मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… पंढरीची गोष्ट – भाग – ६७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… पंढरीची गोष्ट – भाग – ६७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

पंढरीची गोष्ट

एक दिवस आई (सासुबाई) मला म्हणाल्या, ” सुभद्रावहिनींनी तुला बोलावले आहे. येशील का?”

“ हो चालेल ना. जाऊया की. ” मी म्हणाले.

अर्थात नेहमीप्रमाणेच कुटुंबातलं सुभद्रावहिनींशी आपलं नातं काय याचा गोंधळ माझ्या डोक्यात होताच. आईंना ते न सांगताच समजले.

“सुभद्रा वहिनी म्हणजे पंढरीनाथची पत्नी. पंढरीनाथ म्हणजे गोपाळचा मोठा भाऊ. नानांचा ज्येष्ठ मुलगा.” 

ही सगळी लिंक सुद्धा ओपन करायला मला बराच वेळ लागला पण आलं लक्षात.

नाना म्हणजेच भिकाजीशेठ भांडारकर. आबांच्या (माझे सासरे) चार भावांपैकी दुसऱ्या नंबरचे मोठे भाऊ. पंढरी त्यांचा ज्येष्ठ मुलगा.

आई कधीकधी मला सांगत सुभद्रावहिनींबद्दल.

“खूप रुबाब होता तिचा कुटुंबात. सर्वात मोठी सून म्हणून. तिला जर कधी बरं नसलं, प्रकृती अस्वस्थ असली तर तिचं जेवणाचं ताट माडीवर त्यांच्या खोलीत नेलं जायचं पण आता बघा काय अवस्था झाली आहे! पंढरीने असं नको होतं करायला. पदरात चार मुली, एक मुलगा. असा भरला संसार टाकून जाताना थोडा तरी विचार करायचा होता. निदान आपल्या मागे त्यांचं नक्की काय होऊ शकतं याची कल्पना तरी त्याने करायला हवी होती.”

“लक्ष्मी गल्ली” मधली सगळीच घरं तीन मजली. ऐसपैस, वाडा सदृश आणि या सर्वच घरांमधून भांडारकर कुटुंबाचं वैभवशाली एकत्र वास्तव्य. वास्तविक अमळनेर मध्ये या गल्लीला भांडारकर गल्ली असेच म्हटले जाते.

माझं लग्न झालं तेव्हा कुटुंब तसं बरंच विखुरलं होतं. मात्र आमच्या घराच्या समोरच्या इमारतीत वरच्या मजल्यावर सुभद्रावहिनी त्यांची मुले म्हणजेच शरद, माणिक, हेमा, चारू यांच्या समवेत राहत असत. सुभद्रावहिनींना मी ओझरतंच पाहिलं होतं. माझा त्यांच्याशी कधी फारसा संवादही झाला नव्हता. मात्र चारू, हेमा कधी खाली ओट्यावर येऊन माझ्याशी बोलायच्या. मलाही त्यांच्याशी गप्पा करायला आवडायचे. शाळेत शिकणाऱ्या या कुमारवयीन मुली अतिशय बुद्धिमान असल्या पाहिजेत इतके मात्र मला त्यांच्याशी बोलताना जाणवायचे पण त्याचवेळी त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बापाविना वाढणारी मुलं म्हणून एक पोरकेपण त्यांच्या जीवनाला वेढलेलं आहे असं वाटायचं आणि त्याचं मला फार वैषम्य वाटायचं. एका वैभवशाली कुटुंबाचा तेही भाग होते मग असं का? हा प्रश्न मला नेहमी पडायचा. कधीकधी मी आईंना आडून, जरा बिचकतच विचारायची तेव्हा त्या म्हणायच्या,” असंच असतं ग बाई एकत्रात. हात अनेक पण सारी सूत्रं मात्र एकाच्या हातात. कुटुंबाची चाकं त्यांच्याच मर्जीने फिरणार. तसं म्हटलं तर पंढरीच काय सगळेच भरडले जात होते. आबांनी कमी समजावलं का आप्पांना? पंढरीची खूप बाजू त्यांनी मांडली पण शेवटी आबा धाकटेचना भावंडांमध्ये? त्यांचं कोण ऐकणार? मात्र आबांजवळ बुद्धी आणि संयम दोन्ही होतं. जेव्हा जेव्हा त्यांनी मांडलेले अनेक उपयुक्त प्रस्ताव डावलले गेले तेव्हा अक्रस्ताळेपणा अथवा माथेफिरुपणा न करता शांतपणे त्यांनी त्यांचे मार्ग मात्र आखले पण डोळ्यादेखत कुटुंबाची होणारी पडझड मात्र ते फारशी नाही रोखू शकले.”

माझ्यात आणि आईंच्यात होणाऱ्या संवादाची हीच गंमत असायची. सुरुवात एखादा वेगळाच विषय घेऊन व्हायची आणि तो विषय मागे राहून बोलणं दुसरीकडेच जायचं. खूप वेळा आईंचही बोलणं गूढ, अस्पष्ट असायचं. त्यात त्यांचा राग जाणवायचा, नाराजी डोकावयाची. त्यामुळेच सुभद्रावहिनी आणि पंढरीनाथ यांच्या सहजीवना विषयी, नात्याविषयी माझ्या मनात अनेक अनुत्तरीत प्रश्न उरायचे. विलास कडून मला पंढरी या व्यक्तीविषयी तसं बरंच कळलं होतं. त्याच्या बोलण्यात मात्र भाऊ म्हणून पंढरीविषयी प्रेम आणि अभिमान जाणवायचा.

“पंढरी खूप हुशार होता. रसिक होता. तो इतकं सुंदर गायचा! स्वप्नाळू तर होताच तो पण आयुष्याबद्दल त्याच्या काही स्वतंत्र कल्पना होत्या. त्याचं मन या कुटुंबात रमायचं नाही. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. परदेशी जायचं होतं आणि त्यासाठी तो नानांजवळ म्हणजेच वडिलांजवळ पैसे मागत असे. म्हणून तो गृहद्रोही, भेदी, विभाजक ठरला. कोणीच त्याला समजून घेतलं नाही. संपूर्ण कुटुंब त्याच्या विरोधात. हळव्या मनाच्या पंढरीची ताकद कमीच पडली. तो आधी एककल्ली होताच पण त्यानंतर तो एका खोल कोषातच गेला असावा, कधी कधी खिडकीत बसून एकटाच गायचा, रडायचा, हिंसकही व्हायचा. घरातून पळून जाण्याच्या धमक्या द्यायचा तेव्हा घरातली ज्येष्ठ मंडळी त्याला घरात कोंडूनही ठेवायचे. नानांनी चाबकाने फोडलेही होते एकेकदा त्याला. खूप तंग वातावरण असायचं घरात. मात्र त्याच्या अंतरातला आवाज ऐकावा असं कुणालाही वाटलं नाही. त्याला सुधारण्याचे, त्याच्या विचारापासून परावृत्त करण्याची त्यांची हीच साधनं होती. एक वेळ अशी आली की दोन दिवस पंढरी घरीच आला नाही. संपूर्ण गावात शोधाशोध झाली. चव्हाट्यावर नाना चर्चाही घडल्या असतील. शेतावर राहणाऱ्या पावरीला(राखणदार) विहिरीजवळ काढलेल्या चपला आणि कपडे दिसले म्हणून त्यांनी विहिरीत डोकावले. पंढरीचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.”

हीच ती पंढरीची गोष्ट माझ्या मनात आजही टोचत राहते. त्या काळाची मनावर साकारलेली अनेक चित्रं मग दृश्यमान होतात.

गौरवर्णी, ठुसका आकर्षक बांधा सदैव जरीचं काठ पदरी चापून-चोपून नेसलेलं नऊवारी लुगडं, गळ्यात, हातात भरगच्च सुवर्णांचे अलंकार, बुद्धिमान रसिक स्वप्नाळू व्यक्तीची पत्नी, पाच मुलांची आई, मोठी सून. जेव्हा जेव्हा माझ्या मनात अशा सुभद्रावहिनींचा विचार येतो तेव्हा सहज वाटते की त्या आपल्या पतीला आत्मघातापासून का नाही परावर्तित करू शकल्या? त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी लागणारं धन त्या फक्त देहावरच का बाळगत होत्या? ते वापरण्याचा त्यांना अधिकार नव्हता का? त्या एका विशिष्ट काळाने त्यांना रोखलं असेल का असा निर्णय घेण्यापासून? याची समाधानकारक उत्तरे मला मिळालीच नाहीत. त्या काळाचं ते अवघड आव्हान त्या तेव्हा पेलवू शकल्या असत्या तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं चित्र निराळं नसतं का?

मला नेहमीच वाटतं की उणीवा, त्रुटी, कमतरता भरून काढण्याचं सामर्थ्य स्वतःतच असायला हवं. परिस्थितीपुढे हार मानून सहानुभूती मिळवत जगणं हे जीवन उजळवणारं कसं ठरेल?

त्यादिवशी ठरल्याप्रमाणे मी आणि आई सुभद्रा वहिनींना भेटायला गेलो. थोरल्या जाऊबाई म्हणून त्यांना मी वाकून नमस्कार केला. त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. आम्हाला बसायला चटई अंथरली. चुलीजवळ असलेल्या शिशवी पाटावर त्या खुरमांडी घालून बसल्या. हेमाने आणि चारुने चहा पोहे बनवले. आम्ही आल्यामुळे त्यांचे चेहरे खूप आनंदले होते. आई आणि सुभद्रावाहिनी बोलत होत्या. मी फक्त ऐकत होते. कारण त्या दोघी ज्या अनेक विषयांवर बोलत होत्या ते सारे विषय माझ्यासाठी अनोळखी, परके होते. मात्र मध्येच सुभद्रावहिनी माझी दखल घेत, “घेगं! चहा घे, साखर घालू का अजून? पोहे ही घे बरं का? आवडतात नं तुला? का गं! तू मुंबईची, तुला अमळनेरला आवडतं का?” असं काहीबाही अगदीच जुजबी पण बोलत होत्या.

 तास दीड तासाने आम्ही घरी परत आलो पण सुभद्रावहिनींच्या त्या भेटीत मला सतत जाणवला तो त्यांच्या चेहऱ्यावरचा कधीही न मिटणारा उपहास. त्यांच्या स्मितहास्यामागे दडला होता फक्त उपहास. मला उगीचच वाटले, त्यांच्या संपूर्ण देहावर काळाने मारलेल्या चाबकाचे अदृष्य वळ आजही आहेत.

॰ गेल्या ५० वर्षात कुटुंबात मी पाहिलेले अनेक चेहरे विझले असले तरी माझ्या अंतर्मनाने टिपलेल्या त्या कृष्णधवल छटा मात्र अमीट आहेत. अजूनही प्रश्नांकित आहेत.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण… भाग – १ – लेखिका : डॉ. सुमेधा रानडे ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

??

☆ मिरजेची कर्तृत्ववान माहेरवाशीण… भाग – १ लेखिका : डॉ. सुमेधा रानडे ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

कु. शिल्पा मुकुंद मैंदर्गी 

हाँ, यही रस्ता हैं तेरा, तूने अब जाना है..

हाँ यही सपना हैं तेरा, तूने पहचाना हैं..

तुझे अब ये दिखाना है

रोके तुझको आंधियाँ, या जमीन और आसमान पायेगा

जो लक्ष्य हैं तेरा, ‘लक्ष्य’ तो हर हाल में पाना हैं

नुकताच आपल्या दृष्टीहीन(अंध) महिला संघाने क्रिकेट विश्वचषकाचे ‘लक्ष्य’ गाठत तो मिळवून आणला, किती अभिमानाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी!! अशीच आयुष्यातील अनेक ‘लक्ष्य ‘कायमच साध्य करणारी आपली माहेरवाशीण शिल्पाताई!! वरील गाण्याच्या ओळींप्रमाणे जिने आयुष्यात अनेक आव्हाने स्वीकारून पूर्ण केली, स्वतःच्या अंधत्वावर मात करुन ज्ञानचक्षु आणि अंत:चक्षु यांनी डोळसपणाने बघत ज्ञानार्जन केले, नृत्यकलेची उपासना केली.. अशी ही ‘शिल्पा’ मिरजकरांचा अभिमान आहे!

मला कायम वाटते, पंचज्ञानेंद्रियातील नाकाला वास आला नाही तरी चालेल, चव लागली नाही तरी चालेल, ऐकू आले नाही तरी चालेल.. पण.. डोळे आणि दृष्टी मात्र असणे या सर्वात अतिशय महत्वाचे आहे.. त्याच्याविना अवघे आयुष्य किती बिकट! पण तरीही या दृष्टीहीन क्रिकेट खेळणाऱ्या मुली काय किंवा शिल्पाताई काय यांचा आदर्श घेण्यासारखाच आहे.

‘शिल्प’ चा अर्थ कौशल्यपूर्ण निर्मिती.. ही ‘शिल्पा’सुद्धा ही अशीच देवाची कौशल्यपूर्ण निर्मिती! आपल्या दृष्टीहीनतेवर मात करत नृत्य विशारद, कवयित्री, साहित्यिक आणि अजून खूप काही!! जाणून घेऊ तिच्याबद्दल, तिने पार केलेल्या आव्हानांद्वारे..

  1. पहिले आव्हान – अचानक आयुष्यात आलेला कायमचा अंध:कार

मध्यमवर्गीय मैंदर्गी कुटुंबात शिल्पाताई चा जन्म झाला.. वडील मुकुंद मैंदर्गी आणि आई मंजुषा (रेखा) मैंदर्गी यांची ही लाडकी कन्या, मीनल, मेघना आणि पंकज यांची लाडकी बहिण. खरंतर सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिचे रंगबिरंगी बालपण होते पण इयत्ता 3री पासून तिला अंधुक दिसू लागले आणि आणि 4थी च्या सहामाही पर्यंत तर तिची दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्णतः गेली. तिची दृष्टी परत मिळवण्यासाठी वडीलांनी मद्रास पर्यंत जाऊन प्रयत्न केले, प्रसंगी स्वतःचा डोळा द्यायची त्यांची तयारी होती, जेणे करुन शिल्पाला दृष्टी येईल, पण डॉक्टरांनी त्याला साफ नकार दिला. आणि पदरी निराशा घेऊन ते मद्रासहून मिरजेला आले. पण ती निराशा शेवटची.. त्यानंतर शिल्पाताईची दृष्टीहीनता ही तिच्यासाठी कमकुवत बाजू न बनता तिची बळकट बाजू कशी बनेल या दृष्टीने तिच्या आई वडिलांनी प्रयत्न केले आणि ज्याला शिल्पाताईने 100% हूनही जास्त टक्के साथ देत आपल्या आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. शिल्पाताईचे वडील मुकुंदराव मैंदर्गी हे विद्या मंदिर या शाळेत हिंदीचे शिक्षक होते. हाडाचे शिक्षक असणाऱ्या मैंदर्गी सरांनी आपल्या लाडक्या शिल्पाला अंधत्व आले तरी अंध शाळेत न घालता आपल्याच विद्यामंदिर मध्ये 5वी ते 10वी ठेवले. या मागे कारण हेच की एकतर शिल्पा आपल्या नजरेसमोर राहील आणि अंधत्व हा तिच्यातील दोष जाणवून न देता सर्वसामान्य मुलांप्रमाणे तिने शिकावे, हे दोन्ही हेतू साध्य करत शिल्पाताई 10वी पर्यंत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत गेली. यात सर्व शिक्षकांनी सुद्धा तिला सहकार्य केले. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत शिल्पाताईला बक्षीस ठरलेले असायचे. याशिवाय तिला मैदानी खेळांचा अनुभव यावा म्हणून शाळेत खो-खो चा सामना सुरु असताना तिचा हात धरून मुलांच्या मधून स्वतः मैंदर्गी सर पळवत न्यायचे. अनेक पुस्तके वाचून दाखवून अवांतर वाचनाची गोडी शिल्पाताई मध्ये तिच्या आई वडिलांमुळे निर्माण झाली. कुठेही त्रागा, दुःख, नकारात्मकता मनात, वाणीत आणि कृतीत न आणता शिल्पाताई कन्या महाविद्यालयातून BA(मराठी)झाली *सर्वसामान्य मुलीप्रमाणे शिल्पा पदवीधर झाली एक लक्ष्य पूर्ण झाले 

  1. दुसरे आव्हान – नृत्यकलेत प्राविण्य

पदवी पूर्ण झाल्यावर शिल्पाला आयुष्यात अजून आनंद कसा आणता येईल या विचारात असताना, शिल्पाच्या वडिलांना भरतनाट्यम हा एक कलामार्ग सापडला. त्याला कारणही तसेच होते. पूर्वी मैंदर्गी सरांनी एका शालेय प्रशिक्षणान्तर्गत ‘भारतीय मंदिरे-नृत्य परंपरा’ या विषयावर सादरीकरण केले होते, ज्यात त्यांना भारत सरकारचे विशेष बक्षीस मिळाले होते (ही गोष्ट मिरजेतील अनेकांना माहिती नाहीये).. आणि बक्षीस म्हणून सुमारे 40वर्षापूर्वी त्यांना प्रोजेक्टर मिळाला होता. हेतू हाच की हे सादरीकरण गावागावांमध्ये व्हावे व आपल्या अभिजात नृत्य, मंदिरे परंपरा यांची माहिती लोकांना व्हावी. त्याप्रमाणे सरांनी अनेक ठिकाणी विनामूल्य, स्वतः प्रोजेक्टर लावून ही सादरीकरण केली. तेव्हा छोटी शिल्पा त्यांच्या बरोबर असायची. तिला त्यावेळी दृष्टी होती. त्या नृत्यांगना, त्याचे सजणे, त्यांनी हाताला लावलेला लाल-लाल आलता हे अतिशय आवडायचे. पण नंतर या गोष्टी मागेच पडल्या. पण हे लक्षात ठेऊन सरांनी पुन्हा एकदा शिल्पाच्या बाबतीत challange घ्यायचे ठरवले. तिने आपले अभिजात नृत्य शिकावे असे सरांनी ठरवले. नृत्यातील साज -शृंगारापेक्षा आपल्या समृद्ध परंपरा कलेच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी सरांची इच्छा होती. पण हिला नृत्य शिकवायला कोण तयार होईल? कारण दृष्टी नाही! पण त्यावेळी त्यांनी तिला मिरजेतील धनश्री आपटे यांच्याकडे नेले. जो निर्णय त्यावेळी अगदी योग्य ठरला.

खरंतर भरतनाट्यम मध्ये भाव, राग, ताल व नाट्य ‘ यात शरीराची विशिष्ट स्थिती, हातांच्या मुद्रा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. या सगळ्याच्या मध्यभागी असते ती दृष्टी!

पण हे आव्हान स्वीकारले स्वतः शिल्पाताईने, शिल्पाताईच्या कुटुंबियांनी आणि महत्वाचे म्हणजे तिच्या नृत्य गुरु सौ. धनश्री आपटे यांनी. कारण नृत्य करताना हातांच्या मुद्रा, पायातील ठराविक अँगल, चेहऱ्यावरील हावभाव या प्रत्येकाची जाणीव शिल्पाला स्पर्शाद्वारेच करुन देणे गरजेचे होते. गिरकी घेऊन पुन्हा प्रेक्षकांसमोर येणे ही आपल्यासाठी सोपी गोष्ट पण ती शिल्पाला शिकवणे एक आव्हानच असायचे. आपला तोल सांभाळण्यासाठी दृष्टीची गरज असते, पण त्याशिवाय सुद्धा उत्तम नृत्य मनाच्या शक्तीने करता येते हे शिल्पाने दाखवून दिले. अनेकदा इतर मुलींबरोबर नृत्य करताना ती अनावधानाने मध्ये मध्ये येत असे, ठराविक line च्या बाहेर जात असे. पण प्रत्येकवेळी तिच्या नृत्य गुरूंनी तिला अतिशय समजून घेत, न चिडता नृत्य शिकवणे सुरुच ठेवले, आणि 27वर्षांनंतर शिल्पाताई गांधर्व महाविद्यालयाची ‘नृत्य विशारद ‘ झाली. ही खूप अपूर्वाईची गोष्ट मिरजेने जगाला दिली. कारण सलग 27वर्षे गुरु -शिष्य परंपरेने शिकणे, त्यातही असे आव्हानात्मक! सोपे नाही, जे नृत्य करतात, शिकवतात त्यांना याची काठीण्यपातळी नक्की लक्षात येईल (*याविषयी शिल्पा आणि तिच्या गुरु *सौ. धनश्री ताई यांची मुलाखत ‘स्वयंम’ मध्ये श्री उदय निरगुडकर यांनी घेतली आहे, अतिशय प्रेरणादायी मुलाखत आहे, नक्की बघा) धनश्री ताई म्हणतात, की शिल्पा ही सगळयांत ‘उत्तम शिष्य ‘आहे, शिकवलेले ती घरी जाऊन पाठ करणार म्हणजे करणार. नृत्यातील काही भाव समजून सांगताना धनश्री ताईंना काही वेळा कठीण गेले, पण त्या उत्तम गुरु होत्याच, त्यामुळे ‘या मनीचे त्या मनी ‘ या न्यायाने शिल्पा ताईने सगळे आत्मसात केले.

यादरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे नृत्यात MA सुद्धा शिल्पाने केले. यात रोज वेळेत शिल्पाला क्लासला सोडणे -आणणे याची पूर्ण जबाबदारी तिच्या वडिलांनी अगदी आजारी असताना सुद्धा पार पाडली.

 शिल्पाताईला dance करताना बघणे हे खूप सुंदर असते. तिने तिचा 1तासाचा dance चा कार्यक्रम बसवला आहे. गंमत म्हणजे ती dance साठीची वेशभूषा, मेकअप सुद्धा स्वतः करते. भरतनाट्यम साठीची साडी वेगळ्या प्रकारची असते, पण, ती सुद्धा शिल्पाताई कमीत कमी वेळात नेसते. आजपर्यंत मिरज, सांगली, तासगाव, निपाणी, चिपळूण, पुणे, मुंबई अश्या अनेक ठिकाणी तिचे नृत्याचे कार्यक्रम झालेत. विशेष म्हणजे त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रचनांवर आधारित कार्यक्रम करण्याची संधी तिला ‘अंदमान’ इथे मिळाली, जी शिल्पाताईच्या दृष्टीने अभूतपूर्व अनुभव देऊन गेली. तेथील भिंतीना स्पर्श करुन सावरकरांना तिने आदरांजली वाहिली.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : डॉ. सुमेधा रानडे, मिरज

प्रस्तुती : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक भयाण प्रवास… ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ एक भयाण प्रवास… डॉ. माधुरी जोशी 

टायटल वाचून आश्चर्य वाटेल… पण होय! हा माझ्याच आयुष्यातला भयाण, भेसूर, बेसूर काळ… कुणाच्याही वाट्याला येऊ नाही असा… खरंच खोल खोल अंधारातून पुन्हा त्या सोनेरी प्रकाशाकडे गेलेला… आपण निराशेत चिवटपणे आशेवर जगत असतो.. तशीच मी ही जगत राहिले…

१९८०च्या आसपास बेबीताई आणि नृत्यभारतीशी नाळ जुळली.. पुढे कित्येक वर्ष तो सुरेल प्रवास चालू राहिला. “Genius Babytai” आणि त्यांच्या तयार शिष्यांच्या नृत्याला माझी गायनसाथ… अनेक कार्यक्रम, महोत्सव, मैफली…

… असाच एक कार्यक्रम १९९० मधे रंगपंचमीच्या आसपास.. नाशिकला… मी शाळेत नोकरी करत होते. मग रजा वाचवायला अर्धी शाळा करून मी सोयीच्या एस्. टी. नी अनेकदा एकटीच पोहोचे कार्यक्रमाच्या जागी… नृत्य कलाकारांना तयारीसाठी वेळ लागे… त्या सकाळीच गेलेल्या असंत. मी त्या दिवशी तशीच गेले… जेमतेम आवरून स्टेजवरच गेले. काय गायचं यांची भरपूर प्रॅक्टिस झालेलीच असे… माझ्या पद्धतीप्रमाणे त्या दिवशी जे गायचं त्यांची नीट वही सोबत होतीच… काही नवीन नव्हतं मला कारण नृत्यभारतीत रुळून १० वर्ष झाली होती… नेहमीप्रमाणे तयारी होतीच गायची… बेबीताई पढंतसाठी बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी माझी रिकामी जागा होती तिथे जाऊन बसले… बेबीताईंनी एक कौतुकाची, हासरी नजर टाकली वेळेवर पोहोचल्याबद्दल… तिथेच बसल्याबसल्या त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला…

आता वंदनेसाठी पडदा उघडला… मी वंदना गायला स्वर लावायला लागले आणि एक भयंकर धक्कादायक गोष्ट घडली… माझा आवाजाच फुटेना… तोंडातून फक्त हवा… हकार… हे काय होतंय? माझा आवाज का फुटत नाहिये? हे काय झालं? मी घाबरले… हैराण झाले… हे काहीतरी भयंकर होतं… बेबीताई वैतागून बघत होत्या.. ही गात का नाहिये? … मी खुणेनी सांगितलं माझा आवाज गेला… डोळे डबडबलेले… कोरड पडली भितीनं… बेबीताईंनी परिस्थिती ओळखली. त्या उत्तम गात असत. अनेक रचनाही त्यांच्याच… मुखोद्गत.. त्या बिचाऱ्या स्वतः गायला लागल्या. काही उपायच नव्हता दुसरा त्या क्षणी… मला पृथ्वी पोटात घेईल तर बरं असा भाव माझ्या मनात… वंदना संपली आणि तालाचं काम सुरू झालं.. त्यात माझं काम नव्हतं… या प्रसंगानं मला तिथे बसवेना… रडूच फुटत होतं… आत श्वास कोंडला… घुसमटले मी… बेबीताईंना खूण करून तिथून मी उठले… हॉलबाहेर आले… इतकी उध्वस्त.. त्याच मनस्थितीत कुणाला तरी एस्. टी. स्टॅंडवर सोडायला सांगितलं… मिळाली ती एस्. टी. पकडली आणि पुण्याला निघाले. तो परतीचा प्रवास फार… फारच भयाण होता. प्रवासभर रडतच होते…

अडनिड्या वेळी घरी पोहोचले… यांनी दार उघडलं आणि मी ओक्साबोक्सी रडायलाच लागले… यांना काही कळेना… एव्हाना आवाजानं मुलही उठली… आईला असं रडतांना पाहून ती पण कावरीबावरी झाली… लहान होती बिचारी… यांना सगळी हकीकत सांगितली… हे सगळं धक्कादायक होतं… अनपेक्षित होतं… “गाणं” हा तर माझा प्राण… तो सुरेल गोड आवाजच गेला होता.. कासाविशी… बेचैनी.. फक्त बेचैनी… झोप येणं शक्यच नव्हतं. मी हादरले. तेवढ्या वेळात मन कुठे कुठे धावून आलं. माझी संगीत शिक्षिकेची नोकरी… ती राहील ना? आर्थिक भवितव्य क्षणार्धात काळवंडलं. हे काय झालं? का? कशामुळे? … मी कुपथ्य करत नव्हते… भरपूर, नियमित डोळस रियाज करत होते… चोख प्रॅक्टिसमुळे रचना जणू माझ्याच झाल्या होत्या… मग काय घडलं असेल? आवाज बसणं, खराब होणं यापेक्षा आवाजाचं जाणं झेपतच नव्हतं… त्या अंधारात मी मनाने अडखळले, कोसळले.. दिशाहीन झाले…

खूप खूप विमनस्क स्थितीत दुसरा दिवस उजाडला… शाळा होतीच… कसंतरीच आवरून शाळेत गेले… पण टीचर्स रूममधे गेलेच नाही… मैत्रीणीत दु:ख फुटायची भिती वाटली… गाण्याच्या खोलीतच गेले… प्रार्थना झाली… वर्गात गेले तासांप्रमाणे… आवाज विचित्र घोगरा, बसकट, चिरकता… काय काय घडतं होतं. मोठ्या वर्गातल्या मुलींना जाणवलं काही तरी बिघडलंय… बाईंचा हा आवाज नाही. पण बरं नसेल… बसला असेल आवाज.. गार, तळकट खाण्यात आलं असेल… असंच वाटलं बिचाऱ्यांना… अन् लहान मुली हासल्या, डोळेही टिंगल करून गेले त्यांचे… हळवं मन अजूनच दुखावलं… मी पूर्ण उध्वस्त… तो पहिला दिवस होता. आता पुढे काय? हे कधी सुटणार? हे नीट होणार ना? विचारांचा कल्लोळ… दोन दिवसांत वेड लागायची पाळी आली… एखाद्या नर्तकाचा, खेळाडुचा पाय जावा… वादकाचा, चित्रकाराचा हात जावा तसं भयाण काही तरी होतं हे… रोजचा दिवस ढकलणं क्रमप्राप्त होतं…

पितृतुल्य पिंपळखरे गुरूजी आणि पं. अभिषेकीजी हे गुरूजन… छान रमले होते स्वरात… एम्. ए. ला पहिली, खूप स्पर्धात यश, काही मैफली, सवाईत गाणं, अलूरकरची कॅसेट, आदर्श शिक्षिका पुरस्कार, बेबीताईंबरोबर आफ्रिका, अमेरिकेचे यशस्वी दौरे… स्वतःबद्दल म्हणून नाही पण खरंच यशाचा आलेख सुंदर वर चढत होता… तो दाणकन उताराकडे धावला… सारं अनपेक्षित, भयंकर, बेसूर, भेसूर… डोकं बंद झालं जसं काही…

मग उपाय सुरू झाले. अनेक तज्ञ डॉक्टर्स, वैद्य, कडक पथ्य, काढे, ॲंटीबायोटिक्स, स्टीरॉइडस्, अनेक औषधं, टेस्ट, ऊपासतापास, जपतप, पूजा, व्रतं, ओमकार प्राणायाम…

जो जे सांगेल ते सुरू होतं. रस्ता मिळु दे, स्वर मिळु दे… गाऊ दे… एकच मागणं…

सरांकडे जाणं थांबलं… गाताच येत नव्हतं… बुवांनी मात्र खर्जात गाण्याचा सल्ला दिला. तिथे जाऊन नुसतं ऐकायचाही… ऐकणंही शिकणं आहे एक प्रकारचं… हे मात्र पटलं… सर्व शिष्यांच्या मागे भिंतीशी बसून मी किती राग, आलापी, विचार, मांडणी, भावार्थ, बंदिशी, ताना, पलटे… काय काय ऐकत राहिले… इतकं मनापासून… अंतर्मनात शिरंत होतं अगदी… स्वरांचा थेट मनाशी संवाद.. अक्षरशः अधाशासारखं टिपत राहिले… किती काळ जाणार माहिती नव्हतं… पण ते सारं आजवर सोबत आहे…

एक भयाण पोकळी आली आयुष्यात… फक्त ज्या गाण्याचा ध्यास घेतला… नोकरीपायी पहाटे उठून रियाज केले… अभ्यास केले.. गाणं जमायला लागलं, रंगायला लागलं, जरा नाव व्हायला लागलं… आणि अचानक सगळं सगळं संपलं… तो भयानक काळ फारच संथपणे सरकत होता‌.. एखाद्या काळ्या सावलीसारखा… भसाड्या आवाजात नोकरी चालूच होती.

पर्यायच नव्हता… कीव, उपहास, टिंगल, उपेक्षा, दुर्लक्ष साssssरं सोसंत होते. किती उपाय करून झाले. तज्ञ म्हणत घशाला सूज नाही, व्होकल कॉर्डस् पॅरालाईज्ड नाहीत, चरे नाहीत, गाठ नाही.. ‌सगळं उत्तम आहे… दोषंच नाही काही… पण मग काय? उत्तर काय? उपाय काय? .. ‌वेड लागायची पाळी आली अक्षरशः…

.. अचानक कुणी म्हणालं काही खायला घातलं का कुणी? छे, छे… हा तर अगदी वेडा विचार… मी काही कुणी आशा, लता नव्हते माझ्याशी स्पर्धा करायला… ना कुणाशी वैर होतं… एक मात्र खरं… मी चांगल्या गुरूंनी घडवलेली, जरा तयार, चांगलं, ऐकावं असं गाणारी गायिका होते. अशा अजूनही होत्या. मी जरा पुढच्या रांगेतली होते बहुतेक… उत्तम कलाकारांच्या ओळीत असू शकणारी… हा काही खायला घातल्याचा विषय झटकूनच टाकला मी…

होता होता दोन तीन वर्ष होत आली. धीर सुटत चालला… घडत नव्हतंच काही आशादायक… कधीतरी तर जीव द्यावासा वाटला… पोरांच्या ओढीनं, मायेनं पाय ओढला मागे…

आवाज परत आलाच नाही तर… संपलं आपलं गाणं? स्वरात राहणं… परत परत स्वरांना नव्यानं भेटणं… सगळा अंधार समोर… आत मात्र गाणं सुरूच असे… विचार, रचना, रियाज… पण बाहेर येत नव्हतं… घुसमटंत होतं आता…

भीतीनं गिळलं भविष्याला…

– – – आता गुणगुणण्याइतपत आवाज आला होता… त्यावेळी बेबीताईंकडे मासिक सभा चाले… एखादी तयार शिष्या कार्यक्रम करे… आत्मविश्वास, जबाबदारी यासाठी… बेबीताई म्हणाल्या, “तू प्रयत्न कर.. एक वंदना आणि एखादं अभिनयासाठी पदच गायचं असतं. तुझं उत्तम गाणं लोकांनी ऐकलंय… आपलेच पालक वगैरे असतात… ते समजून घेतील. “

.. बेबीताईंची आज्ञा, प्रेम, काळजी समजून मी गायला लागले खरी… पण कधी आवाज दगा देत असे… वाटे कशाला घेतलं हे…

पण हळूहळू सुधारत होतं. गात होते… आशेचा पातळसा किरण फुटत होता… जरा जरा गाता यायला लागलं… १९९० मधे लागलेलं ग्रहण १९९५ मधे सुटलं… मी गायला लागले… एखाद्या भुताटकीसारखा आवाज गेला.. आणि आता परतही यायला लागला… आलाच… मला दागिने, साड्यांपेक्षा नेहमीच स्वरांचा ध्यास होता… मी परत श्रीमंत झाले होते.

पण आवाज गेल्याच्या त्या ५ वर्षात आवाज गेल्याच्या गप्पा, चर्चा, कणव… पसरलं होतं. गाणी मैफली होईनात. पण सहन करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. तरीसुद्धा माझ्याकडे शिकलेल्या अर्चना फाटक, संपदा थिटे, अंकिता देवळे, रश्मी मोघे, प्रियांका बर्वे छान गायला लागल्या‌.. परमेश्वर कृपेनी, रियाजानी यशस्वी झाल्या. खूप समाधान आहे…

माझं गाणं देवानी दिलं… त्यानं परत घेतलं अन् परत दिलंही… एका अंधाऱ्या भयावह डोहातून चांदण्यांच्या लखलखत्या घुमटाखाली आणलं…

आजही गाते… वयानं थोडा श्वास, ताना कमी पडतं आता… पण स्वर, लय, शब्द, भाव यांचा हात हातात तसाच… कणभर जास्तच घट्ट आहे आता… खोल मनात गाणं खूप उलगडलंय… संवादी झालंय… जे कळलंय, उलगडलंय, येतंय, जे घडावं असं वाटतं यासाठी शिकवत राहते. देत राहते. खूप ऐकते, अभ्यासते, विचार करते… आणि हो या अंधाऱ्या काळात “खर्जानं'” खूप दिशा दिली. खर्जातल्या ओमकारानं तर किमयाच केली… मंदिराच्या गाभाऱ्यात घुमावा तसा मंद्रातला स्वर वेगळीच शक्ती, आनंद, शांती देतो… ही दिशा देणारे गुरू महानच… कलावंत, गुणीजन… खूप दिलं, घडवलं त्यांनी… एक स्वररस्ता स्वर रांगोळ्यांनी सजवला.. ‌त्यांचे ऋण कधीही संपणार नाहीत… बेबीताईंचा विश्वास, माझ्याबद्दलची कळकळ, माझ्या दु:खाची जाणीव… त्यातून तर परत स्वर लागला… मी गाती झाले… कसं विसरू?

… माझ्या कडे खूप काही आहे असा दावा नाही माझा, पण जे आहे ते खूप आहे हे मात्र नक्की… आज गुरूजन राहिले नाहीत पण सुंदर स्वरमार्ग सतत आहेत… त्यावरूनच जात्येय… जात राहीन… अंतिम श्वासापर्यंत!!!

आवाजाला काय झालं कधीच कळलं नाही… कळणार नाही… तो नियतीचा जबर फटका होता…

… यशातही अहंकार नव्हताच कधी… वडिलांचा संस्कारच होता तसा… आणि खरतंर कुणालाच असुही नाही… कारण स्वर हे त्यांचेच राजे.. त्यांचे मूडस्, भाव… कधी साथ देतील, कधी सोडतील… माहिती नाही… त्यांना शरण जाणं हेच त्यांचं पूजन!!

परमेश्वरा खूप ऋणी आहे तुझी… ‌शिक्षाही तुझी आणि हे सुंदर दानही तुझंच!!!! असाच अखंड सूर राहुदे…

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्तेचा सारीपाट… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ सत्तेचा सारीपाट… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

सत्ता, व्यवस्था आणि रस्त्यावरचा माणूस?

कोणत्याही सत्तेचा सारीपाट मात्र अजब गजब असतो – – 

मग तो, महाभारतातील काळ असो, रामायणातील किंवा लोकशाही मिळाल्यानंतरचा काळ असो,

सारेच कसे सत्तेसाठी? डाव- प्रतिडाव मांडले जातात…. तेव्हा सुद्धा, द्रौपदीचे वस्त्रहरण झालेच होते!

आता सुध्दा मुखवटे पांघरून सत्ता सामान्य माणसाला एक भविष्यकालीन स्वप्न दाखवित नेहमी गोंजारत असते. आश्वासनाच्या घोषणा वाटत असते कारण एकच..

सत्ता आपल्या हाती ठेवण्यासाठी आता तर, साम, दाम, दंड हे नवे अस्त्र वापरले जाते…

तसेच व्यवस्था सुद्धा अशीच कायमचे गुलाम करीत असते, सामान्य माणसाला..

मग ते शिक्षण, रोजगार, आरोग्य, प्रशासन या पातळीवर..

रस्त्यावरचा माणूस आयुष्यभर ‘तारीख पे तारीख’ सारखा, या व्यवस्थेत कायमस्वरूपी मरत असतो

…. आयुष्यभर,

कधी ‘जिंदाबाद’, कधी ‘भाऊ तुम आगे बढो’.. अशा घोषणा देण्यातच निघून जाते आयुष्य.

शेतकरी, शेतमजूर, तसेच बेरोजगार यांचे प्रश्न सामान्य माणसाला कायमस्वरूपी गिळत असतात

.. तरी सुद्धा, सत्ता केवळ आश्वासनाच्या घोषणा वाटत असते.. दररोज?

पिढी दर पिढी हा संघर्ष असाच सुरू असतोच.

मला वाटते की सामान्य माणसाला मुळ प्रश्नापासून दूर करण्यासाठी सत्ता आणि व्यवस्था पद्धतशीरपणे राबविली जाते..

हे मात्र खरे आहे?

सात बारा कोरा होणार आहे?

कोण खरा? कोण खोटा?

. काहीही समजत नाही

– – तरीही ते म्हणतात ‘ देशात लोकशाही आहे.’…

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक तरी ओळ अनुभवावी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ एक तरी ओळ अनुभवावी…  ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

श्रद्धा आणि आणि चिकित्सा जेव्हा हातात हात घालून येतात तेव्हा मिळणारं आत्मिक समाधान मोठं असतं.

लहानपणापासून घरात आणि आजूबाजूलाही धार्मिक वातावरण होतंच. दर गुरुवारी नियमितपणे दत्ताची आरती म्हटली जायची. त्यातलं…

“दत्त दत्त ऐसे लागले ध्यान 

हरपलें मन झाले उन्मन 

मी तू पणाची झाली बोळवणं 

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान”

या कडव्यापाशी टाळ्यांचा वेग आपोआप मंद व्हायचा. लहान असताना म्हणजे सहावी सातवीत असेन मी एकदा बाबांना विचारलं होतं ‘दत्त दत्त असे लागले ध्यान’ म्हणजे काय असतं… का कोण जाणे त्या शब्दांची मला मोठी गंमत वाटायची. इतक्या लहान मला समजावून सांगायला बाबांनाही बहुतेक जड जात असायचं. ते म्हणायचे तू थोडी मोठी झालीस की शोध घे, हे काय आहे त्याचा. काही प्रश्नांची उत्तरं दुसऱ्याने देऊन समजत नाहीत ती आपली आपण शोधायची असतात. तेव्हापासून श्रद्धेला चिकित्सेचं वावडं नसणं हे कुठेतरी मनात नोंदलं गेलं. आणि नकळत शोध सुरू झाला.

आजही या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे मिळालेलं नसावं असं वाटतं पण आता एवढं लक्षात आलं की काही गोष्टींची भाषिक (व्याख्या) उत्तरं उपयोगी नसतात, त्याची अनुभूतीच घ्यावी लागते तेव्हाच त्या गोष्टी समजतात. जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. किंवा त्या शब्द माध्यमातून आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही. श्रद्धा, विश्वास या गोष्टी अशाच आहेत ज्या शब्दांमध्ये किंवा कुठल्या विशिष्ट परिस्थितीत प्रयोगाद्वारे आपण दुसऱ्याला समजावून सांगू शकत नाही. आपले आपण स्वतःवरच प्रयोग करून त्या समजून घ्यायच्या असतात. प्रयोग करणारे पण आपणच, प्रयोग करतोय तेही आपणच, आणि प्रयोगाची अनुभूती घेणारेही आपणच. ही एक अजब प्रयोगशाळा आहे.

खूप वर्षांपूर्वी अशीच एक कथा वाचनात आली होती. त्या कथेमध्ये साधारण असा आशय होता की, एक लहान मुलगा वनात खेळत असतो. त्याला कुठेतरी कुणीतरी शंकराच्या पिंडीची पूजा करताना दिसतं. त्याला ती खूप भावते आणि तोही एका देवळात जाऊन तशी पूजा करतो. त्यावेळेला काय घडतं तर पाषाणाची आरंभली पूजा, पूजा करता करता स्वयेच झाला पाषाण. अशा अर्थाच्या त्या काही ओळी होत्या. तेव्हाही मला ते वाचून फार गंमत वाटली होती की ही तन्मयता, ही एकरूपता कशी साधली जात असेल. आणि गंमत म्हणजे त्यावेळेला मला ‘दत्त दत्त असे लागले ध्यान’ याच ओळी आठवल्या होत्या. आणि एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्या गोष्टींमध्ये जरी सगुणाचं वर्णन असलं, पूजा असली तरी ते अंतिम ध्येय नाही. त्या सगुणत्वाला सुद्धा कुठेतरी निर्गुणत्वाशी जोडले गेलेलं आहे. ध्यान लागणं यामध्ये कुठलाही भौतिक अर्थ नसून मनाची आणि त्या तत्त्वाची किंवा विश्वाशी एकरूप होण्याची शक्ती आहे. आणि मग तिथे लक्षात आलं की सर्व देवी देवतांच्या प्रतिकांचा प्रतिमांचा उपयोग हा फक्त पूजाअर्चा करणे नसून त्यातून पुढे ध्यानाकडे जाणाऱ्या ईश्वरी तत्त्वाशी जे अद्यापही कोणाला ठोसपणे समजलेलं नाही, तरीही त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं‌ हे आहे.

पण मग हे तत्व काय आहे? जर ते निर्गुण निराकार आहे तर त्याला सगुणांच्या माध्यमातून पाहण्याची गरज का आहे? ही ध्यानाची अवस्था कायम का असू शकत नाही? त्याच्यासाठी इतके प्रयास का आहेत? आणि जर ईश्वर ही संकल्पना आपण मानली नाही तर आपल्याला ती अवस्था समजणार नाही का? एखादा जर निरीश्वरवादी असेल तर तो ध्यानाची अवस्था, या एकरुपतेच्या स्थिती अनुभवू शकणार नाही का?

अशी कुठली गोष्ट आहे की जिच्यामध्ये ही अवस्था अनुभवता येईल? आणि पुढे जसं जसं वेगवेगळ्या व्यक्ती चरित्रांचं वाचन झालं, माणसांचे अनुभव जमा होत गेले. तसं लक्षात आलं की एखादी कला, एखादं संशोधन करताना, एखाद्या खेळात किंवा एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेताना सुद्धा जर तुमचं मन शांत असेल, स्विकारार्ह असेल तर अशी अनुभूती येऊ शकते. धाता आणि ध्येय एक होऊ शकतं. आणि मग किती तरी लौकिक पुरुषांच्या अलौकिक कार्याचं मर्म समजायला लागलं. भले ते लोक धार्मिक नसतील निरीश्वरवादी असतील पण त्यांना ते तत्व गवसलेलं आहे आणि म्हणूनच ते आपल्या कार्यातून अजरामर झाले आहेत.

त्यामुळे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ही फक्त एका आरतीची ओळ नसून ही आपल्या ध्येयाशी एकरूप होणाऱ्या स्थितीची वर्णन करणारी रचना आहे हे लक्षात आलं. आणि त्याचबरोबर ते साधण्यासाठी विचार, मन आणि शरीर यांचा किती उत्तम मेळ साधला जायला हवा एकरूपता साधली जायला हवी हेही लक्षात आलं.

हे अवघड आहे पण अशक्य नाही…

इथे संत नामदेवांचं स्मरण होतं.. ते म्हणतात ना एक तरी ओवी अनुभवावी… मी म्हणते ही एक तरी ओळ अनुभवावी.

आज दत्त जयंतीच्या उत्तम मुहूर्तावर अनेकांना अशी प्रेरणा व्हावी, प्रचिती यावी हीच प्रार्थना!

||श्री गुरुदेव दत्त||

© तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Post retirement management ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ Post retirement management ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

” Post retirement manage करायला शिकावेच लागेल. “••••

काल ताईकडे गेले होते. आज गेल्या गेल्या नेहमीसारखे प्रसन्न वाटले नाही. खरं तर तिच्या घरी नेहमी उत्साही वातावरणात असतं. भाऊजी पण महिन्याभरापूर्वीच retired झाले. चांगली क्लास वन नोकरी, पस्तीस वर्षं केली. चांगल्या मोठ्या post वर होते. Retirement नंतर छान मोठी पार्टी दिली होती. आपल्या नोकरी बद्दल भरभरून बोलत होते. किती जबाबदारी ने त्यांनी आपले काम केले. कसे ते ‘ key post ‘ वर होते. भरपूर मान होता. माझ्या शिवाय पान हालत नसे, माझ्या बॉसचे. असे म्हणाले होते.

आता निवृत्ती नंतरचे आपले काय कार्यक्रम असतील, त्यांची पण चर्चा झाली होती. सर्वच तर मस्त आहे मग काय टेंशन आहे?? कळत नव्हते.

कळेलच थोड्या वेळात. असा विचार करून मी सहज वागले. मी विचारले “अग काय म्हणतात अजय, अनिता, अनय?? भाऊजी कसे आहात तुम्ही?? ‘Post retirement life ‘मजेत चाललीय ना? “ या माझ्या प्रश्नाने खळबळच उडाली. चुकीचा प्रश्न डागल्या गेला हे माझ्या लगेच लक्षात आले. व टेंशन चे कारण लक्षात आले. •••.

जणू काही भाऊजी या प्रश्नाची वाटच बघत होते. त्यांनी बोलायला सुरू केले. आता मात्र ऐकल्याशिवाय इलाज नाही. कारण ते बोलत असताना मधे बोललेले त्यांना आवडत नाही. आवाजात थोडा राग, निराशा, अपेक्षा भंग ची भावना दिसत होती. मी ताई कडे बघीतले तिच्या चेहऱ्यावरही थोडा राग दिसला. मला टेंशन ची चाहूल लागली.

भाऊजी म्हणाले “मी ‘क्लास वन अॉफिसर ‘होतो. माझ्या एका हाकेवर सर्व अॉफिस धावत यायचं. आणि आता मला काही किंमतच नाही. चहा वेळेवर मिळत नाही. साधी आंघोळ करायला आता जाऊ नका, थोड्या वेळाने जा. नाश्ता वेळेवर नाही. कोणी ऐकायलाच तयार नाही. मला वाटलं होतं जसं आयुष्य मी आजवर जगलो तसंच आत्ताही असेल. पण तसं काहीच नाही. मला काही मानच नाही वगैरे वगैरे “. आणि भाऊजींनी ताई कडे बघीतले ••••.

ताई म्हणाली “ झालं का तुमचे बोलणे? आता मी बोलू का? नाही तर पुन्हा रागवाल?? ताई म्हणाली•••• अग!!  घर म्हणजे अॉफिस का? मला मान्य आहे. त्यांचा खूप मान होता. अहो, तो तुमच्या खुर्ची चा मान होता. त्यांची नोकरी, त्यांचे स्टेटस याबद्दल आम्हाला माहीत नाही का?? त्यांच्या बरोबर आम्ही सर्वांनी पण ते enjoy केले आहे. यांचा अभिमान व कौतुक ही आहेच. पण आता retired झाले आहेत. तो past होता. आणि हे घर आहे. अॉफिस नाही. घराचे वातावरण अॉफिस सारखे कसे असू शकते? तेथे बेल वाजवली की रनर लगेच हजर. व साहेबांना काय हवं नको ते बघणार, लगेच आणून देणार. रनरचे फक्त तेच काम असे. येथे तुम्ही बाबा अहात, आजोबा अहात. ते प्रेम आदर मिळतो ना तुम्हाला. •••• 

घर म्हणजे घरातले सर्व जण. आता सकाळी अजय अनिता ची अॉफिस ची घाई, अनयची शाळेची घाई, आता यांची अॉफिस ची घाई नाही पण यांची गडबड खूप असते. या तिघांचे आवरले, की तुम्ही आपलं आवरायला घ्या. असं म्हंटले की यांना पटत नाही. राग येतो. मुलांचा नाश्ता, डबा होत असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा चहा, पाणी मागतात. मला यांचे सर्व व्यवस्थित करायला आवडते. पण इतर महत्त्वाची कामं पण असतातच ना. सर्वांचे बघायचे असते. आज बघ ना, या घाई गडबडीत अनिता डबा न घेता गेली हे बरोबर आहे का? नोकरीला घरातुन निघालेल्या मुलीला डबा देणे जमले‌ नाही मला. हे मला आवडले नाही. अर्धा तास चहा उशिरा मिळाला असता तर चालले नसते का?? •••• थोडं बघावं ना. क्लास वन अॉफिसरी इथे दाखवायची का? वेळेवर मिळाले नाही की यांची आरडाओरडा सुरू होते. मुलांसमोर हे अस वागणं योग्य नाही. या सर्वात माझी तारेवरची कसरत चालू असते. हे साठ वर्षांचे आहेत तर मी काय लहान आहे का??? प्रत्येकाची वेळ सांभाळणे मला कठीण होतं आहे. तरी अनिताची खूप मदत असतेच. यांनी थोडं सहकार्य केले तर, सर्व सहज मॅनेज करता येईल. यांचा मान मला अजिबात कमी करायचा नाही. मुलांसमोर तर नाहीच नाही. कुठे चूकतेय मी?? माझं मलाच कळत नाही. हे असं माझं routine वर्षानुवर्ष चालू आहे. मग आत्ताच का माझी धांदल उडतेय??? “

माझ्या लक्षात आलं ‘post retirement ‘अवघड जातंय. अचानक मिळालेला रिकामा वेळ काय करावे??? सुचत नाहीये, नोकरीत मिळालेला ‘मानसन्मान’ कुठे तरी आठवतोय. हे सर्व पचविणे कठीण होतं आहे. ••••

ताई मात्र बोलत होती. माझ्या ‘support ‘ ने आज तिने बोलायचे ठरविलेले दिसतंय.

ताई म्हणाली, ••••

“अग!!  निवृत्ती हे तर अटळ सत्य आहेच ना. प्रत्त्येकाला एक ना एक दिवस निवृत्त व्हायचेच आहे. आता या परिस्थितीशी ‘adjust’ तर करावेच लागेल.

मला आठवतंय, जेंव्हा अनिता सून‌ म्हणून घरी आली, तेंव्हा मला ही बऱ्याच गोष्टीं बरोबर ‘adjust’ करावे लागले. त्यावेळेस तुम्हीच मला सांगायचे ना. शांत रहा, अनिता नवीन आहे. तिला काही बोलत जावू नको. हळूहळू सर्व सेट होईल. ••••

मला कळतंय आयुष्यभर नोकरी करणाऱ्यांना अचानक रिकामा वेळ मिळाला की काय करावे कळत नसेल. तुम्हाला जे आवडेल ते करा. आपलं टाइमटेबल तयार करा. जेणेकरून मला सर्वांकडे लक्ष देता येईल. •••••

आपल्या मुळे घरच्यांना अडचण होणार नाही याची काळजी घ्यावीच लागेल. आपलं ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व सांभाळुन आपल्या मुलांबरोबर आनंदाने पूढे आयुष्य जगूया आपण. ••••

तुम्हाला तरी कधी कुठे वेळ मिळाला?? जेवढी मोठी ‘post’ होती. तेवढीच जबाबदारी पण होती. जूनी पीढी आपली खुर्ची सोडेल, तेंव्हाच तर नवीन पिढी पूढे येईल ना. •••••

मुलं काही बोलत नाही पण त्यांना तुमची चिडचिड दिसत नाही का?? उद्या आम्ही वेगळं राहतो असे म्हंटल त्यांनी, तर चालेल का तुम्हाला??? ••••

एका बाईच्या आयुष्यात खूपदा असे प्रसंग येतात जेंव्हा ती भांबावून जाते. काय करावे??? कसे करावे?? तिला सुचत नाही. लग्नानंतर, पहिलं मुलं झाल्या वर, सून आल्यावर ती ‘adjustment ‘करिता वेळ घेते. पुरुषांना पण नोकरी नंतर काय करावे‌ हा प्रश्नच पडत असावा. हे नक्की. ”••••

मी मधून मधून दोघांकडे बघत होते. बहुतेक आज या वादविवादात माझ्या वर ‘Umpire ‘ ची जबाबदारी होती. मनात म्हंटल, ••••

“समर्थन व विरोध विचारांचा असावा, व तो वेळेवर केला गेला पाहिजे “. “लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, नाहीतर वागण्याच्या पद्धतीतून असो. “

‌मी हळुच म्हंटल, ••••

भाऊजी!!  ताई बरोबर म्हणतेय. तुमचा एवढा चांगला परीवार असाच रहावा, याकरिता तिचे सतत प्रयत्न सुरू असतात. तुमचे सहकार्य पण अपेक्षित आहे. ••••

म्हणतात ना ••••

“आयुष्यात समाधान, यश मिळवायचे असेल, आपल्या माणसांना जोडून ठेवायचे असेल तर, स्वतः वर, स्वतः ची काही बंधने वेळेवर घालावीच लागतील. “••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदर्श कुटुंब… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ आदर्श कुटुंब… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

साऱ्या विश्वाला कुटुंब व्यवस्था देण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतीय संस्कृतीने केले असे म्हटले जाते. मला त्यात तथ्य आहे असे वाटते…

वरदेव आणि वधू यांचा विवाह झाला की दोघे पती पत्नी होऊन जातात…

लग्न लागताना ते लक्ष्मी आणि नारायणाचे रूप असतात असे मानले जाते..

*”कर्तव्य”* पूर्ती करण्यासाठी दोघे लगीन गाठीत बांधले जातात…

हे बंधन दोन कुटुंबांना आणि त्यांच्या परिवाराला एकत्र आणत असते…

दोघे मिळून आपला प्रपंच सुरू करतात, यथावकाश त्यांचा प्रपंचवेली वर फुले फुलतात…

प्रपंच त्याच्या त्याच्या गतीने कधी सुखात तर कधी दुःखात गटांगळ्या खात असतो…

या सर्वांचा ते कमीअधिक प्रमाणात उपभोग घेत असतात…

… कुटुंबासाठी आपल्याकडे एक महान असे उदाहरण किंवा ज्याला प्रमाण मानता येईल असे कुटुंब आहे… तुमची उत्सुकता फार ताणत नाही…

 

हम दो हमारे दो

एका मुलाला आद्य पूजेचा मान.

त्याला दोन पत्नी

एक बाल ब्रह्मचारी

आई खरं तर राजकन्या

पण तपस्या करून वर निवडला तो कैलास पर्वतावर राहणारा…

अर्थात लौकिक सुखाची वानवा…

… बर हे इथेच संपत नाही 

 

यांची प्रत्येकाची वाहने पाहू…

प्रत्येक जण एकमेकांचे शत्रू म्हणता येतील…

 

एकाचे उंदीर…

दुसऱ्याच्या गळ्यात साप…

तिसऱ्याच मोर…

तर मातेचे वाहन सिंह किंवा वाघ…

 

… तरीही हे कुटुंब आनंदात आहे…

ज्याला त्याला नेमून दिलेली कर्तव्ये अतिशय आनंदाने करीत आहे असे आपल्या लक्षात येईल…  

… सर्वसामान्य घरात इतका विरोधाभास नक्कीच नसेल…

यावरुन मला असे वाटते की आपल्या घरात असलेल्या विविध स्वभावाच्या सदस्यांचा विचार करून आपण गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो…

… पहा, पटतंय का?

शब्दांकन : संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आठवडी बाजार…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आठवडी बाजार…” ☆ प्रा. भरत खैरकर 

गावाला प्रायमरी शाळेत असताना बुधवारची आम्ही वाट बघत असायचो, कारण ह्या दिवशी आठवडी बाजार असायचा. दर बुधवारी आमची सकाळची शाळा असायची. आणि ती सकाळी दहाला संपायची.. त्यामुळे बुधवार हा आमच्यासाठी भारी असायचा. आमचं गाव परिसरात मोठं असल्याने आजूबाजूच्या पंचवीस तीस खेड्यातून या ठिकाणी बाजारासाठी लोक यायचे. हा काळ साधारण ९० च्या दरम्यानचा आहे. तेव्हा बरेचसे लोक बैलगाडी.. रेंग्या.. दमणी.. सायकलने.. पैदल.. असे ह्या बाजारात दाखल व्हायचे.

बैलगाड्यांनी येणारा शेतकरी वर्ग गावाच्या बाहेर असलेल्या एका पटांगणामध्ये आपापल्या बैलगाड्या ‘पार्क’ करायचा. तिथे बैलांना चारापाणी घालून.. ते कासऱ्याच्या साह्याने चाकालाच बैलांना बांधून ठेवायचे. मग आपापल्या पिशव्या.. पोते.. विकायला आणलेलं जे काय सामान.. असेल ते घेवून ही मंडळी आठवडी बाजारात पोहोचायची.. काहीजण आपल्या सोबत तंबू किंवा राहूट्या आणायचे.. ऊन पावसापासून वाचण्यासाठी तसेच मालाचे रक्षण करण्यासाठी या तब्बूंचा.. राहूट्यांचा उपयोग व्हायचा.. काहीजण मात्र बाजाराच्या साथीमध्ये खाली पोतं टाकूनच आपलं दुकान थाटायचे!

इकडे बसस्टॉपवर मात्र खचाखच भरून आलेल्या गाड्या.. जिपा.. मेटॉडोर.. ट्रक आणि बसेस ह्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं असायचं. प्रत्येकाची सामान खाली उतरवण्याची घाई असायची.. ह्या दिवशी हमाल कमी पडायचे.. गावातील ठरलेले मुलं दोन-तीन चा ग्रुप करून भरपूर कमाई करायचे.. तालुक्याच्या ठिकाणाहून आलेले व्यापारी अशा मुलांना पकडून आपापला विक्रीचा माल ठरलेल्या बाजारओट्यापर्यंत पोहोचवून घ्यायचे.. त्यासाठी मुलं मागील तेवढी रक्कम व्यापारी देत असतं. विशेषता ‘झाडी’तून म्हणजे भिशी, चिमूर, नांद इथून येणारा तांदूळ हा मोठ्या प्रमाणात मेटॅाडोर मधून यायचा.. तो तंबूमध्ये थप्पी थप्पी ने लावण्यासाठी खूप दणकट असे हमाल लागायचे.. त्यासाठी ह्या मुलांना मोबदलाही भरपूर मिळायचा.

बाजाराची सुरुवातच मुख्यतः देशी दारूच्या दुकानापासून व्हायची.. त्यामुळे हौसे, नवसे, गवसे, आठवडी बाजारासाठी आणलेला पैसा बऱ्याचदा तिथेच खर्च करून दिवसभर बाजारात बोंबलत फिरायचे. काहीजण सट्टापट्टीच्या नादी लागून नंबरगेम मध्ये अडकायचे.. तर काही मित्रासोबत शेवचिवडा, आलूबोंडे, भजे खात हॉटेलिंग करायचे..

तिथून पुढे कपडे वाल्यांची रांग सुरू व्हायची.. त्या ठिकाणी गरीब, मजूर लोकं आपल्या मुलांसाठी आंगळ टोपडं खरेदी करायचे. सोबत आलेली पोरं आई-वडिलांकडे आईसप्रोटसाठी हट्ट धरायचे.. आंगळ टोपडं आणि सोबत आईसप्रोट मिळाल्यामुळे मुलांचा बाजार मस्त झालेला असायचा.. ते दिवसभर मग आईच्या मागे मागे बाजार भर फिरायचे. काही फुगेवाले, खेळणीवाले दुकानदार सायकलवर आपला व्यवसाय करायचे.. त्यांच्या सायकलला लावलेले भोपू वाजल्यावर मुलं फुगे किंवा खेळणीसाठी रडारड करायचे.

पुढे भुसार मालाची म्हणजे धान्य, डाळी, गहू, ज्वारी इत्यादींची ओळ होती.. त्या ठिकाणी शेतकरी बायका घमेल्यामध्ये किंवा एखादं दुसऱ्या पोत्यामध्ये आपल्या शेतात पिकलेलं वरील प्रकारचे कोणतेही धान्य घेऊन बसायच्या.. एक दोन तासात ते सर्व धान्य विकल्यावर मिळालेल्या पैशांमध्ये आपला आठवडी बाजार करायच्या!

अजून थोडं पुढे गेल्यावर मात्र ठोक व्यापारी व त्यांची दुकाने असायची.. त्यामध्ये तेलाचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, चिकन सुपारी व्यापारी, सोन्या चांदीचे व्यापारी, आपापल्या दुकानात नोकर चाकरासह बसलेले असायचे.. ह्या ठिकाणचा मोठा व्यापार.. मोठी उलाढाल व त्यातील ग्राहक सुद्धा ठरलेले होते.. गरीब, मजूर ह्या मोठ्या दुकानांमध्ये जायची हिंमत करायचा नाही..

पुढे गेल्यावर बांबू पासून तयार केलेल्या टोपल्या.. तट्टे.. चटया.. ढोल्या.. इत्यादीसह त्या ठिकाणी लाकडाचे मोठमोठे फाटे.. वासे.. मयाली.. दरवाजे.. खिडक्या.. विकायला ठेवलेल्या असायच्या.. ज्याच्या कुणाच्या घराचे बांधकाम चालू आहे, असे लोक या ठिकाणी येऊन सौदेबाजी करून हा फौजफाटा घेऊन जायचे..

बाजारातला मुख्य रस्ता दुतर्फा हॉटेल.. पानठेले.. कृषी केंद्र. सायकल मार्ट.. किराणा.. कापडाचे मोठे व्यापारी. मिठाईची दुकाने.. फरसाण.. मुरमुरे फुटाणे.. गळ्यातलं नाकातलं विकणारे.. सलूनवाले.. प्रेसवाले.. टेलरिंग कामवाले.. मोटर रिवाइंडिंगवाले.. इलेक्ट्रिकल दुकान.. हार्डवेअर इत्यादींनी सजलेला होता. ही गावची आणि बाजारातली मुख्य लाईन होती. ह्याच ओळीमध्ये जर्मन पितळेची भांडे विकणारे व्यापारी तसेच शेवटी शेवटी कुंभाराची रांजण, गाडगे, मडके विकण्याची जागाही होती..

 मासे, मटण, डुक्कर, भाजल्या मासळ्या, झिंगे, इत्यादी मांसाहारी पदार्थासाठी बाजारात एक कोपरा ठरवून दिला होता.. त्या ठिकाणी लाकडाच्या तीपाईवर लटकवलेल्या बोकडाची.. डुकराची.. उलटी टांगलेली शरीरे.. तसेच खाली घमेल्यामध्ये जमा केलेल्या रक्ताची.. शिवाय माशांची.. खेकड्यांची.. मिळून एक अजब प्रकारची दुर्गंधी वजा हवीहवीशी वाटणारी बाजाराची खास ओळखही होती.

तिथून पुढे लागूनच गरम मसाल्याची दुकाने यात मीरे, दालचिनी, लवंग, तिखट, मीठ, हळद, घरचे कुटलेले मसाले, अद्रक, लसूणासह अनेकानेक जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वस्तू मिळायच्या.. त्याला लागूनच पुढे शाकाहारी म्हणजे शेतकऱ्यांचा भाजीपाला वांगे, टोमॅटो, कोबी, गवार, फुलकोबी, पालक, मेथी, इत्यादीसह कांदे, बटाटे विकणाऱ्यांची पालं किंवा तंबू होते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या मोसमात या ठिकाणी दूरवरून येणारे सर्व प्रकारचे आंबे मिळायचे.. त्यानंतर उंदीर मारण्याचं औषध विकणारे.. जडीबुटीवाले.. तवा, कढई, तलवार, चाकू, पोळपाट, लाटणं, इत्यादी तयार करणारे शीख म्हणजे सरदार लोकांचे तंबू असायचे.

नदीच्या पलीकडे पारध्यांनी आणलेल्या लावा, तीतरं, कबूतरं, इतर पक्षी, हरीण, ससे, ईत्यादी ह्या बाजारात मिळायचे.

बाजारात फक्त उलाढाल.. व्यापार.. पैशाची देवाणघेवाण.. एवढेच होत नव्हते तर ह्या ठिकाणी वीस-पंचवीस गावातला संवाद.. भेटीगाठी.. नातेसंबंध.. सुखदुःखाच्या बाता.. निरोप.. विरह.. देवाणघेवाण.. इत्यादींचाही ऊहापोह व्हायचा.

सायंकाळच्या वेळी उरलीसुरली दारू पिऊन एखादं दुसरे भांडण.. किंवा मारामारी हा ठरलेला कार्यक्रम असायचा! सगळ्यांची घरी परतण्याची घाई असायची.. गावातलं कोणी मागे राहिला कां? ठरल्यानुसार सगळ्या वस्तू खरेदी केल्या कां? किती नफा किती तोटा झाला? इत्यादींच्या चर्चा.. गप्पा मारत दहा-बारा किलोमीटर वरून आलेली मंडळी भरभर पैदल.. बैलगाडीने.. नाही तर कुणी आणलेल्या वाहनाने.. आपापल्या गावी परतायची, ती आठवडाभरानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी..

आता आठवडी बाजाराची वाट पहावी लागत नाही.. सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे.. स्वीगी.. झोमॅटो.. ॲमेझॉन रिलायन्स बाजार.. आपल्या घराच्या आत घुसलेला आहे.. आठवडाभर थांबायला कुणाला फुरसत नाही वेळ नाही.. एकमेकांशी बोलायला तर मुळीच नाही.. गाडीघोडा सगळ्यांकडे उपलब्ध आहे.. त्यामुळे आठवडी बाजाराची वाट पाहायची गरज नाही.. त्यामुळे संवाद नाही.. भेटणं नाही.. विरह नाही.. सुख दुःख नाही.. कुणाचचं कुणाला घेणंदेणं नाही.. त्यामुळे केवळ दोन दशकात बदललेल्या आठवडी बाजाराच्या ह्या स्वरूपाचं आणि अशा कित्येक नामशेष होत चाललेल्या चांगल्या परंपरांचा -हास होताना बघून मन भरून येतं.. गदगदून जातं..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्त्री जन्मा, तुझी कहाणी… लेख क्र. २३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆

सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

☆ स्त्री जन्मा, तुझी कहाणी… लेख क्र. २३ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

स्त्री जन्मा, तुझी कहाणी!

xxx बाईंच्या वर्गातली (पहिलीतली) एक मुलगी मी त्यांच्या वर्गात गेल्यावर नेहमी माझ्याजवळ यायची. तिच्या डोळ्यावर मोठ्ठं उबाळू आलं होतं, तिचा डोळा जवळजवळ मिटला होता. तिला जवळ घेत म्हटलं, “काय ग, एकटीने आंबे खाल्लेस ना?मला एकही दिला नाहीस ना?”

“बाई, आंबे नाही खाल्ले, असाच आला फोड. पण खूप दुखत नाही, होईल बरा लवकर, ” ती. आपल्या आजाराबद्दल सकारात्मक बोलणारी ही गोड छोकरी मला खूप आवडायची. नेहमी प्रसन्न हसणारी, गप्पा मारायला उत्सुक असणारी ही मुलगी – अभ्यासातही हुशार होती.

तिची फी बाकी होती, म्हणून मी तिच्या वर्गशिक्षिकेकडे चौकशी केली, “हिची आई काय करते?” त्यांनी सविस्तर माहिती घेऊन मला सांगितलं.

“आई चांगली शिकलेली दिसते. हुशार वाटते. मग घरकाम का करते बरं?” माझ्या मनात विचार आला.

काही उलगडा होईना. शेवटी त्यांना भेटायला बोलावलं.

छान हसरा प्रसन्न चेहरा. चेहऱ्यावरून तरी सुशिक्षित वाटत होत्या. विचारलं, “किती शिक्षण झालंय?”

म्हणाल्या, “दहावी. ७८% मिळाले होते, गावी होते तेव्हा. ” 

“गावी असूनही, स्वतःच्या मेहनतीने एवढे मार्क्स मिळवलेत. मग पुढे का शिकला नाहीत?निदान एखादा कोर्सतरी का केला नाहीत?” मी म्हणाले.

त्यांचे डोळे भरून आले. “बाई, घरची गरीबी. माझ्या मागची भावंडं शिकणारी. कॉलेज तालुक्याच्या गावी. रोजचं जायचं यायचं भाडं कसं परवडणार?म्हणून शिक्षण सोडावं लागलं.

नात्यातलाच एक मुलगा स्थळ म्हणून सांगून आला. फारशी चौकशी न करताच वडिलांनी लग्न लावून दिलं. ते दारू पितात हे लग्नानंतर कळलं. खूप वाईट वाटलं. पण माझं हे दुःख वडिलांना सांगून त्यांना कशाला दुःखी करू?

पदरात ही मुलगी, त्यामुळं ठरवलं, आपला संसार आपणच सांभाळायचा. मग दोन पैसे मिळवण्यासाठी कामं करायला सुरुवात केली, ” त्या सांगत होत्या, आणि डोळ्यावाटे अश्रूधारा झरत होत्या.

त्यांना म्हटलं, “तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडून एखादा छोटासा कोर्स करा, त्या कोर्सचा सगळा खर्च मी करेन. तुमच्यासारख्या हुशार बाईने काहीतरी वेगळं करावं असं मला वाटतं. “

माझ्या या वाक्यानंतर त्यांनी झटकन मान वर करून माझ्याकडे पाहिलं, “बाई, पाचव महिना आहे. हे बाळंतपण झाल्यावर मी नक्की येईन. “

म्हटलं, “तुमची तब्येत जपा. तुमची मुलगी खूप हुशार आहे. मुलगाच हवा म्हणून उगाचच वाट पाहू नका. महागाई वाढते आहे. एका मुलाला वाढवणंच किती कठीण आहे! तेव्हा आता दोन बस्स. मग मुलगी झाली तरी चालेल. “

त्या गेल्यावर मी विचारात पडले. आपल्याकडे अजूनही मुलग्यालाच वंशाचा दिवा का मानतात?असा कोणता उजेड पाडतात ही मुलं?खरंच हुशारी असूनही निव्वळ गरिबीमुळे आणि त्यातही मुलगी असल्यामुळे यांचे शिक्षण थांबले. त्यात नवऱ्याचे व्यसन.

– – यात काही सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे. बघू या आपल्याला काय जमते आहे ते.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जे होतं ते चांगल्यासाठीच… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ जे होतं ते चांगल्यासाठीच… ☆ श्री मकरंद पिंपुटकर  

जे होतं ते चांगल्यासाठीच…

तो नुकताच एका लग्न समारंभावरून नेरळहून चिंचवडला परतला होता. घरी येऊन चहाचा कप हातात घेतो ना घेतो, तोच गृहपाठ करणारी लेक भुणभुणली—

“बाबा, हिंदी गृहपाठ — जो होता है वो अच्छे के लिए ही होता है — ह्याचं उदाहरण द्यायचं आहे.”

दमून भागून आल्यावर अशा प्रश्नावर एरवी तो वैतागला असता. पण आज तो खळखळून हसला. “अगं, अगदी ताजं उदाहरण आहे — आणि भन्नाट आहे!

तो सांगू लागला—

“मी शाळेत असताना आम्ही मुंबईत गोरेगावला राहायचो. तेव्हा आमच्या शेजारीच माझ्या वर्गातली एक मुलगी रहायची, आज तिच्या मुलाचं लग्न होतं म्हणून मी नेरळला गेलो होतो.

लग्नमुहूर्त ११:३९ चा होता. आणि १२:५१ व १:१४ अशा दोन लोकल नेरळहून कर्जतला जायला होत्या. त्यापैकी कुठलीही पकडली तरी २:२५ ला कर्जतला येणारी मुंबई–चेन्नई सुपरफास्ट मिळून मी आरामात खडकी स्टेशनवर उतरून घरी पटकन पोचणार होतो. कारण घरी येऊन तुझ्या आजीला डॉक्टरांकडे न्यायचं होतं. ”

“लग्न भारीच झालं. जुने वर्गमित्र – योगिनी, कल्पना, निलेश, मनीष, अनिल — सगळे भेटले. खूप छान वाटलं. मी लवकर परत जाणार म्हणालो तर ते मला जाऊ द्यायला तयारच नव्हते, पण आजीला घेऊन डॉक्टरांकडे जायचे आहे म्हटल्यावर त्यांनी नमतं घेतलं.

तेवढ्यात निलेशला त्याचा पुण्यातला हॉस्टेल roommate दिसला. तो लग्नाला आलेला आणि जेवण झालं की त्याच्या कारने पुण्याला निघणार होता! निलेशने त्याला मला वाटेत चिंचवडला सोडता येईल का विचारलं — आणि तोही लगेच तयार झाला! ”

लेक एकदम उत्सुक, “व्वा, बाबा, मस्तच. जे होतं ते चांगल्यासाठीच! “

“हो, पण जरा थांब, कहानी में ट्विस्ट हैं! आम्ही जेवायला बसलो, आणि अचानक निलेशच्या त्या मित्राला ऑफिसचं अर्जंट काम आलं — तो, मला न घेताच, कारने ताबडतोब निघून गेला. मी थोडा खट्टू.

त्यावर अनिल म्हणाला — “खट्टू नको होऊ, जे होतं ते चांगल्यासाठीच! “

हे सगळं होईपर्यंत, १:१४ ची ट्रेन निघून गेली होती. अनिलने मला नेरळ स्टेशनवर सोडलं. मी RailOne app वर तिकीट काढलं, आणि मला २:०० ची लोकल मिळाली. ”

तो पुढं म्हणाला— “लोकल दोन मिनिटं उशिरा — २:२० ला कर्जतला पोचली. मी ॲपवर चेन्नई सुपरफास्ट कुठे आहे पाहिलं… आणि मला धक्काच बसला! गाडी अजून CSMT वरच उभी होती — तब्बल पावणे दोन तास उशीर! म्हणजे ४:१५ नंतरच ती कर्जतला पोचणार होती! आणि खडकी यायला ६ वाजून जाणार होते. म्हणजे आजीला डॉक्टरकडे न्यायला जाम उशीर होणार होता. ”

तितक्यात स्थानकावर उद्घोषणा झाली —

“जोधपूर–हडपसर सुपरफास्ट एक्सप्रेस लगेच येत आहे. ”

“माझा मेंदू चक्रावला — कारण या गाडीला कर्जतला थांबा नसतो! बहुतेक चेन्नई गाडी उशीरा असल्याने फक्त आजच्या दिवसा तात्पुरता थांबा देत होते. मी लगेच स्टेशनमास्तरांकडून खात्री केली — माझं तिकीट वैध होतं.

गाडी आली — मस्त जागा मिळाली — आणि या गाडीचा अधिकृत थांबा? — चिंचवड!

म्हणजे खडकीपर्यंत जाऊन परत मागे येण्याचा त्रासही नाही! ”

तो चहाचा घोट घेत म्हणाला—

“गाडी ४:१५ ला चिंचवडला. आणि ४:३० ला मी हा असा तुझ्यासमोर. आणि चहा पिऊन झाला की आता आजीला वेळेत डॉक्टरांकडे घेऊन जाणार.

आता काल दुपारी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रॅफिक जाम होता की नाही ते मला माहीत नाही, पण ज्या पद्धतीने मी वेळेत घरपोच येऊ शकलो, त्यावरून मी नक्की म्हणू शकतो की,… ”

“… जे होतं ते चांगल्यासाठीच! “, लेक आनंदाने चित्कारली, “कळलं बाबा! तुम्ही वेळेत आलात, मला माझ्या गृहपाठाचं उत्तरही मिळालं! खरंच — जे होतं ते चांगल्यासाठीच!”

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares