की आयुष्यातलं गणित सोपं होवुन जातं….

ज्ञान असूनही भान हरवलेली किंवा भान असूनही ज्ञान नसलेली अनेक मंडळी या वर्षभरात मला भेटली… अनेक भले बुरे अनुभव आले आणि मी त्यातून समृद्ध होत गेलो. 

अनेक भल्या भुऱ्या गोष्टी या वर्षाने माझ्या झोळीत घेत गेलो….

डिसेंबर महिन्यात आपल्या साथीने घडलेल्या घटनांचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…

भिक्षेकरी ते कष्टकरी

  1. थंडीसाठी स्वेटर विणायला घ्यावं आणि थंडी निघून गेली तरीही काही कारणानं ते अपूर्णच राहावं… अशी अनेक अपूर्ण आयुष्यं आजूबाजूला दिसतात…

अशीच एक प्रौढ महिला….

बालपण आणि तरुणपण काबाडकष्ट करून आई-वडिलांना जगवण्यात गेलं…. कालांतराने आई वडील गेले; पुढे हिला अपंगत्व आलं. 

कुणी नोकरी देईना आणि स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल नाही…. शेवटी नाईलाजाने जगण्यासाठी शनिवार वाडा परिसरात भीक मागायला सुरुवात केली. 

28 डिसेंबर रोजी छप्पर असलेली एक हातगाडी आणि विक्री योग्य सामान तिला घेऊन दिले आहे, ती आता त्या गाडीत बसून व्यवसाय करुन सन्मानानं जगते आहे. 

चला, बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वेटर आज तुम्हा सर्वांच्या साथीने या थंडीत विणून पूर्ण झालं….! 

  1. चार अंध ताईं आणि एक दादा यांना या महिन्यात नवीन वर्षाचे कॅलेंडर विकायला दिले. यांचं”न्यू इयर”…” हॅप्पी” करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न…!
  2. सध्या जातीवरून”राजकारण” सुरू आहे, आम्ही जातींचा उपयोग करुन”समाजकारण” करत आहोत…

चर्मकार समाजाचे एक आजोबा रस्त्यात भीक मागत आयुष्य जगत होते, त्यांना चप्पल विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

नाभिक समाजाचे दुसरे आजोबा रस्त्यावर भीक मागत होते, त्यांना केश कर्तन आणि दाढी कटिंगचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

ज्या ठिकाणी हे लोक भीक मागतात…. शक्यतो त्याच ठिकाणी मी त्यांना व्यवसाय टाकून देतो…. 

ज्या मातीत हजारदा आयुष्याची कुस्ती हरलो…. त्याच मातीत, त्याच जागेवर जिंकण्याची नशा काही और असते…! 

जमिनीला पाठ लागली म्हणुन कुणी हरत नसतं… पडूनही न उठणं म्हणजे हरणं….! 

वरील आठही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं समाधान घेवून आम्ही 31 डिसेंबर साजरा करत आहोत. 

आयुष्यातलं आणखी एक वर्ष संपलं…. ???  संपू दे…. . पर्वा कुणाला….? 

आठ नवीन आयुष्यं उभी राहिली या नशेत आम्ही अजून झुलतो आहोत…! 

– क्रमशः भाग पहिला  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

धागेदोरे तीनशे पासष्ट दिवसांचे, विणतो आपण …. 

सुख दुःखाचे, प्रेमाचे, आनंदाचे,

मैत्र जोडतो, कधी फटकारतो, रुसतो, भुलतो,

कधी ताणतात, कधी सैलावतात, बंध‌ नात्याचे,

 

पौष घेऊन येतो संक्रांत,

” तिळगुळ घ्या अन् गोड बोला म्हणत.”……..

हळदीकुंकू वाण, दागिने हलव्याचे, आणि रथसप्तमी सूर्याची आराधना,

 

येई फाल्गुन .. … प्रेमरंगात रंगे रंगपंचमी,

भलेबुरे जाळायला होळी,

 

चैत्राची पालवी फुटली, गुढीपाडव्याला गुढी उभारली,

गुढी ऐक्याची, सद् भावाची, देशभक्तीची,

सुरु होतं हिंदू नववर्ष,

चैत्रागौर, हळदीकुंकू, डाळ, पन्ह, उसळ हरभऱ्याची,

 

हापूस, पायरीचे आगमन, घरोघरी आमरस पुरीचे जेवण,

वैशाखाचे रणरण ऊन,

परीक्षा,अभ्यास, सुट्टी, निकाल, धामधुम,

 

पावसाची चाहूल, रिमझिम, रिपरिप,

कृषीवलांची‌ लगबग, नांगरणी, पेरणी,

मुलांची सुट्टी संपली, शाळा, कॉलेज, रेनकोट,छत्री, पुस्तक,वह्या, गणवेश,

 

जेष्ठाचे आगमन,… ललनांची‌ वटसावित्री,

आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत, येणारा मेघदूत,

निसर्गपूजा, बैलांचे कौतुक बैलपोळा.. 

 

श्रावण आला, पूजा नागोबाला…. 

सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौरी,

बृहस्पति पूजा बुधवारी, शुक्रवारी लक्ष्मी येई घरी,

शनिवारी मुंज मुलांना जेवण, रविवारी आदित्यांचे पूजन,

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भावाबहीणीच गठबंधन,

रोज गोडधोड … खीर, दींड, पुरणपोळी, नारळीभात, खांतोळी, पेढे,बर्फी, मेवामिठाई,

मसालेभात, कटाची आमटी, भजी, वडे डाव्या बाजूला,

 

पाठोपाठ गणराया आला … सुशोभन, रांगोळी 

गणेशाचे आगमन …. पूजा आरती,मंत्रपुष्पांजली … आली,आली मोदकांची थाळी,

 

अश्विनात विजयादशमी … लगेचच येणार दिवाळी,

आकाशकंदील, किल्ला… फराळाचा हल्लगुल्ला,

वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज,

पाहुण्यांची लगबग, तुळशीच लग्न, घरच्या लग्नांचे मुहूर्त, “शुभमंगल सावधान”,

 

मार्गशीर्षातल्या गुरुवारी श्रद्धेने पूजन, उपवास करिती महिला,

म्हणेतो,येतो नाताळ, तो साहेबाचा … परिणाम थोडा गुलामीचा,

 

असे संपतात बारा महिने, संकल्प राहतात अधुरे,

पुन्हा नववर्ष, नित्य,नवा हर्ष, उभारी, नवे संकल्प, उत्साहाचे वारे  

 

जीवनाचं हेच असे सार … 

इंग्रजी महिन्यातच जगतो, तरी मराठे महिने जगवूया,

ते पाठ‌ करण्याचा संकल्प करुया,

 

इतकीच छोटीशी इच्छा,

….. नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा……

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-2 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-2 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

राजा नीलकंठ बढे उर्फ कवि-गीतकार राजा बढे यांची एक कविता गदिमांच्या वाचनात आली. सुंदर कविता होती. पण खाली लेखकाचे नाव होते –  ‘रा. नि. बढे’. आधी गदिमांना लक्षात येईना की, हे कोण लेखक? मग आठवले की, अरे हे तर आपले ‘राजा बढे’. पुढे त्याच सुमारास राजा बढे पंचवटीत आले. त्या वेळी गजाननराव वाटव्यांचे ‘राधे तुझा सैल अंबाडा’ हे गाणे गाजत होते. त्या चालीवर त्यांना बघताच गदिमा गमतीदारपणे मान डोलावत म्हणू लागले…

“कुणी ग बाई केला? कसा गं बाई केला?

आज कसा राजा बढे, रानी बढे झाला?”

गंगाधर महांबरे म्हणून कवी, गीतकार होते. त्यांचे कौतुक करताना गदिमा एकदा खणखणीत आवाजात गर्जून गेले, ”जय’नाद निनादती अंबरे, जय जय गंगाधर महांबरे”!

एकदा गदिमांच्या एका कोल्हापुरी मित्राने त्यांना चक्क व्यवसाय करायची गळ घातली. साधासुधा नाही तर चक्क पोल्ट्री फार्म काढायचा म्हणून! मराठी चित्रपटसृष्टीत तसा पैश्याचा खळखळाटच असायचा. त्यांनी असे काही चित्र रंगविले की, गदिमा त्याला तयार झाले. घरात बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर मराठी माणसाने एक मोठा उद्योजक होण्याची स्वप्ने पहायला सुरवात केली. नशिबाने ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’ असे नाव नाही दिले. पण त्या काळात गदिमांनी चक्क १०, ००० रुपये तरी त्या गृहस्थांना दिले असतील. ५-६ महिने असेच गेले असतील. गदिमा आपल्या कामात व्यस्त होते. श्रावण महिन्यातील मुहूर्त काढून हे गृहस्थ एकदा ३-४ डझन अंडी घेऊन घरी आले, ‘अण्णा, ही आपल्या फार्ममधली अंडी!’ श्रावण असल्यामुळे सर्वच्या सर्व अंडी नोकरचाकरांना देऊन टाकावी लागली! असेच पुढे काही महिने गेले व गृहस्थ रडत आले की, ‘अण्णा अमुक तमुक रोग झाला व सर्व कोंबड्या मरून गेल्या!’ झालं. गदिमांची व्यावसायिक होण्याची स्वप्ने धुळीस मिळाली व महाराष्ट्र एका मोठ्या पोल्ट्री उद्योजकाला मुकला!.

गदिमांनी १९७७ साली ललित मासिकाच्या दिवाळी अंकात ‘ए. क. कवडा’ या टोपण नावाने मराठीतील २० सुप्रसिद्ध लेखकांवर विनोदी बिंगचित्रे लिहिली होती. त्या वेळच्या प्रसंगानुसार किंवा एकूण त्या लेखकाच्या व्यक्तिमत्वानुसार दोन-चार विनोदी ओळी व त्या लेखकाचे व्यंगचित्र असे त्याचे स्वरुप होते. ती खूप गाजली व हा “‘ए. क. कवडा’ नक्की कोण?” अशा चर्चा रंगायला लागल्या होत्या. संपादकांना विचारणा झाल्या. पण नाव काही कोणाला कळाले नाही. डिसेंबर १९७७ मध्ये गदिमांचे निधन झाल्यावर संपादकांनी शोकसभेत जाहीर केले की, ‘ए. क. कवडा’ म्हणजे ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन होते. ‘

यातली काही स्मरणात असलेली निवडक बिंगचित्रे तुमच्यासाठी खास!

पु. ल. देशपांडे मराठीतील एक दिग्गज लेखक! त्यांचे बंगाली भाषेवर पण तितकेच प्रेम होते. त्यावर गदिमा भाष्य करतात,

“पाया पडती राजकारणी, करणी ऐसी थोर 

मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर”

गो. नी. दांडेकर तर दुर्गप्रेमी!  चालायची पण त्यांना विलक्षण आवड होती. त्यांच्याबद्दल –

“चाले त्याचे दैव चालते, चढतो, त्याचे चढते.

गळ्यात माळ तुळशीची आणि दाढी कोठे कोठे नडते!”

कविवर्य मंगेश पाडगावकर, काव्यवाचनाची त्यांची एक वेगळीच शैली आहे. त्या काळात त्यांच्या काही कविता लिज्जत पापडाच्या जाहिरातीत झळकत असत. त्यावर गदिमा चिमटा काढतात,

“तुझ्या वाचने काव्यच अवघे वीररसात्मक झाले,

घेऊ धजती इज्जत कैसी, ‘लिज्जत पापडवाले”

दुर्गाबाई भागवतांबद्दल… (त्या वेळी त्यांनी साहित्य विश्वात काहीतरी कारणावरून वादळ निर्माण केले होते!)

“जागविले तू शांत झोपल्या वाड़मयीन जगतां

दुर्गे, दुर्गे, सरले दुर्घट, आता हो शान्ता” 

(शांत स्वभावाच्या शांता शेळके यांचा उल्लेख तर नसेल!)

गोमंतक निवासी कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ज्येष्ठ कन्येने एका मद्रासी युवकासी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमार्फत मुंबईमध्ये वाढलेल्या मद्रासी लोकांविरुद्ध ”लुंगी हटाओ, पुंगी बजाओ” अशी मोहीम चालू केली होती. त्याचा कदाचित संदर्भ घेऊन त्यावर….

“बोरीच्या रे बोरकरा, लेक तुझी चांगली

गोव्याहून मद्रदेशी सांग कशी पांगली?”

रविकिरणी कवितेची थट्टा करीत गदिमा म्हणत,

“गिरीशांची ही गर्द ‘आमराई’

त्यात उघडी यशवंत पाणपोई”

स्वतःलाही त्यांनी सोडले नाही! गदिमांना गीतरामायणामुळे ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणत असत. शेवटच्या काळात ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या हातून फारसे लिखाण होत नव्हते. म्हणून स्वतःबद्दलच त्यांनी बिंगचित्र लिहिलं. गदिमांच्या हातात कुर्‍हाड घेतलेल्या व्यंगचित्राखाली लिहिले होते..

“कथा नाही की कविता नाही, नाही लेखही साधा

काय वाल्मिके, स्विकारिसी तू पुन:श्च पहिला धंदा?”

अश्या कितीतरी गंमतशीर गोष्टी, प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले होते. गदिमा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. अगदी हिमनगासारखे…. त्यांच्यात एक बिलंदर खेडूत दडलेला होता. एक सुसंस्कृत प्रकांड पंडित दडलेला होता. एक सच्चा राजकारणी दडलेला होता….. काय नव्हते… ? पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे एक खरा माणूस दडलेला होता. कधी कधी वाटते आपल्यासमोर त्यांची जी बाजू आली, त्याच्या हजारो पट ते आजही पडद्याआड आहेत.

– समाप्त–  

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ गदिमा आणि काही गंमतीशीर गोष्टी – भाग-1 – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री सुहास सोहोनी ☆

(गदिमांच्या आंघोळीच्या ‘मिशा’ ते ‘ग. दि. माडगूळकर पोल्ट्री फार्म’.) 

गदिमांच्या आयुष्यात घडलेल्या काही गंमतशीर गोष्टी, त्यांच्या काही सवयी ज्या तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील !.

गदिमांना त्यांच्या मित्रांना गंमतशीर नावांनी हाक मारण्याची सवय होती. नावांची गंमत करणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. मधुकर कुळकर्ण्यांना “पेटीस्वारी”, राम गबालेंना “रॅम् ग्याबल”, वामनराव कुळकर्ण्यांना “रावराव”, पु.भा.भाव्यांना ‘स्वामी’, पु.ल.देशपांड्यांना ‘फूल्देस्पांडे’. राजा मंगळवेढेकर यांना ‘मंगळ’, ‘राजा ऑफ मंगळवेढा’. पंचवटीत येणारा नवखा असेल तर ‘या’ असे भारदस्त आवाजात स्वागत व्हायचे. सलगीच्या लोकांना ‘क्यो गुरू’, ‘काय माकडेराव?’, ‘कसं काय फास्टर फेणे?’ असे स्वागत ठरलेले असायचे. अनेक मित्रांची अशी वेगवेगळी नावे ठरलेली असायची.

पु.भा.भावे म्हणजे गदिमांचे खास मित्र! तेही गदिमांना काही नावाने हाक मारत – गम्पटराव, बुवा, स्वामी, डेंगरु, लाल डेंगा, वुल्फ ऑफ माडगूळ, चित्तचक्षुचमत्कारिक!.. आणि गदिमांकडून चक्क त्या नावांस प्रतिसादही मिळत असे!.

त्या काळात जशी गदिमा-बाबूजी जोडगोळी प्रसिद्ध होती, तशी त्याच्या आधी एक त्रिकुट प्रसिद्ध होते – ‘लाड-माड-पाड’.. लाड म्हणजे गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड, माड म्हणजे ग.दि.माडगूळकर व पाड म्हणजे पु.ल.देशपांडे!

गदिमा आनंदात असले, कुठले काम किंवा गोष्ट मनासारखी झाली, किंवा आवडली, तर त्यांचे वाक्य असे –  ‘गुड रे, गुड गुड गुड गुड गुड गुड….’, तर कधी ‘बेस्टम बेस्ट आणि कोपरानं टूथपेस्ट!’

एकदा गदिमांचा संबंध कोल्हापूरच्या ‘उत्तमराव शेणोलीकर’ नावाच्या गृहस्थांशी आला. त्यांना हे नाव इतके आवडले की त्यांनी त्या नावाचे रूपांतर ‘उत्तमराव’ –> ‘बेष्टराव’ शेणोलीकर असे करून टाकले. घरात कुठला चांगला पदार्थ झाला की त्यांचे पेट वाक्य ठरलेले असे, ‘एकदम ‘बेष्टराव शेणोलीकर’ झाला आहे!’

गदिमांना एक फोन आला, त्यांनी स्वतःच उचलला, समोरून आवाज आला, “मला ग.दि.माडगूळकर यांच्याशी बोलायचे आहे. मी ‘सत्येन टण्णू बोलतो आहे.” गदिमांना वाटले कोणीतरी गंमत करतो आहे. त्यांनी हे आडनाव ऐकले नव्हते. ते लगेच उत्तरले, “मी माडगूळकर अण्णू बोलतो आहे, बोला!”

गदिमांनी मराठी चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले होते. ते इतके व्यस्त असत की, सकाळी एक, दुपारी एक व रात्री एक अश्या तीन चित्रपटांच्या कथा ते दिवसभरात लिहायला बसत. कधी कधी त्यात साहित्यिक कार्यक्रम असत. ते १२ वर्षे आमदार होते, त्या संबंधित कार्यक्रम असत. ते तयार होत. जाणे आवश्यक असे, पण कंटाळले की तयार होऊन म्हणत, ‘आम्ही नाय जायचा’, नाही जायचा की अजिबात नाही जायचा…’ मग अगदी मुख्यमंत्र्या॓चीही भेट ठरलेली का असेना!

बऱ्याच वेळा सकाळी उठल्यापासून मित्रांच्या बैठकी रंगत. विद्याताई मधूनच राहिलेल्या आंघोळीची आठवण करत. शेवटी गदिमा नाखुषीने उठता उठता म्हणत, ‘पाच मिनिटात आंघोळीच्या मिशा लावून येतो!’ ‘आंघोळीच्या मिशा’ हे एक गंमतशीर प्रकरण होते. एक गाणे होते गौळण खट्याळ कृष्णाला यमुनेच्या काठावर लाडिक रागाने म्हणत असते, ‘आंघोळीच्या मिषाने भिजविलेस अंग…’ पण एकदा गदिमांच्या नेम्याला (नेमीनाथ उपाध्ये उर्फ पुणे आकाशवाणीचे ‘हरबा’) प्रश्न पडला की ‘आंघोळीच्या मिशा’ कसल्या?  आणि तेव्हापासून गदिमा ‘आंघोळीच्या मिशा लावू का?’, ‘आंघोळीच्या मिशा लावून टाकतो म्हणजे सुटलो’, अशीच स्नानाच्या बाबतीत भाषा वापरत असत.

गदिमांचे एक मित्र होते ‘बाळ चितळे’ नावाचे. त्यांची एक वेगळीच तऱ्हा होती. सगळ्यांसारखे न करता वेगळे काहीतरी करायचे. उदा. सगळेजण हॉटेलमध्ये गेले आहेत व सगळ्यांनी डोसा मागविला, तर हे मिसळ मागविणार! अगदी सगळे करतील, त्याच्या बरोबर उलटे करायचे. यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आमच्या घरात कोणी असे वेगळे वागायला गेला की त्याला ‘बाळ चितळे’ ही पदवी मिळत असे!.

गदिमांना कधी कधी छोटे अगदी सर्दीसारखे आजार पण सहन होत नसत. मग अगदी शिंक आली तरी त्यांचे मरणवाक्य सुरू होई, ‘मरतंय की काय आता!’ बिलंदरपणा हा त्यांच्यात ठासून भरलेला होता. हे सर्व गुण जन्मजात माडगूळच्या मातीतून आलेले होते. एकदा माडगूळ गावात सभा झाली. सभेनंतर एकाने टेबल-खुर्ची-सतरंजी या सकट अध्यक्ष, वक्ते यांचे आभार मानले. ते आभाराचे भाषण सीतारामबापू नावाच्या सरपंचाना इतके आवडले की, पुढे बोलताना बापू आभार शब्दाशिवाय बोलेनासेच झाले. अगदी त्यांना कोणी सांगितले की, ‘अमक्या तमक्याला मुलगा झाला’. तर ते चटकन म्हणायचे, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ कोणी बातमी दिली की कडब्याच्या गंजीला आग लागली, तर बापू झटक्याने म्हणणार, ‘म्हणजे हे आभार मानायचंच काम झालं!’ शेवटी सगळ्या गावाने त्यांचे नाव ‘आभार सीताराम’ असे ठेवले होते. तर सांगायचे असे की, हे विनोदी गुण बहुतेक गदिमांना आपल्या गावाकडच्या मातीतून व माणसांकडून उपजतच मिळाले होते.

गदिमांच्या धाकट्या भावाचे लग्न होते. वऱ्हाड घेऊन मंडळी लग्नघरी गेली. नवरा मुलगा बघायला नवरीच्या मैत्रिणींची पळापळ सुरू झाली. नवरा मुलगा कुठला, हे कोणालाच माहीत नव्हते. एक कोणीतरी मैत्रीण मोठ्याने गावाकडच्या टोनमध्ये म्हणाली, ‘कोन्ता ग कोन्ता?’ झालं. पुढचे अनेक दिवस कुठल्याही बाबतीत चौकशी करायची असेल तर गदिमांचे वाक्य तयार असे ‘कोन्ता ग कोन्ता?’ एखादे वाक्य दुसऱ्याला कंटाळा येईपर्यंत लावून धरणे, हे आम्हा माडगूळकरांचे खास वैशिष्ट्य!.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री सुमित्र माडगूळकर

प्रस्तुती : सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘यात काही राम नाही’…. म्हणजे काय ? ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

यात काही राम नाही…. म्हणजे काय ?

आपण सहज जेव्हा म्हणतो यात काही राम नाही… म्हणजे काय ?

राम याचा अर्थ काय ?

राम असणे म्हणजे आनंद…

राम म्हणजे देव, दशरथ नंदन ,कोदंडधारी,  सीतापती, कौसल्याचा पुत्र, असा इतकाच त्याचा अर्थ नाही.

राम म्हणजे परिपूर्णता ,सौख्य ,सुख, विश्राम …. राम म्हणजे  आंतरिक समाधान……

सेतू बांधताना खारीने रामरायांना मदत केली .त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला .म्हणून खारुताईच्या पाठीवर रामाची बोटं उमटली आहेत…

 चांगलं काम केलं की रामराया पाठीशी उभा राहतोच..

 खारीचा वाटा आपणही उचलूया. काय करूया तर…

… एक श्लोकी रामायण आहे ते पाठ करू या .

सहज सोपं जमणार आहे आणि त्याच्याशी निगडित कायमची आठवण राहणार आहे ती आपल्या राम मंदिराची.

तर हे काम जरूर करा ही नम्र विनंती.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ रांगोळी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सकाळी लवकर ऊठून अंगणात सडा टाकायचा मग त्यावर छानशी रांगोळी काढायची असा दिवस सुरू व्हायचा•••

तेव्हा आजीला विचारले “ का गं आजी सडा रांगोळी करायची? “ तेव्हा आजीने सांगितले••••

“ या कृतीतच संसाराचे सार दडलेलं आहे गं•••

आश्चर्याने मी विचारले “ ते कसं?”

तशी आजी म्हटली, “ ते मी सांगते. पण तू मला सांग, सडा रांगोळीचे अंगण पाहिले तर तुला काय वाटते?”

मी म्हटलं “ काय वाटणार? छान वाटते. प्रसन्न वाटते. अजून काय?”

आजी म्हटली, “ बरं आता मी सांगते बरं का ! सकाळी उठून जेव्हा बाई आधी अंगण झाडते ना••• तेव्हा कालची मनातली घाण रुसवे फुगवे कुरबुरी यांचा कचरा ती बाहेर फेकून देते. नंतर जेव्हा पाण्याने ती सडा टाकते ना•••• तेव्हा आपल्याच मनावर ती समजुतीची, सामंजस्याची शिंपण करीत असते आणि सगळी नकारात्मकता ती दाबून टाकत असते. मग जेव्हा ती या दाबलेल्या मनावर अर्थात सडा टाकलेल्या अंगणावर रांगोळी काढते ना? तेव्हा सगळी सकारात्मकता त्यात येते. माझे अंगण चांगले दिसावे, माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याला मी सूख द्यावे याकडे तिचे चित्त जाते.  मग कोणासाठी काय काय करायचे कसे करायचे याचे नियोजन ती रांगोळी काढताना करते. .. मग असे सकारात्मक उर्जेने भरलेलं मन तिला दिवसभर सळसळतं ठेवतं. तिच्याकडून घरातील सदस्यांना सुखावण्याचा आटोकाट प्रयत्न करतं.  पर्यायाने तिच्या बाजूने घरातील शांतता प्रसन्नता टिकवण्याचा प्रयत्न होत असतो…. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जेव्हा सुंदर रांगोळी पहाते तेव्हा ती पण प्रसन्न होते. जरी वाईट विचार मनात घेऊन आली असेल तरी त्याचाही काही अंशी निचरा होतो. पर्यायाने त्याचा या घराला मोठा फायदाच होतो.”  

अशा प्रकारचा सकारात्मकतेचा एक स्त्रोत सध्याच्या काळात आपणच बंद केला आहे. सध्या अंगणच नाही तर त्यापुढे रांगोळी तरी कशी येणार?

पण असा विचार करण्यापेक्षा दारात जेवढी रिकामी जागा असेल तेवढ्या जागेतच छोटीशीच रांगोळी काढूया.  सगळी नकारात्मकता घालवून जेवढी सकारात्मकता घेता येईल तेवढी घेऊया. दिवसाची सुरुवात चला निर्मळतेने करू या…

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शहाणपणाचं  वेडेपण… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

शहाणपणाचं  वेडेपण ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सायली भेटायला आली.

“नीता मावशी आईबद्दल तुझ्याशी जरा बोलायचं आहे…”

“अगं काय झालं मीनाला?”

“आई सध्या काहीतरी वेगळंच वागते आहे.”

“म्हणजे?”

” अचानकपणे तिच्या आत्ये बहिणीला भेटायला गेली .”

“पण मग त्यात काय झाल?”

“इतके दिवस ती  सहज अशी  कधीच गेली नाही. दारातली रांगोळी सकाळची कधी चुकली नाही …आता पेपर वाचत बसते मग  कधीतरी नऊला काढते …. पूर्वी खरेदीला मला घेऊन जायची. आता आपली आपण जाते… जे मनाला येईल ते घेऊन येते.. मध्ये चतुर्श्रुंगीला जाऊन आली …”

सायली एक एक सांगायला लागली….

“अशी का गं वागत असेल ?”

“तुम्हाला तिचा काही त्रास होतो आहे का ?तिची ती जाते तर जाऊ दे ना…”

“अग पण..असं कसं ..”

” घरात कशी असते?”

“अगदी नॉर्मल नेहमीसारखी..”

” बरं ती जाते तर तुमची काही अडचण होते का?”

“नाही काहीच नाही..”

“ मग झालं तर..”

“अग रविवारी अचानकच देहू आळंदीला गेली मैत्रिणींना घेऊन…….. म्हणाली जेवायचं काय ते तुम्ही तुमचं मॅनेज करा.. केलं आम्ही ते …..”

“अगं मग प्रॉब्लेम काय आहे?”

“अगं नीता मावशी हे सगळं अॅबनॉर्मलच  वाटतंय … मी आनंदशी बोलू का?  काही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तर नसेल ना …”

मी जरा स्तब्ध झाले..

म्हटलं “ तुला वाटत असेल तर तू जरूर बोल…”

“हो बोलतेच ..” .. असं म्हणून ती गेली.

मनात आलं…. 

… समाजाच्या घराच्या चौकटीत बाईने अगदी तसंच वागलं पाहिजे .. जरा कुठे वेगळं घडलं ..  मन इकडे तिकडे लावलं तर …कुठे बिघडलं ? ….पण नाही…लगेच ते खटकतं ..

मी मैत्रिणींना हे सांगितलं तर त्यांच्या प्रतिक्रिया ….

“मी पण माझ्या चुलत वहिनीला उद्या भेटायला जाते …खूप दिवस घोकते आहे…”

“मला कॅम्पात जरा एकटीने जाऊन यायचं आहे आता मी जातेच..”

“मला सारसबागेत गणपतीच्या सकाळच्या सातच्या आरतीला जायचं आहे उद्या जाऊन येते…

कितीतरी वर्ष मनात आहे पण असं उठून जावं हे काही कधी सुचलंच नाही बघ …”

एक मैत्रीण  म्हणाली..

 “नीता मला कॅफे कॉफी डे ची ती महागडी कॉफी एकदा प्यायचीच आहे. तुझ्या घराजवळच आहे . उद्या आपण जाऊया  ..कशी असते ती बघूया तरी…”

मैत्रिणी धडाधड सगळं मनातलं बोलायला लागल्या. 

सायलीचा फोन आला .

“आनंदशी बोलले. त्यांनी छान समजावून सांगितलं मला .” ती शांत झाली होती. वाटलं  तिला सांगावं …

“ अग त्यापेक्षा आईचं मन वाचलं असतंस तर…फार काही नसतात  ग बाईच्या अपेक्षा… साध्या साध्या गोष्टी तर आहेत ..करू दे की तिला .. इतके वर्ष तुमची सेवा केली, आता थोडं मनासारखं वागते आहे वागू दे की…” 

तुम्हाला एक  कानमंत्र देते..

वागावं थोडं मनासारखं …. निदान आता तरी …

ही अशीच वागते हे कळलं की ते आपोआप शहाणे होतील…

आता तुम्हाला अजून एक आतली गंमत सांगते बरं का …

मीनाने हे संकल्प मला सांगितले होते…

तिला म्हटलं, “अगं नवीन वर्षाची कशाला वाट बघतेस ? आत्ताच  सुरु कर की..” .

तिने मनासारख वागणं सुरू केलं आणि ही सगळी मज्जा सुरू झाली…..

मला काय म्हणायचं आहे ते आता तुम्हाला समजलच असेल..  फोड करून सांगत नाही… 

सख्यांनो  फार मोठी मागणी नसतेच हो आपल्या मनाची …  

वागा की थोडं मनासारखं…

मग कोणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत तरीसुद्धा तुमचे दिवस आनंदाचे आणि सुखाचे जातील याची खात्री मी तुम्हाला देते….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परतीच्या वाटेवर… लेखिका : सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, वर्ष सरत आलेलं पाहून, परतीच्या वाटेवरच्या प्रवासातलं एक “स्टेशन “मागे पडलं ही भावना मनात  येतेच.

सत्तरी पर्यंतच्या प्रवासात, गंतव्य स्थान ठरवून केलेल्या प्रवासाच्या मिश्र आठवणी बरोबर असताना अटळ अशा गंतव्य स्थानाकडे परतीचा प्रवास सुरु झालाय.

यात कुठेही दुःख, खास करून नैराश्य याचा लवलेश ही नाही.

जन्माला आलेला प्रत्येक जण हे मनापासून स्वीकारतो.

तरीही परतीचा प्रवास कसा असावा याचे आडाखे बांधतोच.

वयपरत्वे कमी झालेली शारीरिक क्षमता, आत्मविश्वास आणि स्मरणशक्ती ही इंधनं परतीच्या प्रवासातली गाडी थोडी धिमी करतात. हे हसत मान्य केलं तरी ही इंधनं शेवटपर्यंत संपू नयेत ही  प्रार्थना  मनोमन सतत बरोबरीने चालत असते.

परतीच्या प्रवासात आपली ही “कुडी “derail “(अपंगत्व ) होऊ नये ही तर प्रत्येकाचीच इच्छा असते.

आपल्या मुलांची गाडी सुसाट धावत असते. कौतुक भरल्या अभिमानाने त्या कडे बघत असलो तरी तरी मनात चटकन येऊन जातंच की आपली गाडी त्यांनी “siding “ला टाकू नये.

त्यांचा वेग झेपणारा नाहीये तर आपल्या वेगाशी कुठे तरी जुळवून घेत मधे मधे अशी स्थानक दोघांनी निर्माण करावीत की तिथे ऊर्जा भरून घेता येईल अशी क्षणभर विश्रांती अनुभवता येईल.

या वाटेवरची विधिलिखित  स्टेशन्स तर टाळता येणार नाहीच आहेत. पण प्रवास सुखकर होण्यासाठी ची आगाऊ आरक्षणं तर करूच शकतो.जसे की….

साठी नंतर तब्बेतीविषयी  अधिक जागरूक राहून स्वतः ला fit ठेवणं गरजेचं आहे.

आर्थिक नियोजन चोख करावं…. छंद जोपासत आपला स्वतः चा समवयस्क  गोतावळा, मैत्रीचं कोंडाळ  असावं.

नवीन गोष्टींचं मनापासून स्वागत करावं. पुढच्या पिढी बरोबर कमीत कमी संघर्षाची वेळ यावी या साठी आपली आणि त्यांची मानसिकता प्रयत्न पूर्वक, जाणीव पूर्वक जोपासावी.

मुलांच्या संसाराच्या जबाबदाऱ्या अट्टाहासाने  आपल्यावर ओढवून  घेणं टाळावं.

“आपल्या ” “स्वतः साठी जगण्याच्या महत्वाच्या junction ला आलोय. … आनंदाने राहू या.

आगाऊ आरक्षणाची ही शिदोरी बरोबर घेतलीय, झालाच आत्ता परतीचा प्रवास “सुखकर”, 

असं तर म्हणणंच नाहीये.पण सह्य नक्कीच होऊ शकतो.

शेवटी हा प्रवास ज्याचा त्याचा, ज्याला वाटेल तसा करायचा असतो. शाश्वत आणि इच्छित ही स्टेशन्स बिन थांब्याची निघू शकतात. 

तरीही बा भ बोरकर यांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे … 

‘दिवस “जरेचे “आले “जरी “त्या काठ जरीचा ” लावू सुखे ‘ .. म्हणत परतीचा प्रवास आनंदाने, समाधानाने करण्याचा  मानस ठेवूच शकतो आपण…

लेखिका : सुश्री नीलिमा जोशी

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोमटण ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

कोमटण ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

कधी नव्हत ते भई आज रागावले होते. भई म्हणजे माझे आजोबा. आईचे वडील. त्यांचे बंधू त्यांना भई म्हणत मग ते सर्वांचेच भई होऊन गेलेले! भई तसे फारसे कधी रागावत नसत. ते शांत व धोरणी स्वभावासाठी नावाजलेले. घरी वा बाहेर ही ते सदा हसतमुख राहत असलेले. क्वचितच ते रागे भरत व त्यास तसे ठोस कारण असले तरच ते विचलित होत. घरात ते तसे सर्वात वडील. घरात नाही नाहीतरी पंचवीसच्यावर माणसं, एकत्र कुटुंब. लहानथोर सर्वांना सांभाळून घेत, घरातील आपापसातले मतभेद, रूसवेफुगवे यातून समंजसपणे मार्ग काढण्याची जबाबदारी त्यांचीच. कितीही संकटं येवो त्याला तोंड देण्याची तयारी सदैव. मागचा पुढचा विचार करण्याचे कसब तसे उपजतच. त्यामुळे घरीदारी त्यांना आदराचे स्थान. पण आजचा दिवस तसा वेगळाच. त्याचे कारण म्हणजे आजोबांचे रागे भरण्याचे कारण तिघांनाच माहित, त्यात मी, आजी व आजोबा. 

मी त्यावेळेस तिसरी चौथीत असेन. मे महिन्याची सुट्टी लागली की माझा मुक्काम आजोळीच हे ठरलेलेच.  तसा मी आजीचा लाडका होतो. सुट्टीतले दिवस तिच्याबरोबर मजेत जात. ती पहाटे उठत. गंगागोदावरी वर पहाटेच स्नानास जात. खंडेरावाच्या कुंडात स्नान आटोपले की काळारामाच्या काकड आरतीला हजेरी लावे व आम्ही बच्चेकंपनी उठण्याच्या आत परतत सुद्धा असे.  वर्षातून बऱ्याचदा ती पौर्णिमेपासून ते पौर्णिमेपर्यंत हेमंतातील कार्तिक स्नान, शिशिरातील हाडं गारठवणाऱ्या थंडीतही पौष स्नान, व माघ स्नान नेमाने करत. चैत्र, वैशाखातलं तसं पहाटेचं स्नान तेवढं सुसह्य असे. बाकीची स्नानं ती सोशिकपणे भक्तिभावाने करे. त्यामुळे तिच्याभोवती सात्विक वलय जाणवे. 

सुट्टीत दिवसभर गल्लीत हुंदडून झालं की रात्री दमूनभागून आजीच्या कुशीत झोपण्याचे सुख तिच्या इतर नातवंडांपेक्षा माझ्या वाटेला जास्त आलंय. खरंतर आजी गोष्ट सांगते व मुलं ऐकतात असं घडत असतं, पण आमच्या बाबतीत वेगळं होतं. शाळेत व गीतेच्या वर्गात ऐकलेल्या महाभारताच्या गोष्टी मीच रंगवून रंगवून आजीला सांगत असे निजताना व ती आपली माझी पाठ थोपटत असे. “ जयू गोष्ट छान सांगतो! ” हे तिच्याकडून ऐकायला गोड वाटत असे. असं होतं तिचं अन् माझं नातं. 

पूर्वी हातगाडीवर मीठ विकणारा गल्लीत येत असे. तसेच नारळाची करवंटी माप म्हणून माठात बुडवून दारोदारी दही विकणारा ही येत असे, आणिक “ सुयाऽऽ सागरगोटे” म्हणून मोठ्याने ओरडत कातकारी बाया ही येत. पाटा वरवंट्याला टोच्या मारून देणारे ही येत. तसेच  दारासमोरच लहानसा खड्डा करून त्यात कोळसे टाकत अंगार फुलवून त्यावर पितळी भांड्यांना कल्हई लावून देणारे ही येत. या सगळ्यांमधे आगळी वेगळी येत ती कोमटण. कोमटण हा आमच्यातला खासगी शब्द, बाकी सर्वजण तिला बोहारीण म्हणत. ती ठेंगणी ठुसकी, काहीशी जाडेली, काळी कुळकुळीत, डोक्यावर नवी कोरी भांड्यांची पाटी घेऊन येई. ती आंध्रातली( हल्लीचे तेलंगणा) कोमटी जमातीतली म्हणून कोमटीण वा आम्ही म्हणत असू तशी कोमटण होती. ती शक्यतो दुपार उलटून गेल्यावर येई. तोपर्यंत बायकांचे स्वयंपाक घरातील झाकपाक झालेलं असायचं. आली एकदाची की किमान अर्धापाऊण तासतरी थांबे.  आजीचं व तिचं विशेष सख्य होतं. ती दोन तीन महिन्यातून एकदा यायची, मग आजी जणू तिची वाटच पहात असल्यागत असायची. हे त्या कोमटिणीलाही ठाऊक असायचं. आजी ढीगभर कपडे अगोदर गाठोड्यातच बांधून ठेवायची. मग त्या बदल्यात हवी ती भांडी घ्यायची. आजोबांकडे भिक्षुकी होती. मुंबई व भारतातून कुठूनही श्राद्ध क्रियाकर्मासाठी माणसं यायची. ती कपडे देऊन जायची. आजी ते कपडे बाजूला ठेवत व त्यातून कोमटिणीशी व्यवहार करे.  आजीने निम्माशिम्मा संसार अशाच कोमटिणीकडून घेतलेल्या भांडीकुंडीने रचला होता. 

कोमटण उन्हातून आल्याने आजी अगोदर तिच्यासमोर पाण्याचा तांबा धरे. मग दोघी एकमेकींची, मुलाबाळांची ख्यालीखुशाली विचारपुस करत. एकमेकांच्या सुखदुःखांचीही देवाणघेवाण होत. प्रसंगी डोळ्याला पदर लावणं ही होई.  “भाकरतुकडा असेल तर दे गं माई.” असं कधीकधी ती हक्कानं आजीकडून मागून घेई. तिचं चूळ भरून झालं की सावकाश मग आजी विचारे, “ हं, काय आणलंस दाखव बघू?”  मग खरा अध्याय सुरू होत. ती कोमटीण कपड्यांचं गाठोडं उघडायचा आग्रह करे तर आजी भांडी पाहण्यात मश्गुल होत. दोन्हीत घासाघीस सुरू होई. हे नको, ते नको, माझ्याकडे आहेत सगळी. वेगळं काही दाखव. मग ती कोमटण पाटीच्या तळाला लपवून ठेवलेली ठेवणीतली भांडी काढे, मग आजीचा चेहेरा फुले. लहानमोठी पातेली, ताटवाट्या, चमचे, साणसी, तवे अगदी टिफीनही आजी निरखून निरखून पाही. पसंत असेल ते बाजूला ठेवे व मग गाठोडं उघडत असे. तसं त्या कोमटिणीच्या मागण्या सुरू होई, आणखी कपडे आण, हे तर जुनेपुराणे, फाटके आहेत. घालता येईल असे दाखव, मग आजी आणखी एक लहानसं गाठोडं आणे व दोघींचं समाधान होईपर्यंत बोलणी चाले. व्यवहार संपला की आजी चहा ठेवायला उभी होई. हक्काचा चहा घेऊनच कोमटण जात असे ते पुढच्या वेळेस नवी भांडीकुंडी घेऊन येण्याचे वचन देतच. 

मला तो दिवस अजूनही लख्ख आठवतो.  त्यादिवशी ती कोमटीण आपल्याबरोबर धाकट्या  बहिणीलाही घेऊन आली होती दुपारचीच.  त्यादिवशी भई गंगेवरची कामं आटोपून लवकर घरी आले होते. तसेच आजोबा आजी दुपारीच एका लग्नाला जाऊन आले होते. आल्यावर आजीने लुगडं बदललं, पण चोळी बदलायची राहून गेली घाईगडबडीत. दुपार नंतर कोमटण आल्यावर नेहेमीप्रमाणे नमस्कार, चमत्कार झाले, तसे त्या कोमटिणीची व तिच्या बहिणीची नजर आजीच्या चोळीवरच खिळली. ती चोळी तशी होती ही खासच. मखमली जांभळ्या रंगाची, त्यावर वेलबुट्टीची पांढरी कशिदाकारी व जरीचा काठ व सोनेरी अस्तर लावलेली. आजीनं भांडी पहायला सुरूवात केली पण दोघींचं मन सौद्यात रमेना. आजीच्या लक्षात आलं सगळं, तसं तिने गाठोडं उघडून कपडे दाखवायला सुरूवात केली. कोमटिणीनेही मग बोलायला सुरुवात केली. पण तिच्या बहिणीची नजर हटता हटेना. तिने सरळ सरळ त्या चोळीचीच मागणी केली. आजी म्हणाली, “अगं, मी ही दोनदाच तर घातलीय. शिवाय जर ही आहे त्यात, इतक्यात कशी देऊ? ” तर कोमटिणीच्या बहिणीने हट्टच धरला. नेहेमीच्या कोमटिणीने त्यांच्या भाषेत बहुधा तेलुगू असावी, सांगून पाहिलं, की “असं नेसलेलं वस्त्र मागू नये कधी.”  पण तिची बहीण बधली नाही. दुसऱ्याच क्षणी आजीनं ती चोळी उतरवून कोमटिणीच्या हातात ठेवली. ती कोमटीण पहातच राहिली. मीही. आजीनं त्यादिवशी एकही भांडं घेतलं नाही. कोमटिणीला व तिच्या बहिणीला चहा पाजून बोळवण केली. त्या दोघी गेल्यावर मी वेड्यासारखं आजीला विचारलं. “ए, आजी तू ती इतकी छान व महागडी चोळी देऊन का टाकली? ” तसं आजीनं मला जवळ घेत शहाण्या माणसासारखं सांगितलं, “हे बघ जयू, तिची बहीण नादान होती, पण तिची नजर सारखी माझ्या चोळीवरच होती, तिचा जीव त्यात गुंतला गेला होता एका क्षणात.  मी ते अगोदरच हेरलं. तिची नजर वाईट का चांगली हे मी नाही सांगू शकत, पण जर ती चोळी मी पुन्हा घातली असती तर ती मला साहली नसती. कुणाकडे असं एकटक पाहणं वाईटच, त्यातही त्यातून काही मागणं तर आणखी वाईट. असं घडलं तर देऊन टाकावं देण्यासारखं असेल तर, आपला मोह कमी होतो.” मी अवाक् होऊन आजीकडे पहातच राहिलो. तसं माझं वय लहानच होतं. हे सगळं कळण्या पलिकडचं. मी मात्र हे सगळं आजोबांना साग्रसंगीत सांगितलं तसं त्यांना कधी नव्हे तो राग आला. आजोबांनी आजीसाठी ते खास लुगडं घेतलं होतं महागाचं व त्यावरची चोळीही हौसेनं शिवून घे म्हणून सांगितलं होतं. सगळं घडून गेलं पण  आजोबा आजींना काहीच बोलले नाही. मात्र राग त्यांच्या हालचालीतूनच जाणवत होता. 

काय घडलं ते आजीच्या लक्षात आलं. आजोबांचा राग कसा घालवायचा हे आजीला ठाऊक होतं. गल्लीतल्या गोठ्यातूनच आलेल्या ताज्या खरवसात गूळ व केशर घालून वड्या केल्या भईंना आवडणाऱ्या, व माझ्याकरवीच भईंना देऊ केल्या. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तरुणाई… ☆ श्री श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

☆ तरुणाई… ☆ श्रीरंग खटावकर  ☆

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं, आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते. मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हाला काय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट! “दात दोनच असले, तरी कडक बुंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे” ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले!”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील, मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही. फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो “

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

” अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना!त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ” त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!” “काही म्हणा, मन्या भाग्यवान हो!

लेक अमेरिकेतून येतो काय, हाटेलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला, तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले. मी म्हंटलं, “तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या, आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे, नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे, फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते, आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो, आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो, आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला  असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल?

असायलाच हवी !

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

 

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यही दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहा मरना यहा,

इसके सीवा जाना कहा !!”

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print