मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ९ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ९. ☆ प्रा.भारती जोगी ☆

झलकारी बाई 

सन १८५७… स्वातंत्र्य समर पेटलेलं… ब्रिटिश जनरल ह्यू रोज ने संधी साधून झाशी वर आक्रमण केले. राणी लक्ष्मीबाईंच्या किल्ल्याला वेढा घातला, सैनिक किल्यात शिरण्याच्या प्रयत्नात… राणी विचारात पडलीये, तात्या टोपे पराजित झाल्यामुळे, पेशव्यांकडून मिळणा-या मदतीची आशा ही मावळली होती. अशा वेळी *ती* पुढे येते… म्हणते…

” राणी साहेब, तुम्ही लहानग्या दामोदर रावांना घेऊन किल्ल्याच्या मागच्या बाजूने निघून जा. मी बघून घेईन इंग्रजांना! “

राणी लक्ष्मीबाईंना हा प्रस्ताव मंजूर नसावा. कारण त्यांना ठाऊक आहे की, ती समर यज्ञात समर्पित व्हायला निघालेली आहे. त्यांना असं सगळ्यांना संकटात सोडून जाणं रूचेना! राणी सद्गदित होऊन म्हणाली, ” झलकारी, अगं तू सावली, छाया ना माझी! मग सावली देहापासून दूर कशी गं होणार”? राणी जागची हालत नाही असं बघून ती पुन:पुन्हा झाशीच्या आणि दामोदर च्या भविष्याची ग्वाही देते, विनवते आणि राणीला निघून जायला भाग पाडते. अगदी बाजीप्रभू चा तोच बाणेदारपणा दिसला तिच्या शब्दांत… लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा जगो!  

राणी जड अंत:करणाने ती चा निरोप घेते… उराउरी भेटते… जणू… तिच्या उरातलं देभक्तीचं आणि झाशीच्या जबाबदारीचं स्फुल्लिंग ; थेट चेतवून, प्रज्वलित करणारी चेतना ते हृदयीचे ये हृदयी घालते… जणू झाशीच्या जबाबदारी चं पदच तिला बहाल करून, घोड्यावर स्वार होऊन, दामोदर ला पाठीशी बांधून निघून जाते…

कोण होती ती? जिच्या हाती झाशी सोपवून जाण्याइतका विश्वास, खात्री कमावलेली…

ती… झाशीच्या राणीच्या खांद्याला खांदा लावून लढलेली, तिच्या बरोबर सावली सारखी राहून, अगदी सर्वार्थाने तिची सावली झालेली, तिची प्रतिच्छाया, तिचंच प्रतिबिंब वाटावं, इतकी, अगदी तिचीच झलक… झलकारीबाई!!

झाशीच्या इतिहासाच्या मोठ्या पुस्तकातील एका छोट्याशा ओळीतलं, छोटंसं नाव! ऐतिहासिक दस्तावेजांच्या चळतीच्या थरांखाली दडलेलं… दबून गेलेलं… दाबलं गेलेलं नाव! पण तिच्या संपूर्ण कर्तृत्वावर दृष्टी टाकली तर लक्षात येतं ते…

तिच्या सावली चं मोठेपण! आणि आपसूकच मुखातून निघतं…

तिची मोठी सावली!!!

झलकारीबाई… बुंदेलखंड मधील भोजला गावच्या, कोळी समाजातील सदोवरसिंग आणि जमुना देवी या दांपत्याच्या घरी, २२ नोव्हेंबर १८३० या दिवशी जन्माला आलेली ही कन्या! एका निर्धन घरात, संघर्ष आणि कष्टमय जीवन असलेलं तिचं बालपण! तिच्या दुर्दैवाने त झलकारी दोन वर्षांची असताना, तिची आई तिला सोडून गेली. आईची मायेची पाखर गेली तिच्या माथ्यावरची!

पण तिच्या पित्याने तिच्या या दु:खाला तिच्या कमकुवतपणात परिणत न होऊ देता, तिची ताकद बनवलं! दु:खावेगाला प्रवेगाची दिशा दिली. तिला मुलासारखी वाढवली. तिच्या हातात बांगड्या नाही तर घोड्याचा लगाम दिला. तिला युद्ध कौशल्य शिकवून पारंगत केले. घोडेस्वारी, तिरंदाजी, तलवारबाजी, शिकवली. याचाच परिणाम म्हणून झलकारी एक साहसी, निडर, आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी घडत गेली… घडली. तिचं बालपण म्हणजे साहसकथाच! १० वर्षांची असतांना, एकदा जंगलात नेहमीसारखीच लाकडे तोडायला गेली असतांना, एका वाघाने तिच्यावर हल्ला केला, तर हीने आपल्या कु-हाडीने त्याला ठार मारले. गावात ही वार्ता पोचली, गावक-यांनी तिला दुर्गा  देवीचा अवतार म्हणून गौरवले.

हे साहस कमी होतं म्हणून की काय… एकदा गावात आलेल्या डाकूंना ही मोठ्या हिंमतीने, एखाद्या विरांगनेसारखं, पळता भुई थोडी केलं!

यथावकाश झलकारी चा विवाह तिच्या योग्य अशाच… झाशीच्या राणीच्या सैन्यातील आणि तोफ चालविणा-या शूर वीराशी.. पूरण कोळी शी होतो. आणि झलकारी झाशीत येते. हाच तो क्षण असावा जो एक स्फुल्लिंग ठरला, एक समिधा चेतविणारा!!

बालपणी मातीचा किल्ला बनवण्यात रममाण होणारी झलकारी एक दिवस झाशीच्या किल्ल्यात प्रवेशते. राणी लक्ष्मीबाईंची दृष्टी तिच्या वर पडते आणि राणी… आश्चर्याने बघतंच रहाते… अगदी असाच प्रसंग…

उटूनि दोन्ही आरिसे | वोडविलिया सरिसे |

कोण कोणा पाहातसे | कल्पावे पां?

राणी आपलंच प्रतिबिंब, हुबेहूब डोळ्यासमोर बघून स्तंभित झाली. चौकशी केल्यावर पूरण कडून तिच्या साहसकथा, युद्ध कौशल्यात तरबेज असणं, घोडेस्वारी, तलवारबाजी, तिरंदाजी… सगळंच कळलं. राणीने झलकारी ला आपल्या दुर्गादला ची सेनापती बनवलं. भोजला गावातील दुर्गावतार सेनापती च्या वेषात अवतरणं हा निव्वळ योगायोग नसावाच! काहीतरी संकेत असावा तो विधिलिखिताचा! राणी लक्ष्मीबाई ने त्या काळात, जात पात न बघता, एक क्रांतीकारी पाऊल उचललं आणि…

गावाकडच्या चुलीतल्या ज्वाळांना, क्रांतीच्या ज्वाळांचं रूप दिलं!! जंगलातून लाकडे तोडून आणणा-या झलकारी लाच जणू राणीने चंदनाची समिधा म्हणून आपल्या जवळ ठेवून घेतली.

हीच ती सांभाळलेली समिधा झलकारीबाई!! हीनेच राणीचं प्रतिबिंब असण्याचा, राणी सारखं दिसण्याचा फायदा घेण्याचा निर्णय घेऊनच, राणीला किल्ल्यातून सुखरूप बाहेर काढले. आणि…

उभी ठाकली थेट जनरल ह्यू रोज समोर भेटीला!

सैनिकाने विचारले, ” कोण तू? “

झलकारी ने उत्तर दिले,…

मी राणी लक्ष्मीबाई!!

ऐकताच, सैनिकांनी घेरले तिला, सगळीकडे राणी पकडली गेल्याची वार्ता पसरली. झलकारी ह्यू रोज समोर उभी… त्याने विचारले, ” कोण आहेस तू? ” झलकारी ने पुन्हा तेच उत्तर दिले खड्या आवाजात… मी राणी लक्ष्मीबाई!! राणी जोपर्यंत सुखरूप सुरक्षित जागी पोहोचत नाही तोपर्यंत यांना गुंतवून ठेवायचा तिचा विचार. पण तेवढ्यात एका फितुराने ती राणी नसल्याचे सांगितले. जनरल च्या आपण फसविले गेलो हे लक्षात आले, संताप झाला खूप. कारण रणनीतीत ली चलाखी असलेला अधिकारी होता तो! पण एका स्त्रीने त्याच्या डोळ्यात जणू धूळ फेकली आणि राणी सुरक्षित जागी पोचली.

असं म्हणतात की ह्यू रोज ने तिला विचारले की, ” तुझ्या बाबतीत मी काय निर्णय घ्यावा असं तूला वाटतं? “

त्यावर झलकारी उत्तरली, ” तुम्ही हवं तर मला फाशी देऊ शकता. मला काहीच भिती नाही. कारण, जीव जायची भीती त्यांना असते, ज्यांचा जीव त्यांच्या देहात असतो. माझा जीव तर झाशीत आहे. मग मला तो जाण्याची मला भीतीच नाही ना! “

असं म्हणतात की झलकारी ला सोडून देण्यात आलं. कारण त्यांना झाशी आणि झाशीची राणी याचा कब्जा हवा होता.

झलकारी झाशी च्या दिशेने परतताना समरांगणावरील शवांत तिला आपल्या पतीचे… पूरण चे शव दिसले. त्याच्या शवाजवळ बसली, आणि वदली, “पूरण, तू माझ्या पेक्षा मोठ्या भाग्यशाली ठरलास रे! झाशी साठी माझ्या आधी जीव अर्पण केलास!… बस्स्… आवरला तिने शोक आणि जख्मी वाघिणी सारखी तुटून पडली अत्यधिक त्वेषाने!! तिच्या त्या दुर्गावताराचं वर्णन कवींनी केलयं…

“जाकर रण में ललकारी थी,

वह तो झांसी की झलकारी थी!

 झलकारी की झलक देखकर

 वो बूंदेले भी हां गये,…

 जब उतरी वे समर भूमी में,

 गोरे भी थरथर कांप गये!

 रानी झांसी को बचा गयी,

 ऐसी सन्नारी थी झलकारी!

फिर लौट के घर ना आई,

ऐसी नारी थी झलकारी!!

अशी ही झलकारी बाई! … दाखवून दिलं, सिद्ध केलं तिने की, खरी वीरता महालांत नसते तर ती रोमा-रोमात सळसळणा-या रक्तातल्या देशभक्तीच्या चैतन्यात असते. राणी सारखी दिसत होती, राणी तिच्यावर झाशी चं राज्य सोपवून गेली, पण तिला राज्य आणि राणी पदाचा मोह नाहीच झाला, तिचं खरं प्रेम होतं ते… झाशीच्या भूमीवर, मातीवर!! इस मिट्टी में मिल जांवां… हेच वेड लागलं होतं तिला!! तिच्या साठी ताज नाही तर त्याग महत्वाचा होता. ती राणीची सल्लागार, महत्वपूर्ण निर्णयांची भागीदार बनली. युद्धाच्या कठीण प्रसंगी… धैर्य आणि शौर्य यांचा योग्य समन्वय साधत ती ढाल बनली राणी लक्ष्मीबाई ची! जौहार करणा- या स्त्रियांना आत्मरक्षणासाठी लढण्याचे बळ दिले. स्वातंत्र्याचा अलख जागवण्यासाठी तिने राणीचं वाचणं महत्त्वाचे मानले.

पण झलकारीबाई चं दुर्दैव बघा… तिच्या नावाचा कुठेतरी फक्त छोटासा उल्लेख मिळतो, जो दिसून ही न दिसल्या सारखाच! नगण्य! दुर्लक्षित! उपेक्षित!! जिचं साहस बघून जनरल ह्यू रोज नी सुद्धा तसं पाहिलं तर… गौरवोद्गार च काढले होते की,

 ” भारतातील १% महिला जरी हिच्या सारख्या बनल्या तर इंग्रजांना भारत सोडून जाव लागेल.! “

असं असूनही आपल्याला मात्र या समिधेचं समर्पण दिसलं नाही.

आता- आता कुठे तिच्या समरपणाचं तेज, त्याची आच, सामाजिक धग, जाणवल्या मुळे असेल… पण २००१ मध्ये सरकारने पोस्टाचे एक तिकीट झलकारीबाई च्या नावाने काढलं.

अशी ही झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई ची प्रतिछाया, झाशीची सावली झाली, तिची कहाणी एक प्रेरणा आहे! एक चैतन्य शलाका आहे जी समिधा बनून समर्पित झाली.

 झलकारीबाई एक ज्वाला होती, धगधगती!!

नाही मिळाली तिला जागा, ऐतिहासिक दस्तऐवजांत, कुठल्या पाठ्यपुस्तकात… पण ती आजही लोकगीते, लोककथा आणि बुंदेलखंड च्या लोक हृदयात अढळ पदावर विराजमान झालेली आहे हे ही नसे थोडके!!!

– लेख क्र. ९ .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वप्नं आणि जिद्द ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वप्नं आणि जिद्द ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

ईश्वरी पांडे 

६ एप्रिल २०२६, पहाटे ४ वाजताचा सुमार, श्रीलंकेतील तलईमन्नारजवळचा समुद्र. आजूबाजूच्या गावातले बहुतेक सगळेजण गाढ झोपेत होते. पण नागपूरची १७ वर्षांची ईश्वरी पांडे पूर्ण तयारीनिशी तिथल्या उरमलाई पॉइंटवर उभी होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पाक सामुद्रधुनीत (Palke Strait) उतरली.

सभोवताली फेसाळणाऱ्या लाटा तिला दिसत नव्हत्या, त्या तिला फक्त जाणवत होत्या. कारण ती जन्मापासून अंध आहे.

पुढील ११ तास आणि १५ मिनिटे ईश्वरीने जगातील सर्वात किचकट, क्लिष्ट आणि बेभरवशाच्या समुद्री पट्ट्यांपैकी एकामधून पोहत प्रवास केला.

समुद्री प्रवाह तिला मार्गापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करत होते, जेलीफिश तिच्या शरीराला स्पर्श करत होते, मुसळधार पाऊस कोसळत होता. पण ती एकाग्रतेने पोहत होती. सोबतच्या बोटीमधून तिचे प्रशिक्षक संजय बटवे लाऊडस्पीकरवरून तिला सतत सूचना देत होते — “डावीकडे, थोडं डावीकडे… स्थिर राहा… तू छान करते आहेस! ”

संजयसरांशिवाय भावी राजगीरे, ईशांत पांडे, संदीप वैद्य, निरव आणि डॉ. अभय राजगीरे हे तिचे सहकारी, कधी पोहत तर कधी होडीतून, तिच्या दोन्ही बाजूंनी तिला साथ देत होते.

दुपारी ३ च्या सुमारास भारतातील धनुषकोडीचा किनारा दिसू लागला. आणि ३:१५ च्या सुमारास जेव्हा तिचे पाय अरिचलमुनईच्या (धनुषकोडी) वाळूत टेकले, तेव्हा ईश्वरीने २९ किलोमीटर अंतर पार करून इतिहास घडवला होता.

पाक सामुद्रधुनी पार करणारी ती जगातील पहिली पूर्णपणे अंध व्यक्ती ठरली.

नागपूरमध्ये तिचे आई-वडील कमलेश आणि अरुणा यांना आपल्या मुलीचा हट्टी आणि जिद्दी स्वभाव चांगलाच माहिती होता. लहानपणी ती पोहायला शिकली, पोहणे सोपे होते म्हणून नव्हे, तर अंधत्वामुळे आपल्याला मर्यादा याव्यात हे तिला मुळी मान्यच नव्हते म्हणून.

२०२४ साली तिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हा १७ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला होता. पण पाक सामुद्रधुनी वेगळीच होती — शार्क, डॉल्फिन्स आणि सतत बदलणारे समुद्री प्रवाह, अनेक दृष्टी असलेल्या पोहणाऱ्यांनाही यांनी नमविले आहे.

धनुषकोडीहून ती जेव्हा नागपूरला परतली, तेव्हा फिटनेसप्रेमी, ज्येष्ठ जलतरणपटू, नातेवाईक आणि उत्साही नागापूरकर नागपूर रेल्वे स्थानकावर जमले होते. ईश्वरीचे जल्लोषात स्वागत झालं, तिची खुल्या जीपमधून मिरवणूक निघाली. मेडिकल कॉलेज चौकात, ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे, रंग आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तिचे स्वागत केले. अंतिम टप्प्यात अश्वारूढ होऊन तिने मानवंदना स्वीकारली.

तिला गर्दी दिसत नव्हती. पण ती आवाज ओळखत होती, त्यांची नावे घेत होती.

आता तिचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदले गेले आहे. पण ईश्वरी इथे थांबणारी नाही. तिचे लक्ष्य आता आंतरराष्ट्रीय पॅरा (दिव्यांग) जलतरण स्पर्धांकडे आहे.

तिनं दाखवून दिलंय, स्वप्नं नुसती डोळ्यांनी बघायची नसतात, तर ती जिद्दीने साध्य करायची असतात.

ईश्वरीचे अभिनंदन आणि तिला शुभेच्छा!

 

माहिती संग्राहक / लेखक : श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका अजब चोरीची गोष्ट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एका अजब चोरीची गोष्ट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

संगीत आणि देवामुळे चोरी सोडून दिलेल्या चोराच्या अजब चोरीची गोष्ट…!

बर्‍याच वर्षांपूर्वी ‘झाला महार पंढरीनाथ’ नावाच्या चित्रपटाचे एक गीत ग. दि. माडगूळकरांनी लिहिले होते. त्या गीताच्या काही ओळी आजही लोकप्रिय आहेत.

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई?

आजच्या कथेत याच ओळी पुन:पुन्हा आठवतील. आम्ही अशा एका चोराची कथा सांगणार आहोत, जो देवाची चोरी करू शकला नाही. फक्त ही कथा भारतात घडलेली नसून, बर्‍याच वर्षांपूर्वी अमेरिकेत घडली आहे.

१९५१ सालच्या एका संध्याकाळची गोष्ट. न्यूयॉर्क शहराच्या १० व्या रस्त्याच्या मागे असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक हाडकुळा तरुण त्याच्या कामाची तयारी करत होता. बाहेर पडलेल्या अंधाराचा अंदाज घेऊन त्याने टेबलवर ठेवलेली एक पातळ छिन्नी खिशात घातली. हा जिम लेसी नावाचा मुलगा चोर होता. चोरांच्याही अनेक जाती असतात. काही दुकानांत, तर काही बंद घरात घुसून चोर्‍या करतात. चोरांची ज्याची त्याची एक स्पेशालिटी असते. हा चोर पार्कींगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांचा दरवाजा उघडून चोर्‍या करण्यात तरबेज होता.

चालत चालत तो ५७ व्या रस्त्यावर पोहोचला, तेव्हा त्याला हवे ते नजरेस पडले. एका माणसाने घाईघाईत गाडी पार्क केली. गाडीच्या मागच्या सीटवर दोन बॅगा होत्या. गाडीवाला फारच घाईत असावा. त्याच्या कपड्यांकडे आणि हेअर स्टाईलकडे बघून चोराची खात्री पटली की, या इसमाच्या बॅगात नक्कीच भरपूर माल असणार. गाडीच्या दरवाजात छिन्नी अडकवून बॅगा चोरायला त्याला जेमतेम दोन तीन मिनिटं लागली. दोन सूटकेस हातात घेऊन तो पसार झाला. त्याचा आजचा कोटा पूर्ण झाला होता.

दहा मिनिटांनी काम आटपून गाडीचा मालक परत आला आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला. त्याने पोलीसांना फोन केला. काही मिनिटांतच चार पोलीस हजर झाले. “माझ्या दोन बॅगा चोरीला गेल्या आहेत. बॅगांमध्ये असलेलं बाकी काही नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्या ऑर्केस्ट्राच्या येत्या कार्यक्रमाचे म्युझिक चार्ट मी बनवून ठेवलेत. ते काही झालं तरी मला मिळवून द्या. ” त्याने पोलीसांना हात जोडून विनंती केली. गाडीचा मालक एका नामांकित ऑर्केस्ट्राचा म्युझिक कंडक्टर *आल्फान्सो डी’आर्टेगन* होता. चार दिवसांनी त्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कजवळच्या बफेलो शहरातल्या एका चर्चमध्ये होणार होता. हरवलेले चार्ट पुन्हा लिहिणे केवळ अशक्य होते. “त्या चार्टमध्ये माझे अ‍ॅव्हा मारीया आणि एक स्पेशल गाणे आहे, जे मला सापडायलाच हवेय हो. ” त्याने पुन्हा कळवळून विनंती केली. पोलीसांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केली.

आल्फान्सो डी’आर्टेगन आणि पोलीस यांच्यात चर्चा चालू असतानाच चोर आपल्या घरी सुखरुप पोहचला होता. त्या मोठ्या सूटकेसमध्ये काय काय माल मिळेल याची चोराला उत्सुकता होती. त्यानी घाईघाईने सूटकेस उघडल्या. एका सूटकेसमध्ये महागडे सूट होते आणि दुसरी सूटकेस उघडल्यावर चोराने मनातल्या मनात नशिबाला शिव्या घातल्या. त्यात फक्त म्युझिक चार्टचे कागदांचे गठ्ठे होते. रागाच्या भरात त्याने कागदाच्या चळती फेकल्या. महागडे सूट घेऊन तो चोरीचा माल गहाण ठेवणार्‍या सावकाराकडे पोहचला. सात सूटांच्या पावत्या देऊन सावकाराने त्याच्या हातावर १४० डॉलर टेकवल्यावर त्याचा मूड बराचसा सुधारला होता. घरी पोहोचल्यावर अस्ताव्यस्त पसरलेले कागद त्याने एका थैलीत भरायला सुरुवात केली. अचानक एका कागदावर त्याला त्याच्या ओळखीच्या अ‍ॅव्हा मारीयाच्या ओळी दिसल्या. एका क्षणात त्याचे मन चर्चमध्ये पोहचले. पियानोचे सूर मनात गुंजायला सुरुवात झाली. त्याने तो कागद बाजूला ठेवला आणि त्याला जोडलेला दुसरा कागद वाचला. त्यावर एका प्रार्थनेच्या चार ओळी होत्या.

Everyone must have a friend

To tell his troubles to;

And I found mine, O dearest Lord, 

My truest friend is you!

या चार ओळी वाचल्यावर त्या चोराच्या मनात काय भावना निर्माण झाल्या कुणास ठाऊक, पण त्याने ती दोन्ही पाने स्वतःकडे ठेवून दिली. बाकीचे कागद थैलीत भरायला सुरुवात केल्यावर अचानक त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक? त्याने संगीत दिग्दर्शकाचं नाव वाचलं. आल्फान्सो डी’आर्टेगा. एका कागदावर ते टिपून ठेवले आणि सगळे कागद घेऊन तो बाहेर पडला. अर्ध्या तासाने तो परत आला, तेव्हा त्याला थोडं बरं वाटत होतं. गाडी ज्या ठिकाणी पार्क केलेली होती, त्याच ठिकाणी थैली सोडून तो परत आला होता. रात्री बराच वेळ तो त्याच विचारात गुंगलेला होता. त्याला कल्पना नव्हती, पण त्याने रस्त्यावर फेकलेल्या कागदांमुळे आणखी एक आयुष्य बदलण्याची वेळ कहाणी सुरु झाली होती.

दुसर्‍या दिवशी सकाळी पार्किंग लॉटच्या समोर असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहणार्‍या बाई बाहेर पडल्या. त्यांना वाटेत दुसर्‍या एक बाई भेटल्या आणि म्हणाल्या, “समोरच्या फूटपाथवर एका थैलीत कितीतरी म्युझिक चार्ट पडलेत बघ. तुझा मुलगा पियानो शिकतोय ना? त्याला उपयोगी येतील.”

त्या बाई लगबगीने गेल्या आणि त्यांनी ती थैली घरी आणली. दुपारपर्यंत डी’आर्टेगाच्या गाडीतल्या सामानाच्या चोरीची बातमी टीव्हीवर झळकत होती. सोबत डी’आर्टेगाचे चोराला उद्देशून एक आवाहन होते. “मी तुला माफ केलेच आहे, पण प्लीज माझे चार्ट माझ्यापर्यंत पोहोचव. मला कार्यक्रमासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. ” त्या बाई म्हणजे मिसेस ब्रेन यांनी ताबडतोब पोलीसांना फोन केला. थोड्याच वेळात डी’आर्टेगा कागद घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. कागदाची थैली घेता घेता त्याचे लक्ष पियानोकडे गेले आणि साहजिक प्रश्न त्याने विचारला “तुमच्या घरी पियानो कोण वाजवतं?”

“माझे पती पियानोवादक आणि म्युझिक अ‍ॅरेंजर होते. ते गेल्यावर आता माझा मुलगा पियानो शिकतोय.”

मिसेस ब्रेन यांनी डी’आर्टेगाला त्यांच्या पतीच्या काही रचना दाखवल्या. त्यामध्ये एक रचना होती – ‘SOS ‘Save Our Souls. 

एका रात्रीत घडलेल्या प्रसंगांनी भारावून गेलेल्या डी’आर्टेगा मिसेस ब्रेन यांना म्हणाला, “ही रचना मी माझ्या कार्यक्रमात सादर करतो. तुम्ही आणि मुलगा त्या कार्यक्रमाला माझ्या सोबतच चला. “

चार दिवसांनंतर त्या कार्यक्रमात त्याने ती रचना सादर केल्यावर मिसेस ब्रेनना अश्रू अनावर झाले. दुसर्‍या दिवशी त्यांचा फोटो आणि कार्यक्रमाची माहिती चोराने वर्तमानपत्रात वाचली आणि चार दिवस ज्या विचाराने तो अस्वस्थ झाला होता, तो विचार त्याने पक्का केला.

****

नंतरच्या काहीच दिवसांत डी’आर्टेगाच्या पत्त्यावर पोस्टाने एक पाकीट आले. त्यात गहाणवटीच्या सात पावत्या होत्या. सोबत चोराने लिहिलेली एक चिठ्ठी होती.

“महोदय, तुमच्या सुटकेस चोरणारा मी चोर आहे. तुमचे कपडे मी ज्या पॉन ब्रोकरकडे ठेवले आहेत, त्याच्या या पावत्या आहेत. ते कपडे मी सोडवून घेईन अशी माझी आता परिस्थिती नाही, कारण ही मी केलेली शेवटची चोरी होती. तुमच्या चार्टमधील जी अ‍ॅव्हा मारिया आणि आणखी एका कवितेची पानं होती, त्यांनी माझे आयुष्य बदलले आहे. आता मी काम करून पोट भरतो. चोर्‍या करत नाही. ही प्रेरणा मला तुमच्या रचनांतून मिळाली आहे. पण तुमच्या समोर येण्याचे धैर्य माझ्यात नाही किंवा चर्चमध्ये कन्फेशन देण्याचेही धैर्य आता माझ्यात नाही. ज्या दिवशी तो धीर माझ्यात निर्माण होईल, तेव्हा मी तुम्हाला भेटेन. ” – (जे. एल.)

या घटनेला तीन वर्षं उलटून गेली. डी’आर्टेगा ज्या चर्चचा सभासद होता, त्या सेंट अँथनी चर्चमध्ये एक मुलगा आपल्याकडे रोज बघतो आहे हे त्याच्या कधीच लक्षात आले नाही. डी’आर्टेगा पण न विसरता त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात न विसरता ‘SOS ‘Save Our Souls ही रचना सादर करत असे. अशाच एका कार्यक्रमानंतर एक दिवस चर्चमध्ये एका तरुणाने त्याला ‘भेटायचे आहे’ असे म्हटले. दोघं बोलत बाहेरच्या कॅफेत पोहोचले तेव्हा त्या तरुणाने खिशातून १४० डॉलर काढून डी’आर्टेगाच्या हातात ठेवले आणि म्हणाला, ” मीच तो चोर, ज्याचे आयुष्य तुमच्यामुळे बदलले. आता तुम्ही मला पोलीसांच्या हवाली केले तरी माझी तयारी आहे. “

डी’आर्टेगाने त्यावर उत्तर दिले, “पोलीसांच्या नव्हे, तर मी आता तुला देवाच्या आधीन करतो आहे. चल आपण एकत्र प्रार्थना करू या. “

ती प्रार्थना होती…

Everyone must have a friend

To tell his troubles to ;

And I found mine, O dearest Lord,

My truest friend is you!

… वाचकहो, देवावर विश्वास असणे-नसणे हा तुमच्या श्रध्देचा भाग आहे. पण ही सत्यकथा वाचल्यावर गदिमांच्या या ओळी तुम्हाला नक्कीच आठवतील.

… ” देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई? ” 

*******

– – – आपल्या प्रत्येक भावनांची एक स्वतंत्र भूमिती असते, हे वास्तव आपण कधी मान्य करणार?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५३ आणि ५४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५३ आणि ५४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५३ – – 

सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी ।

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी |

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५३||

अर्थ : नेहमी नम्रतेने बोलणारा आणि आपल्या मधुर वाणीने लोकांना आपलेसे करणारा, सत्यवचनी आणि विवेकी असणारा, त्याचप्रमाणे कधीही वायफळ आणि असत्य न बोलणारा असा जो परमेश्वराचा भक्त असतो तो जगामध्ये खरोखरच धन्य होय.

(आर्जवी – नम्र, मिथ्य वाचा – खोटे बोलणे, त्रिवाचा – त्रिवार /निश्चित / ठामपणे. परंतु येथे बोलण्यात एकवाक्यता नसलेला असा अर्थ घेता येतो)

विवेचन : भक्ताने कसे असावे ते या श्लोकातही समर्थ सांगत आहेत. त्याचे बोलणे आर्जवी असते. आर्जवी म्हणजे नम्र. आर्जवी म्हणजे लाचार नव्हे. ज्याला (ईश्वराचे) ज्ञान झाले आहे असा भक्त आपोआपच नम्र होतो. फळांनी लगडलेले झाड जसे झुकलेले दिसते त्याप्रमाणे खरा ज्ञानी, विद्वान आणि भगवंताचा भक्त नम्र असतो. ही नम्रता त्याला कोठून उसनी आणावी लागत नाही. ती त्याच्या आतूनच उत्स्फूर्तपणे येते.

समर्थांना मधुर बोलणे अतिशय प्रिय आहे. दासबोधामध्ये ते म्हणतात,

पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते|

तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्ये ||

आपण जसे बोलू तसे उत्तर समोरून मिळेल. मग विनाकारण दुसऱ्याला लागेल असे बोलण्यात काय अर्थ? काही लोक बोलण्यात अत्यंत फटकळ असतात. आपल्या बोलण्याने लोकांची मने दुखावतात. अशी माणसे अप्रिय होतात. मग भलेही ती स्वतःला स्पष्टवक्ता म्हणवून घेतात. परंतु त्यांचा स्पष्टवक्तेपणा इतरांना जखम करणारा असतो. आपण गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचली असतील तर त्यातील भाषा किंवा कधी के वि बेलसरे यांचे निरूपण ऐकले असेल तर त्यांचे बोलणे किती नम्र आणि मधुर होते याचा प्रत्यय आपल्याला येतो. हीच खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत.  

“सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात. ” गोडही बोलायचे आणि सत्यही बोलायचे ही तारेवरची कसरत असते. परंतु दुसऱ्याला न दुखवता देखील सत्य सांगता येते. असा भक्त समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा म्हणजे नेहमी सत्य बोलतो. परंतु या सत्य बोलण्यात विवेकाचा वापर तो करतो. एखाद्या अत्यवस्थ किंवा शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या रुग्णाला जर आपण भेटायला गेलो आणि त्याला म्हटले की आता ही तुझी शेवटची अवस्था आहे. त्यातून तू बरा होणार नाहीस. असे बोलणे सत्य जरी असले तरी ते अविवेकाचे आहे. म्हणून अशा वेळी विवेकाचा वापर करून, ” तू बरा होणार आहेस. तुला लवकरच बरे वाटेल. ” अशा प्रकारचा धीर देणे उपयुक्त ठरते.

खोटे बोलणे आणि स्वतःच्या असत्य वागण्याचे लटके समर्थन करीत राहणे ही सवय बऱ्याच लोकांना असते. परंतु काही काळानंतर लोकांना अशा माणसांचा स्वभाव लक्षात येतो आणि मग त्यांच्या बोलण्यावर ते फारसा विश्वास ठेवत नाहीत. ते बोलतात एक करतात दुसरे आणि वागतात तिसऱ्या प्रकारचे. अशा वागणाऱ्यांसाठी समर्थांनी त्रिवाचा हा शब्द वापरला आहे. म्हणजे ज्यांच्या वागण्याबोलण्यात एकवाक्यता नसते अशा व्यक्ती. परमेश्वराचा खरा भक्त कधीही असत्य बोलून आपली जीभ विटाळत नाही. त्याला खोटे बोलण्याची गरजही भासत नाही. कारण त्याला काही लपवायचे नसते. खोटे ते बोलणाऱ्या माणसाला आपल्या बोलण्याची वेगवेगळी कारणे सांगावी लागतात. आणि आपण आधी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागते. भक्त हा निर्मळ मनाचा आणि सरळ स्वभावाचा असतो. त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता असते. त्यामुळे तो जे बोलतो ते सत्यच असते. त्याचे शब्द त्याच्या निर्व्याज आणि निरलस व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असतात.

– – आणि ज्याच्या शब्दांत सत्य, नम्रता आणि विवेक असतो, तोच खरा “सर्वोत्तमाचा दास” ठरतो.

स्वसंवाद :

१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का?

२) “स्पष्ट बोलतो” या नावाखाली मी कधी दुसऱ्याला दुखावतो का?

३) सत्य बोलताना मी विवेकाचा वापर करतो का?

४) माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का?

– – – – 

श्लोक क्र. ५४

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी |

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी |

चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५४|

अर्थ : जो भक्त तरुणपणी एकांतात राहून आपला काळ घालवतो, कल्पनेच्या राज्यात जो रमत नाही, ज्याची भगवंतावरील श्रद्धा अढळ असते, असा भक्त खरोखरच त्या सर्वोत्तम असलेल्या भगवंताचा जगामध्ये धन्य असलेला दास आहे.

(सेवि – काळ घालवणे, आरण्य – एकांतवास, मिळेना – मिसळत नाही, मेळी – समूह, चळणे – परावृत्त होणे)

विवेचन : ज्या व्यक्तीला भगवंताची ओढ लागलेली अशी व्यक्ती तरुणपणातच एकांतात राहून त्याचे ध्यान किंवा नामस्मरण करणे पसंत करते. इथे समर्थांनी अरण्य हा शब्द जरी वापरलेला असला तरी प्रत्यक्षात अरण्यातच जाऊन राहिले पाहिजे असा त्याचा अर्थ नाही तर भगवंत प्राप्तीसाठी एकांतात जाऊन तपश्चर्या करणे आवश्यक आहे हा त्याचा अर्थ घेता येतो. आजच्या काळात ही गोष्ट थोडीशी विचित्र वाटेल. तरुणपणातच कसे काय एकांतात राहायचे आणि भगवंताचे ध्यान करायचे? ती तर म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे अशी आपली समजूत असते. पण साधना ही पुढे ढकलण्याची गोष्ट नव्हे तर तरुणपणीच करण्याची गोष्ट आहे.

एकांताची सवय होण्यासाठी घरातील एखादा निवांत कोपरा किंवा जवळचे एखादे शांत मंदिर अशा ठिकाणी जाऊन स्वसंवाद करता येईल. काही काळ टीव्ही, मोबाईल यासारख्या गोष्टींपासूनही दूर राहण्याची सवय करावी लागेल.

पण समर्थ या अनुभवातून गेले आहे. “आधी केले मग सांगितले” असेच त्यांचे बोल आहेत. अगदी तरुणपणी त्यांनी नाशिक जवळील टाकळी येथे राहून बारा वर्षांचा काळ एकांतात घालवला. ज्ञानेश्वरादी भावंडांनी एकांतात राहूनच तपश्चर्या केली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर एकांतात आपला काळ घालवित असत.

तरुण वयात उत्साह असतो, काहीतरी करण्याची जिद्द असते अशावेळी एकांताचे सेवन सहज होऊ शकते. जेव्हा सगळी गात्रे थकलेली असतात अशावेळी एकांतात राहणे मनुष्याला शक्य होत नाही. वृद्धापकाळी मुलांशी पटत नाही म्हणून जंगलात जाऊन राहणे हे लादलेले वैराग्य म्हणता येईल. तीर्थयात्रा, निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास, भजन, प्रवचन, कीर्तन इत्यादी गोष्टी तरुणपणीच उत्तमरीत्या करता येतात. मुखात रामाचे नाव तरुणपणीच यायला हवे. आयुष्यभर जर जिभेवर राम नाही आला तर अंतिम समयी तरी तो कसा येईल? त्यावेळीही कामच आठवेल.

तरुणपणीच भगवत भजनात रमलेला माणूस चुकूनही कल्पनेच्या राज्यात रममाण होत नाही. जी माणसे कल्पनेच्या राज्यात रमतात, ती कोणतेच कर्तव्य नीट पार पाडू शकत नाहीत. एकांताची सुद्धा सवय व्हावी लागते. एकांत पचावा लागतो. त्याची सवय व्हावी लागते. काही लोकांना समूहात राहण्याची एवढी सवय असते की ते एकांत सहन करू शकत नाहीत. पण सदैव लोकांमध्ये राहिले तर काही काळाने माणसाचे मन मलिन होते आणि मग अशा वेळी एकांत आणि स्व चिंतन आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीची माणसे काही काळ साधनेसाठी म्हणून घरातून निघून जात असत. आणि काही काळानंतर परत येत असत. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, धावपळ इत्यादी गोष्टींना कंटाळलेली काही माणसे वर्षातून काही दिवस नियमितपणे विपश्यनेसाठी जातात त्याचाही उद्देश हाच असतो.

एखाद्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागली तरी त्याचा उत्साह काही दिवस टिकतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते. कारण लोकांमध्ये राहून त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. तर कधी त्याचा बुद्धिभेद होतो आणि त्याचा जो निश्चय असतो तो ढळतो. माणसाचे मन अतिशय चंचल असते. बंधनात राहणे, एकच एक गोष्ट करणे त्याला आवडत नाही. म्हणून करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, ” घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवुनी करुणा हे बोलतो दीनवाचा… “परंतु परमेश्वराचा जो खरा भक्त असतो आणि तरुणपणापासूनच जाऊ भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो अशा व्यक्तीचा निश्चय कधीही ढळत नाही अशी व्यक्ती म्हणजे परमेश्वराची खरोखरच प्रिय भक्त असते.

स्वसंवाद :

१) मी साधना/नामस्मरण “नंतर करू” असे पुढे ढकलतो आहे का?

२) माझ्या दिवसात मला एकांतासाठी किती वेळ मिळतो? की मी तो जाणीवपूर्वक टाळतो?

३) मी वास्तवात कृती करतो का, की कल्पनांच्या जगातच रमतो?

४) माझा आध्यात्मिक निश्चय किती दृढ आहे? अडचणी आल्या की तो ढळतो का?

५) आजपासून मी एक छोटी पण सातत्यपूर्ण साधना सुरू करू शकतो का? 

– क्रमशः श्लोक ५३ आणि ५४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५१ आणि ५२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५१ आणि ५२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५१ – – 

मदें मछरे सांडिला स्वार्थबुद्धी|

प्रपंचिक नाही जयाते उपाधि|

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|५१|

अर्थ : जो अहंकार आणि द्वेषरहित आहे, ज्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे, जो संसारात राहूनही विरक्त वृत्तीने वागतो, नेहमी नम्र आणि मधुर वाणीनेच बोलतो, असा मनुष्य सर्वोत्तम अशा भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

(मद – अहंकार, मछरे -मत्सर/द्वेष, सांडिला – सोडून दिले आहे, स्वार्थ बुद्धी – केवळ स्वतःचा फायदा पाहणे, उपाधि – बाह्य पाश /बंधन, सुवाचा – गोड /मधुर बोलणे)

विवेचन : हा फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. खऱ्या भक्ताची लक्षणे आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. खरा भक्त अहंकार आणि द्वेष रहित असतो. त्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केलेला असतो. काही ठिकाणी या श्लोकामध्ये पाठभेद आढळतात. काही पुस्तकांमध्ये सांडली असा शब्द आहे तर काही पुस्तकांमध्ये सांडिला असे म्हटले आहे. या शब्दांमुळे अर्थामध्ये जरा फरक पडतो ज्या पुस्तकामध्ये मदे मत्सरे सांडीली स्वार्थ बुद्धी असे म्हटले आहे, तिथे सांडली म्हणजे त्याग केला या अर्थाने मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी या तिघांचाही खऱ्या भक्ताने त्याग केलेला असतो असा अर्थ घेता येतो. तर जेव्हा सांडीला हा शब्द वापरलेला आढळतो तेव्हा मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी हे दुर्गुण खऱ्या भक्ताला सोडून गेलेले असतात. म्हणजे त्याला ते स्पर्शही करत नाहीत असा अर्थ घेता येतो. तसेच काही पुस्तकात मत्सरे तर काही ठिकाणी मछरे हा शब्द वापरला आहे. अर्थात दोन्हींचा अर्थ मत्सर हाच आहे.

या शब्दांच्या जास्त खोलात न शिरता आपल्याला असे लक्षात येते की खरा भक्त हा अहंकार आणि द्वेषरहित असतो. त्याच्याजवळ स्वार्थ बुद्धी नसते. मद म्हणजे गर्व किंवा अहंकार. माणसाला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप गर्व असतो. त्यातूनच मग तो मी हे केले, मी ते केले, माझ्यामुळेच हे झाले अशा प्रकारची अहंकारी विधाने करत असतो. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ आहे असे दिसले की मग त्याचा मत्सर जागा होतो. तो त्याचा द्वेष करू लागतो आणि मग त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही पातळीला जातो.

स्वार्थ म्हणजे स्व -अर्थ. स्वार्थी माणूस केवळ स्वतःचाच फायदा पाहत असतो. पैसा, संपत्ती यासारख्या गोष्टी कितीही मिळाल्या तरी त्याचे समाधान होत नाही. अजून हवे, अजून हवे असे त्याला वाटत राहते. एकदा हातात भरपूर पैसा आला की मग त्याच्या जोडीला मद येतो. अहंकार वाढत राहतो. त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याचा द्वेषही मनामध्ये ठाण मांडून बसतो. पण जो परमेश्वराचा खरा भक्त असतो, त्याची मानसिक अवस्था या सगळ्याच्या पलीकडे गेलेली असते. तो तृप्त असतो. आहे त्या परिस्थितीत संतुष्ट आणि समाधानी राहतो. कोणाचा तिरस्कार किंवा द्वेष करणे त्याच्या मनात येत नाही.

या श्लोकात खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. खरा भक्त प्रपंच तर करतो पण कसा? तर संसारात राहूनही तो त्यापासून अलिप्त असतो. तो विरक्त वृत्तीने जगतो. खरा भक्त असण्यासाठी भगवे कपडे, माळा, टिळा, टोपी, गंध इत्यादी धारण केले पाहिजे असे नाही. त्यासाठी कुठे वनात जावे लागत नाही. आपण संसारात राहून सुद्धा भगवंताचे लाडके भक्त होऊ शकतो.

कमलपुष्पाचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कमळ चिखलात असते पण त्यात राहूनही ते त्यापासून दूर असते. असेच संसारात देखील राहता आले पाहिजे. संसाराची उपाधी खऱ्या भक्ताला असत नाही म्हणजेच त्याला संसाराचे पाश बांधू शकत नाहीत. संसारात असूनही तो मुक्त असतो, विरक्त असतो.

खऱ्या भक्ताचे आणखी एक सुंदर लक्षण समर्थ सांगतात. त्याचे बोलणे नम्र असते, बोलण्यात माधुर्य असते. आपल्या बोलण्याने तो कोणालाही दुखवत नाही. यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. खऱ्या भक्ताच्या अंगी हे गुण आपोआप येतात. निवडणूक आली म्हणजे बरेच पुढारी अगदी नम्रतेने जनतेला सामोरे जातात. कार्पोरेट क्षेत्रातही कामाच्या गरजेपोटी नम्रता धारण केली जाते. पण हे सगळे मुखवटे असतात. आतले रूप वेगळ्याच असते. असे आपल्याला अनेक प्रसंगी आढळून येते. खरा भक्त हा अंतर्बाह्य निर्मळ असतो. मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जेवढं मऊ आणि मुलायम असतं, तसंच सज्जनांचे चित्त असतं असं तुकाराम महाराज म्हणतात.

समर्थ रामदास किंवा संत तुकाराम यांच्यासारखे संत काही वेळा कठोरपणाने बोलताना दिसतात. पण त्यामागे समाज हिताची तळमळ असते. आई सुद्धा आपल्या मुलाला प्रसंगी रागावते, तर कधी चिडून ” मर मेल्या… “असे सुद्धा उद्गारते. परंतु त्यातही तिचे प्रेम असते आणि मुलाच्या कल्याणाचाच विचार असतो. असेच संतांचीही बोलणे असते. जाणीवपूर्वक कोणाचेही मन दुखवावे म्हणून ते बोलत नसतात.

म्हणून आपणही परमेश्वराचे प्रिय भक्त होण्याचा प्रयत्न करावा. अहंकार, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी यांच्यासारख्या दुर्गुणांचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात रहावे, प्रपंच उत्तम करावा. परंतु ज्या काही गोष्टी घडतात, त्यांच्याकडे साक्षीभावाने पाहायला शिकावे म्हणजे आपल्याला त्या बंधनकारक होत नाहीत. अनावश्यक बोलणे टाळावे आणि जे काही आपण बोलू त्यात नम्रता आणि माधुर्य असावे. असा भक्त हा त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील सर्वोत्कृष्ट असा भक्त असतो.

स्वसंवाद ::

१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का – की ते केवळ गरजेपुरते असते आणि आतमध्ये वेगळेच असते?

२) माझ्या मनात कोणाबद्दल मत्सर किंवा द्वेष आहे का – आणि त्याची मला जाणीव होते का?

३) “संसारात राहूनही विरक्त” – माझ्या जीवनात मी साक्षीभावाने वागण्याचा प्रयत्न करतो का की संसारातील गोष्टी मला पूर्णपणे बांधून टाकतात?

– – – 

श्लोक क्र. ५२ – – 

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।

न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सुखसंवाद जो उगमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

अर्थ : खरा भक्त तत्वचिंतनात वेळ घालवतो. अहंकार, दंभ आणि वादविवादात तो वेळ घालवत नाही किंवा त्यात गुंतून पडत नाही. तो उगमाचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करून स्वतःशी किंवा इतरांशी सुख संवाद साधतो असा भक्त परमेश्वराचा खरोखरच धन्य असा भक्त होय.

(क्रमी – वेळ घालवतो, तत्त्वचिंतन – परमात्मस्वरूपाचे चिंतन, अनुवाद – आचरण /अनुकरण, लिंपे – लिप्त होत नाही किंवा दोष लावून घेत नाही, दंभवाद – फसवा युक्तिवाद, विवाद – निष्फळ वाद, उगम – मूळ स्वरूप)

विवेचन : खरा भक्त आपला वेळ कसा घालवतो हे समर्थ पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत सांगतात तर भक्ताने कसे असू नये हे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले आहे.

– – क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे…

साधकाचे अंतिम ध्येय परमेश्वराला प्राप्त करून घेणे हे असते एकदा त्याने ही गोष्ट आपल्या मनाशी निश्चित केली की मग त्याचे चिंतन करण्यातच तो आपला वेळ घालवतो. त्याव्यतिरिक्त जो इतर गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो तो खरा साधक नव्हेच! तो मूळ तत्वाचे म्हणजे परमेश्वराचे चिंतन करतो. याच ओळीत अनुवादे हा शब्द आला आहे याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. साधारणपणे अनुवाद म्हणजे भाषांतर असे आपण समजतो परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ आचरण किंवा अनुकरण असा घ्यायला हवा. म्हणजे ज्याला परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले आहे तो साधकाने जसे वागायला हवे तसेच वागत असतो. आपल्या गुरूंनी किंवा आपल्या श्रेष्ठ ग्रंथांनी जी गोष्ट सांगितली आहे, त्याचे अनुकरण करत असतो. त्याचा अनुभव घेत असतो. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाबद्दल एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीवाचून उपयोग नसतो तर त्याप्रमाणे वागून त्या ओवीची अनुभूती घेणे, अनुभव प्राप्त करणे हा त्याचा अर्थ आहे आणि खरा भक्त तेच करत असतो.

असा भक्त निष्करण वादविवादात गुंतून पडत नाही. आपल्याला थोडेफार ज्ञान झाले, काही मोजक्या ग्रंथांचे आपण वाचन केले म्हणजे आपल्याला फार कळते आहे असे आपल्याला वाटू लागते. मग आपण ते दाखवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी वादविवाद करत बसतो आणि मी किती श्रेष्ठ आहे, मला किती कळते हे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. खरा भक्त बोलतो, गातो ते फक्त परमेश्वराबद्दल बोलण्यासाठीच. त्याचीच महती तो गात असतो. म्हणून तो व्यर्थ वादविवादात पडत नाही किंवा त्यात स्वतःला गुंतवून घेत नाही.

आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळतात. त्यातील आठ ते दहा तास झोपेत जातात. दहा ते बारा तास आपली नोकरी, प्रपंचाचे काम यात जातात आणि उरलेले तीन -चार तास आपण आपल्या मनाप्रमाणे घालवतो. त्यात टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, मित्रमंडळींमध्ये गप्पा मारणे यासारख्या गोष्टी करतो. खरा भक्त या वेळेत काय करतो? तर तो स्वतःशी संवाद साधतो, आत्मचिंतन करतो. त्यालाच सुखसंवाद असे म्हणता येईल. हा सुखसंवाद उगमाकडे जाण्याचा असतो. गंगा नदी किंवा यमुना नदी आपण पाहिलेली असते परंतु हिमालयात प्रवास करणारे यात्रिक किंवा भाविक गंगोत्री किंवा यमुनोत्री म्हणजेच गंगेच्या किंवा यमुनेच्या उगमपर्यंत जातात. म्हणजेच मूळ स्थान शोधून काढतात.

आपल्यालाही मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. परंतु आपणही आपले मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोहम म्हणजे मी कोण आहे, माझे मूळ स्वरूप कोणते आहे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मग आपण सोहम पर्यंत येतो म्हणजे तो मीच आहे हे आपल्याला कळू लागते आणि मग आपलाच आपल्याशी संवाद होऊ लागतो. ” तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. ” आणि जेव्हा भक्ताच्या वागण्यात ही सगळी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो फक्त खरोखरच परमेश्वराचा धन्य भक्त ठरतो.

स्वसंवाद ::

१) माझा रिकामा वेळ कशात जातो – तत्त्वचिंतनात की मोबाईल, गप्पा यासारख्या गोष्टींमध्ये?

२) मला थोडे ज्ञान झाले म्हणून मी वादविवादात पडतो का – की माझ्या ज्ञानाचे आचरण करण्यावर माझा भर असतो?

३) “कोहम ते सोहम” – मी कोण आहे हा प्रश्न मला कधी पडला आहे का? माझ्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याची माझ्या मनात खरी ओढ आहे का?

– क्रमशः श्लोक ५१ आणि ५२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तो ‘जादुई डबा’ – – – माहिती संग्राहक/लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ तो ‘जादुई डबा’ – – – माहिती संग्राहक/लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

जॉन शेफर्ड-बॅरन

एका बंद दरवाजातून जन्मलेला तो ‘जादुई डबा’ आणि तुमच्या ४ अंकी पिनचा रंजक इतिहास – – – 

लंडनच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर पावसाची रिपरिप सुरू होती. जॉन नावाचा एक माणूस धावत धावत बँकेच्या दिशेने जात होता. घड्याळाचा काटा बरोबर दुपारी एकवर पोहोचला आणि त्याच्या डोळ्यादेखत बँकेचं जड लोखंडी दार बंद झालं. जॉन फक्त एक मिनिट उशिरा पोहोचला होता. खिशात पैसे नव्हते आणि पुढचे दोन दिवस बँक उघडणार नव्हती.

*****

त्या दिवशी झालेली ती चिडचिड एका जागतिक क्रांतीची ठिणगी ठरेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तो माणूस म्हणजे जॉन शेफर्ड-बॅरन. योगायोग बघा, जॉन यांचा जन्म आपल्या भारतातल्या मेघालयातील शिलाँगमध्ये १९२५ मध्ये झाला होता. बँकेचं दार तोंडावर बंद झाल्यावर जॉन घरी गेले, पण त्यांच्या डोक्यात एक विचार चक्रावून गेला.

****

त्या रात्री अंघोळ करताना त्यांना चॉकलेटच्या व्हेंडिंग मशीनची आठवण झाली. जर मशीनमध्ये पैसे टाकल्यावर चॉकलेट बाहेर येऊ शकतं, तर मशीनमधून पैसे का बाहेर येऊ शकत नाहीत? हा साधा विचार घेऊन जॉन बार्कलेज बँकेच्या व्यवस्थापकांकडे गेले. त्यांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली.

****

२७ जून १९६७ हा दिवस बँकिंगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. उत्तर लंडनमधल्या एनफिल्डमध्ये जगातील पहिलं एटीएम (Automated Teller Machine) बसवण्यात आलं. गंमत म्हणजे, तेव्हा आजच्यासारखी प्लास्टिकची कार्ड्स नव्हती. लोक एका विशिष्ट प्रकारचा, केमिकली कोडेड चेक मशीनमध्ये टाकायचे आणि मग मशीनमधून १० पाउंडची नोट बाहेर यायची.

****

जॉन यांना वाटलं होतं की एटीएमचा पिन सहा अंकी असावा. त्यांनी स्वतःच्या आर्मी नंबरवरून तसा विचार केला होता. पण जेव्हा त्यांनी ही गोष्ट आपली पत्नी कॅरोलिनला सांगितली, तेव्हा तिने एक साधी पण महत्त्वाची अडचण मांडली. ती म्हणाली, “सहा अंक लक्षात ठेवणं खूप कठीण आहे, मला फक्त चारच अंक नीट लक्षात राहतात. “

पत्नीचा हा विसरभोळेपणा म्हणा किंवा व्यावहारिक सल्ला, जॉन यांनी पिनची लांबी चार अंकांवर आणली. आज आपण गुगल पे असो वा डेबिट कार्ड, जो ४ अंकी पिन वापरतो, त्याचं श्रेय कॅरोलिन यांच्या त्या एका वाक्याला जातं. एका स्त्रीच्या सोयीसाठी बनलेला हा नियम आज जगाचं स्टँडर्ड बनला आहे.

****

 ज्या एटीएमने आपल्याला रांगेतून मुक्त केलं, तेच एटीएम आता एका वेगळ्या वळणावर उभं आहे. आता आपल्याला रोख रकमेसाठी एटीएम शोधत फिरावं लागत नाही. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर असो वा मुंबईच्या खाऊ गल्लीत, खिशात पाकीट नसलं तरी चालतं, फक्त हातात मोबाईल आणि समोर एक क्यूआर कोड (QR Code) असला की काम फत्ते होतं.

****

डिजिटल पेमेंटच्या या लाटेत एटीएमची गरज हळूहळू कमी होताना दिसतेय. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीला एटीएमबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता दिसेनाशा झाल्या आहेत. बँकाही आता नवीन एटीएम मशीन बसवण्यापेक्षा डिजिटल ट्रान्झॅक्शनवर जास्त भर देत आहेत.

****

एकेकाळी क्रांती घडवून आणणारा हा ‘जादुई डबा’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे का? कदाचित काही वर्षांनी आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सांगावं लागेल, “बाळा, पूर्वी पैसे काढायला रस्त्यावरच्या एका मशीनपाशी जावं लागायचं आणि तिथे एक विशिष्ट आवाज यायचा जो ऐकून खूप समाधान वाटायचं. “

****

काळ बदलला की गरजा बदलतात आणि तंत्रज्ञानही. ज्या जॉन शेफर्ड-बॅरन यांनी आपल्याला २४ तास पैसे मिळण्याची सोय करून दिली, त्यांच्या त्या कल्पनेने बँकिंग सोपं केलं. पण आज मोबाईलच्या एका क्लिकवर होणारे व्यवहार पाहता, एटीएम हे मशीन लवकरच इतिहासाच्या पुस्तकात जमा होईल असं वाटतंय.

भविष्यात हा डबा फक्त संग्रहालयातच दिसेल का?

 

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

(त्यानिमित्त जनजागृतीसाठी लिहिलेल्या दोन कविता रसास्वादासाठी प्रस्तुत.)

यंत्रदास विरचित ‘श्रीसुरक्षितताबोध‘ ग्रंथामधील ‘विश्वसौंदर्यवर्णन‘ नाम आध्याय १९

☆ विश्व सौंदर्य वर्णन ☆

☆

अरे विश्व पाहे जरा रंगलेले

जरा ऐकते सूर नादावलेले

हळू हुंग सूगंध धुंदावलेले

सुखे पांघरी वात मंदावलेले ll१ll

*

पहा पर्वतांची कशी ती निळाई

पहा लाल माती पहा रानराई

पहा पाखरांचे थवे हिंडणारे

पहा सारिका, मोर ते नाचणारे ll२ll

*

पहा वीज, वारे, पहा मेघ, तारे

पहा पुष्पभारे, पहा रे किनारे

पहा धातुसाठे, पहा रत्नसाठे

पहा गारगोटे, पहा अष्म मोठे ll३ll

*

कसे तेज फाके नभी भास्कराचे

रुपेरी मृदू चांदणे पौर्णिमेचे

पहा क्रीडने, नर्तने वासरांची

पहा रंग, रूपे जळी मासळ्यांची ll४ll

*

जरा ऐक ती गर्जिते सागराची

वंशीवनी वाजते शीळ साची

जरा ऐक रे खर्ज ते मंडुकांचे

जणू साम गाती जथे ब्राह्मणांचे! ll५ll

*

प्रभूने कसे विश्व हे निर्मियेले

विनाकारणे का असे निर्मियेले?

जगी शासनू फक्त त्याचेच चाले

अरे, पानही श्रीकृपेनेच हाले! ६ll

*

इथे कीड, मुंगीसही अर्थ आहे

घुशी, साप, डासासही कार्य आहे

किडे, गांडुळे, पाल, माशा, मसूरे

तरू, खेचरे, भूचरे, जsलचरे ll७ll

*

कुणाची अरे ही असे मालमत्ता?

कुणाची इथे चालते सांग सत्ता?

अरे, यातले तू वदे, काय केले

बुधा! बोल ना काय तू निर्मियेले? ll८ll

*

तुलाही अरे निर्मिले ईश्वराने

जसे निर्मिले विश्व सारे तयाने

कधी जे कुणी निर्मीलेलेच नाही

तया छेदण्याचा कुणा हक्क नाही ll९ll

*

जगातील सारेच आहे पुरेसे

विभागून घ्यावे जिवांनी जरासे

दुज्या जsगवावे, स्वतःही जगावे

असे सूत्र सांभाळुनी वावरावे ll१०ll

*

नसे आपले, का धरावीस आशा

उगा कासया हाव, का रे पिपाशा?

नको ओरबाडू निसर्गास वेड्या

तयाच्याच हाती तुझ्या सर्व नाड्या ll११ll

*

बसे ज्यावरी त्या न शाखेस तोडी

पुरे हाव आता, पुरे, स्वार्थ सोडी

निसर्गात आहे क्रमू नेमलेले

जसे सूत्र माळेमधे ओवलेले ll१२ll

*

चुकोनी जरी तोडिले सूत्र कोणी

गळोनीच जाती मणी चौ दिशांनी

न माळेस अर्थू, न रत्नांस शोभा

अशाने कुणाचे भले होय बाबा! ll१३ll

☆

– – –

‘यंत्रदास‘विरचित ‘श्रीसुरक्षितताबोध‘ ग्रंथामधील ‘पर्यावरणसमस्यावर्णन‘ नाम अध्याय २०

☆ पर्यावरण समस्या वर्णन ☆

☆

नव्या संस्कृतीने पहा काय केले

निसर्गास सा-या प्रदूषीत केले!

नभा नासवीले, जळा नासवीले

फळा नासवीले बिजा नासवीले! ll१ll

*

कुठे पाखरे भेदरोनी उडाली?

कुठे कूजने कोकिळांची विराली?

वने, वाटिका पार खंगून गेल्या

हिरे, माणके, पाच संपून गेल्या! ll२ll

*

कुठे व्याघ्र गेले? कुठे सर्प गेले?

कुठे भृंग गेले? कुठे हंस गेले?

गवे, कासवे, केसरी, रान साळू

मृगे, माकडे, खेकडे, मोर, भालू ll३ll

*

कुठे वन्य प्राणी? कुठे शुद्ध पाणी?

कुठे रातराणी? कुठे लोकगाणी?

कुठे नम्र वाणी? कुठे देववाणी?

धरा ही कशी दीसते दीनवाणी! ll४ll

*

दिसेना कुठे वृक्षवल्ली जराशा

खुळ्या मानवाच्या किती या पिपाशा!

खरी कस्तुरी फक्त काव्यात राहे

इथे कुंद दुर्गंध कोंदून आहे! ll५ll

*

पहा वाळवंटे जगी माजलेली

धुरू-धूलिकांनी नभे दाटलेली

भगांकीत झाली धरित्री बिचारी

कुणी सर्व केले? मनाला विचारी ll६ll

*

जमीनीत हे क्षार कोठून आहे?

कसे शुष्क झाले कुवे, कूप, नाले?

कुठे दूर पर्जन्य गेले रुसोनी?

गिधाडामुखी रंगती हर्षगाणी! ll७ll

*

पहा उष्णता वाढताहे जगाची

स्थिती घोर आहे पहा जंगलांची

जमिनीतले तेलसाठे उडाले

जळे, वायु सारे अशुद्धून गेले ll८ll

*

सुरत्नाकराच्या तळी काय आहे?

अरे, त्याज्य सारे उदासून आहे!

अणू चांचण्यांनी दशा काय केली?

धरा अंतरी पार पिंजून गेली! ll९ll

*

नवी संस्कृती हाटवीते समुद्रा

तयाने तरी का धरावी मर्यादा?

नवे भोग आले, नवे रोग आले

कुमारी आवंढा गिळे, गर्भ गाळे! ll१०ll

*

गुणी माणसांचाच बाजार केला

किडे, कीटकांचाहि संहार केला

कुठे सत्य गेले? कुठे वीर्य गेले?

कसे ‘कोरोना’सारखे रोग आले? ll११ll

*

पहा ‘ताज’ आता भुरा दिसताहे

हिमासारखा तो खरा शुभ्र आहे

पहा जान्हवीची दशा काय आहे

मळी, सांडपाणी तिथे वाहताहे! ll१२ll

*

अरे, खेद मानू नको बोलण्याचा

जरा जाण हेतू अशा सांगण्याचा

नसे वेळ गेली अजूनी टळूनी

पुरे हाव, स्वार्था धरी आवरोनी ll१३ll

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हे Load-bearing R. C. C. पेक्षा मजबूत निघाले!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “Load-bearing R. C. C. पेक्षा मजबूत निघाले!” ☆ श्री संभाजी बबन गायके

– – प्रा. मुकुंद पाध्ये 

एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचे सैनिकी कल्याणासाठी कोटीचे उड्डाण!

गणित, शास्त्र विषयाच्या शिक्षकांचा सहभाग असलेल्या पेपरफुटीच्या बातम्यांनी देशात रणकंदन माजवलेले असताना एका गणिताच्या अध्यापकांनी कोणताही गाजावाजा न करता देशापुढे एक आदर्श उभा करून कमाल केल्याची बातमी समजली ती कारगिल वीर, PARA स्पेशल फोर्सेसचे सुभेदार मेजर बाळासाहेब मोहारे (सेवानिवृत्त) यांच्या एका मेसेजमधून. विदर्भातील वकील अजिंक्य धर्माधिकारी साहेबांनी ही बातमी लिहिली आहे. वकील साहेबांनी ही माहिती प्रसाद महाजन यांच्याकडून समजली! 

अकोला येथे गणिताचे अध्यापन करून अवघं आयुष्य विद्यार्थी सेवेत व्यतीत केलेल्या मुकुंद पाध्ये सरांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षीपर्यंत पै-पैसा जमा करून एक कोटी रुपये भारतीय सैनिकांच्या कल्याणनिधीसाठी दान दिले… ही ती बातमी!

समाजाचा load ख-या अर्थाने bear करणारी ही माणसं. इतर जण R. C. C. वापरून स्वत:ची घरं मजबूत करण्याचा integrated प्रयत्न करीत असताना दातृत्वाची ही उत्तुंग इमारत मजबुतीने उभी करणारी पाध्ये सरांसारखी माणसं पाहिली की वाटतं… अजूनही फार काही बिघडलेले नाही! 

आजच्या जागतिक भयावह परिस्थितीत जगातील इतर सर्वच देश त्यांचे त्यांचे लष्कर अधिकाधिक सामर्थ्यशाली बनवण्याच्या प्रयत्नांत दिसते. यासाठी आर्थिक पाठबळ तर लागतेच. आपल्याकडे संरक्षणावर कमी तरतूद आहे, असेही नाही. मात्र जनतेने लष्कराच्या आर्थिक सबलीकरणात सहभागी होण्याने राष्ट्रीय एकात्मता, परस्पर सहयोग वाढीस लागून त्यातून आदर्शवत व्यवस्था उभी राहू शकते, हे ध्यानात घ्यावे लागेल. विशेषत: सैनिक कल्याण निधीमध्ये नागरीकांनी सढळ हातांनी साहाय्य करणे गरजेचे आहे. सैनिकांचे उपकार फेडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. पुण्यातील कै. योगेश चिथडे साहेबांनी त्यांच्या पत्नी सुमेधाताई चिथडे यांच्या साथीने आणि लोक सहभागातून सियाचीन दुर्गम बर्फाळ प्रदेशातील रुग्णालयांमध्ये भारतीय सैन्यासाठी कित्येक कोटी रुपयांची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा भेट दिल्याचे देशाला ठाऊक आहे. ही यंत्रणा नागरीकांनाही उपयुक्त ठरते आहे!

प्राध्यापक मुकुंद पाध्ये सरांनी या त्यांच्या donation मधून अनेकांची शिकवणीच घेतली आहे, एक धडा घालून दिला आहे, असं म्हणावंसं वाटतं! यातून सरांचा class ही दिसून आला! अशी माणसं वाढली तर देश NEET चालू शकेल…! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

 – – आपल्या उदाहरणाने लाखो लोकांना स्फूर्ती आणि हिंमत देणारी ही एक सत्यकथा आहे.

1983 मध्ये मेरठ येथे जन्मलेल्या इरा सिंगला यांना जन्मतःच पाठीच्या कण्याच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या हातांच्या हालचालींना काही बंधने आली होती. मात्र अशा अवस्थेतही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कुठलीच वेगळी आणि विशेष वागणूक दिली नाही. आणि म्हणूनच त्या आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकल्या. शिवाय नंतर दिल्ली विद्यापीठाची m. b. a. ची पदवीही मिळवू शकल्या, आणि लगेचच कॅडबरी इंडिया या नामांकित कंपनीत strategic manager म्हणून व कोकाकोला कंपनीत मदतनीस म्हणूनही त्यांनी काम सुरू केले.

2009 मध्ये त्यांनी I. A. S. होण्याचे ठरविले आणि 2010 मध्ये पहिल्या प्रयत्नातच त्या U. P. S. C. ची सिव्हिल सर्विस मधील परीक्षा यशस्वीपणे पास होऊ झाल्या.

त्यांना भारतीय महसूल विभागाची (Revenue Dept.) जबाबदारी देण्यात आली.. पण सरकारकडून, ‘शारीरिक दृष्ट्या असमर्थ’.. हा निकष लाऊन त्यांना नाकारण्यात आले.. सरकारतर्फे असे सांगण्यात आले की त्यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहेत.. एखादी गोष्ट ढकलणे.. ओढणे.. किंवा उचलणे या क्रिया त्या करूच शकत नाहीत, आणि म्हणून I. A. S. Officer म्हणून काम करण्यास त्या सक्षम नाहीत.

या गोष्टीचे त्यांना अतिशय दु:ख झाले. पण अतिशय निश्चयाने त्यांनी ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ या विशेष अर्धन्यायिक संस्थेकडे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तक्रार नोंदवली. बराच काळ लोटला पण सरकार काही त्यांच्या भूमिकेत बदल करायला तयार नव्हते….. आणि आता इराही थांबायला तयार नव्हत्या…

… 2011 साली त्या पुन्हा यूपीएससी च्या परीक्षेला बसल्या आणि पासही झाल्या. या वेळी त्यांना रेल्वे विभाग देण्यात आला, पण पुन्हा त्याच शारीरिक व्यंगाच्या सबबीखाली यावेळीही त्यांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

2013 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेला बसल्या आणि अर्थातच पासही झाल्या. पण याही वेळी सरकारकडून पुन्हा तेच कारण दिले गेले. जगातील सर्वात कठीण असलेल्या एका परीक्षेत एक मुलगी तीन वेळा उत्तम गुणांनी पास होते, पण तिच्यातील शारीरिक व्यंगामुळे नोकरी करण्यास ती असमर्थ आहे हेच दरवेळी अधोरेखित केले गेले.. ही खरोखर फार खेदाची आणि तितकीच संतापजनक बाब आहे.. आणि याही वेळेस केंद्रीय न्यायाधिकरणाकडून त्यांना न्याय मिळाला नाही.

– – आता प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान 2014 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेस बसली. या वेळेस एक विशेष गोष्ट घडली… त्या नुसत्या पासच झाल्या नाहीत, तर संपूर्ण जगातल्या सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्या सबंध भारतात पहिल्या आल्या. आजपर्यंतच्या यूपीएससीच्या इतिहासात प्रथमच इतके जास्त गुण त्यांना मिळाले होते.. म्हणजे एकूण 2025 पैकी 1082 गुण ! 

… आता मात्र सरकारला त्यांचा पवित्रा बदलावाच लागला आणि इरा यांची अलीपुर, नवी दिल्ली येथे “सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट” म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीच्या पहिल्याच वर्षात त्यांनी जवळजवळ 340 बालमजुरांचे जीव वाचवले होते. त्यांना सक्तीने बालमजूर म्हणून पाठविले जात असताना इरा यांच्या सक्त आदेशानुसार त्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते…

आणि इथेच सरकारची खात्री झाली की IAS Officer ची जबाबदारी स्वीकारल्यावर त्या उत्तम काम करू शकतात… त्यांचे शारीरिक व्यंग कुठल्याही कामात अडसर ठरत नाही.

सध्या त्या अरुणाचल प्रदेशात अतिरिक्त सचिव म्हणून काम करताहेत. या शिवाय त्या भारत सरकारच्या न्याय आणि अधिकारी मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या मुख्य प्रतिनिधी म्हणूनही काम पाहत आहेत.

… या व्यतिरिक्त महिला व बाल संगोपन आणि नीती आयोग यांच्या मुख्य प्रतिनिधी, केंद्रीय निवडणूक मंडळाच्या सुलभ निवडणुकीच्या राष्ट्रीय मंडळावर प्रतिनिधी म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

अशा या जिद्दी आणि संयमी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या इरा सिंघल यांनी तरुणांना केलेला उपदेश खूपच बोलका आहे.

त्या म्हणतात…

” तुमची स्वप्ने दुसरे कोणीतरी सत्यात उतरवून देईल याची वाट बघत कधीच थांबू नका.. त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील रहा “.

दृढ निश्चय आणि दुर्दम्य हिंमत यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवे अशा IAS ऑफिसर इरा सिंघल यांची ही सत्य गोष्ट लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.

इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद व प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पॅरालिम्पिक्स (Paralympics) क्या है ?  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ पॅरालिम्पिक्स (Paralympics) क्या है ? ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

सन २०१९. गोविंदगढ, तालुका जेवर, जिल्हा गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश.

… जन्मतःच एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असलेल्या प्रवीण कुमार ने गुगलवर एक प्रश्न टाकला – “पॅरालिम्पिक्स क्या है ?” क्षणार्धात उत्तर आलं – “दिव्यांग (अपंग) खेळाडूंसाठीचे ऑलिंपिक”. (दुसऱ्या महायुद्धात जखमी / अपंग झालेल्या सैनिकांसाठी १९४८ साली सुरू झालेल्या या स्पर्धा सुरू झाल्या होत्या.)

हा प्रश्न विचारला तेव्हा प्रवीण अवघ्या १६ वर्षांचा होता. खेळांची आवड होती, व्हॉलीबॉल खेळायचा तो, पण धावताना मात्र अधू पाय त्याला त्रास द्यायचा. उंच उडी मारणे मात्र सहजसुलभ वाटायचे.

२०१९ मधील त्या एका गूगल सर्चने सर्व काही बदलून टाकले.

प्रविण आता उंच उडीवर कसून मेहनत घेऊ लागला, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊ लागला. २०२० साली टोकियो, जपान इथे होणाऱ्या पॅरालिम्पिक्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करत होता.

टोकियोमध्ये तो पुरुषांच्या उंच उडी T६४ प्रकारात २. ०७ मीटरची उडी मारतो आणि रौप्यपदक घेऊनच बाहेर पडतो. (शारीरिक पंगुत्वाचे वेगवेगळे गट केले आहेत, त्यातील एकातरी पायामध्ये गुडघ्याखालून व्यंग असण्याचा गट T६४ आहे.) भारतात जल्लोष झाला, पण स्वतः प्रविण समाधानी नव्हता.

त्याने प्रशिक्षक डॉ. सत्यपाल सिंग यांना सांगितले, “पुढच्या वेळी सुवर्णपदक. ” प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात अडथळा पार करणाऱ्या त्या मुलासाठी रौप्यपदक पुरेसे नव्हते.

भारत सरकारने २०२१ साली अर्जुन पुरस्काराने प्रविणला गौरवले.

प्रशिक्षकांना दिलेल्या वचनाप्रमाणे, पुढच्या स्पर्धेत, २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रविणने आपल्या पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०२३ साली जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आणि आता पाळी होती २०२४ सालच्या पॅरिस पॅरालिम्पिक्सची.

६ सप्टेंबर २०२४. स्टेड डी फ्रान्स. पुरुषांची उंच उडी T६४ अंतिम फेरी.

… बार वर वर जात राहतो. १. ८९ मी. पार. १. ९३ मी. पार. १. ९७ मी. पार. २. ०१ मी. पार. २. ०३ मी. पार. २. ०६ मी. पार. सहा उड्या, प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात पार. अजिबात डगमगला नाही. दुसऱ्या संधीची गरजच नाही.

… आता बार २. ०८ मी. उंचीवर लावलेला, आशियाई विक्रम. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी. सुवर्णपदकाचा बार.

… प्रवीण वेगाने धावतो. आपल्या मजबूत पायावर जोर लावतो, झेप घेतो. एका क्षणासाठी तो पॅरिसच्या आकाशात तरंगत असतो, त्याच्या जर्सीवरील तिरंगा दिव्यांच्या प्रकाशात चमकत असतो. तो बारवरून कमान करून उडी मारतो आणि पलीकडे गादीवर उतरतो – सफाईदारपणे.

… आणि बार अजूनही तिथेच आहे – स्थिर.

एकच जल्लोष.

सुवर्णपदक. पॅरिस २०२४ मध्ये भारताचे सहावे सुवर्णपदक. प्रविणने अमेरिकेच्या डेरेक लोक्सिडेंटला २ सेंटिमीटरने हरवले. २०२० पॅरालिम्पिक्सचा इंग्लंडचा सुवर्णपदक विजेता जोनाथन पाचव्या क्रमांकावर फेकला गेलेला.

आणि वयाच्या २१ व्या वर्षी, प्रविण हा मरियाप्पन थंगवेलू यांच्यानंतर पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरलेला.

तो आपल्या प्रशिक्षकाला मिठी मारतो. आपल्या खांद्यावर ध्वज गुंडाळतो. ज्या मुलाने काही वर्षांपूर्वी गुगलवर पॅरालिम्पिक्स शोधले होते, त्याने नुकतेच जगाला हरवले होते.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले: “इतिहास रचणाऱ्या प्रविणकुमारचा देशाला अभिमान वाटतो. “

२०२५च्या दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यस्पर्धेत प्रविणने कांस्यपदक मिळवले.

त्याच्या आजवरच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल, या वर्षी २०२६ साली, भारत सरकारने “पद्मश्री” पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला.

खरंच, कधीकधी सर्वात मोठी झेप एका छोट्या क्लिकने सुरू होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares