मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”आगळा वेगळा Father’s Day” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आगळा वेगळा Father’s Day.. ☆ संध्या बेडेकर ☆

आज morning walk ला श्री साठे आले नाहीत. सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. ज्येष्ठांचा हा दहा जणांचा गृप रोज बगीच्यात एकत्र होतो. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार व्यायाम करतात. walk करतात. सात ते आठ ही यांची व्यायामाची / walk ची ठरलेली वेळ आहे. त्यानंतर एक तास गप्पा गोष्टी.

वर्तमान पत्रातील बातम्या, आयुष्याचे अनुभव, किस्से या जेष्ठांजवळ भरपूर असतात. नवीन टेक्नॉलॉजी चे अर्धवट ज्ञान असते, शेअर्स चे चढ उतार, अनेक अनुभवांनी श्रीमंत असलेला हा वर्ग, कधी कधी तर बायकांच्या वरताण गप्पा मारण्यात पटाईत आहेत, असं वाटतं. सध्या तर Cricket World Cup च्या रोजच मॅचेस असतात, त्यावर चर्चा होते, खरंतर गप्पा थाबवाव्या लागतात.

 येथे त्यांना हळु बोला,

अहो! हे खूपदा सांगनू झाले तुमचे,

असं म्हणणार कोणी नसतं.

सांगता सांगता विसरल तरी चालतं. नाव आणि आडनाव तर बहुतेक आठवत नाहीच, तरी सर्व ऐकतात, दाद देतात.

नाईलाजाने साधारण नऊ वाजता सगळे जण आपापल्या घरी जातात. या पिढीची शिस्त मात्र वाखाणण्याजोगी आहे. सर्व रिटायर्ड पण वेळेवर येणार अन् वेळेवर जाणार.

संध्याकाळी पुन्हा बस स्टॉप वर एकत्र भेटतात, तास दोन तास गप्पा झाल्या की आपापल्या घरी जातात.

ही मंडळी काही लहान पणापासून चे मित्र वगैरे नाहीत. Retired झाल्यावर हळूहळू एकमेकांशी ओळख झाली आणि हा गृप वाढत गेला. आता तर भेटणे हा त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांपैकी एक आनंदाचा कार्यक्रम झाला आहे. रोज सकाळी उठल्यावर बगीच्यात जायचा त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.

काही कारणास्तव कोणी येऊ शकलं नाही तर ते स्वतः आणि बाकीचे सुद्धा बैचेन होतात. विचारपूस करताना कुठेतरी काळजी चे सूर असतात. आपली काळजी करणारे कोणी आहेत, ही भावना शक्ति देते. निराशा दूर करते. जगण्याचा आनंद वाढवते.

यांना एक गोष्ट चांगली समजलेली आहे ती म्हणजे आयुष्य आनंदात जगायला, गप्पा मारायला मित्र लागतात.

 हमारे दुनिया में अकेलेपन की कोई जगह नहीं है। किसी को अपना हम बनालो

हा मंत्र त्यांना समजला आहे.

यातील प्रत्येकाचा फॅमिली बॅकग्राऊंड वेगळा आहे. कोणी खूप चांगल्या नोकरीतून अवकाश प्राप्त अधिकारी आहेत. तर काही सर्व साधारण नोकरी केलेले आहेत. काही आजही सहजीवन जगतायेत, तर काही आज आयुष्याच्या संध्याकाळी एकटे आहेत. कोणी एकटेच राहतात तर कोणी आपल्या मुलासूने बरोबर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरांतील वातावरण, समस्या, आधार, प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाची लढाई वेगळी आहे.

या गृपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः चां एकटेपणा घालवायला, active रहायला एक उत्तम मार्ग शोधला आहे. मधून मधून बाहेर जेवायला जातात. पार्टी करतात.

या गृपचे काही नियमही आहेत बरं का??

आपल्या घरातील गोष्टींची चर्चा येथे करायची नाही. औषध आजारपण याबद्दल ही बोलायचे नाही. मदत हवी असल्यास निःसंकोचपणे बिनधास्त मागायची. घरच्या चांगल्या गोष्टी, आनंददायी घटना सांगायच्या, बरोबर त्यादिवशी चां चहा पण सर्वांना द्यायचा.

थोडक्यात रडगाणे गायचे नाही. आनंद शोधायचा आणि साजरा करायचा. त्यामुळे चहाच्या टपरीवर हा गृप वारंवार दिसतो.

आज माझ्याकडून चहा यांची सर्वांना आता सवय झाली आहे.

आनंदी जगायची यांनी सवय लावून घेतली आहे.

बरोबर आहे,

म्हणतात ना,

आनंदी जगणे ही निवड असावी, अपेक्षा नाही. तुम्हाला तोपर्यंत कोणतीच गोष्ट आनंद देणारं नाही, जोपर्यंत तुम्ही त्याची निवड करणार नाही.

Sometimes you hv to remind yourself that life can even more beautiful even though the things are not moving in your own way.

आज Father’s Day

बहुतेकांची मुलं जवळ नाहीतच. बहुतेकांना मुलांचा

Happy Father’s Day 

असा मेसेज आला…

पण श्री साठे या मेसेज ची, फोन ची वाट बघत होते. जूने अल्बम बघत होते, डोळ्यांतून अश्रू घळघळ वाहात होते. आयुष्याचा सिनेमा Real storyडोळ्यासमोरून सरकत होती. श्री व सौ. साठे उदास होते. कधी कधी असं होतं, कितीही मनाला समजवा, पण चांगल्या तर नाहीच नाही, पण वाईट आठवणी मनाच्या कोपऱ्यातून आपलं अस्तित्व दाखवायला जराही वेळ लावत नाही.

आज श्री साठे मुलांच्या आठवणीने उदास होते.

मागच्या वर्षी श्री साठे आजारी पडले, दवाखान्यात भर्ती होते. सकाळी साताऱ्याहून तो आला आणि संध्याकाळी परत गेला. एक दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

एक फोन करण्याइतपत ही त्याला वेळ मिळत नाही का?? मग मेसेज चे तरी काय करायचे म्हणा??

श्री साठे म्हणाले,

अग!! आपण मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवतो का?? एखादं दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं.

सौ. साठे म्हणाल्या,

अहो!! असेल त्याला काही महत्वाचे काम. तुमची मित्रावळ आहे की आपल्याकडे, आधार द्यायला. सोबत आहे की त्यांची.

तेंव्हाच श्री कुलकर्णी श्री साठेंची विचारपूस करायला म्हणून घरी आले होते. दोघांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या.

एकंदर दोघांच्या मनस्थितीचा अंदाज त्यांना आला.

ते तसेच परत फिरले. श्री कुलकर्णी स्वतः बरोबरच बोलत होते. विचार करत होते.

खरंच श्री व सौ साठे मनाने हळवे झाले आहेत. बायका छोट्या छोट्या गोष्टीं आठवून रडतात. मन हलकं करतात. परंतु आज श्री साठे रडतायेत, तर रडू द्यावे. मनात साचून ठेवण्यापेक्षा रडून मोकळ व्हावे.

का पुरूषांना रडायची बंदी आहे का?? त्यांना मन नसतं की भावना नसतात?? त्यांना दुःख होत नाही का?? त्यांनी भावना का दाबून ठेवायच्या?? दुःख एकत्र झालं आणि हा बांध अचानक फुटला, स्फोट झाला तर अनर्थ होईल.

भावनांचा बांध फुटण्याआधी त्याला out let देणे आवश्यक आहे.

काय करणार?? लहान पणापासून मुलांनी हेच ऐकलेल असतं ना.

अरे!! तू मुलगा आहेस ना तरी रडतो. मुलं रडत नाहीत.

हे चूकच आहे.

मनसोक्त हसावं, तसंच जेंव्हा रडावसं वाटतंय तेंव्हा मनसोक्त रडाव सुद्धा. रडून मन हलकं होतं. मनावरचं प्रेशर कमी होत. मनातील अडगळ, कचरा बाहेर पडणं आवश्यक आहे.

आपल्याच विचारात श्री कुलकर्णी घरी आले. त्यांना अस्वस्थ बघून सौ कुलकर्णी नी विचारले

काय झाले.?? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात??

श्री कुलकर्णीचें बोलणे ऐकून सौ कुलकर्णी ना वाईट वाटले. त्या म्हणाल्या,

आज सर्वांना घरी बोलवा हो. बहुतेकांची मुले बाहेरच आहेत. आपण सर्व एकत्र बसून, गप्पा मारू. सर्वांनाच बरं वाटेल आपला अजय तरी आपल्या जवळ कुठे आहे??

 आज गृपवर श्री कुलकर्णी यांनी सर्वांना आमंत्रणाचा मेसेज पोस्ट केला.

आज माझ्याकडून वडापाव आणि चहा पार्टी.

सर्वांनी संध्याकाळी घरी यावे.

मी आणि आपण सर्वच चांगले बाबा होतो. आपली सांपत्तिक परिस्थिती, क्षमता, कुवतीनुसार आपण सर्वांनी आपापले परिवार छान सांभाळले. आज आपण सर्व आपल्या स्वतः चाच कौतुक समारंभ साजरा करूया. स्वतः चीच पाठ थोपटूया.

