मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जांभूळ आख्यान… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ जांभूळ आख्यान☆ शीला पतकी 

जांभूळ आख्यान नावाच नाटक खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं. त्याची कथा थोडक्यात अशी आहे… की एकदा पांडव वनविहाराला गेले असताना कर्ण द्रौपदीच्या दृष्टीला पडतो. आणि क्षणभर तिला त्याचा मोह होतो. आणि वाटतं की हा जर सहावा पांडव असता तर… हा विचार अगदी क्षणभरच येतो… कृष्णाला तिच्या मनातला हा भाव कळतो. द्रौपदी खरंतर तो विचार क्षणात झटकून टाकते… तरी तिला असा विचार आपल्या मनात कसा आला असं वाटतच राहतं… पण ते किती स्वाभाविक होतं ना कारण तो खरंच पहिला पांडव होताच ना… त्या सगळ्यांना खूप भूक लागते म्हणून फळे आणण्यासाठी त्यातील एक पांडव जातो… कुठेही फळं मिळत नाहीत केवळ. एका झाडाला एक जांभूळ लागलेल असत ते तो काढतो. तेव्हा तिथे तपश्चर्याला बसलेल्या ऋषींनी बारा वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर खाण्यासाठी ते जांभूळ राखून ठेवलेले असत हे जेव्हा त्या पांडवाला कळतं तेव्हा तो घाबरतो. ते ऋषी आपल्याला शाप देतील ही भीती वाटते. तो श्रीकृष्णाला ही गोष्ट सांगतो. कृष्ण तेव्हा सांगतो की पतिव्रता स्त्रीने ते झाडाला जर चिकटवलं तर ते पुन्हा लागून जाईल. मग आता द्रौपदी सारखी दुसरी पतिव्रता नाही… सगळे म्हणतात, जा बाई तू हे कर… ती मनोमन जाणून असते हे खरं नाहीये… आपल्या मनात क्षणभर का होईना पर पुरुषाचा विचार आला होता… आणि ती मनोमन श्रीकृष्णाचा धावा करते की, आता मला या पेचातून सोडव. आणि त्याच्या प्रतिमेला नमस्कार करून ती झाडाला जांभूळ चिकटवते. ते चिकटत पण ते उलट चिकटतं… असं का घडलं? … याचे उत्तर श्रीकृष्ण तिला सांगतो की, परपुरुषाचा विचार मनात आणल्यामुळे तुझ्यातून चूक झालेली आहे. त्या चुकीची जाणीव तुला सतत व्हावी म्हणून तुझ्या हातून चिकटवलेले ते जांभूळ उलट लागलं तुला सदैव याची खंत वाटली पाहिजे…

 इथे आख्यान संपत. बायकांच्या मनात पर पुरूषा विषयी कधीही लोभ निर्माण होता कामा नये… अगदी मनांत सुद्धा! …

आता याकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहूयात… एखाद्या पुरुषाला हे जांभूळ चिकटवण्याचा सांगितले असते तर… तर मला वाटतं सगळी जांभळं झाडाला उलटी चिकटली असती किंबहुना जांभळाचे झाडच उलटे झाल असत.

त्या कथेत शेवट सांगताना असं सांगितलं जातं की… म्हणून जांभळ खाल्लं तर आपली जीभ जांभळट होते… म्हणजे जांभूळ खाल्ल्याचे लपून राहत नाही जसे की पाप लपून राहत नाही… म्हणजे एखाद्या स्त्रीच्या कल्पनेत असलेला क्षणभर तिने कल्पना केलेला पुरुष तिच्या मनात आला तर तिच्या पातीव्रत्याचा भंग…! तिच्या हातून मोठे पाप घडले…! आणि पुरुषांच्या दिवसातनं दहा वेळा दहा बायकांबद्दल विचार येतात ते मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ…!

अगदी श्रीकृष्णांन सुद्धा बायकांवर अन्याय केला आहे… हे माझं मत तुम्हाला काय वाटतं…?

– – मी आत्ताच जांभळं आणली.. ते घेताना माझ्या डोक्यात हिच कथा होती. काहीतरी कारण सांगतात. खरंतर जांभळाला पूजेमध्ये ठेवू शकत नाही. पण द्राक्षाला ठेवतात का? किंवा ज्या फळांचे घोस असतात त्यांना तरी ठेवतात का? एक तर जांभूळ पिकल्यानंतर ते लगेच फुटतं. ते जास्त टिकत नाही. त्यामुळे कदाचित पूजेमध्ये त्याला ठेवता येत नसेल.. पण त्याच्या मागे ही कारण देणे चुकीचेच आहे.. कोणत्याही कारणांच्या मागे स्त्रियांना नीतिमत्ता शिकवणं ही एकेकाळची परंपराच होती. स्त्रियांना सगळे नियम आणि बंधन.. अर्थात याला अनेक कारणं आहेत.. कारण स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यात तीच सफर होते.. पुरुष नामानिराळे राहतात. म्हणून स्त्रियांचे चारित्र्य जपण्यासाठी अशा अनेक कथा निर्माण झाल्या असाव्यात..

आणि स्त्रियांना शिक्षण नसल्यामुळे त्या जास्त श्रद्धाळू म्हणा किंवा अंधश्रद्धाळू होत्या म्हणजे बाईने पुस्तक वाचलं तर नवरा मरतो अशा सगळ्या भयावह गोष्टी तिच्या माथी मारल्या आणि नवरा मेल्यावर बाईची अवस्था त्याकाळी खूप वाईट होती अगदी घरात कामाला मोलकरीण. बायकोचं बाळंतपण करायला घरात हक्काची बाई म्हणून दिर ठेवून घ्यायचे आणि छळायचे. शिक्षणाने खूप परिवर्तन झाले, समाजाला ते स्वीकारावेच लागले. काल माझ्या शेजारी एका मुलीची आई गेली ती डॉक्टर आहे आणि तिची बहीण प्राध्यापिका डॉक्टर असलेल्या मुलीने सर्व क्रिया कर्म मुलाप्रमाणे केले. आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यातील चार माणसं काय म्हणतील बाई ती चार बोलणारे नेहमीचे माणसे कोणीही बोलले नाहीत म्हणजे समाजामध्ये परिवर्तन घडवून आले हे नक्की! आणि ते नेमके शिक्षणानेच घडले यात वादच नाही. पण अशा भंपक गोष्टींमुळे मुली थोड्या अधिकच धीट झाल्या आणि कुटुंब व्यवस्था विस्कळीत व्हायला लागली आहे. आता संस्कार काहीतरी टिकून ठेवेल अन्यथा अवघड आहे…!

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”  ARE YOU DEAD?..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ARE YOU DEAD? ☆ संध्या बेडेकर ☆

काही लोक असे आहेत, जे सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर आपल्या गृप्स मध्ये पहिला मेसेज Good morning चा टाकतात.

बरोबर एखाद गुलाबाचे फूल पण पोस्ट करतात.

खरतर हा एक अभिवादन करायचा प्रकार आहे.

मी कधी कोणाला Good morning चा मेसेज पाठवत नाही. गुलदस्ता पाठवत नाही. आणि कोणी मेसेज पाठवला तर मी उत्तरही देत नाही. मला हे उगीचच, waste of time, काय गरज आहे या सगळ्याची? अस वाटत. बहुतेक यात माझा उद्धटपणा दिसतो.

काहीच रिसपोन्स मिळत नसल्यामुळेच, पूढे असे मेसेज मला येत नाहीत. कदाचित फारच शिष्ठ आहेत या असा शिक्का पण माझ्या नावावर मारला जात असावा.

वर्तमानपत्रात एक लेख वाचल्यावर या Good Morning msg कडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. आता हा असा मेसेज किती महत्वाचा असू शकतो. हे लक्षात आल.

दृष्टिकोन बदलला की विचार बदलतात.

हे खरय.

आता एका वेगळ्या अर्थाने Good morning msg पटला.

Are you dead? हा लेख वाचला.

चीन मध्ये हा app वापरणारे बरेच लोक आहेत. आजकाल फॅमिलीच्या नावाखाली जास्तीत जास्त 3 जणांची संख्या असते. त्यातील मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी, लग्न झाल्यावर दूर गेले की फॅमिलीत फक्त 2 जण उरतात. जसजस वय वाढत तस ज्येष्ठांच्या समस्यांना तोंड देत, एक वेळ अशीही येते की दोघांपैकी फॅमिलीत एकच उरतो.

आधीच्या काळात एका मुलाला वाढवायला आजूबाजूचे अनेक लोक असायचे. घरातच कमित कमि आठ दहा जण असायचे. आता तर हम दो हमारे दो हा हिशोब पण गेलाय, आता एकच.. किंवा मुल नकोच. आता DINK चा जमाना आहे (double income no kids), मग एकटे राहणार्यांचा नंबर वाढणारच. त्यात 996 कल्चर.

9 to9 job, मग इतक काम केल्यावर दोन दिवस आराम, भटकंतीत. 6 days busy. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या लोकांशी संबंध नाही, भेटीगाठी नाही, बोलण नाही. शेजारी कोण. राहतय? हे सुद्धा खूपदा माहित नसत. social life as such नाहीच.

अशा वेळेस त्यांच्या घरात काय घडलय/ काय घडतय? हे कळायला मार्ग नाही. त्यात privacy च्या नावाने वागण्या बोलण्यात मोकळीक नाही. विदेशी राहणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, तेही एक मोठ कारण आहेच.

आज single/ एकटे राहणार्यांची संख्या वाढतेय. त्याला कारण अनेक आहेत.

नोकरीमुळे दुसर्या शहरात जाणे, डायव्होर्स झाल्यावर, लग्न करायचे नाही, अशा विचारांचे पण बरेच आहेत. ऑफिस मधून घरी आल्यावर ही conference calls. Work culture अस झालय की आई-वडीलां बरोबरही बोलायला वेळ मिळत नाही. त्यामुळे

एकटेपणा ही समस्या फक्त जेष्ठांचीच आहे अस राहिलेल नाहिये.

 एका समृद्ध घरात एकटी राहणार्या वृद्ध स्री चे प्राण गेले, हे कळल केंव्हा? तर आठवड्याभरानंतर. या दरम्यान कधी कोणी फोन केला, रिंग गेली, फोन उचलला नाही… अस कदाचित झाल असेल. तर बाहेर गेल्या असतील अशी आपली समजूत करून, या बाबतीत कदाचित लक्ष दिल गेल नसेल.. काय नक्की झाल असाव? माहित नाही. पण कळल मात्र आठ दिवसांनी. हे बरोबर आहे का?

Are you dead?

 या app ला CHINA मध्ये छान response मिळाला/ मिळतोय.

एकटे राहणार्यांनी फक्त रोज तेथे एक बटन दाबायचे असते. आणि 

मी आहे

 I am there , I am in

 ही सूचना द्यायची. जर लगातार दोन दिवस हे बटन operate झाल नाही, तर काही problem असावा.

अस लक्षात येईल. त्या app वर registration करताना, काही महत्वाचे, तुमच्या नातेवाईकांचे फोन. नंबर नक्की घेतले असतीलच. त्यानुसार पूढचे काम करण सोप होईल.

मधून मधून वर्तमान पत्रात, TV वर या संदर्भात काही भयानक बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.

भारतात या app ची गरज आहे का?

आज भारतात 5% लोक एकटे राहतात.

ही संख्या वाढतच चाललीय.

आज तरी या प्रकारचा App भारतात नाही.

या प्रश्नावर काही उपाय आहे का?

मला वाटत

 जर आपला एक गृप असला, मग तो मित्र/मैत्रीणींचा, आपल्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा, ऑफिस मधला, समवयस्क मैत्रीणींचा, कोणताही असू शकतो.

त्या गृपवर फक्त

Good Morning msg रोज टाकायचाच असा नियम ठरवला तरी हा प्रश्न सूटू शकतो. नाही का?

आज खासकरून जेष्ठांसाठी अनेक संस्था काम करतायेत.

UP मध्ये 112 वर फोन केला तर लगेच मदद मिळते. तर केरल मध्ये एकटेपणा घालवायला Listener parlours 

 Manglore मध्ये sathi Shifts आहेत.

एकटे राहणार्यांच्या मनात… मला काही झाल तर लोकांना कळेल का? केंव्हा कळेल? हा प्रश्न भेडसावतोच.

काळजी कमी करण्याच एक रहस्य समजून घ्याव. उगीच कल्पनेत काळजी करत बसण्यापेक्षा काही तरी निर्णय घ्यावा. व्यक्त व्हाव.

जस शरीरात वेदना झाल्या की आपण डोॅक्टरकडे जातो, तसेच मनात काळजी / शंका / भीती असेल तर ती वेळेवर समजून व्यक्त होण आवश्यक आहे.

वेळेवर घेतलेल्या correct decision मुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.

No need to worries.

म्हणून रोज good morning चा मेसेज गृपमध्ये पाठवणे हा सरळ साधा सोपा उपाय चांगला आहे. सहज करण्यासारखाही आहे.

आयुष्यातील चुका जरी खोडता येत

नसल्या तरी दुरूस्त नक्किच करता येतात.

मी माझी चूक सुधारणार…

आजपासून मी good morning लिहिणार आणि अशा मेसेज ला उत्तरही नक्की देणार.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आम्हाला ५२ मुलं आहेत☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

– – आभाळात आपण इंद्रधनुष्य साकारू शकत नाही…

 पण कोणाच्या दारात रांगोळी तर काढू शकतो…

– – आभाळात आपण फुलांची झाडं लावू शकत नाही…

 पण कोणाच्या दारात फुलांचं झाड तर लावू शकतो…

 

फुलं एकतर आपल्या अंगणात पडतील किंवा दुसऱ्यांच्या… त्याने काय फरक पडतो…?

अंगण पाहून फुलं सुवास द्यायची थोडीच थांबतात…?

– – याच भावनेने या महिन्यात आपल्या सर्वांच्या साथीने जे काही थोडेफार जमलं ते केलं…!

 

आता जून महिना सुरू होईल, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या चिमण्यांचा चिवचिवाट या मे महिन्यात माझ्या मागे सुरू झाला आहे…

अंकील, काका, मामू, बाबा, बाबू, पप्पा, डाकसाब, भाऊ, भैय्या या नावाने हाक मारत अख्खा मे महिना या पोरा आणि पोरींनी माझा नुसता जीव खाल्ला आहे…

– – नवीन शाळा कॉलेजचा हंगाम आता सुरू होईल…

सर्वांना शाळा कॉलेजमध्ये जायची गडबड आहे, त्याआधी सर्वांना मापाचे युनिफॉर्म, शूज सॉक्स, शाळा, कॉलेजच्या फीया, दुरेघी / एकेरी वह्या, आवडणाऱ्या रंगाच्या वॉटर बॅग, आणि अजून लई काय काय…

पोरांनी नुसतं डोकं उठवलंय…!

 

पण दरवर्षी मी बाप होऊन जातो, दरवर्षी माझ्या घरात जून ते ऑगस्ट दरम्यान पाळणा हलतो…

I am blessed – – 

 

‘ए गपा रे, हाताची घडी तोंडावर बोट… ‘ पोरांवर डाफरून मी शिक्षकाच्या भूमिकेत येतो.

मलाच माझ्या लहानपणी शाळेत जायची इतकी इच्छा का नव्हती याचं कोडं मला अजून पडतं…

माझी इच्छा मग मी याच पोरांवर भागवून घेतो… तुमच्या मदतीने…!

 

तर सध्या मुलांना लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट घेणे, संस्थेला लागणारे आधार कार्ड, फोटो, त्यांचे रिझल्ट वगैरे वगैरे अशा गोष्टी घेणे, शाळेत / कॉलेजमध्ये जाऊन फी कन्फर्म करणे, कोणी ऑनलाईन फी घेतंय तर कोणाला कॅश हवी आहे, त्याचे लिस्टिंग करणे आणि दिवसभर फिरत राहणे…

मनीषा सोडून माझ्याकडे सोबतीला आणि मदतीला कोणी नाही…

… अख्खा महिना या चिमण्यांच्या भविष्यातल्या घरट्यांचा विचार करत गेला…!

 

तुम्हा सर्वांच्या घरात एक दोन किंवा तीन मुले असतील, शाळा कॉलेज जवळ आल्यानंतर ती तुमचं काय डोकं खात असतील? ते तुम्ही जाणताच…

– – शाळा कॉलेज ही मुलांची नसतातच, ती आई बापाची परीक्षा असते…!

… मला आणि मनीषाला 52 मुले आहेत… आता आमची परीक्षा सुरू झाली आहे…

आणि ती किती असेल याची आपण कल्पना करू शकता…

 

आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा संक्षिप्त… (In bulletted points) आपणास सविनय सादर – – 

 

– दवाखान्यात जे रुग्ण उपचार घेत आहेत त्यांना डबा आणून देणारा कोणीही नातेवाईक नाही, अशा सर्वांना जेवणाचे डबे देऊन आपणच नातेवाईक झालो…

… देत आपण आहात आम्ही फक्त हात झालो…

 

– रस्त्यावरील असहाय्य अवस्थेत जगणाऱ्या लोकांना कोणीही जेवण देत नाही अशांना आपण अन्नाचे दान तरी कसे म्हणू? दान करणारा मी कोण? आपल्या साथीने, त्यांची क्षुधा शांती केली आहे…

 

– ज्यांना घराबाहेर काढले आहे, अशा अनेक माऊली रस्त्यावर उन्हात अशाच तडफडत आहेत, जीव तव्यागत तापला आहे, आपल्या साथीने थंडगार पाणी त्यांच्या चेहऱ्यावर शिंपडून त्यांना रोज प्यायला थंड पाणी देत आहोत, तृष्णाशांती म्हणतात ती हीच असावी का…?

 

– अत्यंत क्रिटिकल केसेस ज्यांना कोणत्याही दवाखान्यात ऍडमिट केले जात नाही, अशांची जमेल तितकी सेवा रस्त्यावर करत आहे आणि त्यानंतर ओळखीने त्यांना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहे आणि आपण त्यांचे बिल भरत आहोत… आपण म्हणजे पुन्हा “आपणच”आम्ही नव्हे…!

 

– महिन्यात कितीतरी सणवार येतातच, आपल्या या रस्त्यावरील माऊलींना कोणी गोडधोड देत नाही आणि म्हणून त्यांना गोडधोडाचे जेवण दिले आहे, “आपण” आम्ही नव्हे…!

 

– ज्यांना हात नाहीत पाय नाहीत किंवा दोन्ही असून नसल्यासारखे, अशा सर्वांना वैद्यकीय उपकरणे देऊन खऱ्या अर्थाने पायावर उभे केले आहे, त्यांनी आता काहीतरी काम करावे यासाठी प्रयत्नात आहे.

– – अनेक ताईंना हातगाडी देऊन कामाला लावले.

– – 70 वर्षाच्या आजोबांना पुणे महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर स्वच्छता करण्याचे काम मिळवून दिले आहे.

– – भूक लागली की भीक मागणारे आमचे लोक त्यांच्याकडे जे जमा असेल ते मला जेऊ घालतात, हाताने… शाही जेवण कदाचित यालाच म्हणत असावेत…!

मी त्यांच्यात बसून हे खाताना, या कड़क उन्हात कोणी पदरानं वारा घालतं, कुणी पाणी भरवतं, तर कुणी घास तोंडात घालतं…

– – भिकेमधलं खाऊन सुद्धा, भिक्षेकर्‍यांसाठी काम करताना, मला मी कुठल्यातरी देशाचा राजा आहे किंवा बादशहा आहे असा फील मला येतो…

 

… मी कुणीही नसतानाही, मला हा फील देणाऱ्या माझ्या त्या प्रत्येक माऊलीला साष्टांग नमस्कार.

 

– अजूनही सांगण्यासारखं बरंच बरंच आणि बरंच काही आहे…

– किती लिहू? काय काय लिहू? कुठे थांबू? माझं मलाच कळत नाही.

 

हाताचे चार तुकडे झाले आहेत, पायाचा चुराडा झाला आहे, हाडं मोडून शरीराच्या बाहेर आली आहेत, डोकं फुटून मेंदू बाहेर आला आहे, खून होऊन पोटातली आतडी बाहेर आली आहेत, त्यांचे ऑपरेशन करतानाचे फोटो इत्यादी इत्यादी मी कधीही आजवर शेअर केले नाही. माझ्याकडे अशाच फोटोंची भरमार जास्त असते.

– – असे फोटो टाळून, लेखाजोखा लिहिणे आणि त्यातून खूप काळजीपूर्वक आपल्याला फोटो… तेही कोणाची ओळख न दाखवता मास्क करून दाखवणे… हे सुद्धा माझ्यासाठी महिन्याच्या शेवटी दिव्य असते, वेळ खाऊ असते…!

 

पण मला त्यात अत्यंत आनंद होतो… ,! – कारण आपल्या मदतीमधून काय काम झाले हे साधारणपणे आपल्याला कळवणे हे सुद्धा माझे मी परम कर्तव्य समजतो…

 

तर माऊली काही चुका भुला झाल्या असतील तर माफ करावे…

आज अकरा वर्ष 24 तास मी या क्षेत्रात आहे, केवळ आपल्यामुळे…!

तरीही माझं काहीतरी चुकत असेलच…

चुकत असेन तर पदरात घ्या…

– – आणि नाहीच चुका पदरात घेतल्या, तर मी जाऊ कुठे…????

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”Take it easy..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “Take it easy.. ☆ संध्या बेडेकर ☆

If your plans are not working out… Take it easy. 

इतक्यातच अजय अनिताचे लग्न झालय. अनिता छान हंसमुख मुलगी आहे. बडबडी आहे. तिच्या पोटात काही रहात नाही. ऑफिस मधल्या गमती जमती, मैत्रीणींच्या गोष्टी, त्या आमच्या ओळखीच्या असो वा नसो सर्व सांगते. मी अगदी मन लावून ऐकते. हा तिच्या स्वभावाचा चांगला पार्ट आहे. उद्या या नवीन घरातील तिला काही आवडल नाही, तर ती स्पष्ट बोलेल. आतल्या गाठीची नाही, हे चांगल आहे. नाहीतर मनात एकत्र केलेल्या गोष्टींचा स्फोट व्हायचा. आम्ही सगळेच खुश आहोत. आमचे हे तसे अबोल आहेत, त्यांच्या बरोबर पण छान गप्पा मारते. यांच्यातला बदल मला आवडलाय. अबोल माणसाला समजायला उशीर लागतो. गैरसमज व्हायचे चांन्सेस जास्त असतात.

संवाद असला तर अनेक प्रश्न उद्भवतच नाही. नवीन माणसांबरोबर आपण सहज adjust होऊ शकतो.. बोलण्याने स्वभावाचा कल कळतो. विचार कळतात. आवडी निवडी कळतात.

नेहमी एकत्र रहाण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या असतात.

हे दोन्ही पार्टी साठी आवश्यक आहे.

आज मी सकाळी बटाट रस्सा केला. बरोबर चार जास्तीचे बटाटे उकडून ठेवले. अनिताला डब्यात रस्सा भाजी आवडत नाही. सूखी भाजी आवडते. हे तिने एकदा बोलताना सहज सांगीतल होत. आज तिला दोसा भाजी डब्यात दिली. हे अस सहजच मला करता आल. कारण माहित होत.

ऑफिस मधून आल्यावर आमचा गप्पा टप्पा सेशन चालतो. तेंव्हा तिने सांगितल होत.

आज अनिताला बर नव्हत. थोडा ताप होताच. बाबांनी तिला कारने ऑफिस मध्ये सोडल. ऑफिस सुटल्यावर किंवा आवश्यकता वाटली तर कळव, घ्यायला येईन म्हणाले.

संध्याकाळी अनिताला रोजपेक्षा यायला

उशीर झाला. आधी मिटिंग्स नंतर तीनदा बुक केलेली टॅक्सी केंसल झाली. यात वेळ गेला.

घरी आल्यावर सर्व किस्सा कळला.

मी म्हंटल… अग! बाबांना बोलवायच ना घ्यायला. आधीच तुला बर नाही.

अनिता म्हणाली… Its ok आई.

अहो! एवढ काही झाल नाही हो.

मी ऑफिसमध्ये दुपारी औषध घेतल होत. मी मुद्दामच बाबाना किंवा अजयला बोलवल नाही. उगाचच संध्याकाळच्या गर्दीत त्याना ड्रायव्हिंग कराव लागल असत.

आई मी आधी अशी नव्हते. मी ठरवलेल काही झाल नाही की मला खूप त्रास व्हाचा, चिडचिड व्हायची. घर डोक्यावर घ्यायची मी. मला पण माझी चूक कळत होती. कधी कधी…

आयुष्यात अशा काही घटनां घडतात. त्याबघून आपल्यात बदल होतो. माझ पण असच झाल.

सुनिता विलियम्स आणि बेरी विलमोर आठ दिवसांसाठी स्पेस मध्ये गेले होते, पण आले मात्र 286 दिवसानंतर. म्हणजे आठ दिवसांच्या ट्रीपवर गेलेला माणूस अक्षरशः वर्षभरानंतर परत येतो. ही ट्रीप काही सामान्य, आनंदाची नव्हतीच. फ्रेश हवा नाही, जेवण नाही परिस्थिती एकदम वेगळीच… unnatural… unfavourable परिस्थितीवर त्यांचा काहीच कंट्रोल नव्हता. फक्त शांत राहण आणि वाट बघण एवढच काय ते करू शकत होते. Return flight चे option त्यांच्याकडे नव्हतेच.

ही घटना माझ्यासाठी एक *learning lesson* च होता. टॅक्सी कैंसल होणे, ऊशीरा मिळणे, interview मध्ये rejection, एखाद महत्वपूर्ण काम डिले होणे, डील कैंसल होणे, या गोष्टी मला आधी खूप डिस्टर्ब करायच्या.. तस बघीतल तर अस होण खरतर किती common आहे.. सहज शक्य असत. पण आपल्याला ते सहन होत नाही.

पेशन्स, तक्रार न करता एखादी डिफिकल्ट सिच्युएशन फेस करण, दीर्घकाळ एखादे कठीण काम चिकाटीने करत राहण. ही क्षमता, सहनशीलता, चिकाटी तेही 286 दिवस… 

Hats off to these legends for not just surviving, but making history. 

आता जेंव्हा कधी मी कधी डिफिकल्ट सिच्युएशन फेस करते, तेंव्हा मी स्वतःलाच समजावते…

Thank god… Atleast I am not stranded in space. 

आयुष्य म्हणजे roller-coaster ride. कधी तरी up-down होणारच. गुगली, बाउन्सर्स खेळावेच लागणार.

So, conclusion is

If your plans are not working out properly… Take it easy. 

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आजी…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आजी…☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नमस्कार, मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो. त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या.. एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात.. मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो.. मग त्या रुसून बसतात.. मग मी त्यांना ‘म्हातारे’ म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो.

ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार..? गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते.. डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते.. मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो, तिचाही आणि माझाही.. मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते..!

हे मी रोजच गणित सांगितलं. असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं.. (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो) दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो…!

आत्ता वरच्या आजीचा फोटो पाठवीत आहे, ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने. सुनेला आजी (सासू) अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही. बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही. या आजीनं जगायचं कसं…? म्हणून ती एका परिसरात भीक मागायला येते. (राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत, परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भिक मागावी लागते.)

तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच…! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”.. अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो. तेवढ्यात ही आजी पाठीमागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती.

आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष.. जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप. तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो. तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही… ”

ती म्हणाली, “माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…?” असं म्हणून ती तोंड पाडून निघाली…!

मला वाईट वाटलं. पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “मी तुला खरच लांबचा वाटतो…???”

“न्हाय रं बाळा, तूच तर माझा मुलगा हायस.. असं म्हणत तिने माझ्या डोक्यावर हात ठेवून बोटं कडाकडा मोडली. युद्ध तिथंच संपलं…

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “म्हातारे, सगळंच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत… ”

ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या…!!!”

तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं. ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…??? त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं… परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात यात खूप फरक आहे..

स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं… काय म्हणू या दातृत्वाला..?? एरव्ही शे 200 किलो डोक्यावर, अंगावर, खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी.. पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना. तीच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती.

बॅग उचलता उचलता ती म्हणाली, “तू हे माझ्यासमोर खा… ”

मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या. ती भरून पावली.. देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो..

मला नेहमी असं वाटतं, देव, देवी, अल्ला, ईश्वर, येशु हे आता मंदिर, मस्जिद, चर्च, , गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत, माणूस, माणूसच आहे का हे पाहायला..? हि आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…? माहित नाही…

आजी समोर खाल्लेला एक घास! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली. कशी कोण जाणे? मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली. तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता. आजीही गालातल्या गालात हसत होती.

खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो. सहज मागं वळून पाहिलं. सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती.

आपले स्नेहांकित,

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गृहीत धरलं जाण्याचा त्रास जास्त होतो” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “गृहीत धरलं जाण्याचा त्रास जास्त होतो…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

संध्याकाळची वेळ, सविताच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ. काय करावं हे सुचत नव्हतं. घरातल्या घरात येरझारा चालू असताना समोर डाळिंब दिसल्यावर सवीताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकाग्र चित्तानं डाळिंब सोलणं हा तिचा आवडता उद्योग. रोजच्या पेक्षा हटके गोष्ट केल्यानं मन शांत होतं हा आजवरचा अनुभव. डाळिंबाची सालं काढून एकेक दाणा साफ करत मोकळा करून भांड्यात ठेवयाचा आणि आख्ख सोलून झाल्यानंतर मगच खायचं. हा ठरलेला कार्यक्रम. थोडं कंटाळवाणं, वेळखाऊ काम पण सविताला छान वाटायचं.

एकाग्र होऊन डाळिंब सोलताना सविताच्या मनातली अस्वस्थता कमी झाली. डोकं शांत झालं.

तितक्यात मोबाईलवर बोलत मुलगी आली आणि तिनं थेट भांड्यात हात घालून डाळिंबाच्या दाण्यांचा बकाणा भरला आणि मूठभर दाणे घेऊन खोलीत गेली. काही वेळानं चिरंजीव आले त्यानीसुद्धा तसंच केलं. सविता मोठ्यानं ओरडली पण दोघांनी साफ दुर्लक्ष केलं. सविताच्या ओरडण्याचा काडीचाही फरक पडला नाही. नंतर ऑफिसवरुन आलेल्या नवरोबांनी मुलांचा कित्ता गिरवला. बघता बघता डाळिंब संपलं. सविता प्रचंड संतापली. रिकामं भांड पाहून आलेला हुंदका कसाबसा आवरला. खूप वाईट वाटलं. डोळ्यात पाणी आलं. घरात आपली गरज फक्त कामापूरती… काही किंमतच नाही या भावनेनं दुखावलेल्या सवितानं रिकामं भांडं जोरात फेकलं. आवाज ऐकून रूममधून मुलं आणि बेडरूममधून नवरा हॉलमध्ये धावत आले. सवीताचा आवेश पाहून “काय झालं” विचारायची हिम्मत कोणीच केली नाही उलट हॉलभर पसरलेल्या डाळिंबांच्या साली मुलीनं निमूटपणे गोळा केल्या. मुलानं भांडं उचललं आणि साफ करून शेल्फमध्ये ठेवलं. झाडू घेऊन साफसफाई सुरू केली आणि नवऱ्यानं ताबडतोब दुसरं डाळिंब सोलायला घेतलं.

डाळिंब फक्त एक निमित्त. सविताला खाण्यासाठी आहे की नाही याची जाणीवही कोणाला झाली नाही आणि कोणी तिचा विचारही केला नाही. नेमकं हेच सविताच्या जिव्हारी लागलं.

तसं पहायला गेलं तर ही अतिशय क्षुल्लक बाब पण घराघरात हेच घडतं.

अनेकदा आपल्या माणसाला गृहीत धरतो. त्यांच्या मनाचा विचारच करत नाही. खासकरून घरातल्या महिलांच्या बाबतीत असं सर्रास घडतं. कोणी मुद्दाम असं करत नाही पण बऱ्याचदा होतं.

मुद्दा छोटाच पण विचार करण्यासारखा – – – 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुछ तो लोंग कहेंगेही… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ कुछ तो लोंग कहेंगेही☆ शीला पतकी 

आपल्या आई वडिलांना सुद्धा काही वेळा आपली हुशारी कळत नाही. मी आमच्या घरात विज्ञानाचे प्रयोग करत बसायची. मग त्याचा रंग देणे – खिळे मारणे हे माझ्या हातून व्हायचं नाही. ते मी आमच्या कामवाल्या बाईच्या नवऱ्याकडून करून घ्यायची.

– – एकदा चक्क मी ‘ तिहेरी उपयुक्त शेगडी ‘ नावाचं उपकरण तयार केले.

घरात आमच्या एक जुनं कुकर पडलं होतं – किर्लोस्कर कंपनीच! डबे डबे जोडलेले. माझ्या डोक्यात रात्री तीन वाजता ही कल्पना आली की याच्यामध्ये वाफ सोडली तर, (ते वाफेवर होणार कुकर होतं) म्हणजे त्या प्रत्येक डब्याला आतून एक नळीचा कनेक्शन होतं – म्हणजे पहिल्या डब्यातली वाफ दुसऱ्या डब्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या या पद्धतीने..! ते मी शाळेत घेऊन गेले. नळाची शेगडी तयार केली. त्या नळातनं कमी व्यासाचा एक तांब्याचा पाईप आत मध्ये फिट केला. नळातून पाणी सोडल्यावर ते गरम होऊन बाहेर यायचं.. आत मध्ये बसवलेल्या तांब्याच्या नळातलं पाणी.. त्याची गरम वाफ होत असे, कारण शेगडीच्या आत तापमान जास्त.. त्या नळीवर कोळसा असायचा ना. तांब्याची नळी आणि कमी व्यास त्यामुळे 

ती वाफ शेतावर फवारणी करतो तो पाईप असतो ना त्याच्याद्वारे त्या कुकरला जोडून आत सोडली. एका वेळेला तीन वस्तू होत होत्या.. म्हणजे शेगडी, शेगडी सारखी… बाजूला नळ जोडलेले.. याच्यातून पाणी येत होतं ते 56-57 अंश सेल्सिअस इतकं गरम, आणि डब्यामध्ये डाळ तांदूळ आणि बटाटे – – 

– – ४0 मिनिटात शिजवून तयार…! 

… कुकर शेगडीवर ठेवलेला नाही, ते सगळं वाफेवर व्हायचे. हे असलं काही काम मी घरात करत बसले की वडील आमच्या आईला सांगायचे, ” काय करते की येडं कुणास ठाऊक. काहीतरी जुनंपानं घेऊन खटपट करत बसतय झालं.. नादिष्ट आहे. कसे व्हायचे या पोरीचे कुणास ठाऊक?” घरात अशी चर्चाही चालायची. आई म्हणायची, “ जाऊदे, काहीतरी करून ती आपला आनंद घेतेना.. राहू दे “…

– – या उपक्रमाला राष्ट्रपती-सन्मान प्राप्त झाला त्यावेळेला रेडिओ होता. सातच्या बातम्यात त्याचा सन्मान झाल्याचेही सांगितले. लखनऊ येथील प्रदर्शनात त्याची मांडणी झाली. तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय झैलसिंग यांनी गाडीतून उतरून उपकरण पाहून याचे अतिशय कौतुक केले. लखनऊच्या सर्व वृत्तपत्रांनी मुलाखती घेतल्या. इथे आल्यावर आमचे सोलापुरात अनेक ठिकाणी सत्कार झाले. कारण त्या काळात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या एक दोनच शाळा होत्या. आता सुद्धा कमीच आहेत. सर्वत्र माझं कोड कौतुक…! वृत्तपत्रात मुलाखती… शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी, घरी बोलावून सत्कार केले. – – पण आमच्या घरात – –

काय येडं काहीतरी करतंय झालं… ही प्रतिक्रिया होती. चालायचंच.. प्रेमापोटी बोलतात ते.

एकूण काय… कोण काय म्हणते याकडे फारसं लक्ष देऊ नये. यावर मी काल एक व्हिडिओ पाहिला.. चार छान सुटाबुटातली माणसं.. समोर एक माणूस उभा आहे.. ती चार माणसं एकत्र बोलत होती…

“आपण नेहमी विचार करतो ना की चार लोक काय म्हणतील?… ते चार लोक आम्हीच आहोत… आम्ही काही म्हणणार नाही…! आणि इथं ती फिल्म संपते.

– – – थोडक्यात काय.. तर आपण विचार करू नये.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बॅंकेतल्या मुली ! – लेखक : हेमंत खेर  ☆ श्री सुभाष धारणकर ☆

श्री सुभाष धारणकर

? मनमंजुषेतून ?

☆ बॅंकेतल्या मुली ! – लेखक : हेमंत खेर ☆ श्री सुभाष धारणकर 

बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंक शाखा उघडण्याचे प्रमाण वाढले आणि सेवा भरतीही वाढली. १९७४ ते १९९२ पर्यंत बॅंका, जनरल इन्शुरन्स, एल्आयसी ह्या मध्ये स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून भरपूर भरती झाली. ह्या भरतीत महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पांढरपेशा आणि तुलनेने सुरक्षीत वातावरणातील कार्य संस्कृती मुळे ही क्षेत्रे त्यांना भावली. प्रथमच शिक्षीका, नर्सिंग, पोस्ट आणि सरकारी विभागा बाहेर एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. महिला सक्षमीकरण हा शब्द खूप नंतर आला. त्या आधीच ही शांततापूर्ण क्रांती झाली होती.

बॅंक व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी सुद्धा सहानुभूतीचा आणि काहीसा उदार दृष्टिकोन स्विकारून ह्या महिलांचे जिणे सुखकर केले.

मी १९८४ साली बॅंकेत लागलो. आमच्या बरोबरचे सहकारी जवळपास सगळे गरीब ते कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आले होते.

ह्या मुली सुद्धा अशाच परिवारातून आल्या होत्या. आपल्या बरोबर काटकसरीचे, निगुतीने काम करण्याचे, पापभिरू संस्कार घेऊन आलेल्या. जबाबदारीची जाणीव असलेल्या. काही जणींनी बॅंकेत प्रेमविवाह केले. तरी बहुतांशी जणींचे विवाह पारंपारिक मार्गाने झाले. उच्छृंखलपणा अत्यंत अपवादात्मक होता. नटवेपणाही जवळपास नव्हताच (बऱ्याच जणींनी आपल्या मुलीं बरोबर वा मुलांच्या लग्नात ब्युटी पार्लर बघितले असावे)

आणि कधी काळी कुणी केलाच तर केस हाताबाहेर जाऊ न देण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. मत्सर हा स्त्रीसुलभ असला तरिही सहकार्य आणि सांभाळून घेणं असायचं. अनेकदा सासुरवास भोगणाऱ्यांना बॅंकेत एकमेकींशी बोलून मन मोकळं करता येत असे.

आजच्या तुलनेत तेंव्हा स्वातंत्र्य कमी होतं जबादाऱ्या जास्त होत्या. मुलाबाळांचे करण्यात वेळ मिळत नसे. सासू सासरे छान आणि नातवंडांना सांभाळतायत असं दृष्य कमीच.

खरं तर आमच्या पिढीचे नशीब म्हणजे आधी आई वडिल, सासू सासरे ह्यांची सेवा आणि नंतर मुलांची सेवा.

ह्या मुलींनी हसत हसत सगळं केलं. घरं बांधली, पर्यटन केलं, कर्ज काढून वस्तू केल्या.

अपवाद वगळता फार कोणी प्रमोशनच्या मागे लागल्या नाहीत. पण ज्यांनी घेतली त्या कुठेच कमी पडल्या नाहीत.

एकेकाळी जाड आणि जड लेजर उचलणाऱ्या. काऊंटर, खुर्च्या पुरुषांच्या उंचीच्या विचाराने असत त्यावर उशा टाकून किंवा जुनी लेजर टाकून बसणाऱ्या मुली, सफाईदारपणे संगणक चालवू लागल्या. नाकावर आलेल्या चष्म्यातून स्क्रीन पाहू लागल्या.

जवळपास सर्वांच्याच मुलांनी छान शिक्षण घेतलं. देश विदेशात कर्तृत्व गाजवत आहेत.

ह्या मुलींनी काय दिलं? त्यांच्या मुळे कार्यालयात सभ्यपणा टिकून राहिला.

येणाऱ्या अडाणी महिला ग्राहकांना आधार वाटला. समाजातील महिलांचे स्थान उंचावले.

माझ्या बदल्यांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला आमच्या पिढीच्या ह्या प्रतिनिधी भेटल्या.

त्यावेळी लढणाऱ्या मुली आज निवृत्त होत आहेत. जवळपास सर्व जणी आज निवृत्त होऊन सासू, आजी ह्या रोल मध्ये गेल्या आहेत. आमच्या पिढीने झगडून मिळवलेली पेन्शन अजूनही त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

त्यांनी चाललेल्या वाटेचा आज महामार्ग झाला आहे.

हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मागच्या महिन्यात सिनकर मॅडम निवृत्त झाल्या. आणि ह्या महिन्यात लोटलीकर मॅडम निवृत्त होतील. त्यांना शुभेच्छा.

– वर सांगितलेल्या पिढीतील या बहुतेक शेवटच्या प्रतिनिधी.

त्यांना शुभेच्छा देताना हे विचार मनात आले. ते दिवस पुन्हा आठवले. म्हणून जमेल तसं लिहिलं. (काही चुकलं असेल तर कान उपटायला अजूनही अनेक जणी समर्थ आहेत.)

त्या सर्व सहकाऱ्यांना सादर प्रणाम आणि स्मरण.

लेखक : हेमंत खेर

प्रस्तुती : सुभाष धारणकर

बिबवेवाडी, पुणे. भ्र. ध्व. ९४२३००२९५४ ध्व. क्र. ०२०-२६९६००६४. ईमेल – address-subhashdharankar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कॅलेंडरमधली क्रांती… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

??

☆ कॅलेंडरमधली क्रांती… लेखिका : तृप्ती देव ☆ प्रस्तुती – उज्ज्वला केळकर

जेव्हा सासूने सुरू केला वजा मास‘!

सध्या सगळीकडे तीन वर्षांनी येणाऱ्या पारंपारिक अधिक मासाची, म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची जोरदार रेलचेल सुरू आहे. मुली-जावयांना हक्काने घरी बोलवणं, चांदीच्या ताटात पुरणपोळीचं सुग्रास जेवण देणं, आणि ते ३३ अनरसे देऊन जावयाला ‘लक्ष्मी-नारायण’ मानून त्याचे लाड पुरवणं सुरू आहे.

परवा दुपारी मी सुद्धा माझ्या घराच्या सोफ्यावर बसून जावयाला काय काय खरेदी करायची, याची मोठी यादी करत होते. माझा नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. बदल हवा असं त्यांना कधी वाटत नाही. बदल केला तर नक्कीच तो चांगला असं असं वाटतं.

जावयाच्या खरेदीची यादी बनवता बनवता अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. मी हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि नवऱ्यालाम्हटलं, “अहो ऐकलंत का? जावई दुसऱ्याच्या घरातून आपल्याकडे दोन दिवस पाहुणा म्हणून येतो, तर आपण त्याला देव मानून त्याचे एवढे लाड करतो. पण जी मुलगी तिचं हसतं-खेळतं माहेर सोडून, स्वतःचं आडनाव बदलून, आपलं घर साभाळायला ‘सून’ म्हणून येते… तिच्यासाठी कॅलेंडरमध्ये असा एकही महिना का नसावा? म्हणून मी ठरवलंय, या अधिक मासाला छेद देत मी माझ्या सुनेसाठी कॅलेंडरमध्ये एक नवीनच सण सुरू करणार आहे— ज्याचं नाव असेल ‘वजा मास’!”

माझं हे बोलणं ऐकून नवऱ्यानी वर्तमानपत्र खाली ठेवलं, चष्मा नाकावर सरकवला आणि आश्चर्याने म्हणाले, “हा कुठला नवीन मास? कॅलेंडरमध्ये जेमतेम १२ महिने असतात, १३ वा अधिक मास असतो. हा ‘वजा मास’ कुठून टपकला?”

मी त्यांना हसून समजावून सांगितलं की, ‘वजा’ म्हणजे वजाबाकी नाही, तर सुनेच्या डोक्यावरचा घरचा, स्वयंपाकघराचा आणि जबाबदाऱ्यांचा सगळा ताण महिनाभरासाठी ‘वजा’ करणे! हा संपूर्ण महिना तिने फक्त तिचं आयुष्य बिंधास्त आणि आनंदाने जगायचं.

तेवढ्यात माझा मुलगा आणि सून दिवसभराचं काम आटपून घरात आले. सुनेच्या एका हातात कष्टाची पिशवी होती आणि दुसऱ्या हातात बाजाराची भाजी. तिची ती दमलेली अवस्था बघून मी लगेच तिच्या हातातली भाजीची पिशवी बाजूला घेतली आणि तिला प्रेमाने पाटावर बसवलं. मी घरात जाहीर केलं की, आजपासून या घरात माझ्या सुनेसाठी ‘वजा मास’ लागू झाला आहे!

सुनेने आश्चर्याने विचारलं, “वजा मास? आई, म्हणजे नक्की काय?”

मी तिला सांगितलं की, या संपूर्ण महिन्यात तुला स्वयंपाकघरात पाऊल ठेवायला सक्त मनाई असेल. जावयाला ५६ भोग चालतात ना? मग माझ्या सुनेला महिनाभर तिच्या आवडीचे पुरणपोळी, श्रीखंड-पूरी आणि सुग्रास जेवण तिची सासू स्वतःच्या हाताने बनवून भरवणार! सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तिने फक्त सुखात बसायचं. “रात्री जेवणात काय बनवू?” हा प्रश्न तिच्या आयुष्यातून महिनाभरासाठी वजा केला जाईल.

मुलाने मध्येच विचारलं, “बरं, आणि हिची हौसमौज?” त्यावर मी मुलाला फर्मान सोडलं की, या महिन्यात सुनेला तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला, बाजारात जाऊन हवी ती खरेदी करायला घरची तिजोरी खुली असेल! तिच्या आनंदावर आणि खर्चावर घरातून एकही प्रश्न विचारला जाणार नाही. साडी नेसण्याची किंवा घरकामाची अजिबात सक्ती नाही, अगदी सुती आणि सुटसुटीत कपड्यांमध्ये तिने फिरावं. रात्री हवं तितकं जागावं आणि सकाळी मनासारखं उशिरा उठावं, हिला घरात कोणीही उठवणार नाही!

माझा हा मराठमोळा आणि कल्पक विचार ऐकून सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती गदगद होऊन म्हणाली, “आई… खरंच? आजपर्यंत सासरी आल्यावर फक्त जबाबदाऱ्या वाढतात हेच ऐकलं होतं. पण सासू आपल्यासाठी असा विचार करू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये!”

मी तिचे डोळे पुसले आणि म्हटलं, “विश्वास ठेव बाळा! जावयाला आपण विष्णू रूप मानतो, पण सून तर साक्षात चालती-बोलती गृहलक्ष्मी असते. या वजा मासाच्या शेवटच्या दिवशी मी तुझी चांदीच्या ताटात ओवाळणी करणार आणि जावयाच्या ३३ अनरशांच्या ऐवजी, तुला तुझ्या आवडीच्या ३३ सुंदर वस्तू सासरकडून वाण म्हणून मिळणार!”

हे सगळं ऐकून माझे कारभारीही हळवे झाले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि मुलाला म्हणाले, “बाळा, काढ घरची तिजोरी आणि दे हिच्या हातात… आजपासून घरात वजा मास लागू! आजपर्यंत आम्ही पुरुषांनी फक्त जुन्या परंपरा पाळल्या, पण नात्याला इतकं मायेचं आणि सुंदर रूप देता येतं, हे तुझ्या आईकडून शिकायला मिळालं. ” मुलानेही हसत हसत आईच्या या निर्णयाला होकार दिला.

सुनेने जेव्हा मला प्रेमाने मिठी मारली, तेव्हा मला जाणवलं की, परंपरा फक्त जुन्या चौकटीत जगण्यात नसते, तर नव्या पिढीला पोटच्या मुलीसारखं समजून घेऊन नात्यांना नवा श्वास देण्यात असते. जर प्रत्येक सासूने सुनेला अशी मायेची सुट्टी दिली आणि स्त्रीने स्त्रीचा असा आदर केला, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक घर स्वर्गासारखं सुंदर होईल.

मी तर माझ्या कॅलेंडरमध्ये ‘वजा मास’ लिहून ठेवलाय, आणि माझी सून सासरी यायला आता रडत नाही, तर हसत हसत येणार आहे!

जावई हा केवळ पाहुणा असतो, पण सून ही नव्या पिढीला आणि वंशाला जन्म देणारी, संपूर्ण घराला उजळवून टाकणारी साक्षात महालक्ष्मी असते!”

 

त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अधिक मासाचे अनरसे जावयाला भरवताना, आपल्या घरच्या लक्ष्मीच्या सुट्टीचा ‘वजा मास’ ठरवायला विसरू नका. सासूबाईंनो, कंबर कसा आणि कामाला लागा; कारण सुनेचा चेहरा खुलला की संपूर्ण घर कसं कडाडून हसतं!

बाकी, आमचा हा ‘वजा मास’ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातल्या सुनेला हा सुखद धक्का कधी देताय?

लेखिका : सौ तृप्ती देव

भिलाई छत्तीसगड

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈ संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”BAD PATCH..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “BAD PATCH.. ☆ संध्या बेडेकर ☆

“दूसरों को नहीं खुद को समझाना सबसे बड़ी चुनौती होती है।”

आयुष्य म्हणजे roller coaster ride, चढ उतार, चार धागे सुखाचे तर दहा धागे दुःखाचे. कधी स्वतः च्या चूकीमुळे तर कधी दूसऱ्यांच्या, कधी निर्णय चूकतात म्हणून, तर कधी (+, -, ×, ÷) ही चिन्हे योग्य वेळी, योग्य जागी वापरली जात नाहीत म्हणून. कधी ते सर्व आपल्या नशिबातच होत, असं समजून, वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. आयुष्य कधीच एक रंगी नसत. यात बघायला गेलं तर दोष असा कोणाचाच नसतो. वयाप्रमाणे अनुभव मिळतो, समज वाढते. हळूहळू आपण शहाणे होत जातो. प्रश्नांना हाताळायची कला आत्मसात करतो.

घर, बाहेर, ऑफिस अशा अनेक जागी काही ना काही चालूच असते. कधी कधी तर सर्व दिशांनी अटॅक होतो. म्हणजे अगदी वॉशिंग मशीन मध्ये जसे कपडे धुतले जातात ना, तसेच गोल गोल फिरत राहतो. एक प्रश्न सोडवा, जरा श्वास घ्या, तर दुसरा हजर. कदाचित त्यांनंतर आपण जास्त चकचकीत, हुशार होऊन आयुष्यात येणाऱ्या पूढच्या प्रश्नांना जास्त आत्मविश्वासाने उत्तर देण्यास समर्थ होत जातो. विचारांची क्लॅरिटी वाढते.

प्रश्न आयुष्याच्या प्रत्येक फेज मध्ये असतातच.

मला काही ही problem नाही. असं म्हणणारे या जगात कोणीच नाही. प्रोब्लेम ची डिग्री कमी जास्त असू शकते.

अडचणी आल्या की माणसाला सर्व दोष दिसतात गृहदोष, वास्तूदोष, पितृदोष सर्व दोष दिसतात. देव आठवतात.

आयुष्यात दुःख आहेत, म्हणून तर देव आहे. देऊळ आहे. नाही तर देवाला सुद्धा कोणी विचारलं नसतं बहुतेक. शनिवारी शनी देवता, मंगळवारी बजरंग बली ला कोणी विचारलं असतं का?? फक्त देवावर माझी श्रद्धा आहे, या विचाराने जाणारे किती लोक असतात??

देव सुद्धा म्हणत असेल,

अरे!! कधी फक्त भेटायला ही येत जा, नेहमी काही तरी मागायलाच येतो. बरे असो

तरीही आयुष्य छान, सुंदर, आनंदी असूच शकत. नाही का?? कारण,

“Happiness is not the absence of problems but it’s our ability to deal with them. ”

देवही आपल्याला त्याच समस्या देतो, ज्या सोडविण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यात आपण उत्तीर्ण होणार, याची देवाला खात्री असते.

समजा एखादा प्रोब्लेम आलाच आणि जास्त दिवस घरात जम ठोकून बसलाच, तर थोडा काळ शांत बसावं. थोडा विसावा घ्यावा. प्रत्येक दुःखाचे ही एक ठराविक वय असतच. या BAD PATCH ला जाऊ द्यावे. आणि मग नव्याने सुरुवात केली तर काय हरकत आहे?? काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून दिल्या तर त्रासही कमी होतो.

माझी आजी नेहमी म्हणायची,

सुख मिरवायचे नाही, दुःख गिरवायचे नाही.

प्रोब्लेम नेहमी मोठेच असतात, असं नाही. खूपदा तर प्रोब्लेम्स, self created असतात. म्हणजे,

चढाओढ one up ship कार्यक्रम,  सर्व गोष्टी माझ्या मनासारख्याच झाल्या पाहिजे हा आग्रह,  लवकर श्रीमंत व्हायची इच्छा, उसकी साड़ी मेरे साड़ीसे सफ़ेद कैसे?? हा असा स्वभाव, काल्पनिक भीती, हे सर्व स्वतः च निर्माण केलेले अनावश्यक प्रोब्लेम असतात. दुसऱ्यांचे सुख बघून त्रस्त होणारेही असतातच.

आयुष्य म्हणजे सापसीढी चां खेळ. नवऱ्या बरोबर कागदी पत्रिकेत न जुळलेल्या गुणांबरोबर जुळवून घेण्याची कसरत, आयुष्य म्हणजे नियतीने जे पत्ते तुमच्या हातात दिले आहेत, त्यांचा चांगला डाव मांडणे, आयुष्य म्हणजे एक प्रवास हसत पूर्ण करायचा की रडतखडत करायचा ही प्रत्येकाची इच्छा.

आयुष्याच्या महाभारतात स्वतःलाच कधी कृष्ण, कधी अर्जुन बनून, रोज स्वतः च आपल्या रथाचा सारथी बनून लढाई जिंकायची असते. कधी कधी दोन पाऊल मागे घेण्यातही जीत दडलेली असते.

म्हणतात ना.

जीतने वाला ही नहीं, बल्कि कहां पे क्या हारना हैं । ये जानने वाला भी सिकंदर होता हैं।

कठीण काळात. दुसऱ्याला समजविण्यापेक्षा स्वतः ला समजाविणे हे सगळ्यात मोठ चॅलेंज आपल्या समोर असत.

म्हणतात ना,

जिंदगी में आप तब तक नहीं हार सकते, जब तक आप स्वयंसे ना हारो।

नियतीने आपली Excel Sheet तयार ठेवली आहे. आपल्या आयुष्यात कोण, कधी? केंव्हा? भेटणार?? काय घडणार?? हे script तयार आहे. तेंव्हा या सिनेमात आपल्याला काम करायचे आहे. आपला रोल ठरलेला आहे. त्यात आपल्याला काही खोडाखाड करता येणार नाही.

जे आहे ते आहे. तेच मान्य करायचे. देवाच्या/ नियतीच्या script वर पूर्ण विश्वास ठेवायचा.

जे होईल ते चांगलंच होईल.

देव आहे ना काळजी घ्यायला, सर्व काळजी आपणच केली तर मग देव काय करणार??

तेंव्हा,

मजेत रहा,

खाओ पिओ ऐश करो.

ये जिंदगी ना मिलेगी दोबारा । 

म्हणतात ना,

“जिस मनुष्य को परमात्मा के न्याय पर विश्वास  है,

उसे संसार की कोई भी परिस्थिति विचलित नहीं कर सकती ।

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares