मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुलकर्णी सरांचे अपेक्षित प्रश्न ☆ श्री अमोल केळकर☆

श्री अमोल केळकर

??

☆ कुलकर्णी सरांचे अपेक्षित प्रश्न ☆ श्री अमोल केळकर ☆

साधारण 90 च्या दशकात आम्ही खाजगी क्लास ला जात होतो. (म्हणजे आमची इच्छा नव्हती पण आमच्या आई-वडिलांना वाटायचं, पोरगा शिकून मोठा व्हावा). आमच्या शाळेतील सरांकडेच आम्ही शनिवार रविवार क्लासला जात असू 

ही शिकवणी म्हणजे आमच्यासाठी अभ्यास यथातथाच पण टवाळखोरी जास्त असा विषय होता. (मित्रांना भेटणे आणि मैत्रिणींना बघणे)

रविवारी सकाळी तर सकाळच्या दूरदर्शन वर लागणाऱ्या मालिका ( कच्छी धूप वगैरे वगैरे) सहित क्लासचा कॉम्बो पॅकेज असायचा.

परीक्षेच्या आधी काही दिवस मात्र वातावरण गंभीर व्हायचं. ( इतरांसाठी)

प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित कुठले प्रश्न येतील यावर कुलकर्णी सर टिकमार्क करून द्यायचे (भले एखादा त्यांचा विषय नसला तरी)

सगळेजण जाम खुश व्हायचे, आता हेच प्रश्न परीक्षेत येणार असं वाटायला लागायचं ( 10 पैकी 8 प्रश्नांवर टिक असायची).

परीक्षा झाल्यावर हातातली प्रश्नपत्रिका त्या क्षणी कचऱ्याच्या टोपलीत जायची, त्यामुळे सरांनी टिक करून दिलेले किती प्रश्न 

पेपरात आले हे मात्र (मला) कधीच समजलं नाही.

70-80 % मार्क मिळवत गेलो आणि हे आम्हाला ‘यश ‘ वाटायचं.

आमची पिढी समाधानी होती.

आमचं गाव ‘ मोटे ‘ नसलं तरी लहान ही नव्हतं 

शिक्षकांचे काही लाडके विद्यार्थी असले तरी कुणी ‘ चाटे’ गिरी करायचे नाहीत, शिक्षक करूही द्यायचे नाहीत

(आपल्या क्लासला विदयार्थी येत नाही म्हणून कुणी बदला घेत नसत)

(ढगफुटी आणि) पेपरफुटी न होण्याच्या काळात आमचे शिक्षण झाले हे आमच्या पिढीचे नशीब 

टीप : 12 वीला बोर्डाच्या परीक्षेत, पेपराच्या आधी 10 मिनिटे आमचा एक मित्र 1-2 प्रश्न सांगायचा आणि ते प्रश्न हमखास यायचेच. तो सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊन ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध आहे, (त्याची नाशिकला शाखा नाही)

श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हाच चहा -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ हाच चहा– ☆ विभावरी कुलकर्णी

बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्याच वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी, मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई, वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका, त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि आत्या किंवा काकू चहा किती उकळला आहे ते ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.

असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी. चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही, चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा? 

मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते. आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर, दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम, दार्जिलिंग, निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!

दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे, चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.

हे असे मसाला, गवती, आले, विलायची चहा घेता घेता एक दिवस आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले, काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.

१५ डिसेंबर हा दिवस मूळचा ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २००५ मध्ये भारतात (नवी दिल्ली) या दिवसाची सुरुवात झाली. ज्याचा मुख्य उद्देश चहा उत्पादक देशांमधील कामगारांच्या हक्कांना आणि चहा उद्योगाला प्रोत्साहन देणे हा होता. तथापि संयुक्त राष्ट्राने (UN) भारताच्या प्रस्तावानुसार २१ मे हा दिवस अधिकृत ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून घोषित केला आहे. २१ मे रोजी बहुतांश देशांमध्ये चहाचा हंगाम सुरू होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला.

असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा, पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”धुन  बदल के तो देखो..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “धुन  बदल के तो देखो.. ☆ संध्या बेडेकर ☆

सध्या चालू असलेले  नवीन वाक्य.. रोज   FM  वर ऐकू येतय.

“धुन  बदल के  तो  देखो”

म्हणजे  “थोडा बदल करून तर बघा  ”  हे सांगणं आहे.

प्रत्येक जण वेगळा आहे.  ते वेगळेपण त्याची ओळख आहे.  प्रत्येकाची विचार करायची एक पद्धत असते. संस्कार वेगळे असतात. सवयी  सर्वच वेगळं असतं.  आणि त्या त्या प्रमाणे सर्व जण आपल आयुष्य जगत असतात. पण आपलं आयुष्य इतरांबरोबर ही जुडलेलं असतं. परिवार मित्र मैत्रिणी, शेजारी, समाजातील इतर लोक.  सर्वांशी संबंध येतात आपले. तेंव्हा adjust करणे  accept  करणे avoid  करणे या गोष्टी  करणं आलच.

परिस्थिती प्रमाणे, काळाप्रमाणे वयोमानानुसार, थोडे थोडे बदल करणे गरजेचे असते. ते आपल्या  फायद्याचेच  असतात.

– – यालाच वेगळ्या शब्दांत  “धुन बदल के तो देखो “असं म्हटलं आहे.

नवीन व जुन्या पिढीतील अंतर कमी करायला, दोघांनी थोडे बदल केले तर उत्तमच. दोन्ही पिढ्यांना त्याचा उपयोग होईल.  सामंजस्य वाढेल. difference कमी होतील. सासू -सुनेचे  नातं छान होईल. जून्या आणि  नवीन पद्धती, विचारांचे, चालीरीतींचे  right combination  एका‌ नवीन संस्कृती ला जन्म देईल. जी सर्वांना मान्य असेल.

प्रकृतीचे नियम बदलणे आपल्या हातात नाही. पण  एक काम असही आहे, जे आपण करू शकतो. आणि ते करताना कोणाला विचारायचीही  गरज नाही. आणि ते  म्हणजे स्वतः ला  बदलणे.

खरं तर खूप मोठे बदल करायची गरज नसतेच. छोटे -छोटे बदल  करून‌च खूप मोठा बदल झाल्याचे ल‌क्षात येते. थोडे विचार बदलले. थोडी सहनशीलता वाढविली,  दुर्लक्ष करायचे ठरवले,  परिस्थिती ला मान्य केले. शांत रहायला शिकले.  वादविवाद टाळायला शिकले.   माघार घ्यायला शिकले कौतुक  करायला    शिकले. नवीन पिढी ला charge द्यायची वेळ आली आहे. हे समजलं.  तर झाला की बदल. आणि तुम्ही ही बदललेली धुन ऐकुन तर बघा. किती आनंद देईल ती  तुम्हाला.

अहो!! साधी घरात   ” seating arrangement  ”  बदलली. दोन गुलाबाची फुले  flowers pot मधे लावली, तरी आपल्या ला वेगळे पणा जाणवतो. व छान वाटत. “ज्याला नेहमी टीमचा मेंबर  रहायचे असेल मग ती  टीम  “घरची ” किंवा”बाहेरची” कोणतीही असो  तर धुन बदलत रहावी लागेल. “

 तसं सध्याच्या परिस्थिती ने बदल‌ घडवून आणलेला आहेच. हा जबरदस्तीने झालेला बदल आपण स्विकारलाच ना.  म्हणजे बदल करणे शक्य आहे आपल्याला.

बदलत्या जगाबरोबर चालायचे असेल, तर बदलणे हे प्रत्येक क्षेत्रात गरजेचे आहे. हा “success”  मंत्र आहे.

… काल रेडिओ वर ऐकलं. सासूबाई म्हणतायेत “यावर्षी अधिक महिन्याचे सौभाग्याचे  वाण मी माझ्या लाडक्या  सुनेला देणार आहे ” या सासुबाईंनी धुन  बदलायचे ठरविले आहे. असं दिसतंय.  

म्हणतात ना

” प्रत्येकाला खूष ठेवणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. पण सर्वांबरोबर खुष राहणे ही सोपी गोष्ट आहे. “

थोडी तडजोड केल्यास हे शक्यही आहे.

तेव्हा

“धून  बदल के तो देखो “

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पण मी नाही दिलं तर..?” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पण मी नाही दिलं तर..?☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

 नमस्कार. मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो… त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या… एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात…

मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो…

मग त्या रुसून बसतात… मग मी त्यांना म्हातारे म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो…

ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार…? 

गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते… डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते…

मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो तिचाही आणि माझाही…

मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते… ! 

– – हे मी रोजच गणित सांगितलं… असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं… (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो)

– दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो… ! 

 

अशीच एक आजी आहे.. ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने…

सुनेला आजी (सासू)अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही… बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही…

मग या आजीनं जगायचं कसं…?… म्हणून ती एका परिसरात भीक मारायला येते…

(राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत.. परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागते)

तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली…

.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच… ! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”… अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो…

… तेवढ्यात ही आजी पाठी मागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती…

आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष…

जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप… तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो… तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही…”

ती म्हणाली, “ माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…? “.. असं म्हणून ती तोंड पाडून निघाली… ! 

मला वाईट वाटलं, पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “ मी तुला खरच लांबचा वाटतो…???”

“ न्हाय रं बाळा तूच तर माझा मुलगा हायस… “ असं म्हणत तिने माझ्या डोक्यावरून हात ठेवून बोट कडाकडा मोडली…

– – युद्ध तिथंच संपलं…

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “ म्हातारे सगळेच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत. ,.. ”

ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “ बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या… !!! “

“पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा…?”

… तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं… ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…???

मी त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं…

परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात.. यात खूप फरक आहे…

स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं…

काय म्हणू या दातृत्वाला…????

– – एरवी शे 200 किलो डोक्यावर अंगावर खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी…

… पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना… तिच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती…

बॅग उचलता उचलता ती म्हणाली, ‘ तू हे माझ्यासमोर खा… ‘ मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या… ती भरून पावली…

… देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो…

मला नेहमी असं वाटतं, देव देवी अल्ला ईश्वर येशु हे आता मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत.. माणूस, माणूसच आहे का हे पाहायला.. ,? 

.. ही आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…?

… माहित नाही.. ,.

आजी समोर खाल्लेला एक घास… ! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली… कशी कोण जाणे…? 

 मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली… तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता… आजीही गालातल्या गालात हसत होती…

खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो…

… सहज मागं वळून पाहिलं… सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती…

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उगीचच खरेदीचं प्रमाण वाढतंय!” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “उगीचच खरेदीचं प्रमाण वाढतंय!!…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

रविवारची आळसावलेली, कंटाळवाणी संध्याकाळ,

“मी काय म्हणते”चहाचा कप हातात देत सौ म्हणाल्या.

“बोला!!”

“मॉलमध्ये जायचं का?”