Father’s Dayसाजरा करूया.

आज श्री कुलकर्णींच्या घरी आगळावेगळा Father’s Day झाला. काहींच्या सौ. पण आल्या होत्या.

श्री व सौ साठेही आले होते. गप्पांत रंगले होते.

श्री व सौ कुलकर्णी यांचा उद्देश सफल झाला होता. खरंतर आजची पार्टी खास करून त्यांच्या साठीच होती.

बरोबर आहे,

 आज कोणीतरी आपल्या मुळे आनंदी आहे.

ही एक सर्वोत्तम feeling आहे.

 

When life gives you hundred reasons to break down and cry. Show life you have millions reasons to smile and laugh.

एकतर म्हातारपण म्हणजे वेगळीच फेज, त्यात शरीर नाजूक आणि मन हळव झालेलं असतं. त्यात भरपूर रिकामा वेळ हातात असतो. प्रत्येकाचे प्रश्न, समस्या, वेगवेगळे असतात. फक्त ते

स्वीकार करायची हिम्मत असावी/ ठेवावी, आणि त्याच परिस्थितीत सुधार करण्याची ईच्छा असली तर,

 life becomes easy and happy.

 

म्हणतात ना,

 

You can not find happiness with negative mindset. Start thinking positive and happiness will find you.

श्री व सौ कुलकर्णी सारखा एक तरी मित्र प्रत्येकाला नक्की असावा.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ खरा फादर्स डे!!! – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित ☆

सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ खरा फादर्स डे!!! – लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

रोजप्रमाणेच सकाळ उजाडली होती. आज मला थोडी उशिराच जाग आली. मी निवांत चहाचा कप हातात घेतला आणि किचनमधून हॉलकडे आले.

आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात सकाळच्या कामात गुंतली होती. बाबांचं आज ऑफिस उशिरा असल्यामुळे घरात एक वेगळाच निवांतपणा होता. मोबाईलवर मंद आवाजात भजन सुरू होतं आणि खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हाने संपूर्ण हॉल उजळून निघाला होता.

तेवढ्यात आजोबांचा हलकासा हसण्याचा आवाज कानावर पडला.

मी सहज नजरेने समोर पाहिलं…

माझे बाबा खुर्चीवर बसलेल्या आजोबांचे केस अगदी हळुवारपणे विंचरून देत होते.

“बाबा, जरा स्थिर बसा ना… नाहीतर कंगवा अडकेल. “

– आजोबा लहान मुलासारखे हसले.

“अरे, आता या वयात माझे केस तरी कुठे उरलेत रे? “

– बाबांनीही हसत उत्तर दिलं,

“केस कमी झाले म्हणून काय झालं? आमच्या डोक्यावरचं छत्र अजूनही तुम्हीच आहात. “

– – – मी चहाचा कप हातातच धरून तिथेच थबकले.

त्या सकाळी मला घरात भजनाचा आवाज ऐकू येत होता, पण समोर दिसत होतं ते त्याहूनही मोठं स्तोत्र होतं—एका मुलाने आपल्या वृद्ध वडिलांवर केलेल्या निःशब्द प्रेमाचं.

थोड्याच वेळात बाबांनी आजोबांच्या हातावर औषध ठेवलं, पाण्याचा ग्लास पुढे केला आणि त्यांच्या आवडीचं भजन मोबाईलवर लावून दिलं.

“आज बरं वाटतंय ना, बाबा? “

– आजोबांनी फक्त मान हलवली.  त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं.

दुपारी डॉक्टरांकडे जायचं होतं. संध्याकाळी त्यांना आवडणारं धार्मिक पुस्तक आणायचं होतं. रात्री जेवणात मऊ आमटी आणि गरम भात करायचा होता.

हे सगळं बाबा इतक्या सहज करत होते, जणू ती जबाबदारी नव्हतीच… ती त्यांच्या प्रेमाची रोजची सवय होती.

मी आईला हळूच विचारलं,

“आई, बाबा आजोबांची एवढी मनापासून काळजी कशी घेतात गं? “

– आई पोळी लाटत लाटत शांतपणे म्हणाली,

“बाळा, ज्यांनी आयुष्यभर आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचा हात उतारवयात सोडायचा नसतो. “

त्या एका वाक्याने माझ्या मनात अनेक चित्रं तरळली.

– – लहानपणी आजोबांनी बाबांना शाळेत सोडलं असेल…

सायकल शिकवली असेल…

पहिल्या पगारावर अभिमानाने त्यांच्या पाठीवर थाप मारली असेल…

आणि आज…

– – आज काळाने फक्त भूमिका बदलल्या होत्या.

आज बाबा त्यांच्या स्वतःच्या बाबांचे आधार झाले होते.

आजोबांना औषधाची वेळ आठवत नव्हती, पण बाबांना प्रत्येक गोळीची वेळ पाठ होती.

आजोबांना मोबाईल वापरता येत नव्हता, पण बाबा त्यांच्या आवडीची भजनं, प्रवचनं आणि जुन्या गाण्यांची यादी तयार करून ठेवत होते.

आजोबांना चालताना आधाराची गरज होती, आणि बाबा सावलीसारखे त्यांच्या प्रत्येक पावलासोबत चालत होते.

त्या क्षणी माझ्या मनात एक विचार अलगद उमलला…

– – आयुष्यातील सर्वात मोठा वारसा पैसा, जमीन किंवा दागिने नसतात; आपल्या वडिलांचा हात कधीच सुटू न देण्याची सवय हा सर्वात मोठा वारसा असतो. “मुलांसाठी वडील आणि वडिलांसाठी सावली होऊन जो जगतो, त्याच्या रूपानेच देव प्रत्येक घरात रोज वावरत असतो. “

त्या रात्री सहज मोबाईल हातात घेतला.

सोशल मीडियावर फादर्स डेच्या शुभेच्छांचा पाऊस पडत होता.

कोणी केक कापत होतं…

कोणी फोटो टाकत होतं…

कोणी महागड्या भेटवस्तू देत होतं…

… मी मोबाईल शांतपणे बाजूला ठेवला.

– – समोर बाबा आजोबांना प्रेमाने चादर पांघरून देत होते.

उशी नीट करत होते.

– दिवा बंद करण्याआधी त्यांनी हळूच विचारलं,

“बाबा, अजून काही हवंय का? “

आजोबा हसले. .. “नाही रे… तू आहेस ना, मग अजून काय हवं? “

– – त्या चार शब्दांनी माझ्या मनात फादर्स डेचा अर्थ कायमचा बदलून गेला.

त्या दिवशी मला समजलं…

… एक पिता होणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं नाही.

आपल्या वृद्ध होत चाललेल्या वडिलांचे पुन्हा वडील होणं, त्यांच्या हट्टांना समजून घेणं, औषधांची वेळ लक्षात ठेवणं, त्यांच्या एकटेपणात त्यांच्यासोबत शांत बसणं, त्यांच्या चालण्याचा आधार होणं आणि त्यांना कधीच ओझं वाटू न देणं… हेच पितृत्वाचं सर्वोच्च रूप आहे.

त्या रात्री मी स्वतःशी एक छोटासा निश्चय केला.

– – उद्या मी कोणाचा बाबा होईन की नाही, हे काळ ठरवेल.

पण माझे बाबा जेव्हा थकतील, तेव्हा त्यांच्या आयुष्यात मी नक्कीच त्यांचा आधार बनेन.

कारण वडिलांना दिलेला गुलाबाचा गुच्छ एक दिवस कोमेजतो…

महागडी भेटवस्तूही विसरली जाते…

पण उतारवयात त्यांच्या हातात दिलेला आपला हात आणि त्यांच्या डोळ्यांत दिलेला विश्वास आयुष्यभर ताजा राहतो.

– – मुलांसाठी बाबा होणं ही जबाबदारी आहे; पण आपल्या वडिलांसाठी पुन्हा बाबा होणं हा संस्कार आहे.

– – आणि जो माणूस एका हाताने आपल्या मुलांचं भविष्य घडवतो आणि दुसऱ्या हाताने आपल्या वृद्ध वडिलांना आधार देतो…

… त्याच्यासाठी फादर्स डे कॅलेंडरवरच्या एका तारखेचं नाव नसतं.

त्याच्या आयुष्यातला प्रत्येक दिवसच “खरा फादर्स डे” असतो.

┉❀꧁꧂❀┉

लेखिका : तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सवयी एडिट करण्याची वेळ – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆ 

☆ सवयी एडिट करण्याची वेळ – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  अंजली दिलीप गोखले ☆

खरे तर रोज सकाळी शेकडो, हजारो सुप्रभात संदेश आपल्या मोबाईलवर येत असतात.

बहुतेक संदेश वाचले जातात,

काही फक्त पाहिले जातात आणि

काही नकळत पुढे सरकून जातात. .

 

पण

आज एका मैत्रिणीने पाठवलेला एक छोटासा संदेश मनात घर करून गेला.

 

“Reached that age

where I don’t care

how I look in photos anymore…

 

I want to look good

in the X-rays, scans

and blood reports!”

 

पहिल्यांदा वाचला तेव्हा हसू आलं. अगदी मिश्किल वाटलं. पण काही क्षणांनी त्यामागचा अर्थ मनाला स्पर्शून गेला.

आणि मग विचारांची एक साखळीच सुरू झाली.

खरंच ना…

एक काळ असा होता की

फोटो काढण्यापूर्वी केस नीट आहेत का, चेहरा कसा दिसतोय, कोणता अँगल चांगला दिसेल,

कोणता फिल्टर वापरावा

याची काळजी असायची.

आजही वाटते म्हणा… पण पूर्वीसारखी नाही.

 

आता आयुष्य अशा टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की

फोटोमध्ये आपण कसे दिसतो यापेक्षा

एक्स-रे, स्कॅन आणि ब्लड रिपोर्ट

मध्ये काय दिसतं, याची जास्त काळजी वाटते.

 

हे वयामुळे नाही, तर अनुभवामुळे घडतं.

 

एक काळ असा होता की फोटोवर किती लाईक्स आले, कोणती कमेंट आली याला महत्त्व होतं. पण

जसजसं आयुष्य शिकवत जातं, तसतसं लक्षात येतं की

खरी गुंतवणूक आपल्या आरोग्यात असते. .

कारण फोटोवरील सुरकुत्या लपवता येतात,

पण थकलेलं शरीर लपवता येत नाही.

आपण सगळेच रोजच्या धावपळीत इतके अडकून जातो की

स्वतःसाठी वेळ काढणं

पुढे ढकलत राहतो.

पाणी कमी पिणं, झोप अपुरी घेणं, वेळेवर न खाणं, व्यायाम टाळणं, मनातला ताण साठवत राहणं… आणि मग एक दिवस रिपोर्ट आपल्याला आरशापेक्षा जास्त प्रामाणिकपणे सत्य दाखवतो. .

 

मात्र त्यात घाबरण्यासारखं

काही नाही.

उलट ही एक जाग येण्याची घंटा असते. .

 

खरं तर निरोगी राहण्याचं गणित फार अवघड नाही—

थोडं जास्त पाणी,

थोडी जास्त हालचाल,

थोडी चांगली झोप,

थोडं कमी चिंतन,

आणि स्वतःवर थोडं अधिक प्रेम.

 

आजकाल माझी इच्छा एवढीच आहे

 

फोटोमध्ये मी परफेक्ट दिसले नाही तरी चालेल.

 

पण डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून,

सगळं व्यवस्थित आहे, ”

असं हसत सांगावं.

 

कारण शेवटी आयुष्य हे

फोटोमध्ये कसं दिसतं यावर नाही,

तर ते किती निरोगी, आनंदी

आणि मनापासून जगता येतं

यावर ठरतं. .

 

आणि हो…

 

आता फोटो एडिट करण्यापेक्षा सवयी एडिट करण्याची वेळ आली आहे! 

 

फोटोवर लाईक्स मिळणं आनंददायी असतं,

पण रिपोर्टवर डॉक्टरांनी

छान आहे! म्हणणं त्याहून सुंदर असतं.

मैत्र हो स्वतःची काळजी घ्या ; निरोगी रहा.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आज आकाशात एक काळा ढग दिसला… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ आज आकाशात एक काळा ढग दिसला ☆ संगीता कुलकर्णी ☆

आज सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत उभी राहून मी आकाशाकडे पाहत होती… उन्हाळ्याची तीव्रता अजूनही वातावरणात जाणवत होती. सूर्याने आपले प्रखर तेज सर्वदूर पसरवले होते आणि निळ्याशार आकाश निरभ्र दिसत होते. झाडांची पाने निश्चल होती… पक्ष्यांचा किलबिलाटही मंदावला होता आणि धरती जणू एखाद्या दीर्घ प्रतीक्षेत मग्न होती… अशा शांत आणि स्थिर वातावरणात माझी नजर अचानक आकाशाच्या एका कोपऱ्याकडे वळली. तिथे एक काळा ढग दिसला.

तो ढग आकाराने फार मोठा नव्हता परंतु त्याच्या अस्तित्वाने संपूर्ण आकाशाचे स्वरूप बदलून गेले होते. अथांग निळाईच्या मध्यभागी तो एखाद्या कवीच्या अंतर्मनातील गूढ भावनेप्रमाणे तरंगत होता… त्याचा काळसर रंग आकाशाच्या शुभ्रतेशी एक सुंदर विरोधाभास निर्माण करीत होता. त्याच्या कडा सूर्यकिरणांनी उजळल्या होत्या त्यामुळे त्या ढगाभोवती एक प्रकारचे तेजस्वी वलय निर्माण झाले होते… तो ढग पाहताना असे वाटत होते की निसर्गाने आपल्या विशाल कॅनव्हासवर एक अर्थपूर्ण रेषा उमटवली आहे.

वाऱ्याची मंद झुळूक वाहू लागली आणि तो ढग संथ गतीने पुढे सरकू लागला. त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता. तो कुठल्याही घाईत नव्हता जणू त्याला आपल्या प्रवासाचे उद्दिष्ट माहीत होते. त्या काळ्या ढगाकडे पाहताना माझ्या मनात अनेक विचार उमटू लागले… जीवनातही काही प्रसंग असेच अचानक समोर येतात.. ते सुरुवातीला काळ्या ढगांसारखे वाटतात परंतु त्यांच्याच आगमनातून नव्या शक्यता निर्माण होतात…

तो ढग पाहताच बालपणीच्या आठवणी मनात तरळू लागल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला आकाशात असेच काळे ढग जमले की आम्ही मित्र मैत्रीणी आनंदाने घराबाहेर पळत असू… पहिल्या सरीची आतुरतेने वाट पाहत असू… पावसाच्या पाण्यात कागदी होड्या सोडणे, चिखलात खेळणे आणि आईच्या हाकेकडे दुर्लक्ष करून भिजत राहणे हे सारे क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या एका ढगाने स्मृतींच्या दालनातील कितीतरी बंद दरवाजे उघडले होते.

काळा ढग हा केवळ पावसाचा सूचक नसतो तो आशेचा संदेशवाहक असतो. उन्हाने करपलेल्या धरतीला तो नवजीवनाची हमी देतो. शेतकऱ्याच्या डोळ्यांतील प्रतीक्षेला तो अर्थ देतो. कोरड्या विहिरी, तहानलेली झाडे आणि उष्णतेने व्याकूळ झालेली सृष्टी त्याच्या आगमनाने सुखावते. म्हणूनच त्या ढगाकडे पाहताना मला वाटले की निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाला काहीतरी शिकवत असते. कठीण परिस्थिती कितीही दीर्घकाळ टिकली तरी तिचा अंत निश्चित असतो.

थोड्याच वेळात त्या ढगाने आकाशात आपला विस्तार वाढवला. त्याच्या सावलीने परिसरातील प्रकाश मऊ झाला. वातावरणात गारव्याची चाहूल लागली. झाडांच्या पानांत कुजबुज सुरू झाली. पक्षी अधिक चैतन्याने उडू लागले. जणू संपूर्ण निसर्ग त्या ढगाच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. त्यावेळी मला जाणवले की परिवर्तनाची सुरुवात अनेकदा अशाच सूक्ष्म संकेतांनी होत असते. एका छोट्याशा ढगातून मोठ्या वर्षावाची शक्यता दडलेली असते.

आज आकाशात दिसलेल्या त्या काळ्या ढगाने मला जीवनाचे एक सुंदर तत्त्व शिकवले. बाह्यतः काळोख वाटणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगातही सृजनाची शक्ती दडलेली असते. काळा ढग दिसतो तेव्हा आपण पावसाची आशा करतो त्याचप्रमाणे संकटे आली की त्यातून उगवणाऱ्या नव्या संधींचीही अपेक्षा ठेवली पाहिजे कारण निसर्गाप्रमाणेच जीवनातही प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो… प्रत्येक प्रतीक्षेनंतर आनंद येतो आणि प्रत्येक काळ्या ढगानंतर जीवनदायी पाऊस बरसतो त्यामुळे आज दिसलेला तो एकमेव काळा ढग माझ्यासाठी केवळ निसर्गदृश्य नव्हता तर आशा, परिवर्तन आणि नवचैतन्य यांचे सुंदर प्रतीक होता…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मृतदेह हा पहिला गुरू !!” ☆ गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मृतदेह हा पहिला गुरू !!” ☆ गौरी गाडेकर ☆

डॉक्टर होण्याच्या प्रवासातील पहिला गुरु हा ‘मृतदेह’ असतो! डोनर असतो! मृत्यूनंतरही ज्ञानदानाचा मार्ग त्या शरीराने स्वीकारलेला असतो म्हणून त्याचा आदर राखलाच पाहिजे. कुठल्यातरी विनोदी (?) कार्यक्रमात मेडिकल कॉलेजमधील डिसेक्शन टेबलवरील मृतदेहाबद्दल काहीतरी चर्चा झाली म्हणे… आपल्याला तिकडं जायचं नाही कारण मुळात ते शंभर टक्के खोटं आहे, तसं काही होत नसतं.

एमबीबीएसला असतानाचा पहिलाच दिवस आठवतोय. Anatomy… शरीररचना शास्त्राचा विषय. आयुष्यात पहिल्यांदा मृत्यू इतक्या जवळून बघण्यात आला. खरंतर जिथे मृतदेह, डोनर ठेवलेले असतात त्या डिसेक्शन हॉलमध्ये प्रवेश करण्याआधीच ते सगळं आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात करतात. Formalin या केमिकलचा उग्र वास नाकात शिरतो. त्याची तीव्रता इतकी असते की, डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागतं. शरीर जपून ठेवण्यासाठी याचा वापर करावा लागतो.

आमची १५० विद्यार्थ्यांची बॅच होती. प्रत्येकी १५ विद्यार्थ्यांमध्ये एक देह, एकेका टेबलवर ओळीत झोपवलेले होते. शरीरं कडक झालेली, त्वचा काळसर पडलेली… ते अनोळखी स्त्री पुरुष, Cadaver आमच्या अभ्यासासाठी होते. मध्यभागी ते शरीर आणि बाजूंनी सगळा तो घोळका. आयुष्यात पहिल्यांदाच ते दृश्य पाहिलं होतं… तो उग्र वास, डोळ्यात होणारी चरचर, येणारं पाणी. मनात भीती, घृणा, संकोच, अस्वस्थता, कुतूहल सगळ्याच भावना होत्या.

सरांनी पहिल्या दिवशी Cadaveric Oath वेळी सांगितलं होतं, समोर जो देह दिसतोय तो तुमच्या आयुष्यातील पहिला रुग्ण नसून पहिला शिक्षक आहे, त्यांचा आदर करा. शरीरदान हे मृत्यूनंतरही मानवसेवेचे सर्वोच्च दान असते. आपण जिवंत रुग्णांचा जितका आदर करतो तितकाच आदर आपण यांचा केला पाहिजे, कारण त्या व्यक्तीने मृत्यूनंतरही ज्ञानदानाचा मार्ग स्वीकारलेला असतो.

डोनरच्या बाजूला उभे राहून वास येतोय म्हणून नाकाला हात किंवा रुमाल लावणे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. तुम्ही मास्क लावू शकता पण हाताने नाक बंद करून घेणे वगैरे त्या मृतदेहाचा अपमान समजला जातो. तिथे थांबून थुंकणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, विनोद करणं, शरीरावर विचित्र कमेंट करणं हा त्या डोनरच्या त्यागाचा अपमान असतो.

तो पहिल्या वर्षभराचा प्रवास फार सुंदर असतो. सुरुवातीला त्या देहाबद्दल घाण वाटते, भीती वाटते पण हळूहळू आपली आणि ‘त्यांची’ ओळख होऊ लागते. आपला टेबल, आपली ‘बॉडी’… एक नातं तयार होऊ लागतं. ते शरीर कोणाचंही असू शकतं. जिवंत असताना ते कदाचित नोकरदार असतील, रिटायर्ड असतील, शेतकरी असतील, सैनिक असतील, समाजसेवक असतील, शिक्षक असतील… एखाद्या मुलाची आई असेल! कदाचित लावारिस शरीर असेल! लावारिस असतानाही त्यांनी या रूपाने वारसा जपलेला असतो.

अभ्यास सुरू होतो. सुरुवातीला ज्या भागाचा अभ्यास करायचा आहे तिथली त्वचा बाजूला केली जाते. एकेक अवयव शिकवला जातो. ही काही चार दिवस किंवा आठवड्याची गोष्ट नसते. तब्बल वर्षभर हळूहळू ही प्रक्रिया चालत राहते. शरीरातील एकेक स्नायू, नसा, धमन्या, हाडे, मज्जातंतू उघडून पाहिले जातात. त्यांची रचना शिकवली जाते. किडनी, लिव्हर, हृदय, मेंदू एकेक अवयव बाजूला काढून, अगदी हातात घेऊन शिकवले जातात. हे सुरू असताना कधीतरी एखाद्याच्या हृदयामध्ये स्टेंट सापडतो, एखाद्याच्या हाडांमध्ये बाहेरून बसवलेला रॉड सापडतो… आणि जाणीव होते की हेही कधीतरी आपल्यासारखेच जिवंत होते.

वर्ष संपतं, परीक्षा जवळ येऊ लागते तेव्हा त्या शरीरामध्ये हाडांशिवाय काहीच शिल्लक राहत नाही. त्या शरीराची भेट आता कधीच होणार नसते. इतके दिवस सोबत राहिल्यामुळे त्या मृतदेहासोबत भावनिक बांध तयार झालेला असतो. ज्या व्यक्तीचं नाव कधीच समजणार नसतं, ज्या व्यक्तीला कोणताही पुरस्कार मिळणार नसतो, टाळ्या वाजणार नसतात, कुठे फोटो लागणार नसतो ती व्यक्ती कायमची मनात राहून जाते. एकही डॉक्टर आपल्या आयुष्यात आलेला पहिला मृतदेह, cadaver कधीच विसरत नाही.

हे सगळं लिहिण्याचं कारण काय तर…

त्या तथाकथित विनोदी कार्यक्रमातील विधानांनी वैयक्तिकरीत्या फार दुखावलं नाही. कारण सत्य काय आहे हे आम्हा डॉक्टर लोकांना माहीत आहे पण काळजी एका वेगळ्याच गोष्टीची वाटली… शरीर दानासारख्या पवित्र कार्याबद्दल समाजाच्या मनात संशय आणि नकारात्मकता निर्माण होण्याची. एखादी चांगली गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात पण एखादी चुकीची, वाईट गोष्ट दोन मिनिटाच्या व्हिडिओमुळे आजकाल सहज लोकांच्या मनात बसते.

काहीतरी मुर्ख बडबड करून प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात एका अतिशय पवित्र कार्याबद्दल नकारात्मकता निर्माण होत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कोणत्याही डॉक्टरच्या ज्ञानामागे, कौशल्यमागे एका मौन निस्वार्थ शरीरदात्याचे… Silent Teacher चे योगदान असते.

वैद्यकीय शिक्षणासाठी स्वतःचे शरीर दान करणाऱ्या लोकांना आणि नातेवाईकांना एक डॉक्टर म्हणून माझं एक सांगणं आहे की, हे मृत्यूनंतरही मानवसेवेचे सर्वोच्च उदाहरण आहे. त्या शरीराबद्दल प्रत्येक डॉक्टर कृतज्ञ असेल, त्याचा सदैव मान ठेवला जाईल आणि त्याबद्दल संवेदनशील आणि आदर राखला जाईल!

काही शिक्षक वर्गात उभे राहून शिकवतात, काही शिक्षक पुस्तकांतून शिकवतात… तर काही शिक्षक मृत्यूनंतरही बोलतात… शांतपणे शिकवतात!

तो देह संपतो पण… आमच्या हाताच्या हालचालीत जिवंत राहतो, निदानाच्या रूपाने पुढे येतो, टाके मारताना सुईमध्ये तोच असतो, शस्त्रक्रियांमध्ये आमच्या आधी तिथे उभा राहतो… प्रत्येकवेळी ज्ञानाच्या रूपाने आम्हा सगळ्या डॉक्टरांच्या शरीरात शिक्षक म्हणून कायमचा राहतो. या शिक्षकाबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे.

लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”मनात आलं तर करून टाकावं..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मनात आलं तर करून टाकावं.. ☆ संध्या बेडेकर ☆

आमची नागपुरची ट्रीप ठरली. माझ्या दिरांकडे सोळा सोमवार चे उद्यापन चा मोठा कार्यक्रम होता. एवढ कठिण व्रत मी तर काही करू शकत नाही. कमीत कमी असा कार्यक्रम अटेंड करावा. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आपल्या जावेचे कौतुक, अभिनंदन म्हणून आम्ही जायचे ठरवल.

 खरंतर आमचे सर्व नातेवाईक या कार्यक्रमात भेटणार होतेच. तरी मनात आलं आपल्यापेक्षा जेष्ठ मंडळीला यावेळेस त्यांच्या घरी जाऊन भेटावे.. जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांचे आयुष्यातील किस्से ऐकावे. आपल्याच घराण्या बद्दल अनेक गोष्टी कळतील. मुख्य म्हणजे थोडा आनंद घ्यावा आणि द्यावाही. अनुभवाच्या शाळेत थोड शिकून याव.

आता आम्हीच senior citizen category त आलो आहोत, त्यामुळे काही बंधन वाढत्या वयामुळे तर काही सध्या च्या इकडच्या तिकडच्या बातम्या ऐकून मनात घर करून बसली आहेत. थोडी हिम्मत ही कमी झाली आहे. आणि नागपूरचे आमचे जेष्ठ तर Super Senior category तच आहेत. काही तर नव्वदी पार century च्या जवळपास.

यावेळेस भेटून याव, अस आमच बोलण झाल.

सहजच मी माझी मैत्रीण रमाला आमचा नागपुर प्रोग्राम सांगितला.

रमा म्हणाली

अरे व्वा ! छान. मनात आलंय न तर नक्की जाऊन या. अग! नंतर पश्चाताप व्हायला नको.

आज आमचे हे reservation करायच म्हणून सकाळी आठ वाजताच लॅपटाॅप घेऊन बसले. मला म्हणाले करू ना नक्की reservation ? काढू ना तिकिट

अग! नाहीतर केंसल करण्यात उगीचच पैसे वाया जातात.

सहज माझ्या मनात आल,

हा एप्रिल महिना, नागपुर ची गर्मी. आज तर गर्मीचा कहरच होता. आपण ठरवतो तर आहे, पण झेपणार आहे का आपल्याला ? तिथे जाऊन आजारी पडलो तर. तशी पुण्याची गर्मी पण काही कमी नाही पण इथे आपण घरातच असतो ना. सध्याकाळी छान थंड होत. जमेल का आपल्याला ? 

मी म्हंटल अहो ! थांबा जरा. आज राहू द्या. उद्या बघू.

यांची चिडचिड बडबड मला ऐकू येत होती. पण काय करू ? एक मन म्हणत होत हो तर लगेच दुसर मन अनेक कारण सांगून नागपूरला या सीझन मध्ये जाण कस चूक आहे, हे पटवून देत होत. दोघांच्या वादविवादात माझा गोंधळ उडाला होता.

मला निर्णय घेणे जमत नव्हत.

संध्याकाळी रमाकडे चैत्र गौरीचे हळदीकुंकू म्हणून तिच्या घरी गेले, तर तिने सहज विचारले काय ग ! झाले का reservation? 

मी म्हंटल नाही ग. अग! नागपूरची गर्मी बघून हिम्मत होत नाहिये.

हळंदी कुंकवाला आलेल्या बायकांनी तर हा विषय उचलूनच धरला. पुन्हा तसेच

 हो आणि नाही चे दोन पक्ष तयार झाले.

रमा म्हणाली,

अग! लोक राहतात ना तिथे. अग! AC taxi मिळते तुम्ही संध्याकाळी जाऊ शकता, तिथे रात्री राहण शक्यअसल्यास रहा तिथे.

रमा आमच्याच बिल्डिंग मध्ये येवढ्यातच रहायला आलेली. Morning walk ला भेट होत गेली आणि आम्ही मैत्रीणी झालो.

रमा म्हणाली अग ! मी माझा अनुभव सांगते.

मी नागपूरला आणि माझा भाऊ वर्धा येथे. म्हणजे जवळच रहात होता.

रवी मला सारख म्हणायचा,

ताई ! ये ना. माझ नवीन घर, दवाखाना बघायला ये.

खरतर कोणत्याही शनिवार-रविवार मी सहज जाऊ शकले असते. पण या शनीवारी हे काम। तर पूढच्या रवीवारी ते काम, अस होत गेल, आणि माझ जाण झाल नाही.

अशाच एका शुक्रवारी फोन वाजला.

 रमेश म्हणाले ” आला तुझ्या भावाचा फोन. अग ! या शनिवार-रविवारी जाऊन ये. अग! काम काय होत राहतील.

आता फोनवरच तस सांग त्याला.

मी फोन घेतला आणि बोलणारच, तेवढ्यात वहीनीने रडत रडतच रवी गेल्याची बीतमी सांगितली.

म्हणाली, ताई तुमची खूप वाट बघत होते हो हे.

या वाक्याने तर मी पार कोलमडून पडले..

मला माझीच लाज वाटू लागली.

जी कारण सांगून मी एवढ्या जवळ असून गेले नाही, त्यातील एक तरी कारण वाजवी होत का ? खूप महत्वाच होत का ? ते काम नंतरही करता आल असत ना.

मी का नाही गेले? आजही राहून राहून हा विचार मला बधीर करतो.

म्हणतात ना,

Dead people receive more flowers than. Living ones, because

Regret is stronger than gratitude

आजपर्यंत मी स्वतःला माफ करू शकले नाही.

कितीही काम असू दे. अग! कितीही ऊन असू दे मी केलेली चूक कोणीच करू नये. नंतर फक्त पश्चाताप होतो.

 रमा बरोबरच बोलत होती. खूपदा वेळेवर निर्णय चूकतात आणि नंतर वाईट वाटत. गोष्ट काही खूप मोठी असते अस नाही. कधी कधी तर एखाद्या घरची आनंदाची बातमी असते तर कधी दुःखद असते. ऐकल्यानंतर मनात फोन करायचा विचार येतो. पण कधी कधी तर उगीच काहीही विशेष कारण नसताना राहून जातो. आणि मग आता तर ती गोष्ट जूनी झाली, या विचाराने राहून जातो.

याचा सरळ साधा उपाय म्हणजे 

मनात आल की लगेच करून टाकाव.

हाच आहे.

आज घरी आल्यावर विचारांची दिशाच बदलली. गर्मी असली तरी आपल्याला कशी आपली काळजी घेऊन नागपूर ट्रीप manage, , करता येईल या प्रश्नाची दहा उत्तर मिळाली.

सोचने से सूझता है, और ढुंढनेसे मिलता है। 

हेच बरोबर आहे. फक्त रमा सारखी मैत्रीण हवी जी विचारांची दिशा बदलू शकेल..

आम्ही नागपूर ट्रीप करून आलो. विशेष असा त्रास काही झाला नाही. आनंद, समाधान मात्र खूप मिळाल. आपल्याच घराण्यातल्या अनेक गोष्टी, सणवार पद्धती, पूर्वजांच्या अनेक गोष्टी कळल्या. मनापासून दिलेले भरपूर आशिर्वाद मिळाले.

लक्षात आल, अडचणी मनात असतात. अति विचार करून आपण त्यात भर घालतो.

म्हणतात ना

 Whether it”s a machine, house or relationship 

Maintenance is always easier, cheaper than repairing.

You need not have to regret later.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…) 

इथून पुढे – – – 

या टपरीकडे पाहण्याचा आता माझा सुद्धा दृष्टीकोन बदलला… आता मलाही ते शॉपच वाटू लागले… दृष्टिकोनाचा फरक…!

चार काठ्यांपैकी, लहान बाळाच्या डोक्यावरून फिरवतात तसा हात त्यातल्या एका काठी वरून फिरवत ती म्हणाली, ‘इतकी वर्ष साथ दिली रे यांनी… यांना तू फेकायचं म्हणतोस…? ‘

या चार काठ्यांचे ऋण कसे फेडायचे? आधी फुटपाथ वर उघड्यावर राहत होते. घरातल्यांनी डोक्यावरचं छप्पर काढलं, पण याच चार बांबूंनी सावली दिली…

मी इथल्या लोकांना सांगून ठेवलं आहे, जेव्हा मी मरेन त्यावेळी तिरडी बांधताना याच चार बांबूंसह मला जाळा…!

माझ्या अंगावर काटा आला.

कृतज्ञता असावी तर अशी…

आजीची या कृतज्ञतेची भावना इतकी तीव्र आणि तीक्ष्ण होती की निर्जीव काट्यांना सुद्धा ती समजली असावी…

का कोण जाणे दर वेळी आलो की या काठ्या मला कायम झुकलेल्या दिसतात…!

तरीही अवसान आणून मी म्हणालो, ‘मी जिथे काम करतो तिथला साहेब चांगला आहे, मला तो बिनव्याजी कर्ज देईल, आपण हळूहळू कर्ज फेडू साहेबाचे… बघ तुझा फायदा होईल… आता आहे त्यापेक्षा आणखी जास्त सुख मिळेल…

मी खडा टाकत, चाचपडत, बुटाने जमीन टोकरत आजीशी खोटं बोललो…

कारण माझ्यातला भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर काही माघार घेईना…!

वा रे वा तालेवार, आला मोठा कर्ज फेडणारा, असं म्हणून आजीनं छद्मीपणाने माझ्या तोंडासमोर गोल गोल हात फिरवला.

ती पुन्हा भाऊक झाली, तिच्या डोळ्यात पाण्याचे थेंब होते, ती म्हणाली, ‘ लेकरा या पांढऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरचे सुरकुत्यांनी जे मंत्र शिकवले ते आज तुला सांगते गाठ मारून ठेव’.

मी कान टवकारून ऐकायला लागलो 

खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, ‘आयुष्यभर कोणाच्यातरी ऋणात रहा, पण कोणाच्या कर्जात राहू नकोस’… बघ… अर्थ कळतोय का…?

‘आयुष्यात जगताना दूरदृष्टी ठेवून जगावं… बाळा, दूरचं बघता यावं म्हणून निसर्गानं आपल्याला डोळे कपाळावर दिले आहेत, नाहीतर अंगठ्यालाच दिले नसते का…? … बघ समजतंय का…?

तीचे डोळे आता शून्याकडे लागले होते…

“शून्यातच कदाचित तिचा भूतकाळ असावा… “

बाळा, तू त्या काठ्यांबद्दल बोललास, ‘ अरे एखादं झाड फळ देत नसलं म्हणून काय झालं, सावली तर देतच की… म्हाताऱ्या माणसाला चालताना आधार देते ती ही काठीच असते… आपण ऋणात राहायचं असतं त्या सावलीच्या, मिळालेल्या त्या आधाराच्या…!

आंबा खाऊन लोक कोय फेकतात, अरे या कोयी वरच तर सगळा गर असतो… आणि कोय म्हणजे तरी काय तर बीज रे… या बीजाला काहीच किंमत नसते का रे? ती आकाशाकडे पाहत म्हणाली.

हे वाक्य तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित होतं हे मला कळायला वेळ लागला नाही 

तु म्हणालास शॉप नीट केलं तर आणखी फायदा होईल, ‘पण बेटा कायम लक्षात ठेव फायदा हा कायम खाली असतो, म्हणून त्याला “उचलावं” लागतं… वाकावं लागतं… वाकलास की संपलास…!

‘अरे वाकायचं, पण त्यांच्यापुढे, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, जे आपलं शुभ व्हावं म्हणून आपल्या मागेपुढे शरीराने किंवा मनाने उभे असतात, त्यांच्यापुढे वाकायचं, नव्हे लोटांगण घालायचं… मग ते सजीव असोत का निर्जीव…! ‘

‘शुभचिंतक खूप असतात… परंतु एखाद्याचे शुभ होऊ नये म्हणून चिंता करणारेच जास्त असतात, हे कायम लक्षात ठेव बाळा’ 

अवाक होऊन मी हे सगळं ऐकत होतो…!

‘अश्रूंना काही किंमत नसते, किंमत असते अश्रू पुसणाऱ्याला… हा जो अश्रू पुसणारा आहे ना, त्याला देव समजायचं, आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं बेटा’

मी नि:शब्द झालो, काय बोलावं मला पुढे कळेना.

शिक्षण फक्त वाचायला शिकवतं, आयुष्यात आलेले अनुभव जगायला शिकवतात हेच खरं…!

‘तू म्हणतोस शॉप आणखी मोठं करू, तुला सुख मिळेल… काही वर्षांनी वाटेल त्याला आणखी मोठं करू, हि महत्त्वाकांक्षा कधी संपणार आहे का…?

 सिकंदर सारखा सिकंदर, सुख शोधता शोधता शेवटी जाताना हाताच्या मुठी उघड्या ठेवून गेला, सर्व असूनही मी काहीही वर घेऊन चाललो नाही हे त्याला सांगायचं होतं, आपण कोण रे बेटा…?

सुख मानण्यावर असतं बेटा…

आधी रस्त्यावर उघड्यावर झोपत होते, मच्छर चावायचे, आता रस्त्यावरच मच्छरदाणी लावून झोपते, आता मच्छर चावत नाहीत हे सुख नाही का…?

पुर्वी इथपर्यंत येताना हातात सामानाचे डबे घेऊन चालत, उठत, बसत, कण्हत यायचे…

आता जोडलेले कितीतरी गिऱ्हाईक लोक मला रिक्षाने किंवा त्यांच्या मोटरसायकलीवर आजी आजी म्हणत जागेवर सोडतात… माझा त्रास किती कमी झाला…

हे सुख नाही का…?

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेली पोरं रोज मला धंदा लावायला मदत करतात, माझं हे शॉप माझं नाही, ते त्यांचं समजतात हे सुख नाही का?

आई आजी काकू मावशी म्हणत रोज इथे लोक येतात, चार भिंतीच्या बाहेरही माझं एक कुटुंब आहे, हे सुख नाही का…?

माझ्या घरातल्या लोकांनी माझी जबाबदारी घेतली नाही, पण कोण कुठला तू गरिबा घरचा मुलगा… माझ्यासाठी तू कर्ज घ्यायला तयार झालास… हे सुख नाही का…?

बेटा सोन्या म्हणत इथल्या प्रत्येक माणसाला मी माझा मुलगा करून घेतला आहे, एकाच जन्मात इतक्या लोकांची आई होऊ शकले… हे सुख नाही का…?

अजून किती सुख मिळवायचं बेटा?

किती छोट्या छोट्या गोष्टीत आजी सुख शोधत होती.

सुखी माणसाचा सदराच आजीने माझ्या पुढे आणून ठेवला…

‘ बेटा कधीतरी कुठेतरी थांबावंच लागतं की, आयुष्यात पळताना ब्रेक कुठे लावायचं याचं भान राखता आलं पाहिजे सोन्या. नुसतं शिकलं म्हणून कोणी ज्ञानी होत नाही बेटा…

“काय करावं याचं भान म्हणजे ज्ञान… “

“आणि काय करू नये याचं ज्ञान म्हणजे भान… “

ऐकून मी स्तिमीत झालो…!

मी डॉक्टर, कधी काळचा अंतरराष्ट्रीय संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख…

हि आजी रस्त्यावर वडापावची गाडी चालवते…

तरीही हुशार कोण शहाणं कोण यातला भेद आज समजला…

सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो याची आजीने जाणीव करून दिली.

मी या माऊलीच्या पायाशी झुकलो, तिला नमस्कार केला.

खाली बसून मी वर तीच्या चेहऱ्याकडे पाहिले मला ती हिमालयाप्रमाणे उंचच उंच वाटली…!

मी तिला म्हणालो आजी तू हे शिकलीस कुठं…?

ती म्हणाली, पूर्वीच्या नववी पर्यंत माझं शिक्षण शाळेत झालं, थोडं वाचलं… बाकी जगाने न शिकवताच शिकवून दिलं…!

तोंडाला पदर लावत ती हसत म्हणाली.

पदराआडचं करुण हास्य बहुदा तिला मला दाखवायचं नसावं, मी समजून गेलो.

या स्वाभिमानी आजीला मी पुन्हा एकदा नमस्कार करून गाडीला किक मारली… तेवढ्यातूनही ती म्हणाली सांभाळून जा रे बेटा…!

यावेळी पाऊस नव्हता तरीही जुगलबंदी सुरू होती माझी आणि माझ्या डोळ्यांची…!

यानंतरही मी त्या बाजूला जायचो परंतु आजीच्या “शॉप” वर थांबायचो नाही, वडे करण्यात किंवा कोणाशी तरी बोलण्यात ती गुंग असायची.

मधल्या काळात मुद्दाम तिला भेटण्यासाठी चक्कर मारली, त्यावेळी आजीच्या शॉप ची जागा रिकामी होती.

मोटरसायकल थांबवून मी शेजारी आजी बद्दल विचारले, ते म्हणाले, ‘आजी गेली. ‘

कद्धी, मी जवळपास ओरडलो…

माझ्या पायाखालची जमीन सरकली…

तिथे छप्पर म्हणून असलेला फ्लेक्स नव्हता, फ्लेक्स ला टेकू देणाऱ्या त्या चारही काठ्या नव्हत्या…

अर्थातच त्यांची आहुती पडली असेल…

शॉप ओस पडले होते…

आजी, काकू, मावशी या शब्दांचा किलबिलाट तिथे नव्हता… झाडंच नाही तर पक्षी कुठून येणार…?

आता ती जाईल तिथे सोन्या बेटा म्हणत नवीन नाती निर्माण करेलच…

पण मी आणि माझ्यासारखे अनेक डिलिव्हरी बॉय पोरके झालो त्याचं काय…???

आजही मी त्या टपरीच्या / शॉपच्या रिकाम्या जागेभोवती फेऱ्या मारतो…

पण ती नसते… कुठेच नसते… कुठे कुठेही नसते…

तरीही काव काव करत मी घिरट्या मारत राहतो,

त्या जागेभोवती… पिंड शोधणाऱ्या त्या कावळ्यासारखा…!!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शहर बदलतंय, पण” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “शहर बदलतंय, पण…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

सकाळी रोजच्याप्रमाणे फिरणं झाल्यावर कट्ट्यावर गप्पांची मैफिल रंगलेली. राजकारण, टीव्ही सिरियल, क्रिकेट या नेहमीच्या विषयांवरुन चर्चेची गाडी बेफाम वाढणाऱ्या शहरांवर आली.

“आपलं शहरसुद्धा फार मोठं झालयं”

“मोठं???? चारही बाजूंनी बेसुमार वाढलयं. ”

“हो ना. कित्येक नवीन जागा तर माहितीही नाहीत. ”

“हे सगळं गेल्या वीस वर्षात घडलं”

“नवीन येतेय पण जुन्या वास्तु एकेक करून आठवणीत जातायेत. वाईट वाटतं. ”

“इट्स ओके, जे होतंय चांगल्यासाठीच होतंय. डोन्ट बी इमोशनल, ”डॅडींच्या बोलण्यानं वादाला तोंड फुटलं. स्वतःला आधुनिक विचारांचे समजणाऱ्या डॅडींचे टोकाचे विचार अनेकदा वादाचं कारण व्हायचे. आजही तेच झालं.

“फ्रेंडस जगा बरोबर बदलत रहा. बी प्रॅक्टिकल” डॅडी वदले.

“गपा हो, जेव्हा बघावं तेव्हा प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल जप करता. तुम्ही भावनाशून्य असलात तरी जग नाही”आप्पा एकदम उसळले.

“आप्पा, पर्सनल जायचं काम नाही. मी जनरल बोललो आणि मान्य करा किवा करू नका बदल होणारच. आठवणींचे कढ काढण्यापेक्षा नव्याबरोबर अडजेस्ट करणं हेच शहाणपणाचं आणि फायद्याचं होईल” डॅडी.

“या शहरात आयुष्य घालवलं. खूप बदल पाहिले, अनुभवले पण आताचा बदल फारच वेगळायं. ”आप्पा.

“वेगळा वगैरे काही नाही. आता आपलं शहर महानगर झालयं. माय डियर, धिस इज डेव्हलपमेंट, आय लाइक धिस ग्रोथ” बोलताना डॅडींच्या चेहऱ्यावर चमक होती.

“वी ऑल्सो लाइक ग्रोथ, बट अँट व्हॉट कॉस्ट”

“म्हणजे, समजलं नाही. ”डॅडी.

“खूप नवीन गोष्टी आल्या आणि अजूनही येतायेत. मोठाले रस्ते, अवाढव्य इमारती, शिक्षण संस्था, ब्रॅंडेड दुकानं, हॉटेल्स आणि आणखी बरंच काही.. ”

“मग चांगलचं आहे की… आरामदायी जगण्यासाठी हेच तर पाहिजे. ”

“फार एकांगी विचार करता. तुम्हांला मुद्दाच लक्षात येत नाहीये. ”आप्पा.

“ओके, समजावून सांगा. ” 

“नवीन शहरात आपलेपणा वाटत नाही. सगळं अनोळखी वाटतं. शोरूम आणि घर यात जो फरक आहे तोच.. ”

“म्हणजे”

“खूप चकचकीत, डोळे दिपवणारं शोरूम कितीही आकर्षक, चांगलं असलं तरी परकं वाटतं याउलट घराविषयी मात्र जिव्हाळा असतो. प्रेम असतं. ”

“यू आर राईट” डॅडी 

“आठवणींच्या ढिगाऱ्यावर उभं असणारं नवीन शहर खूप मोठं, आधुनिक, व्यवहारी आणि दिखाऊ आहे. आमच्यासारख्यांना अजूनही शहराविषयी प्रेम, अभिमान आहे पण आता “आपुलकी” मात्र वाटत नाही. ”आप्पा बोलायचे थांबले. कट्टयावर एकदम शांतता. आपल्या शहराविषयी वाटणारी परकेपणाची भावना ही प्रत्येकाचीच वेदना.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.

… हाताने बॅग शोधणे सुरूच होते.) 

इथून पुढे – – – 

आजीकडे दुसरे गिऱ्हाईक नव्हते, ती उघड्या डब्याचे झाकण लावत, उघड्या कढईवर मोठं भांड ठेवत, पदराला हात पुसत आपुलकीने विचारू लागली, ‘तु अमुक अमुक दुष्काळी भागातला ना रे? माझ्याकडे खूप मुले येतात त्या भागातली बेटा. ‘

‘आई वडील काय शेताकडे मजुरी करतात का…?

शिक्षण किती झालंय तुझं? दहावी तरी पास आहेस का…? लग्न झालंय का? पोर बाळ काही आहे का? ‘

आजीचे प्रश्न संपत नव्हते. आजी टपरीतलं इकडं तिकडं पडलेलं साहित्य आवराआवरी करत विचारत होती. मध्येच पदरानं तोंड पुसत होती.

मी तिला म्हणालो, ‘आजी मी डॉक्टर…

पुढचं बोलू न देता ती मला म्हणाली ‘ हां, अरे सगळीच खेड्यातली गरीब मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी व्हायची स्वप्न घेऊन येतात, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत बाळा’ 

‘असू दे, आता जिथे नोकरी करतोयस तिथे करत रहा, पुढे नशीब पालटेल, फक्त कष्ट करत रहा प्रामाणिकपणे… रडायचं नाही बेटा लढायचं… ‘

‘आता ज्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोस तिथे किती दहा-बारा हजार तरी देतात का? एवढ्या पैशात पुण्यात राहायचं कसं आणि गावाकडे आई बापाला पैसे कसे पाठवायचे…? ‘ खरंच तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.

थोड्या वेळात माझ्यासारख्या “डिलिव्हरी बॉय” ची दुःख तिची होऊन गेली… काही मिनिटातच ती मला आपलंसं करून गेली.

आजीचे प्रश्न अजूनही थांबत नव्हते.

तीच्याकडे गिऱ्हाईक म्हणून येणाऱ्या इतर सगळ्या डिलिव्हरी बॉईज मुलांचे अनुभव ऐकून, मीही त्यातलाच एक आहे हे समजून, तीने त्यांच्या व्यथा तिच्याही न कळत मला चिटकवून टाकल्या होत्या.

एव्हाना माझी बॅग सापडली, मी आजीला पैसे काढून देणार, इतक्यात विचार आला, आजी मला जो डिलिव्हरी बॉय समजत आहे, तेच तिच्या मनात राहू दे.

माझे भीक मागणाऱ्या लोकांमध्ये बसून मळलेले आणि चुरगाळलेले कपडे, पावसाने चेहऱ्याचा आणि केसांचा केलेला विकृत मेकअप, डिलिव्हरी बॉईज सारख्या बॅगा, कुठल्याही खिशात न सापडलेले पैसे आणि त्यात फाटलेला रेनकोट…!

या सर्वांमुळे गरीब घरातला आहे, हे समजून आजी माझ्याशी प्रेमाने बोलत होती आणि वागत होती.

मी डॉक्टर आहे वगैरे सांगितलं तर क्षणार्धात तिची माझ्याबद्दलची माया, कणव संपून जाईल.

आणि मी माझ्याबद्दल तिला सांगून तरी काय झेंडे लावणार होतो?

कारण ती स्वतः गरीब होती, आणि कष्ट करून जगत असलेल्या गरीब मुलांबद्दल तिला आपोआपच जिव्हाळा वाटत होता.

मलाही ती तेच समजली होती…

ती आईच्या रूपाने, देत असलेल्या जिव्हाळ्याच्या या दुधात, मी डॉक्टर आहे, असं सांगून मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता.

तीच्या मनात जो गरीब मुलगा तिने रंगवला होता, मला ते चित्र पुसायचे नव्हते…!

आपलंसं समजून मनातल्या मनात माझ्याबद्दल वाळूचं घरटं जे तिने बांधलं होतं, मला ते विस्कटायचं नव्हतं 

खरंतर तीनं माझं रंगवलेले रूप मला आवडलं होतं…

हाच तर खरा आहे भिक्षेकर्‍यांचा प्रतिनिधी…!!!

पैशाची बॅग होती तिथे ठेवून आजीला म्हणालो, ‘आजी तीस रुपये माझ्यावर उधार… दोन दिवसात देतो. ‘

‘दे रे पगार झाल्यावर दिले तरी चालतील. मला कोणी फसवत नाही. ‘ 

नाही म्हणताना, उजव्या हाताचा पंजा, नाही, अशा अर्थाने, माझ्या चेहऱ्यासमोर नाचवत ती बेदरकारपणे म्हणाली.

‘फसवणारे फसवून गेले… ते सगळे माझेच होते, गोड बोलून माझ्याकडचं सर्व घेऊन निघून गेले, कुठे गेले मला माहित नाही. ‘ हे बोलताना मात्र ती भाऊक झाली.

‘कधीतरी वाटतं, भेटावं त्यांना शोधावं त्यांना… नातवंडं आता मोठी झाली असतील’

हे वाक्य बोलताना आजीच्या आवाजाला कंप सुटला, पुढे तिला बोलताच येईना, पुढचं सगळं आजीच्या डोळ्यातल्या पाण्याने सांगितलं… आजीनं डोळ्याला पदर लावला.

पुन्हा खाली मान घालून पदराने तिने डोळे पुसले.

पण पुढच्याच क्षणी पदर झटकून, खंबीरपणे चढ्या आवाजात म्हणाली, ‘जाऊदे शोधायचं तरी कशाला? शोध हरवलेल्यांचा घ्यायचा असतो, स्वतःहून गेलेल्यांचा नाही…!

‘हरवलं असेल तर नक्की सापडतं पण लपवून ठेवल्यावर माणसानं करायचं काय…? ‘ हुंदका देत ती म्हणाली.

‘माझं जाऊ दे तुझं सांग’ म्हणत शेजारच्या पातेल्यातून ओंजळीत पाणी घेऊन ते तिने चेहऱ्यावर सपासप मारलं.

मघाशी पाऊस माझ्या चेहऱ्यावर मारत होता तसंच…

फरक इतकाच, की मी पावसापुढे हार पत्करली आणि थांबलो या जागेवर…

आजीने परिस्थिती पुढे हार न मानता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती याच जागेवर…

पाऊस आता थांबला होता तिच्या डोळ्यातलाही आणि आभाळातलाही…!

चार-पाच गिर्‍हाईकं आली होती. मी गाडीला किक मारून निघालो, तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, ती वडे तळण्यात पुन्हा गुंगून गेली.

पैसे मिळतील की नाही याची तिला फिकीर नव्हती, तिच्या दृष्टीने तिने एका भुकेल्या नातवाला घास भरवला होता, आणि आजी कधी भरवलेल्या घासाचे पैसे मागत नाही…!

काय योजना होती ही पावसाची?

का मला निसर्गाने या आजीची भेट घालून दिली असावी…??

आणि पुन्हा पैसे परत करण्याच्या उद्देशाने परत भेटण्याची योजना सुद्धा करून ठेवली होती…

सगळंच अकल्पित आणि अतर्क्य…!

दोन दिवसांनी मी तिला भेटलो डिलिव्हरी बॉय म्हणूनच, मी 50 ची नोट काढून तिच्या हातावर ठेवली, उरलेले वीस राहू दे म्हणालो.

काय जहागीरदार आहेस का कुठला? ती माझ्यावर डाफरली.

‘असाच पैशाला पैसा जोडून घरी पाठवत जा’ उरलेले वीस रुपये देत ती मायेनं म्हणाली.

(मनात म्हटलं, ‘तुला देऊन घरीच पाठवतोय आजी… कसं सांगू तुला? ‘)

यानंतरही तिच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, कधी वडापाव खायला, तर कधी गप्पा मारायला.

या गप्पांमधून चेहऱ्यावरच्या, एक एक सुरकुतीची कहाणी उलगडू लागली… हळू हळू धुकं विरळ होत गेलं आणि रस्ता स्वच्छ दिसू लागला…

सुरकुत्यांच्या या जाळ्यात खूप काही साठलं होतं, आणि आजी या जाळ्यात अडकली होती कोळ्यासारखी…!

आजी खरंतर एका श्रीमंत घरातली, तीला दोन मुलं. पतीने सर्व इस्टेट या आजीच्या नावे करून ठेवली होती.

मुलांची लग्न होईपर्यंत सर्व ठीक होतं, पण एकदा लग्न झाल्यानंतर घरामध्ये दोनाची चार डोकी झाली.

हि चार डोकी पद्धतशीरपणे आजीकडे स्वतःचा वाटा मागू लागली, त्यासाठी रोज वाद विवाद आणि भांडणे, मारामाऱ्या होऊ लागल्या.

घरातली भांडणे थांबवण्यासाठी आजीने सर्व प्रॉपर्टी दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकली.

प्रॉपर्टी वाटली तरी सुद्धा मरेपर्यंत मी याच घरात राहणार अशी अट आजीने घातली.

घरात राहूनही, यानंतर आजीला कोणती सून जेवण देणार यावरून वादविवाद होऊ लागले. त्यातही पुन्हा मारामाऱ्या.

स्वाभिमानी आजी रागाने एका साडीवर घराबाहेर निघाली आणि एका फुटपाथ वर राहू लागली.

ओळखी पालखीचे लोक तेवढ्यापुरते सांत्वन करून पुढे जात, त्यातीलच एकाने, आजी तुम्हाला वडे करायला चांगले जमतात, तुम्ही हाच व्यवसाय का नाही करत असे सुचवले.

स्वाभिमानाने जगायचं तर काहीतरी करायला हवं, या विचाराने, ओळखीच्या लोकांकडून उधारीवर काही पैसे घेऊन व्यवसायाला लागणारी सामग्री घेतली आणि पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरील फुटपाथवर हा व्यवसाय सुरू केला. गोड बोलण्याने हळूहळू जम बसत गेला.

ऊन वारा पावसाचा त्रास होऊ लागला, म्हणून जी जोडलेली माणसं होती, त्यातील तरुणांनी चार काठ्या आणून त्यावर एक फ्लेक्स टाकून दिला.

आजीला निवारा मिळाला.

साधारण पाचशे रुपये रोज कमावते आजी…

बाकी सर्व नातवंडं समजून आमच्यासारख्या डिलिव्हरी बॉईज ना… उधारीवर…!

कोणी पैसे आणून देते, कोणी बुडवते तिला काही फरक पडत नाही…!

दर भेटीत मला वाईट वाटायचं, स्वतःची ओळख सांगायची सुद्धा चोरी…

एकदा मी तिला म्हणालो, ‘तुझी हि टपरी आपण छान करून घेऊया का? या चार काठ्या फेकून देऊन आपण छान काहीतरी कायमस्वरूपी करू…

ती भडकली, तु माझ्या शॉप ला टपरी म्हणतो…?

हि टपरी नाही माझं शॉप आहे… शॉप…!

सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…

– क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंदासाठी टॉनिक” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आनंदासाठी टॉनिक…” ☆ श्री मंगेश मधुकर

 — आनंदासाठी आपल्या माणसांच्या भेटी हे उत्तम टॉनिक.

 झालं असं की,

रविवारी निवांत होतो. घर, ऑफिस, मिटिंग्स, टार्गेटस, ईएमआयमध्ये गुरफटलेल्या आयुष्यात सुट्टीचंसुद्धा एक रुटीन होतं. तेच ते अन तेच ते. आराम करायचा असं ठरवलं तरी काही वेळातच त्याचाही कंटाळा येतो. आजही तेच झालेलं, कामात असताना वेळ पुरत नाही पण आज मात्र वेळ जाता जात नव्हता. खूप कंटाळा आलेला. कशातच लक्ष लागत नव्हतं. विचित्र अशी बेचैनी. कडक उन्हामुळं बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. इतक्यात मित्राचा फोन “काय करतोयेस”

“विशेष काही नाही”

“गुड!! , भेटीचा प्लान ठरलाय. अर्ध्या तासात ये. कुठलंही कारण नको. कळलं”

“एकदम अचानक, ”

“तू ये रे ”

“ऐक ना”मी टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा जिवलग मित्रांच्या ‘खास प्रेमाच्या भाषेत’ मित्रानं सुरवात केली अर्थात मीही तसाच प्रतिसाद दिला. आयुष्यात काही खास माणसं असतात ज्यांच्यासोबत सगळे मुखवटे काढून मनमोकळं वागता येतं, वाट्टेल ते बोलता येतं. कुठंही ईगो आड येत नाही. आमची मैत्री अशीच होती.

माझी वेगवेगळी कारणं ऐकून मित्र भडकला. “ए गप ऐक. मला काही माहीत नाही. तू येतोयेस. बाय!! ”फोन कट.

थोड्याच वेळापूर्वी भाजीसाठी सोबत येण्याचा सौंनी आग्रह केला तेव्हा मी टाळलं आणि आता मित्राचा फोन. आवरून घराबाहेर पडताना सौंकडे पाहिलं काही प्रतिक्रिया नाही पण तिचा कटाक्ष बरंच काही सांगून गेला.

काही वेळातच चार दिशांना राहणारे आम्ही भेटलो. पद, प्रतिष्ठा, शिक्षण, मान, पैसा, श्रीमंती, जबाबदारी, वयानुसार आलेला पोक्तपणा सगळं सगळं बाजूला ठेवून चेष्टा, मस्करीत गुंग झालो. मस्त फिलिंग होतं.

“बरं झालं आलो. मजा आली. ”

“म्हणूनच आग्रह केला. जास्त नखरे करायला चान्सच दिला नाही. ”

“बिझी लाईफमुळं एकाच शहरात असूनदेखील भेटणं होत नाही. त्यापेक्षा असं अचानक भेटण्यातली मजा काही औरच. ”

“मुद्दाम वेळ काढून भेटणं, घरी जाणं यासारख्या गोष्टी आता दुर्मिळ झाल्यात. ”

“हो रे, आता न कळवता भेटायला गेलो तर आवडतं नाही. ”

“नात्यातली सहजता केव्हाच संपलीय आता फक्त औपचारीकपणा. ”

“फोन, मेसेजेस, चॅटिंग, व्हिडीओ कॉलमुळे कनेक्ट असला तरीही प्रत्यक्ष भेटीतला आनंद वेगळाच. ”

“भाऊ, म्हणूनच म्हणतो अधून मधून तोंड दाखवत जा. बरं वाटतं”गप्पांच्या नादात दोन तास कसे गेले कळलचं नाही. मूड एकदम ताजातवाना झाला.

“थॅंक्स यार, भारी वाटलं. आता पुन्हा पुन्हा भेटू. ” निरोप घेताना प्रत्येकाच्या मनात हीच भावना होती. गाणं गुणगुणत घरात आलो तेव्हा सौं सूचक हसली. “अरे वा, मूड चांगला दिसतोय”

“येस्स.. ”

“जेवणार आहात की मित्रांना भेटून पोट भरलयं. ”सौंचा चिमटा.

“मन तृप्त झालंय. आता पोटपूजा”

कामं, जबाबदाऱ्या तर कायम असणार तरीही वेळ काढून आपल्या माणसांना भेटत रहा. छान वाटतं.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares