मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

नाटककार रविंद्रनाथ (१)

वैश्विक काव्य जगतात मानाचं स्थान प्राप्त केलेल्या रविंद्रनाथांनी नाट्य जगताला लहान मोठ्या अशा जवळपास ५०-५५ उत्कृष्ट नाटकांनी समृद्ध केले आहे. परंतु दुर्दैवाने हे सत्य कुठेच अधोरेखित झालेलं नाही. त्यांच्या नाटकांमधील डाकघर, रक्त करबी, विसर्जन, राजा ही नाटके तसेच चित्रांगदा, श्यामा, नटीरपूजा, चंडालिका, ताशेर देश या नृत्यनाटिका जास्त चर्चिल्या गेल्या आहेत. पण त्यांची छोटी छोटी नाटकं, आपल्या वगनाट्य सदृश नाटिका, प्रहसनं, नाट्यछटा देखील समाजमनावर छाप सोडणाऱ्या आहेत. तसेच त्या थट्टा विनोदाच्या अंगानं सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय जीवनातील विसंगतीवरही प्रकाश टाकणाऱ्या आहेत. रविंद्रनाथांची नाटके कलात्मक सौंदर्याचा अनुभव देता देता सामाजिक प्रबोधनही करतात. त्यांच्या कवितांप्रमाणेच त्यांची नाटके देखील त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहेत. आत्ताच्या भाषेत आपण ज्यांना प्रायोगिक नाटके म्हणतो तशी प्रायोगिक नाटके देखील त्यांनी प्रायोगिकतेचं कसलेही अवडंबर न माजवता लिहिली, बसवली व प्रस्तुत केली.

परंतु त्या काळातली मेलोड्रॅमॅटिक नाटके बघण्याची सवय असलेल्या बंगाली प्रेक्षकांना रविंद्रनाथांच्या नाटकांतील तरलता, अस्फुट संघर्ष लक्षात येत नसल्यामुळे म्हणा किंवा धार्मिक, सामाजिक व्यंगावर भाष्य असल्यामुळे म्हणा रविंद्रनाथांना नाटककार म्हणून जे स्थान कलाजगतात मिळायला हवं होतं ते कांही मिळालं नाही. अर्थात टागोरांनीही हे मान्य केलं होतं. ते म्हणत, “मला नाटक लिहिता आलं नाही. एक मध्यवर्ती कल्पना घेऊन त्यावर नाटक तोलण्याची कला माझ्यात नाही. ” अर्थात त्यांच्या नाटकांकडे पाहिलं असता लक्षात येतं की, हा त्यांचा विनय होता. त्यांच्या मधला कवी त्यांच्या नाटकांतही डोकावतो, हे मात्र खरे आहे. त्यांची कांही नाटकं तर गद्य काव्य असल्यासारखी वाटतात.

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ नाटकाचं बंगालीत भाषांतर केलं होतं. त्या काळात इंग्रजी नाटकांच्या अनुकरणाचं वारं होतं. त्यामुळे पारंपरिक बंगाली नाट्यकला व नवदरबारी लोकांची नाट्यकला यात मोठं अंतर आलं होतं. रविंद्रनाथांनी लोकरंगमंचातली शक्ती ओळखून, त्यावर आपले संस्कार करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. नाटकाविषयी त्यांच्या मनात कोणतेही व्यावसायिक विचार नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही नाटक कंपनीसाठी नाटक लिहिले नाही.

(अपूर्ण–पुढील भागात)

—–

☆ गीत : ७६ ☆

DAY after DAY, O lord of my life, shall I stand before thee face to face? With folded 

hands, O lord of all worlds, shall I stand before thee face to face? 

Under thy great sky in solitude and silence, with humble heart shall I stand before thee 

face to face? 

In this laborious world of thine, tumultuous with toil and with struggle, among hurrying crowds shall I stand before thee face to face? 

And when my work shall be done in this world, O King of kings, alone and speechless shall I stand before thee face to face? 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ७६ ☆

*

हे परमेशा, नित्य, प्रतिदिन

मला भेटशील का रे?

कर दोन्ही जोडूनि उभा मी

मला भेटशील का रे?

*

गगनाखाली निळ्या, अथांग, अतल

नतमस्तक मी शांत, एकाकी, निर्मल

मला भेटशील का रे?

*

दुष्कर जीवन, संकटे कितीक आली

या गर्दीत ना उसंत क्षणाची मिळाली

मला भेटशील का रे?

*

जीवनी, कर्तव्ये सारी पुरी करुनी

येतो मूकपणे, एकांताचे बोट धरुनी

मला भेटशील का रे?

☆

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ७७ ☆

I KNOW thee as my God and stand apart ⎯ I do not know thee as my own and come 

closer. I know thee as my father and bow before thy feet ⎯ I do not grasp thy hand as 

my friend’s.

I stand not where thou comest down and ownest thyself as mine, there to clasp thee to 

my heart and take thee as my comrade.

Thou art the Brother amongst my brothers, but I heed them not, I divide not my earnings 

with them, thus sharing my all with thee.

In pleasure and in pain I stand not by the side of men, and thus stand by thee. I shrink to give up my life, and thus do not plunge into the great waters of life.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ७७ ☆

 *

तुज काय म्हणू मी, कोण म्हणू?

न कळे नाते काय आपुले

पिता, बंधु की सखा म्हणू?

*

जेथे तव पदचिन्हें रमणीय

ती भूमी मज असे पूजनीय

तू माझा समजुनि मी तेथे

उभा कसा राहू?

*

पिता म्हणू, तर जवळ न जाईन

नतमस्तक तव सामोरी होईन

आदर ठेवी दूर जरा मज,

हात कसा तव हाती धरू?

*

सखा सोबती, तू माझा जर

जवळी तुझ्या राहू का निरंतर

कवटाळुनि मम हृदयापाशी 

तुला कसा घेऊ?

*

बंधु तुला जर मानत असतो

तव आज्ञेचे पालन ना करतो

संचित माझे तुझिया सोबत 

वाटुनि का घेऊ?

*

दुःखाचे क्षण, सुखाची पखरण

अनुभवता ये, तुझी आठवण 

जीवन नौका वल्हविसी का,

भवसागर हा पार करू?

*

तू परमात्मा, तुज जीवन अर्पिन

नश्वर या जगती, पुन्हा न येईन

एकरूप तुजसवे होउनि 

मुक्ती का पावू?

 ☆

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ७८ ☆

WHEN the creation was new and all the stars shone in their first splendour, the gods 

held their assembly in the sky and sang “Oh, the picture of perfection! The joy 

unalloyed!” 

But one cried of a sudden ⎯ “It seems that somewhere there is a break in the chain of light and one of the stars has been lost. ” 

The golden string of their harp snapped, their song stopped, and they cried in dismay ⎯

“Yes, that lost star was the best, she was the glory of all heavens!” 

From that day the search is unceasing for her, and the cry goes on from one to the other that in her the world has lost its one joy! 

Only in the deepest silence of night the stars smile and whisper among themselves ⎯

“Vain is this seeking! Unbroken perfection is over all!” 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ७८ ☆

*

तारे गगनी चमकत होते

जेंव्हा झाली विश्वनिर्मिती

वैभव पाहून देवांच्या तर

आनंदा ना राहिली मिती

*

तुटली ताऱ्यांची साखळी

एक तारा कुठे हरवला

मोजीत बसला होता रात्री

कोणी एक रडू लागला

*

घाबरले देवही, गीत थांबले

सुवर्ण तारच तुटली वीणेची

हरवला ताराच म्हणती

शान होता स्वर्गाची

*

सारे होते शोधत अविरत

इकडे तिकडे, तिकडे इकडे

आनंद हरवून बसले विश्व

समजून असे मूढ रडे

*

शांत, गर्द रात्रीच्या डोही

हसती तारे अन् कुजबुजती 

व्यर्थ शोध हा वेदनेचा 

परिपूर्णता आहे जगती

☆

– क्रमशः भाग २६

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “वाह! सरताज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “वाह! सरताज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

महाराष्ट्रातील सर्व शाळांतून ‘हिंद की चादर’ नावाचा उपक्रम सुरु आहे. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ बलिदान दिलेले सिख गुरु श्री तेग बहादूरजी यांच्या स्मरणार्थ अनेक उपक्रम केले जात आहेत. या इतिहासाची विद्यार्थ्यांना शालेय वयातच ओळख व्हावी यादृष्टीने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित निबंध, गीतगायन, चित्रकला अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

गुरु श्री तेग बहादूरजी

प्रसिद्ध पंजाबी गायक श्री. सतिंदर सरताज यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या  पराक्रम आणि बलिदानाची कहाणी अगदी मोजक्या शब्दांत अतिशय प्रभावीरीत्या गाण्याच्या विडीओच्या माध्यमातून मांडली आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे गीत ऐकवण्यात येत आहे. इतरांनीही हा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, असे वाटते!    

शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोबिंद सिंग यांच्या पोटी श्री त्यागमल यांचा १ एप्रिल, १६२१ रोजी अमृतसर येथे जन्म झाला. त्यांच्या मातोश्रींचे माता नानकी असे होते. मुघल सेनेविरोधात करतारपूर येथे झालेल्या लढाईत केवळ तेरा वर्षांचे वय असलेल्या त्यागमल यांनी मोठे शौर्य गाजवले. या पराक्रमामुळे त्यांचे नाव तेग बहादूर असे ठेवण्यात आले. तेग म्हणजे तलवारीची धार, तेज. आठवे गुरु म्हणून श्री हरीरायजी गादीवर असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत शिखांचे नववे गुरु बाबा बकाला गावात वास्तव्यास असून त्यांचा शोध घ्यावा, असे सुचवले.

त्यानुसार बाबा बकाला गावात अनुयायांनी मोठा शोध घेतला. स्वत:ला गुरु म्हणवून घेणारे अनेक लोक त्या गावात निघाले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

त्याच दरम्यान माखन शा लुबाना नावाचा एक व्यापारीही गुरुंच्या शोधात बाबा बकाला गावात येऊन पोहोचला. या व्यापाऱ्याचे जहाज समुद्रात अचानक आलेल्या वादळात बुडणार होते. त्याने मनोमन गुरुंची प्रार्थना केली होती. माझे प्राण वाचले तर मी गुरुंना पाचशे सुवर्णमुद्रा भेट म्हणून देईन, असे त्याने ठरवले होते. परंतू एवढ्या मोठ्या संख्येने स्वत:ला गुरु म्हणवणारे लोक पाहून त्याच्यापुढे खरे गुरु कोण? हा पेच उभा राहिला. पण बुद्धीमान असलेल्या या व्यापा-याने एक युक्ती केली. तो प्रत्येक तथाकथित गुरुंकडे गेला. आपण माझे प्राण वाचवलेत, त्याबद्दल मी तुम्हांला दोन सुवर्णमुद्रा भेट देऊ इच्छितो असं म्हणत त्याने त्या गुरुंना दोन दोन सुवर्णमुद्रा देऊ केल्या. आणि त्या सर्वांनी त्या स्वीकारल्या! 

– —- व्यापारी निराश झाला. पण इतक्यात त्याला कुणीतरी तेग बहादूर यांचेकडे जाण्यास सुचवले. गुरुंच्या समोर दोन सुवर्णमोहरा ठेवताच गुरु तेग बहादूर म्हणाले… यात ४९८ सुवर्णमुद्रा कमी आहेत! समुद्रात जहाज बुडत असताना गुरुंना व्यापा-याने पाचशे सुवर्णमुद्रा देण्याचा नवस मनातल्या मनात केला होता… त्यामुळे कुणालाही सुवर्णमुद्रांची पाचशे ही संख्या माहीत असणे अशक्य होते. हे सामर्थ्य केवळ सिद्ध पुरुषांच्या अंगीच असू शकते, हे व्यापा-याने ओळखले… त्याचा गुरु शोध तेग बहादूर यांच्यापाशी थांबला! त्याने घराबाहेर धाव घेतली आणि आनंदातिशयाने ओरडून लोकांना सांगितले… गुरु सापडले! तेंव्हापासून शिखांचे नववे गुरु म्हणून श्री तेग बहादूरजी यांचे नाव प्रसिद्धीस आले. त्यांनी माता नानकी यांच्या नावाने एक नवीन नगर वसवले. जे पुढील काळात आनंदपूर म्हणून प्रसिद्ध झाले.

काश्मिरातील हिंदू पंडित समुदायाने इस्लाम धर्माचा स्विकार करण्याची सक्ती औरंगजेबाने केली. अन्यथा वाईट परिणामास तयार रहा असा इशाराही दिला. त्यामुळे घाबरून गेलेल्या पंडितांनी मदतीसाठी गुरु तेग बहादूर यांचेकडे धाव घेतली. हिंदू समुदायाने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शीख समुदायाकडे साहाय्य मागणे ही विशेष बाब होती. श्रीगुरू तेग बहादूर यांनी आपल्या अनुयायांना घेऊन दिल्लीकडे कूच केले.

त्यावेळच्या मुघल बादशाह औरंगजेबाची भेट घेऊन काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी सशस्त्र संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी होती. औरंगजेबाने गुरु तेग बहादूर आणि त्यांच्या अनेक अनुयायांना आग्रा येथेच कैद केली. मग दिल्लीत आणून त्यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर अमानुष अत्याचार केले. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यास अभय देण्याचे आमिषही दाखवले. पण धर्मवीर श्री गुरु तेग बहादूर यांनी स्पष्ट नकार दिल्यावर आधी त्यांचे अनुयायी भाई मतीदासजी, भाई सतीदासजी, भाई दयालाजी यांचे शस्त्राने कापून, आगीत जाळून आणि अशाच अत्यंत क्रूर पद्धतीने प्राण घेतले. तरीही कुणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही. शेवटी गुरु तेग बहादूर यांचा औरंगजेबने जाहीर शिरच्छेद करवला.

– – – या सर्वांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची कुणाची हिंमत नव्हती. तेवढ्यात त्या जागी एक मोठे वादळ उठले… धूळ उठली. गुरुजींचे अनुयायी जैता जी यांनी गुरुंचे मस्तक तिथून पळवले व ते आनंदपूर येथे पोहोचले. गुरुंचे सुपुत्र गुरु गोबिंदसिंग यांनी या मस्तकावर तेथे अंत्यसंस्कार केले. इकडे गुरुंचे दुसरे अनुयायी बंजारा लखी शा यांनी गुरुजींचे धड स्वत:च्या घरी नेले. व मुघल सैनिकांच्या नजरा चुकवून घरातच त्यांचे अग्निसंस्कार केले. त्यासाठी त्यांनी घरातच चिता रचली व घरच पेटवून दिले! 

– – हिंदू समाजाच्या रक्षणासाठी शिख गुरुंनी अशाप्रकारे बलिदान दिले. या त्यांच्या कामगिरीमुळे गुरु तेग बहादूर यांना ‘ हिंद दी चादर ‘  अर्थात हिंदू धर्मावर घातले गेलेले संरक्षक वस्त्र, कवच अशी उपाधी दिली गेली.

… गुरु तेग बहादूर यांनी रचून ठेवलेल्या पायावरच पुढे गुरु गोबिंदसिंगजी यांनी खालसा अर्थात पवित्र लढाऊ गटाची स्थापना केली व पुढे मुघलांविरोधात सशस्त्र संघर्ष केला!

– वाहे गुरु:-अद्भूत परमात्मा.

– खालसा:- शुद्ध. फतेह:-विजय.

– जो बोले सो निहाल… जो कुणी शुद्ध मनाने म्हणेल की ईश्वर शाश्वत सत्य आहे.. सत श्री अकाल… तो सुखी, मुक्त होईल! 

– – – वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फतेह.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेगळ्या वाटेने चालणारी बंडखोर, बेडर साहित्ययात्री! ☆ उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ वेगळ्या वाटेने चालणारी बंडखोर, बेडर साहित्ययात्री! ☆ उज्ज्वला केळकर ☆

 नीलम माणगावे 

नीलम माणगावे या लक्षवेधी साहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा, कविता, ललित, वैचारिक, माहितीपर, समीक्षणात्मक, संशोधनात्मक लेख, कादंबरी, संकीर्ण, बालसाहित्य इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केलय. आत्तापर्यंत त्यांची 69 पुस्तके प्रकाशित झालीत. केवळ ‘ विपुल ‘ एवढेच विशेषण त्यांच्या लेखनासाठी पुरेसे नाही. कारण त्यासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि त्यातील आशय यातील वेगळेपणामुळे त्यांचं लेखन ‘ लक्ष्यवेधी ‘ ही ठरत गेलं. त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकाला.. मग तो कविता संग्रह असो, कथासंग्रह असो, कादंबरी असो.. कुठला ना कुठला पुरस्कार मिळालेलाच आहे.

नुकताच त्यांना २००५ मधील कसदार बालवाङ्मयाच्या लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शांताबाई आणि बाबुराव शिरोळे’ पुरस्कार प्राप्त झाला. तूच आमचा हीरो, चिंगळी, आक्कुबाईचं तळं यासारखे त्यांचे कथासंग्रह मुलांना खूप आवडतील, असे आहेत. त्याशिवाय, बिलोरी कवडसे, आणि माठ हसला, पळ सोने पळ यासारखे त्यांचे ५ विज्ञान कथासंग्रह आहेत. बालवाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणजे ‘गाथा उत्क्रांतीची’.. हे सचित्र दीर्घ काव्य आहे. तिची प्रयोगशील वृत्ती यातून दिसून येते. याशिवाय, ‘परीराणी आणि छान छान गाणी’, ‘अंगणगाणी आणि रिंगण गाणी’, ‘गड्डम् गड्डम् गाणम् बडबडम्’ यासखे अनेक कविता संग्रह त्यांचे मुलांना आवडतील असे आहेत. नीलमताई शाळाशाळातून आणि वेगवेगळ्या संमेलनातून कथाकथन आणि कवितावाचन करतात म्हणजे आणि थेट मुलांशी संवाद साधतात.

नीलमताईंच्या साहित्याचा अभ्यासक्रमात, पाठयक्रमातही समावेश झालेला आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड इ. ५वी (लोअर मराठी) ‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेचा समावेश. याच कवितेचा कर्नाटक राज्यच्या ८ वीच्या पाठ्यपुस्तकात, (थर्ड लँग्वेज) समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूरच्या एम. ए. – भाग १ पार्ट १मध्ये ‘पळ सोने पळ’ या बालकथेचा अमावेश झाला आहे.

लवाङ्मयाच्या त्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा उल्लेख करायचा झाला तर, ‘डॉलीची धमाल’या कादंबरिकेचा उल्लेख करायला हवा. ‘डॉली समवयस्क मुलांशी खेळणारी एक मुलगी. सर्वांना ती हवीहवीशी वाटते. एकदा ती सर्वांचा निरोप घेते. कादंबरीच्या शेवटी रहस्य उलगडते. ‘डॉली हे मुळी मुलगीच नसते. ती असते रोबोट॰ आता तिची बॅटरी संपत आलेली असते. नवीन तंत्रज्ञानाचा किती सुरेख वापर करून घेतला आहे इथे. या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

म. सा. प. चा नीलमताईंना मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. त्यापूर्वी त्यांना एकंदर कविता लेखनासाठी ‘ना. घ. देशपांडे’ पुरस्कार मिळाला होता.

विषय-वैविध्याबरोबर आशयातील वेगळेपणा, नाविन्य, कल्पकता, प्रयोगशीलता ही त्यांच्या कवितांची काही ठळक वैशिट्ये सांगता येतील. त्यांच्या ‘खचू लागली भुई ‘ या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

‘पैंजण’ ही नीलमताईंची अतिशय गाजलेली कविता. कविता चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे…

… आजी जड, वजनदार पैंजण घालून आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.

… आईने जड, वजनदार पैंजण वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.

… तिसर्‍या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्‍या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ हे सगळं सहन केलं.

… आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊ देत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी… ’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्‍या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.

– – स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी ’ असं म्हणणारी माझी मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.

 – – ही कविता मुक्तछंदात आहे. प्रत्येक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची… ’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, ’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको… ’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले, नव्हे. तसं नव्हेच ! आपोआप लेखणीतून उतरत गेले असणार.

… २०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे… महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भारतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.

नीलमताईंचं, ‘जसं घडलं तसं’ हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. च्या भाग १ साठी पाठ्यपुस्तक म्हणून लावण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कवितांवर एक प्राध्यापक एम. फील. करत आहेत. तर, दुसरे प्राध्यापक त्यांच्या एकूण कथांवर एम. फील. करत आहेत.

नीलमताईंच्या अनेक कवितांना प्रयोगशीलतेचा स्पर्श आहे. उदा. सरोगेट मदरवरील कविता ‘भांडवली ज्ञान’,

 – – पण तिची अलीकडे प्रकाशीत झालेली ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ आणि ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ ही दोन पुस्तके म्हणजे तिच्या प्रयोगशीलतेचा आगळा-वेगळा आविष्कार म्हणावी लागतील. मुक्तछंदात लिहिलेले काव्यात्म संवाद यात आहेत. ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ मध्ये बापूजी आणि त्यांचा चरखा यातील काव्यात्म संवाद आहे. तर, ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बोधीवृक्ष यांच्यातील संवाद आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती याच्या अनुषंगाने हे संवाद आहेत. संवादांच्या विषयात साम्य आहे, पण दोन्हीतील आशय वेगवेगळा आहे.

लेखिकेच्या प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण सांगायचं, तर तिने ‘खेळखंडोबा’ नावाची एक लघु कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत तिने हत्तींच्या माध्यमातून अनेक महत्वाचे प्रश्न, विशेषत: धर्माबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेत.

नीलमताईंच्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ‘निर्भया अजून लढते आहे. ’ हा त्यांचा दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहातील सर्वच कथांचे ‘बलात्कार’ हे सूत्र आहे. यात बलात्काराचे वर्णन कुठेच नाही. त्यामागची कारणमीमांसा, मानसिकता, तशी मानसिकता निर्माण होण्यामागची विशिष्ट परिस्थिती याचे दर्शन या कथांमधून लेखिकेने घडवले आहे. वृत्तपत्रातून आपण बलात्काराच्या बातम्या वाचतो, टी. व्ही. वरून ऐकतो. क्षणभर हळहळतो. मग सोडून देतो. लेखिकेने ती बीजे आपले विचार, मनन-चिंतन यांचे खत-पाणी घालून जोपासली. आपल्या कल्पक रचना कौशल्याच्या निगराणीने, त्यातून सशक्त झाडे निर्माण केली. जोपासली.

– या संग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.

नीलमताई एक प्रतिभासंपन्न, यशस्वी लेखिका आहेत, तशाच त्या बंडखोरही आहेत. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांवर त्यांचा विश्वास आणि निष्ठा आहे. त्यांची जिथे पायमल्ली होताना दिसते, तिथे त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येते.

नीलमताई स्वत: जैन धर्मीय. तरीही जैन धर्मातील चुकीचे रीतिरिवाज, वा परंपरा, वाईट चाली-रीती, काही अनुयायांचे बेताल वर्तन, भ्रष्टाचार यावर त्यांनी आपल्या लेखनातून टीका केली. ही त्यांची मोठीच बंडखोरी म्हणायला हवी… कधी लेखाच्या, कधी कवितेच्या, कधी कथेच्या माध्यमातून. उदा. ‘शांते तू जिंकलीस. ’ ही कथा. इथे शांता मंदिरासाठी पट्टी द्यायला नकार देते. म्हणून गाव तिच्यावर बहिष्कार टाकतो. तिला वाळीत टाकतो. पुढे तिच्या मुलाचा मृत्यू होतो. त्याचे अंत्यसंस्कार करायला कुणीच येत नाही. तेव्हा ती आणि तिची सासू चादरीची झोळी करून त्यातून त्याला स्मशानाकडे नेऊ लागतात. नंतर ते पाहून हळूहळू गाव त्यात सामील होतो. – – याच शीर्षकाच्या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.

नीलमताईंच्या या धर्मावर टीका करणार्‍या लेखनाने समाजातील अनेकांची अस्मिता दुखावली. आपल्याच धर्माविरुद्ध ती असं कसं लिहू शकते? समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी तिने यापुढे असं लेखन करायचे थांबवावे, असा तिला समज दिला. इतकेच नाही, तर असं काही यापुढे लिहिलं, तर तुमच्या घरावर आम्ही दगडफेक करू, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. पण त्या आपल्या जागी अढळ राहिल्या. जे मनाला पटेल, योग्य वाटेल, ते अव्याहतपणे लिहीत गेल्या. या सर्व प्रकरणात त्यांचे जोडीदार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुळात ते स्वत: अं. नि. स. चे कार्यकर्ते. वैचारिकदृष्ट्या ते त्यांच्याशी सहमत होते.

नीलमताईंच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष नित्यश: बहरत, फुलत, दरवळत राहोत. त्याने वाचकांना आनंद मिळो. त्यांचे भोवतालचे भान जागृत करो, संवेदनशीलता निर्माण करो… या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

☆

© उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनारसा शिळा का मानत नाहीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ अनारसा शिळा का मानत नाहीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

अनारसा शिळा का मानत नाहीत?

 — परंपरा आणि Food Science 

अधिक महिन्यात अनारसाचे दान करण्याची जुनी परंपरा आहे.

शास्त्रात अनारसाला “अपूप” म्हटले जाते आणि विशेष म्हणजे —

अनारसा हा शिळा मानला जात नाही! 

पूर्वीच्या लोकांनी हे फक्त श्रद्धेपोटी सांगितले नव्हते… त्यामागे खूप सुंदर Food Science दडलं आहे.

साधारण भात, पोळी, भाजी यामध्ये moisture जास्त असतो. त्यामुळे त्यामध्ये सूक्ष्मजंतू लवकर वाढतात आणि अन्न लवकर खराब होते.

– – पण अनारसा वेगळा आहे..

१) Deep Frying Science

अनारसा तुपात / तेलात व्यवस्थित तळला जातो.

तळताना : त्यातील बराच moisture कमी होतो. बाहेरचा भाग crisp होतो. high temperature मुळे बरेच microorganisms नष्ट होतात, म्हणून तो जास्त टिकतो.

२) गूळ आणि साखरेची कमाल

अनारसामध्ये गूळ आणि साखर भरपूर असते.

हे दोन्ही :

✔️ नैसर्गिक preservative सारखे काम करतात

✔️ moisture bind करून ठेवतात

✔️ खराब होण्याची प्रक्रिया मंदावतात

म्हणून अनारसा पटकन आंबत नाही.

३) Fermentation चा फायदा

अनारसाचे पीठ मुरवले जाते. या fermentation मुळे texture सुधारते, shelf life वाढते, पचनास मदत होते… पूर्वी refrigerator नसतानाही लोकांना अनुभवाने हे माहिती होते.

४) Low Moisture = जास्त टिकाऊ

अनारसामध्ये पाणी फार कमी उरते.

Food Science मध्ये एक नियम आहे —“जितका कमी moisture तितके अन्न जास्त टिकते. ”

म्हणूनच चिवडा, शेव, पापड, अनारसा

हे पदार्थ जास्त दिवस टिकतात.

५) म्हणूनच दानासाठी योग्य 

पूर्वी प्रवास, दानधर्म, व्रतवैकल्य यासाठी टिकणारे पदार्थ महत्वाचे होते.

– – अनारसा : पौष्टिक, टिकाऊ पोटभर ऊर्जा देणारा आहे.

म्हणून अधिक महिन्यात “अपूप दान” करण्याची परंपरा निर्माण झाली.

खरंतर आपल्या जुन्या पदार्थांमध्ये फक्त चव नाही तर अनुभव, ऋतुचक्र, आरोग्य आणि अप्रतिम Food Science दडलेले आहे.

आज विज्ञान जे सांगतंय…ते आपल्या आजीला अनुभवाने आधीपासून माहिती होतं

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!! – मंदोदरी” – लेख क्र. ८ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!! – मंदोदरी” – लेख क्र. ८. ☆ प्रा.भारती जोगी ☆

लंकेच्या रणभूमीवर ची ती काळ रात्र! नजर जाईल तिथे शवांचा खच पडलेला, रक्ताचे पाट वहाताहेत, आणि अशातच… चतुर्वेद, सहा उपनिषदे, आयुर्वेद यांचं संपूर्ण ज्ञान असलेला ज्ञानी, विश्रवा ऋषींचा आणि उच्च दानव कुळातील माता कैकसी चा पुत्र… दशानन… रावण… रक्तरंजित अवस्थेत, धराशायी होत मृत होऊन पडलेला. तिन्ही मुलं ही युद्धात मारली गेलेली.

पतीच्या आणि पुत्रांच्या मृत्युची वार्ता कानी येताच, जीवाच्या आकांताने, दु:खावेगाने वेडीपिशी होत धावत गेली रणभूमीवर! पतीच्या शवाजवळ बसली… शोकमग्न मंदोदरी च्या मुखातून शब्द बाहेर पडले…

राम विमुख अस हाल तुम्हारा,

रहा न को कुल रोवन हारा!

उठली दु:खावेगाने आणि आक्रंदन करीत विचारती झाली… ” कुठे आहे तो, ज्याने माझ्या पतीला मारलं?? “

तिला अंगुली निर्देशाने दाखविले आणि सांगितले गेलेल्या दिशेला ती गेली.

तिथे एका शीळेवर प्रभू श्रीरामचंद्र खाली मान घालून, दु:खी, उदास, हताश बसलेले. युद्धात झालेल्या जीव हानी ने किंकर्तव्यमूढ बसलेले. अचानक एक सावली दिसते पायाजवळ… लक्षात येते की कुणा स्त्री ची सावली आहे… लगेच उभे रहातात, वळून मोठ्या अदबीने म्हणतात, ” माते, प्रणाम ! कोण आहेस तू? “…….. मर्यादा पुरूषोत्तम राम तिच्या पुढ्यात, विनम्रपणे नतमस्तक झालेला… मंदोदरी ला परस्त्रीचे अपहरण करणा- या रावणाला हरविणा-याची खरी ताकद दिसली आणि कळली ही !! तिच्या पुढ्यात झुकून उभा होता… ब्रह्मा पुत्र, मांधाता ला आव्हान देणा-या, कुबेराला खाली आणणा-या, सा-या जगाला हरविणा-या रावणाला ठार मारणारा… श्रीराम!!! तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. मर्यादा पुरूषोत्तमाच्या या… स्त्री च्या सावलीचं ही भान ठेवणा-या, पर स्त्री मातेसमान मानणा-या या पुरूषोत्तमाच्या उंची पुढे तिला… परस्त्रीचं अपहरण करून आणणारा तिचा लंकापती दशानन अगदीच थिटा वाटला. ती वरमून परतली.

मंदोदरी…. नित्य स्मरणीय अशा पंचकन्यांपैकी एक! पण ही येवढीच तिची ओळख नाही. याच्या पलिकडे ही तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, कंगोरे आहेत जे अलक्षित राहिले आहेत. रामायण म्हणजे… राम, सीता, लक्ष्मण, हनुमान… हेच डोळ्यासमोर येतात लगेच! पण यां व्यतिरिक्त ही अशी व्यक्ती चित्रे आहेत ज्यांच्या बद्दल फारशी माहिती नाही अधोरेखित झाली. त्यातीलच एक आहे… रावणाची पत्नी मंदोदरी!! 

 मंदोदरी… असुरांचा राजा मयासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या. पुराणात तिच्या जन्माविषयी वेग वेगळ्या कथा आहेत. तरीही मान्यतेनुसार ती मधुरा नावाची शापित अप्सरांचे, जी बेडकीरूपातून पूर्व रूपात आल्यावर मयासुर आणि हेमा तिला दत्तक घेतात.

…. सुंदरता, बुद्धीमत्ता, आणि नैतिकता याचा अद्वितीय संगम म्हणजे मंदोदरी! अतिशय धर्मपरायण!! रावणाशी विवाह होऊन लंकेला येते आणि सोन्याच्या लंकेची महाराणी बनते. वेद, शास्त्र, विविध कला संपन्न असलेली मंदोदरी, अगदी ख-या अर्थाने…

.. कार्येषु दासी, करणेषु मंत्री, भोजेषु माता, रूपेषु लक्ष्मी, शयनेषु रंभा, क्षमायेषु धरित्री!

अशी… षट्कर्मयुता कुलधर्म पत्नी होती. तिचा भविष्याचा ही अभ्यास होता. असं म्हणतात की ती रावणाशी बुद्धिबळाचा खेळ ही खेळत असे. बुद्धिबळाची सुरुवात तिनेच केली असं म्हंटलं जातं! 

अशा या बुद्धी मान आणि भविष्य जाणणा-या मंदोदरी ला जेव्हा रावणाने सीताहरण केल्याचे कळते तेव्हा तिला अतिशय क्लेष होतात. पर स्त्री, तीही विष्णू चा अवतार असलेल्या प्रभु रामचंद्रांची पत्नी सीता… हिच्या विषयी असा काम आणि मोह भाव जागृत होऊन तिचं हरण करणा-या रावणाला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे हे तिला लक्षात आले… रावणावर निरतिशय प्रेम आणि निष्ठा असलेल्या मंदोदरी ने त्याला वारंवार धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी समजावले, सल्ला दिला. तिने लंकेची नीती आणि रावणाची चेतना शक्ती बनून राहण्याची सतत धडपड केली.

सीतेला सन्मानाने श्रीरामाकडे परत पाठविण्यातच लंका आणि लंकाधिपतीचं भलं आहे हे ती पुन:पुन्हा समजावत राहिली, विनवत राहिली…..

 विनंती करी मंदोदरी|

वाया आणिली जानकी घरी|

 *

लाज झाली तिहीं लोकी||

 *

मज पाहता हे विवसी|

क्षय आणिला कुळासी||

 अभिलाषिता पर सती|

हे तो नव्हे राजनीती|

 ज्याते ध्यानी ध्याती योगी|

तो मज येतो भेटीलागी|

 तया रामासी विन्मुख होणे|  

जळो जीणे लाजिरवाणे||

 – – संत नामदेव.

संत नामदेवांनी सुद्धा मंदोदरीच्या, रावणाला समजावण्याची, तिच्या पत्नी धर्माची, दखल घेतली आहे हे विशेष!! अधर्मात ही धर्म सांभाळण्याची पराकाष्ठा आणि निकराचे प्रयत्न करणा-या मंदोदरी चे पती प्रेम आणि विवेक ; रावणाच्या अहंकार आणि क्रोधापुढे हारलं!! 

तिला पतीची हार, रक्तरंजित शेवट दिसत होता, पण तरीही या पतीला प्रेरित करणा-या, पतीची चेतना बनलेल्या समिधेचं तेज, सामर्थ्य, चेतना निस्तेज झाली, स्फुल्लिंग मंदावलं पतीच्या क्रोधाहंकाराच्या धगधगत्या होमकुंडापुढे!! आणि तिच्या नशिबी आलं ते एकटेपण!! एकटीने जळत रहाणं!!

…. जळो जिणे हे लाजिरवाणे!!…. हाच सल, हाच चटका, हाच डाग उरी घेऊन ही समिधा जळत राहिली!! 

– लेख क्र. ८.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हरवलेला महिना आणि सापडलेलं संतुलन.. – लेखिका : तृष्णा (रानू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेला महिना आणि सापडलेलं संतुलन.. – लेखिका : तृष्णा (रानू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

एकदा काय झालं…

आकाशात सूर्य आणि चंद्र यांच्यात एक शांत पण महत्वाची स्पर्धा चालू होती.

दोघेही आपापल्या मार्गाने जग चालवत होते…

सूर्य म्हणाला,

“मी ऋतू ठरवतो… उन्हाळा, पावसाळा, हिवाळा… माझ्यामुळेच पृथ्वीवर जीवनाचं चक्र चालतं. ”

चंद्र हसून म्हणाला,

“आणि मी वेळ मोजतो… अमावस्या, पौर्णिमा, सण, व्रत… लोकांच्या भावना माझ्याशी जोडलेल्या आहेत. ”

– – दोघंही बरोबर होते… पण एक समस्या हळूहळू वाढत होती.

गोंधळाची सुरुवात…

चंद्राच्या वर्षात 354 दिवस होते,

आणि सूर्याच्या वर्षात 365 दिवस.

– – दरवर्षी 11 दिवसांचा फरक वाढत गेला…

सुरुवातीला कोणी लक्ष दिलं नाही,

पण काही वर्षांनी लोकांना जाणवायला लागलं—

– – दिवाळी कधी उन्हाळ्यात येऊ लागली

– – होळीचा ऋतू बदलायला लागला

– – सण आणि ऋतू यांचा ताळमेळ बिघडायला लागला

– – – जगात एक अदृश्य गोंधळ निर्माण झाला…

एक “नकोसा” महिना– 

या गोंधळातून एक अतिरिक्त महिना निर्माण झाला…

पण त्याला कोणी स्वीकारायला तयार नव्हतं.

लोक म्हणाले—

“तू कोण? तुला नाव नाही… स्थान नाही… तुझ्यात कोणताही सण नाही…”

तो महिना एकटा पडला…

त्याला “मलमास” म्हणत दुर्लक्षित केलं जाऊ लागलं.

तो दु:खी झाला… आणि थेट देवांकडे गेला.

देवाची करुणा

– – तो महिना देवाकडे गेला आणि म्हणाला—

“माझं अस्तित्व का आहे… जर कोणी मला मानतच नाही?”

देव हसले… आणि म्हणाले—

“तू विशेष आहेस… कारण तू संतुलन आणतोस.

तुझ्यामुळेच वेळ पुन्हा योग्य मार्गावर येते. ”

आणि त्यांनी त्या महिन्याला आपलं नाव दिलं—

“ पुरुषोत्तम मास ”

त्या दिवसापासून…

जो महिना एकेकाळी नाकारला गेला होता,

तोच सर्वात पवित्र मानला जाऊ लागला.

विज्ञानाची गोष्ट

ही कथा आपल्याला भावना शिकवते…

पण त्यामागे एक अचूक विज्ञान आहे.

पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसात फिरते

चंद्र पृथ्वीभोवती 354 दिवसात त्याचे 12 महिने पूर्ण करतो

– – दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो.. हा फरक साचत जातो…

.. आणि साधारण 2. 5 ते 3 वर्षांत तो एक पूर्ण महिना होतो

म्हणून—

– – हा “अधिक मास” calendar मध्ये जोडला जातो

.. आणि सण व ऋतू पुन्हा संतुलित होतात

धार्मिक महत्त्व

अधिक मास आपल्याला एक वेगळी शिकवण देतो—

– – जीवनात जे “extra” वाटतं… तेच कधी कधी सर्वात महत्त्वाचं असतं

– – हा महिना फक्त वेळेचा भाग नाही… तर *आत्मशुद्धीचा काळ* आहे

या काळात माणूस जाणीवपूर्वक थांबतो…

बाहेरच्या गडबडीपासून दूर जाऊन… स्वतःकडे वळतो…

– – जप आणि नामस्मरण केलं जातं —

भगवंताचं नाव घेताना मन हळूहळू स्थिर होतं

– – व्रत आणि उपवास पाळले जातात —

शरीरावर नियंत्रण ठेवताना मनही शिस्तीत येतं

– – दान आणि सेवा केली जाते —

कारण या काळात दिलेलं दान केवळ इतरांसाठी नसतं…

तर आपल्या मनालाही हलकं करतं

– – धार्मिक ग्रंथांचं वाचन केलं जातं —

जेणेकरून विचार अधिक स्वच्छ आणि सकारात्मक होतील

आणि म्हणूनच—

लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, मोठे शुभ समारंभ टाळले जातात

हा काळ “नवं काही सुरू करण्याचा” नसून…

आधी स्वतःला समजून घेण्याचा आणि घडवण्याचा असतो

कारण…

आयुष्याच्या या सतत चालणाऱ्या प्रवासात,

“अधिक मास” म्हणजे एक छोटासा विसावा असतो…

— — असा एक थांबा…

जिथे आपण धावणं थोडं थांबवतो,

पण थांबतो ते हरण्यासाठी नाही…

— — तर स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी…

नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी…

— — जेणेकरून पुढचा प्रवास

अधिक स्पष्ट… अधिक मजबूत… आणि अधिक सुंदर होईल…

एक वेगळी जाणीव…

कदाचित… आपल्या आयुष्यातला “अधिक मास” म्हणजेच तो काळ…

ज्याला आपण टाळतो…पण जो आपली स्वतःशी भेट घडवतो…

कधी कधी आयुष्यातही असा “अधिक मास” येतो…

सगळं थांबल्यासारखं वाटतं…

पण खरं तर… तोच काळ आपल्याला आतून घडवत असतो…

कुणीतरी खूप सुंदर म्हटलंय—

“Sometimes stopping is better to bounce back hard…”

आणि खरंच…

— — “कधी कधी थांबणं म्हणजे मागे पडणं नसतं…

थांबण्यातही एक वेगळी ताकद असते…

— — आणि ही थांबलेली पावलं हरवत नाहीत…

ती फक्त उंच भरारीसाठी तयारी करत असतात…”

शेवटची जाणीव

अधिक मास आपल्याला सांगतो—

— — — “जी गोष्ट सुरुवातीला नकोशी वाटते…

.. तीच कधी कधी जीवनात संतुलन आणणारी ठरते…”

☆

लेखिका : तृष्णा (रानू)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४९ – – 

सदा बोलिल्यासारीखे चालताहे|

अनेकी सदा एक देवासी पाहे|

सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४९|

अर्थ :  जो बोलण्याप्रमाणे वागतो, परमेश्वराची जरी अनेक रूपे असली तरी तो एकच आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, सगुण परमेश्वराची उपासना करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका असत नाही असा भक्त त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त असतो.

विवेचन : खऱ्या भक्ताची फार सुंदर लक्षणे समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहेत. परमेश्वराचा प्रिय भक्त होणे ही सोपी गोष्ट नाही. जशी रोगातून बरे होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावी लागतात, तशीच पथ्ये भक्ताला देखील पाळावी लागतात. आपले संत म्हणजे “बोले तैसा चाले” या तुकोबांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होत.

व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा खोटे बोलत असतो. बऱ्याच व्यक्ती बोलतात एक आणि करतात दुसरे ! अशा व्यक्ती दुसऱ्याला उपदेश करण्यात आघाडीवर असतात. परंतु स्वतःवर वेळ आली की त्यांचे वागणे वेगळे असते. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घाला असे सांगणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसतात. लग्नप्रसंगी हुंडा घेऊ नये, अवास्तव खर्च करू नये अशी सांगणारी मंडळी त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वारेमाप खर्च करताना दिसतात. असे वागणे म्हणजे दुटप्पी वागणे होय.

संतांच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता असते. “काय उणे आम्हां विठोबाचे पायी… “असे तुकाराम महाराजांनी म्हटले. किंवा “सोने रूपे आम्हां मृत्तिकेसमान, ” असे जे त्यांनी म्हटले ती त्यांची अंतरंगातून आलेली निरपेक्ष वृत्ती होती. विरक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना सोने, नाणे, वस्त्र इत्यादी स्वरूपात नजराणा पाठवला तेव्हा त्यांनी तो नाकारला. छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांन आपले गुरु मानत. एकदा तर त्यांनी आपले राज्य समर्थांना चिठ्ठी लिहून झोळीत अर्पण केले होते. परंतु समर्थांनी ते त्यांना परत केले. अशी असते संतांची निरपेक्ष वृत्ती !

अशी भक्ती आणि विरक्ती अंगात भिनली पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसे आहोत परंतु संतांनी दाखवलेल्या या मार्गावर वाटचाल तर करू शकतो ! माझ्या प्रपंचासाठी आवश्यक तेवढे धन मी मिळवीन. इतरांचे धन किंवा पैसा माझ्यासाठी मृत्तिकेसमान असेल. परस्त्रीकडे मी माता किंवा भगिनी म्हणून पाहीन या गोष्टी तर आपल्याला सहज करता येण्यासारख्या आहेत.

ज्याप्रमाणे आपल्या देशाबद्दल बोलताना आपण म्हणतो की आपल्या देशात अनेकतेत एकता आहे. त्याप्रमाणे परमेश्वराची विविध रूपे आणि विविध नावे असली तरी चैतन्यरूपी असलेला तो परमेश्वर एकच आहे. अनेक संतांनी हे सत्य एकमुखाने सांगितले आहे. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ज्याप्रमाणे विविध नद्या एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे विविध देवदेवतांना केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. पण आम्ही सामान्य माणसे हे समजून घेताना गोंधळ करतो. देवामध्ये कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करत बसतो.

स्थुलाकडून सूक्ष्माकडे तशी सगुणाकडून निर्गुणाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. भगवंताचा श्रेष्ठ भक्त ही गोष्ट जाणून असतो. निर्गुण निराकाराप्रती त्याची श्रद्धा असते. परंतु तरी देखील सर्वसामान्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांचीही वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे व्हावी अशी त्याची इच्छा असते म्हणूनच तो सगुणाची देखील पूजा करतो. असे करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका किंवा कोणताही भ्रम असत नाही. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे हे तो जाणून असतो. असा भक्त भगवंताचा त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त होय.

स्वसंवाद :: 

१. माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे का? मी इतरांना जे सांगतो ते स्वतः पाळतो का, याचा मी कधी प्रामाणिकपणे विचार केला आहे का?

२. परमेश्वराची विविध रूपे पाहताना माझ्या मनात श्रेष्ठ-कनिष्ठाचा भेद येतो का? “अनेकी एक” हे तत्त्व माझ्या उपासनेत उतरले आहे का?

३. संतांच्या निरपेक्ष वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझ्या दैनंदिन जीवनात मी एखादी तरी गोष्ट निरपेक्षपणे करतो का?

४. सगुण उपासना करताना माझ्या मनात शंका, भ्रम किंवा न्यूनगंड येतो का? माझी श्रद्धा अविचल आहे का?

५. “सर्वोत्तमाचा दास” होण्याच्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे असे मला वाटते का?

– – – 

श्लोक क्र. ५० – – 

नसे अंतरी कामकारी विकारी |

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी|

निवाला मने लेश नाही तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५०|

अर्थ : ज्याच्या मनामध्ये कामवासनेसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या विकार उत्पन्न करणाऱ्या वासना उत्पन्न होत नाहीत, जो वृत्तीने विरक्त असून ब्रह्मचारी राहून तपस्या करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेशही उरत नाही, ज्याचे मन अत्यंत शांत आणि क्रोधरहित होते, असा मनुष्य त्या सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

(कामकारी – कामवासना, विकारी – विकृती/अशांती निर्माण करणारा, उदासीन – तटस्थ/निर्विकार, निवाला – शांत/तृप्त, लेश – अंश, तम – अंधार /अज्ञान/ मोह/ अविचार)

विवेचन : मागील काही श्लोकांपासून समर्थ आपल्याला खऱ्या भक्ताची लक्षणे सांगत आहेत. एकेक श्लोक वाचून त्याचा अर्थ लक्षात घेतला की आपणही मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने समृद्ध होत जातो. आपण जर साधक असू, तर आपण कसे असायला हवे हे यातून कळते.

कामवासना ही माणसाच्या मनातील इतर वासनांपेक्षाही अधिक बलवान असलेली वासना असते. ती अनेक विकार म्हणजेच विकृती उत्पन्न करते. जेव्हा कामवासनेवर माणसाचे नियंत्रण नसते, तेव्हा त्याची बुद्धी काम करत नाही. त्याचा विवेक हरवतो आणि मग नको त्या गोष्टी त्याच्या हातून घडतात. समाजात अनेक राजकारणी व्यक्ती, साधू, संत, बुवा, बाबांचे असे अधःपतन होताना आपण पाहतो.

भगवंताचा सच्चा भक्त मात्र कामवासनेला आपल्या मनाचा ताबा घेऊ देत नाही. वृत्तीने तो उदासीन असतो. या ठिकाणी उदासीन या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊया. सामान्यतः आपण असे समजतो की उदासीन म्हणजे उदास, कंटाळवाणा, ज्याला कशातच गोडी वाटत नाही अशी व्यक्ती. परंतु इथे समर्थांनी हा शब्द त्या अर्थाने वापरलेला नाही. उद् म्हणजे वरच्या दिशेने. लिफ्टला मराठी शब्द उद्वाहक असा आहे. या अर्थाने उदासीन म्हणजे वरची पातळी. सामान्य लोकांपेक्षा साधक एका वेगळ्या वरच्या पातळीवर स्थिर झालेला असतो. देहसुखाला महत्त्व न देता भगवंताच्या नामात तो स्थिर असतो. असा साधक म्हणजे उदासीन.

तो तापस असतो म्हणजे तपस्या करणारा. तपस्या करण्यासाठी आपल्याला कोणी ऋषीमुनी व्हावे लागेल असे नाही तर भगवंताच्या मार्गावर चालण्यासाठी एक प्रकारची साधना आणि त्यातील सातत्य आवश्यक असते. ही साधना म्हणजेच तपस्या असे म्हणता येईल.

‘ब्रह्मचारी’ या शब्दाचा अर्थ देखील या ठिकाणी आपण समजून घेऊ. व्यवहारात आपण ब्रह्मचारी म्हणजे लग्न न केलेला किंवा ब्रह्मचर्य पाळणारा असा अर्थ घेतो. जो विवेकाचा वापर करून आपल्या मनावर संयम ठेवतो आणि ब्रह्मचर्याचे पालन करतो अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे ब्रह्मचारी. मग ती लग्न झालेली असो किंवा नसो. संसारात राहून देखील ब्रह्मचर्याचे पालन करता येणे शक्य असते आणि खरा साधक त्याचे पालन करतोच. आरोग्य किंवा विद्या प्राप्त करण्यासाठी जसे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते त्याप्रमाणेच साधना मार्गातही ब्रह्मचर्याचे अतिशय महत्त्व आहे.

तिसऱ्या ओळीत समर्थांनी साधकाचे आणखी एक लक्षण सांगितले आहे. ते म्हणजे त्याच्या मनात तमाचा म्हणजे मोह, अज्ञान आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाचा लवलेशही नसतो. काम आणि क्रोध हे बहुधा जोडीनेच आपल्या मनामध्ये वास करत असतात. काम आणि क्रोध या दोन्हींचा अतिरेक झाला की माणूस आपली विचारशक्ती आणि विवेक हरवून बसतो मग त्याच्या हातून नको त्या गोष्टी घडतात. साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या आणि ज्यांनी बऱ्यापैकी त्यात प्रगती केली आहे अशा व्यक्तींना देखील काम आणि क्रोध यावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्यांचे अधःपतन झालेले दिसून येते. महर्षी विश्वामित्रांचे उदाहरण तर आपणा सर्वांना माहिती आहे.

खरा भक्त या सगळ्या वासना आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो. त्याचे मन शांत आणि तृप्त असते. म्हणून आपण जे खरे संत किंवा साधक आहेत, त्यांच्याजवळ शांतीचा अनुभव घेतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि तेज असते. ते त्यांच्या साधनेतून आणि मानसिक शांततेतून आलेले असते. संत तुकाराम म्हणतात…

शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥१॥

म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु. ॥

खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥

तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३||

– – म्हणून काम, क्रोध आदी विकारांवर नियंत्रण असलेला, ब्रह्मचर्याचे पालन करणारा आणि साधना मार्गावर सातत्याने वाटचाल करणारा भक्त म्हणजे त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील उत्कृष्ट असा भक्त होय.

स्वसंवाद :: 

१) माझ्या मनावर कामवासना आणि क्रोध यांचे किती प्रमाणात नियंत्रण आहे – हे मी प्रामाणिकपणे तपासले आहे का ?

२) “उदासीन” म्हणजे वरच्या पातळीवर स्थिर राहणे – माझी साधना मला या पातळीकडे नेत आहे का की मी अजून सांसारिक गोष्टींमध्येच गुंतलेलो आहे ?

३) संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते – माझ्या दैनंदिन जीवनात मनावर संयम ठेवण्याचा माझा प्रयत्न किती प्रामाणिक आहे ?

– क्रमशः श्लोक ४९ आणि ५०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अधिक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अधिक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

खरं तर अधिक महिना म्हणजे पंचांग, कालमापनामधे येत असलेला फरक काढून कालगणना सुरळीत व्हावी यासाठी केलेली सोय आहे.

पण आपण आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी साजऱ्या करत असतो,

थोडक्यात काय तर इंग्रजी कॅलेंडर मधे लीप वर्ष येते अगदी तसंच.

याला अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि बोली भाषेत धोंडयाचा महिना असं म्हणलं जातं.

या निमित्ताने बरीच व्रत वैकल्ये, जप, तप, वाचन, मनन, नामस्मरण आणि दान यांचे खूप महत्त्व आहे.

या मधे मला काही गोष्टींचा समावेश करावा असे वाटते.

– – चांगल्या सवयी, विचार नेहमीच प्रेरणादायी असतात.

अधिकात करूया 33 सकारांची जोपासना…

सध्या चालू असलेला अधिकमास म्हणजे दानधर्म, व्रतवैकल्ये करुन पुण्यसंचय करायची सुवर्णसंधीच.

अधिक मासात 33 संख्येला विशेष महत्त्व.

दान करायच्या वस्तू 33 या संख्येने – – या दानालाच 33 सकारांची जोड मिळाली तर ! 

कोणते हे ३३ सकार? बघूया…

१) सदाचार  २) सद्भावना ३) समयसूचकता ४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता ७) सहजता (वागण्या – बोलण्यातील) ८) सौजन्य  ९) स्नेहभाव  १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान १२) सौम्यपणा १३) सुदृढता (शरीर व मनाची)  १४) सत्यवादित्व  १५) संकल्प  १६) संयम  १७ स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती २०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टि २३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषतः आपल्या क्षेत्रातील) २५) सरसत्व  २६) सातत्य  २७) समाधान २८) स्वावलंबन २९) सजगता (सावध राहणे) ३०) सुसंस्कार ३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुंसेवा

 हे ३३ सकार आत्मसात करायचे या अधिकमासाच्या निमित्ताने ठरविले तर आयुष्य नक्कीच सफल, सुकर, समृद्ध सुखी होईल. आपण खरोखरच सधन होऊ नाही का?

(पुन्हा ‘स’ आहेच)

… सत्यम् शिवम् सुंदरम् ची अनुभूती यायला वेळ लागणार नाही.

… मात्र हे सकार आत्मसात करायला सकारात्मकता हवी हे निश्चित.

प्रयत्न करायला काय हरकत आहे?…

अधिकस्य अधिकं फलम्

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक  संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४७ आणि ४८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ४७ – – – 

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे|

जनी जाणता भक्त होऊनि राहे|

गुणीं प्रीति राखे क्रमूं साधनाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |४७|

अर्थ : ज्या साधकाला आपल्या देहाच्या आत आणि बाहेर एकमात्र भगवंतच दिसतो, जो जाणता म्हणजे ज्ञानी भक्त म्हणून जगात वावरतो, जो सगुणाचे प्रेम टिकवतो आणि साधनेचा क्रम कायम राखतो असा भक्त म्हणजे सर्वोत्तमाचा (भगवंताचा)दास हा खरोखरीच जगात धन्य होय.

विवेचन : या ४७ व्या श्लोकापासून ते ५६ व्या श्लोकापर्यंत जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा हे अंतिम चरण आहे. यात समर्थ ज्ञानी साधकाचे किंवा भक्ताचे गुण सांगतात.

या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात, ” मनी लोचनी श्रीहरी तो चि पाहे” यामध्ये जो परमेश्वराचा भक्त असतो तो मनात आणि लोचनात म्हणजे डोळ्यांमध्ये परमेश्वराचे रूप पाहतो. इथे दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मनामध्ये त्याचे निर्गुण रूप असते आणि नेत्रांना म्हणजेच बाह्य जगतात त्याचे दृश्य रूप किंवा सगुण रूपाचे दर्शन होते. तात्पर्य म्हणजे आत बाहेर सर्वत्र त्याला परमेश्वराचेच दर्शन होत असते. भक्त हा शब्द जर आपण पाहिला तर जो परमेश्वराशी जोडलेला आहे तो भक्त. विभक्त म्हणजे वेगळा. जो परमेश्वराशी जोडलेला नसतो तो भक्त कसा असेल ?

खऱ्या भक्ताला देव सर्वत्र दिसतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी. प्राणीमात्रात सर्वत्र तोच भरलेला आहे. त्याची दृष्टी सम होते. मग भेद राहत नाही. जो आपल्या अंतरात आहे तोच बाहेर देखील आहे हे त्याला लक्षात येते. मग द्वैत राहत नाही. तो अद्वैताचाच एक भाग होतो. तो परमेश्वराशी तदाकार होतो. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे हे त्याला सांगण्याची आवश्यकता राहत नाही. तरी देखील जेव्हा कधी तो सगुण मूर्तीचे दर्शन घेतो, तेव्हा देखील तो परमेश्वराच्या दर्शनाने भाव विभोर होतो. त्याचे नेत्र पाणावतात.

समर्थांनी “मनी लोचनी तो चि पाहे” असे जे म्हटले आहे, त्यातील “चि “म्हणजेच तोच परमेश्वर त्याला सर्वत्र दिसतो. जसा तो भक्त प्रल्हादाला दिसत होता. आपल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीला निर्जीव दिसणाऱ्या खांबामध्येही प्रल्हादाला परमेश्वराचे अस्तित्व दिसत होते.

खऱ्या भक्ताच्या डोळ्यासमोर परमेश्वराची सगुण मूर्ती नसली तरी काही बिघडत नाही. त्याच्या अंतर्यामी ती मूर्ती ठसलेली असते. सगुण निर्गुणाने त्याला काही फरक पडत नाही. “सगुण निर्गुण एकू गोविंदु रे “. अशी त्याची अवस्था असते. त्याला परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र जाणवते. अशा भक्ताला समर्थ ज्ञानी भक्त म्हणतात. भक्तीतून ज्ञान होते पण ज्ञान झाल्यानंतरही भक्ती संपत नाही. असा भक्त हा ज्ञानी भक्त असतो.

पण ज्ञानी भक्त म्हणजे भोळा भक्त नव्हे. हा फरक आपण समजून घ्यायला हवा. आपला असा सोयीस्कर समज असतो की भक्त हा भोळा असतो, त्याला व्यवहार कळत नाही. काही लोक अशा लोकांना मूर्ख किंवा बावळट देखील समजतात. परंतु ज्ञानी भक्ताचे असे वागणे समर्थांना अपेक्षित नाही. त्यांच्या दृष्टीने चातुर्य अखंड सावधानता हे मोठे गुण आहेत. त्यांना अपेक्षित असलेला ज्ञानी भक्त व्यवहारात देखील चातुर्याने वागतो. तो लबाडी करत नाही, तो स्वार्थी नसतो परंतु लोकांकडून फसवला जाईल एवढाही भोळा नसतो.

तिसऱ्या ओळीचा अर्थ पाहूया. तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात गुणी प्रीती राखे क्रमूं साधनाचा. ” ही खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत. परमेश्वराचे जे गुण आहेत की तो सर्वव्यापी आहे, शरणागताला आश्रय देणारा आहे, यासारख्या त्याच्या अनेक गुणां प्रति भक्ताची प्रीती म्हणजे प्रेम असते. परमेश्वराच्या गुणांवरच ज्याची प्रीती नाही, तो परमेश्वरावर प्रेम कसे काय करू शकेल ? असा भक्त साधनेचा क्रम देखील पाळत असतो म्हणजे जिवापाड जपत असतो. साधनेचा क्रम याचा अर्थ भक्त हा पायरीपायरीने परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते. उदा. परमेश्वराच्या नामाचे स्मरण, मनन, सदैव त्याचे चिंतन आणि मग पुढे त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. या सगळ्या विविध पायऱ्या आहेत. या ओळीतील राखे हा शब्द गुणांबद्दल प्रीती राखणे आणि साधनेचा क्रम राखणे या दोन्हींसाठी लागू पडतो.

चौथ्या ओळीत समर्थ अशा भक्ताबद्दल म्हणतात, ” जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ” सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम !कोण बरं असेल मग ? तर एक परमेश्वरच सर्वोत्तम आहे आणि अशा या सर्वोत्तमाचा दास होण्यामध्ये जी धन्यता आहे ती अन्य कशातच नाही. म्हणून अशा सर्वोत्तम असलेल्या परमेश्वराचा भक्त खरोखरच धन्य असतो. तसाच भक्त होण्याचा प्रयत्न आपणही करावा हेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद (नवीन) :: 

१) माझ्या दृष्टीत “समदृष्टी” आहे का – माझ्या भोवतालच्या माणसांमध्ये, निसर्गात मला परमेश्वर दिसतो का ?

२) मी “ज्ञानी भक्त” आहे की “भोळा भक्त” – व्यवहारात चातुर्य राखून भक्ती करण्याचा माझा प्रयत्न आहे का ?

३) माझ्या साधनेचा “क्रम” आहे का – नामस्मरण, मनन, चिंतन या पायऱ्या मी नियमितपणे पाळतो का ? 

– – – – 

श्लोक क्र. ४८ – – 

सदा देवकाजी झीजे देह ज्याचा |

सदा रामनामे वदे नित्य वाचा |

स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा|

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८|

अर्थ :  जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.

विवेचन : देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मारुतींची स्थापना केली आणि गावोगाव श्रीराम आणि मारुतीची मंदिरे निर्माण करवली. मठ उभारून महंत घडवले. हे सगळे भगवंताचेच कार्य त्यांच्या हातून झाले. त्या कार्यातच त्यांचा देह झिजला.

भगवंताचे कार्य करायचे म्हणजे केवळ नामस्मरणच केले पाहिजे असे काही नाही. रंजल्या गांजल्यांची, दीनदुबळ्यांची, प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच आहे. ते देखील भगवंताचे कार्य आहे असे म्हणता येईल.

भक्ताने नेहमी ईश्वरसन्मुख राहिले पाहिजे. तसे राहण्यासाठी भगवंताचे नाम अखंड त्याच्या मुखात आले पाहिजे. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड असते असा भक्त धन्य होय. व्यवहारांमध्ये बोलताना भलेही त्याला लोकरीतीनुसार व्यवहार करावा लागेल. परंतु अंतरातील भगवंताचे चिंतन अखंड सुरूच राहते.

तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, “स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा” म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम तोच आपला स्वधर्म समजून जो उत्तम प्रकारे करतो तो भक्त धन्य होय. बऱ्याच वेळा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सर्व त्यावरील कलाकार आहोत असे म्हटले जाते. आपल्या वाट्याला जी भूमिका आली असेल ती उत्तम प्रकारे करणे हे आपले काम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तोच आपला स्वधर्म आहे तो आपल्याला उत्तम रीतीने निभवता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।

पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।

त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा अतिशय प्रिय आहे. म्हणजेच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला आवडते. मग तुम्ही मंदिरात किंवा तीर्थयात्रेला गेला काय आणि नाही गेलात तरी चालू शकते. प्रत्येकाने आपले काम जर उत्तम प्रकारे केले तर हीच त्या परमेश्वराची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा आपण बांधली असे होईल. मग जगामध्ये आपोआपच सज्जनांची मांदियाळी तयार होईल आणि सगळे सुखी होतील. तेव्हाच ऋषींनी सांगितलेले अस्तित्वात येईल

 सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥

– – सर्व सुखी होतील सर्वांना आरोग्य लाभेल. अर्थात प्रत्येकाने आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तर…

– – आणि असे वागणारा भक्त जगामध्ये धन्य होईल. भगवंताच्या उत्कृष्ट भक्तांमध्ये त्याची गणना होईल.

स्वसंवाद :: 

१) माझ्या दैनंदिन कामात मी “देवकाज” पाहतो का – माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असा भाव माझ्या मनात असतो का ?

२) “स्वधर्म” म्हणजे माझ्या वाट्याला आलेली भूमिका – ती मी उत्तम प्रकारे निभावतो का की इतरांच्या भूमिकेकडे माझे लक्ष जास्त असते ?

३) माझ्या नामस्मरणाने किंवा वागण्याने इतर कोणाला परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे का ?

– क्रमशः श्लोक ४७ आणि ४८.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग”  – माहिती संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग”  – माहिती संकलक / लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

– रोझलीन फिशर

अश्रूंच्या एका थेंबात दडलंय संपूर्ण जग :

… रोझलीन फिशर यांच्या ‘टोपोग्राफी ऑफ टीअर्स’चा थक्क करणारा प्रवास 

… डोळ्यांतून ओघळणारा अश्रू हा वरवर केवळ खाऱ्या पाण्याचा एक पारदर्शक थेंब दिसतो. पण याच थेंबाला सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास एखाद्या महाकाय शहराचा नकाशा किंवा पर्वतदऱ्यांचे विहंगम दृश्य समोर येते.

२०१३ साली छायाचित्रकार रोझलीन फिशर यांनी एका विलक्षण प्रयोगाला सुरुवात केली, ज्याने मानवी भावनांच्या विज्ञानाला एक नवी दृष्टी दिली. फिशर यांनी या प्रकल्पाला ‘टोपोग्राफी ऑफ टीअर्स’ (Topography of Tears) असे नाव दिले. एका वैयक्तिक शोकाच्या काळात त्यांच्या मनात विचार आला की, माझे अश्रू सूक्ष्मदर्शकाखाली कसे दिसत असतील? इथूनच एका जागतिक स्तरावर गाजलेल्या प्रकल्पाचा पाया रचला गेला. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, फिशर यांनी उच्च क्षमतेच्या ‘रेझोल्युशन ऑप्टिकल मायक्रोस्कोप’चा वापर केला. त्यांनी जेव्हा स्वतःच्या अश्रूचा पहिला थेंब तपासला, तेव्हा त्यांना आलेला अनुभव थक्क करणारा होता. फिशर यांच्या मते, “हा अनुभव विमानातून जमिनीवरील दृश्य पाहण्यासारखा होता. “अश्रूंमध्ये केवळ पाणी नसते. त्यात तेल, प्रथिने, एन्झाईम्स आणि मिठाचे प्रमाण असते. जेव्हा हा थेंब सुकतो, तेव्हा त्यातील मिठाचे स्फटिक (Crystals) तयार होतात. हे स्फटिक वेगवेगळ्या आकृत्या धारण करतात, ज्या एखाद्या भूभागाच्या नकाशासारख्या दिसतात.

संशोधनादरम्यान फिशर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. दुःखाचे अश्रू, आनंदाश्रू आणि कांदा चिरताना डोळ्यांतून येणारे पाणी यांच्या रचनेत फरक असतो का? या एका विचाराने या प्रकल्पाला व्यापक स्वरूप दिले. त्यांनी स्वतःचे आणि इतरांचे मिळून जवळजवळ १०० अश्रूंचे नमुने तपासले. विज्ञानाने अश्रूंचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिले ‘बेसल’ (Basal) अश्रू, जे डोळ्यातील ओलावा टिकवून ठेवतात. दुसरे ‘रिफ्लेक्स’ (Reflex) अश्रू, जे कांदा चिरताना किंवा धुरामुळे येतात. तिसरे ‘सायकिक’ (Psychic) अश्रू, जे केवळ मानवी भावनांमुळे बाहेर पडतात.

आकडेवारी आणि निरीक्षणांनुसार, या प्रत्येक प्रकारच्या अश्रूची सूक्ष्म रचना वेगळी असते. दुःखाचे अश्रू जेव्हा सुकतात, तेव्हा त्यांची रचना विखुरलेली आणि गडद दिसते. याउलट, आनंदाश्रूंची रचना एखाद्या फुलांच्या बागेसारखी किंवा गुंतागुंतीच्या नक्षीसारखी भासते. कांदा चिरताना येणाऱ्या अश्रूंची भूमिती पूर्णपणे वेगळी असते. यामागचं कारण शोधताना असे लक्षात येते की, भावनांनुसार अश्रूंमधील हार्मोन्स आणि रसायनांचे प्रमाण बदलते. न्यूरोट्रांसमीटरमधील हा बदल अश्रू सुकल्यानंतर तयार होणाऱ्या स्फटिकांच्या रचनेवर परिणाम करतो. म्हणूनच, प्रत्येक अश्रू हा त्या व्यक्तीच्या तत्कालीन मानसिक अवस्थेचा जणू ‘फिंगरप्रिंट’ असतो.

– – – फिशर म्हणतात की, “आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे दिसते, ते हिमनगाचे केवळ एक टोक आहे. ” आपल्या भावना केवळ मनात नसून त्या आपल्या शरीरातील द्रवाच्या रेणवीय रचनेतही उमटतात. हा प्रकल्प केवळ विज्ञानाचा भाग नसून तो मानवी संवेदनांचे एक दृश्य काव्य आहे. एका लहानशा थेंबात इतकी गुंतागुंतीची सृष्टी दडलेली असू शकते, यावर विश्वास बसणे कठीण जाते. पण विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, आपण जेव्हा रडतो, तेव्हा आपण केवळ पाणी गाळत नसून आपल्या अस्तित्वाचा एक नकाशाच बाहेर टाकत असतो.

– – – आपल्या प्रत्येक भावनांची एक स्वतंत्र भूमिती असते, हे वास्तव आपण कधी मान्य करणार?

*******

माहिती संकलक / लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares