मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन एक गुरू त्राता ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ मन एक गुरू त्राता ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

कधी वाटले, पुन्हा एकदा –

घ्यावा वेध, अपुल्याच मनाचा –

होतो जैसा, तसाच आहे –

किंवा बदल घडे का साचा ॥

 

वाचावी उलटुनिया पाने –

अपुल्या जीवनगाथेची –

निरखावी आपुलीच प्रतीमा –

तटस्थ बुद्धीने साची ॥

 

मूल्यांकन आपुलेच आपण –

कसे करावे समजेना –

करून तुलना दुसर्‍याशी मग –

जाणावे, उमगले मना ॥

 

गुणवैगुण्ये आणि परिस्थिती –

लाभली मज जी दैववशात् –

जोखावी तोलुन दुसर्‍याशी –

ज्यास लाभली भाग्यवशात् ॥

 

बुद्धी क्षमता कार्यचतुरता –

त्याची माझी तोडीस तोड –

सौख्ये मजला कमी न मिळती  

परि त्याची चाले घोडेदौड ॥

 

तरीही कौतुक मनात त्याचे  –

हेवा नाही तिळमात्र –

परंतु काटा वैषम्याचा –

मनात सलतो दिनरात्र ॥

 

तुलना करता कुणी खालती –

तसेच वरचढ दिसती कुणी –

वरची पायरी कुणी गाठता –

न्यूनगंड का रुजे मनी ॥

 

विचार चुकीचा मलाच कळले –

अन कळले की विचारण्याला  –

गुरू न कोणी अंतर्मनसा 

मार्ग योग्य तो दाखविण्याला  ॥

 

सूर मारला नि:शंकपणे –

खोल मनाच्या डोहात –

वेगाने गाठला तळ जसा –

मीन पोहतो दर्यात ॥

 

उघड्या नेत्री धुंडाळुनिया –

कोनकोपरा अंतरिचा –

शोध घेतला गूढ मनाचा –

उत्कटतेने बिनवाचा ॥

 

दूर दिसे देव्हारा त्यातच –

दिसले मजला आंतरमन – 

समाधिस्थ योगिसे बैसले –

घालुन चक्री पद्मासन॥

 

मी काही बोलणार त्याच्या –

आधिच त्याने खुणाविले –

करोनिया स्मितहास्य तयाने –

निकटी मजला बैसविले ॥

 

“जाणून होतो येणारच तू” –

कथिता त्याने दिग्मुढ मी –

“झाला भ्रम बुद्धीस तुझ्या जो –

निवारितो मी एक क्षणी” ॥

 

आंतरमन मग सांगू लागले –

“तन मन बुद्धीची शुचिता –

प्रामाणिक राहून स्वत:शी –

जपणे रे आपुली स्वत:” ॥

 

“आत्मपरीक्षण करून घेण्या –

विचार सुचला तुला भला –

उत्तर मिळण्या परी तुवा जो –

मार्ग निवडला तो चुकला” ॥

 

“मूल्य जाणण्या स्वत: स्वत:चे –

तुलना तर करण्यास हवी –

परंतु दुसर्‍यासवे करुनिया –

वाट न धरि खोटी फसवी “ ॥

 

“तुलना करणे असेल तर मग –

फक्त करावी स्वत: स्वत:ची –

नैतिक आणि सनदशीर ती –

गाठील सज्जनतेची उंची ॥

 

“कालच्याहुनी अधिक चांगला –

आहे का मी आज पहावे –

सत् प्रत्यय भूषीत सर्व गुण –

जमतिल तितुके मिळवावे” ॥

 

बोलुन इतुके लुप्त जाहले –

आंतरमन अदृश्यात –

मी ही परतलो मनडोहातुन –

पिऊन उपदेशाचे अमृत ॥

 

अपुली बुद्धी, नशीब अपुले –

अपुल्या निष्ठा, अपुले संचित –

मिळकत माझी कां तोलावी –

व्यर्थ दुज्याच्या तराजुत ॥

 

कधीच नाही नंतर केली –

तुलना दुसर्‍या वा तिसर्‍याशी –

माझा मीच यशस्वी झालो –

प्रामाणिक राहून स्वत:शी ॥

 

वैषम्यासम न्यूनगंड अन् –

भाव नकारात्मक मनिचे –

कसे वितळले गळून गेले –

भाव सकारात्मक सजले ॥

 

रचना : सुहास सोहोनी, रत्नागिरी

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – २ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझ्या नजरेतून बदलती दुबई – भाग – २ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

ग्लोबल व्हिलेज आणि डेझर्ट सफारी या दोन दुबईतील स्थळांना भेटी दिल्या त्या अगदी उल्लेख करण्याजोग्या ! ग्लोबल व्हिलेज म्हणजे सर्व जग जणू एका मोठ्या मैदानावर पसरलेले…… चीन, येमेन, मलेशिया, पाकिस्तान, भारत अशा विविध देशांच्या स्टाॅल्सनी भरलेली रंगीबेरंगी दुनिया ! सगळ्या आसपासच्या छोट्या देशातील लोक या ग्लोबल व्हिलेज मध्ये खरेदीसाठी येतात. इथे जाण्यासाठी रेंटवर गाड्या मिळतात. आम्हीही ग्लोबल व्हिलेजला भेट दिली. खरेदी झाली ती येमेनच्या मसाल्याच्या पदार्थांची ! एवढे मोठे दालचिनीचे भारे आणि लवंगा – मिऱ्याचे  डोंगर प्रथमच पाहिले ! इराण मधील सुंदर वस्तूंचे तसेच गालिचांचे स्टॉल बघायला मिळाले. बऱ्याच प्रकारच्या करमणुकीच्या गोष्टीही तिथे होत्या. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ग्लोबल विलेजला खूप गर्दी असते.

‘डेझर्ट सफारी’ हे दुबईतील आणखी एक अट्रॅक्शन ! दुबईच्या एका ट्रिपमध्ये आम्ही डेझर्ट सफारीची ट्रीप केली. फक्त चार-पाच तासांची ट्रिप ! पण खूपच वेगळी ! डेझर्ट सफारी बुक केल्यानंतर ठराविक वेळी पिकप् साठी गाडी येते. दुबईपासून काही अंतरावर पोहोचले की या गाडीतून आपण उतरतो. तिथून वाळूत जाणाऱ्या स्पेशल गाड्या असतात, त्यामध्ये आपल्याला बसवून देतात. वाळूचे डोंगर धडाधड  चढत उतरत या गाड्या जातात तेव्हा आपल्या पोटात भीतीचा गोळा उठतो ! तरुण लोक मात्र आरडाओरडा  करून या गाडीत एन्जॉय करत असतात ! नंतर या गाड्या ग्राउंड लेव्हलवर असलेल्या मोठ्या तंबूसारख्या दिसणाऱ्या ठिकाणाजवळ आपल्याला घेऊन जातात. आम्ही तिथे गेलो तेव्हा संध्याकाळ होत आली होती. डिसेंबर २००८ मध्ये आम्ही गेलो होतो. हवेत खूप गारवा होता. वातावरण छान होते. प्रथम कॅमल राईड करून आम्ही आत गेलो. तेथे तऱ्हेतऱ्हेचे स्टॉल्स होते. सिनेमात पाहतो तसे खास अरबी वातावरण ! बसायला गाद्या, लोड तक्के, हुक्क्याचे स्टॅन्ड शेजारी ! मेहेंदी स्टाॅल, खास अरबी ड्रेस घालून फोटो काढायची सोय, विविध सरबते, जादूचे प्रयोग करणारे लोक, काचेच्या फ्लाॅवरपाॅटमध्ये वाळू घालून त्यात डिझाईन काढणारे, असे भरपूर काही बघायला मिळत होते. जेवणाची सोय तिथेच होती. जेवणानंतर तिथे वैशिष्ट्यपूर्ण असा ‘ बेली डान्स ‘ बघायला मिळाला.बऱ्याच जणांनी तिथे नाचून घेतले. दोन-तीन तास अशी जत्रा अनुभवताना वाटलं, जगाच्या पाठीवर कुठेही जा,  माणूस स्वतःच मनोरंजन कोणत्या ना  कोणत्या तरी पद्धतीने करत असतोच ! 

अशी ही अनोखी डेझर्ट सफारीची ट्रिप केल्यानंतर आम्ही ‘धाऊ’ ट्रीप केली. ही खाडीवरची सफर होती. ‘धाऊ’ क्रूजवर नातवाचा  वाढदिवस साजरा केला ! संध्याकाळची क्रूज बुक केली होती. ठरल्याप्रमाणे सात वाजता

आम्ही खाडीवर गेलो. सगळीकडे दिव्यांचा लखलखाट आणि लोकांचा कलकलाट होता. खाडीवर सजवलेल्या, छान छान नाव दिलेल्या बोटी निघण्यासाठी सज्ज होत्या. आमच्या बोटीचं नाव होतं “चांदनी”! बोटीतून एक दीड तासाची खाडीवरची सफर होती ती ! आम्ही बोटीत बसल्यावर प्रथम वेलकम ड्रिंक दिले गेले. बोट चालू झाली. बोटीतून बाहेरचा परिसर खूपच छान दिसत होता. आकाशातील चांदण्यांबरोबर स्पर्धा करणारे दुबईच्या खाडी तीरावरचे लायटिंग पहात आम्ही सफरीचा आनंद घेतला. काही करमणुकीचे कार्यक्रम  क्रूझवर चालू होते. नातवाच्या वाढदिवसासाठी तिथे केकही सांगितला होता आम्ही !  त्यामुळे केक कटिंग करून  बोटीवर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गाण्याच्या तालावर तिथे नाचही सुरू होता. जेवणाचा बेत छान होता. मस्तपैकी जेवण करून आम्ही धाऊ ट्रिप एन्जॉय केली.

 ग्लोबल व्हिलेज डेझर्ट सफारी, धाऊ, या सर्व वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना भेटी देत दोन-तीन वर्ष कशी गेली कळलंच नाही. ९ सप्टेंबर २००९ साली दुबई मेट्रो सुरु झाली. मेट्रोत बसून आम्ही दुबई मॉल, बुर्ज खलिफा पहायला गेलो होतो. दुबई मॉल बघत बघत आत गेले की बुर्ज खलिफापर्यंत जाता येते. ‘ बुर्ज खलिफा ‘ ही जगातील उंच इमारतींपैकी 

एक ! बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यापर्यंत जाता येते. पूर्ण दुबईची माहिती एका छोट्या थेटरमध्ये स्क्रीनवर दिली जाते आणि मग लिफ्ट इतकी झुमकन्  जाते की १२३ वा मजला कधी आला ते कळतच नाही. तिथे साधारणपणे अर्धा पाऊण तास ३६० अंशाच्या गोलाकार भागातील खिडक्यातून, दुर्बिणीतून संपूर्ण दुबई पाहता येते.

—अशाप्रकारे दुबई फिरता फिरता आम्ही आता 2014 सालापर्यंत आलो होतो.

— भाग दुसरा 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

….. काल 19 ऑक्टोबर 22 हा अख्खा दिवस फारच आनंदात गेला. कोथरूडला कमिन्स कंपनी समोर, मुलींच्या अंधशाळेच्या शेजारी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान आहे. त्यांच्यातर्फे २१ तारखेला धन्वंतरी पूजनाचा मोठा कार्यक्रम असतो. त्यासाठी त्यांनी हा संपूर्ण आठवडा दिनांक २३ पर्यंत तेथील जंगल पाहण्यासाठी आवाहन केले होते. आम्ही मैत्रिणी काल सकाळी नऊ वाजताच घरातून उत्साहाने निघालो. खूप लांबून लांबून कोणी कोणी आल्या होत्या. साडेदहापर्यंत तिथे सगळ्या एकत्र जमलो. सौ पल्लवी जमदग्नी ही माझी मैत्रीण आहे. तिने उत्साहाने आमचे स्वागत केले .त्यानंतर संपूर्ण जंगल पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी सुसज्ज आधुनिक कॅमेरा देऊन एक पुरुष आणि एक महिला आमच्याबरोबर दिली. त्या ठिकाणी खूप मोठे जंगल आहे. त्याला “ मियावाकी जंगल “ म्हणतात. 

मियावाकी हा जपानी शास्त्रज्ञ आहे. त्याने पडीक जमीन जिथे असेल तिथे औषधी वनस्पती लागवड करावी अशी सूचना केली. त्याप्रमाणे या संस्थानने या ठिकाणी भरपूर आयुर्वेदिक झाडे लावली. काही आपोआप देखील आली. पण अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडांची त्या ठिकाणी रेलचेल आहे. सुदैवाने काल वरुणराजाची कृपा झाली. चक्क ऊन पडले होते. त्यांनी आम्हाला मोठ्या मोठ्या छत्र्या दिल्या, ऊन लागू नये म्हणून. पण जंगलात शिरताच खूप सावली होती. तेथील सेवक अतिशय उत्साहाने प्रत्येक झाडाची माहिती देत होते. आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले पण त्यांनी न कंटाळता आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. तेथील आवळ्यांनी डवरलेले झाड पाहताच किती वय झाले तरी आमच्या महिला एकदम हरकून गेल्या आणि आम्हाला आवळी भोजनाला इथे परवानगी द्याल का असे बिनधास्त विचारले. त्यांनी देखील हसून परवानगी दिली. ते सारे जंगल, त्यातील पायवाटा, त्यातील अनोखे वृक्ष, त्यांना लगडलेल्या वेली, त्यावर आलेली फळे, फुले पाहून आम्ही देहभान हरपून गेलो. 

दोन तास त्या ठिकाणी हिंडत होतो .अधून मधून त्यांचे सेवक ट्रेमधून ग्लासातून स्वच्छ थंडगार पाणी आणून आम्हाला देत होते. अखेर त्यांनी एकच बाजू दाखवली आणि हॉलमध्ये आम्हाला येण्यास सांगितले. तिथे प्रत्येकाला स्वतंत्र बेंच, समोर खूप मोठे डेस्क होते . एकदम शाळेत गेल्यासारखे वाटले. तिथे गेल्या गेल्या अमृततुल्य चहा मिळाला. त्यानंतर काही भाषणे झाली. तेथील एका डॉक्टर महिलेने आयुर्वेदाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील दिली. त्यानंतर सर्वांना राजगिरा लाडू, केळी असा पौष्टिक खाऊ दिला. खूप सुंदर वाटले. खाली धन्वंतरीची सुबक मूर्ती होती. त्याची सुंदर पूजा ,रांगोळी मांडली होती. तो सगळा परिसर भारावून टाकणारा होता. अगदी “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” अशी अवस्था झाली होती . त्यानंतर आम्ही घरी परतलो पण येताना पल्लवी म्हणाली, तुम्ही जंगल निम्मेच पाहिले आहे पुन्हा याल तेव्हा उरलेले निम्मे दाखवते. 

हे सारे जंगल त्यांनी अवघ्या तीन वर्षात उभे केले आहे. कमाल आहे की नाही? आम्ही तर फोटो काढलेच पण तेथील सेविकेने भरपूर सुंदर फोटो काढून आज आम्हाला पाठवले. अगदी तृप्त तृप्त वाटले. ज्यांना हे जंगल पहायचे आहे त्यांनी खालील नंबर वर कृपया संपर्क साधून हा आनंद जरूर घ्यावा.

सुश्री पल्लवी जमदग्नी

8668514969

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टर्निंग पाॅइंट…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ टर्निंग पाॅइंट…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला. डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा.

किती मेहनतीने, हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.. खूप सारी स्वप्न घेऊन !

ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती.

अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्क्रिया करावीच लागली.

रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा. 

मनातून  तर जवळजवळ संपलो होतो मी. दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही, जगावंच लागतं वगैरे सगळं. दुसऱ्याला सांगणं सोपं असतं. पण वेळ स्वतःवर आली की कळतं, हे मला पूर्ण समजलं होतं.आता त्या सूचनांचा रागही येणं बंद झालं होतं.आयुष्यं संपवण्याचा विचार हजारदा मनात येऊन गेला. पण आईबाबांकडे बघितलं की वाटायचं माझे हात गेले तर माझी अशी अवस्था झाली, मी तर त्यांचं  सर्वस्व आहे. मी त्यांना आयुष्यातून उठवू शकत नाही.

कुठलाही संकटकाळ असो जग पुढे जातंच राहतं….तसंच आषाढ संपून श्रावण महिना आला आणि घरोघरी सणाचे वेध लागले होते…

घरात कोणालाच काही साजरं करायची आतून पूर्ण इच्छा संपली होती. पण बाकी काही असलं तरी गौरी गणपती आले की त्यात काही हयगय आईला चालायची नाही. देवावर प्रचंड श्रद्धा आईची. ‘आपलं काहीतरी चुकलं असणार मागच्या वेळेस म्हणून आपल्या शेखरच्या बाबतीत असं झालं’ हीच चुटपुट तिचं मन खात होती. त्यामुळे ह्यावर्षी श्रद्धेचं रूपांतर थोड्या भीतीत झालं होतं.घराची साफसफाई करण्यापासून आईने सगळं करायला घेतलं. बघता बघता श्रावण संपत आला. घरी बाप्पा येण्याची सर्व तयारी झाली.

आज बाप्पा घ्यायला जायचं होतं….आम्ही ३,४ कुटुंब एकत्रच जायचो. मोठमोठ्या दुकानात न जाता थेट मूर्तिकारांकडून गणपतीची मूर्ती घ्यायचा आमचा नियम होता. मला मुळीच जायची इच्छा नव्हती, मनातल्या मनात त्या देवाशी रोज भांडायचो मी. ज्या हातांनी इतके वर्ष पूजा करून घेतली होती आईने, तेच हात देवाने माझ्यापासून  नेले होते. ‘गणपती आणायला म्हणून नाही निदान चक्कर मारून होईल म्हणून चल’ असे म्हणून सगळ्या मित्रांनी,आईबाबांनी बळजबरी गाडीत घातलं. मी जगतच माझ्या घरच्यांसाठी होतो, त्यामुळे झापडं लावल्यासारखा खिन्न मनाने त्यांच्याबरोबर निघालो.. 

दरवर्षी प्रमाणे मूर्तीकार शंकर काकांकडे पोहोचलो आम्ही. शंकर काका हे नाव लोकांनी खास दिलेलं होतं त्यांना त्यांचं मूळ नाव काय हे आता बहुदा त्यांनाही आठवत नसावं. गणपती बाप्पाची जन्मदात्री देवी पार्वती असली तरी त्याला गणपतीरूप देणारे भगवान शंकर होते.त्यामुळे गावातले सगळ्यात उत्तम गणपती कारागीर म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना शंकरकाका म्हणायला सुरुवात केली.

माझ्या अपघातानंतर ते पहिल्यांदाच मला बघणार होते. मला परत एकदा अनेक प्रश्नांना सामोरं जायचं होतं. मी बाजूला पडलेली एक खुर्ची घेऊन तिथे बसलो होतो. बाकीचे सगळे गणपती बघत होते. तेवढ्यात काका आले आणि शिल्पकाराची नजर ती- ताबडतोब माझ्या कृत्रिम हातावर गेली. ते काही विचारणार तेवढ्यात मी म्हणालो, “ ज्या हातांनी इतके वर्ष गणपती उचलून नेले ते हातच बाप्पा घेऊन गेला काका माझ्याकडून.आता हे उसने हात घेऊन जमेल तसं जगायचं ”

” शेखरभाऊ नशीबवान आहात तुम्ही बाप्पाच्या पंक्तीतले झाले आता… बाप्पाकडेपण त्यांचा मूळ चेहरा नाहीच की,

तो काळ असा होता की रागाच्या भरात शंकराने शीर धडावेगळं केलं त्यामुळे हत्तीचं तोंड बसवावं लागलं गणपती बाप्पाला .पण आजच्या काळात किती प्रगती झाली बघा. तुम्हाला कृत्रिम का होईना हाताच्या जागी हात बसवले आहेत. गणपती बाप्पाची सगळं जग आज बुद्धीची देवता म्हणून पूजा करतं कारण आपल्यात निर्माण झालेलं व्यंग त्यांनी वैशिठ्य असल्यासारखं जगासमोर ठेवलं. सगळे देव मानव साच्यात असतांना फक्त गणपती गजमुखात आहे पण जगात सगळ्यात जास्त घरांमधे सापडणार लाडकं आराध्य दैवत आहे.. दादा बघा, तुम्ही तुमच्यावर आलेली ही आपत्ती संधी म्हणून वापरायचं ठरवलं तर तुम्हीसुद्धा घरोघरी पोहोचाल. तुमचे फक्त हात कृत्रिम आहेत माणूस अजूनही तुम्ही तोच आहात.”

माझ्या अपंगत्वावर इतकी सकारात्मक प्रतिक्रिया त्या दिवशी मी पहिल्यांदा ऐकली.. मूर्ती घडवताना अवयवांना आकार देणाऱ्या त्या हातांनी माझ्या मनावर संजीवनी फिरवली होती. अचानक मला माझे हात न दिसता बाकीचं शरीर जाणवायला लागलं होतं. त्या जीवघेण्या अपघातात वाचलेलं ते अख्ख शरीर मला गेलं वर्षभर जाणवलंच 

नव्हतं .दोन हात सोडले तर मी बाकी पूर्णपणे धडधाकट होतो हे अचानक माझ्या लक्षात आलं होतं. इतके दिवस रोज उठून नसलेल्या हातांकडे बघण्यात मी माझ्या बाकी वाचलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करत आलो होतो.

कृत्रिम का होईना आज हाताच्या जागी हात होते. बाप्पाला तर गजमुख असूनही ते साजरं होतं, हा विचार कोणी शिकलेल्या माणसाने मला दिला नव्हता. तर असंख्य गणपतींना मूर्तरूप देणाऱ्या शंकर काकांनी दिला होता.

त्या विचारांनी जागी झालेली ही सकारात्मक ऊर्जा,आयुष्य जगायची इच्छा घरोघरी पोहोचवायचा प्रण केला मी.

दोन कृत्रिम हात आणि कॉम्पुटरचं  घेतलेलं ज्ञान ह्याच्या मदतीने वेगवेगळे कार्यक्रम बनवायला सुरुवात केली. आज १० वर्ष झाली, साडेअकराशेच्यावर शोज मी इन्फ्लुएन्सर म्हणून केले आणि आज ज्या नामांकित शिक्षण संस्थेत मी माझं शिक्षण घेतलं त्या संस्थेने मला सन्मानाने इथे तुमच्यासमोर बोलावलं आहे. करोडो लोकं त्यांच्या अपंगत्वावर मात करण्यासाठी आवर्जून माझ्या कार्यक्रमांना येतात. प्रत्येकात बाप्पाचा अंश आहे. गरज असते ती त्याची जाणीव व्हायची….. ‘ एखादी गोष्ट वेगळी असणं आपलं व्यंग नसून वैशिष्ठ्य आहे ! ’ ह्या विचाराने सुरुवात केली तर आयुष्यात खूप मोठी झेप घेणं अशक्यं नाही. माझा तो अपघात झाला नसता तर एखाद्या कंपनीत नोकरी करत कुठेतरी पोहोचलो असतोच .पण आज जी उंची मला मिळाली ती त्या घटनेनंतरच. घरोघरी पोहोचायचं माझं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं.

मित्रमैत्रिणीनो कुठलंही काम अशक्य नाही आयुष्याला दिशा देणारा टर्निंग पाॅईंट कधीही येऊ शकतो. एकदा गणपती बाप्पा मोरया म्हणा आणि श्रीगणेशा करा.. ! 

धन्यवाद ! “ 

प्रिंसिपल सरांनी शेखरला कडकडून मिठीच मारली ! हे सर्व ऐकून संपूर्ण सभागृह जागीच उभे राहिले आपल्या दोन हातांनी टाळ्यांच्या कडकडाटात शेखरच्या कृत्रिम हातांची प्रेरणादायी कथा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून गेली होती.. एका वेगळ्या उर्जेचा संचार झाला होता सगळ्यांच्या मनात..

आयुष्याला कुठल्या दिशेने घेऊन जायचं हे एकदा मनाशी पक्क ठरवावं लागतं. चमत्काराला नमस्कार होणारच 

—- मग तो ईश्वराने घडवलेला असो किंवा सामान्य माणसाने.. नाही का ? 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षणभंगूर…डॉ संजय मंगेश सावंत ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ क्षणभंगूर…डॉ संजय मंगेश सावंत ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी साडेतीन चारची वेळ होती. ओपीडी  संपवून नुकताच जेवणासाठी वर निघालो होतो. कॉरिडॉरमध्ये खुर्चीवर एक पंच्याहत्तरीच्या आसपासच्या आजी बसल्या होत्या. त्यांची  रक्त लघवी चेक केली होती व रिपोर्टची वाट बघत त्या बसल्या होत्या. आजी नेहमी दवाखान्यात यायच्या. शांत स्वभाव, चेहऱ्यावर सात्विक भाव, स्वभाव इतका गोड की त्यांच्या सुनादेखील त्यांचं कौतुक करायच्या. आजीदेखील  सुनांचं कौतुक करायच्या. सून आणि सासू एकमेकींचे कौतुक करतात ही बहुतेक क्वचितच आढळणारी गोष्ट, पण या आजींच्या बाबतीत ते खरं होतं,,,

जिना चढताना मी एक क्षण थबकलो. वाटलं आजी बराच वेळ बसून कंटाळून गेल्या असतील, त्यांना चहाला वर घेऊन जावं. पण  नंतर विचार केला आता वेळ खूप जाईल, जेवण उरकून मावडीच्या ओपीडीला जायचं होतं , चहासाठी आजीना वर  घेऊन गेलं तर पुन्हा दहा-पंधरा मिनिट वेळ जाईल आणि सगळे शेड्युल बिघडून जाईल.  म्हटलं बघू उद्या किंवा पुन्हा कधीतरी ,,, जेवण करून  मग खाली आलो त्यावेळी आजी निघून गेल्या होत्या.  कम्पाउंडरला रिपोर्ट दाखवला होता व तो नॉर्मल असल्याने त्या थांबल्या नव्हत्या. उशीर झालाय, उद्या येईन पुन्हा दाखवायला असे त्यांनी त्याच्याकडे सांगितलं ,,

दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्ता करून खाली साडेनऊ वाजता ओपीडीत गेलो तर खुर्चीवर बसल्याबसल्या कंपाउंडरने सांगितलं की काल लॅबसाठी आलेल्या आजी रात्री हार्ट अटॅकने गेल्या…. मी निस्तब्ध !! क्षणभर काहीच सुचेना ! चालता-फिरता माणूस गेला की धक्का  बसतो. मृत्यू अटळ आहे. तो असा शांतपणे योग्य वेळी आला तर कधीही चांगलीच गोष्ट. परंतु मला खंत या गोष्टीची वाटत होती की काल आजीना चहासाठी घेऊन गेलो असतो तर किती बरं झालं असतं ! मी खूप व्यथित झालो. या घटनेला इतकी वर्ष झाली पण अजूनही ही गोष्ट कायम मला खटकते !         

आपल्याला नेहमी वाटत असतं की आपलं आयुष्य खूप मोठं आहे. एखादी  गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो बघू भविष्यात करू,उद्या करू. पण बरेचदा ती वेळ व संधी हातातून निसटून जाते व उरतो तो केवळ पश्चाताप, एक गिल्टी फिलिंग !! देऊ नंतर , करू नंतर , बघू नंतर , जाऊ नंतर, याला काही अर्थ नसतो. कारण तुम्ही आत्ता जो क्षण उपभोगीत असता तोच खरा असतो, दुसऱ्या क्षणावर देखील तुमचा अधिकार नसतो !!

मध्यंतरी ऑगस्टमध्ये माझा थोरला भाऊ covid- ने गेला. उमदा, निरोगी,चालता-फिरता,थोरला असूनही आमच्यापेक्षा ॲक्टिव्ह. हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानाही एकदम उत्साही. त्याला सगळं टापटीप लागायचं. गाडीत बसण्यापूर्वी मला म्हणाला, “ दाढी वाढली आहे  दाढी करून घेतो “.  मी म्हटलं “ कशाला आता वेळ दवडतोस– हॉस्पिटलमध्ये तर जायचंय !!”   पण शेवटी हॉस्पिटलमधून तो घरी परत आलाच नाही. दोन मिनिटात त्याची दाढी झाली  असती, मी त्याला उगाच अडवलं असं अजूनही मला वाटतं ,, आम्ही चौघं भाऊ– मी धाकटा आमच्यामध्ये.  अजून कधीही वादविवाद भांडणतंटा झाला नाही , इतकंच काय पण आम्ही एकमेकांशी मोठ्या आवाजात देखील कधी बोललो नाही. परंतु तो गेल्यानंतर अजूनही मला सतत वाटत राहते की अजूनही आपण त्याच्याशी चांगलं वागलं बोललं पाहिजे  होतं, जास्त संवाद साधला पाहिजे होता. तो दिवाळीच्या सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा काही फंक्शन असेल तर मूर्टीला  यायचा. स्वभावाने अबोल , कधी कधी भरपूर वेळ असायचा पण मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा त्याच्याशी अजून जास्त गप्पा मारल्या असत्या तर खूप बरं झालं असतं असं आता वाटतं. पण आता वाटून काही उपयोग नसतो. गेलेला क्षण, गेलेली वेळ ही कधीही परत येत नसते !! कटू प्रसंग तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. परंतु त्याला बगल देऊन पुढे गेलं पाहिजे. नाहीतर नंतर वाटत राहतं की आपण आपल्या आयुष्यातील बरेच क्षण , वर्ष , दिवस हे विनाकारण वाया घालवले आहेत !!! कारण जर-तर ला आयुष्यात काहीही महत्त्व नसते !

बऱ्याच वर्षापासून आम्हाला आमच्या दहावीच्या बॅचचं गेट-टुगेदर घ्यायचं होतं. अनेक वेळा चर्चा व्हायच्या, तारखा ठरायच्या , कॅन्सल व्हायचं. आम्हाला ज्या सरांनी घडवलं, मार्गदर्शन केलं, कुटुंबातील एक सदस्य असल्यासारख सांभाळलं ,आई वडिलांनंतर त्यांचे स्थान होतं- अशा त्या जे बी  गाडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली है  गेट-टुगेदर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती. मी वैयक्तिक या विषयावर त्यांच्याशी अनेकदा  बोललो होतो , पण  आमचं निश्चित होत नव्हतं …  आणि  एक दिवस सर अचानक अकाली मोठा धक्का देऊन आमच्यातून निघून गेले.  खरेतर या गेट-टुगेदर चे उत्सव मूर्ती हे आमचे सरच  होते. परंतु बघू, नंतर करू, असं म्हणत आम्ही ती संधी गमावली ,, नंतर 1 वर्षापूर्वी आम्ही हे गेट-टुगेदर घेतलं.  सर्व शिक्षकांना बोलवलं , सगळे विद्यार्थी आले होते.  पण गाडेकर सरांची अनुपस्थिती म्हणजे आमच्यासाठी देव नसलेल्या देव्हाऱ्यासारखी स्थिती होती !!!

आपण साधुसंत बनू शकत नाही कारण आपण सामान्य संसारी माणस आहोत , म्हणून माणसासारखंच वागलं पाहिजे. जास्त मित्र नाही जमवता आले तरी चालेल, पण किमान शत्रूंची संख्या तरी कमी करू शकतो– ते आपल्या हातात असतं ,,, आपण बरेचदा एखाद्याला विनाकारण अपशब्द बोलतो, त्याचा अपमान करतो किंवा त्याच्याशी तुटकपणे वागतो. खरंतर या गोष्टींची काही गरज नसते. आपल्या असल्या वागण्याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो, पण त्यावेळी त्याचा काही उपयोग नसतो कारण वेळ निघून गेलेली असते. आणि शब्दांनी झालेल्या जखमा या भरून येणार्‍या नसतात व त्याचा परिणाम म्हणजे आपण अनेक मित्र , स्नेही , नातेवाईक गमावतो.  इतकंच काय पण आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आपण बरेचदा विनाकारण बोलत असतो , कळत नकळत अपमान करीत असतो. या गोष्टींमुळे आपण आपले आयुष्य तर कमी करत असतोच पण त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स देखील खराब करीत असतो. प्रत्येक वाईट कृतीमागे, रागावून चिडून बोललेल्या प्रत्येक वाक्यामागे आपण आपलं आयुष्य  काही क्षणांनी , मिनिटांनी  कमी करीत असतो.  

म्हणून मित्रांनो, मिनिमाईज दि एनिमी , मिनिमाईज बॅड वर्ड्स , मिनिमाईज अँगर , डिपॉझिट फ्रेंड्स अँड डिपॉझिट रिलेटिव्हस !! कारण गेलेला क्षण व वेळ परत येत नाही !!!! 

लेखक : डॉ संजय मंगेश सावंत, मुर्टी , बारामती

प्रस्तुती : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक उलट एक सुलट – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ एक उलट एक सुलट – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

श्वास रोखून धरत एक टाका सोडायचा –

दुसरा अलगद उचलायचा, मग चार उलट चार सुलट –

 

आई शिकवायची तेव्हा कटकट वाटायची फक्त –

कधी वीण विसविशीत, तर कधी घट्ट – 

 

ती म्हणायची….असंच असतं सुरुवातीला–

एखादा जास्तीचा सुटायचा – एखादा दाटायचाच.–..

पण मनासारख्या वीणेसाठी श्वास मात्र रोखायचा –

 

सांगायची..

टप्प्यावर धागे बदलताना जोड नकोत दिसायला –

सोडलेल्या टाक्यांचे भगदाड नको वाटायला आणि –

तेच पुन्हा ओवतांना नक्षीत हवेत शोभायला –

 

तेव्हा वाटायचं…

हिला काय आहे बोलायला !–

 

पण

आज इतक्या वर्षांनंतर सारं सारं उमगतंय–

एक मन जपताना दुसरं सुटेलसं वाटतंय–

तरी ओवून सारं एकत्र नक्षीत घ्यायला जमतंय—

 

मुलांचे चार सुलट , परिवाराचे उलट—

यजमानांचे –एक उलट दुसरा सुलट –

आणि माझे? 

गरजेनुसार कधी चार सोडायचे  – कधी सुटलेले अलगद उचलायचे—

 

हं, तसा रंग आता थोडा फिकट होतोय 

 

पण…… 

 

असो गुंता कितीही, उकल करता येतेय…. 

नक्षी असो कठीण कितीही, वीण घालता येतेय…

ह्यालाच तर जगणं म्हणतात ना…..

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

साधारणतः एखाद्या गोष्टीचा आपण आधी अभ्यास करतो, ती आत्मसात करतो आणि मग आपण त्या गोष्टीला मानायला लागतो. पण शाळेत असतांना एक बाई जणू छोटासा अभ्यासवर्गच घ्यायच्या. तेव्हा खरतरं स्वाध्याय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल तसं काहीही आधी माहीती नव्हतं.पण तो वर्ग आवडला आणि मग मी माझ्या परीने स्वाध्याय म्हणजे नेमकं काय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दलची माहिती अभ्यासायला सुरवात केली आणि त्या माहितीचा, स्वाध्यायचा आवाका बघून अक्षरशः आवाक झाले.

….खूपदा आपल्याला आपल्यात करायच्या सुधारणा, बदल हे कळत असतात खरं, पण ते म्हणतात नं कळतं पण वळतं नाही ह्यानुसार हे बदल, ह्या सुधारणा अत्यावश्यक असूनही आपण चक्क त्याकडे कानाडोळा करतो. मानवी स्वभावच आहे तो. पण कधीतरी ती वेळ येते आणि आपण आपल्यात ह्या बदलांचं आणि  सुधारणांचं बी रोवायला लागतो. हा सकारात्मक बदल आपल्यात खूप चांगलं चिंतन,मनन केल्यानेच होतो हे नक्की. मग ही ऊर्जा आपल्याला अमूलाग्र बदलवते,चांगल्या सुधारणा घडवून आणते.

हे सगळं स्वाध्यायमध्ये पण समजावून सांगितले आहे. १९ ऑक्टोबर– स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. मा. पांडुरंगशास्त्री हे मराठी तत्त्वज्ञ होते, व्यासंगी होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर ‘ मनुष्य गौरव दिन ‘ म्हणून साजरा करतात.आज स्वाध्यायचे लाखो अनुयायी कॅरिबियन, अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये, प्रत्येक राहण्यायोग्य खंडात आढळू शकतात. श्री. आठवले यांचे ” देवाच्या दैवी पितृत्वाखाली वैश्विक बंधुत्व ” हे स्वप्न पूर्ण करणे हे स्वाध्याय परिवाराचे ध्येय आहे.

मा.पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. शास्त्रींनी सरस्वती पाठशाळेत पारंपरिक शिक्षण,संस्कृत व्याकरण, वेदांत,साहित्य, इंग्रजी भाषा साहित्य, ह्यांचा सखोल अभ्यास केला. त्यांना पुढे रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानित केले होते.

त्यांनी ग्रंथालयातील सर्व शाखेतील प्रमुख लेखकांच्या ग्रंथांचे अध्ययन केले. वेद,उपनिषदे, स्मृती, पुराणे ह्यावर चिंतन,मनन केले.  मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा, म्हणजे थोडक्यात जीवन जगणे, जीवनाची आराधना करणे व जीवनावर खोल विचार करणे, ह्याचा प्रामुख्याने पुरस्कार केला.ह्या व्यासंगी व्यक्तीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमण्यम म्हणाले  ‘ विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील देदीप्यमान आशेचा किरण आहेत.” खरचं किती अभिमानास्पद कर्तृत्व नं.

….अनुभवांच्या जोरावर मा.आठवले न्यायव्याकरणशास्त्रात व इंग्रजी भाषेत निष्णात झाले. वयाच्या २२ व्या वर्षी ते दादाजी भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठावरून रोज सायंकाळी भगवद्गीतेवर व रविवारी सकाळी सकाळी भारतीय परंपरेतील विविध दर्शनांवर व इतर विचारप्रणालींवर तरूणांचे अभ्यासवर्गही घेऊ लागले. दिवसभरातील मधला वेळ ते एशियाटीक सोसायटीच्या ग्रंथालयात आधुनिक मानव्य विद्यांवरील ग्रंथांचे वाचन करू लागले. त्याच बरोवर शरीरशास्त्राचाही अभ्यास केला. हा अध्ययन-अध्यापनाचा क्रम सततच चालू होता. जपानमध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांना जाण्याचा योग आला. या परिषदेतील ‘अवतारवाद ’  व ‘ सामाजिक शक्ती-भक्ती ‘ या विषयांवरील त्यांचे प्रतिपादन अत्यंत प्रभावी ठरले. डॉ. कॉम्प्टन या नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन पदार्थ वैज्ञानिकाने भरघोस आर्थिक प्रलोभनांसह अमेरिकेच्या व्याख्यान दौ-याचे दादाजींना आमंत्रण दिले. दादा अंतर्मुख झाले आणि जागतिक किर्ती व प्रचंड पैशांचे प्रलोभन नम्रपणे नाकारून ते मायदेशी परतले.

भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही, तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे. माणसातल्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा हा  संदेश देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले हे खरोखरच आदर्श, विचारवंत व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांनी सामान्य  माणसाला स्वतःची ओळख देण्याचं, त्याला उभारी देऊन सक्षम बनविण्याचे उदात्त कार्य पार पाडलं. अंधश्रध्दा, फसवा ईश्वरवाद, व्यसने आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्या समाजाला गीता-विचारांची दिशा दाखवणा-या हया स्वाध्याय चळवळीला आणि तिचे  प्रणेते  मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांना नुकत्याच झालेल्या जयंती निमित्ताने शतशः प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाषा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ भाषा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दसरा झाला. ह्या वर्षीचा दसरा जरा पाऊस,विजा,कडकडाट आणि गडगडाट ह्यामध्ये पार पडला त्यामुळे नेहमीचा सणाचा उत्साह, लगबग लुप्त होऊन जरा ह्या चैतन्यावर निरुत्साहाचं मळभ आलं होतं.असो.  

“ कालाय तस्मै नमः “

नवरात्राची धावपळ, लगबग संपली. आता जरा निवांतपणा आला आला, असं वाटतं नं वाटतं तोच दिवाळी येतेय. नवरात्र उरकलं आणि आता वेध दिवाळीचे.

नवरात्र उरकलं हा विचार मनात आला खरा आणि लगेच मराठी भाषेची मोठी गंमतच वाटली. उरकलं हा शब्द तसा अर्थाने सरळसरळ घेतला तर बरोबरच, पण गर्भितार्थ बघितला तर चूकच. 

आपण हे सणवार, कुळाचार हे मनापासून करीत असतो. ह्या पासून आपल्याला आनंद,समाधान लाभतं. आणि ‘उरकलं ‘ हा शब्द जरा निरुत्साही वातावरणात काम झालं की मनात येतो.

खरंच भाषा हा प्रकारच मुळात लवचिक. मोडू तसा मोडणारा, वळवू तसा वळणारा, वाकवू तसा वाकणारा. ही भाषाच आपल्याला एकाच शब्दाचे अनेक अर्थ पुरविते. तर एकीकडे हीच भाषा समानार्थी शब्दासाठी अनेक पर्याय पण सुचविते नाही का ? —–

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवार होता, पारावरच्या मारुतीला एक भक्त शेंदूर लावत होता. कडेने एका हातात तेलाची बुधली आणि एका हातात रुईच्या पानांची माळ घेऊन बरीच मंडळी उभी होती. अचानक त्या मारुतीच्या अंगावरचं शेंदराचं आवरण गळून पडलं आणि….

…… आणि आत दिसली गणपतीची सुबक मूर्ती. लोक आश्चर्यचकित. आता हे तेल ओतायचं कुठं आणि ही माळ घालायची कुणाच्या गळ्यात ?

आपलही असंच होत असतं. परमेश्वर सगळ्यांना पृथ्वीवर पाठवतांना पाठवतो फक्त माणूस म्हणून. स्वच्छ कोरी मनाची पाटी, निखळ हसू आणि अत्यंत भावस्पर्शी नजर घेऊन. आपण दहा बारा दिवसातच त्याचं नाव ठेऊन

पहिला जातीचा शेंदूर फासून मोकळे होतो. मग हळूहळू त्याची पंचेंद्रिये काम करू लागतात. त्याच्या मनाच्या पाटीवर कधी घरातले, कधी बाहेरचे काहीबाही खरडून ठेवतात. घर, कुटुंब, गाव, शाळा, कॉलेज, समाज, यामध्ये वावरत असताना एकावर एक विचारांचे, विकारांचे लेप नुसते थापले जातात. आणि मग जणू हीच आपली ओळख आहे अशा थाटात आपणही वावरायला सुरुवात करतो. वरचेवर थापले जाणारे हे लेप, हे मुखवटे, मग आपल्यालाही आवडायला लागतात. माणसं, समाज काय तेलाच्या बाटल्या, हार घेऊन उभे असतातच. नजरेतला विचार हरपतो.  त्याची जागा विखारानं घेतली जाते. आपल्यातल्या मूळ स्वरूपाची जाणीव हळूहळू नष्ट होते.

अचानक एक दिवस काहीतरी घडतं आणि ही शेंदराची पुटं आपोआप गळून पडतात. आतलं मूळ चैतन्य प्रकट होतं. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सहसा हे घडून येत नाही. हा क्षण खूप मोलाचा असतो. खूप प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. नाहीतर गडबडीत आपणच परत आपल्या हाताने आपल्याला शेंदूर फासून घेतो. कारण त्या शेंदऱ्या स्वरूपाची सवय झालेली असते. लोकांच्या तेलाची, माळेची, नमस्काराची भूल पडलेली असते.

आणखी एक क्षण असा मुखवटे उतरवणारा असतो तो म्हणजे शेवटचा क्षण. परमेश्वर सगळे चढलेले मुखवटे, आवरणं, दागिने, एवढंच काय, कपडेसुद्धा काढून ठेवायला लावतो. ज्या मूळ शुद्ध स्वरूपात आणून सोडलं होतं त्या मूळ स्वरूपात घेऊन जातो. बरोबर येतं फक्त आपल्या भल्याबुऱ्या कर्माचं गाठोडं, ज्याचा हिशोब वर होणार असतो. म्हणून या जीवनप्रवासात जर अधेमधे कुठे हे शेंदराचे मुखवटे गळून पडले, तर तो आत्मसाक्षात्काराचा क्षण ओळखा…. त्याला  जपा. 

नाहीतर आहेच…… 

“पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनं…. “

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेर म्हणजे काय?…..अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ माहेर म्हणजे काय?…..अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

१) माहेर म्हणजे…  – महिना दोन महिने आधीच कॅलेंडरवर लक्ष ठेवून माहेरी जाण्यासाठी प्रवासाची तिकिटं काढून ठेवणं.

२) माहेर म्हणजे… – ‘ या वेळी मी आईकडे जास्त दिवस राहणार ‘ असं नव-याला ठणकावून सांगणं.

३) माहेर म्हणजे… – माहेरी जाण्याच्या कल्पनेने चेहऱ्यावर तेज यायला सुरुवात होणं.

४) माहेर म्हणजे… – उत्साहाच्या भरात कपड्यांची बॅग भरायला घेणं.

 ५) माहेर म्हणजे… – ” पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊ या ” असं आपल्या लेकरांना आनंदाने ओरडून सांगणं.

६) माहेर म्हणजे… – बसस्टाॅपवर सोडायला आलेल्या नवऱ्याला हसऱ्या चेहऱ्याने टाटा करणं.

७) माहेर म्हणजे… – बसस्टाॅपवर उतरल्यावर रिक्षावाला म्हणेल त्या किंमतीत माहेरच्या रस्त्याला लागणं.

८) माहेर म्हणजे… – त्या घराच्या पन्नास- पंचावन्न पायऱ्या दहा-बारा ढांगात संपवणं.

९) माहेर म्हणजे… – कोणीतरी दार उघडेपर्यंत दरवाजावरची बेल दाबून ठेवणं.

१०) माहेर म्हणजे… – उंबरठ्याच्या बाहेर उभं राहून, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणाऱ्या आईकडे प्रेमाने पाहाणं.

११) माहेर म्हणजे… – उंबरठ्याच्या आत पाय टाकायची घाई होणं.

१२) माहेर म्हणजे… – चपला काढण्याआधीच बाबांच्या गळ्यात पडणं. 

१३) माहेर म्हणजे… – वहिनीने प्रेमाने आपल्या बॅगा आत नेऊन ठेवणं.

१४) माहेर म्हणजे… – ” किती वाळली माझी लेक ” असं आईने केसांतुन हात फिरवत म्हणणं.

१५) माहेर म्हणजे.. – ” चला आजपासून काय धमाल करायची?” असं मामाने भाच्याला कौतुकाने विचारणं. 

१६) माहेर म्हणजे… – स्वयंपाकघरात डोकावून, “आज काय बेत?” असं नुसतं विचारणं.

१७) माहेर म्हणजे… – आवडीच्या पदार्थांची फर्माईश करणं.

१८) माहेर म्हणजे… – जेवणाची वेळ झाल्यावर पहिल्या पंगतीत बसून जेवायला सुरवात करणं.  

१९) माहेर म्हणजे… – सकाळी जाग येईल तेव्हा आरामात उठणं.

२०) माहेर म्हणजे… – सोफ्यावरून उठून खुर्चीवर बसणं. आणि हो खुर्चीवरून उठून बेडवर लोळत पडणं.

२१) माहेर म्हणजे… – गावातल्या मैत्रिणींना फोन करून सिनेमा-नाटकाचे प्लॅन आखणं.

२२) माहेर म्हणजे – बालपणीच्या जुन्या फोटोंचा पसारा काढून बसणं.  

२३) माहेर म्हणजे… – कोणत्याही पाचकळ विनोदावर खळखळून हसणं.

२४) माहेर म्हणजे… – अंगणातल्या झोपाळ्यावर बसून वेळी-अवेळी पुस्तक वाचणं.

२५) माहेर म्हणजे… – गच्च पोट भरल्यानंतर आईने दहीभात खाण्याचा आग्रह करणं.

२६) माहेर म्हणजे… – ८/१० दिवस पटकन् संपून गेल्यासारखे वाटणं.

२७) माहेर म्हणजे… – सासरी परत जातांना दोनाच्या चार बॅग झालेल्या असणं. 

२८) माहेर म्हणजे… – निघतेवेळी जड मनाने आईबाबांना वाकून नमस्कार करणं.

२९) माहेर म्हणजे… – YES!! ऐनवेळी सासरी जाणं २ दिवसाने पुढे ढकलणं.

३०) माहेर म्हणजे… – ” सासरच्यांना नीट जप हो ” असं आईने प्रेमाने पाठीवर हात फिरवत सांगणं. 

३१) माहेर म्हणजे… – बसमध्ये भावाने जड बॅगा ठेवायला मदत करणं.

३२) माहेर म्हणजे… – ” घरी पोहोचलीस की फोन कर ” असं माहेरच्यांनी चारवेळा ओरडून सांगणं.

३३) माहेर म्हणजे… – बस दिसेनाशी होईपर्यंत माहेरच्यांना हात हलवत निरोप देणं. 

३४) माहेर म्हणजे… – पुढच्या प्रवासासाठी प्राणवायू भरून घेणं.

३५) माहेर म्हणजे… – ” माझ्या माणसांना सुखात ठेव ” ही देवाकडे प्रार्थना करणं.

३६) माहेर म्हणजे… -“आम्ही खूप मजा केली मामाकडे” असं लेकरांनी खूप उत्साहाने त्यांच्या वडिलांना न थकता सांगणं. 

३७) माहेर म्हणजे… – फोन आला की खोलीचं दार लावत आईशी मनसोक्त गप्पा मारणं. ‘ काळजी करू नकोस गं आई ‘ असं दर चार वाक्यांनंतर तिला ठामपणे सांगत राहाणं.  

३८) माहेर म्हणजे… – वयाच्या सत्तराव्या वर्षीही माहेरच्या आठवणींनी व्याकूळ होणं.

  किती लिहावं माहेराविषयी?…

अहो शेवटी माहेर म्हणजे; ” माझ्या माहेरी असं, माझ्या माहेरी तसं ” हे नवऱ्याला सतत सांगून त्याला छळत राहाणं. हो किनई?…… 

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print