“कशाला? काय घ्यायचयं”

“काहीच नाही. खूप दिवसात विंडो शॉपिंग केलं नाही म्हणून जरा…. ”

“आतापर्यंतचा अनुभव वेगळायं. तिथं गेल्यावर शॉपिंग होतचं. गरज नसलेल्या वस्तू घरात येतात. ”

“स्वस्त असतात आणि डिस्काउंट पण मिळतो म्हणून खरेदी होते. बचत कशी करावी हे तुम्हांला समजतच नाही. ”

“मला काय समजतं आणि काय नाही हा मुद्दाच नाहीये. ”

“एवढी गर्दी उगीच होते का?”

“गर्दीचं कौतुक सांगू नकोस. रस्ता खणत असताना ते बघायला सुद्धा गर्दी होते. ”

“उगीच लेक्चर नको. जायचं की नाही तेवढं बोला. काही घेत नाही फक्त फिरून येऊ. त्याला पैशे पडत नाही” सौंच्या आग्रहाला नाही म्हणता आलं नाही. स्वस्ताई साठी प्रसिद्ध (???)मॉलमध्ये पोचलो. तुफान गर्दी. लोक झपाटल्यासारखं खरेदी करत होते. ओसंडून वाहणारी ट्रॉली आणि मुलं यांना सांभाळत बायकोच्या पाठोपाठ फिरणाऱ्या नवऱ्यांच्या गर्दीत मीही सामील झालो. फक्त विंडो शॉपिंग. काही म्हणजे काहीच घ्यायचं नाही असा पक्का निर्धार होता त्याविषयी सौंना आठवण करून दिली तरीही तिनं ट्रॉली घेतली तेव्हा “खरेदी नाहीच” हा निर्धार ढासळायला सुरवात झाल्याची जाणीव झाली. हळूहळू एकेक गोष्टी ट्रॉलीमध्ये येत होत्या. तासा-दीड तासानं बिलिंग काउंटर पोचलो तेव्हा ट्रॉली गच्च भरलेली. वैतागून सौंकडे पाहिल्यावर उत्तर आलं “माझ्याकडं बघू नका. दोनचार वस्तु घरात लागत होत्या आणि नेमक्या त्या स्वस्त मिळाल्या म्हणून घेतल्या. तसंही इथं सारखं सारखं येणं होतं नाही आणि आत्ता लागणार नसल्या तरी नंतर उपयोगाला येतील. घर म्हटलं की काही ना काही चालूच असतं. मी स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाहीये उलट तुम्हीच शेविंग क्रीम वगैरे घेतलं. अजून बिल दिलं नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर सगळ्या वस्तु काढून ठेवते. उगीच वाद आणि मला बोल नको. ”साधारणत: बायकोनं असा पवित्रा घेतला की बहुतेक नवरेमंडळी जे करतात तेच मी केलं. निमूटपणे बिल देण्यासाठी रांगेत उभा राहिलो. तीन हजाराची खरेदी झालेली. हातात तीन पिशव्या घेऊन रिक्षाची वाट बघताना आळस पार नाहीसा झालेला.

“तुमचे साडे चारशे वाचवले” बिलाचा हिशोब केल्यावर ख़ुशीनं सौ म्हणाल्या.

“हंssssम” मुद्दाम एवढंच म्हणालो. जास्त काही बोललो तर… !!!!

 मध्यमाशांच्या पोळ्याला विनाकारण दगड मारायचा नसतो. कुठं अन काय प्रतिक्रिया द्यायची हे नवऱ्यांना अनुभवानं बरोब्बर कळतं.

एक मात्र नक्की की, उगीचच खरेदीचं प्रमाण मात्र वाढलयं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “२१ मे.. जागतिक चहा दिवस…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “२१ मे.. जागतिक चहा दिवस… ☆ संध्या बेडेकर ☆

चहा म्हणजे चहा म्हणजे चहा असतो, तुमच्या आमच्या घरी सर्वांकडे दररोजच होतो, पण सारखा नसतो.. आम्हाला आमचाच आवडतो. तुम्हालाही तुमचाच आवडत असणार.

तुमच्या घरी येताना आम्ही आमच्या घरचा चहा पिऊनच येतो. वेळ नसला तर आल्यावर पितो. आमच्या घरचा चहा प्यायल्या शिवाय आम्हाला चैन पडत नाही. आपल्या घरचा कधीही मिळाला तरी चहा म्हणजे वाह! वाह!… च असतो.

तुमच्या घरच्या चहाला रंगच नसतो. दूध कमी असत. उकळवतच नाही. चहा पत्ती कोणती टाकता माहित नाही. ना रंग ना रूप, मग चव कशी येणार ? चहा कसा प्रमाणात दूध पाणी घेतल, त्यात साखर चहा पत्ती टाकली, आणि उकळी आल्यावर ती किती वेळ येऊ द्यावी, हे ठरवायच असत. नंतर तो मुरू दयावा लागतो. चहा म्हणजे या सर्वांच गणित असत.. ते समीकरण आपापल्या आवडीनुसार ठरवायच असत. एकदा का प्रमाण निश्चित केल की मग तस्सा म्हणजे अगदी तस्साच चहा रोज होतो.

 हे समीकरण म्हणजे या सर्वांच ratio-proportion जमल तरच चहा जमतो. त्यात आल्याची भर असली तर मग तो special कॅटेगरीत जातो. तशी त्याची डिमांड वाढते, थंडीच्या दिवसांत तर खास डिमांड असतेच. बरोबर किंमत ही वाढते.

चहा पिताना मस्त वाटल पाहिजे. सकाळचा चहा प्यायल्यावर उत्साह वाटला पाहिजे. , झोप गायब होऊन ताजेतवाने वाटल पाहिजे. दिवसाची सुरवात चांगली व्हायला चहाचे खूप महत्व आहे. म्हणून तो मोजून मापून, लक्ष देऊन केला तरच चांगला होतो. त्याचा सुवास दरवळला पाहिजे. चहा दयायची पण एक पद्धत असते. छान एकसारखे कप, लबालब भरलेले नसावे, ट्रे मध्ये चहा सांडलेला नसावा. बरोबर बिस्किट म्हणजे मज्जाच येते.

प्रत्येक घरी चहा किमान दिवसांतून दोनदा होतोच.

दररोज दोनदा चहा करायची सवय आहे. अनेक वर्ष म्हणजे साधारण पन्नास वर्ष तरी झाली असतील, तरी कधी कधी कसा काय बिघडतो ? माहीत नाही. तेच प्रमाण, तीच पद्धत तरी वेगळीच चव असते. बहुतेक दुधात पाण्याच प्रमाण जास्त असत, किंवा आल चांगल नसत.

काहीही म्हणा चहा म्हणजे एनर्जी डोज.

नवीन जगात चूलीवरचा चहा। कन्नू की चाय, अमृततुल्य चहा। तंदूर चहा, डिप डिप, कोल्ड टी, चरबी कमी करायला चहा…. वगैरे वगैरे किती तरी प्रकार आहेत.

काही प्रसंगी चहा देताना त्या कपाचा साईज बघीतल्यावर अंतर्मनातून आवाज येतो नकोच तो चहा. , अस मनापासून म्हणावस वाटत. म्हणजे आपल्या हातात कप आल्यावर, दुसर्याला म्हणजे अगदी शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तिला चहा देईपर्यंत आपला संपलेला असतो. ना धड चव कळते ना समाधान मिळत. बरे असो….

चहा जगात लोकप्रिय पेयांपैकी दुसर्या नंबर वर प्यायले जाणारे पेय आहे.

चिनी विद्वान *चेन एतिंयान* हे चहाचे पहिले प्रवर्तक आरंभकर्ता आहेत. कोणत्याही वयोगटातील चहा हे आवडते पेय आहे.

चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा मात्र असतो किवा लागतोच.

तसा रोजच चहा दिवस असतो. एक छान स्वस्त उत्साहवर्धक पेय म्हणजे चहा.

आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे चहा.

त्याच्या सन्मानार्थ साजरा करणारा दिवस म्हणून २१ मे हा जागतिक चहा दिवस.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पेपर फुटी आणि त्यावर उपाय – – – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ पेपर फुटी आणि त्यावर उपाय – – – ☆ श्री सुनील देशपांडे

 – – – पेपर फुटी आणि त्यावर उपाय खरेच हवे आहेत का?

आज-काल पेपर फुटीचा जमाना दिसतो आहे दरवर्षी कुठे ना कुठेतरी पेपर फुटी झालेले ऐकू येते. किमान आरोप तरी होत असतो. यावर्षी ती मोठ्या प्रमाणात झाली आणि गाजते ही आहे.

शिक्षणाचे व्यापारीकरण झाल्याचा हा परिणाम आहे हे उघडच आहे. व्यापारीकरण करण्यासाठी जबाबदार कोण आहे? तर सरकारच आहे हे सुद्धा उघड आहे. खरं म्हणजे शिक्षणाचं सरकारीकरण होणं आवश्यक आहे. त्याऐवजी ते व्यापारीकरण झालं आहे.

६०/६५ वर्षांपूर्वी आम्ही शालेय शिक्षण घेत होतो त्यावेळी पेपर फुटीचा कधी विषय ऐकला नव्हता. त्यावेळी आमच्या शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांच्या घरी शिकवणीला बोलवीत असत. परंतु कोणत्याही शिक्षकाने अशा शिक्षणासाठी वेगळी फी घेतल्याचे निदान आमच्या बाबतीत तरी झाले नव्हते. (कदाचित आम्ही ग्रामीण भागात शिकलो म्हणूनही असेल) आम्ही शाळेमध्ये इंग्रजी, हिंदी, संस्कृत इत्यादी बाह्य शैक्षणिक परीक्षा दिल्या होत्या. त्याही शिक्षकांनी आमच्याकडून कोणतीही फी न करता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या त्या परीक्षांसाठी वेगळे क्लास घरी घेतले होते. कोणत्याही पैशाशिवाय. ड्रॉइंगच्या परीक्षा आम्ही दिल्या त्या शिक्षकांनी सुद्धा काही किरकोळ पैसे कारण त्यासाठी बोर्ड, कागद, रंग वगैरे वगैरे साहित्य लागत असे तेवढ्यापुरते अगदीच नॉमिनल दोन चार रुपये फी घेतल्याचे आठवते. जे शिक्षक शाळेमध्ये आम्हाला शिकवत असत तेच प्रश्नपत्रिका सुद्धा तयार करीत असत. तरी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला प्रश्नपत्रिकेतले एक अक्षर सुद्धा कधी समजले नव्हते.

सातवीची व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा, स्कॉलरशिपच्या परीक्षा आणि एसएससी ची परीक्षा एवढ्याच परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळाबाह्य कुणीतरी तयार करत असत. बाकी सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आम्हाला शिकवणारे शिक्षकच तयार करीत होते आणि तरीही पेपर फुटत नव्हते. बहुधा त्यावेळेला शिक्षक पैशाला हपापलेले नसावे. जे काही शिक्षक कधीतरी शाळाबाह्य शिकवणारे काही फी घेत होते ते सुद्धा इतकी क्षुल्लक रक्कम घेत होते असे अजूनही लक्षात येते. त्यांची थोडीशी आर्थिक गरज असेलही परंतु तेवढ्यापुरतीच त्यांची अपेक्षा असावी. गरज म्हणून पैसे मिळवणे आणि हाव म्हणून पैसे मिळवणं यामध्ये खूप फरक आहे. हाव ही कधी न संपणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याला मर्यादा नसते. ही हाव मनुष्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते. गरज म्हणून पैसे मिळवणं आणि हाव म्हणून पैसे मिळवणे यामध्ये खूप फरक आहे.

मला आठवते जोगळेकर म्हणून गणिताचे शिक्षक होते परंतु ते एसएससी नंतर अजिबात गणित शिकलेले नव्हते. कुणाच्यातरी गणित क्लासेस वाल्या एका चांगल्या शिक्षकाकडे नोकरी करीत असताना त्यांनी ते ज्ञान आत्मसात केले. नंतर पोटाची गरज म्हणून स्वतःचे क्लासेस सुरू केले. शिकवण्याची हातोटी उत्तम आणि वक्तृत्व सुंदर. समोरच्या विद्यार्थी समूहाला संपूर्ण समजले आहे का नाही याची काळजी घेणे हा खूप मोठा गुण. त्यामुळे त्यांचे क्लासेस गर्दी खेचू लागले. कराड सांगली कोल्हापूर अशा तीन ठिकाणी दोन दोन दिवस क्लास घेत असत. त्याकाळी चार चाकी गाडी बाळगणारे खूप थोडे लोक होते त्यापैकी ते एक. परंतु ते म्हणत माझे ध्येय संस्कृत घेऊन एम ए आणि पीएचडी होणे आणि प्राध्यापक म्हणून नोकरी लागणे हे आहे. त्याप्रमाणे ते हा व्यवसाय चालू असताना संस्कृत घेऊन एम ए पी एचडी होऊन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले आणि क्लासेस बंद केले. हाव म्हणून पैसे मिळवणे आणि गरज म्हणून पैसे मिळवणे यामधील फरक तेव्हा आम्ही प्रत्यक्ष पाहिला.

त्यामुळे आता सध्याची परिस्थिती पाहता माणसांमधील विश्वासार्हता शिल्लक राहिली नाही. परंतु आता तांत्रिक पद्धतीने बिनचूक परीक्षा पद्धती घेता येईल का याचा विचार केल्यास मला काही गोष्टी सुचवाव्या वाटतात.

– – सध्याच्या परीक्षा पद्धतीत सर्व विद्यार्थ्यांच्या साठी एकच प्रश्नपत्रिका असणे ही गरजेची आहे का?

– – हा पहिला प्रश्न.

साधारण क्वेश्चन बँक म्हणजे प्रश्नसंच तयार केलेल्या असतात.

समजा शंभर प्रश्नांचा एक प्रश्नसंच असेल तर त्याच्या वेगवेगळ्या अनुक्रमाने दहा प्रश्नपत्रिका तयार करता येतील. जेवढी विद्यार्थ्यांची संख्या असेल तेवढ्या संचांमध्ये त्या सर्व प्रश्नपत्रिका विविध पाकिटामध्ये बंद करून ती सर्व पाकिटे परीक्षा केंद्रावर ठेवणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने त्यातील एक पाकीट कोणतेही उचलून घेऊन जाणे ती त्याची प्रश्नपत्रिका. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटणे हा प्रकार शिल्लक राहणार नाही. प्रश्नपत्रिका आधीच फुटलेले असतील कारण त्या प्रश्नांच्या बाहेरील प्रश्नपत्रिका असणारच नाहीत. यामुळे आणखी एक फायदा असा की कोणताही चॅप्टर म्हणजेच अभ्यासाचा भाग ऑप्शनला टाकणे हा प्रकार बंद होईल आणि संपूर्ण सिलॅबस चा अभ्यास करणे प्रत्येक विद्यार्थ्याला भाग पडेल.

कॉम्प्युटरचा वापर करून सुद्धा या पद्धतीने परीक्षा घेता येतील. कॉम्प्युटरला सर्व प्रश्न फीड करून ठेवणे आणि परीक्षा गृहात जाताना प्रत्येक विद्यार्थ्याने बटन दाबताच त्याला कोणत्याही रँडम सिलेक्शन मेथडने दहा प्रश्न असलेली एक प्रश्नपत्रिका प्रिंट करून मिळेल. ती त्याची प्रश्नपत्रिका असेल. त्यामुळे परीक्षा केंद्रावर सुद्धा एकाचा पेपर बघून दुसऱ्याला कॉपी करता येणार नाही. किंवा बाहेरून कॉपी पुरवणे या प्रकारचे कोणतेही उद्योग करता येणार नाहीत. फक्त यामध्ये एकच भीती आहे किती टक्के निकाल लागेल? 

– – – याच भीतीपोटी अनेक विद्यार्थ्यांना पास करणे आणि त्यासाठी नैतिकता नष्ट करणे हे प्रकार अधिकृतपणे चालू आहेत का? शिक्षण क्षेत्राचे वाटोळे करण्याचा हा पद्धतशीर प्लॅन केला असेल का अशी शंका घेण्यासाठी पुरेसा वाव आहे असे मला वाटते? आणि तसे नसेल किंवा तसे नको असेल तर परीक्षा पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करणे अत्यंत गरजेचे आहे असे मला निक्षून सांगावेसे वाटते.

– – शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल करायचा आहे असे म्हणत म्हणत मागील पानावरून पुढे चालू हेच चालू आहे. खरोखरीच विद्यार्थ्यांची कसोटी घेणाऱ्या परीक्षा भविष्यात पाहायला मिळतील का?

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ज्योत से ज्योत जगाते चलो- – – ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “ज्योत से ज्योत जगाते चलो- – – ” ☆ डॉ. धनंजय देशपांडे

(एक सत्यकथा) 

… ज्योत से ज्योत जगाते चलो 

… भुखो को आनंद देते रहो 

जिथे मी काही सूचना केली तर ती आनंदाने स्वीकारली जाते, अशा सिंहगड रोडवरील माझ्या एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. तयारीसाठी दोन दिवस आधी एक चक्कर टाकावी म्हणून गेलो होतो. मित्राने मांडव, केटरिंग, आसन व्यवस्था इत्यादी दाखवले. ते बाकी सर्व ओके होते.

तर मित्र म्हणाला, “काहीतरी हटके एखादी आयडिया दे न, की जी सर्वानाच आवडेल”

मी फक्त म्हणालो, “आपण अक्षतांमध्ये तांदूळ वापरणे टाळू. वऱ्हाडी मंडळीनी जरबेरा / शेवंती सारख्या फुलाच्या पाकळ्या उधळाव्यात… आणि लोकांना आपण तांदळाचे दाणे असलेली छोटी बॅग देऊ. दाराजवळ ठेवलेल्या बॉक्स मध्ये ती अक्षता बॅग जाताना त्यांनी सोडून जावी. ते तांदूळ नंतर आपण गरिबांना देवू. ” 

– – मित्रानी ते ऐकले. विशेषतः त्याच्या आईवडिलांनी त्याला आनंदाने होकार दिला.

आणि मग मित्राने लग्न सुरु होण्यापूर्वी माइकवरून तसे जाहीर केले.

सर्वांनी त्याचे स्वागत केले. आणि लग्न लागल्यावर आम्ही पाहिले तर त्या बॉक्स मध्ये तब्बल वीस किलो तांदूळ जमा झाला होता.

– – तोच सुमारे २० किलो तांदूळ नंतर मित्राच्या हाताने एका गरीबाच्या घरी गेला.

डीडी क्लास : मंडळीनो तुम्हाला वाटेल की २० किलो म्हणजे काही फार नाही !

पण तसेही ते २० किलो तांदूळ पायदळी जाणार होते, आणि नंतर कार्यालय सफाईवाल्याकडून कचऱ्यात !

ते टळले आणि ते तांदूळ एका घरात चार माणसाच्या पोटात किमान तीन महिन्यासाठी गेले. हे काय कमी आहे ?

अजून एक म्हणजे फक्त पुण्याचा विचार केला तरी एका सिझनला किमान एक हजार लग्न पुण्यात होतात असं गृहीत धरू. (जास्तच होतात पण मी किमान धरलेत) तर या पैकी किमान निम्म्या लोकांनी जरी हे मनावर घेतलं तरी पाचशे x वीस = दहा हजार किलो तांदूळ ! गरजू प्रत्येक घरी दहा किलो दिले गेले तरी एक हजार लोकांना दोन महिन्याचा तांदूळ मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद नवरा नवरीला अगदी मनापासून मिळतील. हे किती छान आहे !

हे एकट्या पुण्याचे बोलतोय आता कल्पना करा, राज्यातील प्रमुख शहरातील लग्ने धरली तर हीच तांदूळ किलोची संख्या कित्येक टनामध्ये जाईल हो !

जुन्या प्रथा त्या त्या काळात चांगल्याच होत्या कारण त्यात काहीतरी विज्ञान आणि संस्कृती होती. मात्र काळाप्रमाणे त्या प्रथा जर आपण थोड्या बदलून अंमलात आणल्या तर संस्कृती पण टिकेल आणि सामाजिक बांधिलकी देखील !!

आपण असे बरेच काही करू शकतो. ज्याची सुरुवात अगदी छोटीशी का होईना असू शकते. डेरेदार मोठा वृक्ष सुद्धा इवलुश्या बिजातूनच वाढतो न ?

काय म्हणता ? बरोबर न ? 

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला आनंदी राहायचे आहे !” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मला आनंदी राहायचे आहे !” ☆ श्री सुधीर करंदीकर

” मला आनंदी राहायचे आहे ! “ काय करू ? ” या मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एकदा मलाच सापडलं बरं का.. तुम्हालाही सांगतो.. बघा पटतंय का ?? – – 

 कायम आनंदी राहणे हे सगळ्यांनाच आवडते. तरीपण आनंदी राहणारी मंडळी अगदीच बोटावर मोजण्या इतकीच असते.

 आनंदी राहण्याचे बरेच मार्ग आहेत पण त्यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे बायकोला खुश ठेवणे.

 बरेच जण म्हणतील की दाखवलेला हा मार्ग अगदी बरोबर आहे, पण तो अतिशय खर्चिक आहे. निरनिराळ्या दुकानात त्यांना नेहमी नेऊन त्यांना खुश करणे हे खिशाला परवडणारे नसते.

 सगळ्यांचे हे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जसे बायकोला खुश ठेवण्याचा सोपा मार्ग आणि कठीण मार्ग.

 अतिशय सोपा मार्ग म्हणजे बायकोबरोबर कॅरम खेळा, पत्ते खेळा, गाण्याच्या भेंड्या खेळा, आणि, प्रत्येक खेळामध्ये बायकोच जिंकेल अशी काळजी घ्या.

 घरामध्ये बायको आसपास असताना बायकोच्या माहेरच्या मंडळींशी फोनवर गप्पा मारत चला, बायकोची तारीफ करत चला.

 बायकोने केलेल्या जेवणाची / खाद्यपदार्थांची खुल्या दिलानी तारीफ करत चला. थोडं तिखट मीठ इकडे तिकडे झालं असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करा.

 घरामध्ये झोका असेल, घराच्या बागेत झोका असेल, किंवा जवळच्या बागेत नेऊन तिथल्या झोक्यावर, बायकोला छान झोके द्या.

 बायको एकदम खुश होणार आणि खुश राहणार हे नक्की. अनुभवाचे बोल असेहि म्हणता येईल.

 चला तर मग या छोट्या छोट्या आणि अगदीच बिन खर्चिक गोष्टी करा आणि कायम आनंदी राहा.

 देवाला पण आनंदी माणसं आवडतात.

देव प्रसन्न होणार आणि बायको पण खुश होणार…

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आठवणींच्या पेटीतला खलबत्ता…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “आठवणींच्या पेटीतला खलबत्ता…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझं सासर सोलापूर असल्याने लग्न झाल्यानंतर मी पुण्याहून सोलापूरला आले. त्यावेळेस यांची नोकरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या… सोलापूर जवळच्या माढा शाखेत होती. काही महिन्यांनी आमचा संसार माढ्याला सुरू झाला. आईने आणि सासूबाईंनी येताना अनेक गोष्टी दिल्या होत्या.

इतर सामानाबरोबर सासुबाईंनी चांगला डबाभर शेंगादाण्याचा कुटही दिलेला होता. कारण सोलापूर म्हणजे प्रत्येक पदार्थात कुट हवाच… तो बरेच दिवस पुरला. नंतर कुट करायचा तर.. घरी खलबत्ताच नव्हता… मग तात्पुरता खालच्या देशपांडे काकूंचा घेऊन आले. तेव्हा असं शेजाऱ्यांकडे काही मागायला जायची लाज वाटत नसे. देशपांडे काकुंचा तर मला खूपच आधार होता. त्या फार प्रेमळ होत्या. वाड्यातल्या लोकांमध्ये एकोपा माया आणि प्रेम होते.

घरात आवश्यक गोष्टी खूप घ्यायच्या होत्या. त्यामुळे खलबत्त्याचा नंबरच लागत नव्हता. हे म्हणाले,

” पुढच्या दोन चार महिन्यात आपल्याला जमेल तेव्हा घेऊ”

 काकुंच्या खलबत्यात कुट आणि चटणी केली. रात्री ह्यांना जेवताना वाढली.

 तर यांनी वेगळाच मुद्दा काढला. ते म्हणाले तुझी चटणी ” मुद्दा “नाही झाली. मोकळी ढाकळी झाली आहे. ” 

 मुद्दा म्हणजे काय हेच मला कळेना. यांना पण ती कशी करायची ते समजावून सांगता येईना.

” पुण्याला आई अशीच करते. “मी म्हणाले. नंतर सोलापूरला गेल्यावर सासूबाईंना विचारलं. त्या म्हणाल्या,

” शेंगादाणे खरपूस भाजून घ्यायचे. सालं काढायची. तिखट, मीठ घालून खलबत्यात चांगलं… कुटायचं आणि मधून मधून चमच्यानी हलवायच… मग शेंगदाण्यातलं तेल आपोआप सुटतं आणि ती नीट गोळा होऊन एकजीव होते. त्यालाच मुद्दा चटणी म्हणतात. “

“हो.. का.. आता मी तशी करत जाईन”

लगेच त्या म्हणाल्या,

” आणि उगीच थोडी करू नकोस जास्तीचीच करत जा. रोज जेवताना लागते. कधी त्यात लसूण घालून करत जा”.

दुसरे दिवशी सासुबाईंनी मला चटणी कशी कुटायची ते शिकवले. थोड्या प्रयत्नानंतर ती जमली. त्यांना म्हटलं,

” इतकी चटणी दोघात लवकर संपणार नाही. “

तर त्यांनी एक चांगली टीप दिली. त्या म्हणाल्या,

” काही दिवसानंतर ती चटणी गवार, वांगी, तोंडली, दोडक्याच्या भाजीत घालून संपवायची. पण लगेच दुसरी ताजी करून ठेवायची.. ” 

अजूनही मी तसंच करते…

हे खलबत्त्याची चौकशी करून आले. नुकताच संसार सुरू झाला होता.. अनेक खर्च… आणि काकूंचा खलबत्ता आणून काम भागत होतं. त्यामुळे नवीन आणायचा मागेच पडत होत. सासरे माढ्याला आले तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी दणकट असा खलबत्ता बनवून घेतला. बत्त्याला पुढे मोठ्या आकाराचा गोल होता. चांगला दोन किलोचा बत्ता होता. सोलापुरला गेल्यावर सासरे मला म्हणाले,

 ” हा बघ तुझ्यासाठी खलबत्ता करून घेतलाय” तो बघून मला फार आनंद झाला. सासर्‍यांच्या धोरणीपणाचे कौतुकही वाटले.

माढ्याला आल्यावर काकूंना आणि शेजारच्यांना आवर्जून घरी तो बघायला बोलवलं. तेव्हा नवीन काही आणलं की त्या गोष्टीच फार अप्रूप वाटायचं.

 येताना सासूबाई माझ्याबरोबर माढ्याला आल्या होत्या. हे म्हणाले,

” आता आईकडून शेंगाच पिठलं शिकून घे. ” 

खरं सांगते ” शेंगाच पिठलं ” हा पदार्थ मी प्रथमच ऐकत होते. सोलापूरचे लोक शेंगदाणे आणि कूट कुठे आणि कसा वापरतील सांगताच येत नाही.

उपमा करायचा पण त्यात हळद घालायची आणि दाण्याचा कूट घालायचा तो रव्या बरोबर शिजवायचा की… झाला तिखटा मिठाचा सांजा…

तर सांगत काय होते..

शेंगाच पिठल… मग सासूबाईंनी कसं करायचं ते शिकवलं.

 दाण्याच्या कुटात तिखट आणि मीठ घालून एकत्र केलं. तेल गरम करून त्यात ते मिश्रण घातलं. दोन मिनिट चांगल परतलं. नंतर त्यात जरा जास्तीच गरम पाणी घातलं. मंद आचेवर झाकण ठेऊन बराच वेळ शिजायला ठेवल. काही वेळानी पाणी आटल्यानंतर कडेला मस्त पैकी लाल रंगाचा तेलाचा तवंग सुटला होता. कूटही छान मऊसर शिजला होता.

पिठल जरा सरबरीतच ठेवलं होतं.

” हे बघ झालं तयार शेंगाच पिठल… “

सासुबाई म्हणाल्या.

खरंच भाकरी बरोबर ते खमंग चटकदार लागत होतं.

 ते मला चांगलं जमायला लागलं. कोणीही येणार असलं तर हे म्हणायचे की,

” आपलं ते शेंगाच पिठलंच कर… “

एकदा बँकेतले साहेब जेवायला आले होते. त्यांना तर ते पिठले फारच आवडले. त्यांनी सगळं सोडून फक्त पिठलं भाकरी खाल्ली.

आता हेच पिठलं” शेंग भाजी ” म्हणून हॉटेलात सव्वाशे ते दीडशे रुपयाला मिळते.

मसाला करायला खलबत्ता लागायचा. पापडाचे पीठ बत्यानी कुटायचं… दाण्याचा कुट तर वरचेवर करायला लागायचा.

अनेक वर्ष खलबत्ता वापरला. काही वर्षांनी मिक्सर घेतला. त्यात तीन वेळा बटण दाबून एका मिनिटात दाण्याची चटणी केली. ती बघून हे म्हणाले,

“ही चटणी बघ… नुसते दाणे तुटून बारीक झाले आहेत. त्याला काही चव नाही. कसली भगरा.. भगरा झाली आहे. “

 त्यांचे ते म्हणणे मलाही पटले. खलबत्त्यातल्या ” मुद्दा ” चटणीची सर त्याला नव्हतीच. चटणी नुसती मोकळी.. ढाकळी झाली होती.

 त्यामुळे कूट मिक्सरवर.

पण चटणी मात्र आवर्जून खलबत्त्यातच केली जायची…

मिक्सर आल्यावर पाटा वरवंटा शेजारच्या एका ताईंना दिला.

पुण्याला बदली झाली. त्या घराची फरशी नाजूक टाईल्स ची होती. जडशीळ खलबत्त्याच्या धक्क्याने ती फुटेल असे यांना वाटायचे. त्यामुळे हे म्हणाले की,

” खाली काहीतरी जाड कापड घेऊनच कुटत जा. “

 अनेक गावात आमची बदली झाली.

 गेली पन्नास वर्षे तो खलबत्ता घरी आहे. काही वर्षांपासून सोलापूरची चटणी पुण्यातही मिळायला लागली. अर्थात त्याला”ती ” चव नाही असचं वाटतं. आता चटणी खाण्याचं प्रमाणही कमी झाल आहे.

खलबत्त्याचा वापरही जवळजवळ होतच नाही.

घरातलं सामान कमी करायचं… पण जुन्या वस्तू वापरल्या जातील अशाच… योग्य व्यक्तींना द्यायच्या… हा विचार होता.

खलबत्ता काढून टाकायला मन तयारच होत नव्हतं. ऊगीचच असू दे… राहू दे… अस माझ चालु होत…

पण एकदा ठरवलंच… तेव्हा त्याचा कोण नीट उपयोग करेल याचा विचार केला.

रोज माझ्याकडे कामाला येणारी शारदा… तिला तो दिला. ती खूपच खुश झाली म्हणाली,

” माझ्याकडे इतका मोठा खलबत्ता कधीच नव्हता. आता माझा मसाला पटकन कुटून होईल. बरं झालं वहिनी तुम्ही दिला. पोराचं लग्न करणार आहे. वाढत्या संसारात मला फार उपयोगी होईल. “

अगदी आनंदाने तिने तो नेला.

त्यादिवशी मनाला उगीचचं चुटपुट लागली.. सासूबाई… सासर्‍यांच्या आठवणींनी डोळे भरून आले..

घरातल्या एका कोपऱ्यात या निर्जीव वस्तू पडून असतात…

पण त्यांच्यावर आपला जीव जडलेला असतो… त्यामुळे त्या वस्तूची अडचण पण वाटत नसते. इतक्या वर्षाच्या संसारात या वस्तूंनी मोलाची साथ दिलेली असते… त्याच्याशी निगडित अनेक आठवणी असतात त्या विसरता येत नाहीत…

खलबत्ता योग्य ठिकाणी दिला याचं समाधान मात्र आहे. शारदा सांगत होती,

“वहिनी तुमचा खलबत्ता खूपजणी माझ्याकडून घेऊन जातात. सगळ्यांना त्याचा ऊपयोग होतोय”.

आपल्या नंतर मुलांना या वस्तूचं करायचं काय… हे कळणार नाही. त्यामुळे अशा वस्तू आत्ताच एक एक करत… घरातून काढत आहे.

मनात मात्र त्या कायमच्या आहेतच…

आज खूप दिवसांनी खलबत्त्याची आठवण आली. म्हणून आठवणींच्या पेटीतून ती बाहेर काढली..

अशा गोष्टींच्या आठवणीतही आनंद आहे…

 

… आता आठवणी काढू आणि आनंद घेऊ..

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares