मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुद्ध भाषा आणि भाषाशुद्धी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ शुद्ध भाषा आणि भाषाशुद्धी… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

*मराठी मातृभाषादिनाच्या सर्वांना शुभेच्छा. *

फेसबुक, व्टहाटस् अपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.

स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे.

*आतपुढ* (आले तसे पुढे ढकलले) ही व्टहाटस् अप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात.

आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हे ही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे.

आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल त्यांना या विषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.

त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते!

याला काय करायचे! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो इंग्रजी असो वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा.

लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते!

समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘कापी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे.

लेख लिहिताना, ‘ घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते ‘ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘ वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे ‘ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजी काट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर ‘ ‘ उसमे क्या है’, ‘ उससे क्या फरक पडता है, ‘ ‘चलता है याsर’, ‘ टेक इट ईझी ‘ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचुकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य आहे.

अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.

मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही किती परकीय शब्द, किती ऊर्दू, किती इंग्रजी शब्द!

इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’, please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?

आपली दैनंदिन विचार विनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?

एका हिंदी लेखातील अवतरण…

‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोग में लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजी के शब्द बोलते है। हर हिंदी प्रेमी इस लेख को पढ़ने के बाद अपने मित्रों के साथ साझा अवश्य करे।’

(अवतरण समाप्त)

आपण मराठीतही अनेक ऊर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा ह्या सूचनेचा.

अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, आभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग!

समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेऊन आता इथेच थांबणे उचित समजतो.

व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर! तो पर्यंत नमस्कार!!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी भाषा दिन…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “मराठी भाषा दिन…” ☆ सुश्री शीला पतकी 

फक्त वेलांटी जर बदलली… दिन या शब्दाची तर आजची अवस्था वर्णन करायला पुरेसे आहे… पण वेलांटी बदलून परिस्थितीचे वर्णन करणारे शब्द मराठी भाषेतच आहेत. असो आज आपण आजच्या लेखात मराठी भाषेने दिलेले काव्य आणि गाणे याचा विचार करूयात आणि आपण किती समृद्ध आहोत हे लक्षात येईल आपल्या घरची समृद्धी लक्षात न घेता लोकांच्या प्लास्टिकच्या डब्याचं वर्णन करायच अशी आज आपली गत झाली आहे असो..!

संपूर्ण मराठी भाषेचा विचार केला तर पुस्तक तयार होईल.. फक्त मराठी भाषेत असलेल्या काव्य आणि गाण्यांचा आपण येथे विचार करणार आहोत

अगदी साडेसातशे वर्षांपूर्वी पासून चा विचार केला तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेला हरिपाठ अनेक वारकऱ्यांच्या मुखातून रोज सकाळी प्रसवतो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.. किंवा पैलं तो गे काऊ कोकता हे… मोगरा फुलला… आणि विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेले पसायदान म्हणजे भारतीय माणूस देवाकडे काय मागतो आणि विश्व कल्याणाची चिंता करतो याचे उत्तम उदाहरण आहे. तुकोबांच्या गाथांचा मोह तर इंद्रायणीलाही झाला आणि त्या त्यामधे बुडालेल्या असतानाही वर तरुन आल्या. चोखामेळ्याचे अभंग जनाबाईचे अभंग तुकारामाचे अभंग आपली अभंग ठेव आहे. मन अस्वस्थ झालं की शांततेचा तो एकमेव मार्ग आहे नुसता हरिपाठ म्हणला तरी मन शांत होईल

पुढील काळात अनेकांनी त्यात भर घातली अनेक काव्य मुखामुखी झाली जात्यावरच्या ओव्यांनी बायकांचा दुःख बोलून दाखवलं माहेर सासरची महती गाईली त्यानंतरच्या येणाऱ्या काळात मोरोपंतांच्या आर्या आल्या खाडीलकरांची नाट्यपद आहेत संगीत नाटकांचा जमाना आला आणि त्यांनी लोकांना वेड लावला. आजही ती नाट्य गीते ओठावर आहेत संगीत मानापमान संगीत सौभद्र अशा अनेक नाटकाने त्या काळातली दुनिया संगीतमय करून टाकली आणि तो काळ मराठी भाषेच्या नाट्यकलेचा वैभवशाली काळ समाजाला गेला त्यानंतर येणाऱ्या मर्ढेकर आणि त्यांचे समकालीन कवी यांनी आशय संपन्न कविता दिल्या पुढे त्या काही कविताना चाल लावून त्याची गाणी झाली गाण्याच्या बाबतीत असं म्हणतात की गाण्यांना जन्म आहे मृत्यू नाही.. ती अमर आहेत. मराठी भाषेतील अवीट गोडीची ही गाणी हे काव्य खरोखर अजरामर आहेत…

जन पळभर म्हणतील हाय हाय… हे भा रा तांब्यांचे काव्य अजरामर आहे.. परी जयांच्या दहन भूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती… या कवितेतला विनम्र भाव आणि कृतज्ञता किती सुंदर आहे! अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना… या काव्यामागची कथा वेगळी आहे.. काव्यमागे अनेक कथा असणारी गाणी तत्कालीन कवीनी दिली… पुढे चित्रपटांचा काळ जसा सुरू झाला तशी सुंदर चालीची अनेक गीते आणि भावगीते तयार झाली. प्रत्येक गीताला एक कथा सांगावी इतका ऐवज आहे प्रत्येक गाण्याला कथा आहे कवीची संगीतकाराची पण ते लिहिण्याचा एक स्वतंत्र विषय करावा लागेल.

कौसल्येचा राम बाई… हे काव्य लिहून झाल्यावर पु ल देशपांडे यांनी त्याची चाल बांधली होती माणिक बाईने ते गाणं गायलं आणि या गाण्याला अमरत्व लाभलं ग दि मा ने दिलेली कित्येक गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत…

प्रेमा भाग्य दिले तू मला… त्या बदल्यात नायिका विचारते आहे की मी तुला काय देऊ? .. प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का? का जळवंती च्या जलाची निळी ओढ ती तुला हवी का? अशा अनेक सुंदर ओळी या काव्यात आहेत आणि तितकीच सुंदर चाल… तितके सुंदर संगीत..! ही सगळी अमरत्व लाभलेली गाणी…

खळ्यांचे श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा… भर मे महिन्यात ट्रेनमध्ये बसून दुपारच्या वेळेला लिहिलेले हे गाणं म्हणजे कवीच्या कल्पनाविलासाचे उत्तम उदाहरण आहे. लताबाईने ते तितक्याच ताकतीने गायलेला आहे त्यांच्याबद्दल आपण काय बोलावे?

घन घन माला नभी दाटती या गाण्यातील..

कोणी विरहिणी राधा गवळण

तिला अडवते कवाड अंगण

अंगणी अवघ्या तळे साचले

विरले जलधारा…! काय सुंदर काव्यरचना आणि प्रसंग. अत्यंत कलात्मक…! हा एवढा खजिना सोडून इंग्रजी माध्यमाकडे का वळता रे बाबांनो…?

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. अ अ आई म म मका मी तुझा मामा दे मला मुका… दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी अवघ्या दत्त विराजे… बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला… वाट पाहणाऱ्या दोन प्रेमी युगोलांसाठी अजरामर झालेले गीते… जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते.. जे वेड मजला लागले तुजला ही ते लागेल का माझ्या मनाची ही व्यथा कोणी तुला सांगेल का? … उडत्या चालीची, तरुण मनाची,… तुझी चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु किंवा लपवलास जरी हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का… मालती पांडे यांनी गायलेले सुंदर गीत… नाच नाच नाचुनी अति मी दमले… बाई मी विकत घेतला शाम… जग हे बंदी शाळा… जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे… रामायणातील राम जन्मला ग सखे राम जन्मला त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करणारे अप्रतिम गीत, जोवर राम आहेत कृष्ण आहेत तोवर या गीतांना मरण नाही ती अमर आहेत. हा माझा मार्ग एकला हे शांत चालीचं गाणं.. जीवनाचा सत्य सांगून जातं. “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया” हे गाणं डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही… जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा प्रत्येक मुलीच्या लग्नात वाजणार हे गीत अख्या मांडवाला रडवून जायचं… अमर भूपाळी मधली घनःशाम सुंदरा ही भूपाळी… सांगा मुकुंद कुणी हा पाहिला हे गाणं… गगन सदन ही प्रार्थना.. सुवासिनी मधले येणार नाथ आता.. बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत… जीवनात ही घडी अशीच राहू दे.. आम्ही जातो आमच्या गावा मधलं… देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा… आराम हराम आहे या चित्रपटातलं आकाशी झेप घे रे पाखरा… तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले… एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात… अष्टविनायका तुझा महिमा कसा… किती असंख्य गाणी..! विरह गीत, प्रेम गीत, भक्तीगीत, भावगीत, मराठी कवींनी लिहिली संगीतकाराने चाली लावल्या संगीत दिलं आणि ती गाणी अजरामर झाली केवढा मोठा खजिना आहे. हे मी इथे लिहिते ते अगदी वरवरचे आहे याची जाणीव मला आहे या खजिन्याचा आनंद घ्यावा… तोच आनंद पदरात भरून माघारी फिरावं.. खजिन्याचा आनंद लुटावा खजिना नव्हे.. कारण तो अमाप आहे.

… हे इतक सुंदर मराठीत असताना हे सगळं सौंदर्य हा आस्वाद हा संस्कार आमची पुढची पिढी मात्र घेणार नाही कारण ते रेन रेन कम अगेन, मेरी हॅड अ लिटिल लॅम्प.. डॅफो डीलस्.. अशा कविता पाठ करते ज्या त्यांच्या मातृभाषेत नसल्यामुळे त्यांना त्याचा अर्थही समजत नाही आजच्या दिवशी या सगळ्या कवी लेखकांचे स्मरण करा त्यानी आपल्याला काय दिले हे दहा मिनिटे बसून मनोमन आजमवा. आमची पिढी भाग्यवान मातृभाषेत शिकली आणि फर्ड इंग्रजी येत नाही म्हणून कुठेही अडलं नाही मराठी साहित्यातला हा आनंद आम्ही आज उपभोगतोय. नुसती गाणी नाहीत हा संस्कार आहे, इतिहास आहे, पुराण आहे.. त्याच्या कथा आहेत, त्या भावभावनांचे वर्णन आहे.. आम्ही हे मनसोक्त उपभोगले… श्यामची आईचे चिंधीच्या गाण्याने घराघरात प्रेमाचा संस्कार रुजला होता आणि द्रोपदीशी बंधू शोभे नारायण.. हे भावा बहिणीचे प्रेम सांगितलं होतं …

हे सगळं लुप्त होता कामा नये. हा निखळ आनंद सर्व मराठी कुटुंबाला मिळालाच पाहिजे. किमान अशी प्रार्थना आपण देवाजवळ आजच्या दिवशी करू…

या लेखात मी फक्त काव्याचा परामर्च घेतला आहे.. तोही अगदी वरवर. पण थोडा आनंद तो नक्कीच मिळवून देईल. आजच्या दिवशी ज्ञानेश्वर तुकाराम जनाबाई सर्व संत सज्जन त्यानंतरचे कवी कुसुमाग्रज माडगूळकर खळे काका भारा तांबे मर्ढेकर अत्रे देशपांडे अशा असंख्य लेखकाना, कवीना मनापासून वंदन ज्यानी ही भाषा समृद्ध केली, त्या माय मराठीला सौंदर्य प्राप्त करून दिले, त्या सर्वांना आजच्या दिवशी मनापासून वंदन.

… लक्षात ठेवा नाणी संपतात पण गाणी संपत नाहीत. ती अमर आहेत.. अगदी अजरामर…!

आपल्या लाडक्या लेकाला लेकीला मराठी माध्यमाच्या शाळेत तरी शिकवा रे.. एवढी आग्रहाची विनंती आहे, नाहीतर ते या खजिन्याला मुकतील आणि त्यांची यंत्र होतील.

– – बघा जमलं तर…

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विचार तर कराल? ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विचार तर कराल? ☆ श्री सुनील देशपांडे

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. त्यामुळे आपण कोण आहोत हे दुसर्यांना सांगण्याची गरज नाही, फक्त चांगले कर्म करत रहा.

वरील मजकूर मला व्हाट्सअप वर आला होता. अशा प्रकारचे सुविचार अनेक येतात.  यासारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगावेसे वाटते. वस्तुतः चंदनाचे झाड हे लक्षात येत नाही.  गावाकडे आमच्या बागेत काही चंदनाची झाडे उगवली होती. परंतु आम्हाला ती झाडे चंदनाची आहेत हे समजलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला हे झाड चंदनाचे आहे हे सांगितले तेव्हा समजले. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्याचा गवगवा होऊन चोरीला जाण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली म्हणून गावाकडच्यांनी ती विकून टाकली. घरात चंदनाचे खोड असेल तर घरात त्याचा सुगंध पसरलेला आम्ही तरी कधी अनुभवला नाही. पूर्वी पूजेसाठी चंदनाचे खोड प्रत्येकाच्या घरी असायचं. चंदनाचे खोड जेव्हा उगाळले जाते तेव्हा त्यातून सुगंध पसरतो त्यामुळे चंदनाला, कुणीतरी हे चंदन आहे हे सांगावेच लागते. आमच्या गावाकडचे घर विकल्यानंतर तेथील सामान देऊन टाकणे व  विकून टाकणे ही प्रोसेस चालू असताना चंदनाचे खोड हे वेस्टेज मध्ये टाकले गेले होते. कोणीतरी हे चंदनाचे खोड आहे म्हणून उचलून आणले.  हिरा सुद्धा पैलू पाडल्याशिवाय हिरा आहे हे कुणालाही समजत नाही. तसे पाहता पैलू पाडल्यानंतर सुद्धा खरा हिरा आणि खोटा हिरा हे कोणाला समजते?

” हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता जो घणी, तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा “….

… असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आहे.  त्यामुळे अज्ञानी किंवा फारसा विचार न करणाऱ्या लोकांना एखादा चुकीचा मुद्दा सुद्धा पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या मजकुरांचा किंवा चुकीच्या दृष्टांतांचा उपयोग केला जातो.  लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दृष्टांतांची परंपरा कीर्तनकारांनी फार पूर्वीपासून आपल्या समाजात रुजवली आहे. कीर्तनकाराला स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावयाचे असतात. परंतु ते दृष्टांत किती योग्य आहेत याचा विचार केला जात नाही. फारसा विचार न करणाऱ्या लोकांसमोर अशा दृष्टांतांचा उपयोग होतो. सध्या व्हाट्सअप वर असे दृष्टांत देऊन एखादी चुकीची गोष्ट सुद्धा पटवून देण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोणतेही उदाहरण किंवा दृष्टांत याबाबत आपण सजग पणे आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे.

कुणीतरी गुड मॉर्निंग साठी असे काहीही सुविचार व्यावसायिकपणे तयार करून पाठवतात. ज्याला खरोखरीचा तर्क लावून तपासून पाहिले तर तो विचार योग्य आहे असे वाटत नाही.  परंतु कट पेस्ट संस्कृती आणि आलेले फॉरवर्ड करा विचार करू नका. या प्रवृत्तीमुळे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला उपयोग काही लोक करून घेतात. त्यामुळे अविचाराने फॉरवर्ड करणे किंवा आला मजकूर की कट पेस्ट करणे ही सवय चांगली नाही. या गोष्टी शक्यतो टाळाव्यात जी गोष्ट विचारपूर्वक आपल्याला पटली असेल, विचारपूर्वक म्हणजे खरोखरच त्यावर विचार करून मान्य झाली असेल तरच ती पुढे पाठवावी. ही सवय स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीने करावे आणि दुसऱ्याचा विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा जे फॉरवर्ड कराल तो तुमचा विचार असला पाहिजे. निदान तुम्हाला सर्वतोपरी विचार करून पटलेला तरी असला पाहिजे.  तो मान्य  असला पाहिजे.  ‘फॉरवर्ड ॲज रिसिव्हड’ अशा पद्धतीने करणे टाळावे, नव्हे, करूच नये!

पहा जमते का? आपण सर्वच हे जमवूया.  अर्थात आपणास विचार करायची सवय असेल तर! नसेल तर अशी सवय लावून घ्यायला काही हरकत आहे का? सुशिक्षित आहात ना? शिक्षित नसला तरी सुविचारी तरी आहात ना? असाल तर करा करा प्रयत्न करा माझ्याबरोबर!

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : sunil68deshpande@outlook.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “खेळातल्या दोन चिठ्ठ्या…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : अमृता प्रीतम ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? मनमंजुषेतून ?

☆ “खेळातल्या दोन चिठ्ठ्या…” – हिन्दी लेखिका / कवयित्री : अमृता प्रीतम ☆ प्रा.भारती जोगी ☆

तो सांगायचा…

ती ऐकायची.

चाललाच होता हा खेळ…

सांगण्या-ऐकण्याचा.

खेळात असायच्या दोन चिठ्ठ्या.

एका चिठ्ठीत लिहिले होते, *”  बोल”. *..

आणि… दुसरीत लिहिलं होतं, ” *ऐक*”

 आता हा नियतीचा खेळ म्हणावा की योगायोग? ? ?

तिच्या हाती सतत तीच चिठ्ठी येत राहिली…

जिच्यावर लिहिले होते, “*ऐक*”

मग काय…

ऐकत राहिली ती…

ऐकलं तिनं फर्मान अन् आदेश

तिनं ऐकले उपदेश! !

 

सगळी बंधनं तिच्यासाठी…

वर्जन, मनाई… तिलाच! !

माहित होतं तिला की…

ऐकणं-सांगणं… केवळ क्रिया नाहीत या! !

राजाने सांगितलं, ” पी हा विषाचा प्याला “…

ती *मीरा* झाली.

ऋषी म्हणाले, ” शीळा हो”…

ती *अहिल्या* झाली.

प्रभूंनी सांगितलं, ” निघून जा”…

ती *सीता* झाली.

चितेतून फुटली किंकाळी…

कुणाच्याच कानांनी नाही ऐकली.

ती *सती* झाली.

त्रिवार तलाक म्हंटलं… तर…

ती *परित्यक्ता* झाली.

तिचं म्हणणं, सांगणं… मनातच घुसमटून राहिलं.

शब्द घशातच अडकले,

ओठ जणू शिवले गेले…

हुंदके गळ्यातच दाटले.

कारण…

 

तिच्या हाती ;  *ती* चिठ्ठी लागलीच नाही कधीच…

जिच्यावर लिहिले होते… *”बोल*”…

(अमृता प्रीतम यांच्या  वह कहता था, वह सुनती थी या हिंदी कवितेचा मराठी स्वैर भावानुवाद) 

अनुवादिका / कवयित्री : प्रा.भारती जोगी.

पुणे. 

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘Mandatory की Optional??…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘Mandatory की Optional??…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

Growing old is mandatory but getting old is optional. 

काल ताईकडे सहजच गेले. दिवसभर खूप गप्पा टप्पा झाल्या. कूठून कुठपर्यंत गप्पा जातात. हे कळतच नाही. किती तरी विषयांवर चर्चा होते. आठवून बघावे तर आठवतही नाही. तरी अनेक विषय बोलायचे / सांगायचे राहूनच जातात. काही विषय तर नेहमीचेच असतात. तेच तेच बोलण होत. तरी बोलतो. सर्वात महत्वाचं म्हणजे गप्पा झाल्या की मजा येते. पोट भरल्यासारखे वाटते. समाधान होत. अनेक प्रश्न सुटतात. अनेक शंका दूर होतात. •••

संध्याकाळी घरी जायला निघणार, तर आज सर्वांचाच खूप आग्रह झाला की आज मी येथेच रहावे. अजय अनिता, भाऊजी सर्वांनीच थांबवून घेतले. •••

कारण काय तर म्हणे, •••तर जवळच एक उडपी हॉटेल उघडले आहे. तेथे उद्या संध्याकाळी जेवायला जाऊ. नंतर अजय मला घरी पोहचवेल. •••

त्यामुळे रहाणे झाले. आणि ताईकडील सकाळ ची घाई गडबड बघायला मिळाली.

तशी प्रत्येकाच्याच घरी एका विशिष्ट पद्धतीने सकाळची गडबड असते. रोज तीच काम, त्याच क्रमाने करायची असतात. अगदी त्या त्या कामाची वेळ पण ठरलेली असते तरी लग्न घाईच असते. तेच, तसेच डायलॉग असतात. त्यात जर लहान शाळेत जाणारी मुल असतील तर मजाच असते. •••

संध्याकाळी अजयने अनयला शाळेची तयारी करायला सांगितले. •••

अनयने होमवर्क केल्यावर आपला बस्ता लावला. कंपॉस बॉक्स चेक केला. बूट पॉलिश केले. त्याबरोबरच बाबांचे, आजोबांचे पण बूट पॉलिश केले. •••

अजय अनिताने पण दुसऱ्या दिवशीची तयारी केली. ताई ने मावशींकडून सकाळच्या नाश्त्याची, डब्याची तयारी करून घेतली. •••

सकाळचा अलार्म वाजला आणि सगळेच वेळेवर उठले. •••

अजय, अनय ने सुर्य नमस्कार घातले. अनिताने पण व्यायाम केला. सर्वांच्या आंघोळी झाल्या. देवाला नमस्कार करून झाला. तोपर्यंत नाश्ता तयार झाला. आधी सर्वांचे चे डबे भरणे, नाश्ता झाला.

शांतपणे सर्व आपापल्या कामाला निघाले.

अनय आजोबांना म्हणाला, •••

आजोबा!! आल्यावर रामायणातील गोष्ट सांगायची आहे. •••

आजोबा म्हणाले, ••• Yes!! छान लक्ष देऊन अभ्यास कर. नंतर गोष्ट नक्की. •••

अजय म्हणाला, ••• बाबा!! आज बॅंकेत गेला तर माझ काम करून या. •••

आता घरी आम्ही तिघेच होतो. •••

यानंतर आमची सकाळची काम सूरू झाली. ताई भाऊजींचा व्यायाम, चहा नाश्ता पूजा.

नंतर भाऊजींचे पेपर वाचन, शेयर मार्केट चे उतार चढाव बघण. बॅंकेत जाऊन आले. येताना ताईने दिलेल्या लिस्ट प्रमाणे सामान आणले. ••••

आमच्या पुन्हा गप्पांचा 2 nd round झाला. जेवण झाली. झोप झाली. •••

दिवसाचा दुसरा पार्ट सुरू झाला. चहा पाणी झाले. भाऊजींनी लॅपटॉपवर काम केले. तेवढ्यात अनय आला. लगेच बस्ता जागेवर ठेवला. डबा धुवायला म्हणून बेसीन मध्ये ठेवला. मोजे धूवून टाकले. युनिफॉर्म बदलला. आजीने दूध बिस्किटे दिली, दूध पिणे झाल्यावर आजोबांना शाळेत काय काय झाले ते सांगितले. होम वर्क काय आहे?? ते सांगितले. •••

आजोबांच्या जवळ गोष्ट ऐकायला बसला. आजोबांनी छान गोष्ट सांगीतली. त्याच्या अनेक प्रश्नांची शांतपणे उत्तर दिली.

राम कडून, हनुमानाकडून आपण काय शिकू शकतो. त्या गोष्टीचा वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींच्या संदर्भात आपण काय कराव? कस वागाव? हेंही सांगीतले. ••••

थोडक्यात आयुष्याचे धडे अनयला दिले. •••

आजोबा नातवाचा तो बॉन्ड बघून खूप छान वाटल. ••••

खरंतर ही बऱ्याच घरातील सर्व सामान्य गोष्ट आहे. पण घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या गोष्टी एवढयाच सहजतेने घडतात का?? ••••

मी ताईला विचारल, ••• अग!! हा तुमच्या घरचा रोजचा कार्यक्रम आहे का?? •••

ताई म्हणाली, ••••

हो, जवळपास रोजच. •••

अजय अनिता चे आॅफिस, अनय ची शाळा त्यामुळे routine हेच असते. अनयला पण शिस्त लावली आहे. त्याच्या सवयींकडे लक्ष असत आमच्या सर्वांचे. •••

आजोबांनी रोज गोष्ट सांगावी. अस अजय अनिता चे म्हणणे असते. त्यामुळे एखादी motivational गोष्ट किंवा महाभारत, रामायणातील गोष्ट किंवा कधी त्यांच्या बालमनातील समस्येवर लागू पडणारी गोष्ट आजोबा सांगतात. त्याच्या बरोबर आम्ही सर्वच खूप गप्पा मारतो. त्यामुळे तो काय विचार करतो. त्याच्यावर होणारा संगतीचा असर सर्वच लक्षात येत. ••••

रामरक्षा, इतर स्तोत्र म्हणून घेणे ही माझी जबाबदारी आहे. •••

मावशींकडून काम करून घेणे ही पण माझी जबाबदारी असते. •••

जी काम आम्हाला सहज जमतात, ती आम्ही आनंदाने करतो. •••

अग!! म्हणतात ना, •••

Growing old is mandatory but getting old is optional. •••

I will run,

if not I will walk,

if not I will crawl.

But I will move forward. •••

– – हाच नियम आम्ही पाळतो. •••

Team work किती महत्वाचे असते. हे या घरच्या activities बघून कळते. ••

म्हणतात ना. •••

**Alone you can win the match but, if you have a good team, you can win Tournament. **

रोजच्या किती तरी गोष्टी Team work ने सहज पूर्ण करता येतात. •••

शेवटी तडजोड आणि समजूतदारपणा याच दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. •••

पंच्याहत्तर वर्षाचे भाऊजी आणि सत्तर वर्षाची ताई कडे काही समस्या / Problems नसतील का?? •••

पण म्हणतात ना, •••

Happiness is not the absence of Problems, It is the ability and the team work to deal with them.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हलक्या डोक्याचे…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “हलक्या डोक्याचे…” ☆ श्री मंगेश मधुकर

प्रसंग एक :

सकाळची वेळ, किचनमध्ये स्वयंपाकाची गडबड. आईनं पोहे प्लेटमध्ये ठेवून दहा मिनिटं झाली. तीन-चार वेळा हाका मारल्या पण अंकितानं एकदाही उत्तर दिल नाही. तेव्हा संतापलेल्या आईनं हातातला मोबाइल हिसकला. अंकिताला भयंकर राग आला. आईवर मोठ्या आवाजात खेकासली “काय कटकट ये. फोन दे”

“देणार नाही. उठून तास झाला. फोनमध्येच तोंड घालून बसलीयेस. बाकी काही काम नाही. खाऊन घे. ”

“मला भूक नाही. फोन दे महत्वाचं काम आहे. ”

“रील्स पाहून पोट भरणार नाही. तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. ”

“माझं मी बघेन. उगीच डोकं फिरवू नकोस. फोन दे नाहीतर.. ”

“काय करशील”आईनं म्हटल्यावर राग अनावर झालेल्या अंकिता जोरात किंचाळत हाताला येईल त्या वस्तू फेकल्या. वाट्टेल ते बडबडत थेट आईच्या अंगावर धावून गेली. लेकीचं अनपेक्षित वागणं पाहून प्रचंड धक्का बसलेल्या आईनं फोन पुढे केला. अंकितानं झडप घालून फोन घेतला “परत माझ्या फोनला हात लावलास ना तर बघ. ”आईच्या डोळ्यात पाणी आलं त्याचवेळी अंकिता रील्स पाहत हसत होती.

प्रसंग दोन :

दुपारची वेळ असल्यानं गाड्यांची वर्दळ कमी होती. उड्डाणपूलावरून स्कूटरस्वार हेल्मेटधारी सुधीर चाललेला. अचानक विरुद्ध दिशेनं तूफान वेगानं येणाऱ्या बाईकला पाहून सुधीर गडबडला. कशीबशी टक्कर टाळली पण दोघंही तोल जाऊन पडले.

“का फुकट मरतोस. जरा नीट चालव की, ”चिडलेला सुधीर ओरडला. बाइकवाला भडकला.

“ए, xxxxx काय बोल्ला”

“तुला मरायचं तर एकटा मर. दुसऱ्याला का घेऊन जातोय. गाडी अशी चालवतात का? ”

“गाडी कशी चालवायची हे सांगणारा तू कोण?? माजं मी बगेन. रस्ता काय तुझ्या बापाचाय का? ”

“मग तुझ्या बापाचा आहे का? . एकतर रॉन्ग साइडनं आलास. वर माज दाखवतो”सुधीरच्या बोलण्यानं भडकलेला बाईकवाला अंगावर धावून आला. तेव्हा इतर गाडीवाल्यांनी मध्ये पडत दोघांना शांत केलं.

“गप जा. डोकं फिरवू नकोस. ”संतापानं फणफणणारा बाईकवाला म्हणाला. त्याचा एकूणच अवतार आणि आविर्भाव बघून नादी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आल्यानं सुधीर तिथून निघाला. तेव्हा बाइकवाल्याची हातवारे करत बडबड सुरू होती.

प्रसंग तीन :

फोनची वाजणारी रिंग किचनमध्ये कामात असलेल्या सुमाला ऐकू आली नाही. तीन-चार वेळा फोन करूनसुद्धा फोन घेतला नाही म्हणून दीपक जाम वैतागला. घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्यानं आरडाओरड सुरू केली. “हजारवेळा सांगितलं की फोन घेत जा. ”

“फोन वाजेलला लक्षातच आलं नाही”

“अंताक्षरी खेळण्यासाठी फोन केला नव्हता”

“मी सुद्धा मुद्दाम केलं नाही. कामात होते. ”

“लक्ष कुठं असतं. कसल्या तंद्रीत असतेस”

“गाढ झोपले होते म्हणून मुद्दाम फोन घेतला नाही. आता बोला. इतकं काय अति महत्वाचं काम होतं. ” सुमाच्या तिरकस बोलण्यानं म्हणाली तेव्हा दिपकचा पारा अजून चढला. तोंडाला येईल ते बोलायला लागला. शब्दाला शब्द लागून दोघांत कडाक्याचं भांडण झालं.

—-

– – वरील घटना काल्पनिक असल्या तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. कोणाही सोबत असं होऊ शकतं. तीनही प्रसंगात कोण बरोबर कोण चूक याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे “राग” आणि वागण्यातली आक्रमकता हाच खरा चिंतेचा विषय आहे.

रागावर कंट्रोल नाही हाच अनेकांचा मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय.

‘राग येणं’ हे जरी नैसर्गिक असलं तरीही आजकाल आपण लगेच चिडतो, संतापतो.

आणि त्यासाठी कोणतंही निमित्त पुरतं. फार लवकर रिअॅक्ट होतो.

अनेकदा डोकं तापलं की संयम सुटतो. तारतम्य राहत नाही. शांतपणे विचार करण्याची इच्छाशक्ती आणि कुवत जवळपास संपलीये.

क्षुल्लक गोष्टींसाठी टोकाची भूमिका घेऊन परिणामांचा विचार न करता भावनेच्या भरात कृती केली जाते.

पूर्वी सुद्धा लोक चिडायचे, रागवायचे पण प्रतिक्रिया आजच्या इतक्या तीव्र नव्हत्या.

शिवीगाळ, धमकी, अंगावर धावून जाणं, मारहाण, अगदी जीव घेणं. असे प्रकार घर, ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी सर्रास होतायेत.

पेपरमध्ये त्याविषयीच बातम्या आणि सोशल मिडियावर सुद्धा तेच.

आदर, संयम, समजूतदारपणा आता सुविचारापुरते मर्यादित झालेत. याचा वास्तवात फारसा कोणी वापर करत नाही.

धावपळ, तणाव, एकटेपणा आणि आभासी जगाचा कैफ यात गुरफटलेलं आयुष्य जगताना सतत अस्थिर असलेलं मन.

माणसा – माणसातील प्रत्यक्ष संवाद आणि त्यातली सहजता संपलीयं.

जिथं तिथं फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करण्याच्या नादात सगळंच बिघडलंय.

अनाकलनीय होतं चाललयं.

एकुणात सारांश असा की आपण खूप “चिडके” झालोय.

ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारे जसे हलक्या कानाचे तसेच कशावरूनही चिडणारे *“हलक्या डोक्याचे”* – – आजच्याच भाषेत बोलायचं तर ‘अँग्री बर्डस’ 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फडक्यांची गोष्ट…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “फडक्यांची गोष्ट…” ☆ सुश्री शीला पतकी 

लीला आत्या जरा रागातच घरात आली म्हणाली, “संपलं बाई संपलं फडक्यांचे युग संपले”… मी तिला शांत करीत म्हणाले, ” अगं आता जुनी युग संपणारच ना. सि. फडकेंना एका काळात वाचणारी वाचक मंडळी खूप होती… तरुण मुलं फडक्यांच्या कादंबऱ्याचे फॅन होते. ना सी फडक्यांच्या लिखाणात तरुणांना आकर्षित करण्याची ताकत होती. तो कालखंड फडक्यांचा होता….

त्यावर लिला आत्या म्हणाली, ” ते नाही ग दुसऱ्या फडक्यांबद्दल बोलते”…. ” अच्छा अच्छा म्हणजे आपल्या सुधीर फडक्यांबद्दल.. बाबूजी असं म्हण की सरळ… बाबूजी बद्दल काय ग रामायणा ने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं. मराठी गाणी त्यांनीच संगीतबद्ध करावी आणि आशा ताईंनी ती म्हणावीत. फडक्यांच्या चाली सुंदर शब्दाला त्या माणसाने खऱ्या अर्थाने अर्थ दिला नाही ग” लीला आत्यांनी हात झटकला, “मी साहित्यातल्या फडक्यांबद्दल बोलत नाही” 

“ मग कशाबद्दल बोलतीयेस? “ माझा वैतागून तिला प्रश्न.

त्यावर ती म्हणाली… “ अगं माझ्या सुनेचा महिन्याचा खर्च सर्वाधिक कशावर होतो तर तो त्या हगीजवर… पंधरा हजार रुपयाचा खर्च त्या कापडावर आणि हात पुसायच्या त्या कागदांवर! त्यानंतर तोंड पुसायचे हात पुसायचा असे कागद आणखीन वेगळे सारखी कागद ओढत असते डब्यातून, नाहीतर त्या रीळातून फाडत असते. ताट पुसायला फाडला कागद… टेबल पुसायला फाडला कागद… तोंड पुसायला वेगळा कागद… काय कचरा का कचरा आणि खर्च केवढा…? मिळवता मिळवता म्हणजे काय उधळपट्टी करायची…?” 

माझ्या एकूण विषय लक्षात आला. आमची लीला आत्या म्हणजे…. आता सांगतेच तुम्हाला.. अहो कोणाचे लग्न ठरलं ना तर या बाईची जमवाजमवा कशाची असावी? … तर फडक्यांची.. जुने लुगडे, साड्या धोतरं, जुन्या पॅंटी, जुने गंजे फ्रॉक, हे फाडून फाडून ती शिवून ठेवायची. मी म्हणलं “ हे उद्योग का करतेस? ”

तर म्हणाली “ लग्नाकार्यामध्ये आचाऱ्याच्या हाताला फडके द्यावे लागतात. आणि ते आपल्या घरचे स्वच्छ असलेले बरे… ताट पुसायला फडके पाहिजेत.. भांडी पुसायला फडके पाहिजेत.. लादी पुसायला फडके पाहिजे… लादी पुसायचे फडके पूर्णपणे पाणी शोषून घेणारे आहेत. ते मी यांच्या बनियन चे करते. “ 

लिला आत्याच्या घरात गेलो तर अनेक ठिकाणी टांगलेले फडके दिसतील… आणि उगीचच इतस्ततः कसेही टाकलेले नाहीत बरं…! त्या त्या ठिकाणी त्यालाही हुक असेल. ताट पुसायचे फडके वेगळे…. वाट्या भांड्याचे वेगळे… टेबल पुसायचे वेगळे… देवाचे वस्त्र वेगळे… लादी पुसायचे वेगळे.. स्वयंपाकात हात पुसायचे वेगळे… आणि हे फडके जुन्या कपड्यांचे…. चारी बाजूच्या कडा शिवलेले त्याला अडकवायला कपड्याचा नाडा किंवा हुक बांधलेले आणि दररोज ते स्वच्छ धुतलेले! आणि शिवाय तिचं एक कपाट आहे त्यात सुद्धा मोड आणण्याच्या उसळी बांधायचे फडके वेगळे…. श्रीखंड करण्यासाठी चक्का बांधण्याचे फडके वेगळे.. ते खास पांढरे स्वच्छ धोतराचे असायचे… जानेवारी महिन्यात हलवा करताना घ्यावयाचे पांढरे स्वच्छ फडके वेगळे… रोज सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुपारी स्वयंपाक घरातले डबे पुसण्याचे फडके ते वेगळे..!

मी तिला म्हणायची “ अग रोज कसले डबे पुसते.. “ 

ती म्हणायची “ स्वयंपाकाच्या घाईत कसले हात या डब्याला लागतात. मग डबे चिकट होतात तेव्हा घरच्या बाईनं दुपारच्या निवांतपणात असे डबे पुसून ठेवावेत. ” तो तिचा कार्यक्रम रोज दुपारी अर्धा तास चालत असे.

एकदा काय झालं…

एक छोटी बादली होती. तुळस वाळत चालली होती म्हणून मी त्या बादलीत पाणी घेऊन तुळशीला घालायला निघाले. तिने मला घाई घाईने थांबवलं.. “ ती कशाला बादली घेतलीस? “ 

“ मग काय झालं स्वच्छ तर आहे ना?

“अग ती फडक्यांची बादली आहे …”

मी म्हणलं “असू दे ना देऊन टाकते पाहिजे तर त्यांना…” कारण शेजारी फडके राहत होते ना…

ती म्हणाली “ नाही नाही तसं नाही. मी रोज दुपारी सगळे फडके म्हणजे कपडे पुसायचे त्या बादलीत भिजत घालते आणि स्वच्छ धुऊन टाकते… फरशी पुसायचे फडके ओट्याचे फडके… हे एकदा धुते आणि हातपुसणीचे वाट्या भांड्याच एकदा…. “

लीला आत्याच्या स्वयंपाक घरात जाल तर कपाटात पांढरे स्वच्छ फडके बांधलेल्या मोरावळ्याच्या बरण्या, उपवासाच्या लोणच्याच्या बरण्या, मुरंबाच्या बरण्या अगदी नटून डोक्यावर पदर घेतलेल्या बाईसारख्या बसलेल्या असायच्या. खालच्या फडताळ्यातल्या… मिठाच्या, लोणच्याच्या बरण्याही अशा नटून-तटून बसलेल्या असायच्या, अर्थात आता ते दृश्य नाही. मी मनात नेहमी म्हणायची ‘हिच्या सुनेच फार अवघड आहे…. ’ पण हिची सून वरचढ निघाली 

… तिने प्रश्नच मिटवला. ॲमेझॉन वरून मागवलेल्या हगीजमुळे लेकराचा लंगोटाचा प्रश्न मिटला, दुपट्यांचा प्रश्न मिटला, टिशू पेपरमुळे हात पुसायचा प्रश्न मिटला. आता लिलाआत्याला फारसा स्कोप उरला नाही.

 लिहीत असताना मला जाणवलं की पूर्वीच्या बायका किती निगुतिने घर स्वच्छ ठेवत असत. जुन्याचा पुनर्वापर.. त्याच शिवण टिपण… त्याची स्वच्छता.. हे सगळं कुठल्याही शाळेत न जाता त्या शिकल्या होत्या… त्यामुळे आजार घरात फिरकत नव्हते. माझी आई नेहमी म्हणायची, “अग ओट्यावरच हात पुसायचं फडकं आणि दारातला पाय पुसणं त्या घरातली स्वच्छता सांगत असत…! ” पायपुसण सुद्धा आई आमची दोन दिवसाला एकदा स्वच्छ धुऊन टाकायची कारण ते जाड कापडाचाच बनवलेल असायचं.

आता फडक्यांची दुनिया घरातून गायब झाली आणि त्यांची जागा ॲमेझॉनच्या कागदाने घेतली. उसळीला मोड आणायचे डबे बाजारात विकत मिळू लागले. चक्का बांधणे संपले. वस्तूंचा पुनर्वापर संपला. कचऱ्याचा ढिगारा वाढू लागला… स्वच्छतेच्या नावाखाली अस्वच्छतेचा पसारा आपण घालू लागलो. बंगल्याच्या समोर असणाऱ्या कचऱ्याच्या डब्यात कागदांचे ढीग वाढू लागले….! ॲमेझॉन चे असे कागद घरात वापरणे आता (कागद हा शब्द जरा लिहिता येतो.. तुम्हाला गावंढळपणाचा वाटेल.. बर ठीक आहे आपण पेपर म्हणूयात) तर असे पेपर घरात ठाई ठाई ठेवलेले आहेत…..

… तरीही लीला आत्याच्या घराचा लक्खपणा नाही. स्वच्छता ही बाईच्या अंगी असावी लागते आणि त्याच्यासाठी लिलाआत्यासारखं नियोजनही असावं लागतं. पैसे आहेत म्हणून ते कागदावर उधळणे कदाचित या पिढीला योग्य वाटत असावं. पैसा पैसा जमा करून भविष्याची तरतूद करणाऱ्या आमच्या पिढीला मात्र हे मानवणार नाही… अर्थात त्यांना जे करायचे ते करू द्यावं संघर्ष नको…!

… तुम्हाला काय वाटतं मंडळी? …. आमच्या लीलाआत्यासारखं फडक्यांवर प्रेम करावं? का त्यांच्या सुनेसारखा ॲमेझॉन चा मार्ग धरावा?

– – बाकी लीलाआत्याचं फडक्यांवर एवढं प्रेम की तिने जावई सुद्धा फडके शोधला आहे.

आहे की नाही गंमत…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बल्ब…” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “बल्ब …” ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

खूप जुनी गोष्ट आहे. नुकतेच आम्ही नवीन घरात राहायला आलो होतो. त्यावेळी ट्युबलाईटचा विशेष प्रसार झाला नव्हता. घरोघरी पिवळे बल्बच असायचे.

दहा दिवसांच्या अवधीत तिसऱ्यांदा बल्ब गेला. पुन्हा बल्ब गेला, म्हटल्यावर आई आणि त्यामुळे मी व संध्याही कावऱ्याबावऱ्या झालो.

बंद दरवाजाचा जमाना तोपर्यंत आला नसल्याने शेजारीपाजारीही जमा झाले.

मग नवीन बल्ब आणून लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतरही गप्पा चालूच होत्या.

“संध्याच्या आई, वरचेवर बल्ब जातो, म्हणजे वायरिंगचा प्रॉब्लेम असणार. “

“हो. हो. इलेक्ट्रिशियनला बोलावून चेक करून घ्या. “

“मला वाटतं…… “

तेवढ्यात आईला आठवलं, “वर राहतात ना, ते ठोकत असतात अधूनमधून. “

“बरोबर. मग त्यामुळेच हादरे बसून बल्ब जात असणार. “

“तुम्ही जाऊन सांगा त्यांना. म्हणावं, नवीन बल्बचे पैसे द्या. “

“हो, हो. जाच तुम्ही, संध्याच्या आई. “

“आता ‘यां’ची यायची वेळ झालीय. स्वयंपाक व्हायचा बाकी आहे. उद्या सकाळी बघूया. “

मग शेजारणींनाही आपापल्या घरच्या स्वयंपाकाची आठवण झाली.

आजचं मरण उद्यावर गेलं, म्हणून हुश्श करत आई रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

बाबा आल्यावर त्यांनीही शेजारणींना दुजोरा दिला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा-अकराच्या सुमाराला पुन्हा वरून ठोकाठोकी सुरू झाली.

“संध्याच्या आई, आत्ता जा आणि रेडहॅन्डेड पकडा त्यांना. “

“पण त्या भांडायला लागल्या तर? “

“घाबरू नका तुम्ही. त्या भांडायला लागल्या, तर खाली आवाज येईलच. मग मी येईन वर. “

“मीही येईन, ” म्हणत सगळ्याच तयार झाल्या.

जीव मुठीत धरून आई वर गेली.

दहा-पंधरा मिनिटं झाली, तरी सारं कसं शांत शांत म्हटल्यावर कुमक गोंधळून गेली. मग एका दूताला वर पाठवण्यात आलं.

“संध्याच्या आई त्यांच्या घरात बसून चहा पित होत्या. “

पाच-दहा मिनिटांत आई आलीच. एकदम शांत दिसत होती.

“काय झालं? ” “काय झालं? ” सगळ्यांनी कल्ला केला.

मग आईने सुरुवात केली, “अहो, मी जरा भीतभीतच गेले वर. म्हटलं, त्या बाईंनी तोंड सोडलं, तर मी काय करणार? पण त्या चक्क म्हणाल्या, ‘गे, भायेरसून कित्याक, घरात येवन बसा आणि बोला. ‘ त्याबरोबर माझ्या जिवात जीव आला. त्या खलात काहीतरी घेऊन बत्त्याने कुटत होत्या. मग मी सांगितलं बल्बचं. तर म्हणाल्या, ‘अरे द्येवा! धा दिसांत तीन बल्ब गेल्यानी? माका ठावक न्हाय, गे, असा काय होईत म्हणान. आता काळजी घेयीन मिया. ‘मग त्या थोड्या सरकून बसल्या. सुनेकडून एक गोधडी मागून घेतली. तिची जाडशी घडी केली. तिच्यावर खल ठेवून त्यांनी आपलं कुटण्याचं काम चालू केलं.

‘माजो हातपण वाईच जोरात चलता. दोघांची शक्ती एकाच हातात इली हा मा? आता हळूहळू मारतंय. ‘

तेव्हा कुठे माझं लक्ष गेलं. त्या डाव्या हाताने बत्ता मारत होत्या. उजवा हात फक्त अर्ध्या दंडापर्यंतच होता.

‘म्हणजे? तुमचा हात? ‘

‘अगे, धाकटो चार वर्साचो होतो, त्या येळा त्येचो बापूस ग्येलो. माज्या पदरात चार पोरा. मगे घोवाच्या मिलमद्ये माका नोकरी दिल्यानी. द्येव त्येंचा भला करो. एक दिस मशनीत हात गावलो आन कापान टाकाचो लागलो. माका दिसला – संपला सगळा. पण पोरांकडे बघून पुन्ना उभ्या रवलंय. मिया डाव्या हाताक सांगलंय – इतकी वर्सां उजव्याच्या जिवाsर तू आराम क्येलंय. आता तुज्याsर दोगांच्या वाट्याचा काम करुची पाळी इली हा. मग तो लागलो कामाक. तेणा माका बगलंला मा, पोरांची आऊस आणि बापूस जालंला… अरे, मिया बोलत काय बसलंय? पयल्यांदाच इल्यात घरी. इल्लो च्या घेवा. ‘

मग त्यांच्या सुनेने चहा करून दिला.

‘अगो, थोडी कोकमां दी गो त्येंका. कालच पावण्यान हाडली गावसून, ‘ म्हणून आमसुलांची पुडीही हातात ठेवली.

‘थोरलो आयलो, का त्येका सांगतंय हां, तुमका बलब हाडून देवक. ‘

‘अहो, नको. राहू दे. आता लावला आम्ही. यापुढे जरा काळजी घ्या, एवढंच सांगायला आले होते. ‘ “

– – – बल्बची भरपाई मागायला गेलेली आई आयुष्यभर पुरेल एवढा सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन आली होती.

 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

रंग…

रंग. रंग मनुष्याच्या आयुष्यात ok खूप महत्वाची भूमिका बजावतात…! कोणतीही वस्तू विकत घेताना, निवडताना, भेट देताना, स्वीकारताना इतर बाबींसोबत त्या वस्तूचा रंग अवश्य पाहतो…! रंगाच्या बाबतीत प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी आवडनिवड असते, असू शकते…!

काही रंग मनाला शांती देणारे असतात, तर काही रंग मनुष्याला नकोसे असतात…

बऱ्याच लोकांना विशिष्ट रंगाच्या वस्तूच नव्हे, तर व्यक्तीही आवडत नाहीत. अनेक लोकांना मनुष्याच्या सावळ्या (खरंतर काळया…) रंगाचे वावडे असते…

या वावड्या स्वभावाचा कधीकधी अतिरेकी नमुना पाहण्यात येतो…! एखाद्या गोऱ्या रंगाच्या मनुष्याच्या बाजूला एखादा काळा मनुष्य बसला तर त्याला असे वाटते की याचा काळा रंग आपल्या अंगाला लागणार तर नाही ना?

इथेच हे थांबत नाही…

एक जुने मराठी गाणे आठवले…

काळाही म्हणतो गोरी पाहिजे,

गोरा ही म्हणतो गोरी

आता तुम्हीचं सांगा पावण 

कुठे जातील काळ्या पोरी…

एक गाणे म्हणजे समाजमनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल…

एका आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचे रंग (शरीराचा वर्ण) भिन्न भिन्न असल्याचे आपण पाहतो…

पण, गोरा म्हणजे चांगला आणि काळा म्हणजे वाईट असे अंधविश्वासू समीकरण आपल्या मनात मांडतो आणि मनुष्य त्यानुसार आचरण करतो…

हा वेताळ नव्हे काय?

आपण सर्वजण एकाच आईची लेकरे आहोत, असे मनावर बिंबवून पक्के केले तर मनामनात लपलेला वेताळ बाहेर काढून टाकायला हवा…

मनुष्य महत्वाचा की त्याचा रंग महत्त्वाचा याचा निर्णय करता आला तर या वेताळाला पळवून लावणे शक्य होईल.
पटतंय ना?

मानवी जीवन प्रवासात रंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे आपल्या लक्षात येईल. किंचितशी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की रंग आहेत म्हणून आयुष्य रंगीबेरंगी आहे, रंग नसते तर आयुष्य बेरंगी झालं असतं…

हेच सूत्र भगवंतांच्या, ही चराचर सृष्टी निर्माण करणाऱ्याच्या मनात असावे म्हणून त्याने एकाच रंगाची किंवा एकाच प्रकारची माणसे निर्माण केली नाहीत… (त्याने एकाच रंगाचं आणि गंधाचे तसेच एकाच आकाराचे साबण बनवणारा कारखाना काढलेला नाही…)

त्याने त्याच्या कार्यकौशल्याप्रमाणे काही ठिकाणी एकदम गोरी, काही ठिकाणी निमगोरी, काही ठिकाणी सावळी, काही ठिकाणी लख्ख काळी अशी विविध प्रकारची माणसं निर्माण केली…

हे वर्णन वाचताना खूप छान वाटत, नाही का?

पण प्रत्यक्षात…

प्रत्येकाला गोरे व्हायचे आहे, प्रत्येकाला अधिक गोरे व्हायचे आहे…

सध्या मनुष्याला गोरे करणारी अनेक मलमे बाजारात विकत मिळत आहेत… (अर्थात अशी मलमे लावून फक्त जाहिरातीत दाखवलेली महिला गोरी होत असते, प्रत्यक्षात तसे गोरे कोणीही होत नसते…) 

एकेकाळी पांढरी पूड लावून मनुष्य तात्पुरता गोरा व्हायचा आणि त्यात समाधान मानायचा, पण आता काळ बदलला, तशी अनेक शोध लावले गेले…

आता ठिक्कर काळा मनुष्य देखील कृत्रिम रित्या काही काळापुरता गोरा होऊ शकतो…

गोरे होणे वाईट आहे असे बिल्कुल नाही, पण विधात्याने सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला उचित असा रंग दिला आहे तो न स्वीकारता, त्याने निगुतीने केलेल्या एखाद्या रचनेत मनुष्याने ढवळाढवळ केल्यासारखे होणार नाही का? या कृत्रिम रित्या गोरे होण्याचा हव्यास म्हणजे एक प्रकारचा

वेताळच नव्हे काय?

ह्या वेताळामुळे मनुष्य गोरा होतो की नाही ते सांगणे अवघड आहे, पण दोन गोष्टी नक्की होतात. एक म्हणजे त्या मनुष्याचा न्यूनगंड वाढतो आणि अशी विशिष्ट मलमे विकणाऱ्या कारखान्यांची भरभराट खात्रीने होते…

पटतंय का?

आपण वेळीच या वेताळाला आवर घालायला हवा…

– लेख क्र. ९

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “एक जाहिरात अशीही…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “एक जाहिरात अशीही…” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या जाहिरातींचा सुळसुळाट सगळीकडेच आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या जाहिराती असतात. टीव्हीवर जाहिराती असतात. रेडिओ वर जाहिराती असतात. पूर्वी रेडिओ वरती एक कार्यक्रम संपला की एखादी जाहिरात असायची आणि दुसरा कार्यक्रम सुरू व्हायचा.

आता तर गाणं सुरू झालं, की दोन ओळी संपतात आणि जाहिरात सुरू होते. कडवं पूर्ण होतं आणि दुसरी जाहिरात लागते.

आता जाहिरातीचा आणखीन एक छान प्रकार बघूया…

तुम्ही म्हैस ही माझी गोष्ट वाचली असेलच.

बावधन या भागात रहदारीचा रस्ता सुखाने आणि आनंदाने आणि सुरक्षितपणे क्रॉस करण्याकरता तिथल्या मुलाने चौका चौकात आता म्हशी ठेवल्या आहेत.

लोकांची रस्ता क्रॉस करण्याची छान सोय होते, मुलाला छान पैसे मिळतात, म्हशीचा आणि मुलाचा छान व्यायाम पण होतो.

एक दिवस मी त्या मुलाला सहज सुचवले की या म्हशीच्या पाठीवर या भागातल्या लोकांना काही जाहिरात करायची असेल तर ती कापडा वरती लिहून म्हशीच्या पाठीवर झूल म्हणून टाकायची.

दुकानदारांची जाहिरात होईल आणि तुला त्यांच्याकडून पैसे पण मिळतील. आणि त्यामध्ये म्हशीला त्रास असा काहीच नाही.

मुलाला कल्पना पटली आणि लगेच त्याने इम्प्लिमेंटेशन केले.

आता तो त्या म्हशींच्या पाठीवर रोज निरनिराळ्या जाहिराती लिहिलेली कापडाची झूल घालत असतो.

म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करणाऱ्यांकडून पैसे मिळतातच, आणि आता जाहिरात दारांकडून पण पैसे मिळतात.

मी जेव्हा जेव्हा तिथे रस्ता क्रॉस करण्याकरता जातो, तेव्हा मला म्हशीबरोबर रस्ता क्रॉस करण्याकरता तो माझ्याकडून पैसे घ्यायला नकार देतो. आणि आभार म्हणून प्रत्येक वेळा मला एक छान फुलाचा पुष्पगुच्छ देतो.

पुढे मागे अजूनहि काही नवीन नवीन कल्पना सुचतीलच…

चला बाय बाय, शुभ दिवस 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares