श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “झेपावे उत्तरेकडे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
काळ्या नभांनी दाटून आलेल्या डोईवरच्या आभाळाने झाकोळलेला सगळा परिसर… नुकतीच मान्सूनची सुरवात झालेली… दोन चार मृगाच्या मोठ्या सरींनी पाणी पाजून तरतरीत आणि टवटवीत झालेली वृक्षराजी.. वैशाखातल्या वणव्याने भाजून निघालेल्या मातीवर मृगाच्या सरी पडल्या तेंव्हा तो बाहेर पडलेला मृदगंध…आपल्या अबोल प्रफ्फुलीत मनातला ‘किती सांगु कुणाला आज आनंदी आनंद झाला ‘ ही भावना झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासोबत गावभर पसरत गेला.. दरवर्षी चातकासारखी वाट पाहणाऱ्या समुहाने राहणारा माणसांचा समाज चला यंदाचा पावसाळा समाधान कारक दिसतोय बरं.. पिकपाण्याचं अवंदा काही अरिष्ट यायचं नाही…अशी खोल कुठेतरी रूतलेली मरण चिंता या वर्षाला सतवाणार नाही…असे ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर आशेचे गेंद फुलाचे डवरलेले दिसू लागले होते… बळीराजा सुखावला तर होताच भुईत पेरलेल्या बीजाला कोवळा अंकूर पालवलेला बघून त्याच्य अंगावर देखील आता पुढच्या ढोर मेहनतीकरिता मुठभर मांस चढवून सज्ज झालेलं… अन मालक तुम्ही एकलचं का बरं आम्ही बी हावं की तुमच्याबरूबर रानात खपायला असं माना डोलवत आपल्या शिंगावरील गोंडे एका लयीत डोलवत बैलं..ढोरं निघतात.. विहिरीला,नदीला आणि ओढ्याला मायंदाळ पाणी असल्यावर..सोळा आणे नसलं तरी बारा आणे पिकलेलं धान्याने आता कणगी तट्ट भरणारच… मग खुळखुळणाऱ्या पैशावर बॅंकेचं हप्तं,सावकाराचं कर्जावरचं व्याज, दिवाळसणाला घरच्यांना नवंकोरी धडुती, लुगडी… बरीच वर्षे बायकोच्या मनात रुतून बसलेला ठुशीचा डाग.. आणि आणि जमलं तर पहिल्या पोरीच्या लग्नाचा उडवून द्यावा बार.. म्हणजे हा डोक्यावरचा भार सगळा एकदम उतरला गेल्यावर थोडसं जीवाला हायसं होईल…दसरा बी गोड अन पाडवा बी…आता यंदा काही माघाची वारी चुकवयायची नाही म्हणजे नाहीच…
हे आशेचं इंद्रधनुष्य मना मनाला भुरळ घालत राहू लागलं….साकार न झालेल्या स्वप्नांची सप्तरंगी चित्र डोळ्यासमोर नाचू लागतात… कल्पनेची उड्डाणं क्षितिजाला भिडताना दिसतात… दंग असतानाच अचानक लहरी निर्सग सुरुंग लावतो आणि आणि सगळी पाहिलेली सगळी स्वप्नं भंग करून जातो… काळे कुट्ट जमलेले ढग आपलं कपाळ पांढरं झालेलं दाखवतात.. तो इंद्रधनुष्याचा पट्टा आक्रसत आक्रसत जाऊन पाहता पाहता लुप्त होतो…. पावसाचा पत्ताच हरवतो… टळटळीत सूर्य तळपळत राहतो आणि काळ्या मातीला भेगाळून टाकतो… पाण्याची ओल आता फक्त ज्याच्या त्याच्या डोळ्यात दिसते… तेव्हढचं पाणी शिल्लक राहतं… गावा गावाचा फुफाटा होऊ लागतो हळूहळू मसणवाटा्याची कळा येऊ लागते.. राजकर्त्याचा आश्वासनांचा निवडूंग उजाड नि बोडक्या माळरानावर दगडांच्या कपारीत तोंड लपवून दडलेला असतो… गोठ्यातली दावणं बाजारात विकली गेलेली गुरांची माघारी परत येण्याच्या आशेने डोळे लावून बसतात…. चुलीतला कोरडा जाळ पोटातील भुकेचा वडवानल चेतवत राहतो..घरात खाणारी तोंड भुकेने तडफडतात आणि घरच्या धन्याच्या हृदयाला पीळ पाडत राहतात…घरचा धनी मात्र घराच्या अंगणात उभा राहून वर आभाळाकडे डोळे किलकिले करत अंदाज घेत राहतो.. कुठे एखादे आशेचं इंद्रधनुष्य नजरेला पडतयं का पाहतो… तोच एखादी आभासी सप्तरंगी शलाका त्याला खुणावून सांगते… झेपावे उत्तरेकडे..
#
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





















