मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

जागृत दैवत.. माय माझी जोगेश्वरी…

माझे काका (अण्णा)दुपारी मंदिरात ओट्यावर विश्रांती घ्यायचे. दुपारी बारानंतर गुरव जोगेश्वरीचा पोशाख बदलायचे. एकदा आम्ही भावंड तिथेच लपंडाव खेळत होतो. दोन्ही दरवाजे बाराला बंद व्हायचे. गुरव काहीतरी आणायला म्हणून वरच्या मजल्यावर गेले आणि दोन मिनिटातच खाली आले तेव्हां त्यांच्या लक्षात आलं, देवीचा चांदीचा मुकुट गायब झाला आहे. त्यावेळी फोन नव्हते. पण फरासखाना अगदी जवळ होता. आमच्यातल्याच एका जाणत्याला काकांनी तिकडे पिटाळलं, पोलिसांचं भलं मोठ्ठ पथक धावत आलं, काहीजण मंदिराचा कोपरान् कोपरा धुंडाळू लागले काहींनी मंदिराला घेराव घातला, तर काही पोलिसांनी उलट सुलट प्रश्न विचारून आमची भंबेरी उडवली. पोलीस पथक, अथक दोन दिवस धावपळ करीत होते पण यश आले नाही, आणि काय सांगू तुम्हाला!  एक दिवस अचानक चोर मुकुट घेऊन देवीसमोर उभा राह्यला. त्यानी लोटांगण घालून देवीपुढे नाक घासले, डोळ्यातून घळघळा पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. शब्द फुटले, ” आई मी चुकलो, मी चोरी केली माझ्या हातून पाप घडलंय, पण मला मुकुट परत आणून देण्याची सद्बुद्धी तू दिलीस. मला क्षमा कर देवीआई, माझे अपराध पोटात घाल. ” देवी पुढे क्षमा याचना करणाऱ्या त्याच्या भोवती पोलिसांनी घेराव घातला. चोर पुराव्यानिशी अगदी सहज सांपडला होता आपणहून तो पोलिसांच्या समोर आला आणि म्हणाला, ” इन्स्पेक्टर साहेब बेड्या घाला मला, फटके मारून माझी ‘ ‘खाल ‘उडवा, माझ्या कडून फार मोठं पाप, घडलंय मी अपराधी आहे. मला या पापाचं प्रायश्चित्त मिळायलाच हवं. असं म्हणून त्यानी बेड्या घालून घेण्यासाठी हात पुढे केले, थरथरत्या पायांनी कसंबसं उभं रहात तो म्हणाला, ” पण साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, मला फक्त अर्धा कप चहा आणि एक बनपाव द्याल का? दोन दिवसाचा उपाशी आहे हो मी!  या पोटासाठी चोरी केली. रात्रभर तळमळत होतो मी. चोरी केल्याची टोचणी मनाला पोखरत होतीच, अपराधी भावनेने, मानसिक ओढाताणीने, उपासमारीने मला ग्लानी आली, मी जमिनीवर कोसळलो. — आणि आणि –पहाटे जोगेश्वरी माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, “उठ!  माझा मुकुट परत मंदिरात नेऊन ठेव. ” सत्य की स्वप्न मला कळेना, साहेब, उठायची पण ताकद नव्हती माझ्या अंगात, मी जागा झालो आणि एक प्रकारचं चैतन्य आलं माझ्या हातापायात. खरं सांगतो, मी आईसमोर कसा? कधी? आलो हे मला कळलंच नाही. ” पश्चातापाने रडणाऱ्या त्या तरुणाला बेड्या घालण्यासाठी, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस सरसावले. इतका वेळ शांतपणे हा प्रकार बघत असलेले माझे काका आता पुढे झाले, आणि म्हणाले, “इन्स्पेक्टर साहेब मला कल्पना आहे कायद्याने तुमचे हात बांधले गेले आहेत. चोरांनी आपणहून गुन्हा कबूल केला तरी तो कायद्याने गुन्हेगारच ठरतो. पण बेडया ठोकण्याआधी माझी तुम्हाला एक कळकळीची, हात जोडून विनंती आहे, फक्त, फक्त दहा मिनिटं थांबा, ह्याला थोडा वेळ द्या, अपराधी बेकारी मुळे सैरभैर झाला होता, त्यातून उपासमार, पोटात अन्नाचा कण नाही. साहेब माणूस चोरी कां करतो? तर पोटासाठी. रिकाम्या पोटात कावळे ओरडत असतात तेव्हांच रिकाम्या डोक्यात सैतान शिरतो. आणि मग सदविवेक बुद्धी मागे पडून माणसाच्या हातून गुन्हा घडतो. भरल्या पोटी कोण कशाला करेल हो चोरी? जोगेश्वरी च्या दरबारातून त्याला उपाशी जाऊ देऊ नका, फक्त थोडावेळ थांबा. समोरच्या गुंडींच्या हॉटेलमधून मी चहा पाव मागवला आहे, तो या तरुणाला पोटभर खाऊ द्या मग खुशाल त्याला फरासखान्यात न्या”. माझ्या काकांचं बोलणं ऐकून भीतीने आणि भुकेने थरथर कापणारा तो तरुण माझ्या काकांच्या पायावर कोसळला. त्याला प्रेमाने उठवत अण्णा म्हणाले, ” उठ बाळा! माझ्या पाया कशाला पडतोस? जोगेश्वरी आईचे पाय धर. ही सारी तिची कृपा. तिनेच तुला विवेक बुद्धी दिली आहे. ” आणि मग पुन्हा एकदा तो कैदी जोगेश्वरीच्या पायाशी कोसळला. अश्रुंचा अभिषेक माय माऊलीच्या चरणावर झाला.

मंडळी आपणही त्या जोगेश्वरी माय माऊलीच्या चरणावर नतमस्तक होऊ या.

– क्रमशः भाग २९ 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सत्य पण… परंतु…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “सत्य पण… परंतु…” ☆ श्री जगदीश काबरे

परीक्षेत चांगले “गुण” सगळ्यांनाच मिळवावेसे वाटतात…

परंतू “गुणवत्ता” वाढवावीशी वाटत नाही.

 

“सुविचारां”चा सुकाळ आहे…

परंतू त्यांच्या “आचारणा”चा दुष्काळ आहे.

 

“कचरा” सर्वांनाच नकोय…

परंतू “स्वच्छता” कुणालाच ठेवावीशी वाटत नाही.

 

“भ्रष्टाचारा”पासून मुक्ती हवीय…

परंतू “नियम” मात्र कुणालाच पाळावेसे वाटत नाहीत.

 

“मरायचं” एकदा सर्वाना आहे…

परंतू “मरावंस” कोणालाच वाटत नाही.

 

“धर्म” सगळ्यांनाच हवा आहे…

परंतू “अंधश्रद्धा” सोडावीशी वाटत नाही.

 

“अन्न” सर्वांनाच हवंय…

परंतू “शेती” शेतकऱ्यालाही करावीशी वाटत नाही.

 

“पाणी”” सर्वांनाच हवंय…

परंतू “पाणी” वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.

 

“सावली” सर्वांनाच हवीय…

परंतू “झाडे” लावावी, ती जगवावी असे कोणालाच वाटत नाही.

 

“सून”” सर्वनाच हवी आहे…

परंतु “मुलगी” वाचवावीशी कोणालाच वाटत नाही.

 

“विज्ञाना”चे सगळे फायदे हवे आहेत…

परंतु “वैज्ञानिक दृष्टिकोन” मात्र रुजवावासा वाटत नाही.

 

आजचे विदारक सत्य असे आहे…

परंतु विचार कोणालाच करावासा वाटत नाही.

 

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “कन्यादान …. असेही!!” – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कन्यादान …. असेही!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नाकी डोळी छान, साडेपाच फूट उंच, वर्ण गोरा, स्वयंपाकात निपुण, अत्यंत सोज्वळ, डबल ग्रॅज्युएट, सासू-सासरे घरात चालणार आहेत, नवऱ्याला सरकारी नोकरी नसली तरी चालेल, फक्त निर्व्यसनी हवा… इतके गुण असलेली मुलगी, लग्न होत नाही म्हणून दहा वर्षे घरात बसलेली…

काही कारणाने तिला कोणी पसंत करत नाही किंवा तिला तो पसंत पडत नाही….

असं न सांगता येणारं दुखणं…

अशा या मुलीच्या बापाला जो काही त्रास असेल, तोच मला त्रास!

भीक मागणारे आमचे वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील, आजी-आजोबा यांना काम करण्याची इच्छा आहे परंतु कोणी काम देत नाही, यांच्या पुनर्वसनासाठी रोजगार केंद्र निर्माण करावे यासाठी जागा (स्थळ) शोधतो आहे, परंतु गेली दहा वर्षे कोणी “स्थळ” देत नाही.

काहींनी आम्हाला रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी “स्थळे” पाठवली, पण ती स्थळे आम्हाला पसंत नव्हती.

जी “स्थळे” आम्हाला पसंत होती… त्यांनी काही ना काही स्वरूपात माझ्याकडे बराच “हुंडा” मागितला…!

नोकरी सोडून वर संशोधन करणारा मी बाप… इतका हुंडा या “स्थळांसाठी” देणं मला कसं परवडेल?

याच परिस्थितीत श्री दानिश भाई धावून आले आणि मध्यरात्रीचे सूर्य या नावाचे रोजगार केंद्र नव्हे, आमची मुलगी त्यांनी आपल्या पदरात घेतली…

बिबवेवाडी येथील स्थळ दिले, नववधूचा विवाहापूर्वी करतात तो मेकअप करून दिला, इथे टीव्ही, फ्रिज, कार्पेट अशा सर्व बाबींचा इंतजाम केला. तोरणे लावली, हार फुले माळा लागल्या, “संसाराला” लागतील त्या सर्व गोष्टी दिल्या…!

खऱ्या अर्थाने त्यांनीच कन्यादान केले…!

मी माझ्या डोक्यावरची पगडी त्यांच्या पायाशी ठेवली… त्यांनी ती उचलून परत माझ्या डोक्यावर घातली…

नावातच “दान” आणि “इश” असलेल्या माणसा पुढे पगडीच काय, संपूर्ण आयुष्य बहाल केले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत…!

तर 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, हा सोहळा संपन्न झाला.

दहा वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू करायचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. आमच्या वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील आणि आजी आजोबा यांच्यामार्फत या रोजगार केंद्रात अक्षय तृतीयेच्या दिवसापासून प्रोडक्शन सुरू झाले.

या सोहळ्याविषयी पुढे लिहिलेच आहे, परंतु मला एवढीच एक “मुलगी” नाही… इतरही अनेक मुलींची अर्थ प्रकल्पांची… जबाबदारी बाप म्हणून माझ्या डोक्यावर आहे.

त्या विषयी अगदी थोडक्यात सांगतो, : 

– अत्यंत गंभीर अवस्थेतील 5 रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांचे जीव वाचले आणि त्यांना आपापल्या गावी स्वखर्चाने पाठवले.

– एक धडधाकट (भीक मागणारा) मुलगा, याला श्री भाटे यांच्या वृद्धाश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. तिथल्या आजी आजोबांची तो सेवा करेल. मी श्री आणि सौ भाटे यांचा ऋणी आहे.

– रस्त्यावर पडलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पातून रोज जेवण दिले आहे.

– अनेक आजा मावश्या यांच्याकडून (खराटा पलटण) सार्वजनिक स्वच्छता करून घेऊन त्यांना किराणा (Grocery) दिला आहे.

– या महिन्यात जवळपास 900 लोकांना वैद्यकीय सेवा, लॅब टेस्ट तसेच वैद्यकीय उपकरणे दिली आहेत.

आणखी सुद्धा बरंच काही आहे…

पण सध्या आमच्या मुलीचा नवीन संसार सुरू झाला आहे… त्याचं कौतुक यावेळी जास्त आहे, म्हणून त्याविषयी जास्त सांगतो…

तर, आपणा सर्वांच्या मदतीने शुभाशीर्वादाने, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र” अक्षय्य तृतीयेला सुरू झाले

आता नेमका काय आहे हा प्रकल्प ते सांगतो…

याचना करत; भिक मागत जगणाऱ्या लोकांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही, या कारणामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही प्रॉडक्ट तयार करून घेऊन, त्यांच्या “हाताला काम” आणि “पोटाला अन्न” सन्मानाने देण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केलेला आहे.

या प्रशिक्षणा दरम्यान कोणालाही इजा होऊ नये, प्रदूषण कमीत कमी व्हावे किंबहुना प्रदूषणाला आळा बसावा आणि कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे

या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू असतील* 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)

डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक फार्मा कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर (Natural/ Organic)हवी असते.

धार्मिक स्थळांमध्ये किंवा रस्त्यावर पडलेल्या अशा फुलांचे निर्माल्य / कचरा आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून आम्हास देतील, किलोच्या भावाने आपण त्या विकत घेऊन त्यांना पैसे देऊ.

वृद्ध आणि दिव्यांग लोक बैठ्या स्वरूपात रंगानुसार या फुलांचे वर्गीकरण करतील.

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून, विशिष्ट तापमानात सुकवून फुलांची पावडर (चूर्ण / फाईन पावडर) केले जाईल. *

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. *

आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना, तयार झालेली फुलांची ही नैसर्गिक पावडर आपण देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत….

रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) 

कचरा आणि निर्माल्या मधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल!

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. आपण कोणालाही तो भेट दिला तरी ती व्यक्ती, पुन्हा कचऱ्यात फेकून देते.

माझी आई, जो बुके बनवते, तो दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं…!

आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते.

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… अंजु.. भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… अंजु.. – भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

अखेर तुझी झुंज संपली. आज तू अनंतात विलीन झालीस.

या चिरनिद्रेत तुझ्या सार्‍या यातना, वेदना मिटून गेल्या. तुला अखेरचा अश्रुपूर्ण निरोप देताना म्हणेन, ‘ जिथे असशील तिथे सुखात रहा. ’ 

आठवणी खूप आहेत. साठ पासष्ट वर्षांची आपली निखळ मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एकत्र होतो. त्यात निरागस बालपण होतं, तारुण्यातलं उमलणं होतं. दोघींच्याही वैवाहिक जीवनातले असंख्य क्षण, अनुभव, भलं-बुरं-आनंदाचं-दु:ख्खाचं सारं सारं सतत अगदी या संध्यापर्वातही कालपर्यंत शेअर केलं.

मैत्रीतली पारदर्शकता आपण सतत जपली.

तू अमेरिकेला गेलीस पण हे साता समुद्राचे अंतर सुद्धा आपल्यात मात्र अंतर पाडू शकले नाही.

अगदी परवा परवाच तू म्हणालीस, “तुझी आणि माझी मैत्री” हाच माझा खरा आनंदाचा ठेवा..!! “

अंजु, मी सुद्धा हेच म्हणेन. आपल्या या मैत्रीनेच आपल्याला घडवलं.

तुझी जीवनाबद्दलची सकारात्मकता, सदैव आनंदातच राहण्याची वृत्ती, एखाद्या गुलाबदाणीसारखा, गुलाबपाणी शिंपडणारा तुझा सहवास मला लाभला. मी किती भाग्यवान!!

झुंजार वृत्तीने तू या असाध्य व्याधीशी हसतमुखाने, स्वीकृत भावनेने लढत होतीस. कायम प्रसन्न राहिलीस. तुझा खिलाडुपणा, सारं काही सहज आणि आनंदाने विनातक्रार स्वीकारण्याचा तुझा स्वभाव शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होता.

आजकाल तुझा, खूप दिवस फोन आला नाही, मेसेज आला नाही की काळीज धडधडायचं. तुला फोन करण्याचं धाडसही व्हायचं नाही. “नो न्यूज ईज अ गुड न्यूज” असं समजून शांत रहायचा मी प्रयत्न करायची. आणि मग एक दिवस तुझा फोन यायचा,

“मी अगदी बरी आहे. मस्त आहे. चिंता नको करुस. इतक्यात नाही जाणार. अगं! उरलेले दिवस फक्त आनंदच वेचणार. “

मग खूप गप्पा. काॅलेजचे दिवस. त्या टिंगल टवाळ्या, काही गंमतीदार लोकांच्या आठवणी आणि खूप काही. तेव्हां माझेही जडावलेले श्वास स्थिर व्हायचे. तू खूप चांगल्या मूडमध्ये होतीस.

म्हणालीस, “ऐक हं! तुला एक छान गाणं म्हणून दाखवते.. ” किती सुंदर, भावपूर्ण, मधुर आवाजात गायचीस!

ते सूर मी माझ्या मनात ठेवलेत.

अंजु, आता तुझे नसणे सोसणं कठीण असलं तरी मी ठरवलंय्, रडायचं नाही. तुझ्या आठवणीतच रमायचं मी ठरवलंय्. तुझ्या मैत्रीचं दान तू मला दिलंच आहेस. तू नसलीस तरी माझी झोळी रिकामी नाही.

शांता शेळकेंच्या शब्दात तूही हेच म्हणत असशील ना?

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे…

बाय अंजु.. निजधामी या सुखी रहा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिकी… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ डिकी… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

प्रत्येक चार चाकी वाहनात सामान ठेवण्यासाठी छोटीशी जागा असते. त्या डिकीत आपण आपले सामान ठेवत असतो. चोखंदळ लोकं त्या डिकीची धारण क्षमता पाहून गाडीची निवड करीत असतात….!

समजा गाडीला डिकी नसती, तर मनुष्याला सामान मांडीवर ठेवून प्रवास करावा लागला असता, आणि तो सुखावह झाला असता…?

पहा कल्पना करून….

जीवनप्रवास आनंदाने करायचा असेल तर आपल्या मनावरील, मनातील, मनाच्या आजूबाजूचे ओझे ठेवायला एखादी डिकी शोधून ठेवायला हवी, नाही का?

© श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नलावडे बाईंची शाळा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ नलावडे बाईंची शाळा…  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

गोरेगाव, मुंबई येथे माझी सन्मित्र मंडळाची शाळा. तळमजल्यावर बालवाडी ते चौथीपर्यंतच्या इटुकल्या पिटुकल्यांचा कलकलाट ऐकू येतो, हीच ती ‘बैरामजी जीजीभॉय प्राथमिक शाळा’. याच शाळेत १९७९ साली सौ. गीता वासुदेव नलावडे – आमच्या नलावडे बाई (8655846810) यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि माझ्यासकट शेकडो मुलांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी दिली.

बाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या तेव्हा त्यांचे शिक्षण फक्त ११वी मॅट्रिक व DEd पर्यंतच होतं. लग्नानंतर नोकरीबरोबरीने शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह व सक्रिय पाठिंबा नवऱ्याचा हे त्या आग्रहाने नमूद करतात. MA, DEd झालेल्या बाई वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या होत्या.

तुमच्या पैकी ज्यांना १ – २ मुलं आहेत, त्यांनी त्या मुलांची लहानपणाची वयं आठवा. त्यांची दंगामस्ती, क्षणाक्षणाला बदलणारे त्यांचे मूड व रंगढंग आठवा. दर वर्गात अशा ४०-५० मुलांना बरोबर घेऊन वर्षानुवर्षं स्वत:चं डोकं शांत ठेवत या मुलांना ठाकून ठोकून तयार करण्याच्या आपल्या कामात बाईंनी स्वत:ला गुंतवून घेतलं. मला वाटतं देव प्राथमिकच्या शिक्षकांना जास्ती पेशन्सचा बोनस देत असावा.

मुलांनी चावटपणा करून ‘बाई तुमचं अक्षर चांगलं नाही, वाचता येत नाहीये’ असं म्हटले किंवा उगाच व्याकरणाच्या चुका काढल्या तरी अशा घटनांचा बाऊ न करता बाईंनी या गोष्टी आपल्याला सुधारणेला वाव आहेत म्हणून स्वीकारल्या – त्या मुलांबद्दल कोणताही राग वा आकस न बाळगता.

सगळ्यांच्यातच काही ना काही चांगले आहे हा बाईंचा ठाम विश्वास. ते शोधून काढणे व त्यांना तशी कामं देणे यात बाईंचा हातखंडा. त्यामुळे आपण इकडचे कामाचे डोंगर तिकडे केलेत याचे भान ना त्या सह-शिक्षिकांना रहातं ना त्या मुलांना. कोणाचं चुकलं की त्याला ‘धपाटे देईन हं’ असे म्हणायचं (बाई मारायच्या नाहीत कधी, नुसतीच शाब्दिक धमकी) आणि बरोबर आले की पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे असा सगळा रोखठोक कारभार.

कोणतीही अवघड परिस्थिती आल्यावर न डगमगता तिचा सामना करणे ही बाईंची खासियत. मग बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये चाळीस विद्यार्थी सहलीला घेऊन गेल्या असता वाघोबा आमने सामने येणं असो किंवा कोकणात किर्र अंधाऱ्या रात्री सुनसान रस्त्यावर मुलांना सोबत घेऊन बसची वाट पहाणं असो किंवा सिंहगड किल्ल्यावरून वांड मुलांना घेऊन अंधारात खाली येणं असो.

कुठेही गैरप्रकार दिसला किंवा आपल्या मुलांना कोणी त्रास देताना दिसलं की तिथे मात्र दयामाया हा शब्द बाईंच्या शब्दकोशात नसतो. आमच्याच माध्यमिक शाळेतल्या मुलीची एका मवाल्याने – स्थानिक गुंडाने – छेड काढल्यावर, पुरुष सहकारी चाचरताना, रणरागिणीचे रूप घेऊन बाईंनी भर रस्त्यात त्याच्या मुस्कटात भडकावून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

मुलांच्या विकासासाठी, अनेकानेक सामाजिक कामांसाठी बाईंनी विविध उपक्रम शाळेत राबवले. ‘श्वास’ चित्रपटासाठी मुलांनी स्वत: आकाशकंदील बनवून विकले व आलेले पैसे अभिनेता अरुण नलावडे यांना दिले होते.

खुर्चीत असले की मी शिक्षक / मुख्याध्यापिका आहे, शाळा सुटली की मी तुमच्यातलीच आहे – तुमची मैत्रीणच आहे – असं सहशिक्षिकांना आवर्जून सांगणाऱ्या बाई सतत नवीन गोष्टी शिकण्याचा आग्रह धरतात. बाईंचे सर्व सहकाऱ्यांशी इतके घरच्यासारखे संबंध होते की सर्वोत्कृष्ट शिक्षकाच्या महापौर पुरस्कारासाठी करावयाचा अर्ज व फाइल सहशिक्षिकांनीच तयार केली व पाठवली. बाईंना १९९७-९८ सालाचा महापौर पुरस्कार मिळाला व पुढे अतिशय बहुमानाचा २००९-१० चा आदर्श शिक्षिकेचा राष्ट्रपती पुरस्कारही. बाईंच्या अथक प्रयत्नांनी व सोमण बाई, बर्वे बाई, पाटील बाई, धारप बाई, सुमन ताई आणि त्यांच्या अगणित सहकाऱ्यांच्या साथीने शाळेला २०००-०१ सालचा ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाला, A ग्रेडसुद्धा मिळाली व मिळत राहिली.

बाईंनी आम्हा दिवट्यांच्याच आयुष्यात प्रकाश पाडला असं नाही तर त्या आम्हा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच होत्या – आहेत. कुटुंबाला उभं करताना बाईंनी विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना मदत केली आहे, आर्थिक मदत तर केलीच पण कित्येकांचे संसारही मोडण्यापासून वाचवले आहेत.

“असंही माझ्या डोळ्यात पटकन पाणी येतं. पण एकदा तर फारच अवघड परिस्थिती झाली होती, ” बाई सांगत होत्या, “एक गरीब मुलगा होता, त्याला आपल्या शाळेत शिशु वर्गात प्रवेश घ्यायचा होता. त्याची आई धुणी भांडी करायची. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी १, ००० रुपये refundable deposit घ्यायचं असायचं. हे म्हटल्यावर तिने रुमालाची पुरचुंडी काढली. त्यात तिने वेळोवेळी साठवलेल्या रुपया, दोन-पाच रुपयाच्या नोटा होत्या. पण ते सगळे पैसे जेमतेम चार – पाचशेच भरत होते.

मी तिला सांगितलं ‘तुमच्या मुलाचं नाव लागलंय, तुम्ही काळजी करू नका. पण शक्य तेवढ्या लवकर उरलेले पैसे भरून टाका म्हणजे प्रवेश पक्का होईल’, तर ती दुसऱ्याच दिवशी हजर. हातात पन्नासच्या नव्या नोटा. ‘क्लार्कला पैसे द्या’ म्हणून सांगणार इतक्यात माझं लक्ष तिच्या ओक्याबोक्या गळ्याकडे गेलं. तिने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले होते. बापरे, तिला ते पैसे तसेच परत केले आणि मंगळसूत्र सोडवून आणायला सांगितले. माणसं चांगली असतात रे, परिस्थिती त्यांना वाईट बनवते. “

बाईंच्या कुंडलीत मुलांशी गट्टी असा एक मोठ्ठा योग आहे. शाळा सोडून वर्षे उलटून गेली तरी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाईंना फोन येत असतात. कुठल्याही गोष्टीचा मुलांच्या angle ने विचार करणे, त्यांच्या मनात शिरणे ही हातोटी साधलेल्या बाई विद्यार्थीप्रिय झाल्या नसत्या तरच नवल होतं.

आणि ही गट्टी मुलांनी शाळा सोडल्यावर, त्यांची शिक्षणं पूर्ण झाल्यावर, अगदी नोकऱ्या लागल्यानंतर, पार लग्नानंतरसुद्धा तितकीच घट्ट रहाते. फक्त नंतर झुकतं माप मुलांपेक्षा कुटुंबातील नव्या members ना – सुना-जावयांना दिलं अशी जरा एक गोड तक्रार मात्र येते.

देश विदेशी विखुरलेल्या आम्हा नर रत्नांना बाईंना प्रत्यक्ष भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली गेल्या वर्षीच्या जानेवारीत (२०१९). निमित्त होतं शाळेच्या ६० वर्षं पूर्ण होण्याचं. माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा घाट घातला होता. कार्यक्रम संपल्यावर बाईंनी सांगितलं की राष्ट्रपती पुरस्काराच्या वेळेला खूप बंधनं होती, नियमावली होती. इथं तसं नव्हतं. इथं माझ्यात आणि माझ्या मुलांच्यात कोणताच अडथळा नव्हता, त्यामुळे त्या पुरस्कारापेक्षा हा पुरस्कारच मला जास्त भावतो.

निवृत्तीनंतर बाई आता DSK विश्व, पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. निवृत्तीनंतर म्हणजे शाळेतून निवृत्ती, बरं का! कारण सोसायटीत सगळ्यांनी गळ घालून बाईंना कमिटीवर घेतले. मग गरजेनुसार ‘धपाटे देईन हं’ म्हणून आणि पैकीच्या पैकी मार्क्स देऊन काम करवून घेण्याचा त्यांचा शिरस्ता आता या मुक्कामी चालू आहे.

बाईंची धावपळ व सामाजिक बांधिलकी अजून चालूच आहे. मुंबईत रात्र शाळेच्या त्या सह सचिव (joint secretary) आहेत. पुण्यात त्यांचं भगवद्गीता, सप्तशतीचा पाठ शिकणे, पठण करणे चालू असतं. DSK विश्वमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व बाई यांनी एके दिवशी प्रत्येकी एक एक समास हाती लिहून काढून एका दिवसात संपूर्ण दासबोध लिहूनही घेतला, त्या हस्तलिखिताचं binding करून घेतलं आणि ते बाड शिवथरघळीत पादुकांवर ठेवलंही.

समर्थ दासबोधात दहाव्या समासात म्हणतात :

महंते महंत करावे,

युक्तीबुद्धीने भरावे,

जाणते करून विखरावे,

नाना देशी.

समर्थच असेही म्हणतात की

आपणासी जे ठावे,

ते ते दुसऱ्यासी सांगावे,

शहाणे करून सोडावे,

सकळ जन.

हल्लीच्या काळात पु ल आपल्या चितळे मास्तरांच्या मुखाने सांगतात – आयुष्यात व्रत एकच केले. पोरगं सापडलं तावडीत की त्याला घासूनपुसून जगात पाठवून देणं. बाई अख्खं आयुष्य याच तत्वांवर जगत आल्या आणि अजूनही ती वाटचाल चालूच आहे.

जुन्या काळच्या एकत्र कुटुंबांत आजीची ढीगभर नातवंडे असत. सगळ्याच नातवंडांना वाटायचे की आपणच आजीचे लाडके. बाईंच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं तसंच आहे. आणि या प्रेमाचा अभ्यासातील गुण किंवा जीवनातील यशस्वी होण्या न होण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नसतो बरं का!

आणि हो, बाई शाळेतून कधीच निवृत्त झाल्या पण आजही मुंबईत, सरकार दप्तरी गोरेगावची बैरामजी जीजीभॉय शाळा “नलावडे बाईंची शाळा” म्हणूनच ओळखली जाते, बरे का!

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सो द ट्रुथ कम्स आऊट… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ सो द ट्रुथ कम्स आऊट… ☆ सुश्री शीला पतकी 

सोलापूर मध्ये अनेक शाळांची मिळून एक विज्ञान दिंडी निघालेली होती. त्यावेळेला एक विज्ञान प्रदर्शन ‘नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूल’ मध्ये भरले होते. त्याचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर जयंतराव नारळीकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शालेय मुलांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे नारळीकरांचे व्याख्यान होणार होते. विज्ञान दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थी, शाळा सहभागी झालेल्या होत्या. सरस्वती मंदिर पासून हि विज्ञान दिंडी निघून, ती नवी पेठ मार्गे मेकॅनिक चौकातून हुतात्मा स्मृती मंदिर जवळ विसर्जित झाली. एका मोठ्या उघड्या टेम्पोमध्ये मी एक रोबोट बनवला होता. त्या रोबोटच्या आत श्रद्धा कुलकर्णी नावाची एक विद्यार्थिनी होती. ती आता अमेरिकेत सी. ए. आहे. उंचीने लहान असल्यामुळे तिला रोबोटचा पूर्ण पोशाख घातला होता. अर्थातच् संपूर्ण रोबोट थर्माकॉलचा बनवलेला होता. हात ताठ होते. मुंडके मात्र हालत होते.

लोक रस्त्यावरून त्या रोबोटला फुलं देत होते, खाऊचे पुडे देत होते. रोबोट सर्वांना हात हालवून अभिवादन करीत होता. अशा पद्धतीने ती विज्ञान दिंडी हुतात्मा स्मृती मंदिर पाशी विसर्जित झाली. त्याचे स्वागत डॉक्टर नारळीकरांसह अनेकांनी केले. रोबोटने नारळीकरांना एक पुष्पगुच्छ दिला. नारळीकरांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि डोक्यावर हात ठेवला. पण मानवी संस्कारी सवयीप्रमाणे ती खाली वाकली आणि तिचे रोबोटचे तात्पुरते घातलेले मुंडके नकळत खाली पडले. नारळीकर सर पटकन म्हणाले, ‘‘सो द ट्रुथ कम्स आऊट”… 

मी त्यांच्या शेजारीच उभी होते. मी त्यांना म्हणाले, ‘‘सत्य शोधणे हेच तर विज्ञानाचे काम आहे ना! ! ” त्या माझ्या अपेक्षित आणि पटकन् आलेल्या उत्तरावर ते खूप खुश झाले. त्या दिवशी त्यांचे व्याख्यान खूप सुंदर झाले. त्यांच्या स्वागतासाठी एक खास ‘स्वागत गीत’ मी लिहिले होते आणि आमच्या विश्वकर्मा बाईंनी ते सादर केले होते. झपतालामध्ये ते गीत होते. मला संगीतातला तो ताल-बिल काही कळत नव्हता. मग त्यांनी मला त्या तालातले एक गाणं दिलं… ‘‘अजी रुठ कर अब कहा जाईयेगा… ” आणि मी त्याच चालीवरती एक स्वागत गीत तयार केले होते. स्वागत गीताला खूप टाळ्या पडल्या. संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिर प्रेक्षकांनी भरले होते. त्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर झाले. आमच्या विज्ञान दालनाचेही त्यांनी भरपूर कौतुक केले.

अतिशय विद्वान असा हा माणूस होता. भारतीय संस्काराने परिपूर्ण आणि विज्ञानावर विलक्षण निष्ठा होती. खगोलशास्त्रावरती अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले होते. अशा व्यक्तीच्या सहवासात पाच तरी मिनिटे घालवता आली… हे आमचे भाग्यच!

आजच्या खगोलशास्त्रीय विज्ञान संशोधनात त्यांचा खूप मोठा असा ‘सिंहाचा वाटा’ आहे. अशा या महान खगोलशास्त्रज्ञाला आमचा मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली. खूप मोठा ऐवज आज आम्ही हरवला आहे. त्यांच्या जाण्याने एक विज्ञान तपस्वी नाहीसा झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वतःबरोबर… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ स्वतःबरोबर… ☆ श्री मंगेश मधुकर

 आयुष्य मोठं गमतीशीर आहे, सतत काहीना काही पाहिजे असतं. एक झालं की दूसरं मग तिसरं..

हे चक्र चालूच.

 लहानपणी स्वतःपुरता विचार करणारे आपण, जबाबदारी, कर्तव्य पार पाडताना बदलतो. ‘जगणं’ स्वतःपेक्षा इतरांसाठीच होतं. चिंता, टेंशन्स, काळजी, धावपळ, तडजोडी हेचं रुटीन. सगळं चांगलं आहे पण मन शांत नाही. अस्वस्थता सोबत असतेच तेच ते अन तेच ते… काहीतरी हरवलंय.

 विचार करताना लक्षात आलं की, इतरांचं करण्याच्या नादात स्वतःलाच विसरलो. आवडी-निवडी, छंद बाजूला टाकून जगतोय… मग ठरवलं की स्वतःला रिचार्ज करायचं, वय्, स्टेटस. आई-वडील, घर, संसार, बायको, मुलं, ऑफिस. जबाबदाऱ्या, चिंता आणि मोबाइल…. सर्वांना दूर ठेवून एक दिवस स्वतःबरोबर घालवायचा.

 बायकोला सांगितलं तर कपाळाला हात लावत म्हणाली “ताप नाहीये”

मी तडकलो तेव्हा तिनं हसत हसत विचारलं….

“नक्की काय करणारेस”

“माहिती नाही. काहीतरी डिफरंट”

“ऑल द बेस्ट, ” म्हणत तिनं हातात टिफिन दिला.

“हे कशाला? ”

“अहो कोलंबस, स्वतःच्या शोधात निघालात तेव्हा बाहेरपेक्षा घरचं खाणं केव्हाही चांगलं” 

मोबाईल स्वीच ऑफ करून बाहेर पडलो.

 बसस्टॉप पाहून रिक्षानं जाण्याचा विचार बदलला. तसंही खूप वर्षात बसनं प्रवास केला नव्हता. रविवार असूनही बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. शेवटच्या स्टॉपचं तिकीट काढलं. खिडकीतून रस्त्यावरचं ट्राफिक पाहत बसलो. अचानक ओळखीचा परिसर दिसायला लागल्यावर कुठं आलोय ते लक्षात आलं. पुढच्याच स्टॉपला उतरलो. दहावीपर्यंत याच भागात राहिलेलो. नंतर शिक्षण, नोकरीमुळे वेगवेगळ्या शहरात गेलो आणि आता इथंच सेटल झालो…. या सगळ्यात, कधी बालपणीच्या ठिकाणी यायला जमलंच नाही.

आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना योग आला.

…. प्रचंड आनंद झाला. एक भन्नाट फिलिंग. चालत निघालो. एक्साइटमेंट वाढलेली. खूप वर्षानी जुना परिसर पाहताना अंगावर शहारा आला. भिरभिरत्या नजरेनं सगळं मनात साठवताना आठवणींचे एकेक धागे जोडले जात होते…..

…. खूप काही बदललेलं.. एकदोन जुने वाडे सोडले तर सगळ्या नवीन बिल्डिंग आणि नवीन माणसं.

काही जुने थकलेले चेहरे दिसले. आवर्जून भेटलो. ओळख पटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप सुखावणारा होता.

गप्पांच्या ओघात जुन्या काळात गेलो…..

…. त्या काळातली मजा, मस्ती, खेळ, सण, गणपती मंडळ सगळं डोळ्यासमोर आलं. आमच्या वाड्याच्या जागी झालेल्या बिल्डिंगकडे पाहताना वाड्यातल्या असंख्य कडू-गोड आठवणी नजरेसमोर आल्या. खूप भरून आलं… ‘आठवणी’ आपल्याला मिळालेलं फार मोठं वरदान. त्या नसत्या तर माणसं दगड झाली असती. आठवणींचा घोळका सोबत घेऊन बराच वेळ गल्लीबोळातून भटकलो. अजूनही जुन्या काळाची जाणीव करून देणारे अवशेष काही ठिकाणी शिल्लक होते.

…. फिरताना आपसूकच पाय जवळच्या प्राचीन मंदिराकडं वळले. लहानपणी दररोज यायचो आणि आता तब्बल 22 वर्षांनी पाऊल ठेवत होतो. बरीच पडझड झालेली तरी काही ठिकाणी नवीन बांधकाम आणि दुरुस्ती केलेली. दर्शन घेऊन सभामंडपात डोळे बंद करून ध्यान लावलं… एकेक क्रिया यंत्रवत घडत होत्या. रोजच्या धावपळीत एक क्षणही फुरसत नसते पण आज….

…. सारखी चिडचिड करणारा मी आज खूप शांत होतो. खूप छान वाटलं. बराच वेळ बसलो. आपण एकजागी इतका वेळ शांत बसू शकतो याचं आश्चर्य वाटलं. मन तृप्त झालं पण पोटानं भुकेची जाणीव करून दिली. मंदिरातल्या बाकावर बसून उदरभरण केलं. डबा खाताना ‘तिची’ खूप आठवण आली. तडक निघालो आणि पंधरा मिनिटांत तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो…..

…. अजूनही ती तशीच होती… ‘ माझी शाळा ’.. मनातला अजून एक हळवा कोपरा. जुन्या आठवणी पुन्हा फेर धरून नाचायला लागल्या. आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस पण त्यावेळी कळलंच नाही.

आयुष्यात अनेक गोष्टी या नंतरच कळतात बऱ्याचदा वेळ गेल्यानंतर.. असो..

 शाळेचा निरोप घेऊन भरपूर सिनेमे पाहिले तिथं पोचलो. बंद पडलेले, रंग उडालेलं, कचरा आणि झाडा-झुडपांनी वेढलेलं थिएटर पाहून मनात कालवाकालव झाली. लवकर ही वास्तू देखील इतिहासजमा होणार याविषयी खात्री पटली. मल्टिप्लेक्स कितीही उत्तम असली तरी सिंगल स्क्रीनची मजा काही औरच.

शेजारच्या थिएटर इतक्याच जुन्या असलेल्या टपरीवर चहा घेतला. अजूनही तीच चव. अहाहा! ! फार भारी वाटलं.

 स्वतः बरोबर फिरताना चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. मस्त, फ्रेश वाटत होतं. खूप आनंदी होतो.

मन शांत होतं. जे शोधत होतो ते सापडलं. महिन्यातून एकदा स्वतःबरोबर फिरायला जायचच असा निश्चय करून घरी जाण्यासाठी बस पकडली…..

…. खिडकीतून पाहताना नकळत गाणं गुणगुणायला लागलो 

 “सुख म्हणजे नक्की काय असतं.”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझा जयंतदादा… – लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझा जयंतदादा… – लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

नुकतेच ५ एप्रिलला पुण्याहून मुंबईला परतताना वासुदेव (माझे पती) सहज बोलून गेले की ‘जयंतदादां सारखी माणसं ह्यापूढे दुर्मिळ असतील’… मी देखील मानेनं दुजोरा दिला होता…

त्यादिवशी सकाळी आम्ही उभयता केवळ जयंतदादाला भेटायला म्हणून पुण्याला गेलो होतो. खूप गप्पागोष्टी झाल्या. अर्थातच मंगला वहिनीची अनुपस्थिती जाणवत होती पण तसं न दाखवता आम्ही अगदी क्रिकेटसकट विविध विषयांवर बोलत होतो.

जयंतदादानं नवीन लेखनाचे तो तपासत असलेले प्रिंटाऊट वाचायला दिले. माझ्या बाबांबद्दल ‘मोरू परतून आला… ‘ ह्या शीर्षकाखाली प्रेमपूर्वक आदरानं भरभरून लिहिलं होतं.

एका भाच्यानं आपल्या लाडक्या मोरू मामाला दिलेली ती प्रेमाची पावती होती. वाचून मन भरून आलं होतं.

माझे वडिल हे जयंतहून ८वर्षांनी मोठे होते त्यामुळे मामापेक्षा एका मोठ्या भावासारखं त्यांचं सख्यं होतं…

नंतर चहापाणी झाल्यावर आरामात निघालो. पण मन जयंतदादाच्या ‘साधी रहाणी उच्च विचारसरणी ‘ अश्या स्वभावात गुंतलं होतं. वासुदेवांनी योग्य शब्दात विचार मांडले आणि मग परतीच्या प्रवासातल्या आमच्या गप्पा दिवसभराच्या घडामोडींची उजळणी करतं झाल्या…

नंतर आम्ही गेला महिना आमच्या व्यावसायिक कामात व्यस्त होतो.

नवीन प्रकाशित इंग्रजी पुस्तकं पुण्यात प्रत्यक्ष भेटून जयंतदादाला द्यायचं चाललं होतं तोच आज सकाळी माझ्या भाचीचा सईचा फोन आला आणि जयंतदादा आता‌ कधीच भेटणार नाही ह्या कल्पनेनं मन सुन्न झालं…

बातमी पसरली होती. परिचितांचे मेसेजेस, फोन येत होते पण आम्ही उभयतां जयंतदादाच्या सुखद आठवणीत स्वतःला सावरुन घेण्याचा फोल प्रयत्न करत होतो.

डॉ. जयंत नारळीकर हा जगप्रसिद्ध वैज्ञानिक -खगोलशास्त्रज्ञ… माझा‌ जयंतदादा म्हणजे सख्खा‌ आते भाऊ…

महाराष्ट्राचं तसचं भारताचं भूषण‌ असला तरी माझ्या बाबांना ‘माझे मोरूमामा’ असं प्रेमानं संबोधणारा, नंदिनीमामी म्हणून कौतुकानं माझ्या आईच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हक्कानं बोलणारा, कोविडमुळं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही माझ्या पहिल्या पुस्तकासाठी मंगलावहिनीबरोबर कौतुकानं प्रस्तावना लिहिणारा, वासुदेवांबरोबर आवडीनं क्रिकेटच्या गप्पा मारणारा आणि प्राध्यापक म्हणून रुजू झालेल्या चिन्मयचं मनापासून कौतुक करणारा प्रेमळ, मनमिळाऊ असा माझा जयंतदादा!!

लहानपणापासून जयंत जात्याच अतिशय हुशार आणि त्यात आई-वडिल-मामा‌ असं तिहेरी मार्गदर्शन मिळाल्यामुळं संस्कृत, गणित, विज्ञानचं नव्हे तर काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य असे नानाविध संस्कार नकळत घडत गेले होते.

माझ्या वडिलांनी (सुप्रसिद्ध गणिती प्रा. मो. शं हुजूरबाजार) रोज रात्री घरच्या फळ्यावर एक आव्हानात्मक गणित लिहून सकाळपर्यंत जयंतनं ते सोडवून दाखवायचं असा उपक्रम सुरू केला होता. परीणामी जयंतला गणिताची अतिशय गोडी लागली ती कायमची! ! ही गोष्ट सर्वश्रृत आहे…

मोरू मामांनी त्यांच्या डॉ. जयंत नारळीकरसारख्या तोपर्यंत जगप्रसिद्ध झालेल्या खगोलशास्त्रज्ञ भाच्यासाठी सुयोग्य पत्नी म्हणून आपली आवडती सुशिल, अतिशय हुशार पण साधी रहाणी असलेली गणिती विद्यार्थीनी मंगला राजवाडे निवडली होती. मामांची निवड सुयोग्य होती.

जयंतदादा आणि मंगलावहिनी एक परीपूर्ण जोडी होती.

आयुष्यातल्या सहजीवनाचा मनमुराद आस्वाद घेत, एकमेकांचा आदर करत पुढं केंब्रिजहून भारतात परत येऊन दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले होते. गीता, गिरीजा आणि लिलावती ह्या कन्या आज आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वानं नावाजल्या जात आहेत.

माझी आत्या, म्हणजे माझ्या वडिलांची मोठी बहिण, संस्कृत विदुषि सौ. सुमती नारळीकर आणि आतोबा रॅंग्लर विष्णू नारळीकर ह्यांचे सुसंस्कार आज नारळीकरांच्या पुढंच्या चार पिढ्यांत नकळत जाणवताहेत.

१९ जुलै, १९३८ ह्या दिवशी कोल्हापूरात जन्मलेले जयंत विष्णू नारळीकर… वाराणशीत शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवतं इंग्लंडमधल्या केंब्रिजला उच्च शिक्षणासाठी गेले आणि रॅंग्लर जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध झाले.

पुढं खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाले. अगदी लहान वयात त्यांना भारत सरकारनं पद्मभूषण म्हणून सन्मानित केलं होतं.

नंतरही अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळत गेले. विविध विषयावर लेखन करत गेले. त्यांच्या साध्यासोप्या मराठी भाषेतल्या रंजक मराठी विज्ञान कथा वाचत एक पिढी मोठी झाली.

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ असले तरी मराठी भाषेत केलेलं लेखन आजही सगळे आवर्जून वाचतात. सर्वसामान्यांना कळेल अश्या मराठी भाषेतून विज्ञान कथा लिहून त्या महाराष्ट्रातल्या गावांगावांत पोहोचवल्या. इंग्रजी भाषेच्या कुबड्या न घेता शुद्ध मराठीत विज्ञानाच्या विविध विषयांवरील त्यांची भाषणं प्रसिद्ध आहेत. गणित आणि विज्ञान सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नारळीकर दांपत्यानं घेतलेले विशेष परीश्रम हे आजही चर्चेचा विषय आहेत…

दोन वर्षांपूर्वी मंगलावहिनी गेली. आपली सहचारिणी बरोबर नाही हे दु:ख त्यांना मनात जाणवतं असलं तरी‌ त्यावर मात करून कालपरत्वे आता ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. आम्हाला त्यांच्या मनोरंजक खुसखुशीत नेमक्या शब्दात असलेल्या केंब्रिजच्या आठवणी, भारतात येऊन आधी टी. आय. एफ. आर. मधिल आणि नंतर आयुकाची म्हणजेच पुणे येथील सुप्रसिध्द इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सची

उभारणी, त्या काळात आलेले विविध अनुभव वगैरे वाचताना पुढंच्या ब्लॉगची आतुरतेनं वाट पहात असूं…

गेल्या महिन्यात भेटून ह्या सगळ्या गप्पा मारत वेळ छान गेला होता. माझ्या वडिलांनी रचलेली संस्कृत काव्य आणि विडंबनांची पुन्हा एकदा उजळणी झाली होती. आता पुढच्या महिन्यात आमचं नवीन इंग्रजी पुस्तक घेऊन येऊ तेव्हा ही संस्कृत काव्य आणि विडंबनं मी उतरवून घेईन असं म्हणून निरोप घेतला होता. तेव्हा असं वाटलंही नाही की ही‌ शेवटची भेट असेल…

जयंतदादा हा आमच्या पिढीसमोर असलेला आदर्श होता. कितीही यश मिळालं तरी जमिनीत पाय घट्ट रूतवून ‘आकाशाशी जडले नाते’ ही शिकवण देणारा माझा जयंतदादा… तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके डॉ. जयंत नारळीकर आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या खगोलशास्त्र प्रेमाचा वारसा आपल्याजवळ कायम राहील…

भावपूर्ण श्रद्धांजली जयंतदादा.

लेखिका : सुश्री सुधा हुजूरबाजार तुंबे

मुंबई

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पण लवकरच उजाडेल… – लेखक / कवी : श्री सुधीर फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ पण लवकरच उजाडेल… – लेखक / कवी : श्री सुधीर फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

एकटेपणाची भिती नाही…पण

माणूस इतका, ’असहाय्य’, पूर्वी कधीच नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

कधीकाळी, वाल्याचा वाल्मिकी झाला होता…

अंगुलीमालही, बुद्धाला शरण गेला होता…

दुराचारालाही संकोच वाटावा,

इतका ‘भ्रष्टाचार’ पूर्वी कधीच नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

गर्वाचे घर कधीतरी खाली व्हायचे…

‘सम्राट’, संतापुढे, नतमस्तकही व्हायचे…

अहंगडानेही अपमानीत व्हावे,

इतका ‘उन्मत्तपणा’ पूर्वी कधी नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

चाणक्याने शेंडीला गाठ मारली होती…

सामान्यांनी जगात क्रांती केली होती…

स्वाभिमानास गहाण टाकेल,

समाज इतका ‘दीन’ पूर्वी कधी नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

माणूस माणसातला ‘माणूस’ बघत होता…

आपलं म्हणून परक्यावर प्रेम करत होता…

माणुसकीलाच तिलांजली देईल,

माणूस इतका ‘हीन’ पूर्वी कधी नव्हता…

काळोखालाही भय वाटावे,

एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…

*

पण लवकरच उजाडेल…

लख्ख प्रकाश पसरेल…

असहाय्यता संपेल…

समाज जागृत होईल…

दारिद्र्य, अहंकार मिटेल…

स्वाभिमानाने जगता येईल…

माणूस ‘माणूसकीला जपेल…

ह्या आशेवर मी जगणार आहे…

लेखक / कवी : श्री सुधीर फाटक 

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares