मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

यू  ट्युबला एका आहारतज्ञाचं भाषण ऐकण्यात आलं. त्यात त्यांनी योग्य आहार,सप्लिमेंट्स यांद्वारे  अनेक रुग्णांना विविध आजारांतून कसं बरं केलं ,ते प्रभावीरीत्या सांगितलं होतं..

काही महिन्यांपूर्वी  निघालेली B12 व D जीवनसत्त्वाची कमतरता व काही तब्येतीच्या तक्रारींमुळे मी  या 

आहारतज्ञांकडे फोन केला.फोन साहजिकच  रिसेप्शनिस्टने घेतला…. ” आमच्या मॅडम ऑन लाईन तुमच्याशी ३० ते ४० मिनिटे बोलून तुम्हाला सल्ला देतील. या सल्ल्याची फी रु. तीन हजार असेल. तुमची केस पाहून तुम्हाला आम्ही तीन महिन्यांसाठी एक डाएट प्लॅन देऊ. तो तुम्हाला फॉलो करावा लागेल.तुम्ही जर हा प्लॅन घेतलात तर 

तीन हजारमधील दोन हजार रुपये आम्ही परत करू.”

दोन हजार रुपये परत करणार म्हटल्यावर मला एकदम भारी वाटलं. डाएट प्लॅन घ्यायचाच ,असा पक्का निश्चय करून मी विचारलं, ” मॅडम, म्हणजे हा डाएट प्लॅन एक हजार रुपयात मला पडेल नं?”

” अहो मॅडम नाही नाही.डाएट प्लॅनची किंमत वेगळी पडणार.”

” किती आहे किंमत”  मी जरा नाराजीनेच विचारले.

” प्रत्येक पेशंटनुसार प्लॅन वेगळा असतो.त्यामुळे किंमतही वेगळी असते.”

” अहो पण रेंज असेल नं,कमीत कमी किंमत काय असेल ?”

“साठ हजार”. …. 

माझ्या हातातून  फोन खाली पडला. दोन दिवसांनी  माझ्या जवळच्या  मैत्रिणीच्या चित्राच्या घरी गेले होते.

तिला ही घटना ऐकवली. क्षणार्धात तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती आत गेली. हातात अनेक बाटल्या,प्लास्टिकचे डबे आणि फाईल घेऊन बाहेर आली….. आठ महिन्यांपूर्वी चित्राला खूप अशक्तपणा वाटू लागला होता.काम होत नव्हते.चिडचिडेपणा आला होता.जगण्यात अर्थ वाटत नव्हता. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले.त्यांना काही विशेष आजार वाटला नाही. जीवनसत्त्व ,लोहासारखी खनिजं यांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं. पौष्टिक, संतुलितआहाराने बरं वाटेल, असं  त्या जुन्या जाणत्या डॉक्टरांचं मत पडलं.

लक्ष्मी पाणी  भरत असलेल्या चित्राच्या घरात अन्नाची काही  कमी नव्हती. स्वयंपाकाच्या मावशी  दोन्ही वेळेला  प्रत्येकाच्या आवडीचं जेवण रांधत होत्या. पण चित्राला दाक्षिणात्य पदार्थ आवडत .ती बरेचदा  वैशाली, वाडेश्वरमधून  इडल्या,डोसेच मागवून खाई. इतर वेळी वरणभातावरच तिचं पोट भरत असे. आईस्क्रीम मात्रं तिला रोज लागायचेच. आणि चहा हे तिचं अमृत होतं. दिवसातून सात-आठदा तरी तिचा चहा होत असे. चित्राच्या लेकीचे चायनीजशिवाय पान हलत नसे. ती मैत्रिणींबरोबर चायनीज खाऊनच घरी येत असे. शिवाय डॉमिनोज ,पिझा हट, मॅकडी  ही तिची तीर्थस्थानं होती. घरची पोळी भाजी तिला बोअर होई. भात खाणं हे तर तिला पाप वाटे. पिझा,बर्गरनी  तिच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलच वजनदार  केलं होतं.. मंदार ,चित्राचे यजमान त्यांच्या धंद्याच्या निमित्ताने  बरेचदा बाहेरच असत. सामिष जेवण त्यांचा जीव की प्राण…विविध गावांतील कोणत्या हॉटेलात फिश चांगला मिळतो, कुठे बिर्याणी लाजवाब असते, हे सांगताना  सरस्वती त्यांच्या जीभेवर नाचत असे. मटन,तांबडा-पांढरा खाण्यासाठी ते मित्रांबरोबर खास  कोल्हापुरला जात असत. त्यामुळे  चित्राच्या शाकाहारी घरी जेवणासाठी ते क्वचितच  असत.

चित्रावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणूनच चित्रा आजारी पडल्यावर त्यांनी तिला लगेच डॉक्टरांकडे  नेलं. डॉक्टरांनी जेंव्हा जीवनसत्त्व, खनिजे, लोह यांची कमतरता सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या समृद्ध भरल्या घरात असं का व्हावं ते त्यांना समजेना. म्हणूनच शेवटी ते शहरातल्या  प्रसिद्ध व महागड्या आहारतज्ञांकडे चित्राला घेऊन गेले.

मी चित्राची फाईल पाहिली. फाईलमध्ये  तिच्या रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स होते. त्यात  अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,लोह यांची कमतरता तिच्या रक्तात दिसत होती. त्या फाईलवर  मी चौकशी केलेल्या  क्लिनिकचेच नाव दिसत होते. निरनिराळ्या  व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या  गोळ्या असलेल्या बाटल्या  दिलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून  नाचणी,बाजरी वगैरेंची  कसली कसली पिठे दिसत होती. या सगळ्यांचे तिच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले होते.

दिलेल्या प्लॅननुसार  तिने  ही औषधे घेण्यास सुरुवात केली. जेवणाऐवजी  पिठे  शिजवून खाऊ लागली. दोन दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवसापासून  जुलाब होऊ लागले. आहारतज्ञाला फोन केला. प्लॅननुसार सगळं सुरू ठेवा,असं उत्तर मिळालं. दोन  दिवसांनी  जुलाबांबरोबरच उलट्याही सुरू झाल्या. पुन्हा आहारतज्ञाला फोन गेला. मॅडम परदेशी गेल्याचं उत्तर मिळालं.

मैत्रीण उलट्या जुलाबांनी अंथरुणाला खिळली. चित्राच्या यजमानांना काय करावं ते समजेना. त्यांना  ज्या आत्यांनी  लहानाचं मोठं केलं होतं त्या आत्याला गाडी पाठवून गावाकडून  घरी आणलं. आत्यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केलेली असली तरी पन्नाशीच्या चित्रापेक्षा त्या ठणठणीत दिसत होत्या. ऐंशी पावसाळे पाहिलेल्या आत्याबाईंच्या सारं लक्षात आलं….. त्यांनी आल्या दिवसापासून पदर खोचून स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्यांनी  तिच्यासाठी  लोणकढ्या तुपातले  मुगाचे,नाचणीचे, डिंकाचे  लाडू बनवले. चित्राचा चहा बंद करून  टाकला. उठल्याबरोबर कोमट पाणी, लिंबू नि मध तिला प्यायला देत असत. नाष्ट्याला  ताजा बनवलेला लाडू नि गरमागरम  भाताचे प्रकार.. गरम गरम भाताबरोबर कधी मेतकूट तूप लोणचं ,कधी कुळथाचं पिठलं, कधी लसणाची फोडणी दिलेलं मुगाचं वरण, कधी टोमॅटोचं तर कधी आमसुलाचं सार ! कधीतरी  मुगडाळीची खिचडी ,तूप ,पापड नि  मुरलेलं लिंबाचं लोणचं….. 

दुपारच्या जेवणात  गरम गरम पोळी, तूप, कधी  बाजरीची तर कधी नाचणीची भाकरी. तिच्यासोबत घरच्या ताज्या  लोण्याचा गोळा. पोळी-भाकरीसोबत  लिंबू पिळलेली, भरपूर कोथिंबीर घातलेली  रोज वेगळी कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, रोज नवीन फळभाजी नि ओल्या खोबऱ्याची, कच्च्या टोमॅटोची ,कांद्याची, दोडक्याच्या किंवा दुधीच्या सालीची खमंग चटणी….. 

दुपारी  गरम गरम उपमा ,कधी पोह्याचा एखादा प्रकार ,कधी लाह्यापीठ ,कधी थालीपीठ, कधी मिश्र धान्यांचं गरमागरम  धिरडं ….. 

रात्रीच्या जेवणात मात्रं गरम गरम ज्वारीची  भाकरी, पालेभाजी नि जवस, खोबरं, कारळे, लसूण यांपैकी एकाची  चटणी. दिवसभरात  दोन मोसमी फळे  तिला खावीच  लागत..

आता  आत्याबाई  हे  एकटीला थोडच खाऊ घालणार ?

साऱ्या घराचाच हा डाएट प्लॅन झाला. आणि आत्यांना नाही म्हणण्याची किंवा विरोध करण्याची कुणाची बिशाद नव्हती.

चित्राला तिच्या न कळत  कधी  बरं वाटू  लागलं, ते कळलंच नाही. तिचा अशक्तपणा, निरुत्साह , निराशा सगळं सगळं पळालंच, पण चित्राच्या  यजमानांची रक्तातील वाढलेली साखरही पळाली. लेकीचं वाढलेलं वजन पळालं नि तिच्यामागे कॉलेजात  मुले लागू  लागली..

….. आजारपणाच्या  छायेनं वेढलेलं  घर  हसतं-खेळतं  झालं.

बाहेरून पिझा ,बर्गर, वडापाव, तेलकट चायनीज, तुपकट पंजाबी ,बेचव कॉंटिनेंटल मागवणं  बंद झालं नि पैशाची कल्पनेपलिकडे बचत होऊ लागली……. पण यासाठी  ऐंशी हजार रुपये अक्कलखाती  जमा करावे  लागले.

भाच्याच्या घरातील पोटं आणि  तब्येती मार्गी लावून आत्याबाई आपल्या गावी  निघाल्या.. चित्रा नि  तिच्या  यजमानांनी  आत्याला वाकून  नमस्कार केला . आत्याबाईंनी  डोक्यावर ठेवलेल्या आशीर्वादाचा हात हातात घेतला, नि त्या अन्नपूर्णेच्या हातात नवीन घडवून आणलेले  सोन्याचे  बिलवर चित्राने  घातले.

” अरे  पोरांनो, हे  एवढे महाग  जिन्नस  कशासाठी ?” … आत्याबाई  चक्रावून  बोलल्या..

” आत्या  तू  तुझ्या अन्नपूर्णेच्या हातांनी जे पौष्टिक अन्न आम्हाला करून वाढलंस त्यामुळे चित्रालाच काय, आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला. त्या अन्नाची किंमत होऊच शकत नाही. पण ही फूल ना फुलाची पाकळी. “…..

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले, सोलापूर

संग्राहिका : वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

ओठांचे कोपरे विलग करत

फुलासारख्या हसत राहतात लेकी

आणि

नाचरी पावले नुसती वाहत राहतात

निर्झराच्या उत्कट आनंदाने…

लेकी रंगीत साड्या नेसतात म्हणे… कानात डूल डुलतात

हातात सुगंधी फुले आणि वाऱ्यावर उडणारे केस

लेकी नाजूक दिसतात…लेकी आकर्षक असतात म्हणे …… 

अरे, याच नाजूक-साजूक लेकी

कठीण कातळाला धडका देत

शोधत राहतात निरंतर जिवंत झरे

हे दिसत नाही कुणाला 

आणि…. 

दिसले तरी, करत नाहीत कधीच मान्य……. 

पांडुरंगा…

आसुसून-आसुसून कुशीत शिरतात लेकी

तेव्हा शब्द बोलतात वेगळे…स्पर्श सांगतो दुसरे काही…… 

तुला सांगू का…

काय मागतात रे लेकी…???

नाचऱ्या पावलांमागील समर्थ कर्तृत्व पहा

हसणाऱ्या चेहऱ्यामागील वेदना न्याहाळा

नाजूक हातांनी दिलेल्या धडका अनुभवा

मान्य करा….”अहं ” सोडून…एकदा मान्य करा…… 

“स्त्री” म्हणून दिसण्यापेक्षा “असणे “…मान्य करा..

काय मागतात रे लेकी…?

आमच्या प्राक्तनातले कातळ आम्ही सांभाळू,

तुम्ही तरी वाटेत उभे राहू नका

नवीन “वांझ कातळ” होऊन….. 

कुशीत शिरलेल्या लेकी…

सांगत राहतात ना मूक राहून

तेव्हा…. जीव जळतो पांडुरंगा… जीव जळतो…

असो….

तू “माऊली” म्हणून बोलले हो…

अन्यथा

माऊलीचे जळणे फक्त तिलाच ठाऊक बाबा…….. 

लेखक : डॉ. नयनचंद्र सरस्वते

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

हे ईश्वरा ,

तुझ्या  असण्याविषयीच्या भोव-यात गुंतण्यापूर्वी

नि तुझ्या बासरीच्या सुरांनी मोहित होण्यापूर्वी ….  

विचारायचा आहे  तुला एक प्रश्न ! 

 

पुन्हा पुन्हा अवतार घेताना..  

एकदाही तू स्त्रीचा जन्म कसा नाही  घेतलास ?

तिच्या दुर्दैवाचे दशावतार भोगायला का कचरलास ? 

सोपे होते रे तुझे कुब्जेला सुंदर करणे …. 

…. नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे ! 

जगून तरी पाहायचे त्यांचे अपमानित जगणे !

 

मोरपिसाच्या स्पर्शाने बुजतात का क्षणात …. 

…. सा-या जखमांचे व्रण ?

नि शिळा जिवंत होताच सरते का रे …. तिचे अपराधीपण ? 

 

हे सर्वज्ञा , 

जन्माचे रहस्य  तूच जिच्याकडे  सोपवलेस ,

तिच्या मनाचा थांग तुला कसा नाही लागला ? 

लेखिका – डॉ. नीलिमा गुंडी

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

आमटीला फोडणी घातली की कसा चर्र असा आवाज येतो, आणि घरभर घमघमाट सुटतो. तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांचा स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला जातो!!

 ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भूक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते. 

नाती पण अशीच हवीत ना !! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी !!

— फक्त “अंदाज” बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानेच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो, समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणून ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणतंच नातं खुपत नाही.

हिंग कितीही औषधी असला तरीही जास्त पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो !!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडून बोलतो, तीव्र बोलतो आणि मग ते बोलणं कितीही समोरच्याच्या भल्यासाठी असलं तरी, नात्यांमधे वितुष्ट यायला वेळ लागत नाही.

मेथी जराजरी जास्त पडली, तर जेवणात कडवटपणाच येतो. आपणही कधी कधी राग आला की अगदी टाकून बोलतो, टोकाचं बोलतो, इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मग नात्यात अढी निर्माण होतेच ना!! अगदीच कबुल आहे, आपल्या माणसांना हक्कानं बोलावं…पण प्रमाणात. एक वेळ स्वैपाक कडवट झाला तरी चालेल, पण नाती नको!! 

कढीपत्ता हा सुगंध येईल इतकाच घालावा, नाहीतर जेवण उग्र होतं. माणूस हा कायमच प्रेमात पडत असतो, कधी व्यक्तींच्या, तर कधी वस्तूंच्या !! एकमेकांवर अतोनात प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात गुदमरायला लावणं वेगळं !! स्वतःला आणि इतरांना झेपेल इतकंच प्रेम करावं, नाहीतर नात्यातला सुगंध हरवून जातो.

हळदीचा रंग मोहक, अगदी प्रमाणात घातली की तिच्या गुणांबरोबर तिचं अस्तित्वही प्रेमात पाडतं. गरज असेल तेव्हा मदत जरुर करावी, पण समोरच्याला “स्पेस” ही द्यावी. आपण आहोत, आपलं अस्तित्त्वं आहे, इतकं जरी समोरच्याला जाणवलं ना, की मग सगळंच सोप्पं होतं.

तेलही आवश्यक इतकंच !! भसाभसा ओतून किंवा अगदी थेंबभर घातलं की फोडणी बिघडलीच म्हणून समजा !!  जास्त तेल पडलं तर मूळ पदार्थापेक्षा तेलाचीच चव जिभेवर रेंगाळेल, आणि कमी पडलं तर ते इतर घटकांना सामावून कसं घेणार?? नात्यात ओशटपणा नको. आपल्यात इतरांना सामावून घेण्याइतका मोठेपणा असावा, पण आपण किती महान आणि किती चांगले हे त्यांना न जाणवता, कसलाच दिखावा न करता !! तरच मनं एकमेकांत सामावली जातील.

आपल्या स्वैपाकात मिरचीचं प्रमाण कसं आणि किती असावं ?  तसंच मुळमुळीत नाती नकोशी होतात अन तिखटपणा, जहालपणा नात्याला सुरुंग लावतो. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच !! फोडणी फक्कड तेव्हाच जमते, जेव्हा भांड्याखालची आच योग्य प्रमाणात असते अन भांडं योग्य प्रमाणात तापतं तेव्हा !! जर आच प्रमाणापेक्षा कमी असेल, तर फोडणी कच्चीच राहील आणि सगळ्या स्वैपाकाची मजाच जाईल. जर आच प्रमाणापेक्षा जास्त असेल तर रागाप्रमाणे त्यातला प्रत्येक घटक तडतडून अंगावर उडेल, इजा होईल, मोहक हळद काळी पडेल आणि फोडणी जळेल. 

—आपल्या नात्यातही आच योग्यच हवी.—-  नाती कच्चीही रहायला नकोत अन जळायलाही नकोत. 

— तरच नात्यांची फोडणी अचूक जमली, असं म्हणता येईल.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆घरापासून … ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ घरापासून… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

अत्यंत बेताच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले दोघे. उच्च विद्या विभूषित. पदवी घेतल्यानंतर लग्न करतात.. स्वतःवर विश्वास असलेले शून्यातून विश्व निर्माण करायला निघतात. तो पैसे मिळविण्याकरिता करिअर करण्यात रममाण होतो. खूप स्वप्नं उराशी बाळगलेली ती संसारात मुलाबाळांच्यात पूर्ण विरून जाते. कायम सहकाऱ्याच्या रुपात आपली भूमिका बजावत राहते. तिला आवाज असतो पण बोलून उपयोग नसतो. अजून काही दिवस म्हणून शांत राहते.. प्रतिष्ठेला भुकेलेला आणि स्वतःला सगळं समजतंय या अविर्भावात असलेला तिचा जोडीदार, तिच्या मनाचा, करिअरचा विचार करत नसतो. ” तू हवं ते करु शकतेस !” असं म्हणायचं पण घरातली कोणतीही जबाबदारी उचलायची नाही. आपलं काम आणि समाजकार्याचं भूत डोक्यात घेऊन कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून पडायचं. तिची केविलवाणी धडपड चालू राहते. सगळंच अंगावर पडल्यामुळे तिला काही सुचत नसतं. तिची खूप चिडचिड आणि स्वतःचा त्रागा होत राहतो.

एखाद्या गोष्टीला विरोध केला की, वाद-विवाद भांडण, अंगावर येणं, हात उगारणं ठरलेलं. स्वतःचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यात रममाण. ” माझेच दोन रुपये घ्या पण मला साहेब म्हणा !” अशी त्याची अवस्था. 

दोन मुलं, त्यांची शाळा, मुलांवरील संस्कार, स्वयंपाक, घरकामाचे नियोजन  सगळं तिनचं पाहायचं..! मुलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात छान प्रगती करतात.. त्यावेळी माझी मुलं म्हणून ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायला हा पुढे पुढे पळायचा. मुलांना हे नको ते नको म्हणून आडवं पडायचे. त्यांच्याशी भांडणाच्या स्वरात बोलायचे. त्यांच्या वयाचे होऊन त्यांना समजून घ्यायचे नाही. स्वतःचे महत्त्व कायम अधोरेखित करायचे. सगळं श्रेय स्वतःला कसं घ्यायचे याची कला वाखाणण्याजोगी.

एक दिवस हा माणूस आपल्या बायकोला म्हणतो. ” आपली मुलं चांगली घडली. आपण आदर्श पालक आहोत. आपण घरात समतेने, लोकशाहीने वागलो. याचा मुलांवर चांगला परिणाम झाला..!” ती मागचं सगळं आठवते आणि म्हणते, “दहा मिनिट शांत बसून विचार कर ! लोकशाही, समता कशाला म्हणतात याचा अभ्यास कर ! मग बोलू आपण…. “

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मन ! संस्कृत आणि प्राकृतातही एकच शब्द, काय आहे हो याची व्याख्या ?

“The heart is situated at the left side in the human body“–असं हृदयाबद्दल खात्रीशीर सांगितलं जातं मग मनाचं काय? कुठे असते ते वसलेलं ? हृदयात? हृदयाच्या पाठीमागे ? शरीराच्या उजव्या बाजूस ? मेंदूत ? नेमके कुठे? काहीच सांगता येत नाही ना? 

बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात’. असंच काहीसं मनाचं स्थान आहे. शरीरात कधीच स्थिर नसणारे मन, ठावठिकाणा नसणारे मन, आपल्या शरीरावर ,जीवनावर मात्र प्रभावशाली अंमल करते. हृदयाची जागा खात्रीशीर असून देखील ते कधीकधी कमजोर असते ,नव्हे ते कमजोर असले तरी चालते कदाचित ! त्यावर उपचार करता येतात.. पण मन कमजोर असेल तर? तर मात्र माणूस पूर्ण दुबळा होतो. त्याची जगण्याची दिशा बदलते, त्याची आकांक्षा ,उमेद सर्वच नष्ट होते.

A sound mind in a sound body असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे ! ‘ मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ‘!! असं तुकारामांनी म्हटलंय; कारण माणसाचे मन शुद्ध असेल तर त्यात सर्व भाव शुद्ध येतात, अन कर्मेही शुद्धच होतात.स्वच्छ पाण्यात सभोवतालचा परिसर स्वच्छच  दिसतो. तसेच मनाचे देखील आहे.  मनापासून केलेले कोणतेही काम मनाला आनंद ,उत्साह ,उभारी देते अन मन प्रसन्न करते. आणि त्यावरच त्या कामाची यशस्वीता देखील अवलंबून असते . वरवर केलेले काम भलेही चांगले दिसले तरी स्वतःस समाधान देत नाही . मन लावून केलेली देवपूजा मन शांत करते ,चित्त प्रसन्न करते. मन लावून धुतलेले कपडे ,घासलेली भांडी कशी स्वच्छ ,चकचकीत होतात ! मन लावून केलेला स्वयंपाक रुचकर होतो अन भूक तृप्त करतो .मनापासून केलेला अभ्यास ज्ञान वाढवतो.  मनापासून गायलेलं गाणं हृदयास भिडते ,असे सर्व काही मनाच्या ओलसर भूमीतून अंकुरते .

  एवढ्याश्या मनाची व्याप्ती मात्र खूप मोठी असते. शक्ती तर कितीतरी पट मोठी असते. म्हणून पंगूसुद्धा हिमशिखरे ओलांडतात, नावेशिवाय नदीचा तीर गाठतात. ‘ मन कधी कधी इतके छोटे होते की चिमटीहून लहान जागेत मावते अन कधी इतके मोठे  होते की त्यात सारे अवकाश सुद्धा समावते ‘….. 

‘मन एवढं एवढं जणू खाकशीचा दाणा 

 मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना !’

मनोव्यापारावर मानवी देह व जीवन अवलंबून आहे. कधी ते आकाशात स्वैर भरारी मारते तर कधी फांदीवर बसून हिंदोळते. कधी चांदणे बनते तर कधी गच्च काळोख ! कधी भिरभिरते तर कधी स्थिर बसते ! अगदी निमिषार्धात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाते.आपल्या प्रिय व्यक्तीपाशी पोचते. त्याच्याशी हितगुज करते, कधी रुसते तर कधी हसते, कधी खट्टू होते तर कधी लट्टू !

या जगात सर्वात वेगवान काय असेल तर ते मन ! एवढे मात्र खरे की, मन उत्साही असेल तर जीवन उत्साही प्रवाही राहते. मनाला कीड लागली , आजार लागला तर देह कितीही सशक्त असला तरी कमजोर बनतो, आजारी पडतो .

मन तरुण असेल तर ते म्हातारपणही टवटवीत बनवते, आणि मन म्हातारे असेल तर तारुण्यातही म्हातारपण येते. म्हणूनच मनाला हवे जपायला फुलासारखे ! मग बघा या फुलाभोवती किती रंगीबेरंगी आनंदाची फुलपाखरे रुंजी घालतात अन जीवन मधाळ फुलपाखरी होते !…. फुलपाखरू खरेच  छान किती  दिसते !!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

लिहायला हवंच खरं तर. हा विषय डोक्यात नव्हता. कालपासून ग्रुपवर मेसेज बघितल नव्हते. आत्ता पाहिले,आणि मग राहवलं नाही. मी स्वतःला तसं कधी मानत नाही, पण शेवटी सत्य तेच असतं. म्हणून विचार केला की इतक्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करते, आता विधवांचं देखील करावं.

मुळात मला स्त्रियांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता ,कुमारिका, असा भेद करणं मान्य नाही. सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी श्रीयुत लावलं जातं, मग सौभाग्यवती आणि श्रीमती असा भेद का असावा ? थोडंसं परखड होईल पण पुढील गोष्टीवरुन लक्षात येतं की पुरुषप्रधान संस्कृतीमधील हे जोखड आहे, किंवा आपमतलबी पुरुषांनी तयार केलेली ही संस्कृती आहे.

समस्त स्त्रियांना नटण्याची, छान दिसण्याची आवड असते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी —– मंगळसूत्र,मांग-टीका,जोडवी, सिंदूर ही आभूषणे काय दर्शवतात? या एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्या एका स्त्रीचं झालेलं नाही. फक्त एखाद्या पुरुषाला बघून कळतं का, तो अविवाहित आहे की विवाहित? स्त्रीकडे बघून मात्र लगेच लक्षात येतं आणि अंदाज देखिल बांधले जातात.

आता मुद्दा विधवा स्त्रियांनी ओटी भरून घेणं, हळदीकुंकू लावून घेणं– हे नाकारण्याचे, तिच्यावर हजारो वर्षापासून झालेले संस्कार आहेत, ” तू जर शुभकार्यात पुढे झालीस तर तिथे काही तरी अशुभ होईल.”—- मग कोणाला वाटेल की आपल्यामुळे कोणाचे वाईट व्हावे?—- मी एक स्वावलंबी, सुशिक्षित, पुरोगामी, काहीशी बंडखोर वृत्तीची असून सुद्धा काही वेळा माझ्या मनात असा किंतु क्षणैक का होईना येतो. मग ज्या महिला परावलंबी आहेत, कमवत नाहीत, त्यांच्या मनात भीती असणारच ना आणि सालोसाल चालत आलेल्या संस्कारांचे ओझे झुगारून देणे अजिबातच सोपं नसतं.

कोणत्याही धर्माबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतू = गार्गी मैत्री राहतात पुराणात. वर्तमानात अजूनही माझ्यासारख्या महिलेला ओवसायला जाताना कोणी हाक मारीत नाही, की वडाची पूजा करताना पर्यावरणाचा विचार करून सुद्धा कोणी बोलावीत नाही.—- तुम्ही साऱ्याजणी डॉक्टर आहात विचाराने पुरोगामी आहात. पण समाजातील हे प्रमाण किती टक्के? बहुसंख्य समाज झी मराठी आणि कलर्स प्रमाणे चालतो. तिथले सगळे सणवार हेव्यादाव्यांसह, श्रद्धा-अंधश्रद्धा यासह समाजात साजरे केले जातात.

कधी कधी वाटते, .. फुले, आंबेडकर, आगरकर, शाहू महाराज, यांचा पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का? सुदैवाने माझे सासर, माझ्या सर्व मैत्रिणी अतिशय पुरोगामी आहेत. त्या असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण मला वाटायचे की असे व्यक्त व्हायची गरज का असावी? फक्त एका स्त्रीतत्वाने दुसऱ्या स्त्रीतत्वाचा सन्मान करणं जमू नये का? जसं पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माउली म्हणून भेटतो, त्याचप्रमाणे तू कोणीही अस– विधवा, सधवा, घटस्फोटिता अथवा कुमारी – तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्यातलं स्त्रीत्व सन्मान करतंय, आणि म्हणून मी तुला हळदीकुंकवाची दोन बोटं लावते, एवढं साधं आहे. – आणि हे जमू नये हे आपलं दुर्दैव.

बाकी मधु, विषयाला वाचा फोडल्याबद्दल खरंच आभारी आहे आणि सावंतवाडी वैद्य राण्यांमधील सर्व सख्यांचे पण आभार.

लेखिका – डॉ. दिपाली घाडगे, विटा..

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा ! लावल तितके अर्थ कमी ! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात !

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. “रांडेच्या” म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. ” का बे छिनालच्या ” म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि “पोट्ट्या” म्हणलं  की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून ” मी तिथे गेलो” आणि  “ऐकू आलं  म्हणलं  की सांगली !! “काय करून राहिला?” म्हणलं की नाशिक, “करूलाल?” म्हणलं की लातूर आणि ” विषय संपला ” म्हणलं की पुणे !! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि “ळ” चा “ल” केला की कोकणी ! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. ” हमारी अडवणूक हो रही है ” हे मराठी हिंदी, आणि ” वो पाटी जरा सरपे ठिवो ” ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव ! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तरी किती ? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटलं, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी—- इत्यादी सगळ्याचा अर्थ एकच– ! “इ” सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द… जसे की “इस्कोट”, “इरड करणे”, “इरल”, “इकनं”. — “ग्न” ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत … लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे “ग्न” बाबत आमच्या मास्तरच ज्ञान !

इदुळा, येरवा, आवंदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला— यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठला हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय !

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असू द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असू द्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची अवजारे असू द्या, कापडचोपड असू द्या नाहीतर अजून काही,—- मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात … सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातून ५ वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी… तुझ्यावर लय जीव आहे बाये !!! अशीच उंडारत राहा… वारं पिलेल्या खोंडासारखं !!

लेखक : डॉ. विनय काटे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ सरते शेवटी.. ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पाहता पाहता २०२२ संपत आलं, नव्हे संपलंच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी , अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात तर काही आयुष्यभर आनंद उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही हे घडलं नसतं तर बर झालं असतं, असे मनाला वाटून जाणाऱ्या  असतात. काही आनंद हे दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असं का ?  खरं जगावं, सुखात आनंदी, दुःखात थोडं निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य नाही का आपल्याला…! खरं जगूया, खरं बोलूया ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊ या..!

वेदनेचं गाणं करता यावं आणि संवेदनेने ते गात रहावं. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावं

ग़म का ख़ज़ाना तेरा भी है, मेरा भी

ये अफ़साना तेरा भी है, मेरा भी

अपने ग़म को गीत बना कर गा लेना

राग़ पुराना तेरा भी है, मेरा भी

तू मुझको और मैं तुझको समझाऊं क्या

दिल दीवाना तेरा भी है, मेरा भी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर

२०२२— वर्ष संपलं.

आज वर्षाचा शेवटचा दिवस.

उद्यापासून नवे वर्ष सुरू.

नवे पान, नवे पर्व, नवे संकल्प, येणाऱ्या नव्या वर्षाने निर्माण केलेली नवी आशा,  नवी स्वप्नं, उगवणारा नेहमीचाच सूर्यही जणू नवरंगांची किरणं घेऊन अवतरलाय, असा भास देणारा नव्या वर्षाचा पहिला दिवस!

मागे वळून पाहताना, जाणाऱ्या या वर्षाला निरोप देताना,  मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे.  काळाच्या बारा पावलांची, कधी सरळ, कधी वळणावळणाची, कधी चढ उताराची, काट्यांची, फुलांची, दगड गोट्यांची, रंगीत व रंगहीन वाट, पुन्हा एकदा न्याहाळून पाहताना, सहज मनात येते.. वर्ष संपले म्हणजे नक्की काय झाले?

कालचक्र अव्याहत फिरत असते.  कालगणनेची गणितं मनुष्यनिर्मित आहेत.  बाकी खरं म्हणजे एक दिवस जाणारा आणि एक दिवस येणारा यापेक्षा नवे काय? फक्त काळाच्या बारा पावलांनंतर आज आणि उद्या मधल्या अंतरात काही क्षणांची विश्रांती, असं म्हणूया आपण. वर्षाच्या चार आकडी संख्येच्या एककामध्ये एकाने झालेली बेरीज. भिंतीवरच्या जुन्या कॅलेंडरला काढणे आणि त्या जागी नवे कोरे कॅलेंडर लटकवणे.  काय बदलतं?

कसे गेले हे वर्ष?

राजकीय, सामाजिक, वैयक्तिक बेरजा वजाबाक्या  यांचं गणित मांडताना उत्तराचा झालेला गोंधळ हाही काही वेगळा असतो का?कुठे मंगल तोरणे तर कुठे प्रिय जनांचा वियोग.कुठे बढती कुठे बेकारी.कुठे यश कुठे अपयश.वादळं,तुफान,भूकंप तर कधी हिरवळ..आंसु आणि हंसु..माणसाने वर्षे मोजली आणि नियती हसली..

त्याच त्याच राजकीय धुळवडी पाहिल्या. नवे भाष्य, नवी विधानं, आरोप प्रत्यारोप, धार्मिक अन्याय,भावनिक गळचेपी वगैरे वगैरे… सगळा खमंग गोंधळ कान टवकारुन आणि डोळे फाडून पाहिला— ऐकला.  काही आत गेले काही बाहेर आले. निवडणुका रंगल्या. कोणी हरले कोणी जिंकले.  गुलाल उधळले, ढोल वाजले. पण हे सारं पाहताना मनात एवढंच आलं यापेक्षा मागचं वर्ष चांगलं गेलं!

आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. सगळेच गोलमाल.युद्धे चालूच आहेत.सत्तेपायी अमानुषता बोकाळलीय्.प्रचंड हिंसाचार.”थांबवा रे!मला शांती हवी आहे!” हे सूरच गोठलेत.

पर्यावरणाविषयी कळवळून मुद्दे मांडले गेले आणि प्रत्यक्ष मात्र आम्हाला डोंगर तोडणारे, झाडे तोडणारे हातच दिसले. वीज नाही, पाणी नाही म्हणत वणवणारी जनताच दिसली.  कव्हर पेजवर विकासाची गणित मांडणारे आलेख, हसणारे चेहरे, दाटलेली हिरवळ आणि आतल्या पानात खून, बलात्कार,अपघात, भूकबळी. मसल पाॅवर. असा रक्तबंबाळ माणूस.. पूर्ण विश्वातलाच.. पाहताना एवढंच वाटलं काय बदललं?

डाव्या हातातलं जाणारं वर्ष उजव्या हातातल्या येणाऱ्या नव्या कोऱ्या वर्षाला सांगते आहे,” बघ रे बाबा! तुला काही जमतय का? मी तर चाललो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”

जन्माला आलेलं हे दोन हजार तेवीस  नावाचं बाळ मात्र खूपच गोंडस भासतंय.  कुणा युगंधराचा अवतार असंच वाटतंय.  कायापालट घडवून आणेल हे बाळ! या क्षणी तरी  अनेक आशा, स्वप्नं,  सुख- शांती, समृद्धी घेउन अवतरले आहे , असं आतून जाणवत आहे. बघूया याच्याही कुंडलीतले नवग्रह योग!  विधात्यांनी मांडलेली २०२३ची ही पत्रिका अखिल विश्वासाठी फलदायी ठरो!इतकंच..

असावे सकारात्मक..

असावे आशादायी…

बाकी नम्रपणे वंदन—त्या कालचक्राला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print